माया निर्मला

शून्याच्या शोधात



back

कथा पिंपळ

भव नाही तो अभाव

एकजिनसी असंभव

भव अभावांचा अभाव

त्याची किती रूपं नावं ॥१॥

भवरूप सकारांना

अभावांची प्रत्युत्तरं

किणकिणते नकार

निर्गुण निराकार ॥२॥

आसपास वसलेली

भवांची शहरं गावं

आणि सुनसान गढी

अभावांची अवाढव्य ॥३॥

भव-अभावांची युगुलं

फुलपाखरं मैथुनमग्न

उडते तरंगते भरकटते

विनाहेतू सव्य-अपसव्य ॥४॥

कथापिंपळ कसे रुजतात

उगवतात उद्-भवतात

भेगाळतात आरपार

भवाच्या चिरेबंदी भिंती ॥‍५॥

निखालस जडवतात

अभावाचा धृवतारा

कसा पुन्हा पुन्हा

भूताच्या अद्भुत कोंदणात ॥६॥

हे अढळ अटळ जडशीळ अभावा

तुला कशी निस्तरू

की व्याघाती विभूतींच्या थेट समोर

तुझी प्राणप्रतिष्ठा करू ॥७॥

लेखाविषयी

प्रशान्त बागड यांची ‘माश्या न मारणाऱ्याचे अनुभव’  ही कथा, विलास सारंग यांच्या ‘माश्या मारणाऱ्याचे अनुभव’ह्या कथेला दिलेला कथात्म प्रतिसाद आहे असं बागड सुचवतात. बागड कथेत लिहितात, ‘विलास सारंग हा माझा पूर्व-पक्ष आहे.’ बागडांच्या कथेचं वाचन, या लेखामध्ये सारंगांच्या कथेच्या जोडीने आणि ‘कथा पिंपळ’ कवितेत स्वतंत्रपणे, अशा दोन्ही प्रकारे केले आहे. ‘माश्या न मारणाऱ्याचे अनुभव’  या कथेला केंद्र मानून परंतु, ढोबळ मानाने त्यांच्या इतर काही कथा आणि कथेतर लिखाण एकत्रित लक्षात घेऊन, त्यांच्या कथांचा बहुस्तरीय पोत समजावून घेण्याचा प्रयत्न इथं केला आहे .

पूर्वपक्ष

‘कवीला कवितेतून काय सांगायचे आहे?’ शाळेमध्ये मराठीच्या परीक्षेत हैराण करणाऱ्या या किंवा तत्सम प्रश्नांनी आपल्याला अजूनही का बेजार करावं? मनू जोसेफनी Live Mint वर लिहिलेल्या ‘Why you should stop asking, “What’s the takeaway”?’ (१० नोव्हेंबर २०१८) या लेखाने त्यातून सुटका केलीय असं वाटतं. लेखात मनू जोसेफ सुचवतात त्याप्रमाणं पुस्तकं, व्याख्यानं किंवा चित्रपटांचे मथितार्थ  त्यांच्या संक्षिप्त गोषवाऱ्यांमध्ये  नेमके मांडलेले असतात असं गृहीत धरण्यानं कलानुभवाला अनिष्ट मर्यादा पडतात. सामान्यतः वाचक-श्रोते-प्रेक्षक कविता, कथा-कादंबऱ्या, किंवा इतर कलाकृती ग्रहण करताना, आपल्या पूर्वग्रहमंडीत अनुभवविश्वाच्या संदर्भात त्यांचे अन्वयार्थ, उद्देश, तात्पर्ये शोधत राहतात. आपल्या आकलन व्यवहारांना नवनवी आव्हाने देणाऱ्या कलाकृतींचा एक नीटनेटका सारांश शब्दांमध्ये मांडून त्या कलाकृतींवर यशस्वी चढाया केल्याचे निःश्वास सोडतात. अशा स्पर्धात्मक वृत्तीने वाचताना वाचकांना प्रभावित करणाऱ्या त्यांच्या कल्प-विकल्पांचा, प्रचलित समीक्षा साधनांचा किंवा सारंगांच्या कथेतल्या ‘डोक्यावर घोंगावणाऱ्या माश्यांचा’  कलेच्या निखळ अनुभवग्रहणात काहीसा अडथळा होतो. ‘वाचत बसणे’ हेच वाचनांतर्गत किंवा कलाग्रहणांतर्गत प्रक्रियांचे प्रतीक मानून सारंगांची कथा इथे वाचली आहे.

