हातात पेन असतो. समोर आडव्या रेषांनी भरलेला कागद असतो. ‘चला, करुया सूरु’ असा पवित्रा असतो. पहिल्या शक्यतेची चाचपणी होते. पुढं दुसरी..तिसरी..चौथी..हे संपणारं नसतं. आपल्या संचितात सगळ्यात खोलवर मुरलेलं, आर्त असं काय आहे? माणदेशातल्या माळवादांचे अंधारे कोनाडे गाडग्यांच्या उतरंडींनी भरलेले असत. घरातल्या सुवासिनी प्रत्येक संक्रांतीला नव्या सात गाडग्यांची भर उतरंडीवर चढवत. उतरंडीच्या तळाला मोठा डेरा असायचा; तो सगळ्यात जुना. ‘त्यानं’ जे साठवलंय ते वरच्या सगळ्यांपेक्षा जास्त मुरलेलं आहे. तसं आपल्या आत रुजलेलं, आर्त असं कोणतं संचित आहे? बायका गाडग्यांत जिनसा ठेवत. उजव्या हाताच्या तिसऱ्या उतरंडीत वरुन चौथ्या गाडग्यात चवळीच्या बिया ठेवल्यात हे त्यांना पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात स्पष्ट आठवत असतं. जुन्या माळीतील उतरंड थोरल्या आईच्या हयातीत सुरु झालेली. आजा मेला तेव्हा तिनं संक्रातीसाठी ठेवलेला चुडा सगळ्यात खालच्या गाडग्यात ठेवून दिलेला. आपल्याला आपलं सगळ्यात आर्त, मुरलेलं संचित शोधायचं असतं.
शब्द उतरु लागलेले असतात. सुरुवातीत हरवलेपण असतं. आणि नकळत आपण शाळेच्या वाटांपाशी येऊन पोहचलेलो असतो. इतकं काय भरुन टाकलेलं असतं या वाटांनी आपल्या आत! पश्चिम घाटातली भुरळ पाडणारी वर्षा वनं पायाखाली घातलेली असतात. पण जेव्हा आत मुरलेलं शोधायची वेळ येते तेव्हा आपण शाळेच्या वाटांपाशी येऊन पोहचतो. काय होतं या वाटांवर? वगळाटी आणि सपाट जमीनींची माळरानं छेदत जाणार्या वाटा. विस्कटून पडलेली दगडं पावसाळ्यात हिरव्या कुसळांनी झाकून घेणारी माळरानं. रांगोळीतल्या ठिपक्यांसारखी विस्कटलेली बोरीची झाडं आणि कुठं-कुठं मोठ्या बाभळाटी. यांचे अडथळे सोडले तर कितीही लांबवरचा परगाना डोळ्यांच्या कवेत घेता यायचा. अगदी आभाळ जमीनीला टेकत नाही तिथपर्यंतचा. आपण असं दूरवरचं भवताल कवेत घेत बेसावध असतो आणि तेव्हाच वाटांकडेची माळरानं आपल्याला चकीत करुन सोडत.
मुजावर मास्तरचं रान सोडलं की वाटेवरची पहिली वगळाट लागायची. सपाट भागावरच्या खुरट्या कुसळांपेक्षा इथली झ्याडरं वाढलेली असायची. सकाळची कोवळी उन्हं घ्यायला उघड्यावर आलेली धामण अनमानधपक्या खसपसून अनेकदा घाबरवून टाकायची. पहिली वगळाट ओलांडताना छातीतली धडधड वाढून जायची. चढावरती पोहचल्यावर थोड्या वेळापासून वाढलेली धडधड ऐकू यायची. एका लगबगीच्या सकाळी, छातीतील धडधड ऐकण्यासाठी उभं राहिलो असताना उजव्या अंगाच्या दगडांमधून काहीतरी हलल्यासारखं वाटलं. वाटलं भास असेल. निरखून पाहीलं तर ताबड्या-लाल रंगाचा पक्षी टक लावून आपल्याकडं बघतोय. वाटलं जाईल उडून. जरा पुढं पाऊल टाकतोय तर दुसराच त्याचा साथीदार अगदी समोरनंच तरातरा चालत पुढं. पुढं तिसरा दिसतो.. चौथा.. पाचवा..असल्या सगळ्या पक्ष्यांचा एक थवाच असतो आपल्या आजूबाजूला! बारक्या तांबड्या दगडांमधे मिसळून गेलेला. मोरासारखे मोठे पक्षी माणसाच्या नुसत्या सावटानेही उडून जातात आणि हे एवढे-एवढे पक्षी आपल्याला घाबरत नाहीत याचं आश्चर्य वाटलं. माळानं भारावून टाकण्याचा हा पहिला प्रसंग. असे कितीतरी प्रसंग पुढे येणार असतात.
