शर्मिला फडके
इन द सिटी, अ लायब्ररी
४
कुलाब्याच्या प्रोजेक्ट ८८ या आर्ट गॅलरीत छायाचित्रकार चिरोदीप चौधरी आणि कवी-लेखक जेरी पिंटो या दोघांनी मिळून केलेले ‘इन द सिटी- अ लायब्ररी’ हे कला प्रदर्शन.
‘फोकस’ या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफ़ी फ़ेस्टीवलचा हा एक भाग होता. ‘फोकस’ची संकल्पना होती- ‘आठवण’.
लायब्ररी आणि आठवणी. नेमके काय साहचर्य आहे?
लायब्ररीची आठवण आणि आठवणींची लायब्ररी.
आठवणींचं आर्काइव्ह.
प्रोजेक्ट ८८ चा अंतर्भाग मुळातच विलक्षण. शतकभरापूर्वीच्या, विस्मृतीत गेलेल्या अडगळीला सामावून घेणाऱ्या गोदामासारखा. ही खरं तर कुलाब्यातली एकोणिसाव्या शतकातली जुनी मेटल प्रिंटींग प्रेसची जागा आहे. चार हजार फुटांचा भव्य अंतर्भाग. धातूच्या उघड्या, वळलेल्या सळया, गोलाकार लोखंडी खांब, उंचच उंच छतावर उभ्या आडव्या भक्कम तुळया, भिंतीतले बॅरल्स, पाईपलाइन्सचं जाळं… अदृश्य आठवणींचं हे संग्रहालय आहे.
आपण जरा अस्वस्थ होतो. चित्र प्रदर्शन बघायची ही अशी जागा आपल्या मनात नक्कीच नसते.
पण मग आतमधे जे काही असतं ते पाहिल्यावर अशा त-हेच्या प्रदर्शनाला हीच जागा किती योग्य आहे हे पटतं.
आतमधे फोटोग्राफ्स असतात, शहरातल्या एका अस्तंगत होण्याच्या मार्गाला लागलेल्या लायब्ररीचे… आणि तिथली काही पुस्तकं. वाळवीने कुरतडलेली, उंदरांनी खाल्लेल्या अर्धवट पानांची, कणा खिळखिळा झालेल्या जीर्ण, चुरगाळलेल्या, पिवळट पडलेल्या पानांची पुस्तकं.
काही पुस्तकं जशीच्या तशी लायब्ररीमधून आणून ठेवली आहेत आणि काही, बहुधा जी आणण्याच्याही स्थितीत नव्हती, त्यांचे फोटोग्राफ्स.
उलटलेल्या काळाचे ठसे पुस्तकांना वृद्ध बनवतात. माणसांसारखेच. पण पुस्तकं तरीही माणसांपेक्षा जास्त जगतात.
प्रत्येक पुस्तकाला व्यक्तिमत्व आहे, प्राचीन, थरथरतं, जुनंपुराणं.. आठवणीतल्या, आल्बममधे जाऊन बसलेल्या व्यक्ती असतात तसं. त्यात काही प्रकांड पंडित, गंभीर वृत्तीचे आजोबा, काही अगदी गप्पीष्ट, काही समजुतीच्या, चार शहाण्या गोष्टी सांगणारे, काही कपाळावर आठ्या घालून टीकात्मक विद्वत्तापूर्ण चर्चेत रमणारे.
फोटोग्राफर आंद्रे केर्तेझचं ‘वाचन’ ही कल्पना मध्यवर्ती असलेलं एक १९७१ सालातलं पुस्तक या प्रदर्शनात आपल्याला दिसतं. त्यात त्याने १९२६ मधे काढलेला एक फोटो उघडलेल्या पानावरच आहे. पॅरिसमधल्या एका साध्याशा, सुंदर घराच्या उतरत्या छपरावर केर्तेझने त्याची लेन्स ठेवली आहे. त्यावरुन आपली दृष्टी घरंगळत जाते आणि मग नजरेच्या टप्प्यात एक वर्तमानपत्र वाचत बसलेला माणूस येतो. केर्तेझला यात कसलेही फोटोग्राफिक कौशल्य दाखवायचे नाही हे एकदा लक्षात आल्यावर मग आपल्याला तो माणूस एका अत्यंत साध्या गोष्टीत किती रमून गेला आहे ते लक्षात येतं, अगदी हेवा वाटण्याजोगी एकाग्रता. ही एकाच गोष्टीमुळे जमू शकते, ती म्हणजे वाचन. लायब्ररीपासून रस्त्यापर्यंत, अगदी लोकांच्या झोपण्याच्या खोलीतही केर्तेझचा कॅमेरा फ़िरतो आणि लोकांच्या वाचनाच्या सवयी, पद्धती डॉक्युमेन्ट करतो. मोबाईल फोन, आयपॅड, किन्डलसारख्या गॅजेट्सच्या खूप आधीचा हा काळ.
