नोकरीसाठी गाव सोडलं. नव्या गावात राहायचं म्हंजे घर शोधावं लागणार होतं. आडवळणी गावात भाड्यानं राहणारं असं कोण नव्हतं. घरं मोठी होती. पण प्राथमिक सोयी नसलेलीच. मला कोणतरी म्हणालं, ‘एक दोन शिक्षक बिर्हाड करून एकदा राहत होतं त मागं, त्या अमक्यातमक्याच्या राहत्या घराच्या मागच्या सोप्याला कसलं तरी पार्टिशन करून.’ तसं का असंना पण आपल्याला मिळालं पाहिजे घर, या काळजीत मी होतो. अनेकजण अडचणीचा पाढा वाचत होते. मी माझ्या गावात नाहीतर अशाच अडचणीत राहत होतो. शेतकर्याची घरं नाहीतर अशीच. दिवसभर काबाडकष्ट करून अंधार पडला की दोन घास खाऊन पडायला झालं की झालं ! कोणत्या इंजिनियरनं शेतकर्याच्या घराचा प्लान केलेला आहे की नाही मला माहिती नाही. पण आपल्याला दुसर्याच्या गावात आल्यावरच या या गोष्टी असाव्या, असं वाटायला लागतं, हे माझ्या लक्षात आलं. नाहीतर खेड्यात बाकीच्या अशा या गरजा घरात भागवायच्या असतात हे माहीत असण्याची गरज नाहीच !
त्यावेळी गावोगावी हागंदारीमुक्त अशी काही गोष्ट अस्तित्वात नव्हती. कोणालाच हातात तांब्या घेऊन कधीही जायला काहीही वाटत नव्हतं. बायकांना मात्र अंधार कधी पडंल याची वाट बघत बसावं लागत होतं. त्यावेळी कोणत्याही गावात संडास असणारी घरं मोजकीच. नाहीतर नाहीतच. तसंच या गावात होतं.
‘तरीपण संडास असणारं असं घर मिळतं का बघा, तसल्या घराच्या एका कोपर्याला जागा दिली तर राहावा, बाई आणि दोन लहान मुलं घेऊन राहणार म्हणल्यावर तुम्हाला तसंल घर पाहिजे.’ असं कोण कोण विचारील ते मला सांगत होतं. आता नाही मिळालं तसंल घर तरी आम्हाला राहावं लागणार होतं.
मग मी शाळेत राहणार्या एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना घेऊन त्यांच्या ओळखीनं शेजारी संडासची सोय असणारं, असं एक घर बघितलं. कसलीही स्वतंत्र अशी सोय नसलेलं. त्यांना मी किमान बाथरूमची सोय करायला सांगितली. पण ते म्हणाले,‘बाथरूम कशाला आमचं एक हायच की ते वापरा.’ एकतर त्याला दार असं नव्हतं. मग आम्हाला त्यांच्या वेळा सांभाळून आमच्या सर्व गोष्टी करायला लागत असतं. त्यांच्यात आणि आमच्यात असणार्या एकाच नळाला कोणतीही ठरावीक वेळ नसलेलं पाणी भरावं लागत होतं . शेजार्यांच्यात संडासची सोय आहे हेच एकमेव कारण ते घर घेण्याचं होतं..
एक-दोन महिनं गेलं आणि घरमालक स्वतंत्र बाथरूम करून दिल्यावर उपकार केल्यागत म्हणायाला लागलं, ‘असं घर गावात तुम्हाला मिळणार नाही. एका घरात दोन बाथरूम गावात कुणाच्या घरात हायत का बघा.’ त्याचं खरं होतं एका घरात प्रत्येकाची वेगळी बाथरूम, संडास, आणि झोपायच्या वेगळ्या खोल्या ही शहरी संस्कृती खेड्यात आलेली नव्हती. इथं प्रत्येकाचं घर आपल्या आपल्या गरजेपोटी बांधलेलं आणि सजलेलं. नाहीतर शहरात एक सारखीच घरं आपल्याला जास्त बघायला मिळतात. ठोकळाघरं.
आम्ही बाथरूम करून दिलं म्हणून त्यांना बरं झालं, असं म्हणून चारआठ रोज होतायत एवढ्यात आम्ही राहात असलेल्या त्या दोन खोलीच्या वरचा माळा त्यांनी एकेदिवशी आपली वैरण आणि जळणानं भरून टाकला. मी त्यांना म्हणालो ,‘ अवो आम्हाला विचारायचं तरी होतं.’ तर त्यांचं मत ,‘ घर आमचं हाय. आणि त्यात काय तुम्हाला विचारायचं ?’ तरी त्यांना काय बोलावं हे मला सुचत नव्हतं. वर त्यांचंच, ‘आम्ही काय मागं लागलो नव्हतो कुणाच्या आमच्या घरात येऊन म्हणून ? आणि शेजारच्या घरात जाऊन हागा म्हणून. आमच्यासारखं मोठं घर आम्ही बांधायला कुणाला नको म्हणलो होतो का काय ?’
एकदा आमच्या संडासची सोय केलेल्या शेजारणीचं आणि घरमालकीणीचं कशावरून तरी लागलं. मला वाटलं शेजारधर्म म्हणून लागलं असावं. असा शेजार्याचा धर्म लोक कोणत्याही गावात गेला तरी न चुकता पाळतातच. त्याला खेडं आणि शहर अपवाद असा नाहीच ! पण यांच्या या शेजारधर्मात आम्हाला कारण नसताना ओढलं. शेजारीण आमच्या घरमालकीणीला म्हणाली ,‘ मोठं घर , मोठं घर हाय ते खरं हाय तुझं , पर हागायला आमच्या सारख्यांच्यातच यायला लागतंय तेबी खरं हाय. घर मोठं असून काय करायचं ?’
तेवढंच आमच्या घरमालकीणला गावलं. तिच्या या भांडणाच्या धर्मापायी ती आम्हाला सांगायला लागली, ‘आम्ही जातोय माळाला तसं हातात तांब्या घेऊन जायचं असंल तर आमच्या घरात राहावा. नाहीतर तुमचं तुम्ही बघा गावात कुणाचं घर मिळतं का ते.’
या बाईनं आम्हाला घर मिळतं का ते सांगण्यापेक्षा संडास बाधून घेतलं असतं, तर काय झालं असतं असं मला वाटत होतं. पण ती एकदम भडकली होती. तिचा नवरा मलाच म्हणाला, ‘शेजारांच्या संडासचं आम्हाला कौतुक कशाला पायजे. एवढं मोठं घर बांधलं त्यात बत्तीस संडास बांधून होतील.’ मला हा बत्तीस आकडा त्यांचा कसा आणि कोठून आला हे कोडं पडलं तरी काय बोलावं हे मला कळत नसल्यानं मी गावात परत घर शोधत फिरायला लागलो.
नुकतंच एक नवीन घर बाधून झालेलं मला कुणीतरी सांगितलं. त्यांच्या घरी गेलो. तेही घर मोठं होतं. पण असंच. आणखी वरती माडीवर राहावं लागणार म्हणाले. हवं तर तुमच्यासाठी वरती पाण्याचा नळ आणि बाथरूम लगेच करून घेतो म्हणाले. मला बरंच झालं असं वाटू लागलं. संडास होतं त्यांचं , पण त्या घरापासून जवळ असणार्या त्यांच्या शेतात. ते शेत काही तसं फार दूर असं नव्हतं. मला त्यांचं स्वत:चं संडास आहे हीच मोठी थोर गोष्ट वाटली. मी त्यांना वरती माडीवर पाण्याचा नळ आणि बाथरूम करून घ्या म्हणून सांगून आलो..
दोन दिवसातून एकदा जाऊन काय झालं ते बघून येत होतो. तरी त्यात महिना गेला.
मग एकदम राहत असलेल्या घरमालकाला आमचं थोडंबुत सामान हलवत असताना कळलं की आम्ही अमक्या तमक्याच्या घरात राहयाला निगालो आहे. ते काहीच बोलले नाहीत.पण त्यांची बायको शेजारांच्यावर बिथरली. तिचं मत आम्हाला त्यांनीच बिथरलं . त्यांचा हिशोब करून गावातच तुमच्या राहणार आहे कधीही येत जाऊ असं सांगून चारसहा महिन्यातच त्या घराचं शेवटचं दर्शन घेऊन बाहेर पडलो.
इथलं शेजारी आणि हे घरमालक आम्हाला आमच्या गावातलंच आहेत असं एकदोन महिन्यात वाटू लागलं. घरतली सगळीच आम्हाला घरातल्यागत वागवू लागलीत. शेजारीपाजारी आपल्या साध्यासुध्या कार्यक्रमात आम्हाला बोलावत होतं. पाण्याचा कधीच प्रश्न येत नव्हता. तिला लहान मुलातून गडबड नको म्हणून अनेक बायका तिची अनेक कामं करू लागत होत्या. घर मालकीण स्वत: पाणी कमी पडंल म्हणून नदीला आपलं धुणं घेऊन जात होती. तिला घरातलं पाणी उपसून देत असे. माझंही वरती माडीवर असल्यानं सुट्टीदिवशी लेखन-वाचन स्वस्थपणे चालत होतं.
आसपासच्या घरातलं कोण फारसं शिकलेलं नव्हतं. त्यांच्याच भावकीतला नाथा नावाचा पोरगा मात्र बीए करत होता तोच काय आमच्याकडं माडीवर वाचायला ,बसायला येत असे. आमचा मुलगा आणि लहान मुलगी त्याच्याशी चांगलीच खेळत असत. आणखी एक, त्याला वाचायचा नाद चांगलाच लागला होता.
पहिला पावसाळा बघितला आणि आम्ही हबकून गेलो. घराच्यामागं उंच असा भला मोठा आंबा रात्रभर वाजत असे. घर खाली खड्यात आणि मागच्या टेकावर उंच असं भलं मोठं आंब्याचं झाड. ते कधीही पडंल असं अनेकांना वाटे. घरमालकांना त्या आंब्याबद्दल अनेकजण सांगत. आंबा वादळ वार्यानं पडला बिडला तर घर जागच्या जागी बसवंल असं कानावर येत. त्याच विचारात पावसाळयातल्या अनेक रात्री जात असत. पण माणसं चांगली. कधीही अडचणीला धावून येणारी. शेतभातात दिवसभर राबणारी. संध्याकाळी कोणाच्याही दारात एकत्र बसून सुखादुखाच्या गोष्टी बोलत बसणारी. माझं गाव , घर आणि माणसं अशीच होती. आपण आपल्या घरात आहे असं थोड्याच दिवसात वाटू लागलं होतं.
मी शिकायला होतो तेव्हा एका शहरवजा गावातल्या घरात राहीलेला अनुभव मला होता. त्या घरात एकटी म्हातारी राहयाची. गावातलं कोणही एक माणूस येत नसे. तिचा सावत्र मुलगा होता पण तो कधीच तेवढ्या वर्षात आलेला मला दिसला नव्हता. तिची सारखी किरकीर असायची. तिला घराच्या भिंतीला साधा पोपडा आलेला दिसला तर ती विचारत असे. तिचं नेहमीच घराबद्दल काहीही साधं झालं तर लगेच असंच का नि तसंच का असं चालत असे. तिला जिना चढताना वाजला तरी राग येई. ती हजार गोष्टी त्यासाठी बोलत, सांगत असे. घराचं दार सहज वार्यानं वाजलं तरी तिला मीच आपटलं असं वाटत असे. कपडे आडकावयाला काही नव्हतं म्हणून एक खिळा मारायला लागलो तर तिनं माझं घर पाडतोस का काय म्हणून चार दिवस लांबड लावली होती. त्यानंतर बर्याचदा मी परत कधी असा खिळा मारला की काय अशा चौकशीत ती मी राहत होतो तेवढे दिवस होती. मला त्यावेळी घराची आठवण खूप येत. पण मग म्हातारीच्या बोलण्याची आणि तिच्या घराची हळूहळू सवय झाली. माझं शिक्षण पूर्ण झालं. अनेकदा घरासाठी बडबडत असणारी म्हातारी मी आता जाणार म्हणून एकदम मला शांत दिसू लागली. खिळा न मारता एकुलत्या एक खुंटीवर रचलेली माझी सगळी कापडं मला काढू वाटंना झाली. माझी बॅग भरून मी निगालो त्यादिवशी म्हातारीनं मला सांगितलं, ‘जा बाबा. कधी आलास तर गाठ घेत जा. राहतं घर बघून जाईत जा. हे घरच माझं सगळं हाय बाबा. माझ्या नवर्यानं पदरात पहिली बायको असताना नादाला लावून मला इथं आणली. या घरात आल्यावर मला कळलं त्याला पहिली बायको आणि एक पोरगा हाय त्यो. जीवात जीव असंपर्यंत तो पोरगा आणि त्याची आई माझ्यासंगं एक शब्द बोलली नाही. पोरगा नोकरीला म्हणून गेला तो कधीच परतून या घराचं का माझं तोंड बघायला आलाच नाही. काही दिवसात त्याचं आई बाप दोघंही गेलंत. त्याला आता कैक वर्स सरली. पण या घराणं मला सांभाळलं. माझं कोण कोण या जगात नाही पण हे घर हाय म्हणून तर मी जगतोय लेका. मग सांग हेला खरचटलं तर मला कळ यायची राहील का ?’
मी आता कधी गेलो तर त्या म्हातारीची आठवण ठेवून भेट घेऊन येतो की त्या घराची ते मला माहिती नाही. आणि जेव्हा जाईल तेव्हा ती घराबद्दलच बोलली तर बोलत राहते. तिचं विश्व म्हणजे ते घरच. ते सोडून बाकीच्या जगाचं तिला काहीही पडलेलं नव्हतं.
मला आजही आठवतंय, आमच्या चुलत्यांना आपल्या घरासाठी काढलेलं पैसे देता आले नाहीत म्हणून ते दूरच्या गावात एका जमीनदाराची शेती कसायला म्हणून घराला काढलेलं पैसे भागवण्यासाठी आपलं सगळं बिर्हाड घेऊन गेले. पण आपण बांधलेलं घर त्या पैसे दिलेल्या माणसाला त्यांनी दिलं नाही. दादा आपला भाऊ घर सोडून गेलेला दिवस आठवून अनेकदा गलबलून गेलेलं मी बघितलं होतं. रात्रीचीच गावात कुणाला माहिती नसताना पोटची न कळती चार पोरं घेऊन गडाच्या डोंगरातनं डोक्यावर बोचकी घेऊन ती कशी चालत गेलीत, आपण त्यांना गडाच्या पलीकडं दिवस उगवायच्या अगोदर कसं घालवत गेल्यावर डोळं गाळत परत आलो, त्या दिवशी घरात चूल पेटली नाही की डोळ्याला डोळा असा लागला नाही, तेव्हा आपल्याला काय काय वाटलं हे सांगताना त्यांचं डोळं नेहमीच एवढी वर्षे झाली तरी भरलेलं दिसायचं ते कितीही लपवत राहिले तरी. त्यांच्या डोळ्याचं पाणी त्या आठवणीनं इतकी वर्षे लोटली तरी तुटलेलं मला कधीच दिसलं नव्हतं. गावात आपलं घर असावं म्हणून आपला भाऊ गाव सोडून गेला ही गोष्ट त्यांना खूप लागून राहिली होती. आम्ही त्यांचं घर वापरत होतो तरी अनेकदा दादा आम्हा भावंडांना ती आठवण करून देत असत. ते चुलते तिकडं जाऊन मोठी शेतीवाडी, मोठं घर बांधून जगत असले तरी ते ज्या ज्या वेळी यायचे त्यावेळी एकदा दूसरा शब्द बोलले तर बोलत असत. दादा आणि ते एकमेकाला मिठ्ठी मारून डोळं गाळत असत. सगळं घर नुसतं फिरत असत. माळ्यावर कायतरी हरवलेलं शोधतात असं मला नेहमी वाटत असे. त्यांना मी अनेकदा विचारलं. तर ते नुसते हसायचे. बोलायचे काहीच नाहीत. मी अनेकदा माळ्यावरच्या अडगळीत ते गेल्यानंतर इकडची तिकडं सगळी अडगळ हलवून बघितली आहे. मात्र ते काय शोधतात ते मला कधीच आमच्या माळ्यावरच्या अडगळीत दिसलेलं नाही. की ते काय शोधतायत ते मला कधीच सापडणारं नाहीच ?
चारआठ महिने झाले असतील ती मला सांगायला लागली, ‘आपल्या मुलांच्या शाळेत नवीन बाई आलेत त्यांना राहयाला घर नाही. त्या बाई जतकडच्या आहेत म्हणे. त्यांचे पती मुंबईला नोकरीला आहेत असं कोणकोण बोलत होतं.’
बाईची आई आणि त्यांची दोन लहान मुलं घेऊन त्या गावभर फिरत होत्या घर मिळतं का बघत. गावात घरं असून भाड्यानं घर द्यावं असा विचार नव्हताच त्याचा अनुभव आम्ही घेतला होताच. आतापर्यंत बाई माणूस गावात नोकरीला आलं नव्हतं. असणारं शिक्षक शाळंतच एका खोलीत आपलं घर करून राहत होतं. आठवडा पंधरा दिवस झालेकी गावाकडं जात होतं.
आणखीन या गावात मला घर शोधताना आणखी एक गोष्ट जाणवली होती , तुम्ही कुणापैकी म्हणायचं? हा प्रश्न लोक थेट ज्याचं घर आहे नाही ते विचारत होतं. त्यांना तुम्ही असं का विचारता असं म्हणूनही फार काही फरक त्यांच्यात पडणार नव्हता. किंवा तसं विचारण्यात आपली काही चूक आहे असंही त्यांना वाटत नव्हतं.
ती मला परत सांगू लागली, ‘त्यांची लहान मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर कोण पुरुष माणूस नाही.एक म्हातारी आहे. कोण त्यांना घर देणार आपण एवढं फिरलो तर आपल्याला किती त्रास झाला.’
माझ्या मनात विचार आला. नाहीतर आपल्याला घरमालक खाली राहावा म्हणत होते. एका सोप्यात. मीच त्यांना नको म्हणालो होतो. पाणी नाही चढलं कधी तर आम्ही खालून वरती नेतो म्हणून सांगितलं होतं. त्याच सोप्यात बाईंना राहूद्या असं मी घरमालकांना म्हणालो. तिनंही त्यांना तेच सांगितलं आणि ती त्यांना म्हणाली, ‘नाहीतर तुमचं घर मोठं आहे. त्यात तुम्ही तीनच माणसं आहात.’ मला शंका होती तोच प्रश्न त्यांनी मला विचारला , आपल्यापैकीच हायत का म्हणून. त्या नव्हत्या. मग त्यांना समजावून कसंतरी तयार केलं.
बाईंचा पसारा त्याच दिवशी त्यांच्या सोफ्यात मांडला. त्याच सोप्याला त्यांचं बाथरूम आणि चूल होती.
घरमालकीण म्हणाली, ‘हाय ही नहाणी आम्हीबी वापरणार. तुमच्यासाठी आमची या सोप्याची चूल आमी मदघरात मांडतो, पर नाहणी कुठं मांडू. वरच्या बाईला वर नहाणी करून दिली. आता तुम्हाला इथं करून देतो. म्हंजी काय माझं घर सगळं नाहण्यानीच भरून जाऊदे का काय? लय झालं तर आमचं बापय घराच्या वळचनीला करतील अंघोळ. पर मी इथंच करणार. पटत असलं तर राहावा, नाइतर बघा कुठं मिळतं का घर कुणाचं. असलं चोचलं आमा शेतकरी माणसांना परवडायचं नाईत.’
त्या बाईंना पर्याय नव्हता. त्यांनी आमच्यापेक्षा भाडं जास्त देऊन तसल्या गैरसोईचा स्वीकार केला.
घरात तिनाची सात आणि आता साताची एकदम आमच्या त्यांच्या मुलासकट अकरा माणसं झाली. एका नळाचं पाणी एवढया माणसांना पुरणार नव्हतं. घर मालकांना मी आणखी एक नळ कनेक्शन घेऊया म्हणालो तर ते म्हणाले, ‘कशाला लागतय. माप पाणी येतय.’
दुसर्या दिवशी पासून आमच्याकडं वरती येणारं पाणी कमी येऊ लागलं. काही दिवसातच घरमालकीण बोलायला लागल्या, ‘ कशाला एवढं पाणी लागतंय ?’ बाईची आई दिवसभर रिकामी होती. ती धुणं घेऊन लांब असणार्या नदीला जाऊ लागली. घरमालकीण तेच आम्हाला सांगायला लागली. पिण्याच्या पाण्याची आमची पंचाईत व्हायला लागली.
दिवसेंदिवस पाण्याची ओरड होऊ लागली. एकेदिवशी ती वरती पाणी येत नाही म्हणून खाली येऊन पाणी मिळतं का ते बघत उभी होती तर पाणी गेलं. रिकामी घागर घेऊन घरात येऊ लागली. तिला बघून घरमालकांचा भाऊ रंगाबापू समोरच्या घरात राहत होता तो आणि त्याची बायको आपल्या घरातली भरलेली घागर घेऊन आल्या थेट आम्ही राहतो त्या घरात. त्या घागर ठेवत आमच्या घरमालकीणीला म्हणायला लागल्या, ‘भाडंकरू ठेवायाची तर त्यांची सोय बघायला नको ? आमची ही जाऊबाई आपल्या ढोरागुरांचं धुण्या भांड्याचं पाणी भरून झाल्यावर तुमास्नी पाणी देणार म्हणल्यावर पाणी तरी किती पुरायचं हाय ? काय हुतय ढोरं नदीला न्याला नि हिला धुणं घेऊन नदीला जायला. त्या खाली राहणार्या बाईची आई या आमच्या परक्या गावात नदीला धुवायला जातीय. हे आमच्या या जाऊला बरं दिसतंय ? बाई तुमी उद्यापासून आमच्या घरात पाणी भरा. वरती पाणी चढवायला लागंल तेवढंच खाण्याजेवणापूरतं. मग काय करायचं ? आणि आमच्याच परड्यात घरातल्या पाण्यांनं धुणं धुवायला येत जावा. आम्ही शेतकरी माणसं आमचं इकडचं तिकडं जरा झालं तर चालंल.’
याचा राग घर मालकीणीला नि काही दिवसात घरमालकाला आला. जिना चढताना जरा वाजला तरी त्यांना सहन होईना झाला. एकदोन पाण्याची घागर मिळावी म्हणून उभा राहून ती रिकामी घागर घेऊन परत फिरू लागली. सगळं पाणी खाली राहणार्या बाई नि घर मालक भरू लागले. आमच्या घरात राहून आमचं बघवत नाही ती माणसं तुमच्यात बसाय उठाय आलेली आम्हाला चालणार नाहीत, असं बोलणं त्यांचं कानावर पडायला लागलं. बीए करत असणारा त्यांच्याच भाऊबंदातला नाथा नावाचा मुलगा वाचत बसायला आला तरी त्यांना चालंना झालं. त्याला घरमालकीण घालूनपाडून बोलायला लागली. आमच्यासाठी त्यांच्यात भांडणं नकोत म्हणून त्याला आमच्या राहत्या घरात येऊ नको म्हणून सांगितलं. तरी तो कधीकधी त्यांना न जुमानता येत राहिलाच.
सगळ्यात चांगली एक गोष्ट दिसत होती ती म्हणजे ज्या बाईची जात कोणती म्हणून जे घरमालक आम्हाला विचारत होते, त्या बाईची त्यांच्याबरोबर राहणारी आई कमरेला बटवा बांधून पानतंबाखू खायची. घरमालक आता आपला बटवा सांदीला टाकून तिच्याच बटव्यात आपली पानाची तलफ भागवत होते. माळकरी घरमालक घरात काहीच खारकांडं शिजवू देत नव्हते पण त्यांचा मुलगा आणि खाली राहणारी बाई घरामागच्या गोठयात चारदोन दिवसाला मटन शिजवून खात होते. त्या बाईंचा नवरा आला तर रोज कोंबडी शिजवली जात असे. तो मुंबईला कोठेतरी शिपाई होता. त्याची एकदा बडबड सुरू झाली की बंद म्हणून होत नसे. सगळं घर बडबड करतय असं तो जेवढे दिवस राहत असे तेवढे दिवस हमखास वाटायचं. मी कसा मुबईतून ट्रकनं येतो , पैसे कसं वाचवतो , मला एक फाईल आमच्या साहेबांच्या टेबलवर आत न्याला माणसं किती पैसे देतात , तीच फाईल बाहेर आणायला मी डब्बल पैसे कसं घेतो , मला पगाराला हात लावायला लागत नाही , हे आणि हजार गोष्टी तो दिवसरात्र बडबडत असे. घरमालक त्याचं हेच बोलणं झोप आली तरी ऐकत बसत होते. पान रंगवत.
घरमालकाचा मुलगा आणि बाईचा नवरा गावात रोज कोण कोंबडी देतं का ते बघत फिरायची. एकदा तर त्यांनी एकदम सहा कोंबड्या आणल्या. त्यांच्या बाई चिडल्या. तर त्याचं सुरू झालं, ‘ मास्तरीन तुला मी केलीय लगीन केल्यावर. नाहीतर बसली असतीस फिरत अशीच बे एके बे करत आणि मी सहा दिवस राहणार हाय , मग सहा कोंबड्या लय झाल्या का काय ? आणि कोंबडं अगोदर कापायचं, तवर कोंबडीची अंडी खा की, नि जा शिकवायला. का मला शिकवायला लागलीस ? मी माझ्या सायबाला शिकीवतोय , कुठल्या कामासाठी कुठली नोट मागायची ते.’ बाई म्हणाली, ‘वरती सर राहत्यात त्यांना काय वाटंल ? बाईचा नवरा हाय का भवरा, सारखा फिरतोय नि बडबडतोय ते.’ तो त्यांना सांगायला लागला, ‘त्यांना काय महिन्यातून एकदा पगार मिळतो. मला पगार किती मिळतो बघावंच लागत नाही.’ मग तर बाई भडकल्या आणि त्याला बोलायला लागल्या. त्यांचं लागलं. घरमालक घरात नव्हते. बाईला त्यानं मारलं. मी खाली पळत आलो. त्याला हे काय करताय म्हणलो. तर तो , आमचं आपलं चाललय सर म्हणाला. मग मात्र शेजारीपाजारची माणसं त्याला बोलायला लागली. आमच्या घरात माझ्या बायकोला मी मारतोय म्हणायला लागला तो त्यांना. बाईच्या आईनं त्याला शिव्या दिल्या. चालता हो म्हणाली. तो रुसून मुंबईला म्हणून बाहेर पडला. घरमालकाचा मुलगा त्याला परत घेऊन आला. तो चारदिवस घर मालकांच्यातच राहिला. त्यांच्या मुलाला घेऊन त्यानं बरीच गावं फिरून घेतली. घरमालकांचा मुलगा त्याच्या चांगलाच नादाला लागला होता. शाळा चुकवून त्याच्याबरोबर गावोगाव हिंडत होता. जाताजाता तो घरमालकाला म्हणाला, ‘आबा या तुमच्या घराला मुंबईत लय भाडं मिळालं असतं.आम्ही तुम्हाला काहीच देत नाही म्हणायचं.’ घरमालक म्हणाले ,‘ वाढवा की तुम्ही. वरच्या सरांना सांगतो तसंच.’ बाईला न विचारता त्यानं भाडं वाढवून टाकलं. ते मला घरमालक महिन्याचं भाडं द्याला गेल्यावरच सांगायला लागले. त्यांचं ते भाडं शहरातल्यापेक्षा जास्त होतं. मी म्हणालो, ‘आमची संडास , बाथरूम , पाण्याची सोय नीट करा. देतो भाडं आम्ही. फक्त तुमच्या घरात आम्ही राहतोय नि बाकीच्या सगळ्या गोष्टी दुसर्यांच्या वापरतोय.’ तर त्यांचं, ‘मला ते काय कळत नाई. बाईचा नवरा एवढा सायब हाय तो ते देतो म्हणतोय तेवढं तुमाला जमत असलं तर आमच्या घरात राहावा. नाईतर बघा दुसरं घर गावात कुणाचं मिळतं का ते.’ मी त्याला सांगितलं, ‘तुमच्या सायबानं दिलं तेवढं भाडं दुसरं घर मिळेपर्यंत देतो.’ तर त्याचं, ‘अवो तुमी इतकं शिकलाय म्हणताय तरी तुमाला आमच्या घराची किंमत नाई ,ती त्या बाईच्या सायबाला कळाली.’ बाईचा नवरा मुंबईत शिपाई असला तरी इथं साहेब होता. घरमालकांना तर तो एकदम आपल्या घराचं भाडं एवढं आलं पाहिजे म्हणाल्यावर मोठाच साहेब वाटायला लागला होता.
मला आता दुसरं घर बघावंच लागणार होतं. नाहीतर हे गाव सोडून दुसर्या गावात जावं असं वाटत होतं. नाथाला मी असं बोललो. त्यानं आपल्या घरात हे सांगितलं. त्यांच्या घरात जागा नव्हती. सगळीच बोलायला लागली, ‘या आमचा माणूस लय घरवाला झाला. मस्ती आलीय का काय म्हणायचं?’
मग त्या खाली राहणार्या बाईच्या नवर्यानं या माणसाला पाक बिघडुन टाकला, अशी कुजबूज सुरू झाली. कोण कोण म्हणायला लागलं, त्या बाईच्या नवर्याला एक कळत नाही पण या बाईला कळूने? या वरती राहणार्या सरांच्या सांगण्यावर या बाईला इथं बुड टेकायला मिळालं. तिचं तरी काय म्हणा तिचा नवरा पोरटकी हाय. पोरं झाली तरी त्याचा पोर्टकीपणा अजून गेलेला नाही. कवा आलं तर नुसतं बाडबाड बोलणं. लाकडाचं तोंड असतं तर बिचार्याचं कवाच फुटलं असतं आणि घरमालक आबा माळ घालून आल्यापासून घरात अंड्याची पोळी भाजून देत नव्हता नि आता बाईच्या नवर्याच्या रोज कोंबड्या होरपळत्यात त्याचं काय वाटंना झालाय त्याला?
नाथाच्या वडलांनं घरमालकाला हे चांगलं नाही म्हणून एकदा सांगितलं. तर त्यांचं लागलं. घरमालक त्यांना म्हणाला, ‘तुमी बांधा घर नि करा जावा त्यांच्या मनासारख्या सोई नि द्या जावा फुकट राह्यला. घर खवण्यानं बांधलंय.’ नाथा मला हे सांगायला लागला. मला आपल्या पायी यांच्यात भांडणं लागायला नकोत असं वाटायला लागलं.
आपण हे गाव सोडून जवळच्या गावात घर बघावं म्हणून माझा परत शोध सुरू झाला. आणखी एक, थोडी जागा घेऊन लहानसं घर बांधावं असाही एक विचार मनात आला. पण झाली तर बदली कधीही होऊ शकते. त्यावेळी या आडगावत त्या घराचं काय करायचं? कोण कोण माझ्याकडं आमची जागा फुकट घ्या तुमाला पाहिजे तेवढं घर बांधा आणि जाताना आमच्या स्वाधीन करून जावा असाही प्रस्ताव घेऊन येऊ लागले. हा प्रस्ताव जास्त वर्षे राहण्याची निश्चिती असती तरी मी मान्य केला असता. आपल्या मनासारखं आपल्या घरात राहता येईल असं वाटत होतं. पण एकदोन वर्षात बदली झालीच तर?
मला एकेक दिवस मोठा वाटायला लागला. त्यांचं बोलणं काहीही ऐकायला यायला लागलं. शेजारी माणसं त्यांच्यापासून दूर जाऊ लागली. तरी घरमालक मलाच जबाबदार धरू लागले. पण मी बाईच्या साहेबांनं सांगितलेलं भाडं देत होतो. काहीह करून हे घर सोडणार होतो. आता ते राहावा म्हणाले तरी आम्हाला या घरात राहायचं नव्हतं.
घरमालक किंवा त्यांच्यातलं कोण नसावं नाहीतर खाली राहणार्या बाईंची आई कधीच नाही जिना चढून आली नसती. ती आली नि म्हणायला लागली, ‘ आमच्या जावायला नाई आक्कल. त्येनं चढवून ठेवलाय या घरमालकाला.’ मला राग आला. मी म्हणालो, ‘त्यांचं घर.आणि तुमचा जावाई मुंबईचा साहेब. त्याला आपण कसं म्हणणार अक्कल नाही असं ? आम्ही नाहीतर घर शोधतोय. तुम्ही जावा खाली नाहीतर घरमालकीण यायची आणि तुम्हाला घर शोधायला लागायचं.’ तर तिचं, ‘मी तरी कुठं राहणार हाय बाबा यांच्यात. एक जात सगळी माणसं अशी हायत.कुठणं माझ्या पोरीच्या नशीबात आल्यात पर आता करायचं तर काय? नाई मी राहयाची लय दिवस. जायची मी आता. तरण्या ताटया पोरीच्या संगं कोणतरी असावं म्हणून आलो. हेंची पोरं राखायला. असं एकाजाग्याला बसून अंग जड व्हायचं नि चार दिवस जगंल ते बी सपायचं.’
चहा पिऊन ती जिना सावकास उतरली. तरी मला जिना वाजंल याची भीती वाटली ती वाटलीच !
एकेदिवशी घरमालकांचा भाऊ रंगाबापू आला. मला आपल्या घरात घेऊन गेला. आपण राजुकाका येतील तेव्हा त्यांना विचारून बघूया घराचं असं मला सांगू लागला. ‘सर, त्यांचं आणि तुमचं जमंल. लय भारी माणूस हाय. त्यांचं शेत आमी एवढी वर्षे करतोय पण कधी हे असंच का नि तसंच का असं त्यांचं नाही. आता ती हिथं राहीत नाहीत. नाहीतर रहात होती तवाबी गावात कुणाला एवढा मोठा शेतकरी म्हणून कधी वाकडा शब्द नाही ओ. आमच्या भावाच्या गांडीला दात आलंत. हे काय शेर पडलं का काय तवा एवढं नि तेवढं भाडं म्हणायला? घील भाडं आता तुमी सोडल्यावर. माणसाला जरा तरी ? सोडा हे घर नि बघा घरात जळमटंच भरायची हायत. दुसरं काय ओ आमच्या गावात ? काढ म्हणावं केरवारा. बायलीच धड खुळंबी नव्ह नि शहाणंबी नव्ह म्हणायचं. त्यात त्या बाईचं खुळं गाठ पडावं ? कोण ईचारतय इथं तवा. तुमाला आता एक गरज हाय म्हणून. नाइतर कोण हाय आमच्या गावात राह्यला भाडकरू ? राहावा राजुकाकांच्यात. देवमाणूस. त्यांना मी सांगतो. ते घर तुमच्या लागाचं हाय.’
ते गावातलं तसं मोठं घर होतं. किसनअण्णाचं घर म्हणून त्या घराची गावात ओळख होती. ते आता नाहीत. पण त्यांचा हा बारदाना त्यांच्या मागं राजुकाका सांभाळत होते. त्यांचं बाकीचं भाऊ मोठया मोठया पदावर. देशी परदेशी. ते कधीतरी गावाच्या सणावारला आपल्या सवडीनं येत असत. मला एका दोघांनी हे घर अगोदर सांगितलं होतं. पण एवढं मोठं हे वतनदार. घर भाड्यानं देणार का असं कसं विचारायचं म्हणून मी विचारलं नव्हतं. आणि विचारायला ते इथं राहत नव्हतेत. त्यांनी शहर जवळ केलं होतं. कधीतरी आठवड्यातून एकदा ते चक्कर शेताकडं म्हणून टाकत असत. सगळ्या शेत लावलेल्या शेतकर्यांना भेटत असत. तेवढंच त्या घरात थांबत असत. ते इथं राहत होते तेव्हापासून त्यांच्या एका मागच्या सोप्याला एक डॉक्टर आणि दुसर्या एका सोप्याला दुसर्या गावचा एक शिक्षक राहत होते.
चार दोन दिवस गेले. राजुकाका आलेत म्हणून मी आणि रंगाबापू त्यांची भेट घ्यायला गेलो. किसनअण्णाचं घर. समोर प्रशस्त घराला शोभंल असं भलं मोठं अंगण. गावात घरं मोठी असली तरी असं अंगण कुणाचंच नव्हतं. दुमजली भलं मोठं चारसोपी घर. सगळं नक्षीदार कापीव लाकडाचं. चारफुट रुंद भिंतीचं. भिंतीत असणार्या दिवळ्या म्हणजे एक एक मोठं कपाटच होतं. समोरच्या सोप्याला जाळी मारून अंगणातलं , गल्लीतलं सगळं सोप्यातल्या झोपळ्यावर बसून बयाजवर दिसतेलं.लाकडी झोपाळा कातीव पायांचा आणि चांगल्या घनसर कडयांचा होता. बसायचे माचेही तसेच.
मावळतीच्या एका सोप्याला शिक्षक राहतेलं. त्याच्या मागच्या सोप्याला डॉक्टर. ते खूप वर्षे झालीत रहातात असं मला कळलं. किसनअण्णानी ती इथं राहत असतानाच त्यांना तो सोपा राह्यला दिलेला. उगवतीचा सोपा एकदम भला मोठा. त्याचं घरागत चार जापतं. त्यात शेतीचं बरंच बारदान पडलेलं. त्यात मोठीच्या मोठी नहाणी. त्यात तांब्याचं मोठच्या मोठं हांडं.घागरी. नक्षीदार. तिथंच बोअरचं मीटर. एकूण सगळा चार जापत्याचा सोपा भरलेला.
मुख्य दरवाजाची भलीमोठी चौकट आणि तिचा दरवजा एकदम देखणा. गंधवालाचा. वेलबुट्टीच्या नक्षीनं कोरलेला. बघत बसावं असं वाटणारा. बाकीचं दरवाजं एका माणसाला सहज न लोटणारं. भिंतीतल्या मोठयाच्या मोठया आडण्याचं. मुख्य घराचं चार जापतं. आत आत.
घरामागं दत्ताचं छोटसं मंदिर. तिथंच बोअर. पूर्वी त्या मंदिराच्या खाली विहीर होती म्हणे. ती आता मुजवलेली. घराला लागून संडास. तिथंच पाण्याचा मोठा हौद. धुण्यासाठीची दगडी फरशी घालून केलेली मोठी जागा. डॉक्टरांचा राबता जास्त तिथंच. ते सगळं स्वच्छ ठेवत. दोनचार दिवसानं सडा सारवण करून घेत. त्यांचा डॉक्टर कम पंचाग बघण्याचा धंदा जास्त चालत असे. मंगळवारी आणि शुक्रवारी गावोगावचे लोक या अडवळणी गावात पंचाग बघायला येत असत. हे त्यांचं कधी चालू झालं कोणाला सांगता येत नाही. पण त्यांच्याकडं यासाठी येणारी माणसं पेशंटपेक्षा अधिक असत. ते आले तेव्हा डॉक्टर म्हणूनच गावात आले. पण त्यांचा हा उधोग चांगला चालला म्हणून डॉक्टरकीच्या धंद्यातनं लक्ष उडालं की ते डिग्रीवाले डॉक्टर नव्हतेच ते कोणालाच आता सांगता येत नव्हतं. मंदिराच्या मागं भल मोठं परडं. त्यात फणसाची, पेरूची, जांभळीची, रामफळाची, आणखी कसली कसली भरून गेलेली झाडं. त्यातच उंचच्या उंच गेलेली नारळीची झाडं. नारळांनी भरलेली.
राजुकाकांना बघितल्यावर आमची तशी तोंडओळख आहे हे माझ्या आणि त्यांच्या लक्षात आलं. तरी रंगाबापूनं आमची ओळख करून दिली. त्यांचं एकदोन शेतकरी बसलेलं होतं. त्यातल्या एकानं भिंतीवरचा किसनअण्णांचा फोटो दाखवला. नुकतेच ते काही वर्षापूर्वी गेले असं त्यातला एक शेतकरी सांगू लागला. दुसरा शेतकरी सांगू लागला, ‘आण्णा हामीला लय दांडगा माणूस हुता. त्यांच्या हामीवर आमची घरंदारं पोरांची लग्नं आमी केली. या घरानं आमाला जगीवलं. पर त्यांचंच राजुकाकानी पुढं एक काकाण चढ म्हणा हवं तर परं चांगलं चालीवलंय.’
मग या सोप्याला काही वर्षापूर्वी गावातल्या कशा अनेकांच्या वळकटी रात्रदिवस वर्षवर्ष पडलेल्या असायच्या हे निगालं. माणूस रातध्याड या घरातलं कवा म्हणून तुटायचं नाही, या घरात गावाचा राबता, कितीतरी माणसं यायची आणि जायची , हालतंबोलतं सदा भरलेलं घर, उठली सुठली बारकी मोठी इथंच माणसं, घराला माणूसच लबुद, तवा नदीवर पूल नव्हतं, आलेला पाव्हणा चार दोन रोज राहयाचा, यांचं पाव्हनं लांब, सुट्टीला तर सगळं घर पाव्हण्यापैच्या पोरांनी भरलेलं असायचं, मागच्या परड्यात, शेतात आंबं, करवंद फणस खायला गावाची पोरं नि ही पोरं दिवसच्या दिवस फिरायची, खेळायची. या घरात कुठूनही आलं गेलं माणूस रिकाम्या हातानं परत जायचं नाही. काकांच्या पोरांची शिक्षण आली तसं यांनी शहरात घर बांधलं. किसनआण्णा आणि ताई मात्र हिथच राहत होते. पण तेही वरचेवर वय होईल तसं शहरात जाऊन येऊन राहू लागली. हळूहळू हे घर बंद झालं.शेवटी शेवटी किसनअण्णाही त्यांची तब्बेत बिघडली म्हणून गेले आणि हे हालतं बोलतं घर बंद होत होत गेलं आणि मग ते बंदच झालं.
त्यानंतर गावात आता पहिलं दिवस नि माणसंबी राहिली नाहीत. माणूस माणसाचं आता ऐकत नाही. कोण कुणाचा मान ठेवत नाही. कुणाची कुणाला फारशी गरज पडत नाही. का कोण कुणाच्या दारात आता पाहिल्यागत जाईत नाही असं बोलणं चालू झालं.
राजुकाकांनी आपलं सगळं सख्यं चुलत भाऊ कुठं कुठं आहेत ते सांगितलं. मग आपलं शिक्षण पुण्याला झालं, आपणही इतर भावासारखे नोकरी करत होतो, किसनआण्णा हे त्यांचे चुलतेच फक्त इथं राहत होते, त्यांना मूल नव्हतं, बाकीचं चुलतं आणि त्यांची मुलं इथं कोण यायला तयार नव्हतं , त्यांना चांगल्या नोकर्या होत्या, एका चुलत्यांनी मग आपल्याला किसनआण्णाचा हा सगळा कारभार पुढं पाहयाला कसं पाठवलं, त्यावेळी आपल्याला आपण इथं राहील असं वाटत नव्हतं, पण आपण इथल्या माणसांच्यात कसं मिसळत गेलो, यांच्यातला एक झालो , किसनअण्णाचा कारभार बघत कसं शिकत गेलो, आणि हा सगळा बारदाना सांभाळायला आपण कसं लागलो हे सगळं सांगितलं.
रंगाबापूनं आम्ही का आल्याच सांगितलं. काकांनी घर फिरून दाखवलं. मदघरातल्या जिन्यावरून आम्ही वरच्या माळीवर गेलो. एकदम प्रशस्त माळीचं खालच्या चार जापत्या एवढंच वरही चार जापतं होतं. त्यातल्या मागच्या बाजूच्या दोन जापत्यात बाराबत्तर अडगळ पडलेली. समोरचं दोन एकदम प्रशस्त. काका म्हणाले, ‘आम्ही राहत होतो तेव्हा या दोन जापत्याचा वापर करत होतो , मागचं दोन ते असेच अडगळ टाकायला होते.’ त्यात आताही तशीच अडगळ दिसत होतीच. समोर गॅलरी होती. त्यात उभा राहिल्यावर सगळी गल्ली आणि अंगण दिसतेलं. हवेशीर खिडक्या. मला ते आवडलं. मी काकांना हे मला दिलं तर आम्ही राहू असं म्हणालो. तर त्यांनी खुशाल राहावा पण वरती तुम्हाला पाण्याची अडचण होणार आणि मागं असणारं संडास बाथरूम यासाठी खाली उतरून घराच्या बाजुनं फिरून जावं लागणार म्हणून सांगितलं. आणखी ते म्हणाले, ‘आम्ही आता नाहीच फार येत तुम्हाला हवं तर सगळं घरच वापरा. मी असाच आठवड्यातून एकदा दोनदा येतो शेताकडं म्हणून. इथं थांबलो तर फारफार तर तासभर थांबतो. आणि जातोय परत.’ मी त्यांना म्हणालो ,‘ आम्हाला हे सगळं घर नको. तुमचे कधी नाही कधी भाऊ , नातेवाईक आले तर आपल्याला सर्वांना अडचण वाटेल असं काही नको. मला वरती बाथरूम करून दिलं तर बरं होईल.’ ते जिना उतरत म्हणाले, ‘ जिना आहेच. बाथरूम करू लगेच उद्या.’
‘तरीपण तुमचं हे सगळं साहित्य खाली पडलेलं आणि तुम्ही आला गेला तर तुम्हा आम्हालाही हा मद घरात जिना आहे त्याची पंचाईत व्हायची. मला वाटतं हा जिना बाहेरून काढून दिला तर कोणालाच त्रास असा व्हायचा नाही काका.’ मी म्हणालो.
मग ते सांगू लागले, ‘तरीपण तुम्हाला वरती पाण्याची अडचण येणार. आमचं पूर्वीचं दोन नळ आहेत खाली त्याचं पाणी मला काही वाटत नाही वरती माळीवर चढंल असं. बाकीच्या गोष्टी सोडा पण जेवणखाण्यासाठी तरी लागणारं पाणी वर चढवायचा त्रास होणार.’
मला आपण अगोदरच या घरात का आलो नाही असं वाटायला लागलं. मी म्हणालो, ‘पाणी भरपूर असल्यावर काका तेवढा त्रास आम्ही सहन करू.’
बोलत बोलत आम्ही सगळं घर फिरून ,मागचं परडं फिरून परत पुढच्या सोप्याला आलो. काका सांगू लागले, ‘या घराला जेवढी माणसं येतील तेवढी मज्जा आहे सर. गेली पाचसहा वर्षे हे घर मला असं मुकं मुकं वाटतय. मी पण आलो तर फार थांबू वाटत नाही या मुक्या घरात. या घरांनं हालतं बोलतं नेहमी राहावं म्हणून तुम्हाला लगेच मी राहावा म्हणालो. आमचं आता कोण माझ्याशिवाय इकडं येईल असं आता तरी मला वाटत नाही.’
त्यांनी जिना कसा बाहेरून करता येईल ते आपण मिस्त्रीला विचारू म्हणून लगेच तिथं असणार्या माणसाला मिस्त्रीकडं पाठवला. मिस्त्री आला.
काका मला सांगायला लागले, ‘सर, या माणसाला काहीही काम सांगा. लाईटचं सांगा, पल्बिंगचं सांगा, सुतार लोहारचं सांगा, गवंडी काम सांगा किंवा कोणत्याही मशीनच सांगा कोणतंही काम येत नाही असं नाही.’
तो म्हणाला, ‘ते राहुदे आता काय काम हाय ते सांगा. आणि मी मागच्या परड्यातली निलगीरची दोन झाडं नेणार हाय ती कवा नेऊ ती सांगा.’
काका त्याला म्हणाले, ‘तरी बरं विचारून न्याला लागलास आता. नाहीतर नेल्यावर मी विचारलं तर सांगतोस, काका होय मी ते नेलं तुमच्या घरातलं, शेतातलं म्हणून.’ ‘आता हे माहिती हाय तुमाला. तरी आपलं ईचारलं.’
मग काकांनी त्याला जिन्याचं काम सांगितलं. त्यानं लगेच खिशातला टेप काढला. मापं टाकली. तो आतला जिना त्याची मापं घेऊन परत बाहेरच्या सोप्यात आला आणि म्हणाला, ‘काका नवीन जिना करण्यापेक्षा आतला जिना बाहेर बसवूया. नाहीतर तिथला जिना सर राहणार म्हणल्यावर बंदच करावा लागणार. मी हाय तो आतला जिना बाहीर बसवून देतो. नाहीतर आत जिना ठेवून तुमी इथं राहणार नाईसा म्हणल्यावर काय उपेग सांगा? त्याला तिथं ठेवायचा कशाला?’ मग तो जिना बाहेर बसंल का ? बसला तर कुठं बसंल? त्याची चर्चा झाली.
काका वरच्या बाथरूमच कसं करायचं म्हणून त्याला विचारू लागले. तर तो आम्हा सगळ्यांना घेऊनच वरती गेला. परत मापं टाकून बाथरूम कसं करता येईल ते सांगून उद्या करतो माझा मी म्हणून लागणारं मट्रेल सांगून परत निलगिरीच्या झाडांचं सांगून तो गेला.
दोन दिवसात जिना बाहेरून बसवून बाथरूमसह काकांनी तयारी करून घेतली.
हे झाल्यावर मावळतीच्या सोप्याला राहणारे शिक्षक कधी नाही ते भेटायला आले. कशाला तिथं राह्यला येताय म्हणायला लागले. काका कधीच नीट लक्ष देत नाहीत, माडीवर पाणी कधी नेणार ? संडासला सगळ्या घराला वळसा घालून यायला लागणार, त्यांचं बोअर आहे पण ते कधी चालतं तर कधी नाही, तो मिस्त्री आला तर ते दुरुस्त करणार, त्यावेळी त्यातलं काही आपल्याला नेता येतं का बघणार, आम्ही राहतो तेवढंच काय असंल ते आम्ही नीट ठेवलं आहे, काकांची कधी तरी येतात, तेवढंच बसाय पुरतं झाडून कामापुरती बसून लगेच जातात, पावसाळ्यात सगळीकडं गळतंय, कितीवेळा मी सांगितलं, पडल्यावरच काका बघणार , त्यांना पडलं तरी त्याची काही गरज नाही , माप सगळं गाव त्या घराबद्दल सांगतं, पण आता त्यात काहीही पहिलं राहिलं नाही, आणखी तुम्ही वरती राहणार आहात, उन्हाळ्यात वरती खूप गरम होणार, हे घर सगळ्या गावाचा बसायचा अडडा आहे, कसली बसली माणसं बसलेली असतात, रिकामं अंगण, रिकामं घर, कोण विचारणार ? कसलीच सोय नाही, आम्ही कसंतरी राहतोय , काकांचं जास्त शेतात लक्ष आहे, घरात उंदीर उकीर काढतात, ते त्यांना दिसत नाही, बाहेरून तुम्हाला ते घर एकदम मस्त वाटत असलं तरी आतून सगळ्या भिंती पोखरल्यात, बघा, मी आणखी काय तुम्हाला सांगणार, मीच ते सोडणार आहे. असं बरंच ते बराच वेळ बोलत राहिले.
मला या सगळ्यापेक्षा आहे हे घर सोडायचं होतं. दुसर्याचं गाव असलं तरी त्या गावात घर आपलं आहे असं राहताना तरी वाटलं पाहिजे. आपल्याला इथं आता ते वाटणार नाहीच याची खात्रीच झाली होती. कुठंतरी का असंना घर शोधावं लागणार होतंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं काकांनी कोणतेही आढेवेढे न घेता मला हवा तसा लगीच घरात बदल करून घेतला होता. तरीपण काळजी लागली. तिथं राहणारा शिक्षक असं सांगतो म्हणजे काय ?
नंतर मला समजलं ते शिक्षक काकांचं ठरलेलं थोडं भाडंही वेळच्यावेळी नीट देत नव्हते. त्यांचं गाव तसं फारसं दूर नसताना दुसर्या गावात नोकरी करत असून या अडवळणी गावात ते राहत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या सोप्याला राहणार्या डॉक्टरांचा पंचागचा धंदा जसा जोरात चालत होता , तसा यांचा या घरात घरमालक असं कोणच नसल्यामुळं दहा टक्के व्याजाचा धंदा जोरात चालत होता.
आम्ही ते घर सोडलं. दीड दोन वर्षात या लहानशा गावात तिसर्या घरात आम्ही जात होतो. वाईट वाटत होतं. रंगाबापुचं कुटुंब आणि नाथा आम्ही गावातल्या गावात पण तिसर्या गल्लीत राह्यला निगालो म्हणून डोळं गाळायला लागली. त्यांनीच आमचं थोडंबुत असणारं साहित्य नेऊन काकांच्या घरात टाकलं. आम्हाला सांगणार्या शिक्षकांना आमचं साहित्य बघून राग आला. तो आमचं साहित्य घरात नेत असताना बराचवेळ तसाच बघत उभा राहिला. तिथं जमलेल्या माणसांना ऐकायला जाईल असं, अरे यांचं एवढंच साहित्य हाय म्हणायला लागला. वरती साहित्य नेण्याच्या आदीच तो, यांनी सांगून आपलं ऐकलं नाही. आले ते आले खालतीकडचा सोपा तरी घ्याचा का नाही ? आता यांची ही लहान मुलं या जिन्यावरून खालीवर कशी करायची ? नाही जमायचं यांना. पाण्याचं काकांनी चावी जिन्याजवळ आणली असली तरी वरती किती आणि कसं पाणी चढवणार ही ? असंच बोलत राहिला सगळं साहित्य वरती नेलं तरी.
पण त्याचं हे सगळं ऐकत गल्लीतली माणसं आम्हाला आमचं साहित्य माडीवर नेण्याला मदत करू लागली होती. काकांची गेल्यापासून या घराची रया गेली होती ती आता परत येईल म्हणू लागली होती. गल्लीत चालतंबोलतं हे गोकुळागत घर होतं, गावातल्या बारक्या सारक्या माणसांचा सारखा राबता या घरात होता , रातध्याड माणसं या घरादारात दिसायची ती काकांची गेल्यापासून बंद झालीत, नडीतडीला हे घर सगळ्यांना उभं राहिलं, घरातल्या बायका नि गडी माणसंबी कुणाला कधी मागं सर म्हणाली नाहीत, का कुणाला कधी वाकडा शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला नाही, गावातल्या पुढार्यांनी माप त्रास दिला पण कवाच या घरातून वाईट वंगाळ बोलणं आलं नाही, असं बरंच माहिती झालेलं न झालेलं आलेली आम्हाला सांगत राहिली.
पाहिल्याच दिवशी जिना उतरताना मुलगी जिन्यावरून खाली पडली. लगेच शेजारचा शिक्षक म्हणाला, ‘मी काय सांगत होतो.’ पण मुलीला थोडं खरचटलं होतं. मुलगा मोठा तोही जिन्यावरून खाली उतरताना घाबरू लागला. तर तो शिक्षक म्हणायला लागला, ‘माणसांना वर खाली चढता उतरता येईना आणि पाणी या जिन्यावरून वरती नेणार ही माणसं ?’ आम्ही काहीच बोललो नाही.
त्यानंतर आमची लहान असणारी मुलगीही कधीच त्या जिन्यावरून उतरताना पडली नाही की आम्हाला पाणी भरताना काही वाटलं नाही. खरं तर त्याची चावी आमच्यासाठी काकांनी जिन्याजवळ आणली होती आणि त्यांना आणि डॉक्टरना दुसरी चावी वापरा म्हणून सांगितलं होतं त्यामुळं त्या शिक्षकाचा तिळपापड झाला होता. मग त्यानं आम्हाला मागच्या बोअरचं पाणी हौदात कसं शिल्लक राहणार नाही, धुण्याला नि संडसाला ते पाणी आम्ही वापरत होतो त्याची कशी अडचण होईल हे तो आणि मागं असणारा डॉक्टर बघू लागले. आम्ही आमच्या नळाला येणारं पाणीच आमच्याकडं असणारं बॅरेलभर भरून ठेवू लागलो. त्यांची पंचाईत झाली. मागच्या हौदातल्या पाण्याची आम्हाला कधीच गरज पडली नाही.
बाकीच्या दोन खोलीपेक्षा इथं बराच निवांतपणा जाणवू लागला होता. आपल्या घरात राहतोय असं वाटू लागलं होतं. घरमालक आणि त्याची दोन वर्षात सोसलेली कटकट अशी कधीच जाणवत नव्हती.
काका आठपंधरा दिवसातून येत असत. त्यांच्यात्यांच्या कामात ते असत. त्यादिवशी त्याच्याकडं त्यांचे अनेकजण शेतकरी, गावातली माणसं दिवसभर येत. आम्ही घरात यायच्या आदीच ते निगालेलं असत. सुट्टीच्यादिवशी तर मला वाचायला आणि लिहायला या घरात बरं वाटायला लागलं. आमच्याकडं असणारं दोन जापतं म्हणजे तशी चार खोल्यांची जागा होती. आतल्या जापत्याच्या भिंतीलाही खिडक्या होत्या. आम्ही या आतल्या एका खिडकीत आमचा किचन कट्टा केलेला होता. म्हणजे त्याच्यावर शेगडी ठेवली होती. त्या खिडकीत सहज एकादया माणसाला बसता येईल अशा त्या खिडक्या मोठया होत्या. दुसर्या खिडकीचा उपयोग लिहिण्या वाचण्याचं टेबल म्हणून केला होता. त्या माळीवर परत आत एक पोट माळा होता. त्याच्यावर उभा राहिलं तरी घराच्या आढयाला हात पोहचत नव्हता.
खाली अंगणात अंधार पडला की शेतातून दमून भागून आलेली माणसं निजेपर्यंत बोलत बसलेली असत. संध्याकाळ झाली की पोरांचं खेळणं चालू व्हायचं ते जेवेपर्यंत चालत असे. त्याच्या अगोदर घरात असणार्या म्हातार्या बायका कलतीच्या उन्हात बसलेल्या असत. तशीच सकाळी चढतीच्या उन्हाला गल्लीतली म्हातारीकोतारी उन्हं तापत नाहीत तोवर बसलेली असत. या घराचं अंगण कधीच मुकं दिसत नसे. घराच्या गॅलरीत उभा राहून किंवा बसून अंगणातल्या माणसांच्या गप्पात सहज भाग घेता येत असे. त्यांचं बोलणं ऐकत बसायला बरं वाटत असे. अनेक नव्या जुन्या गोष्टी त्यांच्या बोलण्यातून कळत असत.
सुगीच्या दिवसात तर या अंगणात काढलेली पिकं वाळवत घालण्यासाठी कधीकधी लोकांच्यात कचवच होत असे. काहीजण पहाटे उठून अंगण धरून ठेवत असत. या काळात आम्हाला कधीच घरात जाताना चप्पल काढल्याशिवाय दारात जायला यायचं नाही. सगळ्या अंगणात आमच्या चौकटीपर्यंत वाळवण पसरलेलं असे. काका आले तर त्यांची गाडी या दिवसात समोरच्या दारात त्यांना लावायला लागत असे. पण तेही कधीच आपली अडचण करता म्हणून कोणाला बोललेलं ऐकायला येत नसे. वाळवण झालं की लोक तिथंच असणार्या धान्याला वारं देत त्या सगळ्या धुरळ्यानं घर भरून जाई.
सुटीच्या दिवशी मी आणि मुलं मागच्या परड्यात दिवसदिवस बसत असत. मुलांना खेळायला भरपूर जागा होती. गावातली मुलं जमत. भरउन्हात सावलीनं भरून गेलेलं परडं असे. कधीकधी नारळाची पडलेली वाळकी सोपटी तोडून बंब फोड आम्ही करत असे. पडलेलं नारळ डॉक्टर आपल्या मालकीचं असल्यागत कोणाला उचलू देत नसत. काकांना मी देतो म्हणून सांगत. पण काहीजण डॉक्टर नसताना नारळ काढून नेत असत. ती बातमी आमच्या कानावर येत असे. पण नारळाची झाडं एवढी होती आणि त्याला नारळही भरपूर होते. कधीतरी काका नारळ काढणारा माणूस आणत आणि पाचपन्नास नारळ काढून नेत.
एक वर्षी पाऊस लागतो त्याच्यापेक्षा खूपच लागला. गावात येणार्या रस्त्यावर पंधरादिवस पाणी होतं. माणसांना घरात अंथरूण पसरायला सुकी जागा उरली नाही. एवढा पाऊस कधीच लागला नाही असं म्हातारीकोतारी माणसं बोलायला लागली. हे घर अनेक ठिकाणी गळायला लागलं. आम्ही वरती राहत होतो त्यामुळं आम्हाला ते जास्त जाणवायला लागलं. असल्या पावसात कुणाला असल्या या उंच घरावर चढून खापरी घाल म्हणायचं तरी कसं असं वाटू लागलं. आतल्या पोट माळ्यावर चढून आतून जेवढी खापरी सरळ करता येईल तेवढी मी करू लागलो. पण पाऊस एवढा होता की खापरीत पाणी मावत म्हणून नव्हतं. घराच्या मागच्या सोप्यात तर वानारांनी मागच्या झाडावरुन थेट घरावर उड्या मारून बर्याच खापर्या फोडलेल्या होत्या. तरी काकांनी मध्यंतरी चार माणसं लावून शंभर दोनशे खापरी नवीन घातली होती. आणखी लागली तर घालता येईल म्हणून खापरी ठेवलीही होती. दरवर्षी हे काम करावं लागतं असं ते सांगत होते. गावात अनेकांच्या घरात वानरांनी हे काम करून ठेवलेलं होतं. गावातून ती हालत म्हणून नव्हती. या घराच्यामागं तर त्यांना पाहिजे ते झाड होतं. त्यांच्या उड्या आणि खेळण्यांनी मागचा सोपा तर खापरी घातल्यानंतर लगेच चक्काचुर करून टाकला होता म्हणूनच तर तो सोपा एवढा तुंबला होता. भिंती मोठया असल्यामुळं एवढं गळून त्यांना काहीच झालं नव्हतं. माणसं नसलेल्या या भल्या मोठया घरात अगोदरच भीती वाटायची असं हे घर. या पावसाच्या दिवसात तर एकदम गुडुप सगळं, घरावरून जाणारा वारा पाऊस एकसारखा वाजत असे. त्यात वार्यांनं घरामागची पावसात वाजणारी झाडं ही भीती अधिक गडद करत. रात्र होईल तशीतर ही भीती आणखी आणखीन दाट होत जाई. खापरीवर वाजणारा पाऊस आणि वारा मोठं घर असल्यामुळं आणखीन मोठा वाटतो की काय असं अनेकदा मनात येई.
दुसर्यादिवशी समोरच्या घरातला एकजण खाली राहणार्या शिक्षकांच्यात नेहमी बसायला असायचा तो आलेला होता. त्याला त्या सोप्यात भिंतीवरून खाली हळूहळू ओली माती गरंगळत येत असलेली दिसली. त्यानं त्या सोप्याच्या माळ्यावर चढून बघितलं. तर वरती आमच्या बाजूला असणार्या चांदीची भिंत वरती पानश्यावर गळत असल्यामुळं पूर्ण भिजून गरवून घसरत असलेली आणि त्याची चांगली गाडीभर माती वरती सोप्याच्या माळ्यावर पडलेली त्याला दिसली. भिंत भली मोठी चांगली वावभर रुंद होती म्हणूनच ती एवढी उंच असून टिकली होती. पण त्या शिक्षकाच्या लक्षात कसं आलं नाही हेच शेजारीपाजारी बोलू लागले. तर त्याचं काकांचं लक्ष नाही हाच पाढा नेहमीचा सुरू झाला. जुनं मातीचं बांधकाम म्हणूनच टिकलं नाहीतर त्याचं कुटुंब एकदम कधी गाडलं गेलं असतं आणि आमचं उघड्यावर पडलं असतं ते कळलंदेखील नसतं असल्या पावसात हेही बोलणं सुरू झालं. हे बोलणं ऐकून तसल्या पावसात या घरादारात बसणारी आपल्या घरातून पळत आली. त्यांनी माळ्यावर पडलेली माती खाली काढली. भिंतीला चांगलाच बोगदा पडला होता. मग काहीनी शिडीला शिडी जोडून भर पावसातच वरती घरावर चढून भिंतीच्या टाळूवर खापरी फुटलेली बदलून दुसरी घातली. तिच्यावर लागलेलं गळतं थांबवलं. तरीपण भिंत पूर्ण भिजलेली त्याची काळजी प्रत्येकजण बोलत राहिलं. तिला पडलेला बोगद्यानं तिचा जीव कमकुवत झालाय असं बोलणं चाललं. आणि ती बरीच दिवस पडणार्या पावसानं आतबाहीर भिजली असल्यामुळं कवाबी कोसळंल असंही कोणतरी बोललं.
त्या शिक्षकांनं लगेच उगवतीचा सोपा उघडून त्याचदिवशी आपलं सगळं साहित्य घेऊन त्या सोप्यात मांडलं. मला परत काकांचं लक्ष नाही तुम्हाला सांगत होतो हे सांगायला तो विसरला नाही. त्याला तो सोपा पाहिजे होता. त्याला आता काकांना विचारायला असं लागलंच नाही.
पण त्याचा सगळा गबाळ कारभार मागच्या धुण धुण्याच्या हौदाजवळ आणि तिथंच असणार्या संडासजवळ पडू लागला. त्याचा त्रास डॉक्टर आणि आम्हाला होऊ लागला. डॉक्टर तर कायमच तिथं असत. त्यांना तो जास्त जाणवू लागला. त्यांची भांडणं होऊ लागली. मग ते एकमेकाच्या कागळ्या काकांना सांगू लागले. तरी हौदातल्या पाण्याचा वापर असलं तरी करू वाटला नाहीच कधी ते राहत असेपर्यंत. त्यातच ते धुण बुडवत. त्यांना डॉक्टर अनेकदा सांगत. पण त्यांनी त्यात बदल केला नाही.
आता तो शिक्षक खाली सोप्यात बोलायचा ते मी आमच्या वरती माळीवर केलेल्या अभ्यसिकेत ऐकायला यायचं. त्याचं बोलणं चाले, ‘आता पडली तर भिंत पडूदे. एवढया मोठया घरात आम्हाला काही त्याची काळजी करायचं पडलेलं नाही. पडली भिंत तर वरती राहणार्यानाच जावं लागणार. बघा म्हणावं आता आणखी दुसरं घर. राहावा म्हणावं आता वरती ऐसपैस.’ कोण कोण यायचं आणि आम्हाला सांगून जायचं, ‘लय त्या भिंतीजवळ जावू नका. दांडगी भिंत हाय. पोरांना सोडू नका लय तिकडं.’
मग आम्ही त्या भिंतीला आमचं भांड्याचं लावलेलं कपाट हालवलं. जागा भरपूर असल्यामुळं आम्ही आमच्या राहत्या घराची रचनाच बदलून घेतली. त्या भिंतीजवळ असणार्या सगळ्या वस्तू त्या भिंतीपासून एक खण सोडून मांडल्या. त्यादिवसापासून आम्ही आमचं त्या भिंतीपासून लांब अंथरूण घालून झोपायला लागलो.
काकांच्या शेतकर्यांनी तसल्या पावसात आपण या घरादारात उठलो बसलो आहे म्हणत भिंतीवर पडणारा पाऊस थांबवा म्हणून असणार्या खापर्या आणि कागद लावून बंदोबस्त केला. इतकी घराची भिंत भिजून बोगदा पडून आतल्या बाजूला तिला साधा भंग दिसत नव्हता. तरी पाऊस उघडेपर्यंत जीवात जीव नव्हता. रात्र रात्र झोप येत नसे. मुलांची काळजी वाटायची. अगोदरच पावसाची भीती होती ती आणखीन या भिंतीनं वाढवली होती. यातच गावात अनेकांची नवी जुनी घरं पडलीत म्हणून लोक बोलत. याच वर्षी नुकतंच बाधलेलं घर कुणाचं तरी पडलं, कुणाच्या घरावरची कौलं उडून गेली, तर कोण वरती माळाला घर असणारा घराचं पाखं वार्यानं उडालं म्हणून आढयाला बैलाचा कासरा बांधून धरून बसलेला शेवटी आडं उडून त्याचं बावळं मोडलं, कोण खापरी बदलायला गेला आणि घरावरून खाली पडला त्याचा मणका मोडला अशा एक ना अनेक गोष्टी या पावसाच्या मार्यात कानावर आदळत होत्या. मग तर मी पोट माळ्यावर हातात दिवा घेऊन चढून सगळं घर साधा मातीचा ढेकळा पडला तर बघत फिरत असे. भिंती चापचत असे. पण भीती चापचायचा दिवा नव्हता. ती आत लपलेली वार्यांनं काहीजरी वाजलं तरी लगेच जागी होत असे. रात्रीची. दिवसाची. कधीही.
वीज पंधरादिवस नव्हती. पाऊस मात्र थांबला नव्हता. पंधरा दिवसांनी पाऊस थोडा थोडा थांबत गेला. एवढा पाऊस लागून अर्धवट पडलेली तसली ती भिंत आहे तशी राहिली.
मग लोक बोलू लागले, आताची घरं अशी टिकत्यात व्हय? या घराची ताकद लय म्हणून असल्या पावसात एवढी मोठी जखम होऊन ते डगमगलं नाही का हाललं नाही जरादेखील.
काही असलं तरी आम्हाला उघड्यावर पाडलं नाही या घरांनं हेच खरं ! खाली गेलं की तो शिक्षक आमच्या तिला म्हणायचा, ‘बघा जावा दुसरं घर, आम्ही काय आमचं गावजवळ आहे पावसाळा संपला की जाणार आहेच. कोण राहील या गावात आणि असल्या घरात? मालक राहणार शहरात आणि आम्ही भाडं देऊन यांचं घर राखत मरून जायचो.’
ती त्यांना म्हणाली, ‘तुमचं पण सर थोडं लक्ष पाहिजे होतं. एवढी भिंत खाली गरवत आली तरी तुम्ही वरती बघितली नाहीत. वेळेवर बघितली असती तर पडली तेवढी भिंत पडलीच नसती. काका काय आपण राहत असलेल्या घरात सारखंसारखं येऊन बघत बसतील का काय तेव्हा ? नाहीतर आता त्या भिंतीवर येणारं पाणी थांबल्यावर भिंत आहे तशी राहिलीच ना ? आपण राहतो म्हणल्यावर घर आपलं म्हणूनच राह्यला नको ?’
त्याला राग आला की काय माहिती नाही. तो तिला म्हणायला लागला, ‘कोण तरी मला सांगत होतं , सर काय लिहितात म्हणून मग त्यांना एवढं कळत नाही ?’
मग तर तिला त्याचा भलता राग आला तिनं त्यांना, ते काय करतात आणि काय करायचं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही म्हणून चांगलच खडसवलं. त्यानंतर कधीही आमच्याबद्दल त्या उगवतीला गेलल्या शिक्षकांनं तोंड उघडलं नाही की डोळं उघडून मावळतीला बघितलं नाही.
दिवाळी झाली आणि काका मला म्हणाले, ‘सर मी अनेकांना भिंत दाखवून विचारलं तर त्याचं मत ती पूर्ण उतरूनच परत बांधावी लागणार असं मत पडलं. नाहीतर अशी ही भिंत पुढच्या पावसाला तग धरायची नाही. आपली सगळ्यांची वेळ चांगली म्हणायची. त्या सरांचं सगळं कुटुंब राहत होतं. मोठा अनर्थ टळला म्हणायचा. या घराबद्दल जिव्हाळा म्हणून आमच्या या शेजार्यांनी आम्ही इथं नसताना हे घर वाचवलं नि आम्हालाही वाचवलं म्हणायचं. परत ही परीक्षा बघायला नको. ही सगळी भिंत उतरली तर तुमचं सगळं साहित्य उघड्यावर पडणार. काय करता बघा. ’
मला आता आणखी परत घर शोधायची एकदम चिंता लागली. कशाल्या आपण या अडवळणी गावात आलो असंल असं वाटायला लागलं. पगार नसंना का पण आज नाही उद्या मिळंल असं होतं. नाहीतर नोकर्यांची आता फारशी स्थिती चांगली नाहीच. अलीकडं तर संस्थापक आपल्या घरातल्यासाठीच संस्था काढतात आणि शासनाच्या पगारावर आपली घरं चालवतात. आमच्या सारख्यांच्या नोकर्या आता नाहीत हे सर्वत्र दिसत होतं.
मी काकांना विचारलं, ‘तरी किती दिवस लागतील भिंत बांधायला ?’
काकांचं नेहमीचं शेतकरी जमलं होतंच. त्यातला भिवान्ना म्हणाला, ‘ते काय काका सांगणार सर. पण भिंत ही बांधायला पायजेच कायबी करून. नाइतर पुढच्याला कुणाला तरी मोठा धोका करील आणि सगळं घर पडंल. तेवढंच नाई तुमाला सांगतो आसपासची बारकी घरं हे दांडगं घर पाडील. हे जुन्यातलं आणि मोठया भिंती म्हणून तगलं या वर्षीच्या पावसात म्हणा. नाइतर आताची घरं असल्या पावसात एवढं पडल्यावर कवाच पडून नदीला वाहून गेलेली कळायची नाईत. काय लागतय ओ घर पडायला ?’
‘तसल्या पावसात या घरानं आम्हाला उघड्यावर पाडलं नाही ही गोष्ट थोर म्हणायची काका.’ मी म्हणालो नि मला त्या दिवसापासून काय वाटतं या घराविषयी हे नीट सांगता येईना झालं. मी तेवढंच बोलून तसाच थांबलो.
काका सांगायला लागले, ‘आपण गवंड्याला विचारू तरीपण. त्यानं किती दिवसात आम्हाला हे पूर्ण करून द्याचं त्याच्यावर हे आहे सर. काय आहे सगळी भिंत उतरायला लागतीय म्हणून नाहीतर तुम्हाला राहावा म्हणालो असतो. हवं तर दोन महिन्यासाठी घ्या कुणाचं तरी घर आणि या परत.’
मला गावात आता घरासाठी फिरायला नको वाटत होतं. दोन वर्षात या घरात आल्यापासून काका कधीही घरमालक असल्यागत वाटत नव्हतेत की त्यांच्या घरातली कोणही आली तरी त्यांचं वागणं कधी तसं जाणवलं नव्हतं हे होतंच पण या घरानं कोसळणार्या पावसात दाखवलेला विश्वास मला शब्दात सापडत नव्हता. त्या कोसळणार्या पावसाच्या रात्री माझ्या आत मुरलेल्या, भिजलेल्या त्यांची ओल कमी होत नव्हती. त्याची भाषा लिपी कळत नव्हती. पण त्याच्या पलीकडे काही तरी मला जाणवत होतं. ते काय आहे हे मात्र बाहेर पडत नव्हतं.
मध्यंतरी काकांचे वडील नव्वदीच्या घरात आलेलं ते एकदा आलेले ते मला म्हणालेलं आठवलं, ‘आमच्या कुटुंबाला अभिमान आहे तुमच्यासारखा एक लेखक आमच्या घरात राहतो त्याचा.’
मी लिहितो ही गोष्ट मला पहिल्यांदाच इथं कोणतरी एवढया वर्षात बोलत होतं. खरं तर मी लेखक बिखक आहे ते इथल्या लोकांना माहिती नाही ती खूप जमेची बाजू आहे असं मला वाटत आलं होतं. नाहीतर सतत असं डोक्यावर ओझं असतं तर जे काही थोडंबुत लिहिणं होतं आहे तेही झालं नसतंकदाचित. लेखकाला लिहिण्यासाठी लागणारा साठपा त्याच्याभोवती असं काही तरी असलं तर थांबत तर नसेल? त्याची साठवण क्षीण तर होत जात नसेल?
त्यादिवशी काकांचे भाऊ आणि त्यांच्या घरातली सगळीच आलेली होती. गावातली बरीच माणसं जमली होती. तरी गावात आता आता अगदी एक दोघं सोडली तर मी लेखक आहे म्हणजे कोण आहे हे माहिती असायचं कारण असं कधीच पडलं नाही. मग तिथं असणार्या रावसाहेब पाटलांनी भोगावच्या आबासाहेब भोगावकरांच्या घरात असेच लेखक येत असत ते त्या काळात ‘धरती ’नावाचा अंक काढत असं सांगितलं. तर एकदा असेच गदिमा, राय किणीकर आणि पुलं त्यांच्या घरी आले होते म्हणे. त्यावेळी कळ्याच्या आमदार देसायांना आबासाहेबांनी त्या तिघांची ओळख करून दिली. महाराष्ट्रातले हे मोठे लेखक, कवी आहेत म्हणून सांगितलं. आमदार देसाई सगळं ऐकून घेऊन त्यांना विचारू लागले ,‘ हे सगळं ठीक आहे. पण हे करतात काय ते सांगा आबासाहेब?’ त्यावेळी त्या तिघांचा आणि आबासाहेबांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. हे ऐकून तिथं असणारे काकांचे वडील आणि एकदोघंच फक्त हसली. बाकीच्यांना काहीच त्यात हसण्यासारखं काय आहे असं वाटलं नाही. त्याचं मला बरच वाटलं.
त्यानंतर बर्याच दिवसांनी एकदा काकांचे मुंबईला मोठे ऑफिसर असणारे भाऊ रवीदादा ते माझी कुठंतरी बातमी बघून की वाचून थेट काकांना घेऊन मला खास भेटून गेलेलं आठवतं. त्यावेळीही गावातली बरीचजण जमलेली होती ती त्यांना भेटायला. मग आणखीन घर माणसांनी आणि घराच्या आठवणीनं भरलेलं होतं. पण तेवढंच !
मी काकांना म्हणालो, ‘दोन महीने आम्ही काढू आहे तिथंच कसंतरी. नाहीतर एकतर भिंत बांधायची आहे. आम्हाला त्या भिंतीच्या बाजूला एक कागद लावून द्या तात्पुरता आडोसा म्हणून. माप मोठी जागा आहे नाही व्हायची आम्हाला तशी अडचण’
त्यांना काहीच बोलता आले नाही. ते तुम्ही म्हणता तर राहावा म्हणाले.
तिथं असणारा एकजण म्हणाला, ‘ भिंत पाडताना असल्या धुळीत राहणार सर ? आणि एवढी दिवस कागद असला तरी उघड्यावर सगळं पडणार. त्यात तुमची लहान मुलं हायत विचार करा जरा.’
मी म्हणालो, ‘तुमचं खरं आहे. पण आता तर काय उन्हाळाच आहे. दोन महिन्याचा तर प्रश्न आहे. आणि तुमच्या गावात दोन घरांचा अनुभव घेतला आहे मी. परत आणि कुणाचा घ्यायला लावता ?’
काकांनी गवंड्याला दोन महिनेही लावायचे नाहीत म्हणून सांगितलं.
गवंडी भिंत पाडत असताना सांगू लागला, ‘असं दहा पावसाळं लागलं असतं तरी ही भिंत डगली नसती.’
त्यानं दोन महिन्याचं काम दीड महिन्यात चार माणसं जादा लावून पूर्ण करून टाकलं.
त्याचवर्षी मागच्या सोप्याला राहणार्या पंचागवाल्या डॉक्टरनी गावातच जागा घेऊन घर बांधलं आणि ते तिकडं राह्यला गेले. उगवतीच्या शिक्षकांना काका म्हणाले ,‘ परत तुमच्या तुम्ही सोप्यात राहावा. आमचं शेतीचं बारदान आणि बाथरूम तुमच्या राहत्या सोप्यात आहे. आम्ही आलो की आम्हाला पंचाईत होते.’ तर त्यांनं, राहतो राहतो म्हणत चार महीने घालवले. त्याला बोअरचा खटका तिथं आणि बाथरूम तिथंच असल्यामुळं तो सोपा सोडू वाटत नव्हता. उलट आहे त्या घरात घ्या की बाथरूम करून म्हणून त्यानं काकांच्या मागं लकडा लावला. कधीकधी काकांना ते नसले तर त्या सोप्याच्या दाराला कुलूप असल्यामुळं पाण्यासाठी दुसर्याची दारं फिरायला लागायची. मग एकदा त्यांनी बोअरचं कनेक्शनच आपल्या मुख्यघरात घेऊन बाथरूम करून घेतलं.
आता मागच्या सोप्याला असणारे पंचागवाले डॉक्टर तिथं नसल्यामुळं मागं असणारा हौद हा गावासाठी खुला झाला होता. लोक आपली गुरंढोरं धुवायला तिथंच आणून हौदाचं पाणी शेणकट मातकट करून टाकू लागले होते. आम्ही नाहीतर काकांनी कधी विचारलं तर एकमेकाची नावं ती सांगत. पण मागं तसं पुढं तेच चालवत. माडीवर पाणी न्याला खूप त्रास होतो म्हणून काकांनी बोअरचं कनेक्शन आमच्या वरच्या बाथरूम मध्ये दिलं. आमचा पाण्याचा त्रास बराच कमी झाला. त्यामुळं आमचंही मागच्या हौदाकडं फारसं लक्ष नव्हतं.
दिवसभर शेजारीपाजारी परड्यात असणारी झाडं त्यांची मोडतोड करू लागले. नारळ कोणाचं कोण काढून नेऊ लागले. बोअरची पाईप वरचेवर जनावरं धुताना फुटू लागली. नाईलाज झाला म्हणून काकांनी घराच्या परड्याला कुंपण घातलं. तेही आठ दिवस कसं तरी राहिलं. आम्ही बोलवं तर काहीजण तुमचं घर आहे का म्हणून विचारू लागली. हे घर सगळ्यांचं आहेही नि नाहीही असं मी म्हणू लागलो. तर लोक घराच्या रोज नव्या मी ऐकलेल्या न ऐकलेल्या आपल्या आपल्या कहाण्या सांगत. आम्ही या घरासाठी काय केलं ते प्रत्येकजण बोलत. कोण घरामागच्या विहीरचा विषय काढत. ती आता मुजली म्हणून दाखवत. तिचं गाव सगळं पाणी नेत होतं म्हणून सांगत. थोरल्या ताई आणि किसन आण्णा, हे काका कोणच कधी एका शब्दानं कुणाला बोलायचं नाहीत हे तर हमखास लोक सांगत.
नंतर नंतर तर अनेकांनी या भल्या मोठया घराच्या भल्या मोठया आठवणी सांगत भल्या मोठया परड्यात शेण टाकून शेणाच्या गारी केल्या. तिथंच बायका शेणी लावू लागल्या. काकांच्या कानावर या गोष्टी जाऊ लागल्या. काका कधी येतील तेव्हा बोलू लागले तर आम्ही याच वर्षी लावल्यात शेणी पुढच्यावर्षी नाही लावत म्हणून त्याच बायका सांगू लागल्या.
मग काका मला सांगत, ‘या लोकांच्यामुळं या खालच्या सरांचं कुटुंबही वाचलं आणि आमचं घरही म्हणा. नाहीतर आमचं हे घर त्या पावसात पडलेलं आम्हाला नदीवरचं पाणी उतरल्यावरच कळलं असतं. वापरूदेत पण मोडतोड करून गहाण करून टाकूने म्हणून बोलायचं. ते या लोकांना समजत नाही सर.’
तरीपण त्यांना या मोठया घराची डागडुजी करण्याचा कंटाळा आला होता हे त्यांच्या बोलण्यात आता वरचेवर येत होतं. एवढा मोठा पसारा त्यातली अडगळ आवरताना आणि त्याची व्यवस्था लावताना त्यांची दमणूक होत होती. प्रत्येकवर्षी घरावर खापर्या घालून नि गळती काढून, भिंतीला कागद लावून गळायचं ते काही केल्या थांबत नव्हतं. पण एवढं करून परत प्रत्येक पावसाळ्यात भीती होतीच. प्रत्येकवेळी कोणाकोणाला सांगायचं आणि कायकाय सांगायचं ? तरी ते थांबत नव्हतं. घर झाडायचं म्हणालं तर दोन दिवस लागत होतं. त्यात आपण आठवड्यातून एकदा तासभरासाठी येतो आणि हे डागडुजीच बघायचं की शेताचं बघायचं असं त्यांना सारखं वाटू लागलं होतं. मला तुम्ही राहताय तेवढंच आमचं घर हालतं बोलतं आहे म्हणून ते समाधान बोलून दाखवत कधीकधी. आता आमचं कोण यायचं आणि कोण राहायचं इथं म्हणून ते चिंताग्रस्त होत.
मग त्यांनी सारख्या सारख्या किती खापर्या घालायच्या आणि त्यांचा उपयोग नाहीच होत म्हणून आहेत्या घराच्या वाशावर कोणीतरी सांगितलं म्हणून किमान भिंतीपुरता पत्रा मारून घेतला. पण तो काही त्या घरानं बसू दिला नाही असंच त्याचं ते पत्रा मारलेलं रूप बघून वाटायला लागलं. मध्येमध्ये कौलं आणि भिंतीवर पत्रा. मलाही ते कसंच दिसू लागलं. तरीपण घराच्या संरक्षणासाठी म्हणून चांगलं झालं म्हणालो. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यावर्षी नवीनच गळती लागली. ती काढणं काही केल्या जमंना झालं. मग वानारांच्या घरावरच्या उड्या थांबाव्यात म्हणून त्यांनी घरालगत असणारी दोन मोठी झाडं तोडली. पण बाकीच्या झाडावर असणारी वानरं काही केल्या कमी झाली नाहीत. त्यांचा मुक्काम काही केल्या हलला नाहीच. घराच्या या परड्यात तासतास बसलो तरी कंटाळा यायचा नाही. मग त्यांना तरी कसा येईल असं मला वाटत असे. अनेक पक्षी आणि चिमण्या तर हमखास दिवसभर या झाडावरून हालायच्या नाहीत.
एवढं करून घराची गळती निगत नाहीत. परत पडायची भीती.
काका एकेदिवशी मला म्हणाले, ‘हा डोलारा आहे सर. पूर्वीच्या माणसांना म्हणजे आमच्या आदीच्या पिढीला याची गरज होती. मलाही इथं येऊन राहावं वाटतय. पण आताच्या पिढीला नाही असल्या एवढया मोठया घरात राहावं असं वाटत. पूर्वीची माणसं एकत्र राहत होती. त्यामुळं घरात माणसं खूप असायची. हा असला डोलारा सांभाळायलाही त्या सगळ्यांना मिळून काही वाटायचं नाही. आता मी आलो तर हे बघणार. आमचे भाऊ नि आमची मुलं हे बघतील असं मला तरी वाटत नाही. त्यांच्या नोकर्या शहरात. ते कधी आले तर तास घटका थांबायला येणार. मला इथं एकाला ठिगळ लावावं तर दुसरीकडं फाटलेलं आता सांधायची ताकद नाही राहिली. पूर्वीची माणसं हाकेला ओ द्याची. त्यांना गरज होती. आता त्यांनाही नाही राहिली ती गरज. आणखी एवढं मोठं घर गैरसोईचं नको आहे कुणालाच.’
त्यांचं खरं होतं. आता तर आमच्याशिवाय त्या घरात कोण राहत नव्हतं. शेजारचे राहणारे शिक्षक तेही गेले होते. आम्ही पूर्वी राहत असलेल्या घरात खाली राहणार्या बाई एकदा अशाच रडत आलेल्या. ते घरमालक खूप त्रास देतात मी इथं राहतो म्हणून. त्या मध्यंतरी काही दिवस गेलेल्या शिक्षकाच्या जागी राहिल्या होत्या. त्यांचीही बदली झाली होती.
काका कधीकधी मला म्हणायचे, ‘सगळे घर तुम्ही वापरा.’
पण आम्ही चार माणसं. या घरात पाचपन्नास माणसं असली तरी कमी. त्या घरात आमच्या चार माणसांचं काय ? आहेत ते दोन जपत तेवढं आम्ही नीट ठेवून राहत होतो.
काकांनी एकदा हा विषय आपल्या भावांना सांगितला. सगळ्या भावांनी त्यांना आपण कधीतरी जाणार आपल्याला एवढं मोठं घर काय करायचं म्हणून सांगितलं. त्याची डागडुजी करून त्याची सतत काळजी करण्यापेक्षा आहे ते घर पाडून त्या जागी छोटा बंगला बांधायचं ठरलं. ती गोष्ट काकांनी अनेकदिवस कोणाला सांगितली नाही.
त्यांना हे करणं अवघड नव्हतं. पण त्यांचं मन या गोष्टीला धजवत नसावं !
एवढं मोठं घर कधी आलं तरी साधं झाडून थांबायचं म्हणलं तरी झाडायला दिवस जायचा.
मग त्यांनी ही गोष्ट आपल्या शेतकर्यांना सांगितली. त्यांनाही वाईट वाटलं.
काहीजण त्यांना हेच करा म्हणाले. तर काहीजण त्यांना मागच्या परड्यातली झाडंही ठेवू नका म्हणाले. आणि ही बातमी शेजारीपाजारी पसरली.
नाहीतर कधीतरी तासभर थांबायला एवढा डोलारा कशाला ?
त्यानंतर एकेदिवशी मी नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण करून गॅलरीत बसलो होतो. खाली घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे माणसं बसली होतीत. त्यांच्यात हाच विषय होता. मला त्या विषयानं कसंतरीच झालं. अनेक दिवस हा विषय काकांच्या पुरता होता. तो आता सगळ्यांचा झाला होता. सकाळच्या चढत्या आणि संध्याकाळच्या कलत्या उन्हाला बसणारी म्हातारी कोतारी माणसं म्हणायला लागली, ‘काकांचं हिथं कोण राहायचं म्हणून सांगा. नाईतर हे घर आजून चार डुया तरी हालयचं नाई. घराचा माल काय हाय. असलं लाकूड सामान आता नाई मिळायचं नि कारागीरबी नाईत आता आसलं घर बांधायला मिळायचं. एवढया मोठया पावसात गाडीभर माती भिजून खाली पडली तरी भिंत डगली का व्हाईच तरी? या घरावर वरीसभर पाऊस पडला तरी हे घर घनमनायचं नाई. आता काय हाय, त्यांचं इथं कोण राहयाचं नाई म्हणून सांगा. नाईतर या घराला काय हुतय चालतं बोलतं असल्यावर.’
मला आठवू लागलं, या काही वर्षात याच घरात माझं वाचन लेखन स्वस्थपणे मला करता आलं.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लेखकपणाचं डोक्यावर कोणतंही ओझं न ठेवता माझ्याशी संवाद या घरानं सादला. माझा मला पैस या घरात मला मिळाला.
याच घरात आमची मुलं लहानाची मोठी झाली. दुसर्याच्या गावातलं हे घर कधी माझं वाटायला लागलं ते मला या घरानं कळूच दिलं नाही.
दोन-तीन दिवस गेलं आणि खाली बोलणारी म्हातारी माणसं परत तेच तेच बोलू लागलेली थांबली. मग काही दिवस गेले आणि कोण कोण कर्ती माणसं बोलू लागली तेव्हा मी फारच अस्वस्थ झालो.
त्यातलं कोण तरी म्हणत होतं, या घराचं लाकूड सामान काकांना म्हणणार मला द्या.
कोण म्हणत होतं, ही मोठी चौकट तुमच्या बंगल्याला काय कामाची म्हणून मी सांगणार ती मला द्या. कोण म्हणालं , घरामागची झाडं चार दिवसात तोडणार आहेत. तर कोण , खापर्या , वासं तुळया आणि दगड माती आपण मागणार.
हे त्यांचं घराच्या अंगणातलं अंधारातलं जोरात बोलणं ऐकून मला कसंतरी झालं.
घर पाडून बंगला बांधायचा ही गोष्ट काका मला बोलले होते. पण माणसांचं हे जोरात चाललेलं बोलणं माझ्या मनात खोलवर रूतलेलं काही केल्या कधीच निगालं नाही.
त्यानंतर काका आले तर ही गोष्टी ते कधी फार बोलायचे नाहीत.
मला त्यांनी ही गोष्ट बोलूने असं वाटत होतं. मात्र लोकांचं हे बोलणं चालूच होतं.
मला आपल्याला दुसर्या घराचा शोध घ्यावा लागणार या गोष्टीची काळजी लागलेली काही केल्या जात नव्हती. त्यापेक्षा हे घर आता काही दिवसांनी इथं दिसणार नाही ही जास्त काळजी लागली होती. मी घराच्या भिंती आणि सगळं घर सारखासारखा डोळ्यानं नि हातानं चापचत असे. याच घराच्या अनेक कथा सांगणारी आसपासची माणसं आपल्याला यातलं काय मिळंल का म्हणून काकांच्याकडं कधी येतील तेव्हा हाच विषय काढत होती. काका त्यावेळी गपगप होत होते. तरी प्रत्येकवेळी मला नको असलेला हा विषय माणसं काढत होतीच. मी आणखीन काळजीत पडत होतो. कधीकधी मला वाटत होतं. सगळ्या घराची डागडुजी करून आम्ही हे घर वापरतो म्हणून काकांना सांगावं. पण काका एवढे वतनदार त्यांना हे पेलंना आणि आपल्याला हे पेलंल? हा विचार मनात यायचा आणि सगळं थांबायचं. पण काय करावं ते मला कळत नव्हतं.
पण दिवसेंदिवस काहीतरी आपलं हरवत आहे ही गोष्ट मला हलवत होती.
शेजारीपाजारी हे घर पाडायचं विषय काढत त्यावेळी त्यांचा भलता राग येत होता. मी आता त्यांच्याजवळ फारसा थांबत नव्हतो. रात्री जेवण झाल्यावर खाली बोलत बसणार्या माणसांचं बोलणं मला आता ऐकूने असं वाटू लागलं होतं. या घरातल्या लहानसहान वस्तू आपण काकांना सांगून कशा आपल्याला मागायच्या हीच जास्त चर्चा कानावर येत होती. त्यांना नाहीतर या वस्तूंची काय गरज अशी चर्चा सुरू होती. अगदी बसायचं पाट, मोठयाच्या मोठया भाकरीच्या लाकडी काटवटी, वरवंटा पाटा, मोठंच्या मोठं कधी काळची ताक हलवायची रवी, मुसळ आणखी काय नि काय.
काका नवीन घर बांधतील तेव्हा या वस्तू त्या वास्तूत मावणार नाहीत ? अशा वस्तू आताच्या घरात मावत नाहीत की साठवता येत नाहीत? त्या फक्त मनातच साठवून ठेवता येतात की काय? नाहीच रोवता येत दळणाचं जातं असल्या घराच्या चकचकीत फरशीवर, नाही रोवता येत आताच्या फरशीगत असणार्या जमीनवर धान्य काडण्याचं उखळ, आणि नाही ठेवता येत असल्या घरात बिनकामाचं मुसळ. नाहीच असल्या घरात ठेवता येत भिंतीला खुंटी आणि नाहीच अडकवता येत तिला दोरी कासरा. नाहीत असली घरं साठवणीची. नाहीच असल्या घरात सगळ्या माणसांना एकत्र झोपता येण्यासारखी जागा असत. नाहीच असल्या घराची दारं सताड उघडी ठेवता येत. आणि आताच्या बंगल्यात ठेवलं जरी कुरपं, कुदळ, फावडं, आयदान, विळा पारळी आणखी काही तरी नाही दिसत बरं. ती वाटायलाच लागते अडगळ. जास्त माणसं झाली तरी आणि असलं साहित्य ठेवलं तरी!
मला काका खरंच या सगळ्या वस्तू कुठं ठेवणार असा प्रश्न पडलाच. का हे लोक बोलतात तसं या अडगळीच्या वस्तू या घरातून एकदम जाणार? कायमच्या? माणसांसारख्या?
मंध्यतरी मी शिकत असलेल्या गावी गेलेलो मला आठवलं. मी ज्या घरात राहत होतो त्या घराच्या दारात उभा राहिलो. तर त्याचं रूप एकदम बदलेलं मला दिसलं. ती म्हातारी मला दिसली नाही. मी थोडी चौकशी केल्यावर समजलं तिच्या सावत्र मुलानं हे घर विकून टाकलं. घराला पोटच्या मुलागत जपणारी म्हातारी पोरकी होऊन त्याच घराच्याभोवती फिरत असलेली मला दिसली. मी तिला बोलवलं. एक शब्द ती बोलली नाही. ती हरवली होती. एकसारखी नुसती घराकडं बघत होती. आता आपलं या जगात कोणच उरलं नाही असं तिला वाटत असावं!
एकेदिवशी काकांनी मला बोलावलं. मला अंदाज आला होता. तरी माझ्या छातीत धडधड होऊ लागलं. त्यांच्या चेहर्यावर तिच गोष्ट मला दिसत होती. ते बराच वेळ काहीच न बोलता स्तब्ध होते. त्यांना काही सुचत नव्हतं की सांगता येत नव्हतं? पण त्यांच्या मनाची पडझड लपत नव्हती. कितीतरी वेळ आमच्यात शांतता होती. दुपारची उन्हं अंगणात नाचत होती. तसल्या तापल्या उन्हात अंगणात कोण असणार?
काका मला जड आवाजात म्हणाले, ‘सर, आमचं आता फायनल झालं. हे घर पाडायचं. मागची असणारी झाडंही विकायची आणि छोटासा याच जागेवर बंगला बांधायचा असं ठरलं.’ हे बोलता बोलता त्यांचा गळा भरून आला. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. माझ्या डोळ्यात उभं राहिलेलं पाणी मला त्यांना दाखवू वाटलं नाही. पण मी पुरता ढासळलो. मला काहीच सुचत नव्हतं? का माझ्या लक्षात आलं की काय डोळ्यात पाणी उभं राहिल्यागत आतला उमाळा फुटंल म्हणून? आणि आपण खूप फुटत राहिलं म्हणून? कदाचित भरकटतही राहिल की काय असं तरी वाटलं नाही मला? काय झालं हे मला माहिती नाही. मी सावरलं. काहीच न बोलता चटकन उठलो. आता त्यांनी माझ्याकडं आणि मी त्यांच्याकडं बघावं हे धाडस माझ्यातही राहिलं नव्हतं. आणि त्यांच्यातही.
मी जिना कसाबसा चढून वरती आलो. माळीवरल्या माळीवर नुसता एकसारखा फिरत राहिलो. संध्याकाळ झाली. तरी तेच चालू होतं. जेवावं असं वाटलं नाही. दररोजच्यासारखेच खाली अंगणात लोकं बोलत होते. तरी ते काय बोलतात ते गॅलरीत बसलो तरी ऐकायला आलं नाही. नुसता गोंगाट आहे असं वाटायला लागलं.
रात्र पडली तरी झोप अशी आलीच नाही. घरामागची झाडं, परडं, पुढचं अंगण, मोठया भिंती, गॅलरी आणखी काय नि काय सगळं घरच सताड उघडं झालं. कधी बंद न होणारं. आपल्या बरोबर मला कोसळत. निमूट. स्तब्ध. माझ्याकडं बघत राहणारं. सगळं साठवून ठेवणारं. एकही अक्षर न बोलणारं. मुकं. मला गरवार करून जाणारं. बस जन्मभर साठवत, जपत म्हणणारं.
गावाकडं मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा मला कधीकाळी दादांनी बोललेलं हमखास आठवतंच. आमच्या घराचं नि चुलत्याच. आता तर दादा आणि चुलतेही या जगात नाहीत. ते काही वर्षापूर्वी सगळ्यांना सोडून गेलेत. तरी त्यांनी साठवून ठेवलेलं त्या घराचं नि चुलत्याचं नातं काही केल्या माझ्यातून सांडत म्हणून नाही. ते चुलते दिसू लागले. नुसते हसणारे. घरभर आल्यावर काहीच न बोलता फिरणारे.
मग मला आणखी एक गोष्ट आठवली: आई नेहमी म्हणते, आताची ही नवी घरं नुसती एकटया दुकटया माणसांची घर हायत. साठप्याची (साठवणीची) नाहीत ! आणि माझ्या आत चिंतेची एक घट्ट काळीमिट्ट अंधार सावली पसरली. मला वाटू लागलं, आपल्या एकूण सगळ्या जगण्यातला पैस तर दिवसेंदिवस या काळात छोटा होत निगाला नाही?
खूपच छान सर, गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या
खूपच छान! हृदयस्पर्शी! लेखन शैलीचे वर्णन करायला शब्द अपुरे!
खूप सुंदर शैली आहे, वाचता वाचता मातीत पाय उमटवायला लावणारी, घराचे सगळे सांदी कोपरे मनात जिवंत करणारी. अन् शेवटी काळजाला गलबलायला लावणारी.
मनःपूर्वक अभिनंदन सर! 💐💐💐