परतीच्या वाटेवर असताना किश्या भेटतो. कारंड्यांच्या घरामागच्या वगळीपासून पिचिंगीपर्यंतच्या माळावरचा खडान् खडा किश्याला माहीत असतो. तांबड्या पक्ष्यांचा प्रसंग ऐकून किश्याला आश्चर्य वाटत नाही. मग पुढं त्याचं एकसारखं बोलणं सुरु होतं. “त्या पोरंचाळवण्या.. ते बघ तिकडं पिचिंगीपशी हायत्या. मुसलमानाच्या रानातली बाजरी काढत्याती तवा लय येत्यात.” गुंड्यागत दिसणार्या पिचिंगीपसल्या पोरंचाळवण्या किश्या दाखवतो. मग पुढं किश्या पोरंचाळवण्यांच्या कितीतरी गोष्टी सांगत राहतो. “संध्याकाळी रस्त्यावर येऊन वरडतात तसल्या पोरंचाळवण्या येगळ्या. त्या टिटवीसारख्या दिसतात. पण रंग टिटवीसारखा नसतुय. जवळ गेल्याव वरंगळीवरनं बिनाब्रेकची सायकल सोडल्यासारख्या एकदम पळतात आणि झाडाच्या नायतर कशाच्यातरी आडमुरी जाऊन थांबतात. अजुन एका दुसर्या प्रकारची पण पोरंचाळणी असती. बारकी. ह्यांच्यासारखी पळत-बिळत बसत नाय ती. चालताना पायातनं एकदम उडती. चितुर उडतु तसाच. पण चितुर उडताना जसा हिलीकॅप्टर उडाल्यासारखा आवाज करतु तसा ह्या करत नायत. उडून थोडं पुढं गेल्यावर पाण्यात दगुड पडल्यासारखा आवाज काढतात. त्यांचं अजून एक हाय; उडून लांब जात नायत. आणि एकदा बसल्याव हुडकून दाखवायचं! अजिबात घावणार नायत.”
पोरंचाळवण्यांच्या गोष्टी संपणार्या नसतात. प्रत्येक चाळवणीनं आपण आधी चकीत होतो आणि मग हुरहुर लागते. थोडं पुढं चालायला जातो तोच दुसरीच नवी गोष्ट समोर येते. या गोष्टीला सुरवातीपासूनच्या तिसर्या गोष्टीचा संदर्भ असतो. आणि अशा कितीतरी नव्या गोष्टींनी परत चाळवणी दाखवलेली असते. माळ अशा चाळवणी दाखवणार्या पोरंचाळवण्यांनी भरलेला असतो.
आपण मोठे होतो. शिक्षणाचं निमित्त घेऊन शहरं गाठतो. माळं दुरावतात. माळांनी लावलेली हुरहूर शहरांकडेच्या माळरानांवर घेऊन जाते. समानधर्मीयांच्या भेटाभेटी होतात. पुढं पक्षीनिरीक्षणाचा नाद लागतो. ज्यांना आपण पोरंचाळवण्या म्हणायचो त्यांची वैज्ञानिक नावं कळतात. गावी गेलं की हे सगळं ऐकायला किश्या असतोच. आपण उत्सुकतेनं सांगतो “दगडांच्या गुंड्यासारख्या दिसणार्या तांबड्या पोरंचाळवण्यांचं नाव ‘धाविक’. सारख्या धावत असतात म्हणून तसं म्हणत असतील. राखाडी रंगाची, टिटवीसारखी दिसती तिचं नाव ‘कारवानाक’. पायातनं उडतो तो ‘रातवा’. सांगत असताना सारखं जाणवत राहतं की किश्याला दुसरंच काहीतरी सांगायचं आहे. थांबलो की लगेच त्याचं सुरु होतं. “पायातनं उडतु तसला रातवा पिचिंगीपसल्या बाभळीखाली बसलेला. वाटलं जवळ गेल्याव उडल. पार जवळ गेलो तरी डोळं मिटून पडलेलं. मेलंय का बघायला हात लावला तर एकदम उडून गेलं. ते अंड्यावर बसलेलं. अंड्यावर बसलेलं असतं तवा ते हात लावूस्तवर उडत नाय.” पोरंचाळवण्यांच्या गोष्टी संपणार्या नसतात. त्यांच्या गोष्टी कळायच्या असतील तर आभाळ आणि जमीन एकमेकांना भेटत नाही तिथपर्यंतच्या प्रदेश कवेत घेऊन स्थिरावलेली नजर हटवायला हवी. मग लगतचं भोवताल दिसेल. एकसारख्या रंगांचं. पुढं एकाच रंगात मिसळून गेलेल्या कितीतरी कडा दिसतील. त्या कडांनी मिळून बनवलेले आकार दिसतील. आणि मग दिसेल भोवतालात मिसळून गेलेलं जीवांचं रंगगोपन.
