मुलांना खेळण्यासाठी मुद्दामून तयार केलेले वाळूचे खड्डे, खेळण्याचे परिसर, मनोरंजनासाठी तयार केलेल्या कृत्रिम जागा या नव्या शतकाने आणलेल्या बाबींनी सोसायट्यांसारख्या मर्यादित झालेल्या ठिकाणी राहणाऱ्या आणि वाढणाऱ्या मुलांच्या एकत्रित खेळण्याला आणि तशा कल्पनाविश्वाला बंध घालण्यापूर्वी इथे धूळ होती. या कृत्रिम घटकांच्या आगमनापूर्वी भिंती न घातलेल्या पण सुरक्षित वाटेल अशा आम्हीच आखून घेतलेल्या जागेत आम्ही तासनतास पळायचो, हुंदडायचो, तर कधीकधी जथ्याने हुल्लडबाजी करायचो. धुळीत खेळताना नवीन काहीतरी धाडस करायची खुमखुमी यायची. धुळीत खेळणं म्हणजे मळलेले कपडे, माखलेला चेहरा, गुडघे, खरवडलेले तळवे आणि धडपडलेले आम्ही हे तर ओघानं आलंच आणि हे सगळं तुम्हाला हवंहवसं असायचं. धूळ म्हणजे गृहपाठ, घरकाम आणि पालकांच्या दट्ट्यातून काही वेळ का होईना सुटका! १९८० आणि ९०च्या दशकात धूळ हाच खेळण्याचा मुख्य आशयविषय होता आणि त्यानंतर डिजिटल जगाला वाहून घेतलेल्या मुक्त आणि भटक्या आयुष्यात धूळ किती महत्त्वाची आहे याचे महत्त्व या दोन शतकांनी नक्कीच जाणले होते.
आर्थिक उदारीकरण होण्यापूर्वीच्या मुंबईत राहत्या वसाहतींना जेव्हा कंपाऊंडच्या भिंती नव्हत्या, आपोआप उघडणारी दारं किंवा बायोमेट्रिक स्कॅन नव्हते, तेव्हा या वसाहती ही आमची खुली मैदानं होती. क्रिकेटच्या धावपट्ट्या किंवा लगोरी, खो-खो, पकडापकडी (आठवलं का हे?) दुसरं म्हणजे आमच्या वेस्पा, बजाज स्कूटर, जुन्या प्रीमिअर, आणि अम्बॅसॅडर गाड्या तिथेच लागायच्या आणि तिसरं म्हणजे दांडिया, होळी आणि दिवाळीही इथेच साजरी व्हायची. आमच्या सोसायट्यांना पक्क्या संरक्षक भिंती अशा काही नव्हत्या, रस्त्याच्या कडेचे छान गुळगुळीत पदपथ नव्हते, ना कृत्रिम गवत किंवा बागा नव्हत्या. धुळीमुळे कधीही त्या जागेचे महात्म्य कमी झाले नाही, बदलत्या ऋतुमानानुसार त्या जागेनं वेगवेगळी रूपं ल्याणं सोडलं नाही.
माती आणि धुळ ही दोनच अंग असणारं हे मैदान सोसायटीतल्या लोकांचं भेटायचं, विचारपूस करायचं आणि चहाटळीचं एकमेव ठिकाण असायचं. एवढंच काय, पण चौकीदारांनाही त्यांच्या गंजलेल्या खुर्च्या जुळवून विडी शिलगावयाला (तेव्हाचे हे चौकीदार साहजिकच कोणत्याही नोंदणीकृत कंपनीचे नसायचे) मासेवाली, भाजीवाला, खारी बिस्कीटवाला आपापल्या मालाचे नाव घेत ओरडायचे, तर सुऱ्यांना धार लावणारा त्याच्या सायकलवर यायचा आणि बोहारीण भांडी घेऊन यायची. अशाप्रकारे, इमारतीच्या मधोमध असणारे हे मैदान म्हणजे सर्वांसाठी रंगमंच होता.
तिथली सिमेंट कॉंक्रिटची टाकी नेहमीच धुळीने माखलेली असायची. तरी आम्ही मुली आणि मुलं तिच्यावर ओळीने बसलेले असायचो आणि कोणीही कधी नाकं मुरडायचो नाही, “हे काय माझे कपडे घाण होतील ना.. इथे खूपच धूळ आहे”. हो कपडे मळणार तर होतेच, आणि तो तर मुद्दा होता. ती टाकी म्हणजे खुल्या मैदानातली छुपी जागा होती जणू. त्या छुप्या जागेत आम्ही खुलेपणाने मोठ्या भावंडांविषयी बोलायचो आणि इथेच आमच्या भुताच्या गोष्टी, करमचंद, महाभारत, किले का रहस्य आणि पूर्वी नितळ सत्य मानलेल्या अनेक भोळ्या समजुतींच्या आधारे आमच्या चर्चा रंगायच्या. ही धूळमय जागा शरीफ आन्टी आणि तरुण मुलामुलींसाठी आकर्षणाचे ठिकाण नक्कीच नव्हती, मात्र आमच्यासाठी हा आमचा भेटायचा अड्डा होता. इथे जमून आम्ही कुजबुज करायचो, विरुद्ध लिंगाविषयी बोलता बोलता जाणून घेण्याची उत्सुकता इथेच शमायची. इथे या धुळीत बसून आमच्या गप्पांना आणि चर्चांना जे उधाण यायचं ते घरातल्या रंगवलेल्या चार भिंतीत कधी येणार नव्हतंच.
