भालजी पेंढारकर केंद्राच्या सर्जनशाळेमध्ये आम्हा रंगकर्मींसाठी, प्रयोग-प्रक्रिया हा, लेखन-दिग्दर्शनाची प्रक्रिया आजमावता येणारा उपक्रम चालवला जातो. यापैकी चवथ्या प्रयोग-प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. चार महिने चाललेल्या प्रयोग प्रक्रियेने मला खूप काही दिले. सर्वप्रथम म्हणजे मनात ज्या काही प्रतिमा उमटल्या त्यांचा वेध घेणं आणि माणूस म्हणून त्यांना मूर्त करतानाचा आनंद लाभणं. नंतर विद्यार्थी म्हणून आपल्या मर्यादा जाणवणे आणि त्यांना ओलांडण्याची संधी मिळणे. सर्जनाची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी व्यवस्थापनाच्या अनेक गोष्टी शिकणे, जसं की नाट्यसंहितेच्या समजासाठी आपल्या संघात सहकार्य भाव निर्माण करण्याची गरज, वेळ पडल्यास व्यक्तिगत स्तरावर समुपदेशन आणि मर्यादित सामग्रीत जास्तीत जास्त परिणाम याच्याबद्दल भान येणे. या सगळ्या प्रक्रियेला मला पुराविद्याशास्त्रीय सर्वेक्षण म्हणायला आवडेल. लेखनाचा टप्पा मला उत्खननाचा वाटतो. आपल्या आयुष्यात मूल्य असणाऱ्या जागेचा शोध, ऐवजाची उपलब्धता तपासून; तत्त्व, मानवी भावभावना, प्रतिमा यांना खणून काढणे. आशयसूत्राची कथानका बरोबर बांधणी करणे, दिग्दर्शक म्हणून लेखकाला सापडलेल्या गोष्टी स्पष्ट करणे हेही एक प्रकारचे उत्खननच होते. यानंतर, कलाकारांना आशय अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळ्या परिप्रेक्षात काम करायला प्रवृत्त करणे, त्यानंतर नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत नाट्यघटकांमध्ये एकात्मता शोधणे, नाटकाचा पोत स्पष्ट करणे आणि अखेरीस एक आस्वाद्य प्रयोग सादर करण्याचा प्रयत्न करणॆ. प्रयोग-प्रक्रियेच्या अखेरीस होणारी चाचणी म्हणजे ज्या काही गोष्टी हाताला लागल्या त्याचे जे काही शिकलो त्याची परीक्षा. या प्रक्रियेमध्ये माझी विविध अंगांनी वाढ झाली असं वाटतं. पण आणखीन एक गोष्ट लक्षात आली की स्वतःच्या भावविश्वात फक्त रमणं या पलीकडे अजून बरंच काही मूल्य असू शकते, जे रूपांतरित करायची संधी मला या प्रक्रियेमुळे मिळाली. त्याचबरोबर स्वतः मधून जे काही प्रकट होतं त्याच्या फक्त प्रेमात न पडता त्याला सावधपणे बघण्याचा दृष्टिकोन मला या प्रक्रियेने दिला. माणूस म्हणून संयम बाळगणे, माणसांना समजून घेणे, ताणतणाव नाहीसे करून, एकाग्रता टिकून ठेवणे इ. कदाचित मागच्या सहाएक वर्षात जेवढं शिकायला मिळाले नसेल तेवढे या ह्या सहा महिन्यात शिकलो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही वाटते की मला या प्रक्रियेने नाटक शिकण्याची आणि करण्याची भूक दिली. माझा या प्रयत्नात पूर्णपणे समाधानकारक परिणाम जरी आले नसतील तरी मला एका गोष्टीचे नक्कीच समाधान आहे की प्रयोग प्रक्रियेमुळे माझी ही भूक अजून वाढली.