कथेमध्ये सारंग लिहितात,

मी दिवसभर वाचत बसतो. .. .. पण खोलीत विलक्षण माश्या येतात. डोक्यावर चकरा मारतात, .. .. मी चिडून उठतो. त्वेषाने हातवारे करतो. .. .. घडी केलेला पेपर संथपणे वर उचलतो आणि फाडकन त्या कीटकावर हाणतो.

पुढे एके ठिकाणी लिहितात,

मी वार केला नाही. मी नुसता पाहत राहिलो त्या दोन कीटकांकडे, एक जिवंत, एक मेल्यासारखाच. मग जिवंत माशी एकाएकी हवेत उडाली आणि क्षणात नाहीशी झाली. .. .. हे जरी खरं होतं की माश्या मारण्याच्या उद्योगानंच माझ्या वाचनात काहीसा व्यत्यय येई, तरी अंगाभोवती माश्या भणभणत असताना वाचायचा प्रयत्न करण्यापेक्षा ते फार बरं होतं.

सुज्ञ वाचक, कलानुभव संकुचित व्हायला कारणीभूत होऊ शकतील अशा आपत्तीकारक पूर्वकल्पनांना आळा घालून, ‘माश्या मारून’ कलाकृतींना शक्य तितक्या मोकळ्या मनाने सामोरं जाऊ पहातात. असं करताना कलाकृतींविषयीचे सगळे संदर्भविशिष्ट ठोकताळे संदर्भांच्या गतिशीलतेमुळे तात्पुरते ठरतात. त्यामुळे, एकदा चिकित्सेचं शिखर गाठून कलाकृतींवर फतेह केली तरी वाचक-समीक्षकांची जबाबदारी संपत नाही, आणि सतत सावध राहून खुल्या दिलाने कलाकृती अनुभवण्याची किंवा कलाकृतींना भिडण्याची कसरत अवघड असली तरी पूर्वकल्पनांच्या अमलाखाली केलेल्या कलाग्रहणापेक्षा ती कसरतच कितीतरी श्रेयस्कर ठरते असं कथेत सूचित केलं आहे असं वाटतं.

उत्तरपक्ष

बागड कथेत लिहितात,

[सारंगांचा] माश्या मारणारा .. .. माश्यांमध्ये गुंतत चालला होता. .. .. तो अहोरात्र माश्यांचा विचार करत होता आणि – की म्हणून माश्या सतत त्याच्या भोवती भणभणत होत्या.

सारंगांच्या कथेतलं साहित्यिक संकायांचं (faculties) प्रचलित समीक्षक चौकटींना आव्हान देण्यात अतिव्यस्त होणं वाचकांइतकंच लेखकांनाही जिकिरीचं वाटत असावं. उपलब्ध समीक्षा-चौकटींना विरोध करता करता घेतलेली त्या चौकटींची गैरवाजवी दखल एकप्रकारे त्यांचा समीक्षा व्यवहारावरील प्रभाव पुन्हा एकदा प्रस्थापित करत असावी. बागड कथेत लिहितात,

मलाही माश्या त्रास देत. .. .. माझ्या वाचनात विघ्न आणत. .. .. अशा वेळी, मी खोलीतून बाहेर पडतो. चौकात जाऊन उभा राहतो. .. .. मी माश्या मनावर घेतल्या नव्हत्या. .. .. मी त्यांच्यावर दुर्लक्षाचे अहिंसक बाण सोडले होते.

वाचन आणि लेखन प्रक्रियांमधली सलगता सूचित करत, बागड पुढे लिहितात,

रस्त्याने चालता चालता मी कथेच्या मागे मागे गेलो होतो. कथेचे शीर्षक तयार आहे. .. .. मी कथेचं शरीर शोधत होतो.

सारंगांची कथा श्रेयस्कर आणि चिकित्सक वाचन शैलींच्या वाटा जोखते असं मानलं तर बागडांची कथा सर्जनशील लिखाणांचे घाट आजमावते, असं म्हणता येईल. सर्जनशील कृतींसाठी समीक्षेच्या चौकटीतून बाहेर पडून, समीक्षक बाण्यालाच बंदी घालून, किंवा समीक्षा व्यवहारापासून मनोमन अंतर ठेवून, एक प्रकारची विपश्यना साधावी लागत असावी. लेखामध्ये बागड लिहितात, ‘लेखकाने लिहिलेली संहिता, लेखकाने घडवलेली बंदिश ही एक प्रकारे पाळलेली शांतता असते, एक प्रकारचं मौनव्रत असतं’.