माळ अनेक रंग घेऊन उभं असतं. तांबड्या, करड्या नायतर काळ्या रंगांची माती, कुठं नुसती मुरमाडाचे खडे तर कुठं मोठाले दगड काळ्या रंगाचे. काळ्या करड्या बाभळी. पावसाळ्यातली हिरवी आणि नंतर वाळून गेलेली पिवळट-करडी कुसळं. आणि या सगळ्या रंगाच्या एकमेकांत मिसळल्यानं तयार झालेला माळाचा रंग. माळावर तगलेल्या अनेकांना याच रंगांनी सहारा दिलाय. यातील प्रत्येक प्रजातीनं निवडलेला माळाचा रंग वेगळा. मिसळून जाण्याची, वावरण्याची तर्हा वेगळी. राखाडी मुरमाडांच्या कडेने टिटवी अंडी घालते, खड्यांमधे बेमालूम मिसळून जाणारी. सिटाना पोटजातीतला सारगोटे मुरमाडी खड्यांच्या पांढरट जमीनींवर मिसळून जातो तर सारडा पोटजातीतला गडद रंगाचा सारगोटा माळांवरच्या काळ्या मातीच्या भागात दिसतो. काळसर रंगाचा ‘हॉटेन्टोटा पॅचूरस’ नावाचा विंचू काळ्या मातीच्या भोवतालात मिसळून जातो. ‘हॉटेन्टोटा टॅमूलस’ नावाचा त्याचा भाईबंद काळ्या मातीशिवायच्या माळरानांना आपलंसं करतो. गडद रंगाची ‘हेमिडॅक्टिलस ग्रासीलीस’ नावाची पालीची प्रजाती काळ्या मातीने व्यापलेल्या माळांवरील दगडांच्या आडोश्याने वावरते. अशी रंगछटांच्या आश्रयानं माळाला व्यापून राहीलेल्या जीवांची यादी वाढत जाणारी आहे. माळाच्या प्रत्येक छटेनं अनंत जीवांना कवेत घेतलेलं असतं. या जीवांसाठी असं माळाच्या भोवतालात मिसळून जाणं फायद्याचं ठरलेलं असतं. लाखो-करोडो वर्षांच्या उत्क्रांतीप्रवासातून मिळालेली देणगी. माळावर पसरलेल्या जीवांचा हा उत्क्रांतीप्रवास अनेक उलथापालथींनी भरलेला आहे. तो समजून घ्यायचा असेल तर आधी ते ज्या भोवतालात सामावून गेले आहेत त्या माळांच्या निर्माणाची गोष्टी समजून घ्यायला हवी.
जंगलांनी व्यापलेला प्रदेश उध्वस्त होताना आपण पाहत असतो. या उध्वस्त जागेवर सर्वांत आधी ताबा घेतात ती गवते. या निरीक्षणामुळं गवत उगवणार्या जागा या मूळ अधिवास मानवी हस्तक्षेपामुळं नष्ट झाल्यानंतर तयार झाल्याची प्रतिमा आपल्या मनात ठसत आली आहे. अगदी अलीकडे, गवताळ माळरानांच्या परिसंस्था उत्क्रांत होण्याच्या काळाविषयी नवनवे उलगडे समोर येत आहेत. डेटींग फोयलोजनीचे तंत्र वापरुन जीवांच्या उत्क्रांत होण्याचा काळ ठरवता येतो. माळरानांच्या बाबतीत हा काळ साधारणतः ६० लाख वर्षांपेक्षा जुना आहे. या उत्क्रांतीला कारण होतं भारतीय उपखंडाचं गोंडवाना भूमीपासून तूटून आशियायी भूमीला टक्कर देणं. सुमारे १८ कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड हा आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका अशा खंडांनी मिळून बनलेल्या गोंडवाना महाखंडाचा भाग होता. ही भूमी होती कोणत्याही ऋतुचक्राशिवाय पसरलेल्या एकसंध वर्षावनाची. १८ कोटी वर्षांपूर्वी मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला या भूमीवर आणि भारतीय उपखंड सुटा होऊन उत्तरेकडे सरकू लागला. सुमारे ८.८ कोटी वर्षांपूर्वी अशाच एका उद्रेकानं मादागास्कर भारतीय उपखंडापासून सुटं झालं. पुढे भारत नावाचे बेट उत्तरेकडे सरकू लागतं. बेटाच्या या प्रवासाच वेग अत्यंत धिमा असतो. मादागास्कर भारतापासून सुटा झाल्यानंतर भारताचा उत्तरेकडील प्रवास वर्षांला १८ ते २० सेंटीमीटर इतका होता. साधारणतः पाच कोटी वर्षांपर्यंत हा प्रवास याच गतीने सुरु होता. याच प्रवासात ऋतुनियमनाचे पहिले संकेत मिळतात. सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी भारताची भूमी आशियायी भूमीला धडकली आणि हिमालय नावाची पर्वतरांग उंचावू लागली. हिमालयाची वाढत जाणारी उंची ऋतुनियमन तीव्र करत होती. उष्णकटिबंधीय प्रदेशातील जागा नियमीत सुकू लागल्या. वर्षा वनांची भूमी हळू-हळू बदलत होती. या भूमीवर तगून रहायचं असेल तर उष्ण वातावरण आणि पाण्याच्या कमी उपलब्धतेवर तगून राहण्याचं अनुकुलन साधणं आवश्यक होतं. वातावरण उष्ण असण्याचा कालावधी वाढत होता. पावसाचे प्रमाण कमी होत होतं. हे सगळं तीव्र झालं साधारणतः एक कोटी वर्षांपूर्वी. हिमालयाची वाढलेली उंची हे याचं कारण. याच वेळी शुष्कीकरणाच्या प्रकियेचा वेग शीर्षस्थानी पोहचला. मोठ्या सदाहरीत वृक्षांना बदलणार्या उष्ण वातावरणात तगून राहणं खडतर ठरत होतं. जीवांमधे उत्क्रांत होण्यासाठी दबाव वाढत होता. याच दबावातून गवतांमधे एक बदल घडत होता. या बदलामुळेच त्यांना या भूमीवर अधिराज्य गाजवणं शक्य झालं. प्रकाश संश्लेषणासाठी लागणारा कार्बन डायॉक्साईड गवते पर्णरंध्रांद्वारे शोषूण घेत. यासाठी ते दिवसभर पर्णरंध्रे खुली ठेवत. सूर्यप्रकाश उपलब्ध असणार्या काळात खुल्या राहणार्या पर्णरंध्रांमधून पाण्याचा अपव्याय होत राही. कमी पाण्यावर तगून राहण्याच्या उत्क्रांतीच्या दबावातून गवतांच्या एका गटानं हा अपव्याय टाळण्यासाठी एक अनुकुलन साधलं. त्यांनी पानांच्या पेशींमधे कार्बन डायॉक्साईड साठवून ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळं त्यांना पर्णरंध्रे नेहमी खुली ठेवण्याची गरज राहीली नाही. या बदलामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊ लागली. गवतांच्या या गटाला C4 असे नाव दिले गेले.
हिरव्या छताचं जंगल हळू-हळू सुकणार्या गवतांच्या उघड्या माळरानांत बदलत होतं. प्राण्यांसाठी लपून राहण्याच्या जागा कमी होत होत्या. एकतर बिळांचा आश्रय घ्यायला हवा किंवा विस्कटून पडलेल्या दगडांचा. बाभळी-हिवरांची किंवा बोरीची झाडं विरळ पसरलेली होती. त्यांचाहा आश्रय होता. पण आश्रयाची जागा सोडून बाहेर आलं की भक्ष्यकांच्या नजरेत येणं सहज शक्य होतं. उत्क्रांतीच्या या दबावातून काही जीवांनी माळाच्या रंगांमधे मिसळून जाण्याचं अनुकूलन साधलं. हालचाल न करता थांबून राहीलं की एकदम अदृश्य. रातवे, कारवानाक, पिंगळे, घुबडांसारखे पक्षी माळाच्या रंगात मिसळून निश्चल बसू लागले. काळसर रंगाचा हॉटेन्टोटा पॅचुरस नावाचा विंचू काळ्या मातीवर विस्कटूण पडलेल्या दगडांच्या आडोशाने वावरु लागला. पतंगांच्या, फुलपाखरांच्या प्रजातींनी वाळलेल्या गवताच्या काड्यांवरती मिसळून जाणारी रंगसंगती उत्क्रांत केली. बोरी-बाभळींच्या खोडावर बसून आवाज करणारे सिकाडा किटक आवाजाचा मागोवा घेत गेलं तरी सापडू नये इतके तंतोतंत मिसळून गेले खोडांच्या रंगांमधे. अधिवासातील जीवांचा उत्क्रांतीप्रवास हा असा एकमेकांना सामावून घेणारा, एकमेकांना उत्क्रांत होण्यासाठी स्पेस देणारा असतो.
माळावरच्या जमीनीत बीळ करुन राहणार्या कोळ्यांच्या एका गटाचं माळावरील अस्तित्व अनेक रहस्यांनी भरलेलं असतं. यांचा रंग माळाशी जुळता असत नाही. पण ते ज्या बिळात राहतात त्याच्या तोंडाला दार असतं अत्यंत बेमालूमपणे आजूबाजूच्या भोवतालात मिसळून गेलेलं. नजरेत येण्यासाठी आधी अनेक अपयशी प्रयत्नांचा भूतकाळ असतो आपल्या पाठीशी. आणि कधीतरी अनमानधपक्या दरवाजा सापडतो. माळानं भारावून सोडण्याच्या क्षणांमधे भर पडते. आयुष्यातील बहुतेक कालखंड हा असा बंद दाराआड राहून काढतात हे कोळी. दाराच्या आजूबाजूला काय घडतंय याचा सुगावा घेत घेत. एखादं भक्ष्य टप्प्यात येईपर्यंत वाट पाहत बसतात. जवळ येणार्या भक्ष्याचा आकार आणि वेग याचा अंदाज दाराच्या मागूनच कळतो यांना. तोंडाशी आलेलं भक्ष्य क्षणार्धात पकडून परत दाराच्या आड अदृश्य. ‘क्षणार्ध’ म्हणजे केवढा कालखंड याची प्रचिती जर घ्यायची असेल तर ट्रॅपडोअर कोळ्यानं पकडलेलं भक्ष्य पहावं. पहिल्या वळीवात नर कात टाकतात. मादीपेक्षा लांब पायांचं अनुकुलन वेगानं अंतरं कापायला मदत करणारं असतं. मिलनोत्सुक नर घर सोडतात आणि निघतात मादीच्या घराच्या शोधात. हा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला असतो. उघड्या माळांवरील भक्षक प्रतिक्षेत असतात. या आव्हांनांमधून नर मादीच्या दारापाशी पोहचतो आणि दरवाजा ठोठावतो. हे दरवाजा ठोठावणं प्रत्येक प्रजातीचं वेगळेपण सांगणारं आहे. प्रत्येक प्रजातीची लय, नाद निरनिराळा. मादी दार किलकिलं करते. या दाराच्या चौकटीवरच मिलनसोहळा पार पडतो. मिलनानंतर मादी नराला खाण्यासाठी पकडू पाहते. यातून वाचलाच तर नर शोधत राहतो दुसर्या मादीचं घर. नरांचं आयुष्यं असतं असं अल्पायुषी. पण माद्या दीर्घायुषी असतात. लिंडा मासून नावाची संशोधिका आस्ट्रेलियातील एका मादीच्या घराचं निरीक्षण करत होती. ती मादी जगली तब्बल ४३ वर्षे. या वर्षीही ती मेली एका गांधील माशीने संसर्ग केल्यामूळं. माद्या आपलं आयुष्य असं एकाच ठिकाणावरती पूर्ण करतात. मादीच्या घरातून बाहेर पडलेली पिल्लंही आजूबाजूला स्वतःचं बीळ खोदतात. या जीवांच्या अशा अनेक पिढ्या त्याच त्या जमीनीच्या तुकड्यांवर वाढत आल्या आहेत. त्यांचं या भूमीवरील अस्तित्व फार पुरातन आहे. अगदी भारतीय उपखंड गोंडवाना भूमीचा भाग होता तेव्हापासून. तेव्हापासून ट्रॅपडोअर कोळ्यांचे पूर्वज या भूमीवर जम बसवून आहेत. यांच्या भाईबंदांचं आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या गोंडवाना भूमीचा भाग असणार्या खंडांवर सापडणं याचाच पुरावा आहे.
‘लॅसरटिडे’ कुळातले सरपटणारे जीव असेच माळरानांच्या परिसंस्थेत सामावून गेलेले. सापसुरळ्यांसाख्या गोलाकार आकाराचे परंतु सरड्यांसारख्या खरबरीत खवल्यांचे. रंग माळाच्या रंगात मिसळून जाणारे. वेग हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य. सरावलेल्या नजरेशिवाय त्यांचा दोन दगडांमधील प्रवास दिसणं मुश्कील. भारतातील माळांच्या निर्मीतीच्या कालखंडाचा उलगडा करणारे संशोधन याच ‘लॅसरटिडे’ कुळातील जीवांवर करण्यात आले. भारतातील त्यांच्या आढळक्षेत्रातून गोळा केलेल्या नमुन्यांच्या जनुकीय संचाचा अभ्यास या संशोधनामधे केला. भारतातल्या माळरानांनी लॅसरटिडे कुळातल्या तीसेक प्रजातींना सामावून घेतल्याची धक्कादायक माहीती या संशोधनामधे समोर आली. जीवांना उत्कांत होण्यासाठी लाखो वर्षांचा कालखंड कारणीभूत असतो. माळराने जर पुरातन नसती तर या अधिवासात सापडणार्या लॅसरटिडे जीवांमधे एवढी विविधता आढळली नसती. या विविधतेला कारणीभूत आहे माळरान आणि लॅसरटिडे जीव यांच्यात सुरु असलेलं लाखो वर्षांपासूनचं अनुकूलन. भारतातील माळराने पुरातन असण्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांच्या आढळक्षेत्रातील जीवांचा एकत्रितरित्या केलेला हा पहिला अभ्यास. अगदी २०१७ मधे तो प्रसिद्ध झाला. डेटींग फोयलोजनीच्या निकालानुसार ‘लॅसरटिडे’ जीवांच्या उत्क्रांतीचा कालखंड हा C4 गवतांच्या उत्क्रांतीच्या काळाशी मिळताजुळता होता.
शाळेच्या वाटांभोवती पसरलेली माळं ही लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या अनेक घटनांची साक्ष घेऊन उभी होती. माळावर वर्षभर हिरवी राहणारी झाडं नसतात, फेसाळते धबधबे नसतात, वर्षभर थंडावा देणारा भोवताल नसतो पण वर्षा वनांसारखंच पुरातन व्यक्तित्व असतं माळाला; आणि चकीत करुन सोडणारा भोवताल असतो. भौगोलिक स्थानामुळं कोल्हापूरजवळच्या दाजीपूरच्या घाटमाथ्यावर नैऋत्य मान्सूनचा पाऊस मनसोक्त कोसळतो. दाजीपूर हिरव्यागर्द छतांच्या राईंनी व्यापून जातं. पाऊस कमी पडतो म्हणून पाण्याशिवाय तगून राहणारी काटेरी झुडपं आणि गवतं सोलापूरच्या माळरानांवर पसरतात. दाजीपूरमधील झाडांची रोपं सोलापूरच्या माळावर लावण्यानं तिथं ना दाजीपूरसारखं वर्षा वन उभं राहणार असतं ना पाऊस वाढणार असतो. अधिवासातील जीवांची उत्क्रांती; त्या-त्या अधिवासातील भौगोलिक रचना, वातावरण, इतर जीवांसोबतचं सहजीवन अशा अनेक सूक्ष्म संबंधांनी जोडलेलं असतं. असं एखाद्या अधिवासातल्या जीवाला दुसर्या अधिवासात नेऊन सोडणं त्या जीवासाठी आणि अधिवासासाठी हितकारक असत नाही. माळावरच्या जीवांची उत्क्रांती तिथं आधीपासून असलेल्या प्रत्येक घटकाशी जुळवून घेण्यातून झालेली असते. हिवर, बोरी- बाभळींची काटेरी झाडे इथल्या जीवांना सामावून घेणारी असतात. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि अवलंबियत्वातून एक परिसंस्था उभी राहिलेली असते.
कोल्हापूरजवळचं कात्यायनीचं माळरान उन्हाळ्यातल्या झळांनी तापून गेलेलं असतं. डार्विनचे सारगोटे मिलनासाठी बाहेर पडतात. प्रत्येक नर आपआपला इलाका निश्चित करतो आणि मादीला आळवण्यासाठी आपल्या गळ्यावरील रंगीत पंखा उंचवत राहतो. मादीला निवड करायची असते. अशा वेळी नर भक्षकांच्या नजरेत येत असतात. धोक्याचा सुगावा लागताच सुरक्षित जागेत पोहचण्यासाठी नरांच्या इलाक्यात दगडांचा आडोसा आवश्यक असतो. दगडं सापांना, सरड्यांना, सापसुरळ्यांना, विंचवांना, इंगळ्यांना आणि कितीतरी किटकांना लपून जाण्यासाठी जागा देत असतात; अंडी घालण्यासाठी सुरक्षितता देत असतात. दगडांचं हे लेकुरवाळेपण बहरण्याला कोटी वर्षांचा भूतकाळ आहे. अगदी हिरव्या छतांच्या राईंची जमीन गवतांनी भरुन गेलीली तेव्हापासून. मग पुढं कधीतरी आपण ‘होमो सेपिअन्स’ आफ्रिकेतून बाहेर पडतो. भारतभूमीवर पोहचतो. जमीनींवरती मालकी हक्क सांगू लागतो. आपली लोकसंख्या भरमसाठ वाढवत राहतो. पुढं कधीतरी जमीनींचं वाटप होतं. सातबार्यावर जमीनींची मोजमापं नोंदली जातात. हक्क सांगणार्याचं नाव येतं वरती. मग प्रत्यक्षात मोजणी होते जमीनीची. विस्कटून पडलेली दगडं गोळा करुन बांध घातले जातात. भरधाव वेगानं दगडांचा आडोसा शोधणारी ‘लॅसरटिडे’ उघड्यावर येतात.
शहरांच्या हद्दी कात्यायनीच्या माळांपर्यंत पोहचतात. नव्याने दिसू लागलेले सिमेंट क्रॉक्रीटचे खांब प्लॉटींगच्या सीमा दर्शवू लागतात. वृत्तपत्रांचे रकाने हद्दवाढीच्या जी आर पास होण्याच्या बातम्यांनी भरुन जातील कधीतरी. मग डांबरी रस्ते पोहचतील टेकड्यांच्या टोकांपर्यंत. जाहिराती लागतील शहरांच्या चौका-चौकात- ‘सुखी जीवनाची सुरुवात करा आता खिशाला परवडेल अशा घरात’ किंवा ‘निसर्गसंपन्न कोल्हापूरात साकारा तुमच्या हक्काचं घर’. खिशाला परवडणार्या रकमेत सामावलेलं असतं तिथं पोहचलेली डांबरी रस्त्याच्या सुविधेचं मूल्य आणि घरापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शहराचं स्थान. माळावरच्या रंगामधे मिसळून गेलेल्या जीवांचं नाव आपण डाऊनलोड केलेल्या उतार्यामधे समाविष्ट केलेलं नसतं. या जीवांच्या संपून जाणार्या घरांचं मूल्य खिशाला परवडणार्या रकमेत नसतं सामावलेलं. विंचू, इंगळ्या, साप, सरडे, लॅसरटिडे, सापसुरळ्या आणि असंख्य किटकांचं आश्रयस्थान संपलेलं असतं; त्याचं मूल्य नसतं सामावलेल्या या किंमतीत. घरांमधून वाहिलेलं सांडपाणी कळंब्याच्या तलावात मिसळणार असतं आणि तलावाच्या पोटातील जलीय परिसंस्था हळूहळू नष्ट होणार असते. या जीवांच्या आयुष्याचं मूल्य नसतं सामावलेलं या रकमेत. लग्नसमारंभ, वाढदिवस, बारसं, आणि सणांचं निमित्त साधून आपण फटाके फोडणार असतो, लाऊडस्पिकरवर गाणी वाजवणार असतो. झाडांच्या आश्रयाने आणि उघड्या माळावर उभ्या-उभ्याने विश्रांती घेणार्या पक्ष्यांना घाबरवून सोडणार असतो. त्याच्या बेचैनीचं मूल्य नसतं सामावलेलं या किंमतीत. असं खूप काही असतं जे या किंमतीत सामावलेलं नसतं.
कधीतरी सातबार्यावरचं नाव बदलतं. प्रवेशद्वाराच्या दिशा निश्चित होतात. भूमीपूजनाचे मुहुर्त निघतात. पायाभरणीसाठी खोदकाम सुरु होतं. बांध घालताना गोळा करायची राहून गेलेली दगडं पाया भरणच्या कामी येतात. ट्रॅपडोअर कोळ्याची मादी camouflaged दारांआडून सुगावा घेत राहते. जेसीबीची यांत्रिक घरघर तिच्या आकलनाच्या पलिकडची असते. विटांच्या उंचावत जाणार्या थरांसोबत मादीचं घर दबत जातं हळूहळू. मग कधीतरी कोकलेटच्या बकेटमधे येतं आणि चिरडून जातं. दगडं उचलण्यामुळं उघड्यावर आलेले जीव भरकटत राहतात आडोसा शोधत. वास्तुशांतीचा मुहुर्त निघतो. भिंतीवर सोडलेल्या लाईटच्या माळा बाजूच्या माळांवर उजेड टाकत राहतात. वळीव येतो. मादीच्या शोधात बाहेर पडलेला ट्रॅपडोअर कोळ्याचा नर लांब पायांनी अंतरं कापत राहतो. भरकटतो. सकाळच्या कोवळ्या उन्हाबरोबर चढत येतो पोर्चमधे, गाडी चढवण्यासाठी केलेल्या स्लोपवरुन. घरातलं कुणीतरी पाहतं त्याच्याकडं. कितीतरी वेळा आता हे वाक्य ऐकायला येणार असतं : “बया, या किड्यांनी नुस्ता वैताग आणलाय.” मग झाडूच्या झटक्याबरोबर उडून जातो नर समोर उघड्या पडलेल्या माळावर. याच वेळी घराचा भोवताल भरुन गेलेला असतो भारताच्या ‘चंद्रयान – ३’ यानानं पृथ्वीवरीन केलेल्या उड्डाणाच्या बातमीच्या आवाजाने.
लेखात उल्लेखलेल्या प्रजातींची इंग्रजी नावे:
- धाविक – Indian Courser
- भारतीय कारवानाक – Indian Stone-Curlew
- रातवा – Indian Nightjar
- हॉटेन्टोटा पॅचूरस – Hottentotta Pachyurus
- हॉटेन्टोटा टॅमूलस – Hottentotta Tamulus
- हेमिडॅक्टिलस ग्रासीलीस – Hemidactylus Gracilis
- ट्रॅपडोअर स्पायडर – Trapdoor Spiders
- डार्विनचे सारगोटे – Darwin’s Fan-Throated Lizards (Sarada darwini)
- ‘लॅसरटिडे’ कुळातले जीव – Ophisops Jerdonii / Ophisops Beddomei ( Family – Lacertidae)
- ‘लॅसरटिडे’ कुळातील जीवांवर झालेले भारतातील संशोधन: A phylogeny of open-habitat lizards (Squamata: Lacertidae: Ophisops) supports the antiquity of Indian grassy biomes, Ishan Agarwal and Uma Ramakrishnan, Journal of Biogeography, Volume 44, Issue 9, September 2017, P. 2021-2032. https://doi.org/10.1111/jbi.12999
- ट्रॅपडोअर कोळ्यांवरती लिंडा मासून यांन केलेले संशोधन:The longest-lived spider: mygalomorphs dig deep, and persevere, Leanda Denise Mason, Grant Wardell-Johnson and Barbara York Main, Pacific Conservation Biology 24(2) 203-206. https://doi.org/10.1071/PC18015.
लेख अप्रतिम आहे. मुळीच माहिती नसलेले पुष्कळ संदर्भ आणि नव्या गोष्टी सुद्धा चकित करून टाकतात. उत्क्रांतीच्या ओघात आणि आवेगात काय काय घडून गेलं आहे ते वाचताना उत्सुकताच ताणली जाते. कोणत्याही आजपर्यंत वाचलेल्या रहस्य कथेपेक्षा मोठे रहस्य त्यात दडले आहे याचा पुरेपूर प्रत्यय येतो. शैली ही खुमासदार आहे. असा सुंदर लेख दिल्याबद्दल आभार आणि लिहिल्याबद्दल अभिनंदन.
Satpal kup Abhyaspurna Marathi Ani Shodhnibandh , keep it up the great work for research and conservation all the best team TWF…
Reading about such ancestry is humbling and at the same time embarrassing our own short lived existence. Beautifully written piece.
खूपच सुंदर लेख!!
माझ्या भोवतालचा माळ अशाच साऱ्या जीवसृष्टीनी भरलेला आहे. अजून नवीन माहिती मिळाली. संशोधन आणि निरीक्षण अचूक माहितीने परिपूर्ण!!