अनिल मेहता यांची मुलाखत

मुलाखतकार: राजन गवस

नव्या लेखकांच्या शोधात



back

राजन गवस: मेहता पब्लिशिंग हाऊसचे सर्वेसर्वा म्हणण्यापेक्षा ज्यांच्यामुळे ही प्रकाशन संस्था उभी राहिली ते  अनिल मेहता आज आपल्या सोबत आहेत. संवादाच्या आरंभी अनिलजी आपले स्वागत आणि नमस्कार.  
तुम्ही निपाणी गावचे रहिवाशी. शालेय शिक्षण घेत असताना पुढे आपण प्रकाशक होऊ ,असं कधी वाटलं होत का?

अनिल मेहता: मला असं कधीच वाटलं नव्हतं. मला वाचनाची आवड होती. मात्र त्यावेळी लेखकांचं फारसं आकर्षण नव्हतं. तसंच, प्रकाशक होईन असंही कधी वाटलं नव्हतं. 

मग आपण एखादं पुस्तक छापावं असं कधी वाटलं?

मी कोल्हापूरला पुस्तकाचं दुकान सुरू केलं, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की, आपल्याला काही पुस्तकं प्रकाशित करता येतील. म्हणजे उदाहरणादाखल, मी सुरुवात केली गाईड्‌सपासून. त्यावेळी प्री-डिग्री होती कॉलेजला. तर प्रि-डिग्रीच्या इंग्लिश गाईडपासून सुरुवात केली. मात्र ही गोष्ट मला स्वत:ला आवडत नव्हती. माझा ओढा होता तो ललित वाङ्‌मयाकडे. माझं लहानपणापासून बऱ्यापैकी वाचन होतं. त्यामुळे ललित वाङ्‌मयाकडे माझा ओढा जरा जास्त होता. दुकानात बसून मी अनेक पुस्तकं वाचायचो. त्यावेळी मला वाटायचं की आपणही अशा प्रकारची पुस्तकं प्रकाशित केली पाहिजेत.

तुम्ही जेव्हा दुकान जेव्हा सुरू केलं तेव्हा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती? दुकान सुरू करण्याएवढी मिळकत वडिलांनी तुमच्याकडे दिलेली होती वगैरे असं..?

नाही. मी स्वत:च काम सुरू केले. अगदी तुटपुंज्या भांडवलावर मी दुकान सुरू केलेलं. त्यावेळी कोल्हापुरात या प्रकारची दुकानं नव्हती. मुख्य म्हणजे एज्युकेटेड बुक सेलर कोल्हापुरात फारसे कोणी नव्हते,  की ज्याला पुस्तकांची पूर्णपणे माहिती आहे असे. माझं शिक्षणच पुण्यात झाल्याकारणांनी मला बऱ्याचशा पुस्तकांची माहिती होती. इंग्लिशसह मराठी. त्यामुळे मला पुस्तक व्यवसाय वाढवता आला. शिवाय शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना मी पुस्तकं पुरवत होतो. 

मग याला घरातून पाठिंबा मिळाला का विरोध झाला?

घरातून पाठिंबा मिळाला. कारण माझे वडील हे चांगले वाचक  होते. आणि मला वाचायलाही त्यांनी शिकवलं. ग. त्र्यं. माडखोलकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांची पुस्तकं ते वाचायचे. त्यांची घरात एक छोटीशी पर्सनल लायब्ररीदेखील होती

त्यामुळे वडिलांचा अपोआपच  तुमच्या कामास पाठिंबा मिळाला. त्या काळात कोल्हापुरात शेटे प्रकाशन, महाराष्ट्र ग्रंथ भांडार होते, याबद्दल तुम्हाला माहिती होती का? की तुम्ही तुमचं स्वतंत्र काम सुरू केलं?

नाही. मी माझं स्वतंत्र सुरू केलं. मला त्यांच्याविषयी ऐकून माहिती होती. परंतु, या प्रकाशकांकडे व्यवसायिक दृष्टिकोण नव्हता, असं माझ्या लक्षात येत होतं.

म्हणजे त्यांचे हौशी प्रकाशक म्हणून काम चालू होतं?

होय. त्यांच्याकडून नवीन पुस्तकं बाजारात नीट ठेवली जात नसत. कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या बुकसेलर्सकडे पुस्तकं पोहोचवायलासुद्धा ते कमी पडत असतील. या प्रकाशकांकडून महाराष्ट्रभर मात्र पुस्तकं पोहोचत नव्हती. 

ते केवळ प्रकाशित करणार आणि सोडून देणार ?

कुठल्यातरी मुंबई पुण्याच्या बुकसेलर्सकडे नेऊन टाकायचं. पुढे त्याच्या नीट वितरण व्यवस्थेकडे लक्ष देत नसत. 

कोणतं ललित साहित्याचं पहिलं पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं?

माझ्याकडे बापूसाहेब गावडे नावाचे पैलवान त्याकाळी येत होते. त्यांचं शिरोलीला एक हॉटेल होतं. त्यांचं ‘दसऱ्याचं सोनं’ नावाचं पुस्तक आम्ही पहिल्यांदा प्रकाशित केलं. 

या पुस्तकाची पहिली प्रत जेव्हा पहिल्यांदा हातात आली तेव्हा काय वाटलं तुम्हाला?

खूपच आनंद झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मला या पुस्तकाने चार पैसे मिळवून दिले. पुस्तक काढलं आणि माझं नुकसान झालं असं काही झालं नाही. या पुस्तकाने चार पैसे मिळवून दिल्यामुळे मला आशा निर्माण झाली की या प्रकाशन व्यवसायामध्ये आपण काहीतरी करू शकतो.

पण यानंतर काही या लेखकाने लिहिलं का? जे तुमच्याकडून प्रकाशित झालं?

नाही. नंतर त्यांनी काही लिहिलेलंच नाही. तेवढी एकच कादंबरी त्यांनी लिहिली. 

तो लेखक आपण तशा अर्थी विसरल्यातच जमा आहे.

होय. नंतर काय त्यांनी लिहिलंच नाही.

पण ‘दसऱ्याचं सोनं’ची एखादी प्रत तुमच्याकडे उपलब्ध असेल ना?

आहे.