प्रदर्शनाच्या एका विभागात पुस्तकांचे काही फोटो. त्यात अगदी काहीच वर्षांपूर्वी, पण अचानक फार जुन्या काळातली वाटायला लागलेली बेस्टच्या बसमधे कंडक्टर हाताने पंच करुन द्यायचा ती तिकिटं एका पानामधे ठेवलेली दिसतात. वाचणाऱ्याने बुकमार्क म्हणून हातातली तिकिटं वापरली होती हे उघड आहे. लायब्ररीमधून नेलेलं पुस्तक कोणी कुठे वाचलं तेही कळतं.
या सगळ्यात एक विलक्षण नाट्य आहे. मानवी संस्कृतीचा, भावनांचा एक लहानसा इतिहास या इमारतीच्या अवकाशात दडून आहे. एका छायाचित्रकाराला आणि एका लेखक-कवीच्या संवेदनशीलतेला हे सगळं जाणवलं, भिडलं नाही तरच नवल. जे हरवलं आहे स्मृतींमधून, ज्याची आठवणही आता फिकी झाली आहे, ते डोहातून वर आणण्याचा हा खटाटोप नेमका का, कशाकरता, कोणासाठी करावासा वाटला असेल त्यांना.
“पुस्तकांना मानवी संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे,” एका भिंतीवर लिहिले आहे. चौधरी आणि पिंटोने हा प्रोजेक्ट नेमका का केला त्यामागचे कारण कदाचित यातून स्पष्ट होईल.
प्रदर्शनात रिचर्ड थ्री पुस्तकाच्या पानामधे सुकलेलं फ़ुल आहे. काही पुस्तकांमधे हाताने लिहिलेली पत्र आहेत. एका पुस्तकाच्या शेवटच्या पानामधे जे पत्र ठेवलं आहे ते कोणा मर्चंट नेव्हीमधे जाण्यास उत्सुक असणाऱ्या तरुणाने परवाना मिळवण्याकरता लिहिलेल्या पत्राची कॉपी, सोबत एक पत्रही आहे. भिंतीवरच्या एका फोटोग्राफमधे पुस्तकांच्या पानांवर लिहून ठेवलेले खाजगी निरोप दिसतात. त्यात एक वाचक होमिओपथीच्या उपचारांची जोरदार तारिफ करतो आहे. एका वाचकाने तर एक गणितातले कोडे घालून ठेवले आहे, पुढच्या वाचकांनी सोडवावे म्हणून. एकाने त्याला कसं वाटलं हे पुस्तक याबद्दल केलेलं रसभरीत समीक्षण आहे.
ही सगळी नांदती, वाचती पुस्तके. एका ठरावीक काळापर्यंत.
मग अचानक असं काय झालं की ओसाडच झाला हा वाचकांचा प्रदेश.
प्राचीन झालेली, ओसाड पडलेली लायब्ररी आणि जीर्ण झालेली, संदर्भ हरवलेली पुस्तकं..
नेमकं कसं बघायचं यांच्याकडे? वाचक पुस्तक वाचतात म्हणजे नेमकं काय करतात? सार्वजनिक मालकीच्या पुस्तकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असतो?
काळाच्या कोणत्या खुणा वाचक आपल्याही नकळत मागे सोडतो? वाचक आणि पुस्तक यांच्यातलं नातं किती जिव्हाळ्याचं, तटस्थतेचं, लोभाचं, हिंस्त्रपणाचं असतं? लायब्ररी म्हणजे नेमकं काय असते? पुस्तकांचे संग्रहालय? की वाचकांची पाणपोयी? पुस्तके आणि वाचक दोन्ही एकमेकांशी संवाद करतात त्यालाच लायब्ररी म्हणता येईल. वाचक फिरकलाच नाही, पुस्तकांची पानं उलटलीच गेली नाहीत तर ती लायब्ररी नाही, ते पुस्तकांचं कब्रस्तान. तुमच्या शहरात अशी किती कब्रस्तानं आहेत, ज्यांना एकेकाळी लायब्ररी म्हणत? मुंबई शहरामधे नेमक्या किती लायब्रऱ्या आहेत, त्यातल्या किती जिवंत, किती धुगधुगी असणा-या, किती मृत आहेत? माहित नाही याचा कधी कोणी सर्व्हे केला आहे का?
मात्र चिरोदीप चौधरी आणि जेरी पिंटो या दोघांना शहरातील अशाच एका एकेकाळी जिवंत, नांदत्या, आता मृतवत झालेल्या प्राचीन, सार्वजनिक लायब्ररीची विचारपूस करावी असं वाटलं. या दोघांपैकी एक फोटोग्राफर आणि एक कवी-लेखक. ज्या अर्थी त्यांना हे करावसं वाटले त्या अर्थी दोघेही अर्थातच संवेदनाशील. त्या दोघांनी लायब्ररीमधे अनेक महिने, दिवस, तास घालवले. कित्येक दशकं कधीही कोणी ज्याची पानं उलटली नाही त्या पुस्तकांच्या अंतर्भागात ते डोकावले. तिथे त्यांना काही विलक्षण गोष्टी सापडल्या, ज्यांच्या वरुन अनेक कथांचा, नव्या पुस्तकांचा जन्म होऊ शकतो अशा गोष्टी. फार काही वेगळ्या, दुर्मिळ नाही, पण विलक्षण. कोणाला तरी आलेलं पत्र, ज्यावर सत्तर वर्षांपूर्वीची तारीख आहे, सुंदर स्केच आहे, पानांमधे ठेवलेलं आता फॉसिल झालेलं फूल, ट्रामचं तिकीट, बसचं तिकीट- ज्याचे थांबेही शहराच्या नकाशावरुन आता अस्तंगत झालेले, कोणाला तरी कोणीतरी लिहून ठेवलेला निरोप, केलेली कविता, किराणामालाचे हिशोब… बदललेल्या, जीर्ण झालेल्या, थांबलेल्या, नाहिशा झालेल्या काळाच्या खूणा पुस्तकांच्या पानांमधे गोठलेल्या होत्या.
लायब्ररी कार्ड्सच्या पानांचेही काही फोटो आहेत. कोणी हे पुस्तक कधी घेतलं, परत करण्याची तारीख, प्रत्यक्षात कधी परत केलं याच्या नोंदी ठेवणारं लहान कार्ड. सगळ्या नोंदी एकाच हस्ताक्षरात केलेल्या. कोणी एकच लायब्ररियन वर्षानुवर्षं, कदाचित इथून निवृत्त होईस्तोवर हे रकाने भरत असलेला. एका पुस्तकाचा फोटो ज्यात मुलाने आपली सुट्टी कशी घालवली याबद्दल वडिलांना लिहिलेले पत्र ठेवलेलं आहे. लायब्ररीमधल्याच एका जिन्याच्या वळचणीला एका पुरातन गोल, पितळी टेबलावर रचून ठेवलेली जुन्या, खिळखिळ्या पुस्तकांची रास. खूप ओळखीचं वाटत रहातं हे सगळं.
लायब्ररीची इमारत, जागा महत्वाची नाही. ती कोणत्याही शहरातली, कोणतीही लायब्ररी असू शकते. महत्त्व आहे त्यातल्या पुस्तकांच्या आजच्या अवस्थेला. काळाच्या पावलांनी चुरगाळून गेलेली ही पुस्तके आहेत. त्यांची छपाई, विषय, वापरलेला कागद, आकार, त्यातली रेखाटनं, चित्रं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांची सध्याची अवस्था, पानांवर दरम्यानच्या काळात उमटलेले बाह्य जगांचे स्पर्श, खुणा.. अनेक मानवी जगातल्या खुणा. हे सगळं म्हटलं तर युनिव्हर्सल तरीही युनिक. स्थानिक जगाचा इतिहास उलगडवणारं.
तुमच्या, माझ्या, कुणाच्याही शहरातली एक लायब्ररी. शहरात अनेक लायब्र-या असू शकतात, असतात. त्यातली एखादी खूप जुनी, सार्वजनिक असते. कदाचित शहर वसलं तेव्हाच तिची योजना झालेली असते. मग शहर वाढतं तसं तीही वाढत जाते, समृद्ध होत जाते. प्राचीन ग्रंथ, संदर्भाकरता, अभ्यासाकरता कपाटांमधे जमा होत जातात. भक्कम, तेलपाणी प्यायलेली, जुनी काळीभोर सागवानी कपाटं, त्यात असलेली हजारो पुस्तके.
गाजलेली पुस्तकं, लेखकांचे नाव मोठं करणारी, बदनाम करणारी, लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झालेली, लाटेसारखी विरुन गेलेली, वादळ उठवणारी, गदारोळ माजवणारी, चर्चा घडवून आणणारी, कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावणारी वादग्रस्त. शास्त्राची, इतिहासाची, रूढी-परंपरांची, अभ्यासाची, मनोरंजनाची, पुन्हा पुन्हा परतून यायला आव्हान करणारी किंवा नुसतीच जागा भरणारी, चाळवणारी चटोर किंवा जडजंबाळ गंभीर. कापडी, कातडी बांधणीची पुस्तकं, काही आपल्या संग्रहात नाहीत याची खंत वाटायला लावणारी, काहींमधे सुंदर, रंगीत चित्र, सुबक रेखाटनं, काहींची बांधणी उत्कृष्ट दर्जाची, काहींचे टाईप वेगळेच, काही सोनेरी वर्खातली, काहींमधे दुर्मिळ नकाशे. असंख्य, हजारो, लाखो पुस्तकं तुमच्या शहरातल्या लायब्ररीतल्या शेल्फांवर, कपाटांमधे, रॅकवर ओळीने विराजमान झालेली.
