निखिल बैसाणे

वलय



back

माझं जगणं हे मृत्य समान होणं आणि मी जिवंतपणे मरणकळा सोसणं हेच माझं प्राक्तन आहे आणि त्याला सामोरं जाणं हेच माझं कर्तव्य- या बाष्कळ कल्पना वैफल्यग्रस्त मनाचे तांबूस स्वप्न आहे. जिवंतपणे मरणे म्हणजे नेमकं काय? काय अर्थ असतो जगात जगत जगत मरण्याचा आणि मरत मरत जगण्याचा?  मुळात मृत्यूच्या तळघरात कैद असेलेल्या शीतल अर्थाची जिवंतपणी सुटका करणं शक्य नाही. या अर्थाचं निपचित पहुडलेले स्वरूप वाट पाहत असतं ते मृत्यूचीच. कारण त्याच्या मृत्यूचा अंत माझ्या मृत्यनेच आरंभ होईल. माझ्या अंताने त्यात जीवाचा संचार होऊन तो रडू लागेल.

मरण स्वस्त आहे. ते सुंदर आहे. ते संपूर्ण आहे. किंवा नाहीही. जीवन मुखवटा आहे. ते पाचूच्या आभाळाला झाकळणारे असंख्य तलम, सफेद, ढग आहे. जीवन तहान आहे, जीवन भोगाची अभिलाषा आहे. ती आकांताने मारत सुटलेली कधीच न संपणारी आरोळी आहे. जीवन धडपड आहे. जीवन जोडणी आहे. ते उजळणी आहे. जीवन मरूस्थलातील बिन पानाचं खुजं रोपटं आहे. या रोपाला बोथट काटे आहेत. या काट्यांची माळा करून अंगुलीमाल व्हावं हे सर्वानाच हवंय. हा काटुंगलीमाल बनविण्यात सर्वांना रस आहे. हा रस कोरडा आहे. तो शुष्क आहे. तो खडबडीत आहे. हा रस तप्त आहे. हा रस तहान उत्पन्न करतो. तो घश्यातल्या चिवट कातडीला आलिंगन देवून निजून राहतो. हा रस खारट आहे. तो थेंब थेंब गळतो. 

घरात आमसूल घातलेली मुगाची डाळ शिजतेय. तिच्या तांबड्या वासाचा हलका वावर माझ्या मनाच्या आर्त कोपऱ्यातही जाणवतोय. हा वास सर्वत्र फिरतोय. माझ्या नाकाच्या शेंड्यावर बसतोय. तेलकट असल्याने निसटतोय. त्याने तिथे खणून घ्यावं. आपली मुळं घट्ट करावी. घट्ट मुळांची झालर विणावी. झालर विणून ती पांघरून घ्यावी. पांघरून तिची उब सोसावी. शेजारी ठेवलेल्या कांस्याच्या तांब्यातला शेवटचा घोट मी जिभेवर ठेवला आणि कोपऱ्याचा त्याग केला. आमसूल मला पटत नाही. पायातला पट्टा घट्ट करत मी चटचट त्या कोपऱ्यातून सटकलो. ऊन मी म्हणत होतं हा आंबलेला वाक्प्रचार आहे. याची जिलेबी पाडल्यास कदाचित गोड लागेल. त्या जिलेबी सारख्या गोल गोल रस्त्यावर मी एकटाच होतो. माझी सावली समोर चालत होती. रात्रीच्या पावसाने कोपऱ्यासकट सारं रान लिबलिबीत झालंय. शांत झालंय.
                                                                   
काल भल्या पहाटे झोप मोडली ती प्राजक्ताच्या म्हाताऱ्या होत चाललेल्या सुवासाने. गोधडीवर हाताची उशी करून अगदी दाराशेजारी झोपलो असल्याने गंध माझ्या अंगावर पहुडला. हा सुवास अंगांगात गोंदवून घ्यावा म्हणून माझ्या गोधडीची उब सोडून चोरपावलांनी बाहेर पडलो. रात्री अण्णांना पुन्हा उशीर झाला होता,  तेव्हा पहाटेच त्यांना त्रास देणं हे माझ्या बाळबोध बुध्दीलाही नकोसं वाटलं. वाळत आलेल्या दुर्वेवर नेहमीसारखाच लालभडक गुंजेचा सडा पडला होता. त्या सड्यातल्या प्रत्येक थेंबावर पापणीच्या रंगाची काळी टिकली शोभून दिसत होती. आई असताना ती देखील कुंकवाखाली एक अलगद बुक्क्याची रेघ काढी. इथे आल्यावर पहिल्याच वर्षी तिने हट्टाने गुंजेचं लहानगं रोप लावलं होतं. त्याला सोबत व्हावी म्हणून ती गुंजेसारखं कुंकू लावे. पुढे रोपाचं वेलीत रूपांतर झालं. वेल वाढल्यावर आई पहाटेच उठून ती गुंज गोळा करी. एकही गुंज तिच्या नजरेआड होणं तिला मान्य नव्हतं. सर्व गुंज टिपून ती भरलेला पदर आवरत घरात येई आणि नंतर पुढच्या कामांकडे वळे. अण्णा दुपारी घरी नसले कि ती ज्वारीच्या पिठाच्या डब्यामागची बरणी काढे आणि नंतर तिचे तासन तास गुंजा मोजण्यात जात. ती चौथी यत्ता शिकली असली तरी गणितात कच्चीच होती. मला शाळेला सुट्टी असल्यावर तिच्या समोर बसकण मारून बसणं हा माझा नेहमीचा उद्योग. गुंजा मोजताना तिच्या जांभळ्या ओठांची लयबद्ध हालचाल गुप्त वाटे. हालचाल कित्येकदा मध्ये थांबे. मुख्य किवाड कोणी ठोकावलं, अंगणात गुराख्याच्या आवाज झाला, किंवा माळ्यावर मांजर शिरली- अशी बरीच कारणं तिच्या मोजमापाचा खोळंबा करी. कारण निस्तरल्यावर तिच्या अंधाऱ्या कोपऱ्यातला कंदिलाची वात वर करून ती पुन्हा गुंज मोजत बसे. तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या कंदिलाची मंद आभा पाहण्यात मी गुंतलेलो असताना, एक दिवस मला ते कळलं. तिची मोजणी चुकली होती. ५०३ गुंजा नंतर ती सरळ ६०४ वर पोहचली होती. तिच्या बांगड्यांजवळ बारीक स्पर्श करून मी हे सांगितलं. ती थबकली. तिच्या कपाळावरली गुंज किंचित मागेपूढे झाली. नंतर माझ्याकडे न पाहताच तिने जाजमावर पडलेली गुंजाची नक्षी सावरली आणि पुन्हा ६०५ म्हणत मोजू लागली. मी पुन्हा तिच्याकडे पाहण्यात गुंग झालो.. ती जेव्हा जाणार हे कळलं तेव्हा मी हटकून सर्वांना सांगितलं- ‘तिला गुंजेचं कुंकू लावा’, पण माझे बोल मातीत मिसळले. आत्याने भांगेपासून नाकापर्यंत तिचं मळवट भरलं. पण मी चोरून एक गुंज तिच्या दगडासारख्या हातात ठेवायचं विसरलो नाही. त्या कोपऱ्यात तिच्या पंचधातूच्या निरंजनाशेजारी मी बऱ्याचदा तो कंदील लावून बाहेर पडायचो. 

