हिमांशू भूषण स्मार्त

एक रात्र-एक सकाळ



back

रात्री असं वाटत होतं की हजारो-लाखों कोनांमधनं येणारे प्रकाशाचे झोत अंगात भरत जातील आणि आपण निर्अंग होऊन जाऊ. लहानपणी भिंगातनं सूर्यप्रकाश एका बिंदूत साठवून कापूस जाळायचो आपण तसं. या झोतांनी अंग भाजत नाहीये पण हे स्पष्टच जाणवतंय की प्रकाश पार रक्ता-पेशीपर्यंत पोहचलाय. रक्त उकळत नाहीये, पेशींची वाफ नाहीये होत पण रक्ता-पेशींची आपल्याशी असणारी ओळख नष्ट होतीय. त्यांच्यावर प्रकाशाचं एक अतितलम पण अविनाशी अस्तर चढतंय. म्हणून आपण नष्ट होत नाही होत, आपण निर्अंग होतोय. प्रत्येक रेघ, प्रत्येक इंद्रिय मोकाट सुटलंय. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या झालेत. प्रकाशानं असं निर्अंग,रंध्रमोकाट, इंद्रिय्रमोकाट करुन टाकलंय आणि कशी कुणास ठाऊक, मस्तकातल्या काहीशे असा प्रकाशवर्ष लांब असणाऱ्या स्मृतीच्या धूसर पुंजक्यात भूपाळी वाजतीये..

सायंकाळी एकेवेळी, द्विजगण अवघे वृक्षी,
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी.

अनुनासिक, काहीशा किनऱ्या आवाजाचे अतिबारिक कण. त्यांनी अंतरिक्षाची अगम्य अंतरं आणि प्रकाशाचे तलम-अभेद्य स्तर ओलांडले हेच थक्क करणारं आहे. ओळी उलटसुलट येतायत, त्यांचा क्रम बिघडलाय. चेहऱ्यावर रडं ओथंबलेल्या संध्या आणि ललिता पवार, अभिनयाने चेहरा डबडबलेला कुणीतरी अनोळखी नट, गायी, उगवणारा सूर्य, कुक्षी कुंभ घेतलेल्या सुहास्य बायका, फडफडा वर चढणारा तिरंगा, कुणीतरी प्रकाशाच्या पांघरुणात झोपलाय आणि लयदार चालणारी एक शेलाटी स्त्री त्याला उठवतीये, भवती हंसाची शिल्पं आणि अर्थातच चरावया उडालेले पक्षी.. असली व्हिज्युअल्स सुद्धा आलीत त्या कणांना चिकटून. आता लताचा आवाज येईल..तरुण, ताजा, लख्ख.

आनंद कंदा प्रभात झाली, उठ सरली राती..

आणि या सगळ्यामागून गवताच्या पिकल्या लोंब्यांचा वास येईल. अंगावरचे कपडे गवताला धरुन राहिलेल्या दवाने ओले होतील. पण असं काही होत नाही भूपाळीतला चमकदार प्रकाश तेवढा शिल्लक राहतो आणि ‘आनंदकंदा’ मधलं लताचं टवटवीत आवाहन. पण हे जास्त जीवघेणं आहे. जीवाची नुस्ती कुतरओढ. तगमग नव्हेच ही, कुतरओढच. तगमग आपलीआपली असते. स्वायत्त. कृष्णविवराला जसं घटनाक्षितीज असतं तसं या प्रकाशाचं अस्तित्वक्षितीज. एकदा त्याच्या अस्तरानं वेढले गेलो की संपला कारभार. भिंगातनं उजेड गोळा कर, गारगोट्या घासून ठिणग्या पाड, अंधाराचं भयं वाटतं म्हणून लोंबत्या वायरी ओढून झिरोचे बल्ब लाव, असं कायकाय करत आलो आपण लहानपणापास्नं, त्याचं आज हे काय होऊन बसलयं..               

