मूळ जपानी लेखिका: बनाना योशिमोतो

मराठी भाषांतर: मनीषा साठे

वीण


back

त्या दिवशी नशापानामुळे डोकं जबरदस्त चढलं होतं. त्यामुळे संध्याकाळ बिनकामाची गेली. लेख लिहिणं हे माझ्या चरितार्थाचं साधन आहे. खरंतर त्या दिवशीपण मला एक तातडीचं काम आलं होतं. एका छायाचित्रकाराने काढलेल्या फोटोला साजेसं असं लिखाण करायचं होतं. पण डोकं भणभणत असल्यामुळे खवळलेल्या समुद्राचा तो फोटो त्या दिवशी काही जगासमोर आला नाही. 

अशा प्रकारे लोकांबरोबर जुळवून घेत काम करणं म्हणजे विलक्षण असतं. विशेष करून सर्जनशील काम करणाऱ्या लोकांसाठी.  दुसरं कोणी तरी डोकावून बघत आहे असं काहीसं वाटत राहतं. कोणे एके काळी त्या व्यक्तीला दिलेल्या वचनाची ही पूर्ती असावी. आठवणींच्याही पलीकडले जुने वचन.

त्या दिवशी मात्र मी शरदाचं निरभ्र आभाळ पाहत बिछान्यावर पहुडलो होतो. जेथवर नजर जाईल तेथवर स्वच्छ निरभ्र आभाळ. छान तंद्री लागली होती. पण खाड्कन ती तंद्री भंगली.

शेजारी राहणारी मुलं कर्कश्श आवाजात व्हायोलीन वाजवत होती. मनात उतरलेलं निळं निरभ्र आभाळ भेदून टाकणारा कर्कश्श आवाज. असो. पण मला काही करून डोळे मिटून आकाशाच्या निळाईशी, गहिराईशी एकरूप व्हायचं होतं.

मिटलेल्या डोळ्यांपुढे पसरलेलं निळं आकाश. त्यातूनच एका भुवईची आकृती उमटली. हो, तिचीच ती भुवई.

तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे, तिला बोलताना शब्द सापडणं कठीण झालं की ती,  “अं..अं..कसं सांगू..” असं काहीसं अडखळत डोळे मिटून घेते. त्या वेळी डोळ्यांवर रेखलेल्या तिच्या भुवया अचानक नजरेत भरतात. काहीशा मुडपलेल्या. त्या भुवयांच्या आकृतीमधून तिचे अंतरंग प्रकट होत असल्याचा भास होतो. शांतपणा आणि चिंतातुरपणा यांचे अजब मिश्रण असलेला तिचा स्वभाव. आणि क्षणात सारे काही लख्ख कळल्याची जाणीव होते. 

हा कळण्याचा क्षण काळजाचा ठोका चुकवणारा असतो. कारण हे कळणं पाऱ्यासारखं निसटून जातं, हाती काहीच लागत नाही असा आतापर्यंतचा अनुभव.

आणि काय कोण जाणे, तिचं असं डोळे मिटून घेणं मला नेहमीच अस्वस्थ करतं.  घाबरून घुटमळल्यासारखं होतं ना होतं तोच ती पटकन डोळे उघडेल आणि बोलून जाईल “कळणं ही गोष्ट तर चांगलीच आहे ना.”

हीच का ती व्यक्ती असं वाटण्याइतकी ती वेगळी भासेल.

केवढा सहज साधा स्वभाव, कोणालाही आवडेल असा, एकदम गुणी. माझं विचारचक्र सुरू होतं. आणि मी ? माझ्यात काय गुण आहेत? मी निरुत्तर होतो. माझं मलाच ओशाळल्यासारखं वाटतं. 

आज रात्री तिला भेटायचं ठरलं होतं. पण हे भेटणं मला नकोनकोसं वाटत होतं. हल्ली तिला भेटल्यावर तिला काही बोलायचं आहे, वेगळंच सांगायचं आहे असं वाटत राहतं. 

आज रात्री नऊ वाजता भेटू.. नेहमीचे  दुकान.. तिच्याकडून निरोप आला. खरं तर ते दुकान आठ वाजताच बंद होत. ‘नऊ वाजता’ मध्ये सूचक अर्थ दडला होता.