आज उठलो तेव्हा हवेत गारठा होता. खूप मेहनत करून कमावलेल्या माझ्या तरुण दंडांवर हल्ली शर्ट अगदी घट्ट बसतं. लहानपणी आई जाण्याआधी मी बराच लठ्ठ होतो, तेव्हा बंडी वगैरे कशी घट्ट बसायची? अगदी तसच.  शहराच्या झिरो पॉइंटलगतच्या पपईच्या बागेत रात्रीच्या पावसाने बऱ्याच पपया गळल्या असतील. ते पाहून यावं? मृत पपईंच्या टाळूवरचं संत्र्याच्या रंगाचं लोणी खाता येईल. पण तिथे जाणं महाग आहे. पाय उचलणं कठीण आहे. थकवा फार जास्त आहे. अंग फार क्षीण आहे. तरी जायलाच हवं. पपईच्या प्रेतांना पहायला हवं. मी पटपट झिरो पॉइंटला पोहचलो. या ठिकाणी बरेच फेरीवाले उभे होते. प्रत्येक फेरीवाल्याकडे शेंगदाणे आणि फुटाणे मिळतात इथे. मी शेंगदाणे घेतले दहाचे आणि रस्त्याच्या मागल्या भूकंपात उचटलेल्या भागावर बसलो. शेंगदाण्यात फुटाणे देखील होते. त्याचं काय करावं म्हणून मी ते उचटलेल्या भागातल्या छिद्रात हळुवार पेरु लागलो. इथे शेंगदाण्यांसोबत पेरू असायला हवा होता. पण पेरूचा मौसम यायला अजून अवकाश आहे. शेवटचा उष्ण शेंगदाणा दाताखाली घेताना ती दिसली. एकटीच होती. बऱ्याच दिवसाने दिसली होती. ती इकडेच येत होती. माझ्या दिशेनेच चालत होती. शेंगदाणा थांबून थांबून चावून मी फस्त केला आणि काहीसा तिरकस उभा राहिलो.
दीड पायांवर उभं राहणं दाभाडेंना आवडत नसे. ‘हे असं करणं म्हणजे बाद होणं असं असतं हे लक्षात ठेव.’ पण मुळातच ज्यांची लवचिकता लाजून लपून लयास गेली त्यांना दोन पायांवर उभं राहणं जमणार नाहीच. दाढी खाजवत हनुवटीच्या कोपऱ्यावरील एक लांबडा केस उपटला. तो फुटाण्यांना दिला. माझी कृती सुरू असतानाच ती समोर आली. तिच्या डाव्या, पसरट हातात मी शेंगदाण्याची सुरनळी दिली. रिकामीच. कमरेपर्यंत मोकळे केस हलवत ती हसली. खूप जास्त हसली. का हसली? तिच्या करंगळीचं पाच इंच लांब, लालभडक नख मी धरलं आणि आम्ही चालू लागलो. या नखाला पुन्हा मोजायला हवं. आम्ही चालू लागलो. मी आणि माझ्या शेजारी ती. 

मला खरंतर तो दिवस आठवत नाही जेव्हा आम्ही भेटलो. पाऊस नव्हताच. मंद वारा वगैरे देखील नव्हता. रस्त्यावर नेहमी सारखीच गर्दी होती. लोकं नेहमी सारखीच ये-जा करत होती. त्यांच्या हातात बाजाराच्या खूप जास्त फुगलेल्या पिशव्या होत्या. एक मिनिट, बाजाराच्या पिशव्या होत्या तर तो नक्कीच रविवार असेल. रस्त्यावर डुकरंही होती. आणि कुत्रीपण. लोकांच्या काळ्या चपला डांबराच्या उग्र, गडद पाठीवर सावकाश पडत होती. माझ्या पायात कालच घेतलेली नवीकोरी, ऊंच टाचेची सँडल होती. सोनेरी रंगाची सरस अशी. कालच नवीन गंगावन घेतलं होतं जे आता माझ्या डोक्यावर अगदी बेमालूम बसलं होतं. आईच्या पोटी पुरुषाच्या शरीरात जन्म घेणं हेच माझं पाप. आता कितीही सुया टोचून घेतल्या तरी ते पुरुषी टक्कल काही लपत नाही. मग असच कधी गंगावन, कधी रुमाल, कधी पदर, तर कधी ओढणी. माझ्या काही बहिणी आगगाडीत कपाळची आग आग करत, उजळ माथ्याने फिरतात. पैसे मागतात. त्यांच्या सहा सहा इंच कोर्‍या भांगेत बर्‍याचदा कुंकू भरलेलं असतं. कोणाच्या नावाचं? आमच्या लोकांना कुंकू निषिद्ध. पण रक्तात भिनलेल्या सवयी, अभिलाषा, या डोकं फोडून बाहेर विसवतातच. त्या विसावतात रक्ताची घट्ट लालिमा घेऊनच.   

स्टेशन जवळच्या थोड्या वाकलेल्या खांबाजवळ येत मी पाठ टेकली. त्या खांबावर आज वंगणाचे चिकट ठसे नव्हते. ओठांची कडा ओलांडलेली स्वस्त लिपस्टिक मी हातरुमालाने टिपून तो हातात चुरगळला. चप्पल पायात खेळवत असताना तो दिसला. तो आला तेव्हा त्याची तेलकट त्वचा थकव्याच्या थेंबांनी चकाकत होती. त्याच्या नाका खाली, ओठांवर बारीक लवसदृश्य मिशी बोलताना अलगद हलते. मी त्याला आवडले. मलाही तो आवडला. आम्ही एकमेकांना आवडलो. माझा हातरुमाल त्याच्या हातात कोंबत त्याला घाम पुसायला सांगितलं. नंतर आम्ही निघालो. “या इथे मला आवडत नाही. आवाज आहे फार. तेव्हा तुझी परवानगी असेल तर दुसरीकडे जाऊया?”- मी हो म्हटलं आणि आम्ही भुऱ्या टेकडी जवळच्या लॉजला पोहचलो. त्याच्या पाठीवरल्या जुनाट चामड्याच्या बॅगेत मी माझी पर्स टाकली. आधी त्रास झाला, पण नंतर बॅगेत पर्स घट्ट बसली. त्यात मी नेहमी थोडा मेकअप, एक लहान सूरी, काही चॉकलेट, आणि दाढीचा सामान ठेवते. एका कोपऱ्यात मी माझा तेव्हाचा, ऑपेरेशन आधीचा फोटो पण ठेवते. बाबाजी जैसा दाढीवाला. शिवाय मोबाइल, काही हातरुमाल, आणि गुरुमाँ आणि इतर सर्वांचे नंबर असणारी एक लहान वही. पण त्याच्या बॅगेत ती पर्स टाकताना मला हायसं वाटलं. लॉजचा चेहरा पाहून पण हायसं वाटलं. सर्वच कसं हायसं वाटण्यासारखंच होतं. गुलशन लॉज खरंतर हॉटेल होती. माझ्या नेहमीच्या लॉज सारखी नव्हती. नेहमीच्या लॉज सारखं इथे पानाच्या पिंकेची रांगोळी नव्हती. मार्बलचा दुधाळ आरसा नसला तरी घासून पातळ केलीली शाहबादी दिसली. माझ्या सोनेरी टाचा त्याच्या निळ्या रबरासोबत कॉउंटरला पोहचल्या. दुसऱ्या मजल्याच्या तिसऱ्या रूमचं कुलुप उघडलं गेलं. पावसाळा असल्याने वातावरण दमट होतं, तेव्हा रूम मध्ये दोन पंखे पाहून पुन्हा हायसं वाटलं. त्याने माझी साडी सोडली. मी त्याचं शर्ट काढलं. मग पुढे दोन तास आम्ही त्या लहानश्या खोलीत, खोल गेलेल्या पलंगावर, एकदाही न खोकता पडून राहिलो. 

