एखादा फोटो पाहाताना, त्यातली एखादी कथा उलगडत जाते. कधी कधी एकच काय पण अनेक कथा त्या फोटोतून आपल्याला दिसू लागतात. पण या कथा नेमक्या काय सांगतात? म्हणजे या गोष्टीतून ‘सत्य‘ आपल्या समोर येतं की त्यात आपल्या कल्पनेलाही काही वाव असतो? एखाद्या वेळेला अचानक काहीतरी फोटोत सापडतं आणि एखादी नवीनच गोष्ट त्यातून बाहेर येते. मग ती पुनर्कल्पना असू शकते किंवा एखादं गुपितही असू शकतं, नाही का? असा एखादा फोटो आपल्याला आतून बाहेरून बदलून टाकतो. आपल्या काळ, अवकाश, भावभावना, मानसिक आंदोलनं यांना पार बदलून टाकायची ताकद या फोटोत असते. फोटो म्हणजे काळ–अवकाशाचा खेळ आहे: ते आपल्याला मागे वळून बघायला भाग पाडतात, स्वप्न बघायला शिकवतात आणि नवा विचार करायचं आव्हानही देतात. फोटोमधून दिसणाऱ्या छोट्या–मोठ्या गोष्टीतून आपण कधी अटकळ बांधत असतो, भविष्याचा वेध घेत असतो, आणि एखाद्या वेळी चुकीच्या समजुतीही उभ्या करत असतो.
कलाकार ज्योती भट्ट यांच्या फोटोंबद्दलच्या लेख–मालिकेतलं हे पहिलं टिपण. ज्योती भट्ट यांनी १९५०च्या दशकात कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. कलाकार म्हणून आजवर त्यांनी निरनिराळ्या माध्यमात काम केलं आहे. त्यांनी सुरुवातीचं कलेचं शिक्षण चित्रकला विभागात घेतलं असलं तरी मुद्राचित्रकार म्हणून ते जास्त ओळखले जातात. न्यूयॉर्कच्या प्रॅट इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी मुद्राचित्रांचं प्रशिक्षण घेतलं. तसंच, बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या ललित कला विभागात त्यांनी १९६०च्या दशकापासून अनेक वर्षे शिकवलं. पण या सगळ्याच्या पलीकडे मला मुख्यतः त्यांनी काढलेल्या फोटोंमध्ये रस आहे. गेली अनेक वर्षे अथकपणे भारतभर फिरून त्यांनी वेगवेगळ्या जागा, मानवी समूह, त्यांचे रितीरिवाज, सांस्कृतिक वैशिष्ट्यं असं बरंच काय काय त्यांच्या कॅमेऱ्यात बंद केलं आहे. ही फोटो काढण्याची त्यांची प्रवृत्तीच म्हणावी लागेल. मधूनच कधीतरी कुठलेतरी फोटो काढलेत असा त्यांचा पिंड नव्हता. त्यात सातत्य आणि नेमकेपणा होता. कुठलीतरी जोरदार प्रेरणा यामागे होती किंवा असं फिरून फोटो काढणं ही त्यांची जणू काही निकड बनली असावी. याकाळात, त्यांच्या भटकंतीच्या दरम्यान साधारण पन्नास ते साठ हजार फोटो त्यांनी काढले असावेत.