मग आता ह्या सगळ्यातून जेव्हा तुम्हाला असं लक्षात आलं की, आपण एखादं पुस्तक छापू शकतो आणि हे पुस्तक आपण चांगल्याप्रकारे विकूही शकतो. तर हा आत्मविश्वास आल्यानंतर या व्यवसायासंदर्भात तुम्ही काय चिंतन केलं? आपल्याला ललित साहित्य प्रकाशित करायचं आहे आणि मग याची पूर्वतयारी म्हणून काय केलं?

या प्रकारचं ललित साहित्य प्रकाशित करायचं म्हणजे कुठलं, तर मला कथा कादंबऱ्या प्रकाशित करायच्या होत्या. मला नाटकांमध्येही इंटरेस्ट होता. त्यावेळी नाटकं खूप बघितली जायची आणि त्याची पुस्तकंही विकत घेतली जायची. त्यामुळे मराठीमधल्या कथा, कादंबऱ्या, नाटकं या प्रकारचं वाङ्‌मय प्रकाशित करावं असं वाटत होतं. आणि माझी सुरुवात झाली त्या काळात. 

म्हणजे सुरुवात झाली पण मला आता कुतूहल असं आहे की लेखकांकडून पहिली प्रत तुमच्याकडे हस्तलिखित रूपात येत असणार. मग ही स्क्रिप्ट तुम्ही स्वत: वाचत होता की कोणाला वाचायला देत होता?

आरंभीच्या काळात मी वाचत नसे. मी स्क्रिप्ट आहे तसेच छपाईसाठी देत असे. चौधरी म्हणून माझे प्रिंटर होते. त्यांचं स्वत:चं मुद्रितशोधन अतिशय चांगलं होतं. त्यामुळे मला त्याची काळजी नसे. बऱ्याचदा पुस्तक छापून आल्यानंतर मी ते वाचत असे. कारण त्यावेळी पुस्तकं मिळणंच कठीण होतं. मोठे लेखक पुण्यामुंबईच्या प्रकाशकाकडून आपली पुस्तकं प्रकाशित करत असायचे. 

त्यांचा ओढा तिकडंच होता. पण त्यावेळी आपल्या खिळ्याच्या प्रेस होत्या सगळ्या. मग कोल्हापुरात अशा किती प्रेस होत्या जुन्या?

कोल्हापुरात बऱ्याच प्रेस होत्या. म्हणजे  सातआठ तरी प्रेस होत्या.

म्हणजे तुम्ही म्हणता ते चौधरी अंजीशवाले?

हो अंजीशवाले. 

सरनोबतांचीही एक प्रेस होती तिकडं.

बऱ्याच लोकांची होती. सरनोबतांची होती. शिंदेंची होती. रॉयल प्रेस होती. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्मेंटचा प्रेस होती. अशा बऱ्याच प्रेस होत्या. 

तेवढा व्यवसाय तरी असायचा का या मुद्रणालयांना?

काही वेळा असायचा. इतरांच्याबद्दल मला ठाऊक नाही. पण माझं ज्यांच्याकडे काम होतं त्यांच्याकडे भरपूर काम असे. 

म्हणजे अंजीशवाल्यांच्याकडे. त्यांच्याकडे भरपूर कामं होती. त्यावेळी खिळे जुळवण्याची प्रेस असल्याने एका पुस्तकाचा निर्मिती कालावधी साधारणपणे किती असायचा?

ते पुस्तकाच्या पृष्ठसंख्येवर अवलंबून असायचं. दोनशे पानांच्या पुस्तकाला कमीत कमी तीन महिने लागायचे. कारण आठ पानांचा फॉर्म खिळेवाल्याला खिळे जुळवून तयार करावा लागायचा. मग त्याची प्रुफं करायची. मग ती परत दुरुस्त करायची. मग ती पुन्हा प्रुफरिडिंग करायची. आणि मग पुन्हा ती प्रिंटिंगला घ्यायची. म्हणजे असा तो बराच गुंतागुंतीचा भाग होता.

 या सगळ्यामधून तुमच्या असं लक्षात आलं की आता आपण आपल्या प्रेसमार्फत पुस्तक करू शकतो. मग वितरणाचे गुंते तुम्ही कसे सोडवले?

वितरणाच्या बाबतीत मला पुण्याचा एक मित्र भेटला होता. तो स्वत: प्रकाशक होता. त्याने मला काही गाईडलाईन्स दिल्या. मी त्याप्रमाणे मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी जाऊन बुकसेलर्सकडे पुस्तके ठेवायचो. या प्रकाशन व्यवसायांची त्या काळात एक वाईट गोष्ट अशी होती की, बुकसेलर्स कधीही वेळेवर पैसे देत नव्हते. त्यामुळे प्रकाशक कायम अडचणीत असायचे. कागदवाल्यांचे बील, प्रिंटरचे बील, बायंडरचे बील या लोकांची बिलं वेळेवर द्यायला जमायचं नाही. 

तरीही अंजीशवाल्यांचा तुमच्यावर भरवसा होता.

भरवसा होता म्हणजे मी त्यांना आठवड्याच्या आठवड्याला पैसे द्यायचो. आठवड्याला किती पैसे द्यायचे हे ठरवले होते. त्याप्रमाणे मी त्यांना ते देत होता. कागदवाल्यांनाही तसेच आठवड्याच्या आठवड्याला पैसे देत असे. कारण माझी इकडे विक्रीही तशी होत होती. 

मग वितरणातील तुम्हाला हे जे गोते आले, वेळेवर न देणे, अमुक होणं, तमुक होणं, या सगळ्यात तुम्ही चिकाटीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा प्रकाशन व्यवसायाचा पसारा मांडला, तो नेमका कसा?

तो खऱ्या अर्थाने मी पुण्यात गेल्यानंतर सुरू केला. आनंद यादव माझे जुने मित्र. आम्ही दोघे पुण्याला एकत्र शिकायला होतो. प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यानंतर मी एकदा त्यांना भेटायला गेलो. एखादं पुस्तक मागायच्या निमित्ताने. तेव्हा त्यांनी मला अशी अट घातली की, तू कोल्हापूरपेक्षा पुण्याला सुरुवात कर. इथून तुला बऱ्याच ठिकाणी काम करता येईल. त्या दृष्टीने पुण्याला सांस्कृतिक केंद्र म्हणूनही फार महत्त्व आहे. त्याप्रमाणे मी ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ नावाने पुण्याला ऑफिस सुरू केलं. आनंद यादवांचा पहिलाच कथासंग्रह ‘माळावरची मैना’ आमच्याकडूनच प्रकाशित झाला. 

