कधीपासून तो ह्या वृद्धाश्रमात राहत होता, किंबहुना आला दिवस ढकलत होता? जेव्हापासून त्याला म्हातारपणाने ग्रासले! निस्तेज भिंती असलेल्या पडवीत, कोमेजलेल्या फुलांच्या बागेत, म्हातारपणाची काठी किंवा तत्सम वस्तूंचा आधार घेत तिथल्या लोकांची निरुत्साही आणि उदासीन वर्दळ सुरू असायची. तीच ती अशक्त आणि पिकलेले केस असलेली लोकं.. त्यांचं संभाषण ठरलेल्या मुद्यांवर – हवा पाणी, रोजचं जेवण, आणि कधीही भेटायला न येणाऱ्या किंवा जुन्या चालीरीतीं प्रमाणे आयुष्य न जगणाऱ्या मुलांबद्दलच्या तक्रारी. त्या वृद्धाश्रमात मन रमवायला एखादा पाळीव प्राणी सुद्धा नव्हता. कावळ्यांना साधा पावाचा तुकडा खायला द्यायचीही परवानगी नव्हती. तो एकमेव पक्षी होता जो अजूनही जवळ येण्याचं धाडस करायचा. वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी बाहेरच्या जगात घडणाऱ्या वेडेपणाच्या आणि वाढत चाललेल्या नैराशयेच्या बातम्या रोज देत असत. हंसेल ला दिवसेंदिवस जास्तच उदास आणि हताश वाटत होतं.
तरीही आज सकाळी एका पक्ष्याच्या चिवचिवाटाने त्याला जाग आली. त्याने अलगद पडद्याची एक बाजू सरकवली आणि त्या सुंदर पिसांच्या लहानग्या पक्ष्याला विचलित न करता हळूच खिडकी उघडली. त्या दयाळ पक्षाने हंसेल कडे एकटक बघितले, मग शांतपणे पर्वतांच्या दिशेने मान वळवली आणि पुनः त्या म्हाताऱ्या माणसाकडे (हंसेलकडे) बघत त्याच्या गोड आवाजात उदासवाणं गीत गायला सुरवात केली.. पानगळतीचं गीत. हंसेलने त्या पक्षाला विचारलं, “तू कुठे होतास रे उन्हाळ्यात? खरंच नशीबवान आहेस, मुक्तपणे विहार करू शकतोस.” बऱ्याच काळापासून तो इतकं कोणाशीच बोलला नव्हता. त्याने खिशात हात घातला आणि जेवणानंतर खिशात लपवलेले पोळीचे तुकडे शोधू लागला जे त्याला कधीच पक्षांना खाऊ घालता आले नाहीत. असं वाटायचं जणू काही तिथला पहारेकरी कोणत्याही उडणाऱ्या जीवावर गोळी झाडण्याच्या तयारीतच असायचा. पक्षांना ठार केल्यानंतर तो त्यांना नदीतल्या सदा न कदा घाईत असलेल्या आणि फार कमी संवाद साधणाऱ्या माशांकडे आणि बदकांकडे फेकून द्यायचा. सलग दोन दिवस पाऊस असल्याने पक्षांपासून सुटकेचा हा मार्ग त्याला अवलंबता आला नव्हता. हंसेलने पहारेकऱ्याकडे लक्ष ठेवत पोळीचा कुस्करा खिडकीच्या ओट्यावर ठेवला. पुन्हा एकदा तो आणि दयाळ पक्षी एकमेकांकडे पाहून छान हसले आणि बोलले. (तो इवलासा पक्षी सुद्धा त्याच्या भाषेत हंसेलशी बोलत होताच की!) मग त्या दयाळ पक्षाने पोळीचा कुस्करा चोचीत घेतला आणि उडून गेला. त्याने तिथे सकाळी तीन वेळा येणं जाणं केलं. शेवटच्या खेपेत त्याने एक संगीताची मैफलच सादर केली, पण ओक वृक्षाच्या मागे पहारेकर्याची चाहूल लागताच त्यात व्यत्यय आला. “जा जा, पळ पटकन”, हंसेल त्याला हातवारे करत म्हणाला. दयाळ झाडाच्या पालवित नाहीसा झाला. हातात बंदूक असलेल्या त्या पहारेकऱ्याने हंसेल ला दारडावले. दिवसातला काही काळ हंसेल त्याच्या छोट्याश्या, लाल-करडी पिसं असलेल्या मित्राची वाट बघत बसला. बऱ्याच वेळ तो त्याला खिडकीसमोर उडतांना आढळला. तो चिवचिवाट करायचा, त्याची मान हंसेलकडे वळवायचा आणि दूरवरच्या डोंगरांच्या दिशेने उडून जायचा. जणू काही तो हंसेलला वोसजच्या निळ्या पर्वतरांगेकडे यायला सांगत होता! हंसेल ती पर्वतरांग बघत बसायचा. त्यावर नेहमी हिवाळ्यात पांढरी छटा, सूर्यास्ताच्या वेळी लाल आणि जुन्या आठवणींची छटा असायची. उंचीवर असलेल्या जंगलांमध्ये वाहणारा वारा, तिथल्या खुणावत असलेल्या वाटा, अदृश्य पक्ष्यांचा चिवचिवाट, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर पळणाऱ्या खारुताई, सगळे त्याच्या ओळखितले प्राणी: असं वाटत होतं जणू काही निसर्ग त्याला बोलवत आहे. त्याने खोलीचं दार ढकललं, ओसाड पडवी आणि हॉल ओलांडला आणि त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेल्या वृद्धाश्रमाचं भलमोठं दार उघडलं. बाहेर नदीकिनारी छान झुळझुळ वारा वाहत होता. हिरव्या पाण्यात रंगीत मासे उड्या मारत होते. पिवळ्या आणि लाल चिनार वृक्षांच्या दाटीत असलेल्या प्रत्येक पक्ष्याचा आवाज त्याला ओळखू येत होता. एका झुडपाखाली, दयाळ पक्षी – त्याचा मित्र, त्याची वाट बघत होता आणि तो दिसताच त्याच्या भोवती उडू लागला. नदीच्या दुसऱ्या बाजूने एक कुत्रा त्याच्या दिशेने आला. संधिप्रकाशामुळे त्याचं कातडं निळ्या रंगाचं वाटत होतं. हंसेलला ते दृश्य पॉल गोगऑनच्या एक चित्रा प्रमाणे वाटत होतं, ज्याची प्रतिकृति वृद्धाश्रमाच्या त्याच्या खोलीत भिंतीवर टांगली होती. पण नाही, हे दृश्य योरीच्या चित्रांसारखं वाटतंय आणि हा दूरवर पसरलेला समुद्र कुठे तहितीतला आहे! – हंसेलचा स्वतःशीच संवाद सुरू होता. त्याला आता देवदार वृक्षांच्या जंगलातला वारा जाणवू लागला. सुई सारखी त्यांची पानं हंसेलच्या पायांखाली चुरडल्या जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रातकिडे उड्या मारत होते. कोकीळेने त्याचं स्वागत केलं. “ह्या बाजूने ये!” जणू काही खारुताई त्याला बोलवत होती. हंसेल ला प्रत्येक प्राण्याची भाषा कळत होती. त्याला घोड्याची दुडकी चाल ऐकू आली. घोड्यावर बसून पोलिस कुठे निघाले असतील का? अरे हा तर शीतोन (त्याच्या ओळखीतलं घोड्याचं पिल्लू)! – हंसेल स्वतःला म्हणाला. त्या लाल करड्या पिलाने त्याच्या जवळ येऊन आपलं डोकं हंसेलच्या थकलेल्या खांद्यांवर टेकवलं आणि जणू काही त्याला खिंकाळत म्हणाला “किती दिवस झाले रे आपण फिरायला गेलोच नाही ते”. शीतोन थोड्या अंतरावर पुढे गेला आणि तात्पुरती शिडी म्हणून एकावर एक रचलेल्या झाडांच्या खोडांजवळ येऊन थांबला. हंसेलला उद्देशून तो म्हणाला “बस माझ्या पाठीवर.. चल घरी जाऊयात.”
नव्याने आनंद मिळालेल्या त्या दोघांना अजून बरंच अंतर पार करायचं होता. फुलांनी बहरलेल्या शेतात, एका बंद घराजवळ ते पोहचले तेव्हा सूर्य अस्ताला आला होता. सुंदर पांढरे केस असलेला प्रेमळ नाईया आनंदाने भुंकतच कोठारातून धावत आला. त्याच्या मागोमाग त्याची दोन पिल्लं सुद्धा आली. एक करडी मांजर हंसेलच्या पायांवर तिचं अंग घासत जणू म्हणाली, “ये बस ह्या बाकावर, विश्रांती घे. मी लक्ष ठेवते सगळीकडे. छान सूर्यास्त बघ, त्याचा आनंद घे. मी तुझ्या पायांना ऊब देते”.
पुढचे बरेच आठवडे वातावरणात आनंदी उबदार रंगाचे सफरचंद, शिंगाडे, अळंबी, ताज्या भाज्या, अशा पानगळीने आणलेल्या भेटवस्तूंची मुक्त उधळण होत राहिली. प्राणी, झाड ह्यांची काळजी घेतल्यानंतर, त्यांना काय हवं नको बघितल्यावर हंसेल दररोज पायी किंवा घोड्यावर बसून पर्वतांमधून वाट काढत जायचा. परत येतांना तो संध्याकाळच्या शेकोटीसाठी लाकडं तोडून आणायचा. त्याच्या मांडीवर आनंदाने बसून मांजर चित्कारायची, कुत्री त्याच्या पायाशी पहुडलेली असायची आणि सतत त्याच्याकडे शांतपणे बघत बसायची. त्याची वाचायची राहून गेलेली बरीच पुस्तकं तो वाचत बसायचा. ही पुस्तकं त्याला काळाच्या फार पुढे घेऊन जायची. कधी वेगवेगळ्या जगांची सफर घडवायची तर कधी जुन्या आठवणींना उजाळा द्यायची.
एके दिवशी तिथले सगळे प्राणी जरा विचलित झाले. कोणी गुरगुरू लागलं, कोणी खिंकाळू लागलं, तर कोणी केकाटू लागलं. मांजर भीतीने दचकून खुर्चीखाली दडली. कुत्रे आणि पक्षी जंगलातल्या पायवाटेच्या शेवटा पर्यंत गेले. त्यांचा कर्णकर्कश कलकलाट आणि टोकदार दात बघून तिथे नुकत्याच आलेल्या दोन माणसांची बोबडीच वळली. ती माणसं म्हणजे वृद्धाश्रमाचा पहारेकरी आणि पोलिस! त्या दोघांनी आधी प्रेमाने प्राण्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, नंतर ते त्यांच्यावर ओरडू लागले. त्यांनी थोडं पुढे जायचा प्रयत्न करताच सगळे प्राणी एका ढांगेत त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. कुत्रे त्यांना चाऊ लागले, दडलेल्या मांजरी लगेच नखांनी वार करण्यासाठी पुढे सरसावल्या, हंस, कोंबड्या चोची मारू लागले, घोड्याने लाथा झाडल्या. जंगलातले इतरही प्राणी मागे राहिले नाही. किडे आणि मधमाश्या सतत त्यांना डंखं मारत राहिले. खारुताईंनी त्यांना देवदार वृक्षाची फळे फेकून मारत नकोसं केलं, ससे सुद्धा त्यांना सामील झाले : त्यांनी त्या दोघांच्या पायाखाली निसरडी विष्ठा टाकली. नको असलेल्या त्या दोघांनी तिथून धूम ठोकली! “आता काही हे परत इथे यायचे नाहीत” – पक्षी आनंदाने गाऊ लागले, घोडा खळखळून हसत सुटला. हंसेल आणि त्याच्या प्राण्यांच्या स्वर्गासारख्या जगात आनंद आणि शांतता परतली. असं म्हणतात की पुराणकथांमधल्या गूढ प्राण्यांनी झाडांना तिथे पोहचण्याचा मार्ग कायमचा बंद करायला सांगितलं जेणेकरून तिथे कोणीही अप्रिय आणि नको असलेली व्यक्ति येऊ नये! ही जागा आता केवळ त्याची आणि त्याच्या छोट्या मित्रांची होती, कायमची.
About Global Villager Challenge
Flatworld language solutions is based in Pune and working in language services since 2013. Company works in and provides major language services like translation, interpretation, coaching, and corporate training. Team FLS is a group of focused, inspired, and driven professionals who are headed to give foreign language learning a whole new perspective.
In addition to this FLS Comes up with different language related initiatives. The vision and thought is to Open various avenues of careers for the future as well as present India and to initiate and improve the ‘World Readiness’ of the youth of the nation.
Global villager Challenge is a very important initiative amongst various initiatives. This is a literature translation competition where the enthusiasts and students have to translate literary texts to Marathi from foreign languages. The students, enthusiasts and professionals knowing would love to be a part of this competition. This competition gives the language professionals a break from their routine translation work and students or enthusiasts get to know another aspect of their language.
This is the fifth year of this competition. The response and the participant number is growing every year. English, French, Russian, German and Japanese are the language categories for this year. Every year we come up with specific theme for the contest. This year’s theme was literature written by female authors around the world.
As the competition is online, anyone from all over the world with knowledge of Marathi language can participate in the competition.
The competition started on the 8th August. Our Judges are usually senior fellows working in respective language areas for more than 15 years. This year Sunil Ganu sir was the Judge for English language category. Dhanesh Joshi was the judge for German Language Category. Anagha Bhat mam was the Judge for Russian Language Category; Nandita Wagale was the judge for French Language Category and lastly Swati Bhagwat mam was the judge for Japanese Language Category. Judges have all the discretion, right from selecting the texts to selecting right criteria for examination.
Following are the winners of the contest:
1. Satish Kawathekar: German
2. Manisha Sathe: Japanese
3. Supriya Shelar: English
4. Bhagyashree Kulkarni: Russian
5. Mugdha Kale: French
Following are the runners up of the contest:
1. Anvaya Sardesai: German
2. Snehal Deshpande: Japanese
3. Priyanka Shejale: English
4. Pranali Shinde: Russian
5. Dnyaneshwari Khade: French
Photo by Harry Cooke from Pexels