सकाळचा स्वयंपाक आटपून ती उरलेल्या कामांना लागली. “लई खराब झालीय भिंत, साफ करून टाकतेच उद्याला..” स्वतःशी पुटपुटत तिनं हातात झाडू घेतला. अख्खं घर तिने सावकाश प्रेमाने झाडून पुसून लख्ख केलं. मग मोर्चा भांड्यांकडे आणि कपड्यांकडे वळवला. घड्याळात दुपारचे बारा वाजून गेले होते. घर आता फारच सुंदर आणि प्रसन्न दिसत होतं. स्वच्छ आंघोळ केल्यासारखं. ह्या वेळेची ती रोज आतुरतेनं वाट बघायची. खिडकीतल्या सदाफुलीला तिनं प्रेमाने पाणी घातलं. सैल झालेली साडी नीटनेटकी करून तिने चहाचं आधण ठेवलं. एक प्रकारची नीरव शांतता पसरली होती. दीर्घ श्वास घेऊन ती शांतता स्वतःत आटोक्याने साठवून ठेऊ लागली. चहाचा कप हातात घेऊन एका कोपऱ्यात खाली शांतपणे बसली. एक नजर घड्याळाकडे होतीच. रंग्या आता उठला असेल आणि कामाला जायच्या तयारीत असेल. तिचं अंदाज बांधणं सुरु झालं. डॉक्टर वैनी आल्या की निघू, , असं तिने मनाशी ठरवलं.
“अरे शेवंती, तू अजून आहेस वाटतं! बरं झालं बाई, जरा मला हे सामान लावायला मदत कर.”
डॉक्टर वैनी घरी प्रवेशल्या आणि शेवंतीला बघून मनापासून हसल्या. त्यांच्या हातातल्या जड पिशव्या उचलायला शेवंती लगबगीने उठली.
चला, तासभर तरी अजून राहता येईल हितं, शेवंतीला थोडं हायसं वाटलं. एक खरंखुरं कारण मिळालं घरी उशिरा जायला.
तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. नेहमीसारखा.
“कुठं हायेस?”
रंग्याचा आवाज ऐकून शेवंतीच्या पोटात खड्डा पडला. नेहमीसारखा.
“वैनींकडेच आहे अजून, जरा जास्तीचं काम पडलं बघा. येतेच मी..”, शेवंती चाचरत बोलू लागली.
“हल्ली भारी कामं देतात का ग वैनी तुला? काय चाललंय तुझं..”
“हो ना..काय करू..” शेवंती आवंढा गिळून बोलायचा प्रयत्न करू लागली.
“ये लवकर, मला बाहेर जायचंय जेवून..”
शेवंतीचा फिका पडलेला चेहरा पाहून वैनींनी तिचा हात हातात घेतला.
“शेवंते, तुला माहित्ये ना की तू आमच्याकडे राहू शकतेस काही दिवस तरी?”
*
आतापर्यंत शेवंतीने कित्येक दिवस आपल्या मैत्रिणीच्या घरी घालवले होते. काही वेळा तर रात्री अपरात्री गेली होती, रंग्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी. पण काही दिवसांनी मन परत त्याच्याकडे आणि घराकडे ओढ घेई. त्यालादेखील कमी माया नव्हती तिच्याबद्दल. किंबहुना तिला तरी तसं वाटायचं.
एक दिवस घरमालक आले होते चौकशी करायला.
“काय शेवंती, काल मोठी पार्टी झाली वाटतं रात्री! शेजारचे कदम म्हणत होते रात्रभर आवाज येत होता जोरात. त्याचं काय आहे, मजा करा तुम्ही, पण जरा हळू. उगाच दुसऱ्यांना त्रास कशाला? शेवटची वॉर्निंग आता. नाहीतर..”
शेवंती ओशाळं हसून म्हणाली, “अहो, गटारी होती, यांचे दोस्त लोक आले होते बायकांबरोबर, जरा जास्तच गोंधळ घातला बघा..नाही होणार परत.. “
घरमालकाच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्टपणे दिसत होता पण तो पुढे काही बोलला नाही. जाताजाता त्याचं लक्ष दारात लावलेल्या सदाफुलीकडे गेलं. ती पार कोमेजून गेली होती. “काळजी घ्या..झाडांची.”
दुसऱ्या दिवशी तिनं ते झाड वैनींकडे आणून ठेवलं.
“राहूदे हे रोपटं हितं? घालत जाईन मी पाणी रोजच्याला..माझ्या घरी मी कधी असेन, नसेन काय भरवसा..”
*
तशी वेळ आलीच काही दिवसांत.