कथांमध्ये विधानं नाहीत

बागडांच्या कथांमध्ये समीक्षा-क्षण येतात ते मौनासारखे, ‘दगडी श्वापदं पोटाशी धरून बसलेल्या अमूर्त आशया’सारखे, पहाड झाडांशी कुजबुजतील तसे. कथेतल्या पात्रांनी केलेल्या अनेक समांतर किंवा परस्पर विरोधी समीक्षा पर्यायांच्या अनिर्णायक ऊहापोहासारखेही समीक्षा-क्षण येतात. उदाहरणार्थ, हे कथांमधल्या संवादांत येणारे काही वाक्यांश –

‘निर्मिती ही काही आकळून घ्यायची गोष्ट नाही, आनंद, आस्वाद महत्त्वाचा’, ‘निर्मिती एक षड़यंत्र आहे’, ‘निर्मिती एक अफवा आहे’, ‘निर्मितीकडे जाणाऱ्या असंख्य वाटा आहेत’, ‘सब्जेक्ट अनंत असतो पण चिडीचूप असतो’, ‘कथेचा पोत हाच कथेचा आत्मा आहे’, ‘नाही, गाभा पोतातून व्यक्त होतो हे मान्य पण तो पोताहून वेगळा असतो’, ‘अर्थ रद्दीच्या भावाने विका. पण गाभा गहाण टाकून चालेल का?’, ‘गाभ्याचं अस्तित्व नाकारून कसं चालेल? तुमच्या नकळत तो आकाराला येईलच ना? गाभा म्हणजे संघर्ष. कथा आणि वाचक यांच्यात उडालेली चकमक’, वाचक गाभ्याबद्दल उदासीनच राहील’, ‘वाचक निशःब्दपणे गाभा शोधतो आणि तिथून रानभरी होतो’, ‘कथांना तात्पर्य नसतं’, ‘गाभ्याच्या त्यागाचं उसनं अवसान लेखकाला कधीच आणता येणार नाही’,

इत्यादी, इत्यादी.

कथांमधल्या पात्रांच्या अशा ‘खुळ्या भांडणांतल्या उंच [समीक्षक] आरोळ्या’ आणि कथांच्या पोतातूनच फुटणारे मंद समीक्षक टणत्कार एका सलग सूत्रात बांधून त्याला एक निर्णायक परिणाम देणारे आणि ते सूत्र वाचकांपर्यंत पोचवणारे सूत्रधार कथांमध्ये नसतात. कथांमधले ‘अंतर्मुखतेत गुंतून पडलेले, आपल्याच निवेदनाचे रहिवासी वा बंदी ठरणारे’ निवेदक कथांमधल्या पात्रांच्या रूपात वावरतात, सूत्रधाराच्या रूपात नाही. हेही, तेही आणि सगळेच पर्याय मांडून एकही ठाम भूमिका न घेता रचलेली शब्दांची रास, शब्दांची वाहिलेली आहुती, मौनासारखीच तर असते. बागड लेखात लिहितात, ‘[कथा लेखन] अंतर्मुखतेच्या बहुस्तरीय, गोष्टीरूप प्रांगणात मुळं रोवून सांकेतिक व असांकेतिक, ज्ञात व अज्ञात, परिचित व पर नीट न्याहाळत, .. .. एका मनोवेधक काळात होतं.’  कदाचित, नागार्जुनांनी वर्णन केलेल्या काळासारख्या अशा काळात ते होतं जिथे,

उगवलेले दोन पूर्णचंद्र जसे स्वप्नातल्या आकाशात
वस्तू वा विचार एकाचवेळी असतात आणि नसतात

कथांना विषय नाहीत

बागड लेखात असंही लिहितात की त्यांच्या ‘कथांना विषय नसतात, कथा काही-नाही  विषयी असतात’. काही-नाहीला, नसलेपणाला दिशा नसतात, मागचा-पुढचा नसतात, सुरुवात आणि शेवटही नसतात. बागडांच्या कथेला सुरुवात आहे. ‘मी बाहेर पाहतो आणि गळणाऱ्या व झाडावर उरणाऱ्या पानांना सगळं विचारू बघतो.’ कथा अशी सुरु होते. ‘झाडावर उरणारी पानं’ जी केव्हातरी गळायला लागतील आणि ‘झाडावरून गळणारी पानं’ जी कधीतरी गळून पडतील, त्यांच्यातल्या अंगभूत अनिश्चिततेच्या साक्षीने, आणि कथेतल्या निवेदकाच्याही अनिश्चित कलानिर्णयाने, ‘ही सुरुवात मला टाळावी लागेल’ असं लिहीत लिहीत कथेला सुरुवात होते.