खेळून झालं की सगळे मिळून कपडे झटकणे आणि पार्श्वभागाला, हातांना, पायाला आणि केसांवर बसलेली धूळ झटकणे ही आता खेळ संपल्याची आणि घरी जाण्यापूर्वीची सामुहिक कृती होती. आम्ही आमचा जंगली अवतार उतरवून आता रामायणातल्या राम सीतेच्या लव आणि कुश या विनम्र, पारंगत आणि सद्गुणी मुलं व्हायचो.. पावित्र्याचे वाहकच जणू. घरात शिरल्यावर आमचं वर्तन पूर्ण विरुद्ध असायचं. आम्ही घरात आल्यापासून स्वच्छ होण्याचे अनेक सोपस्कार आम्हाला करावे लागत, जसं की नळाखाली खसाखसा हातपाय धुवायचे, बदललेले कपडे बादलीत टाकायचे आणि स्वच्छ, छान वासाचे कपडे घालायचे. जेवायला बसण्यापूर्वी स्टीलची ताटं स्वच्छ पुसून, चटई झटकूनच मांडी घालून जेवायला बसायचे. अशाप्रकारे आमच्या घरांमध्ये धुळीला नावापुरती का होईना, पण कायमस्वरूपी जागा होती आणि यावर बारीक नजर ठेवून होतो.
वरवर पाहता, आमचा दिवस दिनदर्शिका, घड्याळ आणि दारावर येणाऱ्या लोकांच्या वेळांनी ठरलेला असायचा. सकाळी सहा वाजता पेपरवाला, ७ वाजता दूधवाला यायचा, तर ८ वाजता कचरावाला यायचा. पण अजून जरा खोलवर जाऊन पाहिलं तर घरातली धूळ झटकणं आणि कानाकोपऱ्यातला केर काढणं आणि घर नीटनेटकं ठेवणं हाच दिवसभरातला मुख्य कार्यक्रम असे. त्यामुळे आमचा घरातला वावर कसा हवा याचे यमनियम ठरलेले होते: गाडीवर उडी मारू नकोस, सोफ्यावर पाय ठेवून चढू नकोस, घरभर फिरू नकोस, मुख्य दारातून अस्वच्छ सज्जात जाऊ नकोस, चप्पल घालून घरात येऊ नकोस..इ. इ.
कामवाली अक्का खाला हिला घरात मानाचं स्थान होतं. कारण तर कळलं असेलच.. ती स्वच्छतेच्या कामाची महाराणी होती आणि ती झाडू, खराटा आणि फडके या पवित्र साधनांच्या आधारे हे पवित्र कार्य पार पाडायची. मी लहान असताना ही कामवाली बाई सुट्टी मागायला यायची तेव्हा आईचा चेहरा विनोदी झालेला असायचा. आता तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला नीट उमगतात..तिच्या चेहऱ्यावर भीती आणि वैताग दोन्हीही दाटून यायचे. ती सुट्टी घेणार म्हणजे स्वच्छता कर्म बंद (आणि ती तिच्या गावी गेली तर आठवडा किंवा महिनाभर देखील कामाला सुट्टी आणि मग तिच्या जागी बदलीची महाराणी मिळवायची). तासातासाला आईने स्वच्छता केली नाही तर ते त्या घराचं आणि आईच्या व्यवस्थापन कौशल्याचं अपयश असे. घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्याचा वसा त्यांच्या सासूने आणि आईने त्यांना दिला होता. घरात धूळ नसणे म्हणजे घरातली सर्व कामं सुरळीत सुरू आहेत आणि यमनियमांचे पालन होत आहे.
दुपारच्या ‘चाय पे चर्चा’ वर शेजारच्या काकू, चाची आणि बुवाबरोबर अनेक वेळा धुळीचे व्यवस्थापन हाच गरम विषय असे. प्रत्येकजण कामवाल्या बाईला हाताशी घेऊन धुळीचा फज्जा कसा उडवतो याचे किस्से, कहाण्या आणि युक्त्या सांगे. एका संध्याकाळी अम्मी आणि शेजारच्या काकूंमधलं संभाषण आजही आठवतं. एक काकू सांगत होत्या, “मी स्वयंपाकघराचा ओटा बाईकडून कॉलीनने स्वच्छ करून घेते”. दुसऱ्या काकू त्यांचं सांगू लागल्या, “मी वॉश बेसिन घासायला बाईला लाईफबॉय देते”. मग आईनेही सुरुवात केली, “आम्ही आत्ताच व्हॅक्यूम क्लिनर आणला. पण मी बाईला नाही हात लावू देत. त्यानं जे काही साफ करायचं ते मीच करते”. त्यांनतर त्या तिघींमध्ये झालेली कुजबुज मला स्पष्ट ऐकू येत होती. व्हॅक्यूम क्लिनर हे घरातल्या स्त्रीसाठी स्वच्छतेचं सर्वात उच्च दर्जाचं आणि अगदी पवित्र, हवंहवंसं साधन असतं. त्यानं कसं पद्धतशीरपणे घरातली धूळ, जळमटं, साठलेली धूळ आणि कोपऱ्यात (पलंगाखाली आणि खिडकीखाली) ठाण मांडून बसलेली कोळ्याची जाळी मुळापासून घालवायचं पुण्याचं काम हे मशीन करतं. ब्रिटीशांमध्ये मान्यवर लोक चहा घेताना त्यांच्या नेमक्या चर्चांमध्ये राजकारण, पर्यावरण या विषयी चर्चा करतात, हे तर संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र इकडे आमच्याही भारतीय गृहिणी वाऱ्याची दिशा, प्रकार आणि त्यामुळे येणारी धूळ यावर चर्चा करण्यात त्या ब्रिटिशांनाही मागे टाकतील. आता हेच ऐका: “मी सांगते तुम्हाला अय्यर वाहिनी, या हवेनी तर नाकात दम आणलाय. सगळ्या घरभर फक्त धुळीचं साम्राज्य! मी किती स्वच्छता करत असते तरी!!” मी खट्याळपणे म्हटलं, “जोपर्यंत वारं असतं तोपर्यंत तू सफाई करताच राहतेस”. आणि या अवखळ बडबडीसाठी मला गालावर चांगलाच प्रसाद मिळाला.
ही चर्चा एवढ्यावरच थांबत नाही, तर ती तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांपर्यंत जाते. आमच्या काचेच्या खिडक्यांच्या जागी आता सरकत्या खिडक्या आल्या. केरसुणीला आता प्लास्टिक केस आलेत आणि आता फारशी पुसताना मॉपचं फडकं पिळून वापरण्याचं तंत्रज्ञान आलंय. आता घरात अनेक प्रकारच्या लिक्वीडना स्थान मिळालं आहे (डेटॉल व्यतिरिक्त बरं का). यांनी शक्य तेवढी प्रत्येक पृष्ठभागावरची धूळ नेस्तनाबूत होते. वाईट याचं वाटतंय की आता त्या धुळीला अंगाखांद्यावर बागडू देणाऱ्या टाकीची जागा सिंटेक्स टाकीनं घेतलीये आणि मैदानावर सिमेंट, पेवर ब्लॉक आणि कृत्रिम खड्ड्यांचं आवरण चढलंय. पूर्वीसारखा आसरा घेता येईल अशी धूळ आता आमची मैत्रीण किंवा मित्र राहिलेली नाही, उलट ती घालवण्यासाठी औद्योगिक साधनं तयार करायला धूळच प्रोत्साहन देत आहे. कदाचित आमच्या साध्यासुध्या केरसुण्या आणि झाडूंना कायमची विश्रांती मिळणार.
आता मी माझ्या स्वत:च्या घरी आहे, आणि माझ्या आईला अभिमान वाटावा असं काही धुळीविषयी मी वागत नसल्याने— आपल्या आयांना घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्याचा किती ताण असायचा याची जाणीव होते. माझ्या घरी कोणी लहान नसल्याने घरात जमा झालेल्या धुळीची सर्व जबाबदारी साहजिकच माझ्यावर येते. काचेच्या किंवा लाकडी कपाटात ठेवूनही जेव्हा माझ्या पुस्तकांवर धूळ बसते तेव्हा मात्र मला चीड येते. माझे सोफ्याच्या कोपऱ्यात जाऊन बसलेल्या, काचसामानावर आणि पलंगाच्या डोक्याशी जमा झालेल्या धुळीशी कायमस्वरूपी धर्मयुद्ध सुरू आहे. घरात पश्चिमेच्या जोरदार वाऱ्याबरोबर येणाऱ्या वाऱ्याविषयी आणि तो बाल्कनीतून आणत असलेल्या धुळीविषयी तक्रार करत असते. मग मी धूळ घरात येऊ देण्यापासून ते वाऱ्याशी अखंड सुरू असणाऱ्या भांडणातला साथीदार असणाऱ्या माझ्या नवऱ्याकडे मोर्चा वळवते, “या वाऱ्यामुळे किती धूळ येतीये. बघ की ही धूळ.. मी किती वेळा साफ करू!” आणि त्याचं उत्तर तेच, मला ओळखीचं असलेलं..
चित्र सौजन्य : विक्रम मराठे