भट्ट यांच्याकरिता एखादी घटना, परिसर किंवा सांस्कृतिक व्यवहार यांचं दस्तावेजीकरण करणं यापुरतं फोटो काढण्याची ही प्रक्रिया मर्यादित नव्हती. त्यांच्या फोटोतून इतिहास, संस्कृती यांचे निरनिराळे पैलू उलगडत जातात. तसंच, आजपर्यंत परिघावर असणारी आणि कधीचं न सांगितली गेलेली कथनं या फोटोंच्या निमित्ताने कॅमेराबद्ध होतात. त्यांच्या फोटोंमध्ये कलाशिक्षण, कलाव्यवहार असेल किंवा दैनंदिन जगण्याच्या, विविध जनसमूहांच्या कथा असतील किंवा रितीरिवाज – विधी असतील, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आधुनिक कलेच्या परिघात सामावल्या गेल्या. यात एकीकडे, ग्रामीण भागातील जीवनाचे दस्तावेजीकरण आहे. त्यात पारंपरिक कलारूपं, लोककला, लोकनृत्यं, सण, आणि विधी यांचे फोटो आहेत. तर दुसरीकडे, कलाजगतातील घडामोडींचं चित्रण देखील आहे. यात कला प्रदर्शनं, मेळावे, कलाकारांची व्यक्तीचित्रं, कलासंस्था, त्यांच्या इमारती यांचे फोटो आहेत. त्यात एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे बडोद्याच्या ललित कलाविभागाचे फोटो ! भट्ट तिथेच शिकले आणि नंतर तिथेच त्यांनी अनेक वर्षे शिकवलं. या काही दशकांच्या कालावधीत त्यांनी या कलाविभागाचे भरपूर फोटो काढले. या फोटोंच्या माध्यमातून विविध पातळीवर हा संवाद भट्ट यांनी घडवला आणि त्यातून सांस्कृतिक व्यवहार घडण्याची प्रक्रिया मांडली गेली. या कलाव्यवहाराचं वैशिष्ट्य असं की वरवर पाहाता जरी हे फोटो म्हणजे नुसतं दस्तऐवजीकरण वाटत असलं, तरी त्यातून एखादा साक्षात्कारी क्षण आपल्यासमोर येतो. हा क्षण किंवा ही घटना एखादं प्रदर्शन असेल, एखादा उपक्रम किंवा प्रयोग असे. पण महत्त्वाचं म्हणजे हे सारे क्षण त्या त्या काळात आधुनिक कला इतिहासाला आकार देणारे ठरले.
इथे तुम्ही पाहाताय तो ‘भारत भवन, भोपाळ १९८२’ या फोटोमध्ये कलाकार, साहित्यिक, समीक्षक एकत्र जमलेले दिसतात. ते ज्या सहजतेने एकमेकांसोबत बसलेले आहेत त्यात एक प्रकारची अनौपचारिकता आहे. ज्योती भट्ट यांनी, ‘भारत भवन, भोपाळ १९८२’ या नावाच्या फोटो मालिकेतील हा फोटो, १९८२ मध्ये भारत भवन, भोपाळ इथे काढला. त्याच वर्षी स्थापन झालेल्या भारत भवन या संस्थेची जडणघडण टिपणारा हा एक मोलाचा दस्तऐवज आहे. कविता, नाटक, दृश्यकला, सिनेमा आणि संगीत अशा सर्व प्रकारच्या कलाप्रकारांचा संगम इथे घडत गेला. जसजशी वर्षं लोटली तसतशी ही संस्था कलाकारांसाठी आणि सांस्कृतिक व्यवहाराचं केंद्रस्थान बनत गेली आणि आधुनिक कलेचं चर्चाविश्व घडवण्यात या कलाकारांनी सामुदायिकपणे महत्त्वाची भूमिका बजावली.
सुप्रसिद्ध आधुनिक वास्तुविशारद आणि नगर रचनाकार चार्ल्स कोरीया यांनी भारत भवनची रचना केली. कवी अशोक वाजपेयी आणि कलाकार जे. स्वामिनाथन यांच्या पुढाकारातून ही संस्था उभी राहिली. मोकळ्या, उघड्या जागा आणि गच्चीसारख्या रचना या सारख्या गोष्टी कोरिया यांनी आधुनिक इमारतींमध्ये पुन्हा एकदा आणल्या. मागे पसरलेला विस्तृत असा बडा तालाब (मोठा तलाव) आणि त्याच्या पार्श्र्वभूमीवर कोरीया यांनी या इमारतीमध्ये लांबलचक मोकळ्या जागा वापरून तिथेच खुल्या रंगमंचाची रचना केली आणि त्याच्या दोन्ही बाजूंना क्षितिजसंमातर पायऱ्या आणि रूंद उतरत्या जागा उभारल्या.
हा फोटो भारत भवनमधल्या सुरुवातीच्या काळातल्या अशाच एका अनौपचारिक भेटीचा साक्षीदार आहे. यात अनेक कलाकार पायऱ्यांवर वरपासून खालपर्यंत बसलेले दिसतात. मागे पसरलेल्या तलावावरून येणारे थंड वारे अंगावर घेत हे कलाकार गप्पा मारण्यात गुंग आहेत. ते चर्चा करतायत, बोलतायत, ऐकताहेत, आजूबाजूला पाहाताहेत आणि हे करताना जणू काही तलावावरून वाहाणाऱ्या वाऱ्याबरोबर येणारा सुगंध नव्या, उत्साहवर्धक, मूलगामी बदलांची नांदी देत आहे. चित्रकार आणि साहित्यिक भूपेन खखर, कलाकार विवान सुंदरम् आणि कला समीक्षक गीता कपूर दगडी भिंतीला पाठ टेकून बसले आहेत. मागच्या बाजूला मनजीत बावा आणि मृणालिनी मुखर्जी हे गीती सेन यांच्या शेजारी बसले आहेत. फोटोत अगदी पुढे, डावीकडून उजवीकडे, के. जी. सुब्रमण्यन, परमजीत सिंह, जोगेन चौधरी हे कलाकार आणि कवी अशोक वाजपेयी बसलेले दिसतात. हे सगळे कलाकार आनंदी पण विचारमग्न आहेत. त्यांच्यात कुठल्याप्रकारचं असमाधान किंवा तुटलेपण दिसून येत नाही. जणू काही सामूहिकरित्या हे सगळेजण कलेमधून येणारी मुक्तता आणि या नव्या जागेतून उभ्या राहाणाऱ्या नव्या शक्यता याबद्दलचे आडाखे बांधत आहेत आणि नव्या कलाविश्वाच्या परिकल्पना करत आहेत.
जे. स्वामिनाथन यांचा ही संस्था घडविण्यामध्ये मोठा वाटा होता. त्या काळात चालू असलेल्या आधुनिक आणि समकालीन कलेच्या चर्चाविश्वाला एक पायाभूत पर्याय म्हणून त्यांनी याकडे पाहिले. या फोटोमध्ये जरी आपल्याला स्वामिनाथन दिसत नसले तरी त्यांचं अस्तित्व अजिबातच नाकारता येत नाही. त्या काळात दिल्ली, मुंबई आणि बडोदा या शहरांमध्ये आधुनिक कलाव्यवहाराची जोमाने भरभराट होत होती. पण तिथल्या कलाकारांचा भर कलेच्या वैश्र्विकतेच्या मांडणीवर भर होता. याला छेद देत स्वामिनाथन यांनी भोपाळमध्ये ‘भारत भवन’ची परिकल्पना केली. यातून त्यांना एकरेषीय कला इतिहास नव्हे, तर कला निर्मिती आणि कलासंस्थाचे अनेक इतिहास सामावून घेणाऱ्या आणि अनेक अंगांनी उमलत जाणाऱ्या कलाविश्वाची कल्पना अपेक्षित होती. या फोटोतला हा कलाकारांचा समूह पायऱ्यांवर बसलेला आहे, त्यांच्या हसत खेळत, गप्पा मारतानाचा हा फोटो पाहाताना ज्योती भट्ट यांच्या या सगळ्यांशी असलेली घट्ट मैत्री जाणवते. पण त्याचबरोबर, हे सगळेजण नवे विचार आणि नव्या आकांक्षा घेऊन बसलेले दिसतात. प्रस्थापित कला विचाराच्या विरूद्ध जाणारा नवा विचार त्यांच्या मनात आहे. ते सारेच कॅमेऱ्याकडे रोखून न पाहाता एका बाजूला पाहात आहेत. कॅमेऱ्याच्या लेन्सपासून बाजूला वळलेल्या त्यांच्या नजरा एकाच दिशेला रोखल्या आहेत. आणि, ते सारेजण, एक नवा विचार, नवी दृष्टी आणि कलानिर्मितीच्या नव्या शक्यता याबद्दल जणू काही तर्क करत आहेत, असं वाटत राहातं.