मग पुणे आणि कोल्हापूर या दोन ठिकाणात तुम्हाला काय फरक वाटला?

प्रोडक्शनमध्ये फरक वाटत होता. पुण्यामध्ये पुस्तकं झटपट व्हायची. पुण्यामध्ये आर्टिस्ट होते. पुण्यामध्ये प्रिंटिंग चांगलं होत होतं. कागदही त्यामानाने कोल्हापूरपेक्षा स्वस्त मिळायचा. आणि पुण्यातल्या पुण्यात बायडिंग होऊन प्रती आपल्याकडे यायच्या. कोल्हापुरात बायडिंगची सुद्धा नीट व्यवस्था नव्हती. पण तरीही लोक छपाईची कामे करत. पण तुलनेने पुण्यात जी व्यवस्था होती ती चांगली होती. शिवाय पुण्यामधून पाठवण्याची व्यवस्था चांगली होती. पुणे मध्यवर्ती असल्याने मुंबई असो, नागपूर असो, किंवा कुठेही पार्सल करणे कोल्हापूरपेक्षा सोपे आणि सोयीचे असायचे. तशी सोय कोल्हापूरला नव्हती.  

तुम्ही प्रकाशन व्यवहार सगळा पुण्यात सुरू केला, त्याचा विस्तारही पुण्यात वाढला. पण तुम्ही कोल्हापूर सोडलं नाही ? 

मी कोल्हापूर सोडलं नाही याचं कारण असं होतं की माझा मुलगा सुनील ज्यावेळी बी.कॉम. झाला, ग्रॅज्युएट झाला त्यावेळी मी त्याला विचारलं की, तुला हा बिझनेस बघायचा आहे का? तर तो म्हणाला, मी प्रयत्न करतो. त्यावेळी त्याची या व्यवसायात यायची इच्छा नव्हती. पण पुढे मला असं दिसून आलं की, दोन वर्षात तो या व्यवसायात चांगला रमला आहे. सध्या तो पुण्यातून प्रकाशनाचं सर्व काम बघतो. तर त्याने प्रकाशन क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती घडवून आणली. ती अशी होती की, मी ज्यावेळी प्रकाशक होतो, प्रकाशनाचे काम बघत होतो, त्यावेळी पुस्तकं उधार देत असे. पण माझा मुलगा सुनीलने ज्यावेळी प्रकाशन व्यवसाय बघायला सुरुवात केली, त्यावेळी त्यानं पहिलं काम केलं ते असं केलं की, सगळ्या बुकसेलर्सना पुस्तकं उधार मिळणार नाहीत असं त्याने कळवून टाकलं. त्यामुळे पुस्तक उधारी बंद झाली. अक्षरश: सहा महिने आमचा बिझनेस ठप्प झाला. इनकम शून्य. विक्री काही नाही. कारण या सगळ्याची पुस्तक विक्रेत्यांना सवयच नव्हती. मग नंतर ज्यावेळी लोकांना आमच्या पुस्तकांची गरज पडायला लागली त्यावेळी आपोआपच लोक रोख कॅश देऊन पुस्तकं घेऊन जायला लागली. त्यानंतर मग आता अशी सोय केलेली आहे, की तुम्हाला ठरावीक क्रेडिट दिलं जाईल. मग तेवढ्या वेळेत जर तुमचे पैसे आले नाहीत, तर तुम्हाला पुस्तकं मिळणार नाहीत.

त्याकडे आपण नंतर जाऊच. सुनील मेहता यांचं प्रकाशन पुढचं. मी तुम्हाला गेली पंचेचाळीस वर्षे तरी ओळखतो.  मला असं सतत जाणवतं की,  मी ज्या-ज्या वेळी कोल्हापूरला येईन तेव्हा-तेव्हा तुम्ही कोल्हापुरातच असता. जरी तुम्ही पुण्याला व्यवसाय सुरू केला असला तरी गाव म्हणून कोल्हापूरबद्दल तुम्हाला काय वाटते? 

मी दर शनिवारी-रविवारी पुण्याला जात असे. योगायोगाने तुम्हीही त्याच दिवशी कोल्हापूरला येत असल्याने दुकानात तुम्ही मला बघू शकत नव्हता. मला भेटू शकत नव्हता. आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मी बरीचशी कामे फोनवरून करत असे. 

हो, ते तर आहेच. पण मला दुसरं एक दिसलं. तुमचं या गावावर प्रेम आहे.

कोल्हापूरवर प्रेम आहे हे निश्चित. त्यामुळे मी पुण्यात जास्त रमू शकत नाही.

होय. तिथं पुण्यात तुमचं सगळं वैभव आहे. मात्र तरीही तुम्ही इथं कोल्हापुरात आहात. यामागचं कारण म्हणजे इथल्या मातीचं तुमच्याबरोबर काहीतरी नातं आहे, असं वाटतं. पुढचा प्रश्न, तुम्ही आनंद यादवांचं ‘माळावरची मैना’  हे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर तुमच्याकडे कोण मोठा लेखक आला?

हळूहळू आनंद यादवांच्यामुळे बरेचसे नवीन ग्रामीण लेखक माझ्याकडे आले. ज्यांची पुस्तकं प्रकाशित करायला पुण्यामध्ये कोणी तयार होत नसे. याचं कारण असं होतं की, त्या काळातील प्रकाशक ग्रामीण भागातील मुलांची पुस्तकं प्रकाशित करायला तयार नसायची. त्यामुळे ते माझ्याकडे यायचे. माझ्याकडे सुरू झालं. मग त्यात तुमचंही एक पुस्तक होतं, मला वाटतं. त्यानंतर नागनाथ कोत्तापल्ले, उत्तम कांबळे, असे बरेच मोठे लेखक. 

इंद्रजित भालेरावांचे सुद्धा पहिले पुस्तक तुम्हीच केलं होतं ? 

होय. इंद्रजित भालेरावांचं ‘पीकपाणी’ आम्हीच प्रकाशित केलं.

रणजित देसाईंची पुस्तके साधारणपणे तुमच्याकडे कधी आली? 

साधारणपणे १९७८ साली.

दादांना असं का वाटलं की तुमच्याकडे पुस्तकं दिली पाहिजेत.

दादांना का वाटलं याचं कारण मला सांगता येणं अवघड आहे. याचं कारण He was not happy with his old publisher म्हणजे त्यांचे जे जुने प्रकाशक होते त्यांच्याबरोबर ते आनंदी नव्हते. म्हणजे त्यांच्यातील रिलेशन हळूहळू बिघडत गेले. आणि मी दुकान काढत असताना एक दिवस त्यांना सांगितलं, मला तुमचे हे पुस्तक प्रकाशित करायला आवडेल. मला वाटलं नव्हतं त्यावेळी ते ‘हो’ म्हणतील. मग दुसऱ्याच दिवशी येऊन त्यांनी पुस्तक द्यायचं कबूल केलं.

एक लेखक म्हणून रणजित देसाई या व्यक्तीविषयी प्रकाशक म्हणून तुम्हाला काय सांगता येईल?

प्रकाशक म्हणून हा लेखक किती मोठा होता हे मी त्यांची ज्यावेळी पहिली कादंबरी प्रकाशित केली होती त्यावेळीच जाणलं होतं. त्यावेळी त्यांनी मला कोवाडला बोलवलं होतं. माझ्याबरोबर होते कमलाकर दीक्षित. आम्ही दोघं कोवाडला गेलो. दादांनी आम्हाला स्क्रिप्ट वाचायला दिलं. स्क्रिप्ट वाचलं कमलाकर दीक्षितांनी. मी आणि दादा इतर विषयांवर निवांतपणे गप्पा मारत बसलो. त्यांची एकंदर लायब्ररी बघितल्यावर मला असं वाटलं, या माणसाचं वाचन खूप मोठं आहे. फक्त मराठीच नाही, तर इंग्रजीचंही वाचन त्यांचं खूप मोठं आहे. आणि त्यामुळे त्या इंग्रजी कादंबऱ्यांचा प्रभाव किंवा असं काही तर त्यांच्या लेखनावर आहे, हे लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो त्यावेळी कमलाकर दीक्षित यांनी मला ‘समीधा’ कादंबरीतील एक चार चुका दाखवल्या. त्यांनी मला विचारलं की, आपण रणजीत देसाईंना विचारायचं का, या दुरुस्त्याबाबत. मी म्हटलं, काल रात्रीच्या गप्पांतून मला माणूस सरळ वाटला. आणि मला नाही असं वाटत त्यांच्यात असे, ‘स्वामी’कार म्हणून मोठं काही तरी आहे. वलय मोठं आहे पण माणूस म्हणून ते फार सरळ आहेत. आपण विचारूया. नाही पटलं त्यांना तर आपण सोडून देऊ. दादांनी तीन चुका दुरुस्त करून देतो म्हणून सांगितले. पण चौथी चूक मात्र ते कबूल करायला तयार नव्हते. याचं कारण असं होतं, ती कादंबरी दलित समाजावर बेतलेली होती. त्यात एक वाईट शिवी आहे. ती शिवी रणजित देसाईंच्या लेखनामध्ये योग्य वाटेल की नाही, ही दीक्षित सरांची शंका. आणि रणजीत देसाई म्हटले, मी ही घातलेली आहे. तू दुसरी मला सुचव. ती मी घालतो. पण दीक्षित सरांना उत्तर देता आलं नाही. 

त्यांचे आणि तुमचे संबंध दीर्घकाळ इतके चांगले राहिले. त्यांची सगळीच पुस्तके तुमच्याकडेच आली. पण दादांच्यामुळे आणि कोणी मोठे लेखक तुमच्या प्रकाशनाकडे आले का? 

दादांच्यामुळे माझ्याकडे व. पु. काळे आले. आमची कुठंतरी भेट झाली. तेव्हा दादांनी एक शब्द टाकला की याला एक पुस्तक देऊन बघ. व. पु. काळे म्हणाले, ‘एक सेकंड एडिशनचं (दुसऱ्या आवृत्तीचं) पुस्तक आहे, देतो.’ म्हटलं, ठीक आहे. मग ते प्रकाशित केलं. आणि नंतर वपुंचे माझे संबंध चांगले झाले.

बाबा पाटील तर तुमच्याकडे कामच करीत होते. त्यांची पुस्तकंही तुम्हीच प्रकाशित केली होती. आता या परिसरातील लेखकांकडे तुम्ही शोधक नजरेनं बघण्याचा कसा प्रयत्न केला?

बरेच लेखक माझ्याकडे येत होते. आता मी थोडं थोडं पुस्तकं वाचत होतो. मला तसा वेळ मिळत होता. पण एकंदर मी बघितलं, फार चांगलं काही हाताला मिळत नाही. फार कमी लेखक, तुमच्यासारखे फार कमी लेखक हाताशी मिळाले. या भागातील लेखकही मला फारसे सरस वाटले नाहीत. तसं बघितलं तर बाबा कदम, शरद वऱ्हाडकर, चंद्रकांत नलगे अशा बऱ्याच लेखकांची मी पुस्तकं छापली.  

तुमचा हा प्रकाशन व्यवहार अतिशय सुस्थितीत आला आणि एक प्रकाशक म्हणून महाराष्ट्रभर तुमचे नावही झाले. मधल्या काळात तुम्ही कादंबरी स्पर्धा घेतली. ही कल्पना कशी सुचली ? 

ही कल्पना अशी होती, की बाबा पाटील माझ्याकडे काम करत होते, बाबा पाटील हे मासिकाचे, दिवाळी अंकाचे काम बघायचे. त्यावेळी कधीतरी अशी स्पर्धा केली होती. म्हणून त्यांनी मला सुचवलं. मग म्हटलं करा तुम्ही. मग बाबा पाटलांच्या कल्पनेतून ती घडली.

या स्पर्धेतून ‘हाल्या हाल्या दूध दे’ सारखी कादंबरी प्रकाशित झाली. खांडेकरांची पुस्तकं तुम्ही कधी प्रकाशित करायला सुरुवात केली?

खांडेकरांची पुस्तकं साधारणपणे मला वाटतं नव्वदनंतर. ज्यावेळी सुप्रिम कोर्टात केस फायनल झाली मग आम्ही सगळी पुस्तकं सुरू केली. तत्पूर्वी सात पुस्तके आम्ही केली होती. कथासंग्रह होते. देशमुखांकडे त्याचे राईटस् (हक्क) नव्हते. ते सगळे मंदाताईंनी मला दिले. ती सगळी पुस्तके आम्ही प्रकाशित केली. 

खांडेकरांच्याकडे तुमचं जाणं येणं वगैरे कसं होतं? 

दुर्दैवाने माझी आणि त्यांची कधी भेट झाली नव्हती. पण मी त्यांचे एकवेळ भाषण ऐकलं होतं. आमच्या कोल्हापूर बुक सेलर्स असोशियनतर्फे त्यांचं एक व्याख्यान होतं. विद्यापीठ हायस्कूलमध्ये आयोजित केलं होतं. ते मी ऐकलं होतं. त्यांची पुस्तकं वाचली होती. प्रत्यक्ष असा संवाद नाही.

आता हा सगळा पुस्तकांचा व्याप संभाळता संभाळता तुमच्याकडे बाबा पाटलांनी काम केलं, तुमच्याकडे आनंद किणीकरांनी काम केलं. आता कुणीतर करत असेल. प्रकाशकाकडे संपादक असला पाहिजे ही धारणा साधारण कोणत्या काळात आली ?

साधारणपणे काही पुस्तकं यादव मला सुचवत होते. तेव्हा मी यादवांना विचारलं की, ‘हे पुस्तक तुम्ही वाचलं का?’ तर ते ‘वाचलं’, असे सांगायचे. मग त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी पुस्तकं प्रकाशित करायचो. पुढे यादवांना वेळ मिळत नव्हता. त्यांनी मला सुचवलं की आपल्या प्रकाशन संस्थेला आपण एक संपादक नेमूया. मग बाबा पाटील, किणीकर आले. आता माझ्याकडे तीन-चार लोकांची टीम आहे.

पण त्या काळात तुम्ही चांगले समीक्षाग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. म्हणजे शेणोलीकरांचा गौरवग्रंथ तुम्ही प्रकाशित केला. गो. म. कुलकर्णीची पुस्तके तुम्ही त्या काळात प्रकाशित केली. यादव सरांची समीक्षेची पुस्तकं तुम्ही प्रकाशित केली. नागनाथ कोत्तापल्ले, द. दि. पुंडेंचे समीक्षाग्रंथ प्रकाशित केलेत. मग संपूर्ण असा चांगला समीक्षा व्यवहार तुम्ही प्रकाशित करत होता, आता मध्येच का बंद केला?

मध्येच बंद पडला याचं कारणं असं होतं की, त्या काळात नवीन कॉलेजना परवानग्या मिळत नव्हत्या. त्यामुळे नवीन कॉलेजं येत नव्हती. त्यामुळे समीक्षाग्रंथांची विक्री होत नव्हती. आता बऱ्याच कॉलेजना परवानग्या मिळतात. आता समीक्षाग्रंथांना चांगली माणसं आहेत. दुर्दैवानं ती पुस्तकं त्या काळात खिळ्याने जोडली असल्याकारणाने ती पुस्तकं आता पुन्हा रिप्रिंट करणे फार आवघड आहे.

मला नाही वाटतं आताच्या या टेक्नॉलॉजीला अवघड असेल असं? 

टेक्नॉलॉजीला अवघड नाही. पण आता हे करणं अवघड आहे. मलाही वाटतंच की चांगले समीक्षाग्रंथ आपल्याकडे असलेच पाहिजे. माझ्याकडे ललित वाङ्‌मय खूप होतं. त्यावेळी समीक्षा वाङ्‌मयही खूप होतं. म्हणजे कोतापल्ले सर, पुंडे सर, गो. म. कुलकर्णीं  यांची पुस्तकं होती. मधल्या पिढीतील मंडळींची ही पुस्तके होती. नंतर एकदम टेक्नॉलॉजी बदलली.

पण आता हे सगळं करत होता; तुम्ही तुमचे संपादक मंडळ, तुम्ही प्रकाशन संस्था इथंपर्यंत आणली. आता मी पुण्यातील ऑफिस बघितलं तर तुमचं प्रत्येक सेक्शन वेगवेगळे आहेत. एके काळी एक माणूस हे सर्व सगळं हाताळत होता. आणि आता तुमचा स्टाफ सत्तर आहे. एक आणि सत्तर यात तुम्हाला काय फरक दिसतो तुमच्या या प्रकाशन व्यवहारात?

आता हा व्यवहार इतका प्रोफेशनल झाला आहे की प्रत्येक डिपाटमेंट वेगळं आहे. याचं कारण असं आहे की, वेळेवर कामे व्हायची असतील तुम्हाला ही वेगवेगळी डिपाटमेंटस असणं आवश्यकच आहे. बरीच डिपाटमेंटस आहेत. त्या डिपाटमेंटनी वेगळीवेगळी कामे केली की ते लगेच होतात. अन्यथा कामे वेळेवर कधीच होत नाहीत.

या सगळ्या व्यवसायात तुम्ही व्यावसायिक स्पर्धेकडे कसे पाहता?

मला असं वाटत की, माझ्या दृष्टीने स्पर्धक नाही. मला याचं कारण असं की, मी ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करतो त्या प्रकारची पुस्तकं दुसरं कुणी प्रकाशित करत नाहीत. मेहता प्रकाशन अनुवादाच्या क्षेत्रामध्ये खूप आहे. मी ज्या प्रकारचे इंग्लड, अमेरिका, आफ्रिका देशातील लेखकांच्या अनुवादाचे हक्क मिळवलेले आहेत,  त्या प्रकारची पुस्तकं त्या काळात कुणी प्रकाशित करीत नव्हतं. आजही करत नाही. आत्ता आत्ता थोडे लोक अनुवादाकडे वळायला लागले आहेत.

तुम्ही अनुवादात जसं काही काम करता तसं कुणी करत नाही. पण तरीही एक व्यावसायिक स्पर्धा महाराष्ट्रात दिसतेच. म्हणजे त्यातले कधी एके काळी महत्त्वाचे प्रकाशक होते ते बाजूला गेले आहेत. पूर्वी मौज प्रकाशनाचा एक दबदबा होता. आता मौजेचं क्वचित पुस्तक येतं. पॉप्युलरचीही पुस्तकं येत आहेत बऱ्यापैकी. नवेही प्रकाशक येत आहेत. आता प्रकाशन व्यवहाराच्या स्थितीकडे बघताना, पुण्यात जरा प्रतिष्ठा होती, तिथं सगळं मिळायचं. आता हे चित्र कसे आहे ? 

