व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघच्या बाबतीत मौन हाच संवाद होता. त्याने आपल्या भावाला थिओला लिहिलेली पत्रं हा व्हिन्सेन्टचा संवाद आहे स्वतःशी केलेला. थिओ हा व्हिन्सेन्टचा लहान भाऊ. थिओ आर्ट डीलरही होता. व्हिन्सेन्टच्या जीवनातलं आणि करिअरमधलं थिओचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. थिओने व्हिन्सेन्टला आयुष्यभर आर्थिक आणि भावनिक पाठिंबा दिला. त्या दोघांमधलं आत्यंतिक जवळिकीचं नातं त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून दिसून येतं. व्हिन्सेन्टची जवळपास नऊशे पत्रं त्याच्या चरित्रकारांना आजवर गवसली आहेत. त्यांतली साडेसहाशे पत्रं त्याने थिओला लिहिली. दिनांक २९ सप्टेंबर १८७२पासून ते दिनांक २९ जुलै १८९०पर्यंत, म्हणजेच व्हिन्सेन्टचा मृत्यू झाला त्या तारखेपर्यंत लिहिलेली ही पत्रं.
मौन व्हिन्सेन्टवर अनेकदा लादलं गेलं — कधी कुटुंबाच्या नाराजीमुळे, कधी शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून भोगाव्या लागलेल्या तुरुंगवासामुळे, कधी मित्रांच्या असहकारामुळे, तर कधी मानसिक आजारातून आलेल्या एकटेपणामुळे. निसर्गाच्या सहवासात किंवा प्रवासात असताना, पुस्तकं वाचतानाही त्याचा मौन आत्मसंवाद सुरूच असे. कॅनव्हासवरील रंगांच्या आणि पत्रांतील शब्दांच्या माध्यमात मौनाचं केवळ रूपांतरण झालं.
व्हिन्सेन्ट हा एक अस्वस्थ आत्मा होता, आयुष्यभर भटकत राहिला. त्याने असंख्य प्रवास केले. अॅमस्टरडॅम, पॅरिस ते आर्ल्स आणि सेन्ट रेमी डी प्रोव्हेन्स — जिथे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला — अशा सर्व ठिकाणांहून त्याने आपली ही पत्रं लिहिली. त्याच्या पत्रांच्या विषयांमधे कमालीचं वैविध्य आहे. त्याच्या मनात आलेला लहानमोठा विचार, त्याची अस्वस्थता, असुरक्षितता, भीती, भविष्याबद्दलची चिंता, कुटुंबीयांविषयीची काळजी, आपल्या आजवरच्या आयुष्यात झालेल्या चुकांविषयीचा खेद, लहानसहान गोष्टींनी झालेला आनंद, वाचलेली पुस्तकं, मित्र, कटकट करणारे व त्याला सुखाने जगू न देणारे शेजारी, त्याची प्रेयसी, धार्मिकता, आणि मुख्य म्हणजे, चित्रकलेसंदर्भातले त्याचे प्रगल्भ विचार, नवं काही शिकायची तळमळ, इतर चित्रकारांबद्दलची मतं, त्यांच्या चित्रांबद्दलचं कौतुक किंवा टीका, आपण करत असलेली स्केचेस, रंग, डोक्यात येणारे चित्रविषय … विलक्षण तरल बुद्धिमत्ता आणि तीव्र संवेदनशीलता लाभलेला व्हिन्सेन्ट हे सगळं आपल्या भावाला नियमित कळवत राहिला, त्याच्याशी संवादत राहिला. त्याचं प्रत्येक पत्र वाचताना त्याचं एकेक चित्र आपल्या डोळ्यांसमोर तरळत राहतं.
व्हिन्सेन्ट एकटा होता, एकाकी होता, पण शांत नव्हता. शांतता त्याला कायम हवीशी वाटत होती, पण त्याच्या अवतीभवती आणि आतमधेही सतत कोलाहल होता — विचारांचा, लोकांचा. दोन्ही त्याला शांतपणे जगू देत नव्हते. त्याला हवी असलेली शांतता लाभू देत नव्हते. या शांततेच्या शोधात, तसेच हातून भरपूर काम होईल या अपेक्षेत आर्ल्सला गेलेल्या व्हिन्सेन्टला तिथेही शांतता लाभली नाहीच; उलट असंख्य शारीरिक, मानसिक गदारोळांना त्याला सामोरं जावं लागलं. मित्र गोगॅंशी झालेले वाद, अस्थिर मानसिक अवस्थेत स्वतःच्या कानाची पाळी कापून घेण्याचं घडलेलं कृत्य, त्याच्या अशा वागण्यामुळे धास्तावलेले आजूबाजूचे लोक, या सगळ्यांत गोंधळून गेलेला, हादरून गेलेला व्हिन्सेन्ट, आणि त्याच्यावर लादलं गेलेलं मौन.
एका अर्थी, व्हिन्सेन्टने मौन कधीच स्वीकारलं नाही, कारण त्याचा संवाद सतत सुरू राहिला — कधी शब्दांतून, कधी रंगांतून, कधी स्वतःतशी, कधी भावाशी. मूर्ख लोकांच्या समाजात हा मनस्वी कलाकार वेडा ठरला. एकांतवासाच्या कोठडीत व्हिन्सेन्टवर मौन लादलं गेलं. स्वतःवर होत असलेल्या अन्यायाचा मुक्तपणे निषेध करायची बंदी झाली होती. रंग व कॅनव्हास जप्त झाल्याने पेंटिंगद्वारे मनातल्या त्रासदायक विचारांचा निचरा करणं अशक्य झालं होतं. स्वतःवर लादलेल्या मौनाला नाइलाजाने सामोरं जाताना व्हिन्सेन्टने आपल्या प्रिय भावाला पत्रं लिहून मनातली घालमेल व्यक्त केली. त्याची असाहाय्य अवस्था, मानसिक तणाव, मनातल्या धुमसत्या संतापावर त्याने निकराने राखलेला संयम त्यात दिसतो. भावाची घालमेल लक्षात घेऊन त्याला दिलेला सबुरीचा सल्लाही यात आहे. व्हिन्सेन्टच्या मौनातून उमटलेली ही अक्षरं त्याच्या रंगरेषांइतकीच अर्थांच्या अनेक शक्यता, असंख्य स्पंदनं स्वतःमधे लपवणारी आहेत.
मला व्यक्तिशः व्हिन्सेन्टने आर्ल्सला आल्यावर थिओला लिहिलेली पत्रं सर्वांत विलक्षण वाटतात. या शांत, निसर्गरम्य गावात येऊन भरपूर काम करावं, सुंदरशा यलो हाऊसमधे राहून समविचारी मित्रांसोबत, विशेषत: गोगॅंसोबत चित्रं रंगवावी, भटकावं, चित्रांबद्दल बोलावं, अशी त्याच्या मनातली साधीसुधी पण उत्कट आस होती. परंतु आर्ल्सचंवास्तव्य त्याच्या मनासारखं होऊ शकलं नाही. एक फार दुर्दैवी म्हणावी अशी कलाटणी त्याच्या संपूर्ण आयुष्याला इथे मिळाली, त्यातूनच त्याचा मानसिक तोल ढळला, आणि पुढे रुग्णालयात भरती होऊन तिथेच त्याचा वेदनादायी मृत्यू झाला. या संपूर्ण काळात तो सातत्याने, घडलेल्या घटनांबद्दल, मनातल्या घालमेलीबद्दल, स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत थिओला लिहीत राहिला. एका बाजूला, आपण सर्वस्व हरवून बसत आहोत, आपला प्रवास संपत चालला आहे अशी आंतरिक दुःखमय जाणीव त्याला होती; पण तरीही मनातली उमेद, आशा, भरपूर काम करत राहण्याची इच्छा धगधगत राहिली होती. पुन्हा एकदा उत्तरेला जाऊन, भावाच्या सोबत राहून नव्याने काम करता येईल, डोक्यामधे त्याला स्वतःलाच चकित करणाऱ्या वेगाने उसळत राहिलेल्या अनावर कल्पनांना, चित्रविषयांना कॅनव्हासवर उतरवता येईल, असंही त्याला वाटत होतं. आपल्या मानसिक आजाराला, प्रकृतीमधल्या चढउतारांना तो कंटाळला होता, पण जरा बरं वाटलं की भरपूर कामही करत होता. शेवटच्या काळातली त्याची काही चित्रं आणि त्याची काही पत्रं मनाला एकाच वेळी आत्यंतिक उदास करत राहतात आणि त्यांतून उमटलेल्या त्याच्या विलक्षण प्रतिभेच्या प्रत्ययाने चकितही करतात. इथे दिलेली ही तिन्ही पत्रं व्हिन्सेन्टच्या शेवटच्या काळातली, आर्ल्स गावात आणि नंतर सेन्ट रेमी येथील रुग्णालयात असतानाच्या त्याच्या मनःस्थितीची व विचारप्रक्रियेची जाणीव करून देणारी आहेत.