गुंजेच्या सड्यातून वाट काढत मी काही मणी माझ्या लहान बोटाला थुंकी लावून टिपली. नखं वाढून गोलसर झालीये. त्याखालच्या बारीक दरीत घाण मावत नाही. या घाणीत कुठली माती असेल? शाळेच्या फोश्या भिंतीची? घरातल्या केरसुणीच्या केराची? जांघेत खाजवून जमा होणाऱ्या मळाची? कि बेंबीत पिकणाऱ्या कापसाची? कुठलीही असो त्यात जर अर्ध्या मोहरी एवढ्या बिया असल्या तर झालं. थुंकीचं सतत सिंचन होतंच आहे. एका पहाटे उठून त्यातनं इवलासा अंकुरच डोकावेल. मग ते खुडून टाकणं मला जमणार नाही. प्राजक्ताची काही फुलं माझ्या ओठांच्या गरम वाऱ्याने कावरीबावरी झाली आणि मी झाडाच्या हिरवट बुंध्याला माझी निमुळती पाठ टेकून बसलो. प्राजक्ता अल्लड आहे. तो अजून कोवळी असल्याने तिला पार नाही. आई जशी न सांगताच एक सायंकाळी अचानक उठून गेली, तसाच हा एक दिवस आमच्या अंगणात येऊन उभा राहिला. अचानक. फार हळवा. भर उन्हात. अण्णांनी नंतर कैकदा तिला पार करण्याचं बोलून दाखवलं, पण ते झालंच नाही. आणि मलाही हि अशीच आवडते. सुंदर दिसते. मोकाट वाटते. बिनवाऱ्याची डुलते. एवढीशी असली तरी तिच्या माथ्याचा भार भव्य आहे. ठसठशीत आहे. मागच्या कार्तिकचा बहर पाहून शेजारच्या काकींनी तिचं एक बोट तोडून नेलं. त्याला न्हाऊ घातलं. खाऊपिऊ घातलं. त्याने बाळसं धरलं. पण त्या बोटाचा हात झालाच नाही. ते तेवढंच राहिलं. मग काकींनी बी न्यावं असं ठरवलं. पण प्राजक्ताा हुशार, ती गर्भार झालीच नाही. तिनं बीच निर्माण केलंच नाही. काकींचा नाकाचा शेंडा उतरला. त्या अजूनही हताश होऊन कुंपणाच्या गंजलेल्या कडेचा स्पर्श वाचवीत प्राजक्तााच्या केसरी सुवासाकडे बारीक डोळ्यांनी पाहतात. आपण मोठे झाल्यावर एक मोठं घर बांधू. मोठं म्हणजे खूपच मोठं. आभाळाला स्पर्श करणारं. त्याचं अंगण म्हणजे शेतच शेत. मात्र त्या शेतांमध्ये मी काहीच पेरणार नाही. तिथे फक्त दोनच प्रियांना प्रवेश असेन. एक प्राजक्ता आणि एक आईची गुंज. 

ती मला पहिल्यांदा भेटली तेव्हाच ठरवलं होतं, हिला पुन्हा भेटायचं नाही. पुन्हा-पुन्हा भेटायला ती सावली नाही. सावली सारखी ती अबोल नाही. पण सावली सारखा तिचा काळपट रंग आहे. तो सुंदर दिसतो. त्यावर माझ्या बोटांचे बोथट ठसे उमटत नाही. ते उमटतात फक्त तिच्या भव्य, रुक्ष, पुरुषी तळहातांवर. हे कापून गहाळ करता येत नाही म्हणून. तिच्या पाच इंच लांब नख असलेल्या करंगळीच्या मुळाशी एक बारीक, भुरा तीळ आहे. तो तीळ मला आवडतो. तो तीळ तिलाही आवडतो. तो तीळ तिला आणि मला, दोघांना आवडतो. त्या तिळाची मी तीनशे तरी चुंबने घेतली असतील. त्यावर तीनशे वेळा माझे ओठ, आणि किमान तीस वेळा माझी टोकदार जीभ फिरली असेल. जीभ कधीकधीच. कारण मला ते आवडत नाही. तिच्या हातच्या रेषांमध्ये कधी घामाचा खारट चटका असतो. उजव्या हाताला तीळ असल्याने त्यात कधीतरी उगाच असल तिळीचाही वास येतो. तो वास मी माझ्या जिभेच्या प्रशस्त इंद्रियाने टिपून घेतो. वास टिपत असताना तिचं ते लाल-काळसर नख माझ्या भुवयांशी अलगद खेळतं. खूप खेळतं. खेळता खेळता थकतं. मग सावकाश निपचित पडतं. त्याची तीक्ष्णता अलगद अलवार होते. मग तिच्या नग्न गुडघ्याला मी बिलगून पडून राहतो. कित्येक वेळ. तिच्या मांड्यांमध्ये एक फट आहे. आणि त्या फटीच्या अवतीभवती व्रण. आदल्या जन्माच्या नाहक वाढलेल्या अंगाचा शिरच्छेद केलेल्याचे व्रण. मी तिला नेहमी म्हणतो, तू भाग्यवान आहेस, मनुष्य जन्म मिळावा म्हणून कैक कोटी वर्ष वाट पहावी लागते. आणि तुला तर एकाच जन्मात दोन जन्म मिळालेत.  
                                                             
प्राजक्ताला पाठ लावून किती वेळ झाला? नाही म्हटलं तरी थोडा उशीर झालाच असेल कारण म्हातारा होणार गंध आता वारलाय. रवीकिरणांनी बाळसं धरल्याने शेवटचा अंधार बोचरा होऊन नाहीसा झाला. आता पालवीवर सोन्याचे जरदोसी थेंब उठून दिसत होते. एव्हाना घरातही अण्णांच्या जड पावलांचा आवाज कानावर पडू लागला. रात्री उशिरा झोपले असले तरी आज त्यांना सकाळी लवकर उठणं गरजेचं होतं. तालुक्याला जायचंय हे काल दुपारीच भात लावताना ते बोलले तेव्हा मला बरं वाटलं. आई गेल्या पासून त्यांचं आणि माझं बोलणं जवळपास संपुष्टात आलं होतं. मुळात बोलण्याचे विषयच आईने तिच्या जांभळ्या ओठांत लपवून सोबत नेले होते. थोड्याच दिवसात मी तेरा वर्षांचा होणार होतो. अण्णा आत्याला आणण्यासाठी सकाळीच निघतील हे काल सांगितलं होतंच. आईला जाऊन ११ महिने झाले होते, म्हणून फार मोठा नसला तरी माझ्या वाढदिवसाचा एक छोटेखानी समारंभ करावा हे सर्वांचंच म्हणणं पडलं. शेवटी कुठलीही व्यक्ती एकदाच तेरा वर्षांची होते. नेहमी नेहमी नाहीच. सर्वांनाच माझ्या वाढदिवसाच्या काही क्षणांच्या आनंदाची उत्सुकता होती. काहींना माझ्या वाढीची चाहूलही लागली होती. मागच्या वर्षी अर्ध्या चड्डीत गावभरची धूळ गोळा करणारा मी आता सतत फुल पॅन्टीत असतो. नाकाच्या बारीक शेंड्याखाली हिरवट लव काळी होतांना सर्वांनी टिपली. आताशी आवाजात अण्णांची जरब जाणवायला लागलीये. दहाव्या वर्षी पोहणं टाकल्याने पावसात नदीवर जाणं केव्हाच सोडलं, नाहीतर मानेखाली फुटू लागलेल्या आणि मागच्याच वर्षी बगलेत न मावणाऱ्या वाढी मुळे सर्वांना माझ्या शारीरिक सक्षमतेचा अंदाज आला असता. सर्वच गोष्टी भाद्रपदाच्या उन्हासारख्या वाढत होत्या, माझी उंची, माझं अंग, माझ्या अंगावरील केस, या प्राजक्ताचा पसारा, अण्णांच्या रात्री उशिरा येणाच्या वेळा- सर्वच. फक्त आईच तेवढी वाढत नव्हती. ती तिथेच अडकून पडली होती. स्वतःच त्या ठिकाणी एकटीच बसून होती. मीही इथेच बसून होतो. पण आता उन्हाची चाहूल लागल्याने रात्रभर गाढ निजलेल्या मुंग्या पुन्हा कामावर निघाल्या. त्यांच्या त्या परोपकारी फौजा माझ्यामुळे अडखळतील हे कळलं आणि मी सरळ घरात आलो. अण्णांना बहिणीच्या घरी जाण्याची केवढी आतुरता होती! बऱ्याच दिवसांनी त्यांनी आज मोरीतच आंघोळ आटोपली. कपडे करून ते ओलसर पंचा उंबरठ्यावर झटकत उभे होते. अण्णा क्वचितच मोरीत आंघोळ करत. त्यांच्या मते आंघोळीच्या पाण्यात उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब पडले नाही तर ती फक्त आंघोळ म्हणावी- स्नान नाही. आंघोळीने फक्त शरीर स्वच्छ होतं, मन स्वच्छ, शुद्ध करण्यासाठी स्नान हाच एक मार्ग. ते मागे परसबागेत विहिरीजवळ अंग धुवायला बसतात. पितळी घंगाळ आणि कांस्याचा कळसा तिथेच मांडून ठेवायचे. जवळच तेल, साबण, रीठा, आणि वाळ्याची घट्ट बांधलेली घासणी ठेवत. लहानपणापासूनच त्यांची पूर्णपणे नागवं होऊन आंघोळ करण्याची सवय अजूनही तशीच होती. पाण्याला ज्याप्रमाणे पिवळी उब शुद्ध करते, तशीच ती शरीराला पवित्र करते. बलवान करते, गांधारीच्या नजरे सारखी. तेव्हा या बलवान करणारी दृष्टी शरीराच्या प्रत्येक अंगावर पडावी असं अण्णांना वाटतं. सुदैवाने पूर्ण परसबाग गोकर्णीच्या निळ्या-पांढऱ्या ताटव्याने झाकोळली असल्याने त्यांच्या या नित्यकर्मात कधीच अडथळा आला नाही. मला पाचवं लागल्या पासून दर पंचमीला त्यांची पाठ घासून देण्याचं काम मला मिळालं. त्यांची नुकत्याच शिजवलेल्या तांदुळासारखी पाठ भव्य होती. घासताना जरा हात निसटला कि ती गुलाबी चमके. त्यांच्या छातीच्या टोकापासून सुरू होणारी भिजलेली आयाळ त्यांच्या कडदोऱ्या खाली येत येत अधिकच दाट व्हायची. त्या दाट केसातून त्यांचं जाड, बोटाएवढं लांब, पाठीच्या मानाने बरंच सावळं लिंग डोकावताना मी निरखून पाहिलंय. मागच्याच वर्षी दोन पायांच्या मध्ये अवघडल्यावर, ताठरल्यावर लिंग मोठं होतं हे कळलं. तेव्हा या निजलेल्या अवस्थेतही भव्य दिसणाऱ्या ठिकाणा हून आपण जन्म घेतला याचा नकळत आभिमान वाटायचा. अजूनही वाटतो. अण्णांच्या नागड्या देहाला पूर्णपणे पाहिल्यामुळे जेव्हा माझ्या कडदोऱ्याच्या कडेला बारीक पाती डोलू लागल्या तेव्हा मी घाबरलो नाही, उलट हा सुखाचा क्षण सर्वांसोबत साजरा करावा असं वाटलं. सर्वांना सांगावं कि आता मी पण अण्णांसारखाच होणार. अण्णांच्या शरीराचा डौल लवकरच माझ्या अंगात भिनेल. अर्थातच मी माझे ओठ बंद ठेवले, पण शेवटी वरच्या धनुष्याने घात केला. ते नवांकुर पाहून सर्वांना कळलं कि आता मी वयात येतोय.. अण्णांनी पंचा पुन्हा झटकला आणि खुंटीवर टाकला. दुपार पर्यंत येतो असं सांगून ते निघाले आणि मी माझ्या आंघोळीच्या तयारीत गुंतलो.

आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा कित्येक वेळ त्या पलंगावर शांतता केस मोकळे सोडून निवांत पसरली होती. तीन तास मी ‘गुलशनच्या’ पांढऱ्या छतावर पडलेले पिवळट, घट्ट डाग मोजीत होते. हे डाग एवढ्या वर कसे पोहचतात? हे डाग एवढ्या वर पोहचवणारे कुठे भेटतील? त्यांची ओळख कशी पटेल? ते चप्पलेच्या नंबर बद्दल म्हणतात ते खरं असेल का? कि तेही त्या तिथल्या तीळा सारखं खोटं ठरेल? मी त्याच्या कडे पाहिलं. डोळे अर्धवट मिटले असले तरी तो झोपलाय याची खात्री होती. मग जराही हालचाल न करता मान वळवत एकवार त्याच्या तेव्हाच्या पांढऱ्या चप्पल कडे पाहिलं. काहीच कळलं नाही. पण यातून खरंच काही कळेल? की उगाच आपलं? हे सर्व प्रश्न डोक्यात थिजल्या तुपाप्रमाणे घट्ट झाले. पण तो पुढल्या वेळी येईल तेव्हा सारे प्रश्न तात्काळ सुटतील हे माहित असल्याने मी पुन्हा ते डाग मोजण्यात गुंतले. तो एकदाच भेटणाऱ्यांपैकी मुळीच नाही हे नकळतच त्याच्या भर तारुण्यात पिकलेल्या केसांनी केव्हाच कबूल केलं होतं.
                                                             
आमच्या परसबागेत आई असताना बरीच फळ झाडं होती. म्हणजे, मोठमोठाली आंबा, चिकू वगैरे नाही, पण लहान, नाजूक तुती, पपई, इत्यादी अशी. पण एक मोठं, म्हणजे फारच मोठं जांभळाचं झाड विहरीच्या पाच पाउलांवर होतं. अण्णांच्या सूर्यस्नानात त्याचा बऱ्याचदा व्यत्य व्ह्याचा, म्हणून त्याची वरचेवर छाटणी ठरलेली. माती चिंब होताच जांभुळांचा सडा बागेत दूरवर पडायचा. जांभळं भारी गोड आणि विपुल असल्याने ती नेहमीच गवताच्या नाजूक टोपल्यांमधून शेजार्यांकडे पोचती व्हायची. ते काम अर्थातच माझंच. आईचं खानपान म्हणजे साधुबुवांसारखं. सात्विक पदार्थांची रेलचेल एवढी की शेजारी बऱ्याचदा तिच्यासाठी फळं आणत. आईला सर्वच फळं आवडायची, एक तेवढं जांभूळ सोडलं तर. हे एकच असं फळ होतं जे आई जिभेवर अजिबात धरत नसे. गुंजेच्या काळ्या टिकल्यांवर जीव ओतणारी आई, जांभळांच्या शाई सारख्या कातडीला काहीबाही बोले तेव्हा अण्णा आणि मी घरात चोरून हसायचो. पण ह्या जांभळांचा राग शांत व्हावा म्हणून जवळच नेहमीच बारा-तेरा पपईची हिरवीगार बुंध्याची झाडे उभी असत. त्यांचा डौलच निराळा कारण आईला पपई फार आवडत. अगदी कधीतरी तिचा पारा चढला कि अण्णा तिच्या समोर पिवळट केसरी पपई ठेवत आणि तिचा राग कापरासारखा नाहीसा व्हायचा. आई प्रत्येक झाडाची अगदी पोटुशी सुनेसारखी काळजी घ्याची. शेजारच्या काकी जेव्हाही हे पाहत तेव्हा आईची (आणि माझी) थट्टा करत. “लवकर सून आण बरं, नाहीतर ह्यांची सारी माया या दुधाळी खातील!” ज्या दिवशी शेजारच्या काकी पपई बद्दल बोलत, त्याच रात्री, अंधार पडल्यावर आई चोरपावलांनी त्या झाडांना एक बारीक चूक ठोकून येई. मग सकाळी जेव्हा पपईची फुलं बुंध्यातून एकेक करून फुटू लागल्यावर त्यांच्या कानाशी जाऊन ती खूपदा काही कुजबुज करायची. हि कुजबुज होताच तीन आठवड्यात त्या झाडाला इतक्या पपई लागत कि ते अक्षरशः कमरेत वाके. तेव्हा आई वखारीतून खास तिळाचं तेल लावलेल्या लांब काठ्या मागवून त्या कुमारी मातांना मायेचा, पण काहीसा कठोर आधार द्याची. वर्षभरात आईच्या झाडांना किमान तीनशे पपई लागत, आणि त्यातल्या निदान शंभर तरी तीच फस्त करे. किंवा जास्तही. कंदिलाच्या प्रकाशात उजव्या हाताने गुंजा मोजण्यात गुंग असताना ती डाव्या हाताने सराईतपणे पपईचा गर तोंडात टाकून स्वछ साल शेजारच्या टोपलीत रचायची. म्हणून जेव्हा मागच्या वर्षी ऐन मोसमात आईने पपई खाणं टाकलं मी चक्रावलोच. नेमकं ह्या नाजूक झाडांनी काय अपराध केला होता हेच मला कळत नव्हतं. आई घरातच बसून मला पपईला पाणी, इत्यादी करायला लावी. पण का?
                                                             
पुढच्या वेळेस तो दिसला तेव्हा त्याच्या पायात नवी चप्पल होती. निळेजांभळी. त्याचं वय काय असेल? त्याचा चेहरा पुरुषर्थाच्या पडद्याखाली झाकलेला असतो, सतत. पण कधीतरी हा पडदा बाजूला होतो आणि त्याचं नाजुक वय अगदी ठासून बाहेर येतं. किती? बावीस? पंचवीसच्या वर तर नक्कीच नाही. आणि त्याच्या समोर मी. पस्तीशि कधीच ओलांडलेली. पण ते माझं दोन्ही जन्म मिळून निघणारा वय. या नवीन, रुपेरी ओळखीचं वय मोजून पाच वर्ष. म्हणजे मी त्याच्याहून लहानच- नाही? 

मी माझ्या नेहमीच्याच ठिकाणी रस्त्यावरच्या लोकांची पाऊलं मोजत उभी होती. काही दिवसांपूर्वी हा वाकलेला खांब सरळ करण्यासाठी काही सरकारी लोक आले होते. पण खांब अजूनच वाकला. माझी टेकण्याची सोय गेली म्हणून सहजच एका पायावर उभे होते. पुन्हा रविवारच असेल. पण तेवढं नीट लक्षात नाही. नजर सरळ रस्त्यावर नव्हती. मोजणी नक्कीच चुकत असावी. पण सर्व लक्ष त्याच्या येण्याकडे असल्याने त्याची काळजी नव्हती. रोज अशीच तास-दीड तास उभी राहून मी घरी परतत असे. पण आज दहा मिनटातच तो आला. रस्त्याच्या कडेला चिकटून येताना मी पाहिला. चेहऱ्याकडे न पाहता समोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यातले भाव वाचण्याचा प्रयत्न मागच्यावेळेस सपशेल फसल्याने या वेळेस मी त्याची थर्मोकॉल सारखी नजर नजरअंदाज केली. त्याच्या पाठीवर तीच, मागल्यावेळची बॅग होती. माझ्या कानाजवळ येऊन तो पुन्हा पुटपुटला. पाउलांची गती तोलत आम्ही पुन्हा निघालो. ‘गुलशन’ मध्ये आज बरीच पाऊलं दिसत होती. एकूण एक घोटा शालीनतेने झाकलेला. काही चटकदार साड्यांनी, काही चमकणाऱ्या सलवारांनी, आणि बरेच करड्या रंगाच्या मोज्यांनी. त्याची पॅन्टचा कडा फाटली असल्याने त्याचे दोन्ही घोटे नागडे होते. तेलपाणी न झाल्याने ते भुरकट झालेले, काहीसे सुजलेले होते. मालकांची रजा घेत आम्ही त्याच खोलीत पोहचलो. त्या लहानश्या खोलीतल्या खोल गेलेल्या पलंगावर आज खालून काही भोकं पडलेली जुनी चादर होती. तो कपडे काढून पलंगावर आडवा झाला. मी साडी सोडली, पण लगेच त्याच्या शेजारी न जाता त्याच्या बॅगेतून माझी पर्स काढली. मग त्या पर्स मधून आठवणीने ठेवलेला शिवणकामाचा टेप काढला. एव्हाना माझ्या नग्नतेकडे पाहत तो ताठरला. त्याचे लांबुडे पाय पलंगाच्या खाली येत होते. तिथे जाऊन मी त्याच्या तळपायांचा माप घेतला. आधी डावा, मग उजवा. तो त्याच्या दाणेदार नजरेने हे सर्व पाहत होता. मग मी त्याच्या कपाळावर आपल्या लाल लिपस्टिकचा डाग सोडला आणि त्याची पायांवर बसून त्याच्या ताठरपणाचं माप घेऊ लागले. ताठरल्याने माप घेणं सोपं झालं होतं. टपावर विसावलेले जाड केस मी डाव्या हाताने मागे केले आणि दाताने टेप उघडली. प्लम्बर सारखे बरेच आडवे उभे माप घेऊन झालं. पण कळलं असं काहीच नाही. उगाच एक उसासा टाकत मी टेप शेजारी पलंगावर भिरकावला. त्याने तो लगेच उचलला. त्याच्या सडपातळ ओठातून काहीसे तिरकस, पण स्वच्छ दात उमटले. टेप दोघं हातांनी उलगडत माझ्या उजव्या करंगळीचा नख मोजला. पाच इंच. त्याच्या अंगाच्या मापाने बराच लहान. नंतर आम्ही कित्येक तास काहीच न मोजता मानेत मान टाकून पडून होतो.
                                                             
पिकलेल्या पपईचा स्वाद नेमका कसा असतो हे अजून मला कळलं नाही. म्हणजे त्या चवीला गोड म्हणावं का? पण मग गुळाच्या चवीला काय म्हणावं? आणि साखरेच्या? पाकाच्या? फणसाच्या? कानाखाली मानेवर केलेल्या उभ्या आडव्या स्पर्शाच्या? सर्वच गोड आहेत का? की काही वेगळं आहे? हा प्रश्न नेहमीचाच झालाय, पण तो कोणालाच पडत नाही. तसं पाहायला गेलं तर या बाबतीत कच्च्या पपई परवडल्या, त्या फक्त कडू असतात. इतर कुठलीही चव त्यात नसते. कडवटपणा हा शुद्धेतचा प्रतीक आहे. कटू मेव जयते. सर्व कडू पदार्थ कडूच असतात. त्यांच्या चवीत भेसळ नसतेच. पण मग पुन्हा पिकल्या पपईंचं काय? मुळात पंचज्ञानेंद्रियांचा विचार केला तर असं जाणवतं की ‘चव’ हे एक अतिशय कमकुवत आणि निम्न पातळीचं ज्ञान आहे. त्याचा काहीच उपयोग नाही. जिभेला मुख्यतः सात चवी कळतात. हो,फक्त सात! दोन हातांवर मोजली तरी काही बोटं शिल्लक राहतील एवढीच चवी ओळखण्याची जिभेची लायकी. त्या मानाने नाक, डोळे, कान, आणि ही अंगभर पसरलेली कात देखील अधिक कुशल आणि बाणेदार आहे. क्रम लावायचं म्हटलं तर डोळे हे सर्वात वर, अगदी निर्विवादपणे. त्या खालोखाल कान आणि नाक. इथे मात्र वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण चवथा क्रमांक हा नक्कीच त्वचेचा. त्वचेला उष्ण, थंड, टोकदार, इत्यादी स्पर्श जाणवतात, पण त्या सोबतच स्पर्शाच्या भाषेची गुप्त संभाषणेही कळतात. मी तिच्या नव्या, तीन वर्ष जुन्या छातीवर जीभ फिरवली तेव्हा ती थंड आणि खारट लागली. तिच्या बेंबीजवळच्या बारीक लवेवर माझी जीभ फिरते तेव्हा ती हलकी उष्ण, तिखट जाणवते. तिच्या नेहमीच मेंदीने नटलेल्या हातांची चव मायाळू वाटते. जुनी वाटते. पाठ कडू, राकट लागते. त्यावरील लालभडक डाग बोचतो. मी तेवीस आणि ती कदाचित पस्तीस. किंवा जास्त. पण तरी मला तिचा हेवा वाटतो. ती हवीहवीशी वाटते. लहानपणी पण असच कोणीतरी माझ्या आयुष्यात असायला हवं होतं. ती माझी आई नाही. प्रेयसित आई पाहुच नये. पण तिला पाहून मला माझ्या गुंजेच्या आईची आठवण येते त्यात माझं काही दोष नाही. आई गेली तेव्हा ती तिच्याच वयाची असेल, नाही?
                                                                         
शेजारच्या काकींनी मला बोलावलं तेव्हा मी थोडा भ्यालो. मागच्या वेळेस प्राजक्ता न जगण्यामागे मागे माझाच काहीतरी बनाव आहे असं ठरवून त्यांनी मला खूप सुनावलं होतं. पुन्हा असंच काही असेल या विचारात भीतभीत त्यांच्या अंगणात आलो. काकी नेहमीच दारासमोर रांगोळी काढत. आज नेमकी प्राजक्ताची नाजूक फुलं त्यांनी टिपक्यांमध्ये टिपली होती. मी पुन्हा घाबरलो, हे नक्कीच शकुन असेल. पण पुढच्याच क्षणी काकींचा हसरा चेहरा आणि हातातल्या मोठ्या डब्यावर दृष्टी पडली. माझी भीती नाहीशी झाली. त्यांचा घोगरा आवाज बारीक करण्याचा प्रयत्न करीत त्या माझ्या छेदलेल्या कानाच्या पाळीजवळ पुटपुटल्या ‘हे लाडू सरळ आईला द्याचे हो!’ मी काकींचे ओठ पाहिले. त्यांच्या कडा काहीश्या सुजल्या होत्या. त्याच्याकडे कानाडोळा करत मी माझा नेहमीचा चिरका आवाज घोगरा करत विचारलं ‘पण का?’ काकी रागावल्या. ‘बावळट, सारं कळतं पण हे कळत नाही हो तुला! की उगाच सोंग करतोय?’ मग आवाज पुन्हा बारीक करीत त्यांनी वाक्य संपवलं ‘आता तू मोठा भाऊ नाही का होणार!’ मी काकींकडे ट्रान्सिस्टरच्या बटणा सारख्या मोठ्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांनी उगाच धक्का देऊन मला घराच्या दिशेने पिटाळलं. मनातला आनंद डोळ्यातून वाहत होता. मी भाऊ होणार! म्हणजे ज्या भव्य ठिकाणहून मी या जगात आलो तिथून अजून कोणीतरी येणार. मला त्या ठिकाणचे चुंबन घेण्याची इच्छा झाली. पण श्या! ह्या भावाने- किंवा बहिणीने इतकं उशिरा का यावं? म्हणजे रामाचा वनवास आता संपल्यात जमा आहे. रावणाचे दिवस भरलेत. आता येऊन काय उपयोग. असंही तो किंवा ती येईल तोपर्यंत रावण मरेलच. मग तो किंवा ती काय करेल. काय पाहील? पुन्हा टीव्ही बंद पडला तर? पण असो. त्याने किंवा तिने आधी यावं मग पाहूया. तो पर्यंत काहीतरी होईलच सुरु. लाडवांचा डबा माझ्या नव्या कादंबर्यांशेजारी ठेवून मी सरळ गुंजेच्या कोपऱ्यात गेलो. आई नेहमीसारखी तिथेच असेल हे मला ठाऊक होता. आई होती, पण नेहमीसारखी गुंज मोजत नव्हती. ती ओणवी पडली होती. तिच्या चेहऱ्यावर वेदनांच्या पसाऱ्यात एक हास्याची लकेर ओठातून वाहत डोळ्यात भरत होती. तिच्या पाया मधून निघणाऱ्या रक्ताच्या धारेत शेजारी पडलेल्या केसरी पपई केव्हाच लाल झाल्या होत्या.
                                                                   
त्याला तोंड उघडं ठेवून झोपायची सवय आहे. झोपेत कधीकधी तो लहान बाळासारखे आवाज काढतो. अगदी बारीक, शक्यतो कोणालाच ऐकू जाणार नाही असा. पण गेल्या एकदोन भेटीत त्याला एक वेगळीच सवय जडलीये. आम्ही एकमेकांना पांघरून झोपल्यावर तो माझे गच्च काळे केस त्याच्या माने भवती गुंडाळून घेतो. माझं कपाळ त्याच्या सडपातळ छातीवर पडून राहतं. त्याला कित्येकदा सांगितलंय, हे केस खरे नाही, माझे नाही, कदाचित बालाजीचे असावे, तेव्हा का गुंडाळतोय? पण त्याला गुंडाळण्यात रस आहे. केसांत कदाचित नाही. त्याच्या या उद्योगामुळे एक मात्र झालंय. सध्या माझं छतावरलं डाग मोजणं थांबलंय. मग आता मी पडून त्याच्या छातीवरचे केस मोजते. भुवयांप्रमाणे ते दाट केस दिवसभर मोजले तरी पुरतील असे आहे. बऱ्याचदा काही केस त्याच्या गळ्यातल्या एका चांदीच्या तीनपदरी अंगठीत अडकून तुटतात, आणि नंतर माझ्या खोल दरींमध्ये निजतात. ही अंगठीच आहे का? फारच लहान आणि खरंतर अंगठीच्या मानाने बरीच बेढब. पायातल्या बोटात दिसेल शोभून कदाचित. तरीही मला ही अंगठी फार आवडते. लक्ख चांदीची, काळ्या आणि लाल दोऱ्यात गुंफून मानेत अडकवलेली. फार ओळखीची वाटते. माझ्या मेंदीच्या बोटांनी तिला स्पर्श केल्यावर मागच्या जन्मीच्या आठवणी मनात येतील असं काहीसं वाटतं. पण त्या आठवणी ठेवायला माझ्याकडे पात्र नाही, तेव्हा त्या वाहून गेलेल्या बऱ्या. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला माझं मन धजत नाही. का कुणास ठाऊक पण असं वाटतं की त्याची नजर काहीतरी शोधतेय. माझ्यात कोणालातरी पाहतेय. कुणाला? कोण होती ती जी आता त्याच्या मुळे माझ्यात वास करू लागलीये? एक कल्पना? की एक मृगजळ?

एकादशी असल्याने शाळा लवकर सुटली. शाळा लवकर सुटल्यावर आम्ही बऱ्याचदा मैदानात कुठलाही एक खेळ खेळत थांबायचो. मैदान दरवर्षी किमान तीनदा श्रमदानाद्वारे स्वच्छ व्हायचं. तेव्हा हुतूतू, खोखो, आंबाकैरी असं काहीही खेळता यायचं. खरंतर लहानपणी आम्ही काहीबाही खेळायचो. बऱ्याचदा आमच्या खेळांना नियम नसत. किंवा असले तरी ते परिस्थिती आणि बऱ्याचदा व्यक्तिसापेक्ष असत. ते खेळ अतिशय मजेदार होते. पण दोनचार वर्षांपूर्वी वर्ल्ड कप जिंकल्यामुळे सर्वांच्या डोक्यात क्रिकेटच्या साहेबाने शिरकाव केला. अर्थात आम्ही त्याला नेहमीच बॅट-बॉल म्हणत असल्याने तो बाहेरून आलाय आणि तो आपल्यातला नाही असं वाटलंच नाही. त्याची गोरी कातडी इथल्या ओल्या उन्हात चिखलाच्या रंगाची झाली. मला बॅटिंग करण्याची भारी हौस होती. पण आज मी थांबलो नाही. सरळ हातात दप्तर घेऊन घरची वाट धरली. घरी एकटी आई सोडली तर कोणीच नव्हतं. अण्णा आत्याला सोडायला सकाळीच तालुक्याला गेले होते. मी माझ्या पायांपेक्षा मोठी चप्पल आवरत थोड्याच वेळात घरी पोहचलो. दार बंद नव्हतंच. आत संध्याकाळचा अंधार होता. मी तडक गुंजेच्या कोपऱ्यात गेलो. मागच्याच आठवड्यात आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यामुळे समोरचं दृश्य पाहून आता काहीच वाटलं नाही. आईचा गुंजाचा डबा तोंड उघडून रडत होता. हेल काढत होता. त्यात दोन चार गुंजा सोडले तर बाकी नाहीसे झाले होते. शेजारीच कंदिलाची वात बारीक झाली असल्याने मोठमोठ्या सावल्यांचे डाव मांडले गेले. त्या सावल्यांनी आईला पणाला लावलं असावं. आणि आई नक्कीच हरली होती. कारण ज्या जांभळांना आईने जन्मभर शिव्या दिल्या ती त्याच जांभळाच्या रंगाची होऊन उघड्या डोळ्यांनी झोपी गेली होती. तिच्या मोकळ्या हातातून गुंजाची धार सतत कोसळत होती..

माझ्या हातावर नेहमीच दोन चिजा राहतात. मेंदीचे डाग आणि गवताच्या रंगाच्या बांगड्या. त्यांच्याकडून मी भाडं घेत नाही कारण ते घरचेच आहे. आपलेच आहे. आपल्या लोकांकडून कोण भाडं घेतं? पण नखांच्या काळ्या आणि लाल नखपॉलिश कडून मी ते घेते कारण ते आपले नाही, ते परके आहेत. त्याचे आहेत. डाव्या हातावर अजूनही ठळक असलेलं ते हिरवं ‘राजेंद्र’ बोचतं. त्याला दर शुक्रवारी मेंदीने लपवते. लहानपणी आईने अंगावर उकळता चहा सांडला होता. चुकून. कदाचित. हातावर, आणि पाठीवरही. हातावरला डाग आता बराचसा नाहीसा झालाय. तेव्हा त्याला मेंदीची गरज नाही. पाठीवरला आहेच, पण तिथे मेंदी कशी लावू? मेंदीची खरी गरज फक्त ‘राजेंद्र’ला आहे. मेंदीत तो शांत पडून राहतो. पण तो कधी डोकावलाच तर असंख्य बांगड्यांच्या पिंजऱ्यात तो कैद व्हावा आणि आपलं हिरवं अस्तित्व बांगड्यांच्या हिरवळीत मिसळून तो ते विसरावा म्हणून ह्या सात सात बांगड्या. खरंतर मला त्याला हाकलून लावायचंय. प्रत्येक अंगातून आणि आठवणींतून काढायचंय. कारण त्याचा ह्या शरीरावर कधीच हक्क नव्हता, मग त्याचं नाव का म्हणून मी इथे ठेवावं? तो तर मेलाय कधीच. ते नाव पण मेलंय. सर्वच मेलाय कदाचित. त्याचं मरण हे माझ्या जीवनातलं सर्वोच्च सुख असेलही, पण ही हातावरची हिरवी पाल जावी. तिला काढून टाकावं. तिची शेपूट राहिलीच तर जळून कोळसा व्हावी. मग तो कोळसा खलबत्त्यात भसाभसा कुटून मी पाण्यात घासतेलात कालवून पुन्हा पेटवीन. त्या घासतेलाची काजळी गोळा करून शाई बनवेल. मग या शाईत काचेचा तुकडा बुडवून सर्व नाहीसं करेल. पण तेव्हा ‘राजेंद्र’ जाईल? कि त्याच्या मृत्यू पुन्हा पुन्हा समोर येऊन उभा राहील? त्या मरणाच्या मरणकळा ह्या जन्मात जिवंतपणी सोसाव्या हेच माझं प्राक्तन आहे का? सर्वांना शेवटी माहित पडेलच का कि हा राजेंद्र कुणेकाळी याच शरीरात राहायचा?
                                                                         
आई गेली. घर शांत झालं. गुंज पोरकी झाली. ती गेली तेव्हा शाळेला दहा दिवस सुट्टी होती. जाण्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिला गोळा करायला गेलो. ती नव्हतीच, पण जे काही होतं ते आम्ही घेतलं. ती जाताना जांभळी असली तरी आता पांढरीशुभ्र झाली होती. त्या शुभ्रतेतले दोन पिवळे मणी आत्याने आपल्या पोतीत टाकायला टिपले. एक जोडवी कलशात टाकायची असं ठरलं, तर दुसरी अण्णांनी त्यांच्या कडदोऱ्यात आई जिथे होती तिथेच घातली. घट्ट बांधली. तीन पीळांची ती चांदीची आई आता नेहमीच त्यांच्या जवळ राहील. कधी त्यांच्या कमरेवर. तर कधी पुढे, कमरेखाली. मीही कधी कधी तिला पाहणार होतोच. आम्ही घरी आलो. दहा दिवसांनी आत्या घरी गेल्या. दहा दिवसांनी मी शाळेत गेलो. 

जत्रेत बऱ्याचदा हनुवटीच्या खाली पडणारा पदर सावरणाऱ्या बायकांच्या मांडवाकडे पाय वळतात. पण शेवटच्या क्षणी नदीच्या तापलेल्या मातीत पाय रुततात. पुढे जात नाही. अडकून पडतात. कदाचित त्या ‘राजेंद्र’ सोबतच नाहक वेदना सोसण्याचा पुरुषी अहंकारही मेलाय. सोशिकतेचं मंदिर मर्दानी दांभिकतेच्या चितेवर वसलंय. बऱ्याच गोष्टी त्यात जळून मेल्या. काही अनावधाने. काही मुद्दाम. पण ज्या नाही जळाल्या त्या अचानक राखाडी रंगात माखलेल्या समोर येऊन उभ्या राहतात. हा थर्मोकॉलच्या डोळेवाला पण अश्याच राखेतून आलाय. पण ती राख सफेद आहे. नितळ आहे. शुभ्र आहे. 

पाणी थोडं तापल्यावर मी ते घंगाळात ओतलं. कोमट पाणी मला चालतं. उगाच उकळतं पाणी ओतण्यात काही व्हावं आणि माझं अंग रांजण सारखं भाजून निघावं. अजूनतरी अण्णांसारखी मोकळ्या आभाळाखाली आंघोळ करण्याची हिम्मत माझ्यात नाही. त्यात ओंगळ असं काही नाही, पण तेरावं लागल्यावरच ते करायचं असं मी ठरवलं आहे. म्हणजे अण्णांना पण माझं वाढतं अंग दिसेल. त्यांनी ते पाहावंआणि आपल्या एकूलत्याएक मुलावर गर्व करावा हेच मला हवंय. मीही त्यांच्या सारख्या गोऱ्या पाठीच्या, भारदस्त, केसाळ, मर्दानी छातीचा, आणि भव्य लिंगाचा पुरुष होईल. आंघोळ आटपून मी तेलपाणी केलं. आईच्या, गुंजाच्या कोपऱ्यात नेहमी प्रमाणे निरंजन नेवून ठेवलं. आईने गुंजाच्या संख्येबद्दल कधीच जास्त विचार का केला नाही हे मागच्या वर्षीच कळलं होतं. जिथे एका गुंजाने धिप्पाड माणूस लोळागोळा होतो तिथे आईने किमान तीनशे मणी गिळले होते. बरेच चावून चोथा करून खाल्ले होते. कदाचित अजून गिळण्याचा प्रयत्न असेल. मी आलो तेव्हा तिच्या उघड्या मुठीतून सांडणाऱ्या गुंजाची राशी एका लहान वारुळाएवढी दिसत होती. पण हे का झालं. आधी बाळ. मग आई. असंच का? त्या दिवसापासून हा प्रश्न डोक्यात घेऊन वावरताना बऱ्याच गोष्टी अधू झाल्या. स्पष्ट दिसणाऱ्या बाबी गढूळ झाल्या. आईच्या मृत्यूचे गूढ आमच्या लहानश्या गावात सर्वांनाच पडले असल्याने बरेच तर्कवितर्क कानावर येत. अजूनही येतात. पण स्पष्ट असं उत्तर नाही. किंबहुना आईला ते उत्तर सापडू नये असंच वाटत असेल म्हणूनच ती काहीच न बोलता उठून गेली. जांभळ्या झालेल्या चेहऱ्यावर जेव्हा आत्याने लालभडक कुंकवाची मळवट भरलं तेव्हा मी हसलो. स्वतःशीच. शेवटी आई जिंकली होती. ती गुंजा झाली होती. गुंजाचं कुंकू लावण्याची गरज उरलीच नाही.

अण्णा आत्याला घेऊन आले. त्यांनी येताच माझ्या हातात एक पार्लेचा मोठा पुडा दिला. मागच्यावेळी आत्याचा आशिष घेताना डोक्यावर केस नव्हते. आत्याचा तेव्हाचा खरखरीत स्पर्श आता जाणवला नाही. अण्णा जाऊन येतो असं म्हणून लगेच पुन्हा बाहेर पडले, आणि मागोमाग आत्याला एकटं सोडून मीही मित्राकडे निघालो. रामायणाची जागा महाभारतने केव्हाच बळकावली असल्याने आम्ही तासंतास त्यावर बोलत बसायचो. महाभारत रामायणापेक्षा नक्कीच उजवं होतं. काय काय बोलायचं हे ठरवत मी निघालो. पण मित्राकडे पोहचल्यावर कळलं कि तो आणि आमचे इतर मित्र नदीवर पोहण्यासाठी निघालेत. खरंतर मंद पावसाळी वातावरण. त्यातल्या त्यात ढगाआड लपलेला सूर्य आणि वाऱ्यात जाणवणारा अल्लड गारवा हे सर्व पोहण्यासाठी योग्यच असे होते, पण तेराव्या वर्षा पर्यंत पोहायचं नाही हे ठरवल्यामुळे मी घरी परतलो. आता फक्त दोन तीन दिवसांचा अवकाश, मग मनसोक्त पोहायला उसंत. रोज रोज पोहायचं.

घरी पोहोचल्यावर पाहिलं, दार फक्त लोटलेलं होतं. आत्या आणि शेजारच्या काकींचं फार सौख्य असल्याने त्या नक्कीच तिथे गेल्या असतील. चुलीवर मात्र मला अतिशय आवडणारी आमसूल घातलेली मुगाची डाळ शिजत होती. तिचा वास मनात भरला. श्वासात त्याचा सहवास जाणवला. पण जेवणाला अजून अवकाश असल्याने मी घडाघडा पाणी प्यालो आणि मागे, बागेत जाऊन जांभुळाखाली बसलो. डाळीचा वास इथेही होताच, म्हणून आत्या येत नाही तोवर मी जांभळं खाण्याचं ठरवलं. समोरच्या बाजूची जांभळं सहसा तुरट निघत, पण झाडामागची आंब्याहून गोड. तेव्हा झाडा मागे जाऊन गोड जांभूळ निवडत बसलो. काही वेळात पोट भरलं, तरी मन, नाक, जीभ, आणि बोटं त्या डाळीसाठी हपापले होते. पुन्हा काही जांभळं गोळा करण्याचा विचार करत असताना दारात एक काळी सावली दिसली. आत्या नक्कीच परत आल्या होत्या. आता आपल्याला डाळ मिळणार या आनंदात मी घरात शिरलो. पण घरात कोणीच नव्हतं. घर शांततेची शाल ओढून निवांत पहुडलेलं होतं. फक्त आईच्या कोपऱ्यात काही आवाज येत होता. मी चोरपावलांनी तिथे पोहचलो. कदाचित आई आली असली तर? आपला मुलगा एवढा झपाट्याने मोठा होतोय याचं कौतुक करायला ती नक्कीच काही क्षणांसाठी परत आली असेल. ती आली असेल तर ती अशी का निघून गेली हे विचारायचं? पण तिला राग येऊन ती नाहीशी झाली तर? मग काय करायचं? असं तिला रागात परत पाठवता कामा नये.

आईच्या कोपऱ्यात नेहमी सारखा कंदील मंद जळत होता. जमिनीवर जाडसर गोणपाट टाकून अण्णा उताणे पडले होते. त्यांचे पाय गुढघ्यात वाकलेले असल्याने त्यांच्या मांसल, गोऱ्या, आणि केसाळ मांड्या अंधारातही चमकत होत्या. अंगावर घामाने चिंब झालेल्या काळ्या कडदोऱ्या शिवाय काहीच नव्हतं. त्या कडदोऱ्यातली तीन घडीची जोडवी डाव्याबाजूला कमरेशी घट्ट झाली होती. पायातून लटकणारं त्यांचं लिंग हेलकावे घेत होतं. त्यांनी दोन्ही हात कमरेच्या खाली नेऊन धरले. त्याला चिकटून एक हडकुळा पुरुष गुडघ्यावर बसून झपाट्याने मागेपुढे होत होता. त्याच्या पाठीवरल्या लाल डागावरून घामाचे थेंब निथरत त्याच्या त्याच्या कंबरेवरल्या लाल कडदोऱ्यात नाहीसे होत होते. उकळतं पाणी पडून हे डाग झाले असतील नक्की. घामाशिवाय त्याच्या कडदोऱ्यात काहीच नव्हतं. तो पूर्णपणे कोरा होता. त्यांची हालचाल सुरूच होती. हालचालीच्या वेगात अण्णांचं कण्हणं मिसळून अंधाराचा आवाज येत होता. त्या फाटलेल्या गोणपाटाकडे एकवार पाहून मी तिथून निघालो. पुन्हा जांभळाच्या झाडाखाली जाऊन बसलो. बरीच जांभळं गोळा केली. ती खाल्ली.

तो डागवाला माणूस केव्हा गेला माहित नाही. पण सायंकाळ ओसरली तेव्हा आत्या जांभळाकडे आली. आम्ही घरात आलो. आमसुलाचा कुबट वास नकोसा होत होता. पण मुकाट्याने जेवलो. शेवटचं जेवलो. अण्णा घरात नव्हतेच. रात्री केव्हा येतील हे आत्यालाही ठाऊक नव्हतं. वाट न बघताच मी तसाच डोळे उघडे ठेवून झोपलो. रात्री अण्णा केव्हा आले माहित नाही, पण त्यांची लुंगी काहीशी खाली सरकल्यावर त्यांचा कमरेला घट्ट बसलेला, मगाशी पाहिलेला कडदोरा अलगद कापला. त्यातनं आईची जोडवी काढली. माझ्या हातात बांधलेल्या लाल-काळ्या दोऱ्यात ती ओवली आणि गळ्यात अडकवली. छातीवर वर खाली होणारी ती जोडवी घेऊन जेव्हा मी पहाटेच्या उजेडात घर सोडलं तेव्हा प्राजक्ताचा वास अजून तरुण होता. टपोरी गुंज गवतावर निजलेली होती.

चित्र सौजन्य: कॉन्सोलशन, एडवर्ड मंक, १८९४.

निखिल बैसाणे सद्या आयसर भोपाळ इथे हायपर मस्कुलिनिटी अँड हिंदू मिथ: इंटर्प्रिटेशन्स या विषयावर संशोधन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *