आकाश व त्यातील ढग यांना जर एखादा बैल भिडला तर काय होतं? ऐकायला विचित्र वाटेल पण खरंच दोन परस्परविरोधी गोष्टी एकमेकांना भिडल्या तर किती काय काय शक्यता निर्माण होऊ शकतात! ज्या कलमठ गावात मी रहातो त्या गावातील रस्त्यातून सहज चाललो होतो. तोच रस्त्याच्या बाजूच्या एका उकीरड्यावर एक म्हातारा बैल चरताना दिसला. त्याची शिंगं छान लालभडक रंगवलेली होती. त्याची कातडी कालपरत्वे सुरकुतलेली होती. काही वेळ विचार केला. या बैलाचा नेमका कसा फोटो काढता येईल. मग दिसलं आकाश. त्यातील पांढरे ढग. मग विचार केला की हा बैल, त्याची सुरकुतलेली कातडी, त्याची लाल शिंगं जर निळ्या आकाशाशी व त्यातली सुरकुतलेल्या ढगांशी भिडवली तर काय होईल. आणि मग जे तयार झालं ते छायाचित्र हे होतं.

भिडणं अनेकप्रकारे असू शकतं. ते छायाचित्रात दिसणाऱ्या दोन गोष्टींचं असतंच व त्याचबरोबर व्यक्ती, प्राणी, वस्तू व छायाचित्रकार यांच्यातलं भिडणंही असतं. असाच एकदा मध्यरात्री घरी निघालो होतो आणि गावातल्या एका गल्लीत पोचल्यावर एक गाय अचानक उडी मारून आडवी आली. पूर्ण गल्लीत हिरव्या रंगाची रोषणाई केलेली होती. मध्येच एक लाल रंगाचा दिवाही होती. म्हटलं काहीतरी गमतीशीर तयार होईल. क्षणाचाही विलंब न करता मी मोबाईल काढला व एक छायाचित्र निर्माण झालं. कालांतराने जेव्हा ते छायाचित्र प्रेक्षकांना दाखवलं तेव्हा बरेचसे अभिप्राय खूप विचार करायला लावणारे होते. कुणी विचारलं की हे छायाचित्र नेमक्या कुठल्या वस्तीत घेतलंय? हिरवा रंग जास्त दिसतोय म्हणजे मुस्लीम वस्तीच असणार. मागचा लाल भगवा हिंदुत्वाचा रंग. नेमकं तुम्हाला काय सांगायचंय? हिंदू मुस्लीम भानगडीत अडकलेली ही गाय आहे का? असे असंख्य प्रश्न, कुतूहल, अभिप्राय, मतमतांतरं. आणि हीच तर गंमत आहे. आपलं सामाजिक, राजकीय पर्यावरण सध्या इतकं गढूळ आहे की प्रत्येक गोष्टीत राजकीय अर्थ लावायचा प्रयत्न होतो. आणि तसा झाला तर काही चुकीचंही नाही. मुद्दा हाच की अगदी सर्वसामान्य गोष्टीतून तुम्ही राजकीय सामाजिक विषयांना भिडू शकता का? त्यातून नेमकी कोणती छायाचित्रं, प्रतिमा तयार होतात? गावात मोकाट फिरणारे गाय बैल यांना छायाचित्रांच्या माध्यमातून भिडायचं ठरलं व त्यातून अशा कित्येक छायाचित्रांनी जन्म घेतला.

समोर दिसत असलेल्या भल्या मोठ्या अवकाशात तुम्ही नेमक्या दोन गोष्टी कशा भिडवता यावर तुमच्या छायाचित्रातील कथा जन्म घेते. गुहागर जवळच्या बुधल गावातील समुद्राकिनाऱ्यावर पाय ठेवताच मला ही कोळीण दिसली. सर्वप्रथम माझ्या मनात भरली ती तिची शारीरभाषा. तिच्या शारीरभाषेतला रांगडेपणा तिच्या एकंदरीत व्यक्तीमत्वाबद्दल भाष्य करत होता. क्षणाचाही विलंब न करता मी तिचं छायाचित्र टिपलं. सर्व मिळून मी तिचे चार फोटो काढले. कालांतराने या छायाचित्राच्या कित्येक कथा प्रेक्षकांनी तयार केल्या. चिपळूण येथील महाविद्यालयात भूगोल व त्या अनुषंगाने येणारा स्थलांतरणासारखा विषय शिकवणारा मित्र राहुल पवार यांनी म्हटलं, “पुरूष मंडळी स्थलांतरीत झालेल्या कोकणात स्त्रि़यांमध्ये आलेला नेतृत्वगुण, धाडसीपणा आणि पुरूषीपणा या फोटोतून जास्त स्पष्ट होतोय.” मग या अनुषंगाने पुन्हा पुन्हा फिरताना हे जाणवू लागलं. खरंच या कोळीणी खूप आक्रमक व मेहनती आहेत. पण या छायाचित्रातील कोळीण त्या किनाऱ्यावर एकटी उभी राहून काय करतेय? पण तसं नाही. मी छायाचित्रात तिला व अथांग समुद्राला भिडवलंय फक्त. पण त्या फ्रेमच्या बाहेर तिच्या डाव्या बाजूला एक पुरूष तिच्याशी गप्पा मारत बसलाय व उजव्या बाजूला वीस तीस कोळीणींचा कल्ला चालू आहे. पण मला जो सामाजिक राजकीय अर्थ दाखवायचाय त्यासाठी मला तिची शारीरभाषा, तिचं समुद्राकडे रोखून बघणं व अथांग समुद्र या तीनच गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. या तीन गोष्टी एकमेकांशी भिडल्या तर काय कथा तयार होईल इतकाच विचार करून मी हे छायाचित्र काढलं.

असं विविध स्तरांवर छायाचित्रकार व सर्जनशील माणूस म्हणून सतत भिडावं लागतं. मग ते स्वतःच्या आयुष्यातील चढ किंवा उतार असो वा सामाजिक पातळीवरचे. दोन्हीवेळा तयार रहायचं. २०१५ साली पत्नीच्या दुसऱ्या बाळंतपणात खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. जवळपास महिनाभर हॉस्पिटलमध्ये तळ ठोकला. या सर्व दिवसात रोज पत्नीची छायाचित्र काढत राहिलो. ही खूप कसरत असते. एकाचवेळी पती म्हणून आणि छायाचित्रकार म्हणून समोरच्या परस्थितीला सामोरं जावं लागतं. जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याच्या व्ह्यू फायंडर मधून पहाता तेव्हा बाकीचं जग नाहीसं होतं.. काही क्षणांपुरतं तरी. आणि कॅमेऱ्यातून जे दिसतंय त्यावर लक्ष केंद्रीत होतं. आज या साऱ्या अडचणींमधून बाहेर पडून तीन वर्ष झाली. आयुष्यातला जो कठीण कालखंड होता त्या काळाचे फोटो आज खूप आनंद देतात. आमच्या कुटुंबासाठी तो बहुमूल्य ठेवाच आहे. असं विविध प्रकारे समोर दिसणाऱ्या वस्तुस्थितीला सामोरं जाता यायला हवं असं वाटतं.

शेवटी छायाचित्र म्हणजे काय तर समोर दिसणाऱ्या जगाच्या विस्तीर्ण कॅनव्हासमधला एक तुकडाच. वस्तुस्थिती दाखवणारा. पण ती वस्तुस्थिती दृश्यकलेच्या सौंदर्यशास्त्रानुसार पकडली पाहिजे. एकाचवेळी अनेक गोष्टी छायाचित्रात घडत असतात व त्याचवेळी त्यांचं स्वतःचं म्हणून एक वेगळं अस्तित्वही छायाचित्रात पकडता आलं पाहिजे. या छायाचित्रात अनेक लोक आहेत. ते आपापलं काम करतायत. पण कोणाचंही शरीर एकमेकांना आडवं येताना दिसत नाही. ते एकमेकांपासून एका ठरावीक अंतरावर आहेत पण तरीही एकाच फ्रेमचा भाग आहेत.

जसं आपण स्वतःच्या आयुष्यातील खासगी संवेदनांशी भिडतो तसं ते इतरांच्या खासगी अवकाशामध्ये भिडता यायला हवं. पण त्यासाठी खूप वेळही द्यावा लागतो. ओमप्रकाश हा दशावताराच्या इतिहासातला एक मोठा कलाकार. त्याच्यासोबत मी गेल्या पाच वर्षात जवळपास ५० गावं फिरलोय. सुरूवातीपासून मनात होतं की ओमप्रकाशचा असा एक फोटो काढयचा की ज्यात तो स्त्री व पुरूषत्वाशी एकाचवेळी भिडताना दिसेल. पण हे छायाचित्र मिळायला पाच वर्षं जावी लागली. या छायाचित्रात तो एकाचवेळी स्त्री देखील वाटतो व पुरूष देखील. त्याचं या दोन अवस्थांना भिडणं जर मला ताकदीनं पकडायचं असेल तर मलाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खोलवर जावं लागणारच आणि त्यासाठी तितका वेळ द्यावा लागणारच. पण जेव्हा असं एखादा क्षण तुम्हाला छायाचित्रात पकडता येतो तेव्हा तुम्ही केलेली मेहनत सफल झाल्याचं समाधान मिळतं.

मला वाटतं असं आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कलेच्या माध्यमातून भिडता यायला हवं. लहानपणी जेव्हा चाळीत रहायचो तेव्हा शेती करायची खूप हौस होती. घरातल्या किचनमध्ये जे जे म्हणून काही असेल ते ते जमिनीत पुरून पहायचं. पहिला पाऊस पडला की हाच उद्योग. एकदा घरातून मुठभर शेंगदाणे घेतले आणि ते पेरले. शेंगदाणे रूजून आले. पुढच्या दोन महिन्यात फूटभर उंचीचं झाड आलं. यापूर्वी कधीच शेंगदाणे कसे तयार होतात हे माहिती नव्हतं. रोज तासन् तास ते झाड बघत बसायचो. एकदिवस त्याच्या मुळाशी पिवळ्या रंगाची फुलं येऊ लागली. काही दिवसांत त्यातलं एक एक फूल कोमेजून जमिनीकडे झुकायला लागलं व चक्क ते फूल जमीन फाडून आंत जाऊ लागलं. तीन साडे तीन महिने धीर धरल्यावर एक दिवस मनावर दगड ठेऊन ती झाडं उपटून काढली. त्याच्या खाली कित्येक शेगा लागल्या होत्या. माझ्यासाठी तो चमत्कार होता. मुठभर दाण्यांचे आता ढीगभर दाणे झाले होते. मातीमध्ये, पर्यावरणामध्ये काय काय असतं नाही? आपल्याला फक्त ते पकडता आलं पाहिजे. मला शेती आणि फोटोग्राफी यात फरक वाटतं नाही. पूर्ण ताकदीनं भिडायचं फक्त. एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद पर्यावरणात असतेच.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
3 Comments
संगीता पुसाळकर
सुंदर आणि समर्पक लिखाण फोटो तर जबरदस्त आहेतच
Kunal
1dam bhariii👌👌👌
अतुल पेठे
इंद्रजितचा मी चाहता आहे. छायाचित्रकला नावाच्या अफाट सागरात हा आपल्या कोकणातला दर्यावर्दी नव्या दिशेने होडी व्हलवत निघालाय. त्यानी काढलेली छायाचित्र नवी दृष्टी (प्रदान नाही तर) ‘प्रभान’ करतात. व्यंकटेश माडगूळकर या माझ्या आवडत्या लेखकाशी जवळीक साधणारे इंद्रजितचे दृष्टिनाते आहे. आश्चर्य म्हणजे त्याची कलेची समजही तितकीच प्रभावी वाटली, जिचे नाते माधव आचवलांच्या ‘किमया’शी आहे. जगण्याला कलेच्या माध्यमातून घातलेला हा ‘हाकारा’ पुस्तक रुपात आणा ! सदिच्छा !
– अतुल पेठे