आजूबाजूला पुस्तकांच्या थप्प्या रचून वाचनात गढून गेलेले वाचक. एकेकाळी उत्सुकतेने तुम्हीही लायब्ररीच्या पाय-या चढलेल्या असता, तिथे बसून एका मागोमाग एक पुस्तकांची पाने खाल्लेली असतात. लायब्ररी तुमच्या शहरातले एक वाजते गाजते, नांदते, जिव्हाळ्याचे, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र बनते. तिथे लेखक भेटीला येतात, व्याख्याने होतात. पण मग दशकं उलटतात, पिढी बदलते. संदर्भाची, मनोरंजनाची साधने बदलतात. लायब्ररी बदलतेच असं नाही. शहर वाढतं त्या प्रमाणात सदस्य संख्या वाढतेच असं नाही. मग टेबल खुर्च्या जुन्या होतात, शेल्फांवर धूळ साचते, पुस्तकांची पानं महिनोन् महिने, वर्षानुवर्षे उलटूनही पाहिली जात नाहीत, घरोघरी आपला स्वतंत्र पुस्तकांचा साठा करणारी वाचनप्रिय पिढी लायब्ररीचा पत्ता विसरुन जातात. त्यांना लायब्ररीची गरजच वाटत नाही. कोपऱ्यात सारुन दिलेल्या अडगळीचं विधीलिखित लायब्ररीच्या माथी लिहिलं जातं. एकेकाळी लायब्ररीच्या ज्या इमारतीमधे पुस्तके वाचायला असंख्य, अनाम माणसांचा अविरत पदरव असे तिथे आता सुनसान शांतता असते फक्त. आणि पुस्तकांवर धुळीचे, कोळीष्टकांचे ढीग. कपाटांमधल्या पुस्तकांवर धुळीचे थर अजूनच साचत जातात, पुस्तकांची पाने कोणीही न उलटता जीर्ण होत जातात. तुमच्या शहरात अशा जीर्ण झालेल्या, कसर लागलेल्या, पिवळ्या पडलेल्या, उंदरांनी कुरतडलेल्या पुस्तकांच्या थप्प्यांनी वाकलेल्या, खिळखिळ्या झालेल्या कपाटांमधे उत्थानाची वाट पहात मलूल पडून राहिलेल्या पुस्तकांनी भरलेल्या किती लायब्र-या आहेत याची तुम्हाला जाणीवही होत नाही. झाली तरी काय करणार असता तुम्ही त्याचं?
*
दक्षिण मुंबईत, धोबी तलाव इथे कयानी अॅंड कंपनी या सुप्रसिद्ध इराण्याच्या समोर असलेली जुनी ‘पिपल्स फ्री रिडिंग रुम अॅंड लायब्ररी’. १८४५ साली बांधलेली. महात्मा गांधी मुंबईत पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांनी या लायब्ररीला भेट दिल्याचीही एक ऐतिहासिक आठवण.
भरपूर, वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं, मासिकं, वृत्तपत्रांचे ब्रिटिश काळापासूनचे गठ्ठे. या लायब्ररीत चिरोदीप चौधरी पहिल्यांदा गेला १९९४ साली. द संडे ऑब्झर्वरकरता काम करत असताना. त्या वेळची त्याची आठवण म्हणजे एका प्रचंड मोठ्या सागवानी कपाटातल्या कप्प्यात पंच मॅगझिनचे बाउंड व्हॉल्यूम्स रचून ठेवले होते. त्यावेळी हे मॅगझिन नुकतेच बंद झाले होते. दोन वर्षांपूर्वी या लायब्ररीच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजवर जेरी पिंटो यांची नेमणूक झाली. संस्थेचे एक सभासद निवृत्त होत असल्याने जेरी पिंटोना त्यांच्या जागेवर घेतलं गेलं होतं. “आणि मग जेव्हा जेरी या लायब्ररीच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजवर आहे हे कळलं तेव्हा मी पुन्हा इथे गेलो. वीस वर्षांनंतरही सगळं जसंच्या तसं होतं. कपाट, फ़ळ्यांवरचे मासिकांचे गठ्ठे जराही न हललेले, त्यावर धुळीचे थर वाढलेले. वीस वर्षांत पुस्तकांच्या या दुनियेला कोणी स्पर्शही केलेला नाही.” चौधरी सांगत असतो. त्या दिवशी त्याने काही पुस्तकं उचलली, चाळली, उघडून पाहिली. चाळीस हजाराहून जास्त पुस्तकं तिथे होती. ती पाहूनच दडपण आलं. प्रत्येक पुस्तकावर धुळीचे, कोळीष्टकांचे जाड थर. अनेक जीर्ण, वाळवी लागलेली. कित्येक वर्षांमधे कोणाच्याही नजरेचा, हातांचा स्पर्श न झालेली, कपाटातल्या फ़ळ्यांवर चिरनिद्रा घेणारी पुस्तकं.
चिरोदीप आणि जेरीला त्या पुस्तकांच्या पानांमधे दडलेल्या अनेक विलक्षण गोष्टी मिळाल्या. पुस्तक वाचताना लोकांनी पानांमधे खुणा म्हणून मागे सोडलेल्या, विसरलेल्या अनेक गोष्टी. सार्वजनिक पुस्तकांमधल्या या वैयक्तिक खुणा हा एका फोटोफीचरचा विषय होऊ शकतो ही कल्पना चिरोदीपच्या डोक्यात त्याच वेळी रुजली. मग तो पुन्हा पुन्हा तिथे जात राहिला. पुढचे १८ महिने. अडीच हजार फोटो त्याने काढले. त्यापैकी २६ छायाचित्रांचं त्यांनी प्रदर्शन भरवायचं ठरवलं. जेरी पिंटोने या फोटोंकरता कॉपी लिहिली, लायब्ररीवर लिहिलं.
इन द सिटी, अ लायब्ररी या फोटो प्रोजेक्टचा जन्म असा झाला.
फोटोग्राफी हा मुळातच आठवणींना, स्मृतींना जपून ठेवण्याचा प्रकार. वस्तू, वेळ, प्रसंग, व्यक्ती यांचे डॉक्युमेन्टेशन असते ते. चिरोदीप चौधरी फोटोग्राफीकडे याच दृष्टीकोनातून बघतो. काळाच्या अखंडित प्रवाहातले तुकडे इमेजेस मधे, इमेजेसना कथेमधे रुपांतरीत करण्याचा त्याला छंद आहे. हा लायब्ररी प्रोजेक्टही त्याला अनुसरुनच. “पुस्तकांकडे मी कायमच आकर्षित होतो. मला जुनी, हाताने काढलेली इलस्ट्रेशन्सही आवडतात. ज्या पुस्तकांमधे अशी हाताने काढलेली चित्रं असतात ती आता फार बघायला मिळत नाहीत. एखाद्या जुन्या रद्दीच्या दुकानात किंवा मग अशा जुन्या लायब्ररीच्या कपाटांमधे मात्र ती हमखास मिळतात. पुस्तकाच्या पानांमधे माहितीचा खजिना असतो. एखादं पुस्तक जेव्हा हरवतं किंवा ते वाचलंच जात नाही, तेव्हा मानवी स्मृतीचा एक तुकडाच गहाळ होतो. लायब्ररीच्या सदस्यांची संख्या जेव्हा घटत जाते, वाचणारी माणसं तिथे येईनासे होतात, त्यावेळी विस्मृतीचे एक जाडसर धुके साकळायला लागते.”- चौधरी सांगतो.
काय आणि कशाचे फोटो काढावेसे वाटत आहेत हे त्याच्या मनात पक्क होतं. व्हिज्युअल ड्रामा तिथे होताच, त्याही पेक्षा खूप काही तरी – पुस्तकांचा जन्म झाला तेव्हापासून माणसाशी जडलेलं एक नातं, जे विसविशीत व्हायला सुरुवात कधीच झाली होती, आता वाळवीने पोखरलं गेलं आहे ते त्याला तिथे दिसत होतं. एका जुन्या वास्तूतल्या संस्थेची कथा सांगताना इमारतीचे फोटो काढण्यापेक्षा त्यातल्या रहिवाशांचे, म्हणजेच पुस्तकांचे फोटो काढणं चौधरीला जास्त योग्य वाटलं. वास्तू सुंदरच आहे. नाट्यपूर्णही आहे. पण खरं नाट्य त्यातल्या जीर्ण, जुन्या पुस्तकांमधे आहे, त्यांच्या आजच्या अवस्थेमधे आहे. पुस्तकामधलं प्रत्येक पान, ते जितकं जुनं, खिळखिळं तितकी त्याची गोष्ट तीव्रतेनं भिडणारी. त्या पानांवरचे शब्द काय सांगतात त्यापेक्षा त्या पानाची स्थिती काय सांगू पहाते आहे, त्यातून एक वेगळा इतिहास, मानवी वर्तनाचा इतिहास समोर येतो आहे तो जाणून घेणं जास्त महत्वाचं. उलटलेल्या काळाचे अवशेष, मग ते पोस्टकार्ड असो, ट्राम तिकिट, ठेवलेला निरोप. आयुष्याची नाट्यपूर्ण गुंतागुंत या पानांमधे आहे. आठवणींची ही कहाणी जास्त आव्हानात्मक, जास्त भावनाशील, जास्त नाट्यमय आणि जास्त नाजूकही. काळाचे आठवणींवर पडलेले घाव आणि काळाने केलेलं त्यांचं नुकसानही जास्त स्पष्टतेनं, ठळकपणे दिसतात.
जेरीच्या मते एका लेखकाच्या दृष्टीने प्रत्येक लायब्ररी ही सुखद आणि दु:खद अशा दोन्ही प्रकारच्या स्वप्नासारखी असते. तुमच्या समोर हजारो पुस्तकं असतात जी तुम्ही वाचलेली नसतात, शिल्लक आयुष्यातला प्रत्येक तास वाचनात घालवायचा ठरवलं तरीही ती वाचून संपणे शक्य नसते. हजारो लेखक, ज्यांची नावंही कधी तुमच्या कानावर पडलेली नाहीत. आपलंही दैव लायब्ररीच्या या हजारो न वाचल्या गेलेल्या पुस्तकांच्या लेखकांच्या नशिबाशी बांधलं गेलं असल्याची विदारक जाणीव अशा लायब्ररीमधेच होते. या लायब्ररीमधे काही अत्यंत दुर्मिळ, ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची पुस्तकं आहेत. खूप जुनी म्हणून त्यांचं महत्त्व आहेच, पण काही खाजगी रित्या छापून घेतलेली, अगदी मोजक्या प्रती, आपल्या नातेवाईक, जवळच्या मित्रांना वाचण्यापुरत्याच. वैयक्तिक आठवणी, आत्मचरित्र, प्रवासातल्या आठवणी, पत्रसंग्रह, काही संस्थांच्या इतिहासाच्या नोंदी, शाळांचे अहवाल इत्यादी. प्रेमचंद रॉयचंद या उद्योगपतीची खाजगी संग्रहातली पुस्तकं ज्यांच्यावर त्यांचा खाजगी शिक्का आहे तीही इथे आहेत (त्यांच्या आईचं नाव राजाबाई टॉवरला दिलं आहे). काही पुस्तकं आता जगात कुठेच नसतील, फक्त याच लायब्ररीमधे शेवटची प्रत असेल, त्यालाही वाळवी लागलेली.
हे एकाच वेळी त्याला विलक्षण आणि विदारक वाटलं. शहराच्या सार्वजनिक वाचन स्मृतींचं आर्काइव्ह अशा वैयक्तिक तुकड्यांमधूनच उभं रहातं. शहराचा इतिहास या अशाच आठवणींच्या तुकड्यांमधून शोधायचा असतो.
*
लायब्ररी हे वाचन स्मृतींचे कोठार आहे, आणि वाचन संस्कृतीच्या लयाला चाललेल्या युगाची साक्षीदारही. सार्वजनिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही वाचन स्मृतींची साठवण लायब्ररीत होते. प्रत्येक काळातली वाचन स्मृती वेगळी. प्रत्येक काळातला पुस्तकांचा प्रतिसादही वेगळा. काळ आणि पुस्तक, हे समीकरण सोडवताना वाचन हा दुवा जास्त जास्त विरत चाललेला लक्षात येतो. वाचनलायांची संस्कृती नजरेसमोर लयाला जाताना दिसते आहे. पुस्तक आणि वाचक यांच्यातला संवादांचे, शतकभरापूर्वीचे पडसाद या कोळीष्टकांनी भरलेल्या, पोपडे निघालेल्या जुनाट भिंतींमधून ऐकायला येतात. मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा, ज्ञानाचा, शहाणीवेचा मार्ग पुस्तकांच्या पानांमधूनच जातो. पण पुस्तकांच्या पानांपुरतं ज्ञान मर्यादित नाही. ते त्यात आहे आणि त्याही पलीकडे आहे. पुस्तकात त्यातल्या शब्दांपेक्षाही कितीतरी अधिक काहीतरी सामावून असते. जे कदाचित कधीच वाचलं जाणार नाही. लायब्ररीमधल्या पुस्तकांना इन्डेक्स नंबर असतो, त्या नंबरानेच ती ओळखली जातात. वाचकाच्या हातात ते पडल्यावर त्याची खरी ओळख बाहेर येते. वाचकाने ते हातात घेतलेच नाही तर… न वाचताच वार्धक्याचा शाप नशिबी आलेली अशी असंख्य पुस्तकं लायब्ररीमधे. पुस्तकांना अनेक शत्रू असतात, लायब्ररीलाही असतात. सर्वात भयानक शत्रू म्हणजे वाचकांच्या पदरवाचा कमी कमी होत गेलेला आवाज, रिकामा अवकाश. सदस्यांची रोडावलेली संख्या.
लायब्ररीसारख्या वाचन स्मृती-संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्राचीन संस्थेला आज टिकून रहाण्याकरता जी धडपड करावी लागत आहे ती एकंदरीतच आजच्या आपल्या बदललेल्या मानवी संस्कृतीसंदर्भात काही महत्वाचं विधान करते. एका बाजूला मॉलसारख्या व्यावसायिक विक्रीसंस्था वाढत आहेत, आणि सार्वजनिक मोफत वाचनालये बंद पडत आहेत. एकेकाळी शहरातल्या पुतळ्यांच्या हातातही पुस्तके असत, ज्यांनी शहराची उभारणी केली त्या ऐतिहासिक पुरुषांचे हे पुतळे, फिरोजशाह मेहता, दादाभाइ नौरोजी.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या हातातही पुस्तक होते. शहराच्या इतिहासात पुस्तकांना स्थान होते. ज्ञानाला, बुद्धीमत्तेला स्थान होते. पण आता हे पुतळे काळाच्या अवशेषाचा भाग झाले. चिरोदिपने टाईम आउट मुंबईच्या एका अंकाकरता शहरातली वास्तुकला या विषयावर फोटोग्राफी करताना या पुतळ्यांचे फोटो काढले होते. आता या प्रदर्शनात वाळवी लागलेल्या पुस्तकांचे फोटो आहेत.
काळाचा, संस्कृतीचा एक मोठा टप्पा ओलांडला गेला आहे.
वाचनालये आज जगण्याकरता धडपडत आहेत, त्यांच्यातलं मानवी आठवणींच आर्काइव्ह नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. आपण विस्मरणाच्या, अॅम्नेशियाच्या गप्पा करत असतो, अशा वेळी माणसांच्या आठवणी जपणारी एक इमारत जगण्याची जी धडपड करत आहे ती जाणून घेणे महत्वाचे ठरते. आपण सगळं फार पटकन विसरतो. काही गोष्टी मुद्दाम प्रयत्न केला नाही तर त्या आपल्या आयुष्यात घडून गेल्या आहेत हेही नंतर कधी आठवणं शक्य नाही. लायब्ररीमधे मागे राहिलेले हे क्षण, स्मृतींचे कण काही फ़ार महत्वाचे नाहीत त्या त्या माणसांच्या दृष्टीने. मात्र शहरातल्या त्या काळातल्या लोकांच्या जगण्यातले हे काही क्षण आहेत, त्या काळाच्या आठवणींच्या दृष्टीने आज त्यांना एक काहीतरी महत्व आहे.
*
फोटो काढण्याकरता चिरोदीप चौधरी जवळपास दीड वर्ष या लायब्ररीमधे येत होता. इमारतीच्या अंतर्भागाचे, जुन्या पुस्तकांचे तो फोटो काढत होता. पण एकानेही कधी जवळ येऊन तो हे का करत आहे हे विचारण्याची उत्सुकता दाखवली नाही.
एकंदरीत पुस्तकांबद्दलची उत्सुकता, कुतूहल कमी झाल्याचेच हे लक्षण आहे असं चिरोदीपला वाटतं. त्याच्या मते आत्ताच्या आणि जुन्या (स्मृतीतल्या) लायब्ररीमधला सर्वात मोठा फ़रक तिथे येणारी माणसे हाच आहे. पूर्वी इथे वाचक यायचे. आता इथे सर्वात जास्त विद्यार्थी येतात. त्यांना पुस्तकं ‘वाचायची’ नसतात, परिक्षा पास होण्यापुरती ते ती चाळतात. हवा तेवढाच भाग वाचतात किंवा झेरॉक्स करुन घेतात. पूर्ण पुस्तक वाचण्याइतका त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा वेळी आजच्या डिजिटल युगात लायब्ररी या संस्थेची गरज आहे का हा प्रश्न मनात येतो. वाईट वाटतं आणि हे अपरिहार्य आहे याचा चटकाही बसतो. सार्वजनिक वाचनालये ही संस्था आजच्या इंटरनेटच्या युगात झपाट्याने अस्तंगत होण्याच्या मार्गावर असलेल्या इतर अनेक गोष्टींपैकी एक. हे अस्तंगत होणे खेदजनक तरीही अपरिहार्य.
काळाची गती संथ होती. वाचत बसायला वेळ होता. त्यावेळी अगदी मुंबईसारख्या वेगवान शहरातली वाचनालयांमधे पुस्तक वाचणाऱ्यांची गर्दी असे. आता एकंदरीतच अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे. इलेक्ट्रॉनिक स्क्रीन टाईम इतका वाढला आहे की रोजच्या वर्तमानपत्राच्याही वाचनाला वेळ देणारे लोक दुर्मिळ झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदललेली वाचनशैली, पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची एका अर्थी चांगली सवय, लायब्ररीमधे जाऊन तासन तास वाचन करण्याइतका वेळच नसणे, विकिपेडिया, गुगल आणि लायब्ररीमधल्या दुर्मिळ पुस्तकांचे होणारे इलेक्ट्रॉनिक डिजिटायझेशनमुळे संदर्भ ग्रंथांची कमी झालेली गरज, अशी असंख्य कारणं. पटणारी, न पटणारी पण अपरिहार्यपणे स्विकारायलाच लागणारी. ज्ञान, माहिती निरुपयोगी होत जाते, आठवणीही होतात निरुपयोगी, संदर्भहीन. काळ खूप वेगाने पुढे सरकतो.
आपल्या नजरेसमोर, गेल्या आठ-दहा वर्षांमधे झालेले हे बदल आहेत.
लायब्ररीची मोफत रिडिंग रुम आजही भरलेली असते, मात्र कपाटांच्या खणातली पुस्तक वर्षानुवर्षं जागची हलत नाहीत. इथे तीस-चाळीस वर्षं नियमित येणारीही माणसं अजून आहेत. लायब्ररीच्या इमारतीमधेही जराही बदल झालेला नाही. काळ इथे गोठला आहे. मात्र आता इथे नव्या आठवणी पुस्तकांच्या पानात जन्माला येणं पूर्ण थांबलं आहे. कॉलेजातली मुलं मुली इथे येत असतात, पण त्यांना कपाटांमधल्या पुस्तकांमधे जराही रस नसतो. लॅपटॉप, मोबाईल फोन यांच्यात ते रमलेले असतात. पुस्तकांना कोणी हातही लावत नाहीत.
तरीही अजून शहरांमधे लायब्ररी आहेत, ही एक छान गोष्ट आहे. ही तुमच्या आमच्या शहरातल्या एका लायब्ररीची छायाचित्रांकित कहाणी. लायब्ररीमधल्या दुर्लक्षित पुस्तकांची कहाणी.
लायब्ररीसारख्या जागांकरता आपल्या मनात असलेला हा एक रोमॅन्टीक नॉस्टेल्जिया आहे. त्यांची आज तितकिशी गरज राहिलेली नाही हे वास्तव माहित असूनही. तो नेमका काय आहे हे जाणून घ्यायला मला या प्रदर्शनाची मदत झाली.
प्रदर्शनातले पानं अर्धी कुरतडलेल्या जुनाट पुस्तकांचे, पानांमधल्या वस्तू, रेखाटन, चित्रांचे सेपिया टोनमधले कलात्मक फोटो आणि सोबत जेरी पिंटोची परिणामकारक, चपखल शब्दांमधली कॉपी.
पिवळ्या पडलेल्या जीर्ण पानांवरचं काव्य त्यातून आपल्यापर्यंत पोचतं.
हाताने लिहिलेली पोस्टकार्ड्स, कोणी तरी कोणाला तरी पाठवलेली तार, चिरडलेल्या किड्यांचे फॉसिल्स, वाळवीची भोकं.. हे प्रत्येक उलटून गेलेल्या काळाचे तुकडे. आठवणींचे तुकडे. चिरनीद्रेतल्या पुस्तकांचे आत्मे नवा जन्म मिळाल्यासारखे उठून उभे राहिलेले..
पुस्तकं या फोटोंमधून पुन्हा जन्म घेतात.
आणि मग पुस्तकांच्या दुर्दशेमुळे मनातली बोचरी सल जरा निवळते. हळवी, काव्यात्म गतकातरता त्या जागी उमटते. मनातल्या असंख्य वाळवी लागलेल्या आठवणी, रद्दी म्हणून अडगळीत, धुळीने भरलेल्या कपाटांवर रचून ठेवून दिलेल्या.. सगळ्या सुंदर, कलात्मक, ग्लोरिफाइड स्वरूपात प्रकट होतात.
या प्रदर्शनातले फोटो हे अनेकदा सेल्फी वाटतात. त्या त्या काळातल्या वाचकाने आपल्या वास्तवाला कैद करुन ठेवलेली सेल्फी.
तुम्ही लायब्ररीची पायरी शेवटची कधी चढलात? तुमच्या मुलांना लायब्ररीचं सदस्यत्व घ्यायला आणि तिथे जायला सांगितलंत? ती जातात? In the City, a library हे प्रदर्शन आपल्याला हे प्रश्न विचारते. आपल्या शहरातल्या लायब्ररीच्या जीवन-मरणाला कारणीभूत ठरतील यांची उत्तरं.
—