हाकारा | hākārā च्या मागील अंकाप्रमाणे आताचा अंकही ‘मौन’ ह्या संकल्पनेच्या विविध कंगोऱ्यांचा वेध घेऊ पाहतो आहे. ह्या संदर्भात, चिंतनशील कलाकार आणि कलाभ्यासक म्हणून ओळखले जाणारे संगीतकार कौशल इनामदार ह्यांचे, संगीत ही ललितकला आणि मौन ह्यांतील परस्परसंबंधांविषयीचे विचार आणि अनुभव जाणून घेण्यासाठी अनघा मांडवकर ह्यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद दृक्श्राव्य व शाब्द अशा दुहेरी स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. ‘हाकारा | hākārā’ नियतकालिकातर्फे आयोजित केल्या गेलेल्या ह्या मुलाखतीत कौशल इनामदारांनी स्वतःच्या आणि अन्य कलाकारांच्या सांगीतिक आविष्कारांची उदाहरणे देत, म्हणजेच प्रात्यक्षिकांतून आपले मौनाविषयीचे म्हणणे मांडले आहे. सूक्ष्मसखोल चिंतन आणि सांगीतिक अभिव्यक्तीतील तरलता ह्यांचे मिश्रण असलेली ही मुलाखत दृक्श्राव्य स्वरूपात अनुभवता यावी, म्हणून ह्या संपूर्ण संवादाची ध्वनिचित्रफीत इथे उपलब्ध करून देत आहोत. सदर मुलाखतीतून कौशल इनामदारांसोबत घडलेल्या मौन, संगीत, नाटक, कलानिर्मिती, कलास्वाद ह्यांसंबंधीच्या सह-चिंतनाविषयीचा अनघा मांडवकर ह्यांचा लेखही सोबत देत आहोत.
‘संगीतकला आणि मौन’ ह्याविषयी कौशल इनामदार ह्यांच्याशी साधलेल्या संवादातून अनुभवलेल्या सह-चिंतनाविषयी अनघा मांडवकर ह्यांचा लेख
‘हाकारा | hākārā’च्या मागील अंकात माझा ‘शांतता ! नाटक सुरू आहे …’ हा नाट्यकलेच्या संदर्भात मौन ह्या संकल्पनेविषयी विचार करू-मांडू पाहणारा लेख प्रकाशित झाला होता. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार ह्यांनी ह्या लेखाविषयी प्रतिसाद पाठवताना त्या संदेशामध्ये, मोत्झार्टचं संगीतकला आणि मौन ह्यांविषयीचं एक मार्मिक विधान लिहून पाठवलं होतं. ते विधान वाचताना मनात आलं की नाटकाप्रमाणे संगीत ह्या कलेच्या संदर्भातही मौन ह्या संकल्पनेबाबत धांडोळा घेऊन पाहायला हवा. संगीतातलं मौनाचं स्वरूप व स्थान आपल्याला कोण समर्थपणे उलगडून दाखवू शकेल, ह्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा त्या प्रतिसादपर संदेशातूनच नजरेसमोर आलं — कौशल इनामदार. हा विचार करताना, कौशल इनामदारांनी मराठीत आणि हिंदीत संगीतकार व गीतकार म्हणून शुभ्र कळ्या मूठभर, गर्द निळा गगनझुला इत्यादी गीतसंच, गोष्ट संयुक्त मानापमानाची इत्यादी नाटकं, नॉट ओन्ली मिसेस राऊत, बालगंधर्व, अजिंठा, यलो, रंगा पतंगा, इट्स ब्रेकिंग न्यूज इत्यादी चित्रपट, चार दिवस सासूचे, ४०५ आनंदवन, मराठी पाऊल पडते पुढे इत्यादी दूरचित्रवाणी-कार्यक्रम, आणि अनेक जाहिराती अशा विविध माध्यमांसाठी स्वतःची अनवट वाट चोखाळत केलेलं महत्त्वपूर्ण काम तर डोळ्यांसमोर होतंच; पण त्यासोबतच, त्यांचे संगीत-साहित्यविषयक अनोखे कार्यक्रम-उपक्रम, तसंच मुलाखती, नियतकालिकांतील सदरं, अनुदिनी, यूट्यूब वाहिनीवरील कौशलकट्टा इत्यादी माध्यमांतून अभिव्यक्त होत आलेली त्यांची संगीत, भाषा, साहित्य, कला, संस्कृती ह्यांविषयीची सखोल जाणकारीही महत्त्वाची वाटत होती. आम्ही दोघंही रुपारेल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे संगीतकलेतील त्यांच्या सर्वपरिचित यशस्वी वाटचालीआधीच्या महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या नाट्यकलेशी जुळलेल्या अनुबंधाविषयी ऐकून माहीत होतं. रुपारेलमध्ये शिकताना त्यांनी चेतन दातारांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेलं नाट्यकलेचं प्रशिक्षण आणि विशेषतः एकांकिकालेखनाकरिता मिळवलेली पारितोषिकं ह्याविषयीच्या माहितीमुळे ही मुलाखत घेताना माझ्या मनात अनेक उद्देश होते. संगीतासोबत नाट्यकलेविषयी व एकंदर कलाव्यवहाराविषयी एका सुजाण, प्रतिभाशाली, विचारशील कलाकाराची मतं, भूमिका, संकल्पना जाणून घ्याव्या, तसंच त्यांच्याकडून नाटक, भाषा, साहित्य, कला व संदेशन ह्यांचा अभ्यास करतेवेळी मला खुणावत राहिलेल्या नाट्यकलेतील संगीताच्या व मौनाच्या योजनाविषयीच्या काही प्रश्नांसंबंधीही समजून-उमजून घ्यावं, अशी इच्छा मनात घेऊन मराठी रंगभूमिदिनी, दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४च्या संध्याकाळी, कौशल इनामदारांच्या ठाण्यातील शांत-निवांत स्टुडिओमध्ये त्यांना भेटले. ह्या भेटीतून एक सुंदर व अनोखं संवादसत्र साकारलं. अनोखं ह्या अर्थाने की हा ‘शांतते’विषयीचा संवाद होता, हे दोन संवादकांनी एकमेकांशी बोलत बोलत ‘मौना’चं म्हणणं समजून घेणं होतं.
संगीत ही नादातून अभिव्यक्त होणारी श्राव्य ललितकला. आणि मौन म्हणजे साधारणतः नादरहितता असं म्हटलं जातं. नाद आणि मौन ह्या दोन्ही वरकरणी एकमेकांच्या विरोधी वाटणाऱ्या पण परस्परसापेक्षतेने अस्तित्वात असणाऱ्या अत्यंत मूलभूत आणि रोचक संकल्पना आहेत. मुलाखतीच्या सुरुवातीला, ह्या दोन पायाभूत, केंद्रवर्ती संकल्पनांविषयी बोलताना कौशल इनामदारांनी महाविद्यालयीन जीवनात लिहिलेल्या आपल्या एका कवितेचा उल्लेख करीत, आणि लहानपणी ऐकलेल्या आजीच्या, आईच्या अंगाईगीतांच्या व मंगेश पाडगांवकरांच्या ‘पान जरा हलले’ ह्या कवितेच्या चालीतील मौनयोजनेच्या आठवणी सांगत, ‘‘सायलेन्स इज गोल्डन’ असं कोणी कितीही म्हटलं, तरी मौनाचं कौतुक करायचं असेल तरी त्याकरिताही ध्वनीचाच उपयोग करावा लागतो. पृथ्वीतलावर नीरव शांतता नावाची काही गोष्ट नाही, ती कृत्रिम रीतीनेच निर्माण करता येते. ह्या निसर्गचक्रात ध्वनी हा अखंड सुरू असतो, नादाच्या सापेक्षतेनेच मौन जाणवतं,’ ही नाद आणि मौन ह्यांविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली.
नादाच्या सापेक्षतेने जाणवणारं हे मौन व्यापक, बहुरूपी असतं. ते विविध कलांत विविध प्रकारे, विविध रूपांत वावरतं. संगीतातील मौनाचं स्वरूप कसं असतं, कोणकोणत्या प्रकारे मौन संगीतात वावरतं, आणि ते संगीतात का योजलं जातं, कोणती कार्यं करतं किंवा करू शकतं, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं. माझ्या ह्याविषयीच्या प्रश्नांचं उत्तर देताना, मोत्झार्टचं “दोन सुरांमधलं मौन म्हणजे संगीत,” हे विधान उद्धृत करून, कौशल इनामदारांनी ‘दोन सुरांतील मौनालाही आपल्याला ऐकू येत नाही असा एक नाद आहे, तो ऐकू येत असेल तर एक सलगता आपल्या मनात निर्माण होते; पण ह्याकरिता आपल्यामध्ये सुरांतील, श्रुतींतील सूक्ष्म फरकांचे बारकावे जाणवून घेऊ शकणारी प्रतिभा व प्रगल्भता असावी लागते. शांतता अशी काही गोष्ट स्वतंत्रपणे ऐकवली जाऊ शकत नाही, तर विशिष्ट स्वरांतून, आवाजांतून त्यांत अनुस्यूत असलेलं मौन ऐकणाऱ्यांना आपापल्या मनात जाणवत असतं,’ हे विचार मांडले. तसंच, आपले गुरू पं. सत्यशील देशपांडे ह्यांच्या ‘गान गुणगान’ ह्या पुस्तकाचा संदर्भ देत व ‘राधा’ ह्या नामोच्चाराविषयीचं आपलं खास निरीक्षण नोंदवत भारतीय तालप्रक्रियेतील ‘आवर्तना’चं वैशिष्ट्य व ‘खाली-भरीच्या जागा’ ह्या पायाभूत संकल्पना उलगडून सांगितल्या.
कौशल इनामदारांना त्यांच्या आईच्या वडिलांकडून — प्रसिद्ध व्हायोलिनवादक शंकरराव बिनीवाले ह्यांच्याकडून — संगीताचा वारसा लाभलाय. संगीतकार कमलाकर भागवत आणि शास्त्रीय संगीतक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार नि गुरू पं. सत्यशील देशपांडे ह्या गुरुजनांकडे त्यांनी अध्ययन केलंय. ह्या सर्व गुरुजनांच्या सहवासातून, त्यांच्याशी झालेल्या चर्चांतून किंवा त्यांच्या रियाजांतून, कलाविष्कारांतून त्यांना मौन ह्या संकल्पनेसंबंधीचं काही मर्म गवसलं असेल का, ह्याविषयी माझ्या मनात कुतूहल होतं. ‘एकान्तात गाणं बदलतं, त्याला गुणगुणण्याचं गुणवैशिष्ट्य (क्वालिटी) येतं. हल्ली हे गुणवैशिष्ट्य हरवत चाललंय, मौनात ऐकण्याची प्रक्रिया (जी निष्क्रिय स्वरूपाची नसते,) हरवत चाललीय. असं ऐकणं शिकवलं पाहिजे, कारण श्रोत्यांचं मौनातील ऐकणं कलाकारांना समृद्ध करतं, संगीतातील कलाकृती ही ऐकणाऱ्याच्या मौनाच्या सापेक्षतेने अस्तित्वात येते,’ अशा मुद्द्यांच्या आधारे संगीतकलेच्या संदर्भातील मौनाचं महत्त्व अधोरेखित करताना कौशल इनामदारांनी आपले आजोबा शंकरराव बिनीवाले ह्यांच्या स्वान्तःसुखाय ‘म्यूट’ व्हायोलिनवादनाचं आपल्या लहानपणी अनुभवलेलं रूप, तसंच कुमार गंधर्वांच्या गंभीर आजारपणाच्या काळात त्यांनी रचलेल्या बंदिशींच्या वेगळेपणाविषयी गुरू पं. सत्यशीलजींकडून कळलेल्या गोष्टी, ह्या स्मृतींना उजाळा दिला; आणि ज्ञानदेवांपासून बालगंधर्वांपर्यंतच्या प्रगल्भ प्रतिभावंतांनी ‘मायबाप’ श्रोत्यांच्या रसिकतेच्या केलेल्या गौरवामागील कारणांविषयीचा आपला तर्क मांडला. मौनरूप श्रवणासाठीचा संयम, प्रगल्भता, रसिकांच्या अशा मौनातून संगीताला मिळणारं अस्तित्व ह्यांविषयीच्या त्यांच्या मतांतून कलाकार आणि रसिक हे दोघं मिळून संगीताचा जो अनुभव घेतात, त्याकरिता मौनाचा अवकाश कसा आवश्यक असतो, हे संगीतगत मौनासंबंधीचं अजून एक परिमाण उलगडलं.
कौशल इनामदार ह्यांच्या लेखनातून, यूट्यूबवरील संवादफितींतून हे सतत जाणवत आलंय की ते विविध कलाक्षेत्रांतील जुन्या-नव्या, भारतीय-पाश्चात्त्य कलाकारांच्या कामांचा जाणकार रसिकतेने आस्वाद घेत आलेयत, अभ्यास करीत आलेयत. अशा आस्वादक-अभ्यासक कलाकारांच्या कलाजाणिवांवर गुरुजनांइतकेच पूर्वसूरींच्या कलाकृतींचेही संस्कार होत असतात. म्हणूनच ह्या मुलाखतीदरम्यान त्यांना हे आवर्जून विचारावंसं वाटलं की, कोणत्या कलाकारांच्या कलाकृतींतील, विशेषतः संगीत-कलाकृतींतील मौनाचं योजन त्यांना कधी लक्षणीय वाटलंय का किंवा प्रभावित करून गेलंय का ? ह्या प्रश्नावर बोलताना, त्यांनी श्रीनिवास खळे, आर. डी. बर्मन, मदनमोहन, एम. एम. क्रीम ह्या संगीतकारांच्या संगीतरचनांची, शंकर-एहसान-लॉय, ए. आर. रहमान ह्या संगीतकारांनी कल्पकतेने योजलेल्या पार्श्वसंगीताची, तसेच विशिष्ट गायक-गायिकांच्या आवाजांची एकाहून एक सुंदर उदाहरणं गुंफत संगीतातून प्रत्ययास येणाऱ्या शांततेचं सौंदर्य व कार्य समजावून सांगितलं.
ह्या सर्व पार्श्वभूमी-परिचयातून कौशल इनामदारांच्या कला, संगीत, मौन ह्यांविषयीच्या भूमिकेची जडणघडण ध्यानात येत गेली. आता उत्सुकता होती ती त्यांच्या स्वतःच्या संगीतातल्या मौनस्थळांचं सौंदर्य अनुभवण्याविषयी, व ह्या मौनयोजनेसंदर्भातील त्यांची विचारप्रक्रिया ऐकण्याविषयीही. कौशल इनामदारांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीच्या आरंभीच्या टप्प्यात बा. सी. मर्ढेकर, मंगेश पाडगांवकर, बालकवी ह्यांच्या कवितांना लावलेल्या चालींमागची आपली विचारप्रक्रिया सविस्तर उलगडून दाखवली; तसंच स्वतःच्या संगीतातील मौनयोजनेविषयी मनमोकळेपणाने हृद्गत मांडलं. ते थोडक्यात असं नोंदवता येईल — “शांततेचा भाग मला लवकर सापडला, कारण माझा स्वभाव शांततेत रमणारा होता, फारसा बहिर्मुख नव्हता. कोणत्याही सर्जनशील कलाकाराचं काम कोलाहलात राहून एक ‘व्यवस्था (ऑर्डर)’ तयार करणं असतं. कोलाहलात त्या कलाकाराला राहावंच लागतं, म्हणून त्याला शांततेची कदाचित अधिक ओढ असते. मी काहीच करत नाहीये असं वाटत असताना खरं तर माझ्या मनात बराच कल्लोळ सुरू असतो; शांततेचे तुकडे शोधून, ते जोडून काही सुसंगत, सुसूत्र निर्माण करण्याचा मी प्रयत्न करत असतो.”
कलाकाराला खुणावणारी शांतता असते, अशा शांततेची त्याला ओढ असते, हे खरं आहे; पण अनेकदा अव्यक्त मौनाचं म्हणणं ऐकता येण्यासाठी कलाकार जीवघेण्या अस्वस्थतेतून प्रवास करत असतो. एखादी कविता किंवा एखादं गीत चाल लावण्यासाठी संगीतकाराच्या समोर येतं, तेव्हा एका अर्थी तो त्या कवितेत किंवा गीतात जे उघड व्यक्त झालंय त्यापलीकडचं मौन, अस्फुट, अव्यक्त राहिलेलं किंवा तसं राखलं गेलेलंही काही ऐकू पाहत असतो. पण जेव्हा कविता किंवा गीत मौन सोडत नाही, तेव्हा संगीतकार ह्या अस्वस्थतेतून कशी वाट शोधतो, हे विचारल्यावर, कौशल इनामदारांनी आपल्या कारकिर्दीतील सर्जनशीलता मुकी होण्याच्या म्हणजेच काही न सुचण्याच्या काळाचाही प्रांजळपणे मागोवा घेतला. त्यांनी, असा भयंकर किंवा नकोनकोसा वाटणारा मौनकाळही सर्जनशील कलाकारांसाठी कसा महत्त्वाचा असतो, तो एक आशीर्वाद म्हणून, आरसा पाहण्याची एक संधी म्हणून, तसेच अनुभवविस्ताराकडे वळण्याची एक दिशा म्हणून कसा स्वीकारावा, ह्याविषयीची आपली स्वानुभवातून घडलेली दृष्टी मांडली.
गायक-वादकांच्या कलाविष्काराच्या आरंभीच्या व नंतरच्या मौनाच्या अस्वस्थ स्वरूपाविषयीही त्यांनी आपलं मत नोंदवलं. त्यांच्या मते, ‘मैफिल असेल किंवा ध्वनिमुद्रण, आसपासचे आवाज विसरून, कलाकाराला मौनातून जो अचूक, निर्दोष, नितळ असा आरंभीचा सूर शोधता यावा लागतो, तो मौनाचा भाग कलाकारासाठी सगळ्यांत महत्त्वाचा असतो; कारण आरंभस्वर हा एकच भाग कलाकाराच्या हातांत असतो. कुठल्याही कलेचा प्रवास शक्यतेपासून अपरिहार्यतेकडे होत असतो. कलाकाराला पहिला स्वर अचूक सापडतो, तेव्हा शक्यता नव्वद टक्के कमी होतात, तर्काची दिशा सापडते. अर्थात, ह्यामध्ये उत्स्फूर्तता येण्यासाठी वेळ लागतो. उत्स्फूर्ततेपाठी इतरांना न दिसणारी अतिशय मोठी प्रक्रिया असते, आपल्याला सतत त्या रियाजात, विचारात राहावं लागतं. सर्जनाचा क्षण हाच सगळ्यांत जिवंत क्षण असतो. त्याच्या मागे किंवा पुढे अस्वस्थकारी मौनच असतं. ज्ञानेश्वरांना लाभली होती तशी चिरशांतता लाभत नाही, तोपर्यंतचं मौन हे अस्वस्थकारीच असतं. अनाहत नाद सापडत नाही, तोवर मौन ही कृत्रिमच गोष्ट असते. म्हणून तर आपण शांतता भंग करायचाच प्रयत्न करत असतो. ह्या शांततेचा आपल्याला बालकवींच्या ‘मोहिनी’ कवितेतील कोकिळेप्रमाणे सौंदर्यपूर्ण रीतीने भंग करता येतो का, एवढाच काय तो मुद्दा असतो.’
कौशल इनामदारांच्या संगीतात शांततेतील मधुरव्यत्ययाचं हे वैशिष्ट्य सहज-स्वाभाविकतेने खुलून येतं, ह्याचं एक कारण कदाचित हे असावं, की त्यांचा मुळातच एक व्यक्ती व एक कलाकार म्हणून शांत रस, ठहराव, शांतता ह्यांकडे विशेष कल राहिलाय. शांतता हा त्यांच्या संगीताचा स्व-भाव आहे. पण संगीत ही आज केवळ कला नाही, तो अर्थकारण व स्पर्धात्मकता ह्यांना महत्त्व मिळालेला व्यवसायही आहे. संगीतातील शांततेसंदर्भात विचार करताना, आजच्या कोलाहल-पर्वात त्यांच्या कलाकृतींतील शांतप्रकृतीला संगीत-व्यावसायिक आणि श्रोते ह्यांच्याकडून कशा प्रकारचे प्रतिसाद मिळतात, त्यांबाबत ते स्वतः काय भूमिका घेतात, हे समजून घेणंही अगत्याचं वाटत होतं. ह्या मुद्द्याविषयी त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आपली भूमिका मांडली, “कोणी माझ्या प्रकृतीचं संगीत ऐकायला उत्सुक आहे का, हे मी शोधत असतो. मी असं ठरवलंय की मला माझ्या स्वभावाचं संगीत करायचंय, तशा प्रकारचा श्रोता मी शोधीन. सगळ्या प्रकारचे श्रोते आपण गोळा केलेच पाहिजेत, प्रत्येक वेळी आपल्या कलाकृतीकरिता टाळ्याच वाजल्या पाहिजेत, ही आसक्ती आता शमलीय माझी. पण मी केवळ माझ्या-माझ्यात रमत नाहीये. मीही माझ्या प्रकृतीच्या रसिक मायबाप श्रोत्यांच्या शोधात आहेच. कारण कला ही एकतर्फी गोष्ट नाही, हा द्वैताचा खेळ आहे.” संवादाच्या ओघात त्यांनी अजून एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं, तो म्हणजे, ‘आपण संगीतातील शांततेबाबत विचार करतोय. पण आपल्याला शांततेतील संगीत सापडतंय का ? ते सापडतं तेव्हा त्याचं संगीत करायची गरज वाटत नाही.’ प्रगल्भतेच्या अवस्थेत पोहोचल्यानंतर शांततेतलं संगीत कसं कळू-भावू लागतं, ह्याविषयी बोलताना कौशल इनामदारांनी आपल्या आजोबांच्या (शंकरराव बिनीवाले ह्यांच्या) आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना कोणतंही संगीत न ऐकता आंतरिक शांततेत कसं रमावंसं वाटत होतं ह्याचं उदाहरण दिलं.
ह्या सर्व संवादातून संगीत व मौन ह्यांतील नातं कसं असतं, कसं आकारतं, कसं बदलतं, ह्यांविषयी कलाकार व रसिक ह्या घटकांच्या संदर्भातून सविस्तरपणे विचार केल्यानंतर, आम्हां दोघांना संगीत आणि मौन ह्यांतील नात्यासंबंधीचं काळ व स्थळ ह्या दोन अक्षांवरचं चित्र काय दिसतं, हे पाहणंही महत्त्वाचं वाटत होतं. आधी आम्ही काळाच्या अक्षावरील परिवर्तनांसंबंधी विचार केला. काळ, तंत्रज्ञान, संगीत ह्यांतील परिवर्तनं आणि संगीतगत मौन ह्यांतील परस्पर-अनुबंधांविषयी विचार करताना कौशल इनामदारांनी मांडलेली भूमिका थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल, ‘सगळ्या काळांत सगळ्या प्रकारचे श्रोते असतात. तंत्रज्ञान व काळ ह्यांना एकच दिशा ठाऊक असते — पुढची. हे वास्तव नाकारता येत नाही; पण तंत्रज्ञान हे केवळ माध्यम असतं, ते म्हणजे आपल्याला सांगायची असलेली गोष्ट नव्हे. म्हणूनच तंत्रज्ञानाला आपल्यावर आरूढ होऊ देण्याऐवजी आपण त्यावर आरूढ व्हावं. कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काळ आपल्याला ताब्यात घेईल. तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या संगीतासाठी करून घेतला पाहिजे. अंतिमतः, कला ही कधीच कालबाह्य होत नाही, तंत्रज्ञान कालबाह्य होत असतं. शाश्वत मूल्यांचा शोध घेत राहणं हे कलाकाराचं काम असतं.’
कालगत परिवर्तनांनंतर संगीतगत मौनयोजनेसंदर्भातील स्थळाच्या अक्षावरील वैविध्यही ध्यानात घेणं आवश्यक होतं. कौशल इनामदारांनी पाश्चात्त्य प्रवाहातील ‘रायटिंग द म्युझिक’ आणि भारतीय प्रवाहातील ‘कम्पोझिंग द म्युझिक’ ह्या संकल्पनांतील फरक सांगून, ह्या दोन्ही संगीतप्रक्रियांत मौनयोजनाच्या संदर्भात काय फरक दिसतो, ह्याविषयीही निरीक्षणं नोंदवली. त्यांच्या मते, ‘लेखन-दस्तऐवजीकरण महत्त्वाचं नाही असं नाही, पण मौखिक परंपरेचंही आपलं स्वतःचं शहाणपण आहे, त्यात प्रवाहीपणा आहे. लिहिलेलं अंतिम सत्य वाटतं, पण ते अंतिम सत्य नसतं. त्या त्या प्रदेशातील, संस्कृतीतील परंपरांमागे जे सामूहिक शहाणपण आहे, त्याचा लिहाज ठेवला पाहिजे. पाश्चात्त्य संगीतातील शांतता व आपल्या संगीतातील मौन ह्यांची गुणवत्ता वेगवेगळी आहे, कारण ह्या दोन्हींतील सुरांची गुणवत्ता वेगवेगळी आहे. कम्पोझिंग द म्युझिकमध्ये उत्स्फूर्ततेला वाव आहे, हा एक भाग आहे. शिवाय, ह्या संगीतप्रक्रियेत मुखड्यापासून समेपर्यंतच्या आवर्तनातील जागा वेगवेगळे कलावंत आपापल्या प्रकृतीनुसार, प्रतिभेनुसार वेगवेगळ्या प्रकारे भरतात. ह्या प्रक्रियेत वैविध्य व बदल ह्यांची शक्यता असते. ही शक्यता रायटिंग द म्युझिकमध्ये नाही, कारण एकदा लिहिलं की ते पक्कं होऊन जातं. ते काही चुकीचं आहे असं नाही; पण आपलं जे काही आहे, ते आपल्या मातीतून उगवलेलं ज्ञान आहे.’
सांस्कृतिक पर्यावरणानुसार सांगीतिक प्रक्रियांत, व त्यानुसार संगीतगत मौनयोजनेत काय फरक आढळतात, ह्याविषयीची ही चर्चा ऐकताना संगीताला असलेल्या भाषिक पर्यावरणाचा मुद्दा मनात जागा झाला. ह्याविषयी बोलताना कौशल इनामदारांनी, मराठी गीतांत भावनेच्या संदर्भानुसार एकच ‘कधी’ हा शब्द कधी ‘कधि’ असा ऱ्हस्वान्त तर कधी ‘कधी’ असा दीर्घान्त कसा योजला गेलाय, ह्याची गंमत लक्षात आणून दिली. भाषा बदलली, ध्वनी बदलला की संगीतात कशा वेगवेगळ्या गोष्टी घडतात, हे त्यांनी मराठी, हिंदी व तामीळ ह्या भाषांच्या तुलनेतून लक्षात आणून दिलं. तामीळ भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण दीड-मात्री स्वरामुळे तिथल्या संगीतात दिसणाऱ्या मौनाचे अवकाश किंवा विराम ह्या वैशिष्ट्याचं तामीळ संगीतकारांच्या प्रभावातून हिंदी व मराठी संगीतात कसं आदान घडलंय, घडतंय, हे त्यांनी चित्रपटसंगीतातील काही उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केलं.
संपूर्ण मुलाखतभर संगीत ह्या कलेविषयी स्वतंत्र कला म्हणून सविस्तर ऊहापोह केल्यानंतर, ह्या संवादाच्या समापनाच्या टप्प्यात नाटक, चित्रपट ह्या अन्य कलांतील संगीताचं योजन ह्या संदर्भातूनही मौनासंबंधी चर्चा केली गेली. कौशल इनामदारांनी नाटक-चित्रपटांतील विरामाच्या जागांमध्ये पार्श्वसंगीताचं योजन केव्हा व का केलं जातं किंवा केलं जावं ह्याविषयी खूप महत्त्वाचे विचार मांडले. त्यांचा असा दृष्टिकोन आहे की, ‘संगीताद्वारे विशिष्ट दृश्यामधील जे अव्यक्त आहे ते बाहेर काढायचं असेल तरच तिथे ते संगीत योजायला हवं.’ एस. टी. कोलरिजच्या ‘टिरनी ऑफ द आय’ ह्या संकल्पनेचा उल्लेख करीत व पार्श्वसंगीताची उदाहरणं देत त्यांनी लक्षात आणून दिलं की, ‘आपल्याला प्रत्येक गोष्टीला दृश्य अन्वयार्थ देण्याची गरज वाटते. आपण सुरांनाही अशा दृश्यप्रतिमा देत असतो. विरामांच्या जागी कल्पकतेने योजलेलं संगीत स्पर्शादी श्राव्येतर संवेदना प्रतीत करून देण्याचं, वातावरण उभं करण्याचं कार्य करत असतं. मौनच अधोरेखित करायचं असेल, तर तिथे असं संगीत योजलं जात नाही. ह्याबाबतची कलात्म जाण दिग्दर्शक व संगीतकार ह्या दोघांना असावी लागते.’ ‘नाटकांत किंवा चित्रपटांत संगीत येतं, तेव्हा त्यांत एका प्रकारचा विराम येतो, त्यांची गती थांबते, ह्या मतात कितपत तथ्य आहे ?’ ह्या प्रश्नावर बोलताना कीर्ती शिलेदारांसारखे पद गातानाही अभिनयाचा धागा ढळू न देणारे कलाकार, ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ ह्या अलीकडच्या नाटकाची हृषिकेश जोशी ह्यांनी केलेली वैशिष्ट्यपूर्ण बांधणी ह्यांचा, तसंच ‘अविश्वासाचं स्वेच्छापूर्वक निलंबन (विलिंग सस्पेंशन ऑफ डिसबिलीफ)’ ह्या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी लक्षात आणून दिलं की, ‘नाटक न थांबता पद येतं, तिथे संगीत हे गोष्ट पुढे नेणं, वातावरणनिर्मिती करणं अशी कार्यं करतं. पूर्वी असंच चित्र असायचं. किंवा, बालगंधर्व, केशवराव भोसले ह्यांच्यासारखे खरोखरीचे प्रतिभावंत गायक असताना व श्रोतेही प्रगल्भ असताना, संगीताच्या ओघात नाटक थांबूनही प्रश्न उद्भवायचा नाही. नंतरच्या काळात तशी प्रतिभा नसतानाही नाट्यसंगीताबाबत अंधानुकरण घडलं, तेव्हा प्रश्न निर्माण झाले. पण आपल्या सांस्कृतिक नेणिवेत संगीत आहे, त्यामुळे वस्तुतः आपल्याकडे संगीत व गद्य ह्या गोष्टी परस्परपूरकतेने जाऊ शकतात.’
मुळात नाटक आणि मौन ह्या विषयावरील लेखावरच्या प्रतिसादातून संगीत आणि मौन ह्या विषयावर सुरू झालेला, आणि मराठी रंगभूमिदिनी रंगलेला हा संवाद पुन्हा नाटक ह्या कलेतील संगीताच्या व मौनाच्या संदर्भातील प्रश्नांपाशी येऊन पोहोचला, ह्यात नवल नाही. एका अर्थी, नाटक व संगीत ह्या कलांतील सह-अस्तित्वाच्या परंपरेतून हे असं घडणं स्वाभाविकच होतं. नाटक – मौन – संगीत – नाटक – मौन असं हे संवादाचं वर्तुळ पूर्ण करताना माझ्या मनातील सर्व प्रश्न संपले नव्हते, कौशल इनामदारांनी मांडलेल्या विचारप्रवर्तक चिंतनातून अनेक नवी कुतूहलंही मनात पेरली गेली होती; पण आतापर्यंत झालेल्या चर्चेतील हे विचार मनात झिरपू-मुरू देण्यासाठी विराम घेण्याचीही आवश्यकता वाटत होती. मुलाखतीची सम गाठताना, मुलाखतीच्या सुरुवातीला ज्यांच्याविषयी चर्चा केली गेली होती त्या नाद आणि मौन ह्या मूलभूत संकल्पनांतील संबंधांविषयीचा सनातन वादप्रश्न कौशल इनामदारांसमोर उपस्थित केला — नाद व मौन ह्यांत आधी कोण, नंतर कोण ? मौनाच्या पोकळीत नाद उमटतो ? की नादप्रवाहातील पोकळी म्हणजे मौन ? त्यावर त्यांनी म्हटलं की, “आधी म्हटलं तसं, नाद नसेल तर मौन कळणारच नाही. शांतता ही मला कृत्रिमच वाटते. कुठेही गेलात तरी नाद असणारच आहे. मौन व शांतता ह्या आपल्या मनात सुरू होतात, मनात संपतात. शांतता ही कल्पना आहे, तिचं अस्तित्व हे मनातील अस्तित्व आहे, पण म्हणून ती खोटी नाही, ती खरी कल्पना आहे. नाद व मौन ह्या गोष्टी समांतरच आहेत. त्या द्विपरिमाणी (बायनरी) नाहीत. आपण असा विचार केला तर त्यांच्याबाबतचा आधी कोण व नंतर कोण हा प्रश्नच मिटतो.”
खरं तर, कला, संगीत, नाद, मौन अशा मूलभूत संज्ञा-संकल्पनांना निरनिराळ्या मिती असू शकतात. परंतु आपण अनेकदा एका विशिष्ट साच्यातच त्यांच्याविषयी विचार करत राहतो. कौशल इनामदारांशी झालेल्या मौनाविषयीच्या ह्या संवादातून ह्या व इतर काही मूलभूत संकल्पनांच्या अशा अनेक अलक्षित आगळ्यावेगळ्या मिती जाणून घेता आल्या, त्यातून आता ह्या संकल्पनांविषयी नव्याने विचार करावासा वाटतोय. संगीतातील शांततेविषयीचा शोध घेण्याच्या उद्दिष्टाने कौशल इनामदारांशी हा संवाद सुरू केला होता; पण त्यांच्या आवाजातील शांतता व त्यांच्या स्टुडिओतील शांततेचा आवाज ह्यांची जुगलबंदी ऐकल्यानंतर, शांततेतील संगीताचा शोध घेता यायला हवा, मौनाचा नादस्वर ऐकता यायला हवा, ही नवी उद्दिष्टं खुणावू लागली आहेत. अर्थात, ह्या उद्दिष्टांच्या दिशेने करावयाचा प्रवास हा कदाचित कौशल इनामदारांनी ह्या मुलाखतीत ज्याचं महत्त्व सातत्याने अधोरेखित केलं त्या आत्मसंवादी मौनातूनच होऊ शकत असेल !