लेखन
नाट्यलेखन प्रक्रियेत, लेखकासमोर किती आव्हान असतात हे मला स्पष्ट झाले. मला सगळ्यात जास्त आव्हानात्मक वाटलं ते म्हणजे आशय नाटकाच्या माध्यमातून पोहोचवणे. जे काही मला म्हणायचं आहे शब्दांमध्ये उतरत आहे का नाही हे पाहणे. पहिला दोन खरड्यांमध्ये अजिबातच साधले नाही. या दोन्ही खर्ड्यांमधे पात्रे केवळ थेटपणे, भाषण केल्यासारखी आशय बोलून दाखवत होती. त्यांना स्वतंत्र स्वभाव प्राप्त झालेले नव्हते. दोन्ही खरड्यांमध्ये स्वरूप आणि कथानक वेगवेगळे होतं. शेवटच्या खरड्यांमध्ये आशयाला अनुसरून थोडफार नाट्य सापडलं असे मला वाटते. या दरम्यान माझ्या मार्गदर्शकांसोबतच्या चर्चा मला लाभदायक ठरल्या. अनेकदा संपूर्ण पुनर्विचार ही करावा लागला. हे लक्षात आलं की नाटकातली मज्जा आणि त्याचं म्हणणं एकत्र आलं पाहिजे, फक्त एकावर भर देऊन चालणार नाही. या टप्प्यावर आल्यानंतर Textual analysis चे महत्त्व कळाले. नाट्य अवकाशात गोष्ट कशी मांडायची हे समजले, लेखन किती गुंतागुंतीची प्रक्रिया होऊ शकते याची कल्पना आली. अजून खर्डे करण्याची आवश्यकता मला वाटली. आपल्याला जो विषय मांडायचा आहे त्या विषयाबद्दल अजून चिंतन करण्याची गरज भासली. जेणेकरून ज्या काही नाट्यप्रतिमांच्या शक्यता आहेत त्यांना आशयाला अनुसरून चिन्हांकित करणे शक्य होईल. नंतर बऱ्याच गोष्टी काढून टाकाव्या वाटल्या ज्यांचा अनपेक्षित किंवा संभ्रमात टाकणारा परिणाम होत होता. किंवा अश्या गोष्टी ज्या निव्वळ गंमत निर्माण करत होत्या पण त्यांचं काही म्हणणे नव्हते. नाटकातल्या चिन्हांमधून अपेक्षित चिन्हार्थ प्रतीत करणे आणि नको असणाऱ्या चिन्हांचे निराकरण करणे या टप्प्यावर हळूहळू साधत गेले. लेखनाचा टप्पा पार पडल्यावर अजून सशक्त चिन्ह शोधण्याची उणीव वाटल्यास, नाटकात आधीपासून उपस्थित चिन्हांची अर्थगर्भता टिकवून ठेवत, नव्या चिन्हांचा शोध घेणे आणी हे सारे, एकसंध नाट्यानुभव म्हणून संप्रेषित करणे यासाठीची समज मिळायला हवी हे लक्षात आले. आता हे आव्हान माझा नाटकाच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे आणि इथून पुढे यावर काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.
माझ्या नाटकाचे स्वरूप
पात्राच्या मनात-नेणीवेत घडणा-या उलथापालथींवर आधारित नाटक, प्रयोग-प्रक्रियेसाठी मी ’मनात’ नावाचे नाटक लिहीले. हे नाटक वास्तववादी पद्धतीने मांडलेले नाटक नव्हते. त्यामुळे लेखन-दिग्दर्शनात मला बिनवास्तववादी शैलीचा वापर करायचा होता.
अभिनय
मला दिसलेलं अभिनयाचं स्वरूप-शैली, सगळं मनात घडतंय याच सूत्रावर, ‘मनात’ आधारित होते. भावनांची अतिशयोक्त-नाट्यात्म अभिव्यक्ती मला प्रयोगासाठी गरजेची वाटली. पात्रांच्या हालचालींना, वाक्यांना, देहबोलीला एक व्यंगात्मक लय असावी असं जाणवलं. हे अधोरेखित करण्यासाठी अभिनेत्यांकडून उत्स्फूर्त आविष्काराचे वेगवेगळे टास्क घेण्यात आले. जगण्यातल्या गुंतागुंतीच्या, अनिश्चिततेच्या प्रसंगांना प्रतिसाद म्हणून होणारा त्रागा आणि चिडचिड हा नाटकातल्या पात्रांचा मला स्थायीभाव वाटला. पात्रांच्या वर्तनात एक cathartic घटक ही होताच. कदाचित मनात घडणाऱ्या प्रसंगांमधली झटापट अभिनयाच्या शैलीचा विचार करताना केंद्रस्थानी होती.
संगीत
संपूर्ण नाटकाला एक विशिष्ठ लय होती, ती आणण्यासाठी पार्श्वसंगीत हे मूलभूत ठरलं. नाटक वैज्ञानिक कल्पनेचाही घटक स्वीकारते. अनेक यांत्रिक आवाज गरजेचे होते. मूळ पात्र म्हणजे ’अनिकेत’साठी सगळेच संगीत हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे वापरण्यात आले, तर त्याच्याविरुद्ध संघर्ष करणारे पात्र म्हणजेच, करण-या माणूस या पात्राला, सगळी जॅझ वाद्य वापरून पार्श्वसंगीत दिले. अनिकेतचे संगीत तीव्र, जलद गतीत असणारे, ताण निर्माण करणारे होते. याउलट माणसाचे संगीत संथ गतीत, गूढ, थोडे स्थिरावणारे होते. या विरोधाभासाने त्या पात्रांचा संघर्ष उठून दिसण्यात मदत झाली असं मला वाटतं. पार्श्वसंगीतात सुधारणा करण्यासाठीची जागा म्हणजे संगीताच्या टोनल क्वालिटी अजून अचूक करणे आवश्यक वाटले. संगीत परिणामकारक होण्यासाठी बऱ्याच तालमी संगीतासहित कराव्या लागल्या. एकूणच तांत्रिक दृष्टिकोनातून अजून पार्श्वसंगीताच्या घटकांना विस्तारण्याची गरज वाटली.
प्रकाश
संहितेत वैज्ञानिक विषय येत असल्यामुळे प्रकाशयोजना परिणामासाठी मूलभूत होती. ट्रांजिशन जरी कमी असल्या तरी महत्त्वाच्या होत्या. या ट्रांजिशनना एक प्रकारचा यांत्रिक पोत देण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न केला होता. अनिकेतच्या व्यक्तिगत प्रसंगांमध्ये वातावरण निर्मितीसाठी प्रकाशाची मदत झाली. वास्तव आणि बिनवास्तव यांच्या सीमेवर असणारे वातावरण निर्माण करणे प्रकाशामुळे शक्य झाले. अनिकेत आणि ऋतूच्या अखेरच्या प्रवेशात गोट्यांच्या बरणी मधून प्रकाश आणायचा होता. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची बरणी शोधून त्याच्यातून अपेक्षित प्रकाश बाहेर पाडणं गरजेचं होते. त्यासाठी बऱ्याच तांत्रिक गोष्टी कराव्या लागल्या. मी प्रकाश योजनाकाराचे आभार मानतो की त्याने मला अपेक्षित परिणाम साधून दिला.
वेशभूषा
वेशभूषा ही पात्रांची गुणवैशिष्ट्ये सुचवण्यात कामी आली असं मला वाटतं.
अनिकेत : अनिकेतच्या अंगावरच्या अनेक गोष्टींवरून, कपडे असो किंवा चष्मा, त्याचे चौकोनी घड्याळ या सगळ्यातून त्याच्या आयुष्यात त्याने स्वत:च निर्माण केलेल्या चौकटी सूचित करण्याचा प्रयत्न होता.
माणूस : माणसाचं पात्र गूढ दाखवायचा असल्यामुळे त्याला ब्लॅक अँड व्हाईट कोट दिला जेणेकरून तो ज्या कंपनीचा प्रतिनिधी आहे त्या कंपनीचे जे काही गूढ किंवा अनाकलनीय रूप आहे, ते प्रतीत व्हावे.
ऋतू : ऋतूचे दोन वेगळे वर्जन या नाटकात आहेत. पहिले वर्जन संदिग्ध आणि अमानवी वाटावे म्हणून त्याचा कपड्यांसाठी ग्रे रंगाचा वापर करण्यात आला, नंतर दुसऱ्या ऋतूला सौम्य आणि मृदु रंग वापरले. एक प्रसन्न वाटणारं निसर्गचित्र त्याच्या कपड्यांवर दिसावं जेणेकरून त्याचा स्वभाव सूचित व्हावा अशीही योजना केली.
आई : आई या पात्राला तिच्या कपड्यांवर बेबंद प्रकारचे डिझाईन्स दाखवून तिची प्रवृत्ती चौकटी मोडू पाहणारी आहे हे सुचवण्याचा प्रयत्न होता.
दिग्दर्शन
दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न होता, या प्रक्रियेत नियोजन करण्यासाठी समज मला मिळाली असं वाटतं. पहिला आग्रह हा होताच की सगळं योजने प्रमाणे, काटेकोर झालं पाहिजे. पण प्रक्रियेत शिरल्यावर लक्षात आले की बऱ्याच गोष्टी त्या-त्या ठिकाणीच बदलाव्या, ठरवाव्या लागतात. बसवण्याच्या प्रक्रियेत जाणवलं की खूप नियोजन सोयीचे ठरणार नाही, कारण त्याक्षणी अनेक गोष्टी सुचतात ज्या आजमावून बघणं भाग असतं. त्यामुळे बदलासाठी कायम तयार राहिले पाहिजे. एक मूळ रचना डोक्यात ठेवून कुठल्याही गोष्टीबद्दल नियोजनाचा दुराग्रह टाळणं फायद्याचं ठरतं असा मला अनुभव आला.
पहिला टप्पा
सुरुवात अभिनेत्यांच्या बरोबर संहितेच्या विषयाच्या चर्चेने झाली. अभिनेत्यांचे जे व्यक्तिगत अनुभव संहितेच्या विषयाला जवळ जाणारे आहेत ते मांडायला सांगितले. नाटकाला अनुसरून ज्या काही भावस्थिती आहेत त्यामध्ये व्यक्तिगत स्तरावर जगताना अभिनेते कसे व्यक्त होतील हे मांडायला सांगितले. हे सगळे एकत्र केल्यामुळे याच सगळ्या टास्कचा आईस-ब्रेकर म्हणूनही उपयोग झाला असं मला वाटतं. चर्चेतून नाटकाचा भाव सापडण्यात अभिनेत्यांना मदत व्हावी हा उद्देश होता.
दुसरा टप्पा
अभिनयाची शैली कलाकारांना समजून सांगण्यासाठी वेगवेगळे उत्स्फूर्त आविष्कार केले. प्रथम देहबोली आणि हालचालींवर काम करण्यात आले. या नाटकात प्रत्येक पात्राला एक विशिष्ट व्यंगात्मक अंगविक्षेप आहे, हालचाल करण्याची पद्धत आहे. ती प्रत्येक-अनेक परिस्थितींमध्ये अभिनेत्यांना उद्युक्त करते. त्यानंतर अभिनेत्यांचे गट करून त्यांना संघर्ष बिंदू सापडणाऱ्या परिस्थिती देऊन उत्स्फूर्त आविष्कार शोधले. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही संहिता वाचना कडे वळलो.
तिसरा टप्पा
संहिता वाचून झाल्यावर ब्लॉकिंग ची पायरी आली. पण भावनात्मक समज गरजेची होती. ती अपुरी आहे असे मला जाणवले, त्यासाठी पात्र तीव्रपणे भावना का प्रकट करत आहेत हे अभिनेत्यांना समजणं गरजेचं होतं. हे सगळं करताना एक भावनांची श्रेणी बांधण्यात आली, जेणेकरून एक भावना शोधून तिची तीव्रता कमीजास्त करून त्यानुसार व्यक्त होण्याचा प्रयत्न केला.
शेवटचा टप्पा
या टप्प्यात बरंच काही सुचत गेलं, उत्कट होण्याच्या जागा सापडल्या. अभिनेते आणि संगीत, प्रकाश, नेपथ्य यांचे सूत जुळताना जाणवले. एकूणच हा टप्पा मला समाधानकारक वाटला, इतक्या दिवसाच्या परिश्रमाचे फलित दिसत होतं, अनेक आव्हाने ऐन वेळेला समोर आली पण त्यांना तोंड देण्याचे धाडस या प्रक्रियेने मला दिले. अखेरीस प्रयोग सादर होताना; एकप्रकारचे समाधान आणि त्याचवेळी प्रयोगाच्या नव्या शक्यता सुचणे हे एकाच वेळी घडत होते.
मौखिक परीक्षा
परीक्षेमध्ये बऱ्याच अर्धवट राहिलेल्या गोष्टी समोर आल्या. एक गोष्ट नक्कीच लक्षात आले की नाटकात अशा असंख्य जागा असतात ज्यांचे चिन्ह म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असते, दिग्दर्शक म्हणून त्या जागा धरून ठेवणे अत्यावश्यक असते. हे शिकायचा माझा प्रयत्न असेल.
प्रयोग प्रक्रियेमुळे मला जी संधी मिळाली त्याचे मोल शब्दात सांगणं कठीण आहे. हिमांशू भूषण स्मार्त सर आणि अख्या सर्जनशाळेचा यासाठी आभारी आहे याच्यापुढे ही प्रक्रिया न थांबवता अजून काम करण्याचे नियोजन आहे, यानंतरही अजून शिकायची संधी मिळेल अशी आशा आहे.