मूळ लेख: नमन अहुजा
मराठी भाषांतर: मधुरा जोशी
आपल्या राज्यघटनेतील ऐतिहासिक कला भविष्याचा वेध घेऊ शकते का?
५
back
राज्यघटना हा एक हस्तलिखित, सचित्र दस्तऐवज आहे. त्यामध्ये शेवटी स्वाक्षऱ्यांची एक मालिका आहे. पूर्वीच्या काळी, कोणत्याही राज्यातील सर्वांत मौल्यवान हस्तलिखिते, हुकूम आणि आदेश हाताने लिहिले आणि रेखाटले जात आणि राज्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्यांने त्याला मान्यता देण्यात येई. आपली राज्यघटना ही एका अश्या एका दीर्घ पुरातन परंपरेतील कलाकृती आहे. आपल्या घटनेमध्ये सुलेखनकार आणि कलाकारांच्या स्वाक्षर्या कोरलेल्या आहेत. यामध्ये संविधान संमेलनातील २८४ सदस्यांच्या स्वाक्षर्या तसेच सुलेखनकार प्रेम, मुख्य कलाकार नंदालाल बोस आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतन मध्ये काम केलेल्या सर्वांच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे. घटनेतील सुलेखन प्रेमबिहारी नारायण रायझदा यांनी केले तर प्रत्येक पानाच्या चौकटीतल्या कडांवर शांतिनिकेतन मधील अनेक विद्यार्थ्यांनी काम केले होते.
पारंपरिक मुघल आणि सल्तनत हस्तलिखितांमध्ये वापरल्या गेलेल्या हाशिआ पद्धतीने पानांच्या चौकटींवर सुलेखन केले गेले. संपूर्ण हस्तलिखितामध्ये दोन प्रकारच्या किनारी वापरल्या गेल्या आहेत. सर्व पृष्ठांमध्ये एक साधी, सोन्यासारखी कडा आहे , तर कलमांच्या सुरुवातीच्या पानांवर आणि प्रत्येक कलम ज्या पानावर संपते तिथल्या आतल्या कडा सोन्याच्या अलंकारांने सुशोभित आहेत.
घटनेच्या दोन मूळ सचित्र प्रती आहेत. यातील मुख्य प्रत इंग्रजी हस्तलिखित होती, तर दुसरी प्रत हिंदीमध्ये हस्तलिखित होती आणि कलाकारांच्या वेगवेगळ्या गटांनी ती प्रकाशित केली होती. या दोन्ही मूळ प्रती दिल्लीतील संसद भवनात हिलियमने भरलेल्या कपाटात सीलबंद करून ठेवल्या आहेत. ह्या प्रतींवर काम करणाऱ्या कलाकारांच्या गटाचे नेतृत्व शांतिनिकेतनच्या कला भवनाचे प्राचार्य नंदालाल बोस यांनी केले होते.
भारतीय सर्वेक्षण संस्थेने गेल्या काही वर्षांमध्ये घटनेच्या प्रतीचे पुनर्मुद्रण केले. परंतु ह्या प्रतींचा दर्जा वर्षांनुवर्षे खालावतच गेला आहे. माझी स्वतःची प्रत २००० मध्ये दिल्लीच्या एका प्रिंटरद्वारे भारतीय सर्वेक्षण संस्थेने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या आदेशानुसार तयार केलेली एक बेढब आवृत्ती आहे. तीन वर्षांपूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई येथे आणि नॅशनल म्युझियम, दिल्ली येथे ‘भारत आणि जग’ नावाने आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित केले होते. मी या प्रदर्शनाचा क्युरेटर होतो आणि राज्यघटना हा या प्रदर्शनाचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज असेल असे ठरले. मी सादर करत असलेल्या घटनेची मला उपेक्षा करण्याची इच्छा नसल्यामुळे, मला घटनेच्या १९५० च्या आधीच्या असलेल्या प्रति शोधाव्या लागल्या. कारण, त्याकाळात भारतीय सर्वेक्षण संस्था स्वतःचे काम जरातरी गांभिर्याने करत असे.
गेल्या काही वर्षांत विविध लेख आणि ब्लॉग्स मधून बोस यांच्या या घटनेतील रेखाटनाने आधुनिक प्रेक्षकांपुढे / वाचकांपुढे समस्या निर्माण केली आहे. बोस यांनी विविध भारतीय कला परंपरांचे प्रतिपादन करून, त्यांना एकत्र जुंपून एक कथन उभे केले. यामध्ये त्यांनी पौराणिक कथा आणि त्यातील पात्रांना वास्तविक इतिहासात मध्ये मध्ये पेरले आहे. शेवटची तीन चित्रे केवळ भारतातील भूप्रदेशाशी संबंधित आहेत. ही जंगल, वाळवंट, समुद्र आणि डोंगराच्या भूमीची रेखाटने एकत्र बघितली तर ती हडप्पा काळातील सामर्थ्य आणि प्रतिष्ठेने संपूर्ण अश्या सील बैलापासून सुरू होतात. यावर पुरातन काळातील अज्ञात भाषेतील चिन्हांच्या खुणा आहेत. या रेखाटनांवरून हे स्पष्ट होते की मानवी संस्कृती आल्या आणि गेल्या आणि आपण घटनेतील प्रकरणे बघायला लागतो तशी चित्रे उलगडू लागतात: आपल्याला काही लोक राजवाड्यात दिसतात तर काही निसर्गाच्या सान्निध्यात दिसतात.
घटनेतील नागरिकत्वाशी संबंधित भाग हा जंगलातील ऋषींच्या आश्रमस्थानाच्या चित्राने सुरु होतो, तर मूलभूत हक्कांवरील तिसरा भाग राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या चित्राने सूचित केला आहे. नैतिक कृती किंवा सदाचरण म्हणजे काय हा मोठा पेच अर्जुन आणि कृष्णाच्या कथेतून दिसतो. यात पुढाकार घेण्यास असमर्थ ठरलेला अर्जुन नतमस्तक झालेल्या अवस्थेत दर्शविला आहे. तर, राज्य धोरणाची निदर्शक तत्वे या चवथ्या भागाच्या येथे निर्विकार चेहऱ्याने उभ्या असणाऱ्या कृष्णाचे चित्र आहे. बुद्धाच्या अवशेषांचे (ऐतिहासिक) दुसरे विभाजन आणि त्याचे अवशेष दक्षिण आशियाच्या प्रत्येक भागाकडे पाठविण्याचा अशोकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण सातव्या भागाच्या सुरुवातीला आहे. हा प्रसंग संघराज्यातील प्रत्येक राज्याचे अधिकार सांगतो. अश्याप्रकारे, प्रत्येक चित्र भारतीय कलेच्या वेगेवेगळ्या कालखंडामधून घेतलेले आहे. त्यातील बरेचसे भाग हे सोन्यात आरेखित केलेले आहेत. या हस्तलिखितांचे स्वरूप पोथी या पारंपरिक भारतीय हस्तलिखितांसारखे आहे आणि त्यातील प्रत्येकात मजकूराबरोबर जाईल असे कथानक शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु तो नक्कीच उघड नाही, तर अव्यक्त आहे आणि म्हणूनच तो समजून घेण्यासाठी वाचकांना विचार करण्याची गरज आहे.
या चित्रांमध्ये भारतीय कलेच्या अनेक शैलींचा काळजीपूर्वक समावेश केला आहे. यामध्ये अजिंठा, बाघ येथील भित्तिचित्रे आणि राजस्थानी पुस्तकातील रेखाटने, मुघल, दखनी आणि पहाडी परंपरा, कोणार्क, भरहुत, अमरावती, महाबलीपुरम आणि चोळ दक्षिणेचे शिल्प यांचा समावेश आहे. तीन दशकांपर्यंत, भारतात शांतिनिकेतनचा अभ्यासक्रम सक्रियपणे लागू होता. या अभ्यासक्रमात जगातील विविध भागांतील कलापरंपराचा समावेश होता आणि त्या शिकण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सक्रियपणे प्रोत्साहित केले जात होते. परंतु, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भारतीय कलेच्या समृद्ध वारशाला मूर्त स्वरूप देण्यास प्रेरित करणे ही आवश्यक होते. अशा रीतीने वर्षानुवर्षे ह्या संकल्पनांवर केलेल्या कामाचा परिणाम घटनेच्या मुखपृष्टासह सर्वच मुख्य पानांवरच्या एकरेषीय रचनामंध्ये व चित्रांमध्ये दिसून येतो.
शांतिनिकेतनच्या कलाभवनाची मूल्ये ही चेला आणि मास्टर मोशाय (नंदलाल बोस यांना या नावाने संबोधले जाई)यांनी एकमेकांच्या सहयोगाने काम करण्यात होती. बोस आणि त्यांचे विद्यार्थी अशाचप्रकारे एकत्र काम करत. सहसा असे मानले जाते की आपल्या निवडक रेखाटनांच्या मांडणीतून भारताचा कालक्रमानुसार इतिहास सांगायचा बोस यांचा हेतू होता. तरीही प्रत्येक संपादक आणि क्यूरेटर हे जाणतो, की एखाद्या घटनेची निवड करणे आणि दुसऱ्या एखाद्या घटनेची निवड न करणे यामागे काहीतरी विचार किंवा तर्क असतोच.
तर, बोस यांच्या निवडी काय दर्शवितात? तसेच, प्रत्येक कालावधीचे प्रतीक म्हणून निवडलेल्या विशिष्ट आख्यायिकांची निवड कशाने निश्चित केली हा ही एक प्रश्न इथे निर्माण होतो. पुढे जाऊन इतर प्रश्न देखील उद्भवतात. संपूर्ण निवड लोकांच्या इतिहासाऐवजी नायकांच्या निवडी (आणि फक्त एक महिला नायिका, झाशीची राणी लक्ष्मीबाई) वर केंद्रित असल्याचे दिसते. या टोकाच्या स्व-सिद्धभावातून राष्ट्राभिमानाचा प्रसार करणे हा उद्देश आहे का? आपल्या आधुनिकतावादाच्या समजेत वीराची किंवा व्यक्तीची पूजा करणे हे अंतर्भूत आहे. भूतकाळाकडे पाहाण्याची ही व्यक्तिकेंद्री दृष्टी याचेच वैशिष्ट्य आहे. आणि कलाकारांनी त्यावेळी ज्या पद्धतीने विचार केला त्यात स्त्रियांचा कायमच अभाव दिसत आला आहे. आज अनेक कला इतिहासकार यावर टीका करताना दिसतात. आणि म्हणूनच, अनेक प्रकारे राज्यघटना हा एक आधुनिकतावादी प्रकल्प आहे. त्यामधील शब्द आपल्या भविष्याला आकार देतात तर त्यातील रेखाटनांतून भारतीय राष्ट्रीय चळवळीत यशस्वी झालेल्या एका विशिष्ट भूतकाळाच्या संकल्पनेचे दर्शन घडते.
तथापि, बोस आणि १९४० च्या दशकातील इतर राष्ट्रवादी यांना त्यांनी रेखाटलेले नायक आज ५० वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात कश्याप्रकारे समजले जातील याचा अंदाज बंधू शकले नसतील. १ जानेवारी १९९० रोजी न्यायमूर्ती हरिनाथ तिल्हारी यांनी एक निर्णय दिला की घटनेतील रेखाटनांमध्ये असलेली धर्मनिरपेक्षता आणि सांस्कृतिक वारसा ही संकल्पना धर्माला नाकारणारी नाही. विश्व हिंदू अधिवक्ता संघाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडे असा युक्तिवाद केला होता रामाचे घटनात्मकदृष्ट्या ‘दर्शन’ आपण घेऊ शकतो. राज्यघटनेत राम, अकबर आणि इतर व्यक्तिमत्वे चितारलेली आहेत. त्यांच्या घटनेतील उपस्थितीमुळे त्यांना ‘घटनात्मक व्यक्तिमत्त्वे’ म्हणून ती प्रमाणित होतात असा हा युक्तिवाद होता.
घटनेतील ही चित्रे हडप्पा संस्कृतीपासून ते १९४७ च्या स्वातंत्र्यापर्यंतच्या भारतीय कलेच्या इतिहासावर आधारित आहेत. यामध्ये ऐतिहासिक युगातील प्रत्येक विशिष्ट शैलीचे स्पष्टीकरण देऊन देशाला त्याच्या कलात्मक इतिहासाशी जोडले गेले आहे. तथापि, या विविध ऐतिहासिक काळाची परिभाषा सतत बदलते. घटनेत सूचीबद्ध केलेले शब्दप्रयोग आपण आता वापरत नाही. उदाहरणार्थ:- ‘मोहेंजोदारो काळ’ किंवा ‘महाकाव्य कालखंड’. वसाहतकालीन ब्रिटिश कालखंडात्मक पद्धतीत बोस आणि त्यांचे सहकारी वाढले. त्यात भारतीय इतिहासाला ‘मुस्लिम काळ’, ‘वैदिक कालखंड’ , ‘ब्रिटिश कालखंड’ अशा कालखंडा विभागले गेले. आज ती पद्धत मोडीत काढण्याचा आपण कसोशीने प्रयत्न करतो. म्हणून सर्व कलाकृतींप्रमाणेच या कलाकृतींचा विचार ही ज्या काळात ही चित्रे केली गेली त्या काळातील त्यांच्या चित्रांना मार्गदर्शन करणारे नियम किंवा अत्यावश्यकता यांच्या संदर्भात केला पाहिजे.
इतिहासाचा उद्देश हा केवळ ज्यांनी संस्कृती निर्माण केली त्या राष्ट्रपुरुषांच्या अभिमानाने प्रेरीत होणे हा असेल तर आपल्याला यापेक्षा चांगले भविष्य असे असू शकते हे कधीच लक्षात येणार नाही. कारण तसे असेल तर मग जे काही चांगले होते ते पूर्वी इतिहासात होते असेच समजले जाईल. आणि मग आपल्याला ते बदलण्याची गरज तरी काय? असे वाटेल. या पार्श्वभूमीवर जर बोस यांनी घटनेतील रेखाटन करताना आपल्या संस्कृतीने जे अत्याचार घडवले किंवा अत्याचाराच्या पद्धतींना त्याजणे अशक्य मानले, त्यांचे वर्णन करण्याचा थोडा विचार केला असता तर आपल्याला घटनेची आवश्यकता खरेच का आहे, याची आपल्याला जाणीव राहिली असती, असे म्हणता येईल काय? आपल्या आजूबाजूला जेव्हा भविष्यासाठीच्या लढाया लढल्या जात आहेत तेव्हा आपल्याला जर आपल्या इतिहासाने दिलेली ओळख धरून ठेवावीशी वाटत असेल तर तर घटनेतील रेखाटनातील उद्देशाविषयीचा तणाव हा आपल्या वर्तमानातील तणावाचे प्रतिबिंब आहे. तर मग हा तणाव हीच आपली नियती आहे का? परंपरेच्या आवाक्याचे समर्थन करत आधुनिकतेकडे पाहताना आपल्याला इतिहासाविषयी भूमिका घेणे भाग आहे. आणि त्याचबरोबर ‘परंपरा’म्हणून नेमके काय पात्र ठरते हे ठरवणेही महत्त्वाचे आहे.
हा तणाव किंवा ही समस्या ओळखणे हाच एक उपयुक्त दृष्टिकोन असू शकतो.यातूनच आपण ‘राष्ट्र’या संकल्पनेतील नाहीशी झालेली आशा पुनरुज्जीवित करू शकतो. भूतकाळातील मूल्यांबरोबर सलोख्याचं नात बाळगण्याची आशाही यातून आपल्याला मिळते. आणि म्हणूनच संविधानातील रेखाटनातील अर्जुन नायक म्हणून न पाहता त्याच्या नतमस्तक अविर्भावातून जी द्विधा मनस्थिती दिसते ती समजून घेतली पाहिजे. नायक अशोकाच्या प्रतिमेमधील नायकापेक्षा त्याची अवशेषांचे विभाजन करण्याची कृती आणि युद्धाच्या अत्याचारांमुळे त्याला अहिंसेच्या तत्त्वाचा प्रसार करण्याची लक्षात आलेली गरज समजून घेतली पाहिजे. ह्या नायकांच्या शैलीशी किंवा नावाशी साधर्म्य यापेक्षा या नायकांनी जी अरिष्टे, तणाव किंवा समस्या यातून जो मार्ग शोधला तो मार्ग ह्या चित्रांमधील उद्देश आणि संदेश आहे. या समस्यांत नायकांनी बजावलेली भूमिका सक्षम होती जी आपल्याला कार्यरत ठेऊ शकते. या सर्व अस्थिरता आणि अपयशातून मार्ग काढत ज्यांनी इतिहासाला एक दिशा दिली अश्या ह्या चित्रांकडे खरोखरच आधुनिकतावादाच्या विजयाची चित्रे म्हणून बघता येऊ शकते.
ज्या अवघड आणि संवेदनशील परिस्थितीत आणि कथानकांच्या संदर्भात हे नायक उदयास आले, त्या परिस्थितीच्या वाचनाने आज आपल्याला यापुढे आशा दिसू शकते आणि मार्ग शोधण्यात मदत होऊ शकते.
प्रतिमा सौजन्य: नमन अहुजा.
वरील चित्र: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नंदलाल बोस यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र. यात दांडीयात्रेतील गांधीजींच्या पदयात्रेचे चित्रण केले आहे.