रंग्याचा हात मुलांवर वरचेवर पडायला लागला तेव्हा तिनं ठरवलं कि आपल्या पोरांना ह्या अश्या घरात दिवस काढायला लावायचं नाही. एक दिवस तिनं त्यांना दिलं पाठवून गावी साताऱ्याला आजी आजोबांकडे. नाहीतरी कोरोनामुळे शाळांना सुट्टी असल्यासारखंच होतं. रात्री घरी आल्यावर रंग्याला समजलं तेव्हा तो थोडासा खजील झालेला दिसला. पण शरमेची जागा लागलीच अनावर संतापाने घेतली. शाळेविना पोरं नुसता दंगा करतात म्हणून गावी पाठवलं असं त्याला समजवायचा तिनं आटोकाट प्रयत्न केला पण..
दुसऱ्या दिवशी तांबडं फुटतंय तोच शेवंती गाठोडं घेऊन डॉक्टर वैनींकडे.
ती कायम निघायच्या तयारीत असायची – २ साड्या, ब्लाउज, एक पंचा, अंतर्वस्त्रे, थोडे पैसे. गेली जवळजवळ तीन वर्षं तिनं रोज ह्याच भयाच्या सावटाखाली काढली कि आज काय नवीन झेंगट उपटणारे. तिच्यासाठी घर ही एक गरज नाही तर स्वप्न बनून राहिलं होतं.
*
शेवंतीला रंग्या डॉक्टर वैनींकडे पहिल्यांदा घेऊन आला होता तेव्हा ती अगदी पोरसवदा होती. बारावी पास होऊन नुकतंच लग्न केलं होतं रंग्याशी. रंग्याने वैनींना शेवंतीला नोकरी द्यायचं आर्जव केलं. तेव्हापासून नवरा बायको एकत्र काम करू लागले दवाखान्यात. रंग्या कंपाऊंडर होताच. शेवंती साफ सफाई करू लागली. ती आपलं काम जेवढं मन लावून करायची, रंग्या तेवढं कटकट करत. लवकरच ती वैनींच्या घरीसुद्धा काम करू लागली. काही वर्षांनी रंग्याने दवाखान्यातलं काम सोडलं आणि तो एका मित्राबरोबर केटरिंगच्या व्यवसायात लागला.
वैनींना नाही म्हटलं तरी शेवंतीचा लळा लागला होता. त्यांची मुलगी सुप्रिया अमेरिकेत वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी गेली होती. त्यामुळे घरात निर्माण झालेली एक पोकळी भरून काढायचा भाबडा प्रयत्न त्या करू पाहत होत्या. शेवंती घरी आल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांची मनीमाऊ येऊन तिला बिलगली होती. साहेब देखील खूष होते शेवंतीच्या कामावर. “देवांची भांडी घासावीत ती फक्त शेवंतीनेच!”
एकदातर कमालच झाली. पावसाळ्याचे दिवस होते, शेवंती वैनींकडे आली ती नेहमीपेक्षा खूप उशिरा आणि चिंब भिजून. तिच्या साडीची पुरती वाट लागली होती. दुपारचे तीन उलटून गेले होते आणि जेवायची वेळही. वैनींनी शेवंतीला कोरडी साडी नेसायला दिली आणि गरम गरम खिचडी करून वाढली मायेनं. वैनींचं घर तिच्यासाठी एक उबदार घरटं झालं होतं. खिडकीतली सदाफुली जिवंत होती, बहरलेली नसली तरी तगून होती.
*
शेवंती चाळीच्या पायऱ्या चढून वर जाऊ लागली तसे तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. आज बहुतेक काहीतरी बिनसलंय असं तिला वाटून गेलं. रंग्या होताच तिची वाट पाहत.
“किती उशीर! तुला बोललो व्हतो ना, की मी संजूकडे जाणारे? दोन घास तरी बनवशिल की नाही? आधीच सगळा धंदा बसलाय भोसडीच्या कोरोनामुळे, त्यात तुझी रोजची नाटकं..” रंग्याची टकळी सुरु झाली.
“अहो, झाला उशीर थोडा, संजू काय घोड्यावरून आलाय व्हय..” नकळत शेवंतीचा आवाज चढला. तिचा धीर हल्ली सुटायला लागला होता.
“ए, आवाज कुणावर चढवते ग?” रंग्याचे डोळे विचित्र तऱ्हेने चमकायला लागले.
शेवंतीची नजर आपोआप दिवाणाखालच्या गाठोड्याकडे गेली. दीड खोल्यांचं घर एक असहाय्य्य आणि मूक साक्षीदार बनून उभं होतं..
दुसऱ्या दिवशी सकाळ होते तोच शेवंतीनं संजूला फोन लावला आणि तिचा कापरा आवाज ऐकून संजू लगेच घरी हजर झाला रंग्याला आपल्या घरी घेऊन जायला. नशिबाने रंग्या त्याच्याशी हुज्जत घालायच्या स्थितीत नव्हता. रात्रभर आदळआपट करून तो दमला होता. दर पंधरवड्यातून एकदातरी अशी वेळ हमखास येत असे. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं होतं खरं.
ते दोघे घराबाहेर पडल्यावर शेवंतीनं दरवाजा घट्ट लावून घेतला. रिकाम्या, सुन्न घरावरून तिने एक नजर फिरवली. आत्ता ह्या क्षणी घर फारच सामान्य आणि ओंगळवाणं दिसायला लागलं होतं. हे घर आधीपासूनच असं होतं थोडं वंगाळ.. का आत्ता अशी हालत झालीय? ते प्रेमबीम काय म्हणतात सिरीयलमध्ये, ते गायब झाल्यामुळं.. विचार करत शेवंतीने ह्यावेळी गाठोडं नाही तर एक बॅगच भरली.
आणि ती घराबाहेर पडली.
*
स्वयंपाक होत आला होता. दुपारचा एक वाजायला आला होता. आज शेवंतीनं जरा जास्त वेळ घेतला, कामाला दोन हातांऐवजी एकच हात होता. दुसऱ्या हाताला बँडेज होतं. नेहमीची धुणीभांडी केल्यानंतर स्वयंपाकघराची भिंत स्वच्छ केली आणि ते बघून तिचं तिलाच बरं वाटलं. नीरव शांतता आता तिच्याशी बोलू लागली. काय झालं नेमकं काल? आणि का? आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला एक कडक चहा मदत करेल असं वाटून तिने चहाचं आधण ठेवलं. किचनच्या ट्रॉलीला टेकून बसली पसरून. एक एक क्षण आठवू लागली कालचा. तिच्या आत्ता कुठे लक्षात आलं की काल जे थैमान घडलं तेव्हा रंग्या नेहमीसारखा दारू प्यायला नव्हता. ती मनोमन चरकली. खाड्कन सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येऊ लागले. ती हे आठवायचा प्रयत्न करू लागली की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनात रंग्याविषयी भीती कधी घर करायला लागली, कधी पोटात खड्डा पडायला लागला, आणि हौसेपोटी सजवलेलं छोटंसं घर भयंकर काळकोठडीसारखं कधी वाटू लागलं..
पहिला दिवाळसण होता शेवंतीच्या माहेरी. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. घरी नातेवाईकांची ही एवढी गर्दी झालेली, शेवंतीच्या सख्ख्या, चुलत भावंडांचा हा एवढा कल्ला सुरु होता. जावईबापूंचे हट्ट पुरवायला काही कमी ठेवली नव्हती शेवंतीच्या आईबापाने. शेवंती खूपच खूष आणि माहेरच्या मंडळींच्या कोड कौतुकामुळे हरखून गेली होती. पण रंग्याच्या मनास काही रुचत नसावं बहुतेक, कारण त्याचं लक्ष सतत गणेश वर होतं. गणेश, शेवंतीचा चुलत मामेभाऊ, ज्याच्याबरोबर ती शाळेत एकत्र शिकली आणि एकत्र दंगामस्ती करत मोठी झाली. इतर भावंडांच्या मानाने गणेशशी असलेली तिची जवळीक रंग्याला जरा जास्तच वाटून गेली.
त्या रात्री रंग्याने शेवंतीला त्याबद्दल फटकारलं. शेवंतीला हसावं कि रडावं काहीच उमगेना. आधी तिला थोडी मजाच वाटली. आपलं माणूस म्हटल्यावर अश्या प्रकारचे रुसवे फुगवे चालायचेच. पण रात्र उलटून गेली, तांबडं फुटायला आलं तरी रंग्या काही ऐकून घेईनाच. ज्याच्याशी आपण इतक्या आनंदाने, विश्वासाने लग्न केलं, ज्याला आपलंसं केलं, त्याने असे संशय घ्यावेत? मी त्याला जीवाचा आटापिटा करून का समजावू जर माझ्या प्रत्यक्ष वागणुकीचा, माझ्या त्याच्या विषयीच्या प्रेमाचा, आपुलकीचा अर्थच त्याला समजत नाहीये, हा प्रश्न तिला पडलेला तिला आठवलं. पण तो प्रश्न तिने लगेच मोडीत काढला होता कारण ज्या अर्थी रंग्या इतक्या रागाने बोलतोय ह्याचा अर्थ माझीच चूक झाली असणार, माझ्याच प्रेमात काहीतरी कमी असणार असा अर्थ तिने लावला होता. मग त्यानंतर ती कित्येक वर्ष स्वतःला, स्वतःच्या प्रेमाला, स्वतःच्या कर्तव्यदक्षतेला रंग्यासमोर झुंजवत राहिली, सतत सिद्ध करत राहिली. काळानुसार हे स्वतःला सिद्ध करायचे मापदंड अधिकाधिक क्लिष्ट आणि जाचक बनू लागले आणि काही वर्षांनी ते सर्वव्यापी झाले. पहिला दिवाळसण हि आपल्या स्वत्वाच्या अंताची सुरुवात होती हे शेवंतीच्या लक्षात आलं.
त्यानंतर असेच पण जरा वेगळ्या छटांचे शेकडो प्रसंग. तिचा आत्मसन्मान केव्हाच निकालात काढला होता रंग्यानं, पण आताशा तिच्या बुद्धीवर, विचारशक्तीवर रंग्याने प्रश्न करायला सुरुवात केली होती. छोट्या छोट्या गोष्टींची निवड करायला ती रंग्याला विचारायला लागली. त्यावरून रंग्याला तिच्यावर आगपाखड करायला आयतंच कारण मिळायला लागलं. रंग्या आहेच गरम डोक्याचा, आणि आपण असे येडे, वेंधळे, मग का नाही सटकणार त्याची. शेवंतीचं हे आवडतं वाक्य झालं होतं, माहेरच्यांशी, तिच्या मैत्रिणींशी बोलताना.
कोणी इतकं का अशांत आणि अतृप्त असावं, का कोणी इतकं हिंसक असावं कि त्याला काही फरक पडू नये कि आपलं सटकूपण आपल्या मुलांसमोर, शेजाऱ्यापाजाऱ्यांसमोर बाहेर पडतंय..आणि सर्वात महत्त्वाचं..मी काय त्याचं घोडं मारलंय कि त्याने मला इतकं वाईट वागवावं..
चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर शेवंतीला नवनवीन प्रश्न पडू लागले. असे प्रश्न जे तिला ओरडून सांगत होते कि आतातरी डोळे उघड आणि स्वतःकडे बघ. रंग्याला सोड त्याच्या नशिबावर. तू तुझं नशीब बघ.
तिला ते क्षण आठवू लागले जेव्हा तिला तिच्या मनाच्या सर्वात आतल्या एका अंधाऱ्या कोनाड्यातून क्षीण हाका ऐकू येत होत्या, प्रत्येक भांडणाच्या सुरुवातीला आणि मारपिटीच्या अखेरीला. त्या हाकांचा अर्थ तिला आता कुठे समजायला लागला. त्या हाका जणू तिला सांगत होत्या की घराच्या चार भिंतीत कसलं संरक्षण शोधत्येस तू? इथे तुझ्या स्वतःच्या मनाच्या घरात येऊन बघ. कोणाची हिम्मत आहे तुला तिथून हाकलून द्यायची? तू जी काही आहेस, ती स्वतः केलेल्या कष्टांमुळे. सोड त्याला मागे, आणि तू हो पुढं बिनधास्त..ह्या थंड भीतीला घालवून दे आणि कर ऊब निर्माण.
फोन वाजला. आणि वाजत राहिला. रंग्याचा होता. ह्यावेळी तिच्या मनात ना काहूर माजले ना चलबिचल झाली.
डॉक्टर वैनी आलटून पालटून फोनकडे आणि शेवंतीकडे पाहत होत्या.
“तू विचार केला आहेस का मी जे काही सांगितलं त्याचा?” डॉक्टर वैनींनी शेवंतीला विचारलं.
तिने होकारार्थी मान डोलावली.
वैनींने डॉक्टर साहेबांना फोन लावला.
“ठरवल्या प्रमाणे शेवंतीचं तिकीट काढून द्या संध्याकाळच्या साताऱ्याच्या गाडीचं. माझं आपल्या संस्थेशी बोलणं झालं आहे तिच्या कामा संदर्भात. ते तिची वाट बघत आहेत.”
*
दुपारी रंग्या वैनींच्या घरी येऊन तमाशा करून गेला होता. वैनी आणि साहेब निव्वळ पगार देणारे हात राहिले नसून तिची ढाल बनले होते. त्याला कोणी पत्ता लागू दिला नव्हता की शेवंती संध्याकाळी निघून जाणार आहे म्हणून.
जायची वेळ झाली.
शेवंती सावकाश उठली.
तिच्या डोळ्यांमध्ये शांतता होती.
छातीमधल्या भीतीची जागा आता विश्वासाने घेतली होती.
तिचं लक्ष बाजूच्या खिडकीकडे गेलं.
बहरायला आसुसलेली सदाफुली जणू काही तिच्याकडे अपेक्षेने पाहत होती.
ती घराबाहेर पडली सदाफुली सकट.
मनाच्या सर्वात आतल्या कोनाड्याकडे परतायला.
स्वतःच्या सत्त्वाकडे परतायला.
खुपच छान पद्धतीने भावना उलगडल्या आहेत..मस्त
अप्रतिम !
खूप दिवसांनी छान कथा वाचली
Keep it up👍