एक तूही नही जो मुझसे जुदा हो बैठा
मैने जो संग तराशा था वो खुदा हो बैठा

मग प्रकाशाचं कायकाय वेडवाकडं आठवायला लागतं. अमिताभ अंगभर लायटिंग असलेले कपडे घालून नाचतो, ‘सारा जमाना हसिनो का दिवाना’..त्याच्या मागं मैदानभर पसरलेली लाईटची टिंबं. बटबटीत तांबडे-हिरवे, डोळ्यात घुसणारे दिवे. सारा जमाना ज्यांचा दिवाना आहे अशा, मागं नाचणाऱ्या हसिनांचे चेहरे, दिव्यांनी निबर केलेले. त्यांच्या हसण्यातनं प्लॅस्टिक ओसंडतयं. अमिताभच्या अंगभर वळवळणाऱ्या लायटिंगनं त्रासावं, त्याच्या बेढब नाचानं त्रासावं की हसिनांच्या हसण्यातल्या प्लॅस्टिकनं, ..हे ठरवताना मेंदूचा पार गोंधळ उडालाय. तहानलेल्या कंठातनं मृगजळाचे धुमारे उसळावेत तसा मेंदूच्या गोंधळातून प्रकाश धुमारतोय. रंकाळ्यावर आई-बापांची बोटं धरून चालत जाणारं एक पोर दिसतंय. त्याच्या बुटात लाइट. पावलाचा दाब जमिनीवर पडला की दिवे लागतायत. पोरांना भाडोत्री रपेट मारून आणणाऱ्या उमद्या घोड्यांची तोंडं निळ्या-तांबड्या-पांढऱ्या लाइटिंगच्या माळांनी वेढून टाकलीयेत. भेळेच्या गाडीवर चार राक्षसी बल्ब टांगलेत. प्रकाश  पांढऱ्याफेक चिरमुऱ्यांमधे घुसलाय आणि चिरमुऱ्यांचे छोटेछोटे दिवे बनलेत, ते खाल्ले की पोटात तारांगण बनणार. मग आपलं पचन झगझगीत आणि आपल्या रक्ताभिसरणात संचारणारे द्रवरुप प्रकाशझोत. या प्रकाशझोतांची लसलस सतत अंगात. ही लसलस अंगाच्या प्रत्येक अग्रात तटतटून येते आणि शरीर सारखं काहीतरी करु पाहतं. ही लसलस अतिदाट आणि शरीराच्या हालचाली मोकाट. बाहेरुन बघणाऱ्याला हे सगळं किती मनोहारी वाटत असेल. आवेगानं मूठ गच्च आवळली तरी मुठीतून फुटून आल्यासारखा प्रकाश भळभळेल. अपार श्रमानं जांभई दिली तर तोंडावाटे प्रकाश फेकला जाईल. आळसानं अंग ताणलं तर रक्तामधनं प्रकाशाचे फवारे उसळतील. खूप दमलं की कपाळावर प्रकाशाचे थेंब डवरतील. रडलं की अश्रूतनं प्रकाश टपकेल आणि हसलं की दाता-डोळ्यांमध्ये दिव्यांच्या लख्ख ज्वाळा पेटतील. आणि या दिव्यांचं इंधन अविनाशी. नवरात्रात अखंड तेवणाऱ्या समयांचं तेल कधीतरी उत्तररात्री संपून गेलं की, अंधार वातीवाटे आत शिरुन समयांना व्यापून राहतो, तसं नाही या दिव्यांचं. आणि हे मायावी दिवे पेटलेले असले की कुणाची सेाबत नाही. या दिव्यांनी झगझगणारे आपण प्रचंड एकटे. कुणी शरीरानं कितीही निकट असलं तरी प्रकाशाच्या अस्तरानं आलेली अनोळख जास्तच सशक्त. ही अनोळख जास्त समकालीन, रास्त. आणि या प्रकाशानं बाकी सगळचं कसं गिळून टाकलंय. चवी, गंध, स्पर्श, आवाज. अर्थात, हे काही एकाएकी झालं नसणारं. रात्रीचा एकेक प्रहर प्रकाशानं अप्रस्तुत करून टाकला असणार. आधी सूर्यास्ताच्या नजिकचे प्रहर-क्षण, मग हळूहळू मध्यरात्र ओलांडून उत्तररात्र, मग पहाट.. टेकड्या-डोंगरावर जाऊन पहावं तर दऱ्या दिव्यांनी भरून काढलेल्या, जमिनीतून प्रकाश आकाशाकडे उसळलेला, दिवसभराच्या यातायातीनं म्लान रस्ते फिक्या, कमी उजेडात जास्तच शक्तीहीन, उपरे.

घड्याळात रात्र झालीये आणि आपण असे, अंगावर येणाऱ्या प्रकाशाच्या मुसंड्या सोसत रस्त्यावर उभारलोय, दिग्मूढ. सगळं स्वच्छ-टक्क-ढळढळीत दिसल्यानं आलेली मूढता. किती छान रचलेला शब्दाय दिग्मूढ. दोन ऱ्हस्वांच्या मध्ये एक दीर्घ जोडव्यंजन. संधी होण्याआधीच्या दोन स्वतंत्र शब्दांचे प्रवाह मिसळून ते कुठे विरघळले एकमेकांत त्या जागेला स्पर्श करून, संधीनं निर्मिलेली एकसंधता. उच्चारित होण्यानं शब्द किती वाहता बनवलाय. मधल्या दीर्घानं शेवटच्या ऱ्हस्वाचं आवार विस्तारलय. शब्द सुचवत असलेली अवस्था नकोशी पण उच्चारण हवंस. इतकं प्रबळपणे प्रकाशमूढ होऊनही, दिग्मूढ होऊनही शब्दांच्या चवी कळतायत म्हणजे अजून धुगधुगी आहे आपल्यात. याचा दिलासाही वाटतो आणि भयही. म्हणजे प्रकाशानं घुसून, स्वतःच अस्तर चढवावं असं एक सूक्ष्म आपल्यात शिल्लकाय अजून.

रस्त्यावरनं अंगावर येणारी वाहनं आणि त्यांचे अप्पर लाईटस् ओलांडत घराकडं जाताना कसली कसली अजब इल्युजन्स डोळ्यापुढं तरळत राहतात. अकराव्या अवतारातल्या विष्णूनं एक लालभडकं रंगाचा स्विच ऑन केला आणि शिवाचं, एलइडीच्या व्यामिश्र नळ्यांसारखं बेबंद तांडव आरंभलं. सगळं ब्रह्मांड प्रकाशानं पांढरफेक. म्हणजे हा सृष्टीचा शेवटचा दिवस होता. म्हणून प्रकाश इतका अनिवार.. आता आपण कुणीही नाही. आपण केवळ मूलकण, ज्याला गुण नाहीत पण ज्यांच्या आतून अतितेजस्वी प्रकाश उलतोय.

मग त्याच वाटेनं घरी येऊन जेवण-बिवण. बिछान्यावर पडताना खिडकीवरचा पडदा ओढून पडून राहिल्यावर, खिडकीबाहेरचा प्रकाश पडद्यावरून आंदोळत पसरत राहतोय. खिडकीबाहेर ब्रम्हा; मूलकणांचे असेंब्लिंग करत नवी सृष्टी घडवतोय. पडद्यावर आंदोळणाऱ्या त्याच्या हालचाली. कॉलनीच्या दुसऱ्या टोकावर चाललेल्या दांडियाचं जोरकस पार्श्वसंगीत. 

मैं तो आरती उतारूँ रे, संतोषी माता की

या विलक्षण नशिल्या इल्यूजननं गुंगी येते. प्रकाशबंबाळ रात्रीला एकटं सोडून, तिच्याशी प्रतारणा करून परदेशी चालल्यासारखं असाहाय्य आणि अपराधी वाटतंय. मग म्हटलं तर झोप म्हटलं तर गुंगी असं काहीतरी. पुन्हा लता आणि पांढऱ्या वस्त्रांमधली मीनाकुमारी.. .. .. .. .. ..

ये रोशनी के साथ क्यों धुआँ उठा चिराग से
ये ख़्वाब देखती हूँ मैं के जग पड़ी हूँ ख़्वाब से

मग मेंहदी हसनच्या आवाजातला मीर.. ..

देख तो दिल कि जाँ से उठता है
ये धुआँ सा कहाँ से उठता है

मग अभिषेकी,

तुझ्या लोचनी हा प्रकाश विलसे
तयासि लाजे बघ चंद्रिका ही

रोशनी, प्रकाश, चराग, चंद्रिका.. ..प्रकाशाविषयी किती म्हणून ठेवलंय माणसांनी. लहानपणी परसातल्या अळूच्या गचपणात, जेवल्यानंतर हात धुवायला जाताना आजी सांगायची, ‘लाइट लाऊन जा रे घाबरायला होणार नाइ. एक पिवळा क्षीण दिवा लागायचा. त्या दिव्यानं एक मोठ्ठा पारदर्शक चेंडू बनवलाय आणि आपण त्यातनं न घाबरता चाल्लोय. त्या चेंडूच्या सीमेपार कितीतरी गोष्टीयेत. जास्वंदीच्या गचपणात रात्रवस्तीच्या चिमण्या आहेत. तीन भागात उलून आलेली, पिकली सिताफळायत, दगडांच्या गराड्यात वावरणारी पिवळी धामणाय, लिंबाच्या खड्‌ड्यात पुरलेले लठ्‌ठ उंदीरायत, ज्याचं हळूहळू खत होतंय, खसफसत फिरणारी मुंगसं आहेत, मांजरायत, छपरांवर आळसावून पडलेला चंद्राचा अतिमंद उजेडाय. आपण पिवळ्या चेंडूतनं जातो, पाण्याची खळखळ करून हात धुतो. परत आलो की बटन दाबून चेंडू मिटतो. चेंडू मिटला तरी बाकी सगळं त्याच्या भवतीचं आहे तसं. त्यावेळी कसा दुबळ्या पिवळ्या चेंडूनं धीर वाटायचा, आता इतक्या प्रकाशाचं भय वाटतं. असो, आता ते संपलं सगळं. 

मैने जो संग तराशा वो खुदा हो बैठा.
गुंगी सरते आणि झोप येते.

****

ग्रीष्मातली सकाळ. शहर बरंचसं मागं पडलंय. घाटाच्या सगळ्यात वरच्या वळणावरनं बघितलं की आडवं पसरलेलं दिसतं ते त्याचं शेवटचं दर्शन. डाव्या हाताला कळंब्याचं पाणी, उजव्या हाताला दूर रंकाळा. जागा मिळेल तिथं कोंबलेल्या इमारती. अधनंमधनं हिरवे तुरळक पट्टे. पण घाट सोडला की सगळं वेगळं. वाळून गेलेल्या गवतानं पिवळसर करड्या झालेल्या टेकड्या. ग्रीष्माचे ओढाळ फुलोरे. भेगाळलेली भुई मागे सोडत भिंतीकडं सरकलेलं पाझर तलावांचं पाणी. सुकत चाललेल्या दलदलीत ठसे उठवत फिरणाऱ्या तुताऱ्या, चिलखे, टिटव्या. मग दगडाधोंड्यांच्या खोबण्यांमध्ये पाय टाकत, पांढऱ्या फुलांनी डवरलेल्या करवंदाच्या जाळ्या सांभाळत अर्धा-एक तास चालणं. मग दोन्ही काठांना निलगिरींची रेघ असलेली कच्ची वाट लागते. मग एक सपाट पठार. दयाळांची, चंडोलांची उड्डाणं. मैनांचं, धानचिमण्यांचं धावत अंतर कापणं. पुढं डोंगर कापून केलेला ऊस. पाटांमधनं खालच्या दिशेनं वाहणारं पाणी. अचानक वाट संपते आणि पावलांसमोर खोल दरी येते. लांब, दरीची दुसरी भिंत. दोन डोंगरांच्यामध्ये, दरीच्या तळाशी कोरडा पडलेला तलाव. तलावाच्या भिंतीपासनं अरुंद होत गेलेली घळ आणि घळीच्या सगळ्यात अरुंद बेचक्यात झाडांचा हिरवाकंच पुंजका वाढलेला. हा पुंजका वाहत यावा तसा तलावाच्या दिशेनं आलाय आणि कोरडेपणाला बिचकुन मध्येच थांबलाय. घळीतनं ओसंडून आलेले थोरले पाषाण मात्र न घाबरता तलावाच्या कोरडेपणात उतरलेत. त्यांच्या अंगावर पावसाळ्यात पाणी वाहल्याच्या, शेवाळ्याचे तलम थर चढल्याच्या, बगळे शिटून गेल्याच्या खुणायत. एवढ्या ऐवजावर ते ग्रीष्माची वाट चालून जाणारायत. गालिब म्हणालाय तसं, ’अगर और जीते रहते तो यही इंतजार होता’. पण हा इंतजार पाषाणांसाठी जाचाचा नाही. त्यांनी शेवाळाच्या, हंगामी झुडपांच्या, गवतांच्या बिया धरून ठेवल्यात. पावसाळ्यात डोंगरावरनं ओढ्या-ओहळांनी वाहत येणारं पाणी, घळीच्या अरुंद टोकावरनं कोसळत राहील. पाषाणांची गवती बेटं होतील. सरत्या पावसाळ्यात लाजरी किंवा जांभळी पाणकोंबडी पाषाणांच्या माथ्यावरच्या गचपणात अंडी घालील.

संपलेल्या वाटेपाशी उभारून दरी बघितली की दबायला होतं. दरी उतरायचा धीर होत नाही. पण एकेक पाय रोवून, मध्येमध्ये बसत उतरायला लागलं की दरी संपायला लागते. मध्येच एखादा सपाट तुकडा लागतो, तिथं श्वास गोळा करत बसता येतं. आकंठ आणि उत्कट दमता येतं. दरीत उतरलं की तिच्या उंचावरच्या टोकाकडं बघायचं आणि आपण उतरत आलेल्या अंतराच्या जाणीवेनं सुखावायचं. आपल्या शरीराचा थांग लागला आपल्याला, यानं दिलासायचं. आता आपण, कोरडेपणात उतरलेल्या पाषाणांच्या उंचीचे झालेले असतो. कधीतरी कुणीतरी या दोन भव्य डोंगरांच्या बेचक्यात भिंत बांधून पाणी अडवलं आणि त्याच्यावर पोसलेल्या शेतीत भिंत बांधणारे रमून गेले. तलावाला त्यांनी एकटं सोडलं. मग तलावावर, दरीवर, घळीवर; झाडा-वेलींनी, पक्षा-प्राण्यांनी, कीटकांनी ताबा मिळवला. डोंगरांच्या, दरीच्या कितीतरी नंतर जन्मलेला तलाव आपल्या पूर्वजांच्या रूपात मिसळून गेला. केवळ त्याचं रूप नाही मिसळलं, वृत्तीही मिसळली, स्वभाव मिसळला. सुदैवानं शेतीत रमलेली माणसं तलावाकडं, घळीकडं फिरकली नाहीत. नाहीतर माणसांना त्यांनी निर्मिलेलं काहीही असं सृष्टीत मिसळलेलं चालत नाही. माणसं पुन्हा निकरानं त्याला मानवी तोंडवळा देत राहतात. सृष्टीच्या तोंडवळ्याला मागे हटवत राहतात. माणसांनी दुर्लक्षलं की सृष्टी पुढं सरकते.

दरीत उतरल्यानं आता आपण कुठल्याही काळात नसल्यासारखे. काळ नाही फक्त प्रहर आहेत. ग्रीष्मातलं उन्ह भल्या सकाळीही तापलेलं आहे. ते दरीच्या विस्तीर्ण भिंतींवरनं ओसंडत येऊन तलावाच्या कोरडेपणावरनं पसरत राहीलंय. आता या उन्हाच्या पालाणाला पाठ करायची आणि घळीतनं वहात आलेल्या हिरव्या पटट्यात शिरून चालायला लागायचं. कोरडेपणाच्या सीमेवर पहिला पाषाण ओलांडला आणि हिरव्या पट्‌ट्यात पाऊल टाकलं. उन्हाची तप्तता मंदावली. भुऱ्या-करड्या रंगाचे पाषाण अचानक संपून काळे पाषाण सुरू झाले. उन्हात अंधार उतरायला लागला. कोरडेपणाच्या सीमेआत करंजांचं अथांग बन पसरलेलं. बनाच्या खोल गाभ्यात दाट-सघन अंधार. आणि साऱ्या गारव्यात, करंजांच्या गडद हिरवेपणात, पाषाणांच्या काळ्याशार अंगांवर मंद पाऊस पडत असल्यासारखा आवाज उमटत राहिलेला. एका थेंबाचा वेध घ्यावा तर दुसरा, तिसरा, शंभरावा.. थेंबांची नुस्ती अनवरत टपटप. चित्त उल्हास आणि संभ्रमानं भरून गेलंय. घळीतल्या, करंजांच्या बनानं केलेल्या श्यामल ब्रह्मांडात काळे पाषाण अनंतापर्यंत पसरलेले आहेत. बनाचं अवकाश छेदत गेलेल्या मनगटाएवढ्या वेलींचे आंदोळ; त्यांच्यावर पाय रोवून उडालेल्या पाखरांच्या हालचालीनं सूक्ष्म आंदोळतायत. आणि ही कृष्णमधुर टपटप. घळीच्या गाभ्यातल्या अंधारानं तिला सर्जनाचा गंध चढलाय. हा गंधही सतेज काळा. टपटपीची मधुरा काळी. काळीच ती. कानाला बरं वाटावं म्हणून तरी सावळी कशाला म्हणायचं? अंधाराचं काळेपणच पण ते गर्भातल्या पाण्यासारखं सत्त्वानं भारलेलं. कितीतरी वेळ निघून गेलाय आणि आपण टपटपीनं विभोर होऊन, पाषाणांच्या आवारात नुस्ते उभे. टपटप टपटप. ही टपटप बनाच्या सर्वात सुदूर टोकाकडं अनावरपणे खेचत राहते. आत शिरत जावं तसं करंजं जास्तच दाट व्हायला लागतात. टपटप जास्तच गहिरी. भरभरून. आत्तापर्यंत जे थेंब फक्त ऐकू येत होतं ते आता अंगावर पडलेलं जाणवतंय. खांद्यावर, बाहूंवर, माथ्यावर. पण त्यांचा स्पर्श पाण्यासारखा नाही. पाणी स्पर्शलं अंगाला की आधी त्याचा गारवा जाणवतो. पण या थेंबांचा पोत जाणवतोय आधी. मृदू-कोवळा-तलम. पण या अतीव मृदूतेतही एक घट्टपणाय. अत्यंत खोलात जाऊन ऐकलं तर जाणवतंय की दोन थेंबांमधले विराम, पावसाच्या थेंबांमधल्या विरामांपेक्षा खूप वेगळेयत. आत्तापर्यंतच्या तंद्रीत हे सुचलेलं नसतं की जमीन बघावी पावसानं ओलावलीये का? वर नजर करून पहावं, झाडांमधनं थेंब झरतायत का? किंवा ओंजळ पुढं करून थेंब झेलावेत सरळ. ओंजळ पुढं केली तरी काही सेकंदं ती रिकामी. टपटप सुरू मात्र. अंगाला स्पर्श सुरू. ओंजळ मात्र रिकामी. मग काही क्षणांनी ओंजळीत पहिला थेंब पडतो, मग दुसरा. ओंजळ जवळ आणून नीट बघितल्यावर कळतं की ह्या करंजाच्या अर्धोन्मिलीत कळ्यायत. टपोऱ्या आणि गुलबट. सगळे करंजं फुलोऱ्यानं लदबदून गेलेत आणि त्यांच्या फुलोऱ्यांचा पाऊस पडतोय. आजवर इतके करंजं बघितले. एकेकटे, गटानं वाढलेले, फुलांनी ओसंडलेले, जाडसर शेंगांनी लगडलेले. पण हा पाऊस विलक्षणाय. दुसऱ्याच सृष्टीत असल्यासारखा. करंजांच्या शेकडो अर्धोन्मिलीत कळ्या, नुस्त्या गळून जमिनीकडं झेपावत नाहीयेत. त्यांच्या गळण्याला एक लयदार गती आहे आणि त्या पाषाणांवर टेकताना एक नाद उत्पन्न करतातयत. कदाचित कळ्या देठापास्नं विलग होतानाही एक ध्वनी उमटत असेल. शेकडो कळ्यांच्या गळण्यातनं करंजाचा पाऊस पडतोय. पावसाचं रहस्य कळतं तसा तो जास्तच लुभावणा होतो. जमीन या पावसाच्या शिडकाव्यानं रेखलेली आणि सगळीकडं करंजाच्या पानांचा आणि फुलोऱ्याचा दाट गंध भरून राहिलेला.

आता काही वेळ नुस्तं हा पाऊस झेलत पाषाणात बसून राहायचं. कस्तुराचा आवाज, भारद्वाजाचं घुमणं, झाडांच्या पसाऱ्यातनं चाललेली शिंजिरांची फडफड, वटवट्यांची चुकचुक आणि करंजाचा पाऊस. मऊसूत, घट्ट, पांढरा-गुलबट आणि गंधित. 

ही घळ कुठाय? आपण कुठचे? कुणाचे? आपल्या ग्रहाचं नाव काय? काही आठवत नाई. स्मृती अप्रस्तुत झालीये. इंद्रियं घळीच्या प्रत्येक कोपऱ्यात-कणात संचरतायत. आता करंजाचा प्रत्येक थेंब स्पर्शतोय, अंधाराच्या प्रत्येक पुष्ट कणातली चव कंठात उतरतीये. 

अचानक जाणवतं की थोड्या लांबवरून, करंजांच्या आडव्या फांदीवरनं; लाल डोळ्यांच्या दोन जोड्या आपल्यावर रोखेलल्या आहेत. एकटक. डोळ्यांच्या मागे दोन बोटभर शिंगं. अंग गुबगुबीत, फांदीवर बसल्यानं पाय अंगात हरवून गेलेत, डोळे मात्र रोखलेले. डोळ्यात जिज्ञासा, उत्सुकता, ओळख नसल्यानं आलेला अपरिचितपणा, किंचित असुरक्षितता. दरीत उतरल्या उतरल्या जांभळीच्या झुडपात जोरकस फडफड जाणवली ती यांची होती. मग आपण करंजाच्या पावसात हरवून गेलो. खरंतर आपण यांच्यासाठीच आलो इथं. मध्येच हा कळ्यांचा पाऊस आला आणि हरवलो. आणि हे समोर बैठक जमवून निश्चल. एक नव्हे दोन. कदाचित जोडी. विणीसाठी त्यांनी हकाळाच्या प्रवाहातनं सुटलेली घळ निवडली असणार. घळीत फिरताना शिटून पांढरे झालेले पाषाण दिसले, होल्याची ताजी पारध दिसली. फणशीच्या झाडाखाली जुन्या पारधीच्या चिक्कार खुणा दिसल्या. मग असे इंद्रियांनी तरल होऊन बसून राहिल्यावर श्रृंगी घुबडांचा हा जोडा दिसला. हा कितीतरी काळ आपल्याला रोखून बघत राहीलाय. आपल्या समोरची जागा निवडून. डोळ्यांना डोळे भिडतील असा. म्हणजे आपण घळीच्या वरच्या टोकावर उभे होतो तेव्हाच कुठंतरी रंगगोपन करून बसलेल्या यांनी आपल्याला पाहिलं, मग आपला पाठलाग केला. यांना पंखांचा आवाज न करता उडता येतं. भवतालात मिसळून जाता येतं. आणि आपल्या नकळत आपल्याकडं असं आरपार पहात बसता येतं.

त्यांचे आपल्यावर रोखलेले डोळे हळूहळू निवतायत का? त्यांच्यातलं अपरिचितपण, असुरक्षितता संपतीये का? आपल्या नजरेतनं त्यांना समजत असेल का की आपल्याला त्यांना सांगायचंय, माझ्या वावरानं इथला पाचोळा हलेल, अंगाला घासून काही काटक्या मोडतील, फांद्यां जागा बदलतील. पायांना चिकटून काही करंजांच्या कळ्यांचे, मातीचे अवशेष येतील. इथला प्राणवायू माझ्या छातीत भरेल. इथल्या अंधाराच्या सत्त्वानं माझं आरोग्य सुधारेल. इथल्या वाहत्या हवेनं माझ्या इंद्रियांची अभेद्यता विरघळेल. इथला करंजांचा पाऊस अनुभवून मला कळेल की जीवन नेहमी आपल्या काही पावलं पुढं असतं. मी इथून काही सोबत नेणार नाही. इथलं काहीही माझ्या भुकेचा विषय असणार नाही. इथलं काही मी विध्वंसणार नाही. पण मी पुन्हपुन्हा दरी उतरून घळीत येईन. करंजाच्या बनात शिरेन. तेव्हा तेव्हा तुम्ही इथं असा. असाच माझा पाठलाग करा. माझ्या आरपार बघत बसा. तुमच्या पारधीसाठी पारव्या-होल्यांची वीण होवो. होल्यांच्या दाण्यांसाठी गवतं पिकोत-कीटक प्रसवोत. कीटकांच्या प्रसवासाठी पाचोळ्याचे कोपरे घडोत. हंगामी डबकी साठोत. दगडांच्या सांदऱ्या घडोत. पाचोळ्यासाठी झाडं वाढोत. पाषाणांची हळूहळू माती होत राहो. पाऊस पडो. प्रकांड उन्ह पडो. थंडीनं आसमंत वेढत राहो. वारे सुटून झाडांच्या,गवताच्या बिया पसरोत. अपार आकाशात पक्षांची उड्डाणं घडोत. झाडांच्या-झुडपांच्या गचपणात चतुष्पादांचा-सरिसृपांचा संचार घडत राहो. तुमची सृष्टी अक्षय राहो. त्यात मला अलगद शिरून राहण्याएवढी चिमुटभर जागा असो.

पाऊस तसाच पडतोय. घुबडं बसूनायत. पण आपल्यासाठी काही हे कायम टिकणारं नाही. आता उठायचं. शरीर हलंल की घुबडं उडून जातात. ती घळीच्या सगळ्यात अरुंद टोकाकडं निघून गेलीत. तिथून फक्त त्यांचा खोल घुमणारा आवाज येतोय. त्यानं घळ भरून गेलीये. त्या आवाजाच्या गूढतेनं आणि आर्ततेनं शरीर भारून गेलंय. 

घळीबाहेर जाताना टाकलेल्या प्रत्येक पावलाबरोबर ती गूढता लांब पडत जाते. घुबडं घळीच्या उबदार गाभ्यात निभ्रांत असतात. घळीत करंजाचा नादमग्न पाऊस पडत असतो. आणि आपल्याला अख्खी दरी चढून, घाटाच्या वळणावरनं दिसणारं शहर बघत घरी परतायचं असतं. 

हिमांशू भूषण स्मार्त मराठी नाटककार असून कविता, ललित गद्य आणि संशोधनात्मक लेखन करतात. ते ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ येथे अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत.

3 comments on “एक रात्र-एक सकाळ: हिमांशू भूषण स्मार्त

  1. डॉ. सारीपुत्र तुपेरे

    सर.. आपलं लेखन नव्या तरल जाणिवा समृद्ध करत जाते.

    Reply
  2. sanjay meshram

    khup chhan lalit lekhan.

    Reply
  3. Shubham Rokade

    खूप छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *