१.
काय करावं मी ह्या तर्कविसंगतीचं —
अरे हृदया, अरे त्रासलेल्या हृदया — हे सोंगासारखं,
जीर्ण वय जे माझ्याशी बांधलं गेलंय
जसं कुत्र्याच्या शेपटीला बांधावं ?
माझ्याकडे कधीच नव्हती ह्याहून अधिक
उत्तेजित, उत्कट, विलक्षण
कल्पनाशक्ती, किंवा कान आणि डोळा
जे असंभवाची ह्याहून अधिक अपेक्षा करू शकतील —
नाही, बालपणीदेखील नाही, जेव्हा घेऊन गळ आणि चारा,
किंवा साधंसं गांडूळ, मी चढायचो बेन बुल्बनच्या पाठीवर
आणि असायचा माझ्याकडे खर्चण्यासाठी उन्हाळ्याचा संपूर्ण दिवस.
असं दिसतंय की मला सांगावंच लागेल स्फूर्तिदेवतेला सामान बांधायला,
मित्र म्हणून प्लेटो आणि प्लॉटिनसला निवडायला
जोपर्यंत कल्पनाशक्ती, कान आणि डोळा,
समाधान मानू शकतील युक्तिवादावर आणि व्यवहार करू शकतील
अमूर्त गोष्टींचा; अन्यथा खिल्ली उडवली जाईल
पाठ न सोडणाऱ्या पोचे पडलेल्या कसल्याशा किटलीकडून.
२.
मी तटबंदीवर शतपावली करताना टक लावून बघतो
एखाद्या घराच्या पायाकडे, किंवा जेथे
झाड, काजळलेल्या बोटाप्रमाणे, जमिनीतून निघतं;
आणि कल्पनाशक्तीला पाठवतो
दिवसाच्या उतरतीस लागलेल्या प्रकाशाखाली, आणि बोलावतो
प्रतिमा आणि आठवणींना
भग्न अवशेषांमधून किंवा प्राचीन वृक्षांमधून,
कारण मला विचारायचा आहे त्या सर्वांना एक प्रश्न.
त्या कड्यापलीकडे राहत असे सौ. फ्रेंच, आणि एकदा
जेव्हा मेजावरच्या किंवा भिंतीवरच्या प्रत्येक चंदेरी मेणबत्तीने
उजळून काढलं गडद महोगनी लाकूड आणि मद्य,
एक सेवक, जो मनोमन जाणू शकत होता
त्या महामहनीय मानिनीची प्रत्येक इच्छा,
धावत गेला आणि माळ्याच्या कात्रीने
एका उन्मत्त शेतकऱ्याचे कान छाटून टाकले
आणि त्यांना एका छोट्या आच्छादित थाळीतून पेश केलं.
मी लहान होतो तेव्हा काही मोजक्या लोकांना अजून आठवायची
एक शेतकरी मुलगी कोण्या एका गीतातून वाखाणलेली,
जी राहायची त्या खडकाळ जागेमध्ये कोठेतरी,
आणि ते तिच्या चेहऱ्याच्या कांतीची करायचे प्रशंसा,
आणि तिची प्रशंसा करण्यात त्यांना व्हायचा अधिक आनंद,
ते आठवायचे की जर ती जत्रेला गेली
तर तिथे शेतकऱ्यांची झुंबड उडायची
इतक्या कमालीच्या कीर्तीचा वर्षाव केला होता त्या गीताने.
आणि काही विशिष्ट पुरुष, त्या गाण्याने वेडावले जाऊन,
किंवा तिच्या नावाने डझनावारी जाम रिचवून,
मेजावरून उठले आणि त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या मोहिनीची
स्वतःच्या डोळ्यांनी खातरजमा करणं योग्य राहील;
पण चुकीने ते चंद्राच्या तेजस्वीपणाला समजले
दिवसाचा निरस उजेड —
संगीताने त्यांच्या अकलेची केलेली होती दिशाभूल —
आणि एकजण बुडून मेला क्लूनच्या मोठ्या दलदलीत.
अजब आहे, पण ज्या माणसाने ते गीत रचलं तो होता आंधळा;
मात्र, आता त्यावर विचार केल्यानंतर, मला दिसत नाही
त्यात काहीच अजब; शोकांतिकेची सुरुवात झाली
होमरपासून जो होता एक आंधळा माणूस,
आणि हेलनने केलेला आहे साऱ्या जिवंत हृदयांचा विश्वासघात.
अरे, दिसू दे चंद्र आणि सूर्यप्रकाश
एक अविभाज्य प्रकाशझोत,
कारण मी जर सफल झालो तर मला माणसांना वेड लावायलाच हवं.
मी स्वतः निर्माण केला हेन्रहॅन
आणि भल्या पहाटे त्याला जायला लावलं मद्यधुंद किंवा शुद्धीवर
शेजारच्या ग्रामीण घरांतून कोठूनतरी.
एका म्हाताऱ्याच्या डोंबारखेळांमध्ये अडकून
तो अडखळला, कडमडला, धडपडला मागेपुढे
आणि भाड्याने द्यायला त्याच्याकडे होते फक्त मोडके गुडघे
आणि अभिलाषांचं भयानक वैभव;
मी ते सारं काही रचलं होतं वीस वर्षांपूर्वी :
चांगली माणसं पिसत होती पत्ते एका जुनाट बंदिस्त आवारात;
आणि जेव्हा त्या प्राचीन मवाल्याची पाळी आली
त्याने पत्त्यांना असं काही मंत्रमुग्ध केलं आपल्या अंगठ्याखाली
की फक्त एक पत्ता सोडून बाकी सारे बनले
शिकारी कुत्र्यांचं टोळकं, न की पत्त्यांचा जोड,
आणि त्या उरलेल्या पत्त्यापासून बनवला त्याने एक ससा.
हेन्रहॅन तेथून झपाटल्यासारखा उठला
आणि त्या भयाण भुंकणाऱ्या पशूंमागे धावला ज्या दिशेला —
अरे ! मी विसरून गेलो कोणत्या दिशेला — पुरे झालं !
मला आठवायलाच हवा असा एक माणूस, ज्याला प्रेम
किंवा संगीत किंवा शत्रूचा छाटलेला कान
उल्हसित करू शकत नव्हते इतका तो आलेला होता घायकुतीला;
एक व्यक्ती जी बनून गेलीय इतकी अद्भुत
की एकदेखील शेजारी उरला नाहीय हे सांगायला
की त्याने कधी गुंडाळला होता त्याचा गाशा :
ह्या घराचा एक प्राचीन दिवाळखोर मालक.
ती अधोगती होण्याआधी, शतकानुशतकं,
हत्यारबंद रांगडी माणसं, गुडघ्यांपर्यंत गुंडाळून मोजेबंद
किंवा घालून लोखंडी बूट, चढायची निरुंद पायऱ्या,
आणि काही हत्यारबंद माणसं अशी होती
की ‘महान स्मृती’मध्ये साठवलेल्या त्यांच्या आकृत्या,
कर्कश किंचाळ्या फोडीत आणि धपापणाऱ्या उराशी येतात
झोपणाऱ्याच्या विश्रांतीवर आदळण्यासाठी
ज्यादरम्यान त्यांचे मोठाले लाकडी फासे ठोठावत असतात पटावर.
मी विचारणार आहे प्रश्न सर्वांना, त्यामुळे येऊ शकणाऱ्या सर्वांनी या;
म्हाताऱ्या, गरजू, अर्धकुलीन माणसा, ये;
आणि घेऊन ये सौंदर्याचा आंधळा भटका उत्सवकर्ता;
देवानेदेखील त्यागलेल्या गायरानांमधून
डोंबाऱ्याने पाठवलेला तांबडा माणूस; सौ. फ्रेंच,
ज्यांना मिळाली होती भेट इतक्या उत्तम कानाची;
तो माणूस जो दलदलीच्या चिखलात बुडून मेला होता,
जेव्हा थट्टेखोर स्फूर्तिदेवतांनी निवडली होती गावरान पोरगी.
सारे म्हातारे पुरुष आणि स्त्रिया, श्रीमंत आणि गरीब,
जे ह्या खडकांवरून चालायचे किंवा ह्या दारावरून जायचे,
ते चारचौघांत किंवा खाजगीत आरडाओरडा करायचे का
जसा मी आता करतो म्हातारपणाविरुद्ध ?
पण मला उत्तर सापडले आहे त्या डोळ्यांमध्ये
जे अधीर झालेले आहेत निघून जाण्यासाठी;
जा तर मग; पण हेन्रहॅनला राहू द्या मागे,
कारण मला गरज आहे त्याच्या साऱ्या जबरदस्त आठवणींची.
प्रत्येक झुळुकीवर प्रेम असणाऱ्या म्हाताऱ्या लंपटा,
त्या गहन विचारशील मनातून बाहेर येऊ दे
तुला जे काही गवसलं आहे थडग्यात,
कारण तू नक्कीच हिशोबली असणार
प्रत्येक अकल्पित, अलक्षितपणे घेतलेली
बुडी, जिला आकर्षिली होती मवाळ नजरेने,
किंवा एखाद्या स्पर्शाने किंवा उसाशाने,
दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वाच्या चक्रव्यूहात;
कल्पनाशक्ती रमत असते सर्वांत अधिक
मिळवलेल्या स्त्रीवर की गमावलेल्या स्त्रीवर ?
जर असेल गमावलेल्या स्त्रीवर, तर कबूल कर की तू पाठ फिरवलीस
एका जबरदस्त चक्रव्यूहावर अहंकारामुळे,
भ्याडपणामुळे, कसल्याशा मूर्खपणाच्या अतिसूक्ष्म विचारामुळे
किंवा अशा कशामुळे ज्याला कोणे काळी म्हटलं जायचं विवेक;
आणि कबूल कर की जर आठवण येत राहिली, तर सूर्याला
लागतं ग्रहण आणि दिवस पडतो काळाठिक्कर.
३.
वेळ आली आहे माझं मृत्युपत्र लिहिण्याची;
मी प्रामाणिक माणसांची निवड करतो
जी ओढे चढून जातात
जोपर्यंत उगम सामोरा येत नाही,
आणि पहाटे टाकतात त्यांचे गळ
ठिबकणाऱ्या दगडाच्या शेजारी; मी जाहीर करतो
त्यांच्या वाट्याला येईल माझा अभिमान,
अशा लोकांचा अभिमान जे बांधलेले होते
ना कोणा ध्येयाशी ना राष्ट्राशी,
ना ज्यांच्यावर थुंकलं जात होतं त्या गुलामांशी,
ना त्यांच्यावर थुंकणाऱ्या जुलमी राजाशी,
बर्क आणि ग्रॅटनचे लोक
ज्यांनी दिला, जरी ते मोकळे होते नकार देण्यास —
अभिमान, जणू काही प्रातःकाळचा,
जेव्हा वेगाने झेपावणारा प्रकाश मोकळा असतो,
किंवा जणू काही अद्भुत रणशिंगाचा,
किंवा जणू काही वळवाच्या पावसाचा
जेव्हा सर्व ओढे कोरडे असतात,
किंवा जणू काही त्या घटकेचा
जेव्हा हंसाला आपली नजर स्थिर करावीच लागते
विरत जाणाऱ्या प्रकाशकिरणावर,
आणि तरंगून कापावा लागतो लांबसर
चमचमत्या प्रवाहाचा शेवटचा पल्ला
आणि तेथे गावं लागतं त्याचं अखेरचं गीत.
आणि मी जाहीर करतो माझी श्रद्धा :
मी थट्टा उडवतो प्लॉटिनसच्या विचारांची
आणि ठोकतो शड्डू प्लेटोच्या पुढ्यात,
मृत्यू आणि जीवन नव्हतेच मुळी
माणसाने रचेपर्यंत संपूर्ण,
बनवेपर्यंत आमूलाग्र सारे काही
त्याच्या कडवट आत्म्यापासून,
होय, सूर्य आणि चंद्र आणि तारे, सर्व,
आणि त्यापुढे जाऊन असं देखील आहे
की मृत होऊन आपण उठतो,
स्वप्नं पाहतो आणि म्हणून निर्माण करतो
‘चंद्रापलीकडचं नंदनवन’.
मी सलोखा केलेला आहे
विद्वत्तापूर्ण इटालियन गोष्टींशी
आणि गर्विष्ठ ग्रीक दगडांशी,
कवीच्या कल्पनांशी
आणि प्रेमाच्या आठवणींशी,
स्त्रियांच्या शब्दांच्या आठवणींशी,
त्या सर्व गोष्टींशी ज्यांतून
माणूस रचतो एक अतिमानवी
लख्ख आरशासारखं स्वप्न.
ज्यादरम्यान तटावरच्या खिंडुकलीमध्ये
कावळे बडबडतात आणि किंचाळतात,
आणि डहाळ्यांचे लावतात थरांवर थर.
जेव्हा त्यांचा ढिगारा रचून होईल,
माता पक्षी घेईल विसावा
त्यांच्या माथ्यावरील पोकळीत,
आणि मग उबवील तिचं जंगली घरटं.
श्रद्धा आणि अभिमान दोन्ही मी ठेवतोय
डोंगराचा उतार चढून जाणाऱ्या
तरुण प्रामाणिक माणसांसाठी,
जेणेकरून फुटत्या पहाटवेळी
ते टाकू शकतील त्यांचा गळ;
मीही घडलो होतो त्याच मातीतून
तिला तडे जाईपर्यंत
ह्या बैठ्या उद्योगामुळे.