जमणार नाही सांगण्यासाठी फोन केला पण तिने उचलला नाही. फोन मधुर आवाजातली टेप वाजवत राहिला. ज्यावेळी ती कामावर येत नाही त्यावेळी ती कुठे असते, काय करते, मला अजिबात कल्पना नव्हती.  शेवटी इलाज नाही म्हणून भेटायला बाहेर पडलो.

अंधारलेला निर्मनुष्य रस्ता होता.  शरदाचा वारा तनामनाला भिडत होता. वळणं घेत घेत पुढे चाललेल्या रस्त्यावर आकाशातील तोच चंद्र प्रकाशाचे शिंपण घालत होता. स्वच्छ सुंदर वातावरण. काळही थिजून राहिला होता. भरकटणारे विचारपण हवेच्या झुळुकीबरोबर दूर वाहून जात आहेत असं वाटत होतं. इमारतीमध्ये शिरलो तर तिथे अंधार दाटून राहिला होता.

अपेक्षेप्रमाणे दुकान बंद होतं. आणि तीही बाहेर थांबलेली नव्हती. दुकानाच्या मागच्या अंगाला विलायती वस्तूंचे दुकान तर पुढच्या अंगाला कॉफी शॉप होतं. 

सीमारेषा धूसर होत विरघळत जाणाऱ्या गोष्टी मला भावतात.  दिवस आणि रात्र यांचा संधिकाल…काचेच्या बशीत पसरत जाणारा सॉस आणि कॉफी शॉपपर्यंत पसरलेल्या विविधरंगी विलायती वस्तू. तिच्या प्रेमात असल्याची ही जादू.  ती मला संध्याकाळच्या चंद्रकोरीप्रमाणे भासायची.  धुसर.. विझू विझू पाहणारी.. फिकट निळसर रंगाची छटा असलेल्या पांढुरक्या प्रकाशासारखी.

जवळ जाऊन दुकानाच्या पायऱ्यांवर कोणी आहे का ते बघितलं. पण ती तिथेही नव्हती.

तेवढ्यात तिच्या आवाजातील हाक ऐकू आली.  काहीशी गूढ आणि घुमल्यासारखी.. जणू काही त्या जगातून या जगात दिलेली हाक नकळत नजर वर गेली. काळोख्या वातावरणात पांढऱ्या शुभ्र खुर्च्या आणि टेबलं तरंगत असल्याचा भास आणि काचेच्या पलीकडून हाक मारणारी तिची धूसर आकृती.

तिने हसत हसत हाताने खुणावलं आणि जडशीळ असा काचेचा दरवाजा माझ्यासाठी उघडला.

“तू कशी काय आत शिरलीस?” मी विचारले.

“दुकान मालकाला विनंती करून किल्ली घेतली.”  ती म्हणाली.

 मी दुकानात शिरलो. एखाद्या वस्तू संग्रहालयासारख्या हारीने वस्तू मांडून ठेवल्या होत्या. शांततेमध्ये पावलांचा आवाजही घुमल्यासारखा येत होता. नेहमीचं दुकान आहे असं वाटतच नव्हतं.  दुपारच्या वेळेचा गडबड गोंधळ, जिवंतपणा, त्यातला प्राणच काढून घेतलेल्या कलेवराप्रमाणे. आम्ही एका टेबलावर आमने सामने बसलो.

फ्रीज उघडून तिने ज्यूस एका ग्लासमध्ये ओतला. 

“अगं, असं स्वतःचंच दुकान असल्यासारखं वागून कसं काय चालेल?”  मी विचारलं.

“तू नको काळजी करू.  मी बोलून ठेवलं आहे मालकाला.” तिने काउंटर पलीकडून उत्तर दिले.

“दिवे लावले तर नाही का चालणार?” भोवतालच्या काळोखाने मी अस्वस्थ झालो होतो.

“अरे असं कसं चालेल? मग बाकीची माणसंपण दुकानात येऊन बसतील की,”  ती म्हणाली.

“थोडक्यात काय.. अंधारातच बसायचंय तर,” मी म्हणालो.

“काय हरकत आहे.. छानच वाटतंय की”, असं म्हणून तिने सफाईदारपणे ज्यूसचा ग्लास माझ्यासमोर धरला.

“बिअर नाही का मिळणार?”, मी विचारलं.

“अजून तुझं डोकं उतरलेलं नाही”, ती बोलली.

“तुला कसं कळलं?” मी आश्चर्याने विचारलं,  “मी बोललो का तुला?”

“फोनवरच्या आवाजावरून कळलं”, ती खुसुखुसु हसत म्हणाली.

मलाही मोकळं वाटलं.

“पण आता रात्र झाली आहे. मला वाटतं की बिअर घ्यावी”, मी म्हणालो.

“हरकत नाही.” असे म्हणून तिने फ्रीजमधून बिअर बाहेर काढून मला दिली.

आज काहीतरी वेगळीच हुरहुर जाणवत होती.  तिच्या चेहऱ्यावर सतत मंद हास्य होतं.  तिच्या पावलांचा आवाज दूर दूर पुसट होत गेल्याचा भास मला झाला. मनात शंकेची पाल चुकचुकली. 

काळोखाच्या राज्यात ती बिअर काही खास वाटत नव्हती. काहीतरी अति थंड.. जणू उत्तर ध्रुवावर बसून पितोय असं वाटलं. कालच्या नशापानाचा अंश शरीरात होताच त्यात ही थंड  धुके  दाटलेली उदास रात्र ..सरसर नशा  चढत गेली. 

“मी पुढच्या महिन्यात एका शिबिराला जाणार आहे”,  ती म्हणाली.

“आता हे काय नवीन?”  मी विचारलं. 

“अरे माझी एक मैत्रीण आहे. काय काय घडलं तिच्या आयुष्यात.  बिचारी खूप दु:खी असते.  तिनंच शोधून काढलं  आहे  हे शिबिर. म्हणजे जरा अतिरेकी प्रकार आहे. म्हणून माझ्याबरोबर तूही येशील का असं विचारत होती.”

“अतिरेकी?”, मी विचारलं.

“असं ऐकलंय की डोकं आतून एकदम साफसूफ होतं. ते नेहमीचे क्षमतांचा विकास किंवा ध्यानधारणा प्रकारातील नाहीय पूर्णपणे  शून्यावस्थेला पोहोचायचं.. बर्‍याच अनावश्यक गोष्टी कायमसाठी विसरून जायच्या.. असं काहीतरी..”

“इंटरेस्टिंग वाटतंय ना?”,  तिने विचारलं. 

“मला नाही वाटलं इंटरेस्टिंग.  हे आवश्यक अनावश्यक नक्की कोण ठरवणार?” 

“हुं..तो जुगारच आहे म्हणा.  असं असत ना की अमुक अमुक गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत असं आपणंच आपली समजूत करून घेतो. अशा गोष्टी विसरणं  असावं.”

“म्हणजे आपला जीव ज्यात गुंतला आहे त्या साऱ्या गोष्टी  का?”

“अरे, तसंच असेल असंही नाही. सगळंच  फार टोकाचं आहे पण  माझ्या मैत्रिणीचा घटस्फोट झाला आहे.. फार खचली आहे त्याने. आणि तिला ते सगळं विसरायचं आहे. पण मलाही नाही वाटत की ती हे विसरू शकेल”, ती बोलत होती.

“कशाला चालली आहेस तू.. नको ना जाऊस.”  मी म्हणालो.

“आता असं एकटं नाही पाठवता येणार तिला. माझं बोलणं झालं आहे तिच्याशी,” ती म्हणाली. “आणि मलाही उत्सुकता आहे.  गेल्याशिवाय कसं कळणार, काय काय चांगलं आहे ते?”

“ते सगळं विसरून जाणं वगैरे.. मला नाही पटत.” मी म्हणालो.

“अरे, न आवडणाऱ्या गोष्टी विसरता आल्या तर काय हरकत आहे?”

“सगळे स्वतःच ठरवत आहेस तू”

“ठीक आहे पण..” तिने डोळे मिटले आणि मनातील गोष्ट शब्दात कशी मांडायची याचा क्षणभर विचार केला.

“कमीत कमी तुला तरी मी विसरणार नाही.”

“हे तुला कसं कळलं आधीच?” 

“मला कळतं.. बस्स.” 

ती हसत असं बोलत होती पण तिच्या काळजात दडलेली अजून एक धास्तावलेली ती मला स्पष्ट दिसत होती. नव्हे, ऐकूच येत होती.

“तुला विसरण्याचा विचार जरी आला ना, तरी.. तरी असा विचार करणाऱ्या मलाच मला विसरून जायचं आहे.”

हे तिच बोलणं काळजाला चाटून गेलं आणि तिला समजावणं मी थांबवलं.

“आपल्या दोघात दोघांत घडलेलं सर्व काही विसरू शकतेस हां तू”, मी हसून म्हणालो.

“हजारो सालोंका सबकुछ?” ती पण हसली. 

ती असं बोलायला लागली की तिच्या उत्साही पण मनाचा तळ गाठणाऱ्या आवाजामुळे क्षणभर ती बोलते तेच सत्य असं वाटत. वाटतं  खरंच हजारो वर्षांपासूनच आपलं प्रेम असेल का?

“आपण पहिल्यांदा सहलीला गेलो होतो ती गोष्ट”

“त्याला १९ का काहीतरी वर्ष झाली ना?”

“हो, आपण त्या पथिकाश्रमात राहिलो होतो. आणि ती खवचट मालकीणबाई म्हणाली होती की तुमची बायको फारच लहान दिसते.”

“तेही आपल्या वयात फारसा फरक नसताना.”

“तू वयाच्या मानाने मोठा वाटायचास. तिथली खोली फार प्रशस्त होती आणि छत फार काळोखे होते. मला खूप भीती वाटत होती.”

“पण आपण बाहेरच्या बागेत फिरत होतो तेव्हा काय सुंदर चांदण्यांनी फुललेली रात्र होती.”

“गवताचा गंध वातावरणात होता”

“तुझे त्या वेळचे केसपण मला आठवले.  छोटे होते.”

“त्यानंतर आपण फुतोन* अंथरून झोपी गेलो”

“हो”

“तू मला काहीबाही बोलून घाबरवत होतास. त्यामुळे एकटीने ओनसेन** वर जायला पण मी तयार नव्हते.”

“मग आपण दोघे गेलो होतो.”

“तिथे तू मला मिठी मारली होतीस.”

“हो, आजूबाजूला जंगलासारखे होते.”

“आणि आकाश चांदण्यांनी बहरलं होतं. अजूनही मन तिथेच रेंगाळत आहे.”

“मग हे जिवंत मरणासारखेच आहे.” मी उद्वेगाने म्हणालो.

“काय..कशाबद्दल बोलतोस तू?”

“हेच ते.. सारे विसरून जाणे वगैरे.”

“नको ना असं बोलू. फार वाईट वाटतं मग.”

” ‘One Flew Over the Cuckoo’s Nest’ या चित्रपटातील  नायकासारखं. आगीतून फुफाटयात.”

“रॉबर्ट टॉम ना तो?”

तिने डोळे मिटून घेतले. 

“फक्त नको असलेल्या गोष्टी विसरून जायच्या आहेत.”

“म्हणजे माझ्याबद्दलच्या का?”

“नाही रे, नको असलेल्या गोष्टी नक्की कोणत्या तेच मला समजत नाहीये.”

“निघू या का.. थंडी वाढली आहे. आणि फारच गंभीर गंभीर वाटतंय.” 

“अशा बसक्या आवाजात बोललं की फार महत्त्वाचं बोलणं चालू आहे असं वाटायला लागतं ना? चल आपण जरा दुकानात फेरी मारू.”

आम्ही दुकानात एक चक्कर मारली.  मांडणीवर  विलायती वस्तूंचे जणू प्रदर्शनच मांडले होते. एकावर एक रचलेले काचेचे कप लोलकाप्रमाणे चमचमत होते. दिवसा हे दुकान फारच सामान्य वाटतं.  आत्ता काहीतरी या रात्रीची जादू होती.

आम्ही दुकानातून बाहेर पडलो.  स्वतःचं घर असल्याप्रमाणे कुलूप लावलं.  बाहेर पाऊल टाकल्यावर वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली आणि थिजलेला काळ परत वाहता झाला.

“अजून थोडं प्यायला जाऊ या का?”

“चालेल की.”

मला अचानक हलकं वाटायला लागलं.

“मला कशात न कशात तुझ्या खुणा दिसतील आणि तुझी आठवण येत राहील,” चालता चालता ती बोलायला लागली. “अगदी विसरले असं म्हटलं तरी आठवण ही येणारच.”

“कशात ना कशात म्हणजे?”

“अरे, आपण खूप काही एकत्रच अनुभवलंय.  खाणं-पिणं, मौज मस्ती आणि बरंच काही.  त्यामुळे या जगातल्या कोणत्याही दृश्याच्या चौकटीत तुझे अस्तित्व मला जाणवेलच. जाताजाता दिसलेलं तान्हुलं  बाळ.. फुगू साशिमच्या (जपानी खाद्यपदार्थ) पारदर्शी बशीवरील नक्षी.. उन्हाळ्यातील फटाक्यांची रोषणाई.. संध्याकाळचा समुद्र..  ढगाआड लपलेला चंद्र.. काहीही पाहिलं तरी तुझीच आठवण.  टेबलाखाली कोणाच्या पायाला पाय लागून सॉरी म्हणताना.. एखाद्या भल्या माणसाने पडलेली वस्तू उचलून दिल्यावर थँक्यू म्हणताना.. जख्खड म्हातारा थरथरत चालत येताना.. रस्त्यावरील कुत्री, मांजरी.. उंचावरून दिसणारा नजारा.. स्टेशनवर उतरून चालताना..  उबदार वारे चेहऱ्याला स्पर्शून जाताना.. मध्यरात्री फोन वाजला तर.. दुसरे कोणी आवडायला लागले तर.. त्याच्या रेखलेल्या भुवयांमध्ये.. चोहीकडे तुझ्याच साठवणी, तुझेच भास.”

“म्हणजे, जे जे जगी जगते.. त्या सर्वांतच माझा अनुभव..  नाही का?”

“नाही,” तिने क्षणभर डोळे बंद केले नंतर पारदर्शी नजर थेट माझ्यावर रोखून म्हणाली, “जगात अस्तित्वात असलेल्या गोष्टी?  त्यांचा काही संबंधच नाही इथे.  हे तर सारे माझ्या मनाच्या रंगमंचावरील नाट्य आहे.”

“हेच ते तुझे माझ्यावरचे वेडे प्रेम.  नाही का?” मी विस्मयाने विचारले.

अगदी त्याच वेळी..  क्षणभर काय घडले ते कळलेच नाही.  वीज कोसळल्याप्रमाणे आधी प्रकाश दिसला मग आवाज आला. समोरच्या इमारतीच्या वरती काहीतरी चमकले आणि मग आगीचा लोळ दिसला. आवाज होऊन काचेच्या ठिकर्‍या हवेत उडून संथ गतीने अंधारात जमिनीवर विसावल्या. 

काही सेकंदातच निद्रिस्त शहराच्या कानाकोपऱ्यातून माणसं गोळा झाली,  दुरून पोलिसांची गाडी आणि अग्निशामक दलाचा भोंगा वाजला. 

“बॉम्ब स्फोट झाला असावा.” मी उद्दीपित होऊन म्हणालो.

“प्रत्यक्ष घडताना आपण फक्त बघितला.  फार कोणाला काही लागलं नसेल ना?”

“नसावं, इमारत काळोखी होती आणि जाणारं येणारं पण कोणी नव्हतं.. विशेष काही घडलं नसावं.”

“तसं असेल तर ठीक आहे.  पण बघितलं ते खूप सुंदर दिसलं. अग्निफुलांच्या रोषणाईप्रमाणे.”

“हो जबरदस्तच होतं.”

“खरंच रे.”

ती अजूनही आकाशाकडे बघत होती. 

मी तिच्याकडे बघत असताना माझ्या मनात आलं की तुझ्या माझ्या दृष्टीमध्ये थोडासाच फरक आहे. तू जेव्हा डोळे मिटून घेतेस त्या क्षणी साऱ्या विश्वाचे केंद्र तुझ्या ठायी एकवटते. या अनंत विश्वाच्या गाभाऱ्यात तुझी मूर्ती कणरूप झालेली मला दिसते.  केंद्रस्थानी तू आणि बाजूला अफाट वेगाने पसरत जाणारा विश्वाचा पसारा. माझा भूतकाळ, अगदी माझ्या जन्मापूर्वीच्या गोष्टी,  माझा सारा लेखन-प्रपंच, आतापर्यंत मी बघितलेले सर्व देखावे, तारकापुंज, निळी वसुंधरा आणि तिला वेढणारे काळोखे काळे अंतराळ.  विराट विश्वरूप दर्शन.  आनंदाने मी वेडापिसा होतो.

पण तू डोळे उघडल्यावर सर्व काही लोपून जाते. तुझे ते विचारात गढून जाऊन डोळे मिटणे मला हवेहवेसे वाटते.

आपल्या दोघांची दृष्टी परस्पर विरोधी आहे. तरी आपण मात्र परस्पर पूरक आहोत.  अनादी काळापासून नर-नारी,  आदम आणि इव्ह यांच्यामधील आंतरिक ओढीचे प्रतीक. स्त्रीला एकच रूप अनेक रूपात विलसताना दिसते तर पुरुषाला अनेकत्व एकाच रूपात विलीन होताना दिसते.  प्रेममय युगुलाच्या अनुभवाला असा साक्षात्कारी क्षण येतोच येतो. 

सहअस्तित्वाची ही अतूट वीण चिरंतन आहे. DNA सारखी, आकाशगंगेच्या विराट व्याप्तीसारखी.

ती माझ्याकडे पाहून अस्फुट हसली आणि दाद दिल्यागत बोलली.

“नितांत सुंदर.. अविस्मरणीय.. खरंच मी आजन्म विसरू शकत नाही.” 

*जपानी अंथरूण
** गरम पाण्याच्या झरा


About Global Villager Challenge

Flatworld Language Solutions is based in Pune and working in language services since 2013. The company works in and provides major language services like translation, interpretation, coaching, and corporate training. Team FLS is a group of focused, inspired, and driven professionals who are headed to give foreign language learning a whole new perspective.

In addition to this FLS Comes up with different language-related initiatives. The vision and thought is to Open various avenues of careers for the future as well as present India and to initiate and improve the ‘World Readiness’ of the youth of the nation. 

Global villager Challenge is a very important initiative amongst various initiatives. This is a literature translation competition where the enthusiasts and students have to translate literary texts to Marathi from foreign languages. The students, enthusiasts, and professionals knowing would love to be a part of this competition. This competition gives the language professionals a break from their routine translation work and students or enthusiasts get to know another aspect of their language. 

This is the fifth year of this competition. The response and the participant number is growing every year. English, French, Russian, German, and Japanese are the language categories for this year. Every year we come up with a specific theme for the contest. This year’s theme was literature written by female authors around the world. 

As the competition is online, anyone from all over the world with knowledge of the Marathi language can participate in the competition. 

The competition started on the 8th of August. Our Judges are usually senior fellows working in respective language areas for more than 15 years. This year Sunil Ganu sir was the Judge for the English language category. Dhanesh Joshi was the judge for the German Language Category. Anagha Bhat mam was the Judge for the Russian Language Category; Nandita Wagale was the judge for French Language Category and lastly, Swati Bhagwat mam was the judge for the Japanese Language Category. Judges have all the discretion, right from selecting the texts to selecting the right criteria for examination. 

Following are the winners of the contest: 

1. Satish Kawathekar: German 

2. Manisha Sathe: Japanese

3. Supriya Shelar: English

4. Bhagyashree Kulkarni: Russian

5. Mugdha Kale: French  

Following are the runners up of the contest: 

1. Anvaya Sardesai: German 

2. Snehal Deshpande: Japanese

3. Priyanka Shejale: English

4. Pranali Shinde: Russian

5. Dnyaneshwari Khade: French  

चित्र सौजन्य: किरण मुणगेकर

मनीषा साठे पुण्यात वास्तव्यास असतात. गणित विषयात बी. एस्सी. केले असून जपानी एन२ पातळी पार केली आहे. जपानी भाषा शिक्षक आणि अभ्यासक म्हणून कार्यरत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *