एखादं चित्र हजारो शब्दांसारखं असते. पण ते कृतीतून आलं की तेच शब्द लाखवेळा गायली जाणारी गाणी होतात. अशी गाणी आठवणींसारखी असतात. त्यांची लय आपल्याला काहीतरी शिकवून जाते. शिकवणी सारखी असते. तुम्ही त्यातील शब्द विसराल पण त्यांची लय दीर्घकाळ तुमच्या मनात राहते. निर्वासितांच्या छावणीतील अशा अनेक लयबद्ध सुरांच्या आठवणी माझ्या मनात कोरल्या गेल्या आहेत. जीवनातल्या या आठवणींमध्ये एक जादू आहे. ती सामान्य अनुभवाच्या पल्याडची आहे. जेव्हा तुम्ही ही गाणी गुणगुणता तेंव्हा तुम्ही ती पहिल्यांदा ऐकली होती त्या काळात आणि त्या जागी जाऊन पोहचता. आणि आता जेव्हा मी ती गाणी गातो तेंव्हा शब्दांसकट त्यांची लय माझ्या मनात गुणगुणू लागते. शब्दांच्या संगीतमय लयबद्ध बांधणीतील ही गीतं, पुन्हा मला त्या दिवसांची आठवण करून देतात आणि ती शिकवण मी मौल्यवान हिऱ्याप्रमाणे माझ्या मनात साठवून ठेवतो.
दिवसभराच्या कामानंतर मी आणि सईद छावणीमध्ये परत येतो. तो दाराचं कुलूप उघडतो तेव्हा मी त्याच्या मागे उभा राहून जणू मी काही पाहिलंच नाही असं दाखवतो. नेहमीप्रमाणे समोरच्या दुकानदाराची टपोऱ्या डोळ्यांची मुलगी समोरच नेहमीच्या जागी नेहमीप्रमाणेच बसलेली असते आणि नेहमीप्रमाणेच ती माझं निरीक्षण करत असते – जणू मी एखादा अद्भुत पक्षी आणि ती पक्षीनिरीक्षक. शेवटी कुलूप उघडतं, मी त्याच्या मागेच उभा असतो, सईद आत जाण्याआधी खाली वाकून उजव्या हाताने जमिनीला स्पर्श करतो, उठतो आणि मागे होण्यापूर्वी हलकेच आपल्या ओठांना स्पर्श करतो आणि ‘या अल्ला’ म्हणत हाताचं चुंबन घेतो.
‘कशासाठी?’ मी स्वतःलाच विचारतो. ही जागा? हे आयुष्य? यासाठी तू आभार मानतोस? सईदला विचारण्यापूर्वी मी स्वतःलाच पुन्हा प्रश्न करतो.
“मी स्वर्गाचं तर चुंबन शकत नाही. नाही का? म्हणून मी भूमीचे चुंबन घेतो.”
मला जेंव्हा ओरडावसं वाटतं तेंव्हा मी शांत बसतो, मी गप्प राहून वेळ घालवतो कारण ती शांती मला पुढच्यावर परत फेकायची असते. हे सर्व समजायला मला काही वर्षं लागतात आणि अजून काही वर्षे लागतील हे सगळं मनात रूळवायला. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे ह्या निराशेच्या काळात जपलेली दडलेली कृतज्ञता, परीक्षेच्या क्षणातली सहनशीलता आणि अशा वेळी ईश्वराला सामोरे जाण्याचा संयम.
‘ठक! ठक!’ कोणीतरी दारावर थाप मारली. आम्ही आमच्या दुपारच्या वामकुक्षीतून जागे झालो. सईद दाराकडे गेला. त्या दुकानदाराची मुलगी हुंदके देत असलेली त्याला दिसली. काय झालं हे सांगायला सुरुवात करताच करत ती ओक्साबोक्सी रडू लागली. मी पण दाराजवळ गेलो पण सईदनी मला एकदम पुढे न येण्याची खूण केली.
“काय झालं?”, मी विचारलं.
“अल-हज मोहम्मदना हृदयविकाराचा झटका आला”, सईद नि मला सांगितलं.
“ते कोण आहेत ?”, मी विचारलं.
“आपले शेजारी, आणि त्या मुलीचे आजोबा.. आता प्रश्न विचारत बसू नको. ‘या अल्ला!” म्हणत पायात चप्पल सरकवली.
लगेच आम्ही अल हाजींच्या घरी गेलो. खरवडलेल्या भिंतींची, दोन ती मजली इमारत. प्रत्येक मजल्यावर दोन खोल्या, आत जाताच, चौदा जणांचं कुटुंब एकमेकांना चिकटून जवळजवळ बसून जपमाळ घेऊन प्रार्थना करताना आम्हाला दिसलं. आधी मला वाटलं की ते गृहस्थ गेले आहेत पण लगेच माझ्या लक्षात आलं की ते अजून आहेत. मागच्या बाजूला असलेल्या झोपायच्या खोलीतल्या पलंगावर पडून ते जोरजोरात श्वास घेत होते आणि पाण्याबाहेर काढलेल्या माशा सारखे तडफडत होते. सईद बरोबर मी त्या खोलीत जायला निघालो, पण, काल रात्रीपासून त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला असं सांगून कुटुंबियांनी आम्हाला आत जाण्यापासून थांबवलं. ते दवाखान्यात जायला तयार नव्हते. पंच्याऐंशी वर्षांचे अल- हाजी निर्वासितांमधले एकमेव जिवंत गृहस्थ. ते अश्यां मोजक्या पैकी ज्यांनी पॅलेस्टाईन मधील आपलं घर पाहिलं आहे आणि ज्यांना ते आठवत आहे अशा काही मोजक्या लोकांपैकी ते एक आहेत. छावणी मधल्या अशा जुन्या लोकांची संख्या भराभर कमी होते आहे आणि पॅलेस्टीनांची चौथी पिढी आता या निर्वासित छावणीत जन्मलीय .
“आता कसं वाटतं अल-हाज?” सईदनी त्यांच्या कानाजवळ जाऊन विचारलं आणि औपचारिक चुंबन घेतलं.
“मित्रा, एक पाऊल पॅलेस्टीनच्या जवळ, एकेक पाऊल पुढे जातोय”, त्यांनी उत्तर दिलं.
“माझ्याबरोबर पाकिस्तानहून आलेला एक जण तुम्हाला भेटायला आला आहे”, त्यांची निराशा दूर करण्यासाठी सांगितलं आणि त्याचा परिणामही झाला.
त्यांनी आपलं डोकं हळूच उचललं, आणि त्यांनी आपली नजर माझ्या चेहऱ्यावरच्या रेषा वाचण्यासाठी माझ्यावर रोखली. जणू काही ते हात बघणारे आणि माझा चेहरा म्हणजे जणू काही माझा हातच! मी सुद्धा त्यांचा चेहरा वाचला. एखाद्या मध्ययुगीन ऐतिहासिक खंडहरा सारखा त्यांचा चेहरा कितीतरी गोष्टी सांगत होता. त्यांच्या चेहऱ्यावरली वर आलेली हाडे शतकातल्या चांगल्या वाईट गोष्टींची आठवण करून देत होते. डोळे छोट्या मुलासारखे चमकत होते आणि जणूकाही आयुष्याचा पुरावा त्यांनी अजूनही आपल्या डोळ्यात साठवून ठेवला होता.
“या या”, ते म्हणाले.
“पुढे ये. मला तुला नीट पाहू दे” मला जवळ येण्याची खूण करून ते म्हणाले.
“खूप इच्छा असूनही तुमच्या देशातल्या कोणालाही मी कधी भेटलो नाही. तुम्ही इकडं कसे काय आलात?” त्यांनी घोगऱ्या आवाजात मला विचारलं.
“पॅलेस्टिनी लोकांची दुःखं समजून घेऊन, ती एक दिवस सर्व जगाला सांगण्यासाठी तो इथं आलाय आला आहे” सईदनीच पटदिशी उत्तर दिलं. मी का आलोय जे सईदने त्यांना सांगितलं त्यातलं मला पामरालाही माहिती नव्हतं.
“ओह! पण मग तुम्हाला इथं नवीन काही सापडणार नाही. त्याच जुन्या घिस्यापिट्या रेकॉर्ड्स आणि कॅसेट्स पुनःपुन्हा मागंपुढं करण्यात काय अर्थ आहे? जगाला आधीच पुरेसं माहीत आहे. कोणी काही ऐकत नाही. आधी कधी ऐकलं नाही, आणि आता पुढेही कोणी ऐकणार नाही” असं म्हणत त्यांनी आपलं डोकं मागे टेकवलं.
“तुम्हाला काही नवीन समजून घ्यायचय?” त्यांनी मला हळू आवाजात विचारलं आणि मी शांतपणे होकार दिला.
त्यांचा चेहरा उजळला आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली.
“एक वृद्ध गृहस्थ होते. मृत्यूशय्येवर पडून जीवनाशी झगडत होते. त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या मुलाने त्यांना एकटं टाकलं होतं. मुलाची एकदा शेवटची भेट घ्यायची त्यांची इच्छा होती. तो त्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे ते त्याच्यावर नितांत प्रेम करत होते. मृत्यूशी झगडणाऱ्या वडलांबद्दल त्याला कळले तेंव्हा तो त्याच्याकडे आला. पश्चातापाने होरपळणारा मुलगा वडलांची लांची क्षमा मागण्यासाठी तो धावत पळत आला.
“प्रिय बाबा, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. तुमची काही इच्छा असेल तर मला सांगा, मी ती पूर्ण करीन.” आपल्या मरणाच्या दारात असलेल्या वडिलांना त्याने विनंती केली. वृद्ध वडलांप्रमाणे तो मुलगाही गरीबच होता. म्हणूनच जेंव्हा , “होय बाळा , माझ्यासाठी करण्यासारखं तुझ्याकडे खूप आहे. ते तू केलंस तर मला आवडेल. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्यासाठी एक घर बांध.” असं वडील म्हणाले तेंव्हा मुलगा एकदम गोंधळून गेला.
“बाबा हे कसं शक्यय! तुम्हाला माहितीय मी..”
“शक्यय तुला हे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक मित्र करशील तर तुला तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात एक घर मिळेल.”
पुढे कितीतरी वेळ अल हाजींचे शब्द माझ्या कानात होते. मला अजूनही समजलेलं नाही की त्यांनी ही गोष्ट मलाच का सांगितली. अल हाजींशी वाईट वागलेल्या जगाला विदाई देणारा संदेश म्हणून मी या गोष्टीकडे पाहतो. त्यांना सांगायचं होतं की अंतर, मग ते शारीरिक किंवा आणि कुठलं असेल, शत्रू निर्माण करत असतं. म्हणूनच तुमच्या शत्रूंशी मैत्री करा, तुम्हाला दूर करणारं अंतर कमी करा, अनोळखी असणाऱ्या माणसांमुळे वाटणारी कोणतीही भीती मुळापासून समूळ नष्ट करा!