आता मी घडवणार आहे माझा आत्मा,
त्याला शिकायला भाग पाडून
एका विद्वत्तापूर्ण शाळेत
जोपर्यंत शरीराचा चक्काचूर,
रक्ताचा मंद ऱ्हास,
चिडचिडा चित्तभ्रम
किंवा नीरस जराजर्जरता
किंवा ओढवेल त्याहून भयंकर जे काही दुर्दैव —
मित्रांचे मृत्यू, किंवा मृत्यू
प्रत्येक चमकदार डोळ्याचा
ज्याने चुकवला काळजाचा ठोका —
सारे काही भासतात निव्वळ आकाशातील ढग
क्षितिज विरू लागण्यावेळचे;
किंवा एखाद्या पक्ष्याची झोपाळू हाक
दाट होत चाललेल्या सावल्यांमधील.
अनुवादाबद्दल :
मनोरा ही कविता आयरिश कवी विल्यम बटलर येट्स ह्यांच्या दि टॉवर ह्या मूळ इंग्रजी कवितेचा मराठी अनुवाद आहे. ह्या कवितेत साठीच्या उंबरठ्यावर उभा असलेला कवी आपल्या स्वतःच्या राहत्या घराच्या (कवितेत वर्णिलेला मनोरा), त्याच्या आसमंताच्या, आपल्या कलाकृतींच्या भूतकाळांकडे परतत माणसाच्या सृजनप्रक्रियेविषयी, त्याच्या वार्धक्याप्रतीच्या अप्रीतीविषयी आणि भावी पिढ्यांकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या वारशाविषयी अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळविल्यानंतर पाच वर्षांनी प्रकाशित केलेली ही कविता येट्सच्या कलात्मक पराकाष्ठेची साक्ष देते. सर्वोत्कृष्टतेच्या शिक्क्यानिशी जेव्हा हा कवी आपल्या भूतकाळात परततो; तेव्हा तो तिथे नॉस्टॅल्जियात रमत नाही तर नवनिर्मितीच्या पाऊलखुणा शोधतो, भूतकाळात माणसाचं परतणं कसं असावं ह्याचा अंतर्मुख करणारा आदर्श घालून देतो.
विल्यम बटलर येट्स (१३ जून १८६५ – २८ जानेवारी १९३९) हे आयर्लंडमध्ये जन्मलेले नोबेल पारितोषिक विजेते कवी, लेखक व नाटककार होते. आयरिश साहित्यिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीमध्ये त्यांचे फार मोठे योगदान होते. विसाव्या शतकातील श्रेष्ठ इंग्रजी साहित्यिकांच्या यादीत त्यांचे स्थान फार वरचे आहे. सेलिंग टु बायझंटियम व सेकंड कमिंग यासारख्या त्यांच्या कवितांनी साहित्यिकांच्या अनेक पिढयांना प्रभावित केले. वयाच्या सतराव्या वर्षापासून कविता करू लागलेल्या येट्स ह्यांच्यावर आयरिश इतिहास व आख्यायिकांचा इतका गाढा प्रभाव होता की त्यांनी १५ व्या शतकाततील ‘टूर बेलीली’ हा ऐतिहासिक मनोरा खरेदी करून १९२१ पासून १९२९ सालापर्यंत त्यामध्ये आपल्या कुटुंबासह तिथे वास्तव्य केले. दि वॉन्डरिंग्झ ऑफ ओशीन (१८८९, काव्यसंग्रह), दि केल्टिक ट्वायलाइट (१८९३, कथासंग्रह), दि लँड ऑफ हार्ट्स डिझायर (१८९४, नाटक), इन दि सेव्हन वूड्झ (१९०३, काव्यसंग्रह) व दि टॉवर (१९२८, काव्यसंग्रह) ही त्यांची काही महत्वाची पुस्तके. गुरु रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक प्राप्त होण्याआधी टागोर ह्यांच्या गीतांजली ह्या त्यांच्या काव्यसंग्रहाला १९२३ साली अत्यंत परिणामकारक प्रस्तावना लिहुन येट्सनी त्यांना इंग्लंड-युरोपमध्ये एक वैश्विक कवी म्हणून ओळख प्राप्त करून दिली. एकोणिसाव्या शतकातील साहित्याला, विशेषतः कवितेला, आधुनिकतेच्या दारात आणून सोडण्याचे श्रेय येट्सना दिले जाते.
चित्र-प्रतिमा सौजन्य : द लोनली टॉवर, सॅम्युएल पामर, १८७९, इचिंग.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