बागडांच्या बहुतेक कथांचे वाचन कथा-विषय, त्यातली पात्रं, त्यांची वळणं, निवेदकांची ओळख या  सगळ्यांविषयीच्या अनिश्चिततेपाशी घडोघडी अडखळते. एकाच कथेमध्ये ‘बहुदा शंभराव्या डॉक्टरची गोष्ट’ सांगितली जाते. कथांमध्ये ‘स्वतःच व्यास आणि स्वतःच गणपती होणारा, चेहरा गुप्त ठेऊन जगाशी बोलणाऱ्या डोळ्यांचा, ‘बिनपावलांचा’, ‘एकटे असण्याची खात्री नसलेला एकटा’, ‘कोड्यात पडलेला’ असे संदिग्ध निवेदक भेटतात. ‘या टोकापासून त्या टोकापर्यंतची सलगता न सोसवून’ कथा ‘गुंत्यातल्या एखाद्या धाग्यावरून सोडून दिलेल्या’ असतात. ‘दिशा नसलेल्या आणि मुक्कामाची हाव नसलेल्या उनाड वाचनासारखं’ विकिरण कथांचंही एकेक पाऊल पुढे पडतं आणि दोन तीन चार पाच सहा पावलं इकडे तिकडे किंवा मागे सुध्दा पडतात. अनवट सुरुवातींनी आणि चौखूर चालीत कथांची वाटचाल होते. जसं नागार्जुन लिहितात,

भव नाही स्थिर, नाही अस्थिर,
नाही दिशाबद्ध, वा नक्षत्र दिशाहीन


झाडावरची पानं, त्यांना विचारत होणारी सुरुवात, विलास सारंगांचा पूर्व-पक्ष, माश्या मारण्यामधलं नाट्य, त्यावर केलेली टिप्पणी, फुलं घेऊन येणाऱ्या मुलीची गोष्ट, तिने सुचवलेली चहा पिणाऱ्या माणसाची गोष्ट आणि स्पष्टीकरणासाठी सांगितलेली कस्तुरीमृगाची आणि मस्क-डिअर ची गोष्ट, निवेदकाला सुचलेली एक नवीन पिक्चरचं शूटिंग बघायला जाणाऱ्या मुलाची गोष्ट, कथेच्या पिंजऱ्यात उभा निवेदक, इत्यादी अनेक एकामागून एक येणाऱ्या आणि जाणाऱ्या तपशिलांचे फाटे फुटून ‘माश्या न मारणाऱ्याचे अनुभव’ या कथेचा आत्मशोध चालू राहतो. त्या तपशिलांची मुळं आणि त्यांचे परस्परसंबंध यांची दखल घेण्यापेक्षा, तपशिलांमुळे आकाराला येणारा कथेचा पोत कथेत महत्त्वाचा किंवा पुरेसा ठरतो. बागड कथेत लिहितात,  

घटनेची गंगोत्री शोधण्याच्या फंदात मला पडायचं नव्हतं. तिच्या गोचरत्त्वाचं व्याकरण उकलणारं माझं काव्य .. .. मला पुरायचं.

कथेच्या शोधात असलेल्या या कथेला, बागडांनी लेखात लिहिल्याप्रमाणे ठोस विषय नाही. त्यामुळे कथेत सर्वत्र विखुरलेल्या अगणित तपशिलांचं प्रयोजन एकप्रकारे तात्पुरतं किंवा नैमित्तिक वाटतं, आणि कथेच्या शोधात असली तरी ती एक कथा आहे म्हणून ते सकारण किंवा पद्धतशीरही वाटतं. मुळात, काही ना काही तपशील असणं जुजबी नाहीच. तपशीलच नसेल तर कथा ती काय? कथाविषयांच्या नितळ नसलेपणावर उमटलेली तपशिलांची लहानशी लाटही जशी ठळक किंवा बटबटीत दिसेल तशा आणि त्या ‘बटबटीतपणाचं बोट धरून चालणं भाग आहे’, बागड कथेत लिहितात. नसलेपणावर उमटलेले तपशीलच तर, किंवा हलकेसे तपशिलाचे तरंग सुद्धा, नसलेपणाला शक्यतेचा परिणाम देतात, नाहीपणाला न-नाहीपणाची महिरप घालतात, आणि नितान्त नसलेपणाच्या कोऱ्या कागदावरच तर तपशिलांना कथेमध्ये अस्तित्वाची धार चढते.