या नव्या दृष्टीत अनेक विचारप्रवाहांचा अंतर्भाव होता. यातला एक धागा भारत भवनच्या रचनेमध्ये दिसून येतो. या फोटोत जरी ते प्रत्यक्षात दिसत नसले तरी जे. स्वामिनाथन आणि भारत भवनच्या इमारतीचं सावट इथे सतत जाणवत राहातं आणि त्यातूनच या फोटोमध्ये जे काही दिसतं आहे, त्याचे निरनिराळ्या अंगांनी अर्थगठन करणं आणि ते वेगवेगळ्या पद्धतींनी मांडणं शक्य होतं. कला आणि हस्तकला या विभागणीला त्यांनी आधुनिक कलाव्यवहार आणि आधुनिकतेच्या वैश्र्विक मांडणीच्या परिप्रेक्ष्यात बघितलं. त्यांनी कलेतील समकालीनतेची व्याख्या, ‘विविध संस्कृतींच्या सह-अस्तित्वाला एकाचवेळी असलेली मान्यता’, अशी केली. विशेष म्हणजे, भारत भवन हे आदिवासी कलेच्या संग्रहणाचे केंद्र बनले आणि हे कलाप्रकार येथे एकत्र आणण्याकरिता स्वामीनाथन् कारणीभूत ठरले. तोपर्यंत आधुनिक कलेचं चर्चाविश्र्व हे मुख्यतः शहरी भागात आकाराला आलं होतं. हा ‘विरूपित दृष्टीकोन’ दुरूस्त करण्याचा स्वामिनाथन् यांचा प्रयत्न होता. त्यांचा हा पवित्रा ज्योती भट्ट यांच्या भारतातील ‘जिंवत परंपरा’चं दस्तऐवजीकरण करण्याच्या प्रकल्पाच्या जवळ जाणारा होता. फक्त भट्ट यांनी ते फोटोग्राफीच्या माध्यमातून साधलं.
के. जी. सुब्रमण्यन, ज्योती भट्ट, जे. स्वामिनाथन, मृणालिनी मुखर्जी आणि गीता कपूर यासारख्या कलाकार आणि समीक्षकांनी त्यांच्या कला व्यवहारातून आणि लिखाणातून परंपरा आणि स्वदेशीवाद यावर मांडणी केली. अर्थातच, त्या सर्वांचे त्याकडे बघण्याचे दृष्टीकोन आणि मनोभूमिका या परस्परांहून निराळ्या तर होत्याच, शिवाय त्या संकल्पनांतील गुंतागुंतीची उकल करणाऱ्याही होत्या. आधुनिक कलाव्यवहारात ‘परंपरा’ या विषयाला त्या काळातले अनेक कलाकार आपापल्यापरीने भिडलेले दिसतात. हा फोटो याच अनेकविध भूमिका एकत्रितपणे आपल्यासमोर घेऊन येतो. पण त्याचबरोबर, या संकल्पनांची गुंतागुंतही तो एका अर्थाने वाढवतो. असंही बघावं लागेल की वर्चस्ववादी आणि कला – हस्तकला असा भेद करणाऱ्या उतरंडीवर आधारलेल्या कला विश्वावर एक उतारा म्हणून या संस्थेची, तिच्या खुल्या अवकाशाची कल्पना केली गेली होती. अशा ठिकाणी या कलाकार-लेखकांचं एकाच वेळी असलेलं अस्तित्वही हा फोटो दाखवतो आणि या पर्यायी अवकाशाच्या संदर्भात समकालीनता या संकल्पनेला हा फोटो कशा पद्धतीने आपल्यासमोर ठेवतो, ते पाहाणंही गरजेचं ठरतं. ही संस्था एक विशिष्ट भूमिका घेऊन सुरू झाली असली, तरी अनेक वादांमध्ये ती नंतर अडकत गेली आणि तिची मूळची प्रेरणा मागे पडली. त्यातले ताणे-बाणे नंतरच्या काळात दिसू लागले. असं असलं तरी हा फोटो किंवा ही दृश्यप्रतिमा मात्र आपल्याला गतकाळात घेऊन जाते आणि ज्या विचारांवर या संस्थेचा पाया रोवला गेला त्याची पुनर्कल्पना करायला उद्युक्त करते. पायाभरणीचा हा क्षण त्याच्या पोटात नवी मांडणी, नवा प्रगतीशील विचार घेऊन आलेला होता. या फोटोमधली सामूहिक कृती ही या नव्या मांडणीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. त्या सगळ्या कलाकारांच्या फोटोबाहेर वळलेल्या नजरेतून नवी स्वप्नं, नवी दिशा, नवं वळण असं बरंच काही आपल्याला जाणवून जातं. पण ते तिथवरच मर्यादित नाही. तर, या ‘आदर्श दृष्टी/भूमिके’चा अर्थ आपण आज कसा लावतो आणि काळाच्या ओघात नव्या स्मृती तयार होत असताना, काही पुसल्या जात असताना, या साऱ्याच्या दरम्यान या प्रतिमेचा अर्थ कसा घडत आणि बदलत जाईल, हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.
प्रतिमा सौजन्य: ज्योती भट्ट अर्काईव, एशिया आर्ट अर्काईव