नाही आता तसं राहिलंय असं मी म्हणणार नाही. यांच कारण नाशिक, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणावरून चांगली पुस्तकं प्रकाशित होतात. याचं एक कारण नवी टेक्नॉलॉजी. आणि आता ट्रान्सपोर्ट सगळीकडे पसरलेलं आहे. आणि त्या त्या भागातील प्रकाशक त्या त्या भागातील लेखकांशी संपर्क करून पुस्तकं प्रकाशित करीत आहेत. 

बरोबर. म्हणजे आता विकेंद्रिकरण झालेय. 

आता नागपूरला नागपूरच्या लेखकांची पुस्तकं आली. औरंगाबादच्या लेखकांची पुस्तकं आली. आता असं झालं आहे.

आता तुमच्याकडे समग्र लेखकाची पुस्तके आहेत. व. पु. काळे, वि. स. खांडेकर आहेत, शंकर पाटील आहेत, गंगाधर गाडगीळ आहेत, द. मा. मिरासदार आहेत, व्यंकटेश माडगूळकर आहेत. आता हे सगळे लेखक मेहता प्रकाशनाचे तर मग बाकीच्या प्रकाशकांनी काय करायचं?

या बाबतीत अनेक गोष्टी आहेत. याचं कारण असं होतं, की लेखकाबरोबर ज्यावेळी आपण करार करतो त्यावेळी तो स्वच्छ असावा. आम्ही आमच्या व्यवसायात पारदर्शीपणा सांभाळला आहे. कुठल्याही लेखकाचे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी लेखकाचे कॉन्ट्रॅक्ट हे सही करून आल्याशिवाय आम्ही पुस्तकाला हात लावत नाही. आम्ही वेळच्या वेळी रॉयल्टी देतो. पूर्वीच्या प्रकाशकांकडून हे घडत नव्हतं. म्हणून हे लेखक कंटाळायचे. लेखक पैशासाठी कधी लिहीत नाही. लेखक हा स्वत:च्या आत्मसमाधानासाठी लिहीत असतो. पैसा हा नंतरचा भाग झाला. परंतु तुम्ही त्याला काहीही दिलं नाहीत, तर तो नाराज असणारच ना. तुम्ही पैसे मिळवता, म्हणजे प्रकाशक ज्या लेखकावर पैसे मिळवतो पण लेखकाला काही देत नसेल तर लेखकाची कुठं तरी नाराजी असणारच. त्यामुळे हे लेखक माझ्याकडे आले. माझा व्यवहार आजही पारदर्शी आहे. 

तो मला माझ्या पुस्तकांच्या प्रकाशनातून लक्षात आलाच आहे. १९८० पासून  हे मी अनुभवतोय.  मी ज्यावेळी तुमच्याकडे पहिलं पुस्तक दिलं त्यावेळी तुमच्याकडे एक नोटबुक होतं आणि त्याच्यावर आपला करार झालेला होता. मी प्रत्यक्ष बघितलेलंच आहे. पण तेवढीच लेखकांची नाराजी होती म्हणून ते तुमच्याकडे आले, असं नाही. तुम्ही पण काही प्रयत्न केले असतील?

प्रयत्नही केले. त्या प्रयत्नांनाही एक वेगळं कारण होतं. लेखकांनाही वाटत होतं की, मेहता ही प्रकाशन संस्था आता मोठी आहे. आणि यांच्याकडून आपली सर्व कामे वेळेवर होतील. पैसे तर मिळतीलच आणि आपलं पुस्तकं महाराष्ट्रभर सगळीकडे जाईल, असं त्यांना वाटत होतं. 

आता इतक्या लेखकांच्या बरोबर तुमचे संपर्क असतात. तुमचं सगळं चाललेलं असतं. मग या सगळ्यात लेखकांबरोबरचे संबंध तुम्ही कसे टिकवून धरता?

काय आहे, कुठल्याही माणसाशी आपण व्यवहार स्वच्छ ठेवले तर मैत्री आपोआप होते. मैत्री नसण्याचं किंवा मोडण्याचं कारण काय असतं, तर व्यवहार खराब असणं. माझे व्यवहार जर चोख असले तर लेखकांचे आणि माझे संबंध बिघडण्याचे काहीच कारण नाही. 

नाही पण व्यवहाराच्या पलीकडे पण काहीतरी असतं ना? 

मैत्री असते. माझ्या लेखकांना मी सांभाळतो. 

लेखकाशी भांडण झालं असं कधी घडले काय ? 

फार क्वचित झालं असेल. गैरसमज होतात आणि मग भांडणं होतात. एका लेखकाचं मी पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्याने ते आपल्या मुलावर लिहिलं होतं. त्यानं मला सांगितलं की, मी या पुस्तकाचे पैसे घेणार नाही. म्हटलं ठीक आहे. मग त्याप्रमाणे मी पुस्तकाची किंमत कमी ठेवली. आणि नंतर त्याने मला एक लांबलचक पत्र पाठवलं की, तुम्ही मला या पुस्तकाचे पैसे दिले नाहीत. मी त्यावेळी त्यांच्याकडून लिहून घेतलं नव्हतं. त्यावेळी ते नाराज झाले.

तुमचा या सगळ्या लेखकांबरोबर वावर होता. मध्यंतरी काही वेळा असं वातावरण ही होते की, संमेलनाध्यक्ष ठरविण्याच्या राजकरणात तुम्ही सामील असायचा असं म्हटलं जायचं?

हा गैरसमज होता. मी कधी या भानगडीत पडलो नाही. मात्र मी आनंद यादवांच्या प्रचारासाठी गेलो होतो ते मी मान्य करतो. त्यानंतर मी कधीही कुठल्याही लेखकांच्या प्रचारासाठी गेलो नाही.

तुमच्या लेखकांचा प्रचार तुम्ही नाही करायचा तर कुणी करायचा?

मला नंतर वाईट असं वाटतं होतं की काही वेळेला प्रकाशक बरोबर असणं हे लेखकालाही ऑकवर्ड व्हायचं. आणि समोरच्या माणसांना ही ऑकवर्ड व्हायचं.

या सगळ्यात तुम्ही साहित्य संमेलन अध्यक्षाच्या निवडीत तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होता. पण या सगळ्या साहित्य संमेलनाविषयी तुम्हाला काय वाटते ?

मी साहित्य संमेलनाला कधीही गेलेलो नाही. फक्त सांगलीला मी गेलो होतो. याचं कारण असं आहे की, माझा तिथं स्टॉल होता प्रकाशनाचा. तो चांगला सजवला होता म्हणून मी तिथं गेलो होतो. पण मी संमेलनाच्या मांडवात गेलेलो नाही. त्यावेळी मला चांगल्या प्रकाशकाचं पारितोषिक होतं. मला आणि रा. चिं. ढेरे यांना. त्यावेळी रा. चिं. ढेरे यांची कन्या अरुणा ढेरे यांनी पारितोषिक स्वीकारायला आल्या होत्या. माझ्यातर्फे मी माझ्या मुलाला पाठवलं होतं.

पण या चाललेल्या गोष्टींबद्दल काय तर मतं असतील की तुमची? 

चाललेल्या गोष्टीबद्दलची मते वाईट आहेत म्हणून मी ते पारितोषिक स्वीकारायला गेलो नाही. 

लेखकांनी दिलेला ताप तुम्ही सहन करता. म्हणजे हे सहन करण्यापाठीमागचे कारण काय?

सहन करण्यामागे त्यांची जी मानसिकता आहे, ती जर आपण समजून घेतली तर आपल्याला ताप होणारच नाही. त्यांच्या दृष्टीने त्यांना जो ताप होतो, तो माझ्या दृष्टीने मला होणारच.

रणजीत देसाई आणि तुमचे संबंध इतके फार स्नेहाचे होते. ते मी बघितलेले आहेत. असे असताना माधवी देसाई यांचे ‘नाच गं घुमा’ मेहता प्रकाशनाकडे कसे आले नाही?

मेहता प्रकाशनाकडे ‘नाच गं घुमा’ आलं होतं. मी ते वाचलं होतं. पण मी ते प्रकाशित करणार नाही असं स्पष्टपणे माधवीताईंना सांगितलं होतं. कारण माझे आणि माधवीताईंचे संबंध चांगले होते. दादांचे तर होतेच. मी माधवीताईंना हे स्पष्टपणे सांगितलं की, मी हे पुस्तक प्रकाशित करू शकत नाही. कारण मला यातील फॅक्टस आणि फिगर्स माहिती होत्या. आणि प्रकाशित करणं मला योग्य वाटलं नाही.

कारण तुम्ही त्यातले सहप्रवासी होतात. ते बघत होतात. जगत होतात. आता या लेखकांच्या घरगुती प्रकरणात, भांडणात सुद्धा तुमचा एक मध्यस्थ्याचा रोल राहिला, असं म्हटलं तर?

फक्त याच बाबतीत.  

बाकी कोणाच्यात नाही?

बाकी कोणाच्यात नाही.

आता प्रकाशन व्यवसायाचं स्वरूप झपाट्याने बदलत आहे. ईबुक्स येताहेत. आता किंडल आले आहे. आता या सगळ्या प्रिंट माध्यमांचं अवस्थांतर होत आहे. अशा काळात प्रकाशनाच्या भवितव्याबद्दल काय सांगाल?

माझ्या दृष्टीने आणखी दहा ते पंधरा वर्षे मराठी पुस्तकांना बऱ्यापैकी भवितव्य आहे. त्यानंतर अवघड आहे. त्याचं कारण असं, आजपर्यंत जी मुलं मराठी माध्यमात शिकत होती, ती आता इंग्रजी माध्यमांकडे वळायला लागली. ही मुले ज्यावेळी मोठी होतील, त्यावेळी ती मराठी पुस्तके वाचणार नाहीत. कारण त्यांनी आत्ता कुठे मराठी वाचलेलं असतं. त्यामुळे ती इंग्रजीच वाचतात. आजही काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. 

आता एक सर्व्हे असं सांगतो, गेल्या दोन तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद पडायला लागल्या आहेत. पुन्हा एकदा मुलांचा ओढा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांकडे वाढतो आहे. 

हल्ली हल्ली हे चित्र मीही बघतो. मलाही असं वाटतं की असं व्हायला लागलं आहे. असं जर लवकरच झालं पुढे तर मराठी पुस्तकांना चांगले दिवस येतील. 

आता फक्त माझं म्हणणं असं आहे, की ह्या ई-बुकमध्ये लेखकाची आणि प्रकाशकांची जास्त फसवणूक होण्याची शक्यता आहे का?

नाही. याचं कारण असं आहे, ईबुक्स कुठेही मिळत नाहीत. ईबुक्स हे फक्त एका प्लॅटफॉर्मवर मिळतात ॲमेझॉन किंवा तुम्ही असाइनमेंट केला असाल त्या कंपन्यांवर. ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या या कधी फसवेगिरी करत नाहीत. याचं कारण असं की, पुस्तक हा त्यांच्या दृष्टीनं पिन ऑफ बिझनेस म्हणजे अगदी किरकोळ असते.

पण आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की, तुम्ही पूर्ण अनुवादाकडे वळलेला आहात. म्हणजे तुम्ही ललित साहित्य प्रकाशित करत नाही असं म्हणतं नाही. पण तुम्ही कवितासंग्रह प्रकाशित करायचे टाळले आहे, असं का बरं? 

माझ्या माहितीप्रमाणे कवितेला फार मागणी नाही. जे संग्रह अभ्यासक्रमात लावले जातात तेवढीच खपते. बाकीची खपत नाही, असा माझा अनुभव आहे. पण काही प्रकाशकांचा वेगळा अनुभव असेल.

पण किती जाते यापेक्षा कविता ही आपण केली पाहिजे म्हणून वर्षाला एक दुसरं प्रकाशन का करत नाही.

मला वाटतं मी वर्षातून एक दोन प्रकाशित करतो.

आता तुम्ही ज्या वयाच्या टप्प्यावर आहात आणि मुलाने जो व्यावसाय हातात घेताला आहे. आता ह्या दोन पिढींच्यामध्ये काही वादविवाद होतात का?

होणारच. माझ्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे. त्याचे विचार आणि माझे विचार एकमेकांना पटतील असं नाही. माझी अजूनही इच्छा अशी असते आम्ही काही समीक्षाग्रंथ प्रकाशित करायला पाहिजे. पण त्याला त्याची ना असते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कवितासंग्रह मला प्रकाशित करायचे असतात. पण तो काही वेळेला म्हणतो की, आता मागणी नाही. मला कवितेबद्दल प्रेम आहे. अरुण शेवते यांचा पहिला कवितासंग्रह मी काढला. इंद्रजित भालेराव यांचा पहिला ‘पीकपाणी’ हा कवितासंग्रह मी काढला. सदानंद मोरे यांचा पहिला कवितासंग्रह आम्ही प्रकाशित केला. असे कितीतरी लेखक आहेत की ते मोठे झाले आहेत. 

पण आता ही भोवतालची जी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या भोवतालचं जे समाजकारण, राजकारण असेल किंवा आपली बदलती मानसिकता असेल. माणसाची गती प्रचंड वाढलेली आहे. एकमेकांवरचा विश्वास कमी झाला आहे. अशा काळात एक व्यावसायिक म्हणून या परिस्थितीकडे कसे बघता.

एकंदरित समाजाची अशी वाईट स्थिती जरी असली तरी त्यातून काही चांगलं होईल अशी अपेक्षाही बाळगली पाहिजे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी एक बघतो, काही नवीन लेखक अगदी जोमाने पुढे येतात. आता मनोज बोरगावकर सारख्या लेखकाची ‘नदीष्ट’ सारखी पुस्तकं येताहेत. अशी चांगली पुस्तकं येताहेत. या नवीन लेखकांच्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि मला असे नवीन लेखक मिळावेसे वाटतात.

असे लेखक मिळाले तर तुम्ही प्रकाशित करणार का? 

डेफिनेटली करणार. का नाही? अशा बऱ्याच नवीन लेखकांची पुस्तके मी प्रकाशित करतोय. ‘हल्या हल्या दूध दे’ लिहणाऱ्या बाबाराव मुसळेंचं आत्ता नुकतंच मी एक ‘नो नेव्हर नॉट’ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. म्हणजे अशा बऱ्याच  लेखकांची पुस्तकं आम्ही प्रकाशित करत आहोत.

प्रकाशन व्यवहारात तुमचे इतके वेगवेगळे प्रचंड अनुभव जमा झालेले आहेत. तुम्ही जगत आलेले आहात. मी तर असं बघितलेलं आहे की, तुम्ही अगदी सगळ्यांकडे तटस्थ भावनेतून बघता. गुणदोषांसह माणसं स्वीकारता. हे सगळं आहे. तर मग आता या वयाच्या थांब्यावर असं वाटत नाही का, आपण आत्मकथन लिहावं? 

खूप वाटतं. पण आता काही गोष्टी वयोमानानुसार स्मरणातून चाललेल्या आहेत. मी प्रयत्न करतो आहे विस्मरणात न जाण्यासाठी. आता बघू कधी त्याला रूप येतं ते.  

तुम्ही व्यवसायाची पूर्ण धुरा सुनील मेहतांच्याकडे सोपवलेली आहे. आता या सगळ्यातून मुक्त होता होता काय वाटतं तुम्हाला तुमच्या आयुष्याविषयी?

मला असं वाटतं की, या व्यवसायानं मला अनेक माणसं दिली, मित्र दिले. यात भारतभरातील मोठे लोक आहेत. उदाहरणार्थ नानी पालखीवाला, अरूण शौरी, किरण बेदी, सुधा मूर्ती असे अनेक नामवंत लेखक लोक माझे मित्र झाले. या व्यवसायामुळे महाराष्ट्रात माझे अनेक लेखक आहेत. माझ्याकडे ज्यांनी लिहिलेलं आहे त्या लेखकांनी कधीही माझ्याशी वैर पत्करलेलं नाही. किंवा कधीही माझ्याविषयी वाईट बोललेले माझ्या कानावर आलेले नाही. आजही या सगळ्यांशी माझी मैत्री आहे. अशाप्रकारच्या व्यवसायामध्ये अशा प्रकारची माणसं मिळवून ठेवणं ही बाब मला महत्त्वाची वाटते. पैसे मिळवणं ही बाब दुय्यम आहे. पण अशी माणसं भेटली त्याचे मला समाधान वाटतं. 

पण हे एवढं आयुष्य तुम्हाला समाधान देऊन गेलं. माझी शेवटची अपेक्षा एवढीच आहे की, तुम्ही हे सगळे अनुभव आपल्या आत्मकथनातून मांडावेत. या संवादासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आपले मनापासून आभार.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता यांची मुलाखत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी घेतली. ही मुलाखत दि. १५ मे २०२१ रोजी फेसबुक पेजवरून प्रसारित करण्यात आली होती. या मुलाखतीचे शब्दांकन डॉ. तेजस चव्हाण व रवी लोंढे यांनी केले आहे.

अनिल मेहता हे मेहता पब्लिशिंग हाऊस या मराठीतील एका अग्रणी प्रकाशन संस्थेचे संस्थापक असून ते गेली चार दशके या क्षेत्रात कार्यरत आहेत. द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, नवी दिल्ली (एफ आई पी ) या संस्थेचे ते वीस वर्षे व्हाईस प्रेसिडेंट होते. सध्या ते या संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य आहेत.

राजन गवस हे गारगोटी येथे राहणारे मराठीतील नामवंत कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत असून त्यांच्या ‘तणकट’ या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे वेगवेगळ्या भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरांवर मराठी विषयाचे अध्यापन करून ते अलीकडे निवृत्त झाले आहेत.

One comment on “नव्या लेखकांच्या शोधात: अनिल मेहता/राजन गवस

  1. अशोक गायकवाड, अकिवाट

    प्रकाशक आणि लेखक हे नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे असतात.यातून प्रवाहाच एक नातं तयार होतं.ते साहित्याच्या प्रवाहाचे दोन तट बणून सामाज्याच्या प्रवाहात मिसळून जातं ते अगदी आपल्या माती -माणसाशी नाळ जोडून. म्हणून लेखक -साहित्य -प्रकाशक आणि वाचक यांना अडचणी असल्या तरी प्रेरणा आणि ऊर्जा या मुलाखतीच्या वैचारिक देवाण -घेवाणातून मिळेल असे वाटते. मोजक्या प्रश्नांना हवी तशी उत्तरे मिळत गेल्याने मुलाखत उत्तम 🙏🏻🙏🏻

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *