नमस्कार.
तीन प्रकारची संभाषणं असतात. एक बायनॉमियल आणि दुसरं पॉलिनॉमियल. बायनॉमियल संभाषण म्हणजे एकाच व्यक्तीशी थेट संवाद साधणं आणि पॉलॉनॉमियल म्हणजे समुदायाला उद्देशून संबोधणं. आणि संभाषणाचा तिसरा प्रकार म्हणजे स्वतःशी साधलेला संवाद — स्वगत. माझं आजचं हे भाषण या सर्वांचं मिश्रण आहे, असं समजा.
“तुडुंब जन्मांचे सावळेपण
एखादी प्राणांची मल्हारधून
एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन”
आरती प्रभूंनी लिहिलेल्या सर्जनाच्या प्रेरणेचं वर्णन करणार्या या चार ओळींमधे नाद-संगीत आणि दृश्यमयता यांच्या एकजीव चैतन्यमयी अस्तित्वाचं चिरंतन सार आहे.
ऐकणं आणि पाहणं या अगदी भिन्न क्रिया आहेत. त्यांतही प्रकार आहेत. मोठा आवाज कानावर आदळतो, कुजबूज ऐकायला येते, संगीताने मन भरून जातं. बघणं खूप सहज असतं. त्यात प्रकाशाचा सहभाग असतो. प्रकाश कसा आहे, त्याचा स्रोत खालून आहे का वरून आहे, त्याचा झोत तिरपा आहे, प्रखर तीव्र आहे, का मंद आहे, यावरून दृश्यरूपाचा नेमकेपणा सिद्ध होतो.


कलेची अभिव्यक्ती हा एक निश्चित घडवलेला विचार मांडण्याचा प्रयोग असतो — संगीतातही आणि चित्रकलेतही. तो कधीच अपघात नसतो. चित्राची निर्मिती होते, त्यात चित्रकाराचं व्यक्तिमत्त्व दिसतं. त्याच्या आवाजाचं टिंबर जाणवतं. एखाद्या चित्रकाराची अनेक चित्रं सलग पाहताना त्याच्या मनोभूमिकेबद्दल अंदाज बांधता येतो. वयाने मोठे झालेले चित्रकार कधी वयानुसार प्रगल्भ विचार / कलानिर्मिती करतात, कधी ते तरुणाच्या मनोवस्थेत वावरतात, तर कधी लहान मुलाच्या जिज्ञासेने परत नव्याने जगाकडे पाहतात. त्या त्या मूडनुसार आणि परिस्थितीमधून त्यांची निर्मिती घडते. त्यांच्या वैचारिक जडणघडणीमधे संगीताचा-ध्वनीचा सहभाग असेलच, असं नाही. याला कुठलीही परंपरा नाही.
ऑस्ट्रेलियातील आदिवासींमधे मात्र त्यांच्या लोकगीतांच्या ओळीच त्यांच्या चित्रसृष्टीची प्रेरणा आहे. त्यांच्यातील कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनाही ती लोकगीतं माहीत असतात, म्हणून त्यांना ती चित्रं पाहताना त्यांतलं संगीत सहज ऐकू येतं. एकाच लोकगीताच्या ओळींवर वेगवेगळ्या कलावंतांचे वेगवेगळे कलाविष्कार पाहायला मिळतात. नवीनवी गाणी रचली जातात आणि त्यांच्या अनुषंगाने नव्यानव्या चित्रमालिकांची निर्मितीही होत राहते.
बाकी जगात किंवा आपल्याकडे मात्र असं चित्र दिसत नाही. पाॅल क्लीने लहान मुलांसाठी खूप काम केलं. त्याच्या अनेक चित्रांमधे किंवा जाॅन मिरोच्या अनेक चित्रांमधे मला बडबडगीतांमधला लोभस इनोसन्स दिसतो. त्या चित्रांतून ती बडबडगीतं ऐकायला येतात. वासुदेव गायतोंड्यांची आणि मार्क रोथकोची पेंटिंग्ज पाहताना मला घनगंभीर पुरुषी आवाजातल्या ख्यालाची बढत ऐकू येते. अमेरिकन ऍब्स्ट्रॅक्शन आणि जॅझ यांच्यातही खूप घट्ट नातेसंबंध आहे. त्या कलाकृतींमधल्या प्रोग्रेशनचा प्रवास जाणवण्याइतका स्पष्ट दिसतो. पण हे कनेक्टिंग द डाॅट्ससारखं आहे, खूप वैयक्तिक आहे. कलेचा अनुभव असाच असतो. अतिशय वैयक्तिक आणि पाहणार्याच्या भावनाविश्वाशी जोडलेला. तो कधीच सार्वजनिक नसतो. एखादं पेंटिंग पाहताना रसिकाच्या मनात काय घोळू लागेल याची निश्चिती कलावंताला करता येईल, असं कधीच नसतं. ही आहे भासमय गृहीतकांची कल्पनासृष्टी. तिला नेहमीचे नियम लागू होत नाहीत. इथे हरघडी जुने संकेत मोडले जातात आणि नवे तयार होतात. कल्लोळ सहज दिसतो आणि ऐकू येतो; परंतु तेवत राहणारी सलग शांती चित्रात निर्माण करणं हे सिद्धहस्त, प्रतिभासंपन्न कलावंताकडूनच घडतं. त्या भारदस्त स्वयंभू कलाकृती मग इतर कलावंतांसाठी आणि संगीतकारांसाठीही प्रेरणास्रोत ठरतात.
चित्र सुरू करताना मनात दोन भिन्न धारणा असतात : To find order in a chaos or to underline or separate chaotic elements embedded within prevailing order. या दोन भिन्न धारणांमधून कलानिर्मिती होत असते. कलानिर्मिती ही कलावंताच्या दृष्टीने मोठी घटना असते. आणि अशी मोठी घटना घडताना त्याच्या मनात अनेक विचार, अनेक व्हिज्युअल एलिमेंट्स एकमेकांना स्पर्शून जातात, एकमेकांवरती आदळतात. मनोविश्वात त्यांचे प्रतिध्वनी उमटतातच. पेंटिंगमधे ते किती समर्थपणे आणि सहजपणे व्यक्त होताहेत यावर त्या कलाकृतीची गुणवत्ता जोखली जाते. त्यातलं नावीन्य झटकन सामोरं येतं. काही कलाकृती लाऊड असतात तर काही सौम्यशीतल असतात. पण ‘तुमच्या पेंटिंगमधे काहीतरी लिरिकल, म्युझिकल क्वालिटी आहे,’ ही समीक्षकाकडून चित्रकाराला मिळालेली हायेस्ट दाद असते. ध्वनी आणि चित्र यांचा इथे असा मेळ होतो. चित्र-ध्वनीचे अस्तित्व असं आणि इतपतच एकरूप पावतं.
ध्वनी-नाद-संगीत आणि दृश्य — ऐकणं आणि पाहणं … एखादी कल्पना स्फुरते, घटना घडते, आणि माणसाला त्या घटनेचं आकलन कसं होतं, कितपत होतं याचं परिमाण ठरवण्यासाठी मोठी प्रश्नावली तयार करावी लागेल. ज्याच्या-त्याच्या क्षमतेनुसार जो तो माणूस त्या त्या घटनेचा, अनुभवाचा अन्वयार्थ लावतो. कलावंताच्या बाबतीतही हीच प्रक्रिया घडते आणि निर्मितीचं निमित्त ठरते. कला सादर करण्याची अनेक माध्यमं आहेत, अनेक तऱ्हा आहेत, आणि अनेक प्रयोजनं आहेत. कोणी स्वतःसाठी गातो, नृत्य करतो, चित्र काढतो, तर कोणी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी, तर कोणी सत्तेचा अनुनय करण्यासाठी. एकूण गोळाबेरीज — कलावंत स्वतःला जाणवलेला, कलेतील नवा दृष्टान्त जाणत्या लोकांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतो.


संगीत ही आजची सर्वांत परिष्कृत कला आहे. गाणं गाण्यासाठी माणसाची सर्व शारीरिक आणि मानसिक अंगं एकत्र यावी लागतात, तेव्हाच माणूस गाऊ शकतो. इतर माध्यमांमधे असं होत नाही. गाणं ऐकता ऐकता तुम्ही चित्र काढू शकता, शिल्प घडवू शकता, अभिनय करताना नटाला इतर बरीच व्यवधानं सांभाळावी लागतात. संगीत, मुख्यतः कंठसंगीत सादर करताना मात्र फक्त सुरांशी आणि लयीशी झालेली एकतानताच कलाविष्काराची परिणामकारकता सिद्ध करते. परमेश्वर आहे याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे संगीताचं अस्तित्व. जगणं त्यामुळे सुसह्य होतं. माझं स्वतःचं भरणपोषण संगीतामुळे झालं — मानसिक आणि व्यावहारिक सुद्धा. माझ्या वडिलांनी आयुष्यात फक्त गाणंच केलं. त्यांच्या गुणांमुळे सर्व गोष्टी त्यांच्याकडे आपोआप चालत आल्या. मी हे सर्व पाहत पाहत वाढलो. अनेक मोठे चित्रकार, शिल्पकार, कवी, लेखक आमच्या घरी माझ्या लहानपणापासून येत असत. गाण्यांबरोबरच मी सिनेमाच्या, फोटोग्राफीच्या आणि पेंटिंग्जच्याही प्रेमात पडलो, परंतु माझं पहिलं प्रेम संगीतच आहे.
इतर माध्यमांतले कलावंत संगीताची ही परिणामकारकता जाणून आहेत. आणि उत्कृष्ट संगीतश्रवणाने होणारा परिणाम आपल्या चित्रातून, शिल्पातून, लेखनातून पाहणाऱ्याला, वाचणाऱ्याला अनुभवायला मिळावा अशी त्यांची आकांक्षा असते. शेकडो वर्षांपासून भारतीय मिनिएचर्स, शिल्पकला आणि स्थापत्त्यकला या क्षेत्रांत नादमयता आणि संगीताची तरल प्रगल्भता यांनाच उत्कृष्टतेचा बेंचमार्क मानलं गेलं. संगीताचा पाश्चात्त्य कलासृष्टीवरील इन्फ्लुएन्सही लपू शकत नाही. नाद-ध्वनी-संगीत यांची ही विश्वव्यापी भुरळ आणि सर्व कला एकजीव आहेत. दृश्यकला-क्षेत्रातल्या मोठमोठ्या कलावंतांनी आपल्या कलाकृतींमध्ये संगीत भिनवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. कधी तो प्रयत्न चित्रातली लय सांभाळताना तर कधी सुरांच्या अचूकतेशी आशयाची सांगड घालताना दिसला. सर्व कला आणि शास्त्रं ही अध्यात्माच्या छत्रछायेखाली वावरतात, फुलतात आणि नांदतात. कलासाधनेतील सातत्य साधकाला एका अमूर्त समाधानाच्या आनंदमयी पोकळीत आणून ठेवतं. चांगली कलाकृती निर्माण करण्याची एक आगळी परिपूर्ती असते. दृश्य-कलेच्या क्षेत्रातल्या कलावंताला असंच परिपूर्तीचं उत्कट स्पिरिच्युअल समाधान लाभतं, त्या वेळच्या मौनावस्थेला लौकिकात समांतर फक्त शांत, निरभ्र आकाशसंगीत असू शकतं. गायतोंड्यांसारख्या कलावंताला आणि इतर अनेक कलावंतांना हे जाणवलं होतं. गायतोंडे स्वतः रेकॉर्ड्स लावून शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न सिम्फनीज ऐकत बसायचे, (गायतोंडे गंगूबाई हनगल यांचे फॅन होते,) तर कधी तासन्तास समुद्रकिनाऱ्यावर जाऊन क्षितिजाकडे पाहत बसायचे. या सर्वांचंचे प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतींमध्ये सामावलं आणि त्या कलाकृतींना उत्कृष्टतेचं शाश्वत मूल्य लाभलं.
गायतोंड्यांचे शिक्षक शंकर पळशीकर यांनीही त्यांच्या सत्तरच्या दशकातल्या पेंटिंग्जमधे बीजाक्षरांचा ठळक वापर केला आणि चित्रात ध्वनी दर्शविण्याचे प्रयोग केले. एस. एच. रझा यांनी कबीराचे दोहे त्यांच्या पेंटिग्जमध्ये रंगवले. मला हे सहज आठवताहेत. त्या त्या काळात ते नवे होते. त्याआधी युरोपमध्ये पॉल क्ली आणि कांडींस्की यांनी, जे संगीताचे विद्वान जाणकार होते, नाद-संगीत या विषयाला केंद्रस्थानी ठेवून अनेक पेंटिंग्ज केली. सध्याही अनेकजण इन्स्टॉलेशन आर्ट या माध्यमामध्ये अनेक कलावंत साउंड इफेक्ट्सचा वापर करताहेत. त्यातून प्रेक्षकांपर्यंत कलावंताला अभिप्रेत असणारा आशय तंतोतंत पोहोचतो का, हा ग्रे एरिया आहे. हे तसं संदिग्धच आहे. परंतु अशा प्रामाणिक प्रयत्नांची वैश्विक कलासृष्टीत दखल घेतली जाते आणि नोंद होते. मी, माझ्यासारखे अनेक, चित्रांमधल्या अशा नव्या सुरावटी आणि नवे आवाज ऐकायला उत्सुक आहोत. आपल्या हातून आज काही नवं घडावं, उद्या काही नवं दिसेल, असं नक्की होणार आहे, ही आशाच कलावंताच्या जगण्याचा प्राण आहे.
ध्वनी हे आकारविहीन वास्तव आहे. आकाशही तसंच निराकार वास्तव आहे. आकाश हा मला एक सर्वसमावेशक विचार वाटतो. दोन्हीही शाश्वत आणि जिवंत अनुभव आहेत — पवित्र गाभाऱ्यात असल्यासारखे, शांत, सुरेल, भारलेल्या मौन मनोवस्थेशी घट्ट नातं सांगणारे. आकाश हा अमूर्त विषय मला पेंटींगसाठी लोभस वाटला. अनेक घटना घडतात आकाशात. पावसाळी आकाश, पहाटेचं आकाश, दुपारचं आकाश, संध्याकाळचं आकाश, रात्रीचं आकाश. वेगवेगळ्या ऋतूंमधे दिसणारं, अनुभवता येणारं वेगवेगळं आकाश मला खूप काही सांगतं आणि ऐकवतं. मी माझ्या मनातलं आकाश रंगवत गेलो. आठ मोठ्या कॅनव्हासची सिरीज झाली. ती चित्रं पाहताना मला त्या त्या वेळचे राग आठवतात, आणि ती चित्रं मला माझ्या दुनियेत घेऊन जातात.
नाद-संगीत ही फार परिष्कृत आणि उत्क्रांत कला आहे. जीवन व्यापून टाकणारी. सर्व माध्यमांमधे निर्मिती करणाऱ्या कलावंतांसाठी संगीताची रसपूर्णता, सर्वसमावेशकता, गुणवत्ता हा एक्सलन्सचा बेंचमार्क आहे. संगीतातली तरलता, गांभीर्य, सूर-ताल-लयीची मोहिनी, संगीतातला रोमान्स, ध्वनीतली प्युरिटी आपल्या आविष्कारामधे उतरावी, असं सर्वांनाच वाटतं. आपली श्रवणशक्तीची स्मृती ही दृश्य स्मरणापेक्षा जास्त असते. पेंटींगमध्ये उतरलेला उत्कृष्ट नाद-संगीताचा किंचितसा भासमान अंशसुद्धा त्या कलाकृतीला प्रतिष्ठा मिळवून देतो. दृश्यकलानिर्मितीच्या प्रक्रियेत असणाऱ्यांसाठी नेहमीच्या आर्ट मटेरियल्स बरोबरच काव्य, नाद-संगीत, रागसंगीत हीसुद्धा महत्त्वाची साधनं आहेत. नवनिर्मितीच्या परिपोषात परिपुष्ट होणारी आनंदी, शांत, निर्विचारी मनोवस्था हे कलावंताचं खरं श्रेयस आहे; प्रसिद्धी किंवा पैसा हे नाही. ती मनोवस्था हे डेस्टिनेशन आहे. तो भोज्या आहे. तिथे जायचं आहे. या इथल्या प्रदर्शनातल्या कलाकृती आपल्याला काही नवं, काही उत्कृष्ट निर्माण करण्यासाठो खुणावत आहेत, असं मला जाणवलं. हे सुंदर प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे आभार.
‘चित्रध्वनी’ या निवडक दृश्यकृतींच्या डॉ. श्रीराम लागू रंगावकाश येथे आयोजित झालेल्या दृक्श्राव्य प्रदर्शनाचं उद्घाटन करताना जयंत भीमसेन जोशी यांनी केलेलं भाषण.
चित्रे: जयंत भीमसेन जोशी.
1 Comment
Vikas Malhar
Jay Sir
Greetings
Everytime your thoughts on art-forms and life is magical and infinite touches life and its mystery.
Your article is so connecting to my heart. So sensible melted my being.
So truthful like a painting. Like a inocent child of an imagination. Like a open sky ever changing mysterious, as life. Through reading your article my every cells recharged and makes me fresh.
And your art is witnessing. Always.
Thank you Jay Sir for sharing.