‘कथांना विषय नाहीत’ हे बागडांच्या लेखात आलेले विधान त्यांच्या कथांमध्ये अशा शब्दांत जाहीर होत नाही. त्याची अप्रत्यक्ष सूचना मिळते. ‘अंतरंग नसलेलं आभाळ’, ‘केंद्र नसलेलं दुःख’, ‘निराशय अस्तित्व’, ‘निरर्थकावर मात करु बघणारी, .. .. अनाकलनाला परतवण्याचा व्यर्थ प्रयत्न करणारी’ पात्रं, ‘उडून जाणारे आशयाचे बिंदू’, ‘बुडायला टोक नसलेला, शेवट नसलेला संदिग्धतेचा अंधार’ अशा सगळ्या वर्णनांमधून ते प्रतीत होतं. नसलेपणाचं गणित आपण असं फक्त वर्णनात्मक पातळीवरच मांडू शकतो. नागार्जुन लिहितात तसं, नसणं आणि असणं, किंवा शून्य आणि शून्येतर यांसारख्या द्वंद्व कल्पनांची चर्चा, एकमेकांच्या अपरोक्ष, वेगळी वेगळी होऊ शकत नाही.

शून्य व्यक्त होत नाही, न-शून्य संभवत नाही
तथ्य त्या द्वंद्व कल्पनेत, असतील जर वर्णने काही १०

आशयांची संभाव्य मुळं

बोलीभाषेत ‘माश्या मारणं’ म्हणजे विशेष काही न करणं. साहित्य-क्षेत्रात माश्या मारणं म्हणजे आपल्या अनुभव विश्वातच कथा विषय आणि विस्तार शोधून बागड लेखात लिहितात त्याप्रमाणे ‘आपलं अस्तित्व वस्तुस्थितीने बांधून घेणं’ किंवा त्यांच्या कथेतलं, ‘माश्यांमध्ये गुंतून जाणं’ असं म्हणता येईल. बागड लेखात लिहितात, ‘स्वतःच्या वस्तुस्थितीत स्वत:चं विसर्जन करून डायस्पोरिक साहित्य वाढीस लागतं’. आपल्या ऐतिहासिक, भौगोलिक, वैयक्तिक, सामूहिक, किंवा थोडक्यात, पदरात पडलेल्या आयत्या अनुभवांचं पीठ दळून त्याच्याच कथात्म भाकरी भाजणं त्यात असतं असं मानलं तर मग त्यात नेमकं सृजन कसं ओळखायचं असा प्रश्न पडू शकतो. नागार्जुन लिहितात,

उमलत नाही जे स्वतःतून, त्याला म्हणावे भव कसे
परनिर्भरांच्या मेळातून घडणे, म्हणावे उमलणे कसे ११

उलटपक्षी, ‘माश्या न मारणं’, निष्क्रियतेला निर्बंध घालणं म्हणजे अनुभव ग्रहण करून त्यात बुडून न जाता अलिप्तपणे त्यांचं विश्लेषण करणं. कथावस्तूचा संदर्भ सोलून काढणं. जसं कथेत, ‘चौकाचं संविधानक चौकाच्या कथेतून वेगळं करणं.’ आणि मग जसं लेखात लिहिलंय तसं ‘आपल्या काळाचं अधिक मनोवेधक वस्तूत रूपांतर करून’, अनुभव कोशाच्या पल्याडचा कथाविषय हाताळून, कथावस्तूला वेगळ्याच कोंदणात बसवणं. म्हणजे जसं बागड कथेत लिहितात,

मराठी वाचक-सीतेला दिसतो कस्तुरीमृग. तो धावत जातो पाश्चात्य वाङ्मयाच्या, नॅचरलीसमरंगी दंडकारण्यात. इंग्रजी वाचक-सीतेला दिसतो मस्क-डिअर. तो धावत जातो संस्कृत वाङ्मयाच्या दंडकारण्यात.

सारंगांच्या कथेमध्ये श्रेयस्कर वाचनासाठी समीक्षा विचारांचा पाठपुरावा करता करता समीक्षेचा सोपानच सृजनशील वाचन-लेखनाचा मुक्काम ठरू पाहतो, तर बागडांच्या कथेत सर्जनशील लिखाण करण्यासाठी समीक्षक चौकटींबरोबरच अनुभव चौकटींनाही छेद द्यावा लागतो असं सूचित होताना दिसतं. बागडांची कथा असंही सुचवते की कलाकृतीच्या निर्मितीला आणि अनुभूतीला जसा कोणता ना कोणता तपशील असावा लागतो तशी कोणती ना कोणती प्रकट-अप्रकट चौकटही असावी लागते. कथेत लिहिलंय,

कोश हवा आहे माश्या मारणाऱ्याला. बाहेर तो किती वेळ राहणार?

तळ्यात मळ्यात

अनुभवकोशाच्या वस्तुस्थितीचं सतत भान राहण्यासाठी जशी चिकित्सा व्यवहाराची आवश्यकता असते तसं सर्जनशील लेखन-वाचनासाठी अनुभवकोषांमधल्या जागृत, मूर्त, अमूर्त अनुभवांच्या सतत संपर्कातही राहावं लागतं. अनुभव आणि चिकित्सा, साहित्यव्यवहाराची ही दोन परस्पर पूरक अंगं समीक्षक आणि सर्जनशील अशा दोन्ही प्रकारच्या लेखनवाचनासाठी आवश्यक असा द्वंद्वात्मक अवकाश उपलब्ध करून देतात. बागड त्यांच्या कथालेखनातून, त्या द्वंद्वात्मक विस्तारातल्या अनेक व्यामिश्र स्तरांशी एकाच वेळी संपर्कात राहू पाहतात आणि त्यातली जोखीमही सूचित करतात असं वाटतं. कथेमध्ये लिहिलंय,

माश्या मारणाराच तर माश्या न मारणाऱ्याचे अनुभव लिहू शकतो.
माश्या मारणारा माश्या न मारण्याबद्दल लिहून एक व्याघात म्हणून, जगासमोर उभा राहील. कथेच्या पिंजऱ्यात उभा आहे आत्मव्याघाती माश्या न मारणारा. ही व्याघात आपत्ती सहन करत [निवेदक] तळ्यातून मळ्यात उडी घेतो.

साहित्यकृतींचे विषय, त्यांची व्याप्ती आणि प्रवृती आदींवर त्यांचे आशय, आकारमान आणि प्रकार निर्भर असतात असं मानलं तर आणि स्वतःच्या कथालेखनाविषयीची बागडांची टिपणं, उदाहरणार्थ, कथांना विषय नसतात, कथा काही-नाही विषयी, न-वस्तू विषयी असतात, कथांमध्ये एकप्रकारचं मौन पाळलेलं असतं, इत्यादी, प्रमाण मानली तर काही उपकल्पित प्रश्न विचारता येतात.

न-वस्तू केव्हढी असते? तिचा आकार कसा असतो? स्वतःचे शारीर वा अशारीर हात न चालवताही, अगदी अलगद, अलिप्तपणे, मौनासारख्या विधानांच्या कोणत्या धाटणीत न-वस्तू नेमकी व्यक्त करता येते? आणि मग, त्या परस्पर परावर्तित न-वस्तू आणि न-विधानांच्या समोरासमोर धरलेल्या आरश्यांमध्ये कोणती बिंबं आणि कोणती प्रतिबिंबं? कोणते आशय आणि कोणती त्यांची रूपं? बायबलच्या पवित्र स्तोत्रांमध्ये घोषित केलेल्या इस्रायलच्या कथित राजासाठी आपण परीकथांमध्ये असतो तसा नवा अदृश्य अंगरखा कसा शिवावा? किंवा कथित राज्य कोणती बहुढंगी शस्त्रास्त्रं परजत आणि कसं काबीज करावं? बागड कथेत लिहितात ‘हवेत रट्टा कसा मारणार?’

हात हवेत नाचवत, काँटें नहीं कटते यें दिन यें रात गाणारी  श्रीदेवी, कल्पनेतल्या मि. इंडिया१२ भोवती रुंजी घालते, तसं कथा-काव्य-समीक्षेचे पदर कथाभर फलकारत कथांचे निवेदक आशयांच्या ‘अदृश्य केंद्रांचं आरेखन करतात’. संहितेनुसार वेष बदलून जसं गीतकाराला गाण्याच्या दृश्यात मि. इंडिया सारखं अदृश्य होता येतं आणि श्रीदेवीसारखं नाचत गिरक्याही घेता येतात, तसं निवेदकांना वर्णनांच्या तळ्यात तरंगून मौन राखता येतं आणि संवादांच्या मळ्यात जाऊन समीक्षक शेरेही मारता येतात.

मग पुन्हा प्रश्न पडतात. तळ्यात मळ्यात करताना उडी दरवेळी कथेच्या त्याच सूत्रात किंवा समीक्षा विचाराच्या त्याच धारेत पडते का? कथांचा विवर्ती शून्यान्त गाभा एकच असतो की अनेक? गेली पंधरा वर्ष प्रशान्त बागड एकच कथा क्रमशः लिहितायत की दरवेळी एकाच कथेमध्ये अनेक कथा लिहितात? उत्तरादाखल प्रश्नांइतकाच अमूर्त प्रतिप्रश्न नागार्जुनांच्या संहितेत सापडतो.

भव नाही एक, वा नाही ते अनेक,
घुमत राहाते जशी, कुणाची ती हाक १३

रूपापासून अरूपापर्यंत

या, अशा, किंवा अजून कधी न उच्चारल्या गेलेल्या उपकल्पित प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी, कथेच्या गृहीत गाभ्यापर्यंत पोचण्यासाठी, कथेनी मळवटलेल्या पायवाटांवरूनच वाचकांनाही जावं लागतं. उदाहरणार्थ, कथेला सामोरं जाता जाता वाचकांनाही कथांच्या निवेदकांसारखं गद्य आणि पद्याच्या तळ्यात-मळ्यात करावं लागतं. संदिग्ध, अनाकलनीय आणि तत्त्वतः अप्राप्य अशा कथेच्या केंद्राचा पाठपुरावा न करता, कथेतच सापडणाऱ्या ‘[कथेकडे] जाणाऱ्या अनेक वाटा’ धुंडाळून, ‘लहान लहान अर्थपूर्ण प्रवास’ करत, हाती लागणाऱ्या ‘सुट्या कल्पनां’मध्ये, ‘अतिएकाकी अस्फुट विधानां’मध्ये, किंवा मनू जोसेफनी त्यांच्या लेखात उल्लेखलेल्या कलानुभूतीच्या बेहद बेनाम क्षणांमध्ये (in the absolute anonymity of its moments) कथांची खरी ओळख पटवून घेऊन, तिथून परत फिरणंही भाग पडतं. बागड लिहितात, ‘ज्या बिंदूवरून वाचक मागे फिरतो, कथेला शरण जात नाही ती जागा म्हणजे कथेचा गाभा.’ कथारूपापासून आशयाच्या दिशेनी केलेल्या वाचनप्रवासातच वाचकांना कथेचा रहस्यमय शून्याशय चाचपडावा लागतो. कथावाचनाचा सोपान आणि मुक्काम शेवटी, नागार्जुन लिहितात तसे, एकच ठरतात.  

वाक्यं आणि विधानांच्या झुल्यात,
रहस्ये जी मतामतांमध्ये हिंदळतात
आपल्याच बंद मुठीत दडलेली,
ती शून्यता अव्यक्ताच्या विवरात १४

अखेरीस, वाचनाची सांगता शून्य प्राप्तीत नाही, तर शून्य असाध्य आहे या जाणिवेत होते. कथांच्या वाचनासाठी आणि कथांविषयीच्या लेखनासाठीही आवश्यक असं शून्य हे साधन आहे, साध्य नाही. कथेच्या शून्यांत गाभ्याची जाणीव ही एक प्रक्रिया आहे, फलित नाही. त्या अर्थाने वाचनाची सांगता होत नाही आणि होतेही.

‘माश्या न मरणाऱ्याचे अनुभव’, बोलीभाषेत, काही न करणे टाळणाऱ्याचे अनुभव, अशा, शीर्षकातल्या दुहेरी नकारापासून सुरुवात करून कथावाचन आणखी एका दुहेरी नकारापर्यंत येऊन पोचतं – असाध्य शून्य, अर्थात, जी कधीच हाती लागणार नाही अशी न-वस्तू. हा दोन नकारांचा एक होकार नाही. उगवत्या सूर्याच्या देशातल्या सूर्यासारख्या, कायम जाणीव क्षितिजावरच्या धुक्यात वेढलेल्या शून्याशी केलेला हा नागार्जुनी समेट म्हणता येईल. गौतम बुद्धाचे विचार समजावताना नागार्जुन असंही सांगतात की अव्यक्त शून्याला शेंदूर फासून त्याला भजू नका. शून्याभोवती एखादा आखीव-रेखीव सिद्धांत मांडून रोज उठून तो राबवू नका. शून्याला आपल्या जाणिवेच्या सीमेबाहेर केवळ सौम्यपणे तेवत राहू द्या. बागड त्यांच्या कथालेखनाविषयी लिहितात तसाच ‘अकर्मक’ कथाप्रवास, वाचकांनाही कथा वाचताना करावा लागतो.

संदर्भ:

१. प्रशान्त बागड, माश्या न मारणाऱ्याचे अनुभव, मुक्त शब्द, मुंबई, मे २०११

२. विलास सारंग, माश्या मारणाऱ्याचे अनुभव, सोलेदाद, मौज, १९७५, प. आ.

३. प्रशान्त बागड, विवादे विषादे प्रमादे प्रवासे, शब्द पब्लिकेशन, मुंबई, २०१०

४. प्रशान्त बागड, मी का लिहितो, मुक्त शब्द, मुंबई, ऑक्टोबर २०१३ (साहित्य अकादमी आयोजित उत्तर-पूर्व आणि पश्चिमी राज्यांमधल्या तरुण लेखक-लेखिकांच्या भेटसत्रात बागडांनी केलेल्या, ‘Why do I write’, या भाषणाचा लेखकाने केलेला मराठी अनुवाद)

५.या उपविभागातली सर्व अवतरणे विलास सारंगांच्या ‘माश्या मारणाऱ्याचे अनुभव’ या कथेतील आहेत.

६. इथून पुढची वेगळ्या ठशात मांडलेली सर्व अवतरणे ‘माश्या न मारणाऱ्याचे अनुभव’ या कथेतील आहेत.

७. इथून पुढची लिखाणाच्या ओघात गोवलेली सगळी अवतरणे ‘माश्या न मारणाऱ्याचे अनुभव’ या  कथेतून, ‘विवादे विषादे प्रमादे प्रवासे ‘ या कथासंग्रहातून, आणि ‘मी का लिहितो’  या लेखातून घेतलेली आहेत.

८. म्यॅथु व्हर्गीस, Exploring the Structures of Emptiness, सॅन्क्टम बुक्स, न्यू दिल्ली, २०१०;

‘नागार्जुन, चतुस्स्तव,  दक्षिण भारत, ०१०० ते ०२००, अचिंत्यस्तव, चोविसावंकडवं’;

(लेखात दिलेल्या नागार्जुनांच्या सर्व भाष्यांचे स्वैर मराठीकरण, म्यॅथु व्हर्गीस यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून मी केलेले आहे.) 

९.नागार्जुन, चतुस्स्तव, दक्षिण भारत, ०१०० ते ०२००, निरउपम्यास्तव,आकारावं कडवं

१०. नागार्जुन, चतुस्स्तव, दक्षिण भारत, ०१०० ते०२००

११. नागार्जुन, चतुस्स्तव, दक्षिण भारत, ०१००ते ०२००, अचिंत्यस्तव,तिसरं कडवं

१२. शेखर कपूर निर्देशित हिंदी चित्रपट, मि. इंडिया, मुंबई, १९८७

१३. नागार्जुन, चतुस्स्तव, दक्षिण भारत, ०१०० ते ०२००, निरउपम्यास्तव, तेरावं कडवं

१४. नागार्जुन, चतुस्स्तव, दक्षिण भारत, ०१०० ते ०२००, अचिंत्यस्तव, सातवं कडवं

चित्र सौजन्य: प्रभाकर कोलते

माया निर्मला स्वयंसेवी संस्था आणि सरकारी विकास प्रकल्पांकरिता संशोधन आणि मूल्यमापनाचे काम करतात. मुक्त शब्द आणि परिवर्तनाचा वाटसरू या मराठी नियतकालिकात त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.

3 comments on “शून्याच्या शोधात: माया निर्मला

  1. नारायण लाळे

    माया निर्मला यांची कथेवरील समीक्षा वाचून न-वाचून तसेच प्रशांतची मूळ कथा न-वाचून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो आहे . प्रशांतच्या कथेशी माझी तोंड ओळख आहे .समीक्षेत लिहिल्याप्रमाणे त्याच्या कथेत वाचकाला कथा शोधावी लागते. लेखक कथेतल्या कथेकडे जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध करून ठेवतो . वाचकाला ते कष्ट घेण्यास लेखक भाग पाडतो .वाचकाला तो ( लेखक ) ‘ माश्या मारत ठेवत नाही ‘

    Reply
    • माया

      नारायण लाळे, तुमचं निरीक्षण अगदी नेमकं आहे. Thank you for sharing.

      वाचताना वाचकांनी बघ्याची भूमिका सोडून कथेच्या आत्मशोधात लेखकाच्या बरोबरीने किंवा लेखकाशिवाय सहभागी होणं जास्त श्रेयस्कर ठरावं असं वाटतं.

      माझ्या दृष्टीने आनंदाची बाब ही की मूळ कथा न वाचताही तुम्ही लेखाचे अर्थपूर्ण वाचन करू शकलात. याचे श्रेय संपादक आशुतोष पोतदारांकडे जाते. त्यांनी दोन्ही संदर्भ कथा आणि बागडांच्या इतर कथा आणि लेखांमधून आवश्यक तो सगळा मजकूर लेखात सढळपणे अंतर्भूत करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तुम्ही केलं तसं, लेखाचं स्वतंत्र वाचन करणं शक्य झालं असं वाटतं.

      पुन्हा एकदा आभार.

      Reply
  2. adminhakara

    मला समीक्षा लेख वाचायला आवडतात . ती समंजस असेल तर अशी समीक्षा मला खूप आवडते . क्लिष्टता हा समीक्षेचा आजार आहे . तुम्ही केलेली समीक्षा समंजस तसेच क्लिष्टतेचा आजार नसलेली वाटली. धन्यवाद. (नारायण लाळे, मेसेंजर)

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *