नामदेव गपाटे

समकालीन राजकारणावरील रूपकात्मक भाष्य: इंडियन ॲनिमल फार्म



back

प्रवीण दशरथ बांदेकर हे नव्वदोत्तरी मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. त्यांनी चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन ॲनिमल फार्म या महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. समकालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे हे त्यांच्या तिन्ही कादंबऱ्यांचे मुख्य अंत:सूत्र राहिले आहे. येरू म्हणे या कविता संग्रहापासून त्यांनी आपल्या साहित्य लेखनाला सुरुवात केली. येरू म्हणे पासून इंडियन ॲनिमल फार्म पर्यंतचा त्यांचा हा प्रवास एकप्रकारे आत्मनिष्ठ जीवनजाणिवांना समाजनिष्ठ बनवण्यापर्यंतचा आहे. त्यांनी प्रथम येरू म्हणेच्या माध्यमातून आत्मनिष्ठ स्वरुपाची कविता लिहिली. नंतर खेळखंडोबाच्या नावानं मधून कथनात्मक स्वरुपाची दीर्घ कविता लिहिली. त्यानंतर चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन अॅनिमल फार्म या कादंबऱ्यांच्या निमित्ताने सामाजिक आशय आणि कादंबरीचा रूपबंध यांच्यामध्ये सेंद्रिय नाते असलेली नवी कादंबरी लिहिली. भवतालच्या राजकीय घटितांमागचे सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक सहसंबंध उलगडून दाखविणे, हे त्यांच्या कादंबरी लेखनाचे मुख्य सूत्र आहे.

जॉर्ज ऑरवेल या ब्रिटीश कादंबरीकाराने ॲनिमल फार्म या कादंबरीतून प्राणी कथेचे रूपक वापरून रशियातील साम्यवादी राजसत्तेवर उपरोधिक भाष्य केले होते. जॉर्ज ऑरवेल यांच्या या प्राणीकथेच्या रूपकाचा आकृतिबंध वापरून बांदेकरांनी इंडियन ॲनिमल फार्म या आपल्या कादंबरीतून समकालीन भारतीय राजकारणाची गोष्ट सांगितली आहे. त्याचबरोबर त्यांची ही कादंबरी कथासरित्सागर, इसापनीती व पंचतंत्र या प्राचीन भारतीय कथासंहितेतील प्राणी कथेच्या रुपबंधाशीही नाते सांगते. कादंबरीतील पशूपक्ष्यांचे माणसासारखे विचार करणे, बोलणे, भवतालाला प्रतिक्रिया देणे, राग, लोभ, मोह, माया, स्वार्थ, सत्ता आदि सामान्यपणे मनुष्य प्राण्यामध्ये आढळून येणारे गंड बाळगणे या कल्पनेला या प्राचीन भारतीय कथासंहितेचा आधार आहे. त्यांनी आपल्या कादंबरीचा रूपबंध या प्राचीन भारतीय कथासंहितेतून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच रुपबंधाच्या दृष्टिने जॉर्ज ऑरवेल यांच्या ॲनिमल फार्म या जागतिक दर्जाच्या कादंबरीचा प्रभावही तिच्यावर आहे. बांदेकर त्यांनी या कादंबरीतून ऑरवेल प्रमाणेच एका रूपककथेच्या माध्यमातून समकालीन राजकारणातील भल्याबुऱ्या घटनाप्रसंगांचे व वृत्तीप्रवृत्तींचे पुनर्वाचन करण्याचा प्रयत्न केला आहे. या रूपक कथेला वेगवेगळ्या समकालीन राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक घटनांचे संदर्भ लाभले आहेत.

जॉर्ज ऑरवेल यांच्या ॲनिमल फार्म या कादंबरीमध्ये मि.जोन्स हा मनोर फार्मचा मालक आहे . या फार्ममध्ये ओल्ड मेजर हा समताधिष्ठीत समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहणारा तत्त्वनिष्ठ डुक्कर आहे. त्याची लोकशाहीवादी मूल्यांवर श्रद्धा आहे. तो भाषणातून फार्ममधील प्राण्यांच्या मनात क्रांतीची भावना जागृत करून अॅनिमल फार्ममध्ये समताधिष्ठीत लोकशाहीची स्थापना करू पाहत असतो. या ओल्ड मेजरच्या मृत्युनंतर फार्ममधील सर्व प्राणी विद्रोह करून फार्ममधून मालक मि. जोन्सला हाकलून देतात. या उठावाचे नेतृत्व स्नोबॉल व नेपोलियन हे दोन डुक्कर करतात. मनोर फार्मचे नाव बदलून ॲनिमल फार्म हे ठेवले जाते. आणि फार्मची सगळी सूत्रे आता प्राण्यांच्या हातात येतात. फार्ममध्ये सर्व प्राणी समान आहेत या सूत्रावर आधारित एक नवी व्यवस्था निर्माण केली जाते. तेथे दर रविवारी वेगवेगळ्या विषयावर सर्व प्राणी एकत्र येवून वादविवाद करू लागतात. या प्राण्यांमध्ये डुक्कर आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर फार्मचा कारभारी होतो. त्यामध्ये नेपोलियन डुक्कर एका शक्तिशाली नेत्याच्या रूपाने पुढे येण्याचा प्रयत्न करतो. या सत्तासंघर्षात तो जंगली कुत्र्यांच्या साहाय्याने स्नोबॉल या डुकराला फार्ममधून हाकलून देतो. हळूहळू हा नेपोलियन डुक्कर संपूर्ण फार्मवर अधिकार गाजवू लागतो. फार्ममधील समताधिष्ठीत व्यवस्था टिकवून ठेवणारे नियम आपल्या सोयीनुसार बदलून टाकतो. यातच सर्व प्राणी समान आहेत हे तत्त्व बदलून सर्व प्राणी समान आहेत परंतु काही प्राणी हे जास्त समान आहेत. या तत्त्वानुसार चालणारी नवी शोषण व्यवस्था प्रस्थापित करतो. थोडक्यात, या कादंबरीतून जॉर्ज ऑरवेल यांनी १९१७ रशियन राज्यक्रांती नंतर मार्क्सच्या शोषणरहित साम्यवादी व्यवस्थेचे शोषित व्यवस्थेमध्ये झालेल्या रुपांतरणाचा आलेख मांडला आहे.

इंडियन ॲनिमल फार्म या कादंबरीची सुरुवात नव्या मालकाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला विवेकनिष्ठ कृष्णा घोड्याच्या म्हणजेच म्हातारबाच्या गोळ्या झाडून केलेल्या खुनापासून होते . डुकरांची जी हुजूर पार्टी, कुत्र्यांचे जय समर्थ गँग, शेतात राबणाऱ्या विविध प्राण्यांचा श्रमिक प्राणी मोर्चा यांच्या अवतीभवती या कादंबरीतील सर्व घटना घडत आहेत. जातीच्या टोकदार होत चाललेल्या अस्मितांनी आजच्या राजकारणाचे सर्व अक्ष निश्चित होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भिडतंत्राच्या साहाय्याने होणारी मॉब लिंचिंग, टोळी युद्धाच्या साहाय्याने केले जाणारे सोयीचे व जातीपातीचे राजकारण व विवेकावादाच्या हत्येतून अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर येणारे दाब यातून गरीब, हतबल, श्रमजीवी, विवेकवादी व अल्पसंख्याक समाजघटकांचे भयग्रस्त होत चाललेले जगणे बांदेकरांनी प्राणीकथेच्या रूपकाच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे. लेखकाचे कादंबरीच्या सुरुवातीलाच कुणा प्राण्याच्या भावना दुखावल्यास आगाऊची दिलगिरी व्यक्त करणे हे समकाळातील भवतालाच्या टोकदार होत चाललेल्या सामूहिक अस्मितांचे सूचन करणारे आहे.

बांदेकरांच्या इंडियन ॲनिमल फार्ममध्ये मरणप्राय वेदनांमधे असतानाही मूल्यांवरच्या निष्ठा कायम ठेवणारी म्हादबासारखी पात्रं आहेत . तशी अत्यंतिक व्यवहारवादी दृष्टिकोन ठेवून निष्ठा निश्चित करणारी चंफीसारखी पात्रंही आहेत. त्याचबरोबर सत्ता एके सत्ता एवढेच सत्य मानणारी साहेबराव डुक्कर, नानोपंत श्वानसारखीही पात्रं कादंबरीच्या केंद्रभागी आहेत. प्रस्तुत कादंबरीतील ही पात्रं समकालीन व गतकालीन भारतीय राजकारणातील विशिष्ट वृत्तीप्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्यामुळेच तीमधून घडणाऱ्या दंगली, बॉम्बस्फोट, दिले जाणाऱ्या शिव्याशाप, आक्रोश, हुल्लडबाजी, कुकारे आदी घटना आपल्याला नवीन न वाटता चिरपरिचित वाटू लागतात. रोजच्या जगण्यातील बऱ्याच मानवी कृतींमधील उगीचताही बांदेकरांनी अधोरेखित केली आहे.

उंदराच्या शिकारीचा आळ घेवून कुत्री व डुकरं यांच्या प्रस्थापित राजकीय शक्तीची कटकारस्थाने उघडी पाडू पाहणाऱ्या मोहिनी मांजरीची तथाकथित संस्कृती रक्षकांनी केलेली हत्या हे इंडियन ॲनिमल फार्ममधील मॉब लिंचिंगच आहे. ते पाहून अलीकडच्या काळातील समाजविघातक शक्तींची यासदृश्य कित्येक प्रकरणे डोळ्यासमोर तरळून जातात व मन सुन्न होते. सत्य समाजासमोर आणू पाहणारे कित्येक आवाज आज या भिडतंत्राच्या गर्दीकडून क्रूरपणे दाबले संपवले जात आहेत. हेच मोहिनी मांजरीच्या हत्येवरून लेखक सुचवू पाहत आहे. मोहिनी मांजरीच्या हत्येला कावळ्या, कबुतरांनी ज्या चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत केले त्यातून कर्तव्य विसरत व पातळी घसरत चाललेल्या प्रसारमाध्यमांकडून एखाद्याच्या मरणाचे देखील इव्हेंट कसे साजरे केले जात आहेत, या विदारक , क्रूर व बळावत चाललेल्या प्रवृत्ती लेखकाने अधोरेखित केल्या आहेत.

भाबडेपणात जगणारे कित्येक समूह या भूलथापांना व बुद्धिभेदांना बळी पडताना दिसतात. मोहिनीचे हे तथाकथित संस्कृती रक्षकाकडून चिरडले जाणे एका अर्थाने सर्वहारा गरीब श्रमिक वर्गाच्या नैसर्गिक हक्काचेच चिरडले जाणे आहे. ही येऊ घातलेल्या एका भयंकराची चाहूल आहे. हे सत्तासंघर्षाच्या कुकाऱ्यात मानवतेचा व सत्याचा सूर हरवला जाण्याचे लक्षण आहे. थोडक्यात, मोहिनी मांजरीच्या शोकात्म व विदारक अंताने राष्ट्रप्रेम व राष्ट्रद्रोह या शब्दांच्या अर्थामध्ये सामान्यजणांमध्ये बुद्धिभेद करून गैरसोईच्या लोकांना पद्धतशीरपणे देशद्रोही ठरवून संपविण्याची इंडियन ॲनिमल फार्ममधील पद्धत व व्यवस्था आपल्याला परिचित वाटू लागते . बांदेकरांचे हे ॲनिमल फार्म म्हणजे रूढ अर्थाने एक शिवार आहे. त्या ठिकाणी सगळे पाळीव प्राणी एकत्रित राहत आहेत. त्यांच्या शिवाराचे काही नियम आहेत, तशा काही अस्मिताही आहेत. हे नियम व अस्मिता म्हणजे तिथला शिवारवाद आहे तर या नियमांचे व अस्मितांचे उल्लंघन म्हणजे तिथला शिवारद्रोह आहे. बांदेकर यांनी या रूपक कथेतून निर्देशित केलेल्या या शिवारवाद व शिवारद्रोह या संकल्पनांमध्ये समकालीन राजकारण प्रभावित करणाऱ्या राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोह या संकल्पना अंतर्भूत आहेत.

इंडियन ॲनिमल फार्ममधील प्रसारमाध्यमांची जबाबदारी नव्या कारभाऱ्यांनी कावळे, पोपट, कबुतरे व चिमण्यांकडे दिलेली आहे. या माध्यमांचा कलकलाट या रूपक कथेतील सर्व प्राण्यांचे जगणे या ना त्या प्रकारे प्रभावित करतो आहे. कधी नव्हे एवढे संशयाचे वातावरण या माध्यमांनी पद्धतशीरपणे निर्माण केले आहे. फार्ममधील पोपटांचा व कावळ्याकबुतरांचा तो कलकलाट वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला लाभलेल्या प्रसारमाध्यमांच्या कलकलाटापेक्षा वेगळा नाही. छिद्रान्वेषी कावळ्याच्या टेहळणीतून सामान्यजणांचे खासगी जीवन व अभिव्यक्तिस्वातंत्र्य दोन्ही बाधित व बंदिस्त होत आहे. भय्यालाल पोपटाच्या रूपाने बांदेकरांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या चरणी निष्ठा गहाण ठेवत चाललेली माध्यमे व त्यामुळे सामान्यजनांवर निर्माण झालेली ऐकून घेण्याची सक्ती त्यांच्या भयंकर परिणामांसह कादंबरीतून मांडली आहे. त्याचबरोबर बांदेकरांनी आजच्या प्रसारमाध्यमांकडून सत्ताधाऱ्यांची जीभा फाटेस्तोवर गोडवे गाऊन केली जाणारी हुजरेगिरी व कणा हरवत चाललेल्या माध्यमसंस्कृतीची चिरफाड केली आहे. प्रसारमाध्यमांच्या व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरून शिवारात राबणाऱ्या श्रमजीवी वर्गाचे प्रश्न हरवत जाणे भयंकर आहे. असे बदलत्या राजकारणाची दिशा निश्चित करणारे अनेक लंबक संकेत रूपाने या कादंबरीतून आले आहेत.

समकालीन राजकारणातील अनेक परस्परविरोधी व अंतर्विरोधी वृत्तीप्रवृत्तींचे, मतप्रवाहांचे व कारस्थानांचे अर्थ या रूपक कथेतून आपल्याला सापडू शकतात. बांदेकरांनी इंडियन ॲनिमल फार्ममधील पोपट, कावळे, कबुतरांना प्रसारमाध्यमांचे रूपक म्हणून कादंबरीत स्थान दिले आहे. इंडियन ॲनिमल फार्ममधील कित्येक पोपट, कावळे, कबुतरे सत्ताकेंद्राची खुशमस्करी करण्यात व्यस्त आहेत. मोहिनी मांजरीला उंदीर मारल्याच्या खोट्या आरोपाखाली तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या गर्दीने चिरडून मारल्यानंतर शिवार धमाका व एकच सत्य या माध्यमसमूहांनी घेतलेली भूमिका पाहिल्यानंतर हे लक्षात येते. शिवार धमाका वाहिनी सनसनाटी वार्तांकनासाठीच प्रसिद्ध होती . मोहिनी मांजरीच्या हत्येनंतर त्यांनी नेहमी प्रमाणे परिस्थितीच्या विपरीत बातम्या सुरु करून फार्ममधील प्राण्यांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, झडती घेताना संस्कृतीरक्षक कार्यकर्त्यांना मोहिनीच्या घरात हत्या केलेले अनेक उंदीर आढळून आले. हे उंदीर खाण्याच्या उद्देशानेच मारले असल्याचं मोहिनीने संस्कृतीरक्षकांच्या कार्यकर्त्यांसमोर कबूल केले. कार्यकर्त्यांनी मोहिनी मांजरीला शिवारातल्या जाणत्या प्राण्यासमोर माफी मागून आपली चूक झाल्याचं कबूल करण्यास सांगितलं, तर तसं करण्यास तिनं नकार दिला .. ..शेवटी पापाचं प्रायश्चित्त म्हणून तिनं स्वत:हून दारातल्या लिंबाच्या उंच झाडावर चढून खाली उडी मारली आणि स्वत:ला संपवलं (पृष्ठ १३२). केवळ सत्ताधाऱ्यांच्या जी हुजुरीसाठी कोणाच्याही मरणाचे खोटे सोहळे उभे करणारी ही पत्रकारिता पाहून आपल्याला आपल्या भोवतालचे काही टी.व्ही. चॅनल्स व सत्ताधाऱ्यांची जी हुजुरी करणारे व पोपटाप्रमाणे त्यांचीच भाषा बोलणारे संपादक, निवेदक आठवल्याशिवाय राहत नाहीत. त्याचबरोबर माध्यमांमधील आम्हाला असं वाटतं पेक्षा आम्हाला वाटतं तेच बरोबर या प्रवृत्तीचे बळावत जाणे बांदेकरांनी अधोरेखित केले आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी माणसाचे खासगी आयुष्य बाधित करून टाकणाऱ्या समकालीन राजकारणातील ट्रोलधाडीही बांदेकरांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या कादंबरीतील अनेक विकेकनिष्ठ प्राण्यांना आपण सत्तेच्या लोभापायी दोन पायाचा माणूस तर बनणार नाही ना ही भीती सतावते आहे. त्यांची ही भीती मनुष्यप्राण्याच्या अध:पतनाचे सूचक म्हणून आली आहे.

प्रस्तुत रूपक कथेतील विविध प्राणी,त्यांचे स्वभावविशेष वर्तमान समाजातील विशिष्ट जातीचे व वृत्तीप्रवृत्तींचे सूचक म्हणून आले आहेत, हे समजायला उशीर लागत नाही. समाजातील गरीब, भोळ्याभाबड्या, चतुर, चाणाक्ष अन् अप्पलपोट्या अशा कित्येक प्रवृत्तींचे नेमके चित्रण बांदेकरांनी प्रस्तुत कादंबरीतून केले आहे. इंडियन ॲनिमल फार्ममधील बहुतेक सगळ्या घटना कमी अधिक प्रमाणात आज आपल्याला माणसांच्या फार्ममध्येही घडताना दिसतात. तिथल्या सगळ्या वृत्तीप्रवृत्ती आपल्याला परिचयाच्या वाटू लागतात. त्यामुळे इंडियन ॲनिमल फार्ममधील प्राण्याचे सुख-दु:ख, समस्या या आपल्या होऊन जातात. रूपकाच्या वापरानंतरही घटनाप्रसंग व वर्ण्य विषयाशी एकरूप होण्यातूनच बांदेकर यांना हे शक्य झाले आहे. उदा. बाजीराव गाढवाच्या माध्यमातून अशिक्षित तरीही अत्यंत व्यवहारी प्रवृत्ती येतात, तशा माठ्या बोक्यासारख्या लुच्च्या व अप्पलपोट्या प्रवृत्तीही येतात. माठ्या बोक्याच्या निमित्ताने मालक कुणीही असला तरी त्याच्या पायावर निष्ठा वाहून, त्याची मर्जी सांभाळून आरामात जगणाऱ्या प्रवृत्तींचेच सूचन बांदेकरांनी केले आहे. त्याचबरोबर म्हादू बैल, नेताजी घोडा, बाजीराव गाढव, चंफी कुत्री हे श्रमिक प्राणी मोर्चाचे सदस्य आहेत. हे रूपक बाजूला ठेवून हे संदर्भ तपासले असता हे प्राणी वर्तमानातील गरीब, श्रमिक, सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात.

खरे तर, म्हातारबा घोड्याची हत्या करण्याने किंवा म्हादबासारख्या कार्यकर्त्याला गायब करण्याने किंवा एका अनाम असुरक्षिततेत चंफीसारख्या कार्यकर्तीचे निष्ठा सोडून सत्तेची गणिते जुळविण्याने कोणतीही चळवळ संपत नसते. चळवळीच्या उभं राहण्यात, वाढण्यात आपण केवळ निमित्तमात्र असतो. चळवळी अन्याय, अत्याचार व शोषणाविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून उभ्या राहत असतात. त्यांच्यातील गतिरोधानेच त्या क्षीण होत असतात. कृष्णा घोड्याच्या हत्येनंतर व म्हादबासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या गायब होण्यानंतर कुणा सुसाट किंवा हिरकणीच्या निमित्ताने त्या पुन्हा बळावत असतात. जोपर्यंत शोषणकारी व्यवस्था समाजामध्ये उपस्थित आहे तोपर्यंत चळवळींचे उभे राहणे जितके अपरिहार्य तितकेच नैसर्गिक आहे. हेच बांदेकरांना या रूपक कथेतून सूचवायचे आहे.

बांदेकरांनी प्रस्तुत रूपक कथेतून अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या होणाऱ्या संकोचाबरोबरच समकालीन राजकारणातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घटनांची सूत्रबद्ध मांडणी केली आहे. म्हादू पुन्हा उभा राहून बोलू लागला, ‘बघा, साथींनो, ह्या पूर्वी इंडियन ॲनिमल फार्ममध्ये ह्ये आसलं कधी घडत नव्हतं . पण ह्ये आसं सारखं सारखं घडाया लागलं आहे . बोलणाऱ्याला बोलू दिलं जात नाहीय. विचार मांडू दिला जात नाहीये. आपल्या विचारांच्या प्राण्यांची सभा आयोजित केली, तर त्यात मुद्दामहून घुसून हुल्लडबाजी करून अडथळे आणले जात आहेत’ (पृष्ठ क्र. ३७). म्हादूच्या या निवेदनातून अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कळीचा प्रश्न लेखकाने ऐरणीवर आणला आहे. त्यांच्या या कादंबरीवर जॉर्ज ऑरवेल यांच्या अॅनिमल फॉर्म या कादंबरीचा प्रभाव आहे. ऑल आर इक्वल ही समाजवादी समाजव्यवस्थेची नव्या मालकाच्या येण्याने बट सम आर मोअर इक्वलया तत्त्वाकडे होत चाललेली वाटचाल हा एकूणच या कादंबरीचा मुख्य आशय व विषय आहे. थोडक्यात, सर्व प्राणी समान आहेत या सूत्रावर आधारित समताधिष्ठीत समाजव्यवस्थेमध्येच काही सत्ताकेंद्रांच्या अधिक शक्तिशाली होण्याने येऊ घातलेल्या नव्या शोषणव्यवस्थेचे सूतोवाच या दोन्ही कादंबऱ्यांमधून आले आहे. हे या दोन्ही कादंबऱ्यांचे समान सूत्र आहे.

हिंसा हे अन्यायावरचं उत्तर नव्हे . आपल्याला त्रास देणारे हे अज्ञानी प्राणी आपलेच बांधव आहेत . त्यांना आपण विचारांनीच समजावलं पाहिजे (पृष्ठ क्र. २३). बांदेकरांनी म्हादबा बैलाच्या तोंडी घातलेले हे उद्गार विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. हे कोणत्याही मानवतावादी चळवळीमध्ये अंतर्भूत असलेले तत्त्वज्ञान अधोरेखित करतात. या विचारांची लढाई जिवंत राहण्याची किंबहुना अधिक तीव्र होण्याची इच्छाही जिवंत ठेवली आहे. त्याचबरोबर संघटित होऊन लढले तर नक्कीच आपल्यावरचा अन्याय दूर होवू शकतो, हे म्हादू बैल व त्याचे साथी शिवारातल्या गरीब श्रमजीवी प्राण्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यात संघटित होऊन लढण्यावरचा व झालेल्या बदलांवरचा विश्वास अधिक दृढ करणारे आहे. असे कित्येक आशावाद प्रस्तुत रूपक कथेतून आले आहेत.

वस्तुत:, म्हातारबाच्या हत्येअगोदर व नव्या मालकाच्या आगमनापूर्वीचे फार्ममधील वातावरण विवेक, विचार, व्यक्तिस्वातंत्र्य, न्याय या मूल्यांवर विश्वास असलेले होते. परंतु इंडियन ॲनिमल फार्ममधील नव्या कारभाऱ्याच्या येण्याने आणि म्हातारबा नेत्याच्या हत्येने एकूण फार्ममध्ये जो संशयकल्लोळ आणि भयग्रस्ततेने जी वाताहत झाली आहे, ती केवळ या रूपक कथेतील कोंबड्यांची, शेळ्यामेंढ्यांची वाताहत न राहता आपल्या भवतालच्या दाटून आलेल्या वाताहतीशी साधर्म्य साधते. नव्या मालकाचा आदेश डावलून आपल्या रेडकाला चोरून दूध पाजल्यामुळे तिलोत्तमा म्हशीला देशद्रोही ठरवून तिच्या रेडकाला कायमचे संपवले जाणे, समकाळातील सामान्यजणांच्या जगण्याच्या नैसर्गिक हक्कामध्ये कायद्याच्या व विकासाच्या नावाखाली केले जाणारे हस्तक्षेप बांदेकरांनी अधोरेखित केले आहेत. याचबरोबर म्हतारबाच्या हत्येनंतर लेखकाने आता या अशा गोष्टींची सवय करून घ्यायला हवी असे म्हटले आहे , कारण, गोष्टी सवयीच्या झाल्या की आपणही निर्ढावत जातो आपल्या वाट्याला आलेल्या काळासारखेच. मग कशाचंच काही वाटेनासं होतं. नेहमीचंच झालंय आता हे असं, म्हटलं की आपणही मोकळे पुढं जायला (पृष्ठ क्र.१०). बांदेकरांनी या ठिकाणी माणसाचे सामूहिक निर्ढावलेपण व बोथट होत चालेल्या संवेदनांचे सूचन केले आहे .

समकालीन राजकारणात दिसणाऱ्या सामान्य कष्टकरी वर्गाचे जगणे प्रभावित आणि नियंत्रित करणाऱ्या कित्येक बिनचेहऱ्याच्या प्रवृत्ती इंडियन ॲनिमल फार्ममधून बांदेकर यांनी साक्षात प्रकट केल्या आहेत. मुळात त्यांनी अॅनिमल फॉर्मचा नवा मालक म्हणजेच एक बिनचेहऱ्याची आकृती कल्पिली आहे. तो दिसतो कसा? राहतो कुठे? करतो काय? येतो कधी? जातो कधी? या व अशा सर्वच गोष्टींबद्दल फार्मातील मुख्य निर्णयप्रक्रियेतील साहेबराव व नानोपंत यांच्या शिवाय सर्वच प्राणी अनभिज्ञ आहेत. फार्ममधील जय समर्थ गॅंगसारखा सामूहिक चेहरा असलेल्या तरीही तितक्याच परिचित असलेल्या प्रवृत्ती आजही आपल्या भोवती वावरताना दिसतात. या बिनचेहऱ्याच्या प्रवृत्तीच आज आपले जीवन नियंत्रित करीत आहेत. याची आपल्याला कल्पनाही नसते. याद्वारे एका भयंकर अशा संभ्रमावस्थेतच आपण जगत असल्याचे सूचन बांदेकरांनी केले आहे.

या कादंबरीतून वेगवेगळ्या घटनाप्रसंगांच्या निमित्ताने इतिहास व वर्तमान यांच्यातील अनेक सांस्कृतिक अंतर्विरोध बांदेकर यांनी समाविष्ट केले आहेत. या अंतर्विरोधातून वेगवेगळ्या संस्कृतींमधील संघर्ष व भारतीय प्राचीन परंपरेतील बहुसांस्कृतिकत्वही अधोरेखित झाले आहे. त्याचबरोबर समकालीन राजकीय व्यवस्थेतील अनेक छुप्या अजेंड्यांचा उच्चार संकेताने आला आहे. अस्मितांचे उधळलेले गोरू या भागातून जाती जातींमधील अधिक टोकदार होत चाललेल्या अस्मितांमुळे जातीय राजकारणाचे धुमसणारे अंत:प्रवाह अधिक ठळक व संदर्भासह आले आहेत. आपापल्या जातीपातीच्या झेंड्याखाली संघटित होणं ही त्यांच्यासाठी निव्वळ अस्मितेची गोष्ट नव्हती, तर शिवारातल्या वाढत्या असुरक्षित वातावरणात आपापलं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी त्यांना ते आवश्यक वाटू लागलं होतं (पृष्ठ क्र.७७). समाजातील या वाढत्या असुरक्षिततेतून लोकांचे जातीपातीच्या झेंड्याखाली एकत्र येणे अधोरेखित केले आहे. त्यामुळे राजकारणाच्या बदलत चाललेल्या दिशांचाही निर्देश बांदेकरांनी केला आहे .

पुरोगामी विचाराच्या सामाजिक व राजकीय चळवळींच्या क्षीण होण्यामागची कारणपरंपरा शोधण्याचा प्रयत्न बांदेकरांनी प्रस्तुत कादंबरीतून केला आहे. दिवसेंदिवस टोकदार होत चाललेल्या जातीय आणि धार्मिक अस्मितांमध्ये लेखकाने या चळवळीच्या क्षीण होण्यामागची कारणे शोधली आहेत. धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष राजकीय विचारांवर जातीपातीच्या राजकारणाने केलेली कडी हा या कादंबरीचा मुख्य कथाभाग आहे . म्हातारबाचे विचार कधीचेच आऊटडेटेड झालेत आणि तरीही हा म्हादू त्या विचारांना चिकटून राहायचा मूर्खपणा करतोय, म्हादूला व्यवहार कळत नाही, हा निव्वळ पुस्तकी पंडित आहे , पोथीनिष्ठ बावळट आहे , सगळे प्राणी समान आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच शिवाराच भलं होऊ शकतं, हे याचे विचार म्हणजे केवळ युटोपिया आहे (पृष्ठ क्र.७८). म्हातारबा घोड्याचे समतेचे, विवेकवादाचे, बंधुभावाचे व धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान म्हादबाच्या रूपाने पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु, बदलत्या काळाबरोबर धर्मनिरपेक्ष व जातनिरपेक्ष विचारधारेच्या शक्तींनी आपले तत्त्वज्ञान, आपले विचार आणि ते पोहोचविण्याची आपली साधने अपडेट न करता तिकडे दुर्लक्ष केले. याच गोष्टीचा फायदा जातीवादी व मूलतत्त्ववादी शक्तींनी घेतला. व अख्खं शिवार, फार्म, गाव व देश या सगळ्या संस्थांमधून धर्मनिरपेक्षतेच्या या उदात्त व मानवतावादी तत्त्वज्ञानाची पीछेहाट झाल्याचे सूतोवाच बांदेकर यांनी केले आहे.

इतिहास समजून घेण्याची वा त्याचे पुनराकलन करून घेण्याची आवश्यकता इंडियन ॲनिमल फार्म या कादंबरीमध्ये अंतर्भूत आहे. बांदेकर यांनी या कादंबरीतून अनेक ठिकाणी सत्ताकेंद्राद्वारे कालबाह्य झालेल्या व शोषक-शोषित यांच्यातील अंतर वाढवणाऱ्या परंपराचे पुनर्वाचन व पुनर्स्थापना करण्याचे झालेले प्रयत्न अधोरेखित केले आहेत. त्यांनी इतिहास काळापासून परंपरागत विघातक मूल्यांद्वारे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मानवी मूल्यांच्या होणाऱ्या मुस्कटदाबीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच फार्ममधील सौहार्दपूर्ण व शांततामय वातावरणाला बाधा पोहचल्याचे संकेतही कादंबरीतून आले आहेत. स्वयंघोषित संस्कृती रक्षकांच्या फतव्यांमुळे असुरक्षित झालेले सामान्यजनांचे जगणेही त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये सामावून घेतले आहे. बबी या मेंढीच्या निमित्ताने आजही सनातनी विचारांचा घट्ट पगडा असलेल्या जातपंचायती, त्यांचे समाज विघातक आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटणारे निवाडे व यातून सर्वहारा व विशेषत: स्त्रीजातीच्या वाट्याला येणारी अगतिकता बांदेकरांनी आपल्या कादंबरीचा आशय बनविली आहे. बबी व चंफीच्या रूपाने नव्या विचाराच्या स्त्री वर्गाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. उदा.कामवासना, प्रजनन, शरीरधर्म यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मादीजातीचा एक जीव म्हणून आपल्या जातभाईं असलेल्या कुत्र्यांपैकी कुणालाही समजून घेता आलं नाही, याची खंत चंफीला नेहमीच वाटत राहायची (पृष्ठ क्र.८९ ). चंफीच्या या वाटण्यातून आधुनिक व नव्या विचारांच्या स्त्री वर्गाच्या समकालीन समाजव्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत.

देवदेवतांवर अधिकार सांगण्यातून दोन समाजामध्ये निर्माण होणारी तेढ, त्यातून पेटणाऱ्या दंगली व त्यात होरपळणारा समाज हे गेल्या काही वर्षापासूनचे राजकीय पटलावरील कळीचे प्रश्नही बांदेकरांच्या नजरेतून सुटलेले नाहीत. लोकदेवता म्हसोबाच्या मंदिरावरून पेटलेल्या दंगलीच्या निमित्ताने बांदेकर याच गोष्टींकडे लक्ष वेधू पहात आहेत. या निमित्ताने इतिहास व आपल्या प्राचीन भारतीय परंपरांचा आपाआपल्या सोईनुसार अर्थ लावण्याच्या प्रवृत्ती देखील त्यांनी अधोरेखित केल्या आहेत. सत्तेच्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या धार्मिक भावना, श्रद्धा व जातीय अस्मिता यांचा केला जाणारा उपयोग व या सत्तासंघर्षातून विकोपाला गेलेला धार्मिक व सांस्कृतिक संघर्ष मांडणारे अनेक प्रसंग प्रस्तुत कादंबरीतून आले आहेत. कोळसूद, रानडुक्कर आदी बाह्य शक्तींकडून फार्मातील जनजीवनात होणारे हस्तक्षेप आपले रोजचे शांत जगणे प्रभावित करणाऱ्या बाह्य शक्तींची आठवण करून देतात. बांदेकर यांनी या रूपक कथेतून समूहमनाच्या संभ्रमावस्था नेमक्या हेरल्या आहेत.

सत्ताधारी डुकरांकडून व कुत्र्यांकडून नव्या मालकाच्या स्वागताच्या नावाखाली संपूर्णइंडियन अॅनिमल फार्ममधील गरीब प्राण्यांची झालेली लूट व फसवणूक ही सत्ताकेंद्राकडून रोजच या ना त्या निमित्ताने होणाऱ्या आपल्या लूटीशी व फसवणूकीशी नाते सांगणारी आहे. म्हशींच्या लांब शिंगांवर, शेपटांवर व आचळांवर लावलेल्या जाचक करांच्या माध्यमातून बांदेकर वर्तमान सरकारी व्यवस्था व योजनांमधील अंतर्विरोधाकडे लक्ष वेधू पाहत आहेत. डुकरं आणि कुत्र्यांच्या रूपकातून वर्तमान परिस्थितीतील राजकीय क्षेत्रांतील झुंडशाहीचे चित्रण कादंबरीतून आले आहे. गुंडगिरी व दहशत यांच्या शिवायचे विवेकनिष्ठ व तत्त्वनिष्ठ राजकारण आजच्या काळात हद्दपार होत चालल्याच्या अनेक खुणा बांदेकरांनी कादंबरीभर सोडल्या आहेत. त्याचबरोबर चंफी आणि नानोपंत यांच्यातील संबंधाच्या निमित्ताने सत्ताकारणाच्या आणि शरीरधर्माच्या अगतिकतेतून येणारे स्त्री-पुरुष संबंधातील नागडेपणही अतिशय संयमाने मांडले आहे. भविष्यात येऊ घातलेल्या अनेक भयग्रस्त शक्यतांचे सूचन या रूपक कथेतून आले आहे .

याशिवाय या रूपक कथेतून समकालीन भारतीय राजकारणातील अनेक लहानसहान गोष्टी मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. कादंबरीतील सुसाट घोडा व हिरकणी गाढवीण हे लिहिणे वाचणे शिकून पुस्तकाशी नाते जोडलेल्या व स्वत:च्या नैसर्गिक हक्कांबद्दल सजग असलेल्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. ही पिढी आपल्या जोडीदार निवडीच्या हक्कापासून ते आपल्या भाषण स्वातंत्र्यापर्यंत सर्वच हक्कांबद्दल जागृत आहे. ही पिढी खऱ्या अर्थाने म्हतारबाचे संस्कार घेऊन जगते आहे. त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक गतिरोधांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या वाताहतीस कारण ठरलेले गर्दीकडून तात्काळ केले जाणारे निवाडे समकालीन समाजातील भयग्रस्तता वाढविण्यास मदत करतात. सत्ताधारी कारभाऱ्याकडून माध्यमांच्या द्वारे केलेल्या खोट्या प्रचाराला व इतिहासाच्या लावलेल्या चुकीच्या अन्वयार्थाला बळी पडलेला एक मोठा वर्ग या कादंबरीतून कार्यरत आहे . वर्तमानात सत्तेसाठी चालू असलेल्या माणसामधील कळवंडी कुत्रा , मांजर , डुक्कर , बैल आदी प्राण्यांमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्यांना कुणाला ह्या शिवाराची शिस्त आणि संस्कृती पाळायची नसेल, ते खुशाल हे शिवार सोडून पलीकडच्या शिवारात जाऊ शकता (पृष्ठ १४३) अशी सत्ताकेंद्रांकडून केली जाणारी विधाने अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रश्नातून साहित्यिक विचारकांच्या झालेल्या हत्या व त्याचे परिणाम म्हणून पुढे आलेली पुरस्कार वापसीची चळवळ या अलीकडच्या काळातील काही ठळक घटनाप्रसंगांची आठवण करून देतात.

म्हातारबा कृष्णा घोडा, म्हादबा बैल, बाजीराव गाढव यासारखे समाजातील ऐक्य व बंधुत्व टिकवण्यासाठी झटणारे कित्येक कार्यकर्ते व त्यांनी उभ्या केलेल्या कित्येक चळवळी या सत्तासंघर्षाच्या खाईत गडप होत असतात. परंतु विचाराच्या रूपाने चळवळी नव्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात. कादंबरीच्या शेवटी काळाची चक्रे इतकी गतीने फिरत आहेत की कादंबरीतील दोन–ती –चार पिढ्या एकाएक इतिहास जमा होतात. आणि आपल्याच शिवारातील पक्ष्यांच्या गोष्टीतील पात्रे बनून जातात. ‘आरं , आपला म्हातारबा रे .. आपला कॉम्रेड कृष्णा घोडा .. अरं बगा, रं बगा, डोळे उगडून बगा तरी एकडाव.. कसा आपल्या पोरांतच मिसळून गेलाय..ह्येचा अर्थ म्हातारबा हायी ! म्हातारबा मेला न्हायी .. आपल्याच पोरांसंगट वावरतोय तो.. त्येस्नी घेऊन फुडं निगालाय..’ (पृष्ठ क्र. २५६ ) हे म्हादबाला त्याच्या मरणोपरांत होणारे आभास आहेत. या आभासामध्ये म्हतारबाचे नव्या पिढीबरोबर आंदोलनामध्ये उपस्थित असने माणूस मारता येतो परंतु विचार मात्र मारता येत नाही. तो येणाऱ्या पिढ्यांची सोबत करतो. त्यांना लढायला उर्जा पुरवितो. तो एका पिढीकडून दुसरीकडे हस्तांतरित होतो, हेच विचारांचे व चळवळींचे वैश्विक तत्त्वज्ञान अधोरेखित केले आहे.

माणसांच्या वृत्तीप्रवृत्तींची प्राणीकथेच्या रूपकातून मांडणी करताना बांदेकर यांनी या वृत्तीप्रवृत्तींबरोबरच प्राण्यांच्या वर्तनव्यवहाराचेही अवधान पाळले आहे . त्यांच्या कादंबरीतील गरीब श्रमजीवी वर्गाचे प्रतिनिधित्व बैल, गाढव, घोडा, शेळ्या, मेंढ्या, म्हशी हे श्रमाशी व उत्पादक वर्तनव्यवहाराशी नैसर्गिक संबंध असणारे प्राणी करताना दिसतात. तर डुक्कर हा अत्यंत निरुपयोगी प्राणी कारभारी म्हणून दाखविला आहे. कुत्रा हा रक्षणाचे व दहशत कायम ठेवण्याचे परंपरागत कार्य करणारा प्राणी फार्ममध्येही रक्षणाचे व दहशत निर्माण करण्याचेच काम करतो. त्याचबरोबर पोपट , कबुतर व कावळ्यांना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कल्पिणेही त्यांच्या वर्तनव्यवहाराशी सुसंगतच आहे. या अवधानाबरोबरच या रूपक कथेतून भाषेचा देखील अत्यंत परिणामकारक वापर बांदेकरांनी केला आहे. साहेबराव डुक्कर व नानोपंत श्वान या सत्तास्थानी असलेल्या पात्रांच्या तोंडी येणारी भाषा दहशतीची व दिशाभूल करणारी आहे. उदा. ‘कोण आहेत या शिवारद्रोही छिनाल रांडा ? .. शिवारासाठी चिमूटभरसुद्धा त्याग तुम्हाला करता येत नाही का ? ज्यांना कुणाला शिवाराची शिस्त पाळायची नसेल ते खुशाल हे शिवार सोडून पलीकडच्यांकडे जावू शकतात. जा, आणि बघा तिथं कशा चाबकानं तुमच्या आरत्या ओवाळतात ते ! त्याच्या (साहेबरावच्या) आवाजातील जरब आणि चेहऱ्यावरचे क्रुद्ध भाव पाहताच बोलणारे प्राणी एकदम चिडीचूप झाले. नानोपंत ! कुठायत तुमचे सैनिक हे असे छुपे देशद्रोही तुमच्या नजरेतून सुटतात कसे ? ही सगळी त्या युनियनवाल्या काळतोंड्या म्हाताऱ्याची पिलावळ असणार. बघताय काय, घ्या यांना ताब्यात . चांगली अद्दल घडावा एकेकीला ..’ (पृष्ठ १४३) साहेबराव डुकराच्या संवादातून बांदेकर यांनी शोषित आणि शोषक यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून त्या पात्रांचे सत्ताकारण अधोरेखित झाले आहे .

त्याचबरोबर या कादंबरीतून शेळ्या, मेंढ्या, म्हशी व कोंबड्या आदी गरीब प्राण्यांची भूमिका कायम बचावात्मक व आर्जवाची राहिली आहे. उदा. काही कोंबड्या एका मेलेल्या घुशीच्या आसपास घुटमळताना दिसल्या. त्यांना ती घूस मोहिनीच्या नात्यातल्या मांजरीने मारून दिली असावी असा संशय येवून संस्कृतीरक्षक कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या नरडीचे घोट घेतले होते . तर मोहिनीच्या आईबहिणींवर हल्ले करून जबर जखमी केले होते . तुमच्या देवाचे वाहन उंदीर आहे हे ठीक आहे, पण घुशीचा काय संबंध , असं विचारावंसं वाटूनही कुणीच त्यांना विचारायच धाडस केलं नाही. यामागे कदाचित शिवारद्रोही कोंबड्यांची बाजू घेतली असा आरोप ठेवून आपल्याला मारपिट करण्यात येईल, अशी भीतीही असू शकत होती. (पृष्ठ १६६) या प्रसंगातून बांदेकरांनी एका शोषित समाज घटकाचे व प्रवृत्तीचे सूचन केले आहे त्यांची अगतिकता त्यातून अधोरेखित झाली आहे. त्याचबरोबर म्हादबा बैल, बाजीराव गाढव व चंफी कुत्री ही चळवळीच्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रेही संयमाची, बदलाची व मानवमुक्तिच्या लढ्याची पोक्त भाषा बोलताना दिसतात. एकूणच, कादंबरीतून भाषिक लहेजाद्वारे सर्वच वृत्तीप्रवृत्तींच्या स्वभावाचा विशिष्ट परिणाम ठसवण्यात बांदेकर यशस्वी झाले आहेत.

इंडियन ॲनिमल फार्ममधील म्हातारबा घोड्याची झालेली हत्या मानवी इतिहासातील पहिलीच हत्या नाही. अशा कित्येक हत्या इतिहासाने पाहिल्या आहेत. त्यांचीच ही एक पुनरावृत्ती आहे. सैरभैर झालेल्या सामान्य जीवांना एकत्र आणू पाहणाऱ्या, शहाणपणाचे चार शब्द शिकवू पाहणाऱ्या व निर्भय सत्याची उजेडाची वाट दाखवणाऱ्या कुणाची तरी ही हत्या म्हणजे एका अर्थाने विवेक, विचार, विज्ञान आणि न्याय या मानवी मूल्यांचीच हत्या आहे. अशा हत्यांनी चळवळी संपत नसतात. या हत्येने प्रस्तुत रूपक कथेतील प्राणी बांधवांमध्ये पसरलेली अस्वस्थता समकाळातील एका विशिष्ट समूहाच्या अस्वस्थतेशी नाते सांगते. या अस्वस्थतेतूनच चळवळी अधिक भक्कम होत असल्याचे सूचन बांदेकर यांनी केले आहे .

वर्तमान परिस्थितीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे भयंकर दाब लेखक विचारकांवरती निर्माण झाले आहेत. या दाबातूनच बांदेकरांनी समकालीन राजकारणावर भाष्य करण्यासाठी प्राणी कथेच्या रूपकाचा आधार घेतला आहे. लेखकावरचे हे दाब प्रत्यक्ष कादंबरी अंतर्गत पात्रांवर देखील दिसून येतात. समकालीन राजकारणावर रूपकात्मक भाष्य करणाऱ्या या कादंबरीतून बांदेकर यांनी समकालीन राजकारणातील टिपेला पोहचलेला वैचारिक संघर्ष सामावून घेतला आहे. समकालीन राजकारणाची अनेक रूपे या कादंबरीतून आली आहेत. त्यांच्या या लेखनाला समकालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक घटनांचे संदर्भ लाभले आहेत. सकृत दर्शनी ही कथा कुत्र्यामांजराची कहाणी वाटत असली तरी तिच्यातील समकाळाला भिडण्याच्या शक्तीमुळे ती वर्तमान परिस्थितीत लेखकाच्या वाट्याला आलेल्या सामाजिक व राजकीय स्थिती गतीचा आलेख ठरते. त्यामुळे प्राणी कथेच्या रूपकाद्वारे व्यक्त होऊनही अपेक्षित अर्थबोध साधण्यात बांदेकर यशस्वी झाले आहेत. थोडक्यात, समकालीन राजकारणातील विभिन्न वृत्तीप्रवृत्ती, मतप्रवाह व कारस्थानांचे अर्थ या रूपककथेमध्ये अंतर्भूत आहेत हे या कादंबरीचे बलस्थान आहे.

चित्र सौजन्य: चेतन मेवाडा

नामदेव गपाटे काशी हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी येथील मराठी विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

2 comments on “समकालीन राजकारणावरील रूपकात्मक भाष्य: इंडियन ॲनिमल फार्म

  1. vaijayanti

    nice article namdev

    Reply
  2. Namdeo

    thank you … Tai

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *