मूळ कथा: विमल चंद्र पांडेय
भाषांतर: चिन्मय पाटणकर

उत्तर प्रदेशची खिडकी

back

(प्रिय मित्र सीमा आझादसाठी)

प्रश्न – माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. माझ्या वडिलांची नोकरी गेली आहे. घर चालवण्यासाठी मी काहीतरी काम करावं असं त्यांना वाटतं. मात्र, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. शिकतानाच त्यांना मदत करावी असं मला वाटतं. तसंच अभ्याबरोबरच थोडीबहुत कमाई होण्याइतपत काम करावं असंही वाटतं. मी काय करू? – मनोज कनौजिया 

उत्तर – वडिलांना मदत करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. मात्र, योग्य ज्ञान आणि पदवी असल्याशिवाय चांगलं काम मिळणं कठीण आहे, हेही तितकंच खरं. तुम्हाला पैसे मिळवता येतील आणि सोबत अभ्यासही होईल असं काम मिळणं जरा कठीण आहे. काम कसंही असलं, तरी तुम्ही पैशांसाठी ते करताय म्हटल्यावर तुम्हाला सर्वप्रकारे पिळून घेतलं जातं. नंतर इतर काही करण्यासाठी ताकदच उरत नाही. 

प्रश्न – माझं माझ्या आई-वडिलांबरोबर पटत नाही. आर्मीत जाण्यासाठी मी रोज सकाळी पळायला जावं असं त्यांना वाटतं. पण मला संगीत शिकायचंय. त्यांनी माझी गिटार तोडून टाकली आहे. माझे वडील, काका सतत पैसा, धंदा, नोकरी याच विषयांवर बोलत राहतात. माझा श्वास इथं अक्षरशः गुदमरतोय. मी काय करू? – राज मल्होत्रा, मुंबई

उत्तर – आई-वडिलांना समजून घेणं हे जगातलं सर्वात अवघड काम आहे. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. कारण, आजकाल फक्त पळून आर्मीतली किंवा पोहायला शिकून नेव्हीतली नोकरी मिळत नाही.. आपल्याला हवं ते निमूटपणे करत राहणं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, हाच मूर्ख लोकांना सामोरं जाण्याचा उत्तम मार्ग आहे. 

प्रश्न – माझे पती टूर्सच्या निमित्ताने कायम बाहेर असतात. आमचं लग्न होऊन फक्त दोन वर्षं झाली आहेत आणि त्यांच्या जवळ नसण्याचा मला रात्री त्रास होतो. माझ्या शेजारचा तरूण अविवाहित आहे. माझ्या मदतीसाठी तो कायम तत्पर असतो. आजकाल मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले आहे.  भावनेच्या भरात माझ्या हातून काही वावगं घडू नये, असं मला वाटतं. मी काय करू? – क, ख, ग, दिल्ली. 

उत्तर – तुम्ही तुमच्या पतीला समजवा. त्यांना त्यांच्या टूर्स जरा कमी करायला सांगा. एकटं असताना तुम्हीही पूजापाठ, गायत्रीमंत्राचा जप करा. तुम्ही स्वतःला सावरा. नाहीतर, बघताबघता तुमचा सुखी संसार उद्ध्वस्त होऊन जाईल. 

प्रश्न – माझं वय २६ वर्षं आहे. मला दोन मुलं आहेत. आताशा मला सेक्स करावासा वाटत नाही. मात्र, नवरा रोज रात्री लगट करतो. माझे स्तनही लहान आहेत. त्यावरून माझे पती कायमच मला टोमणे मारतात.  मी काय करू? – एक्स वाय झेड, अहमदाबाद.

उत्तर – शारीरिक उणीव हेे देवाचं देणं आहे, हे नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी थोडं जुळवून घ्या. रात्री बेडमध्ये नवऱ्याला थोडं सहकार्य करा. सेक्स करावासा वाटत नसेल, तर काही रोमँटिक फिल्म्स् पहा, कथा-कादंबऱ्या वाचा. या वयात शारीरिक संबंधांबाबत अशी विरक्ती येणं बरं नाही.

प्रश्न.. प्रश्न.. प्रश्न

उत्तर.. उत्तर.. उत्तर

घाबरण्याचं काहीही कारण नाही. या प्रश्नांतून किती जणांच्या समस्या सुटल्या आणि किती जणांच्या नाही सुटल्या, याचा काही मला हिशेब ठेवावा लागत नाही. हां, मी या प्रश्नांची उत्तरं देतो. माझं नाव अनहद आहे. माझी उंची पाच फूट चार इंच आहे. महिलांसाठीच्या या मॅगझिनमध्ये मी दोन वर्षं काम करतोय. माझं अजून लग्न झालेलं नाही. तुम्हाला माझ्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास माझ्याबरोबर पहाटे पाच वाजता उठून पाणी भरावं लागेल आणि माझ्या पिताश्रींचा आरडाओरडा ऐकावा लागेल. ते फक्त माझ्यावरच ओरडतात असं काही नाही. खरंतर, ओरडणं हे त्यांच्या रोजच्या फिरण्यासारखंआहे. त्या बाबतीत आई आणि माझा भाऊ असा ते काहीही फरक करत नाही. ते एका चायनीज मिलमध्ये काम करतात. करतात नाही करायचे. मात्र, आपल्याबाबतीत ‘करायचे’ असं म्हणणं त्यांना ऐकायचं नसतं. ते तिथं सुपरवायझर आहेत. मला सुपरवायझरचा अर्थ माहीत नव्हता तेव्हा वाटायचं, मिल माझ्या पिताश्रींचीच आहे. आम्ही खूप श्रीमंत आहोत. जणू काही त्यांनी कामगारांचा अर्धा पगार कापला असल्याच्या आविर्भावात ते बोलत असतात. आज त्यांनी दोन कामचुकार कामगारांना दोन दिवसांसाठी काढून टाकलं किंवा आज मिलमध्ये उशीरा जावंसं वाटलं, तर ते उशीराच जाणार.  ज्या दिवशी ते उशीरा जाण्याबद्दल बोलायचे आणि रात्री उशीरापर्यंत जागायचे, तेव्हा आई ‘अन्सारी रागावेल तुमच्यावर’  असं म्हणायची. मग ते आईला मिठीत घेऊन तिच्या गालावर त्यांचे गाल घासायचे. आई लाजून त्यांच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करायची. त्याक्षणी आई माझं नाव घेऊन पिताश्रींना हळूच काहीतरी सांगायची. त्या क्षणी तिथून निघून जावं असं मला वाटायचं.  मी तिथून जाऊ लागल्यावर पिताश्रींचा आवाज यायचा, ‘मी राजा आहे तिथला, कोणी अन्सारीबिन्सारी माझं काहीही वाकडं करू शकत नाही.’  माझे पिताश्री जगातले सर्वांत ताकदवान माणूस आहेत असं मला वाटायचं. मला भारी वाटायचं. पिताश्री खरंच कोणालाही घाबरत नव्हते. फक्त जेव्हा बाबा घरी यायचे, तेव्हाच पिताश्री विनम्र होऊन वागायचे. बाबा म्हणजे माझ्या पिताश्रींचे काका. आमच्या अाख्ख्या खानदानात पिताश्रींशिवाय तेच सर्वांत जास्त शिकलेले होते. बाबा पिताश्रींपेक्षा वयानं बरेच मोठे होते आणि जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे होतं. तुमचेही दिवस येतील, असं ते नेहमी सांगायचे. मात्र, त्याचा अर्थ न कळूनही आम्ही दोघं भाऊ खूश व्हायचो.

सर्वांत वेगानं उडणाऱ्या 
चिमणीचं नाव बालपण आहे

एखाद्या दिवशी फॅक्टरीत यायचं म्हणून मी किंवा उद्भ्रांतनं हट्ट केला, तर पिताश्री आम्हाला उचलून घ्यायचे. आमच्या केसांतून हात फिरवायचे आणि मग खाली ठेवून पटकन आपल्या सायकलला टांग मारून निघून जायचे. ज्या दिवशी पिताश्री फॅक्टरीत जायचे नाही, त्या दिवशी वातावरण एकदम छान असायचं, पाऊस पडेल असं वाटायचं. पण पाऊस काही पडायचा नाही. आम्ही चौघंही कधीकधी पुढच्या कॉलनीतल्या बागेत फिरायला जायचो. तिथं बसून पिताश्री आम्हाला सांगायचे की ते शहराच्या बाहेर कुठेतरी जमिनीचा तुकडा घेणार आहेत आणि तिथं आमचं घर असेल. मग रात्री उशीरापर्यंत जमिनीवर घराचा नकाशा काढायचे, आईकडून तो पास करून घ्यायचा प्रयत्न करायचे. आईला घरात चार खोल्या हव्या असायच्या. तीनच खोल्या असल्या तरी पुरे;  पण त्या मोठ्या हव्यात, असं पिताश्री म्हणायचे. त्यानंतर ते तीन आणि चार खोल्यांचा नकाशा काढून आमचं मत विचारायचे. आम्ही दोघंही चार खोल्यांचा नकाशा दाखवायचो. कारण त्यात आमच्यासाठी स्वतंत्र खोली असायची. आई खूश व्हायची. पिताश्री पराभव मान्य करून हसायचे. एखादा सिनेमा जेव्हा टॅक्स फ्री होईल तेव्हा पहायला जाऊ, असं  सांगायचे. आईनं सांगितलं, एकदा ती त्यांच्याबरोबर सिनेमाला गेली होती. त्या सिनेमाचं नाव क्रांती होतं. त्यात जिंदगी की ना टुटे लडी हे गाणं होतं. आईचं हे बोलणं ऐकून त्यांना छान वाटायचं आणि ते ‘आज से अपना वादा रहा हम मिलेंगे हर एक मोड़ पर’ हे गाणं गायचे. उद्भ्रांत मला विचारायचा, कुठला सिनेमा टॅक्स फ्री असतो? मी कॉलर ताठ करून सांगायचो, ‘ज्या सिनेमात छान छान गाणी असतात, त्याला टॅक्स फ्री सिनेमा म्हणतात.’ खूप सारी छान गाणी असलेला सिनेमा रिलिज होण्याची वाट पहायचो. पिताश्री कायम आम्हाला स्वप्न दाखवायचे. त्यात आम्हाला इतकी मजा यायची की आम्ही त्यातून बाहेरच पडायचो नाही. आम्ही स्वप्नातच शाळेत जायचो. आमचे नवे कपडे आणि नवी सायकल पाहून मित्र चकित व्हायचे. माझ्या मित्रांना नव्या सायकलवर थोडा वेळ बसायला हवं असायचं. मात्र, मी फक्त नीलूलाच माझ्या सायकलवर बसू द्यायचो. नीलू खूप सुंदर होती. कुठल्याच भाषेत तिच्या डोळ्यांचं वर्णन करणं शक्य नव्हतं. जगातला कुठलाच कवी तिच्या चालण्यावर कविता लिहू शकत नव्हता. मीही लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, त्या प्रयत्नातून मी काही ना काही लिहायला शिकलो. या चुकीच्या सवयीनं मला योग्य मार्ग दाखवला. बीए झाल्यावर पिताश्रींचं ऐकून मी बीएडला गेलो नाही  आणि दिवसरात्र कागदावर काहीतरी खरडून ते काळे करू लागलो. जणू काही लिखाणाचं भूतच माझ्या मानगुटीवर बसलं होतं. बघताबघता नीलू माझ्यासाठी जगातली सर्वांत सुंदर मुलगी झाली, माझी कॉलनी जगातली सर्वांत सुंदर कॉलनी आणि मी जगातला सर्वांत भित्रा प्रियकर ठरलो. त्या सुंदर दिवसांत मी सगळ्या प्रकारच्या कविता वाचल्या. एकीकडे समशेर पंत होते  आणि दुसरीकडे मुक्तीबोध आणि धुमिल. त्या प्रत्येक प्रकारच्या कवितेतनं मला खूप काही दिलं. कविता करत माझ्याही कित्येक डायऱ्या भरल्या. माझं लिखाण कुठे ना कुठे छापून येत होतं. लिहिण्यामुळे मला कुठेही नोकरी मिळू शकते या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी अजून थोडाच वेळ होता. पत्रकारिता करण्यासाठी काहीतरी शिकण्याची गरज वाटू लागली. पत्रकारिता अनेक ठिकाणी शिकवली जाऊ लागली होती. या संस्थांची संख्या जितकी वाढत होती, तितकाच पत्रकारितेचा दर्जाही खालावत होता. पत्रकारिता शिकवणाऱ्या संस्था काय आणि का शिकवायच्या, देवच जाणे! पिताश्रींच्या मिलजवळच्या (आता आम्हाला त्यांना पिताश्रींची मिल म्हणायची सवय झाली आहे) कित्येक मिल बंद पडल्या होत्या. त्यांचीही मिल बंद पडण्याच्या मार्गावर होती. कित्येक महिन्यांपासून कामगारांचे पगार थकले होते. पिताश्रींनी मला घरी लागणारा किराणा आणि भाजीपाल्याच्या खर्चाची जबाबदारी घ्यायला सांगितलं. काहीतरी करून ते उदभ्रांतच्या शिक्षणाची तजवीज करणार होते. त्यानंतर काही दिवसांनंतरची ही गोष्ट आहे. मी आणि उदभ्रांत एखाद्या काडीनं किंवा दगडानं चार खोल्या असलेल्या घराचा एक नकाशा काढायचो. आम्ही खूप हट्ट केल्यावर पिताश्रींनी त्या घराचा नकाशा आम्हाला एका कागदावर काढून दिला होता. जमिनीवर काढलेल्या नकाशातल्या आपापल्या खोलींत आम्ही जाऊन खेळायचो.  उदभ्रांत कायमच आपल्या खोलीतून पाहुण्यांच्या खोलीत जायचा. मी मात्र त्याला पिताश्रींच्या खोलीत शोधत असायचो. एकदा असं झालं की खेळता-खेळता उदभ्रांतला हाका मारत मी पाहुण्यांच्या खोलीत गेलो. तिथं पिताश्री त्यांच्या मित्राबरोबर बोलत बसले होते. मी आरडाओरड करतोय समजून ते मला ओरडले. घरात एवढा मोठा व्हरांडा आणि तुम्हा दोघांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत, तर तुम्ही तिथंच खेळलं पाहिजे. घरी आलेल्या पाहुण्यांना असा त्रास नाही द्यायचा, असं त्यांनी माझ्याकडे रागानं पहात सांगितलं. इतक्यात बाबांनी आमच्या गेटची कडी वाजवली. आपण पिताश्रींना सांगून गेटवर एक बेल बसवायला हवी, ती बेल वाजवल्यावर घरात ओम जय जगदीश हरे वाजेल, असं मी उद्भ्रांतला सांगितलं. बाबा कायमच आमच्या खोलीत बसून जगभरच्या गोष्टी सांगायचे. बाबा आम्हाला बाहेरच्या जगाकडे पाहण्याची दृष्टी द्यायचे. त्यांच्या सांगण्यानुसार आमच्या दोघांची नावं ठेवली होती, याचा आम्हाला खूप अभिमान वाटायचा. नाहीतर, माझं नाव रामप्रवेश सरोज ठेवलं गेलं असतं आणि माझ्या लहान भावाचं रामआधार सरोज! तसंही त्यांचं बोलणं कळत नाही, म्हणून बाकी लोक त्यांच्याशी कमीच बोलायचे. आम्हालाही त्यांचं बोलणं कळायचं नाही. मात्र, आम्हाला ते आवडायचं. आम्ही लहान असताना बराच काळ त्यांच्या सहवासात गेला. आम्ही गाडीच्या मागच्या सीट ऐवजी पुढच्या सीटवर बसण्याची वेळ लवकरच येईल. प्रत्येक अन्यायाचा बदला घेतला जाईल आणि आपले हक्क आपल्याला मिळतील, असं ते सांगायचे. त्यांचं बोलणं ऐकून आम्हाला खूप भारी वाटायचं. मला तितकं काही कळायचं नाही. मात्र, हळूहळू उदभ्रांत बाबांच्या इतका जवळ गेला की काही विषयांवर तो त्यांच्याशी थेट वाद घालायचा. मागच्या निवडणुकीनंतर बाबा वेड्यासारखं नाचत साऱ्या कॉलनीत साखर वाटत असताना उदभ्रांतनं त्यांना सांगितलं की त्यांना जरा जास्तच अपेक्षा आहेत. त्याच विषयावरून त्यांचं भांडणही झालं होतं. राज्यघटना अस्तित्त्वात आल्यानंतर आपल्यासारख्या गुलामांना पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याला अशी नजर लावून ये, असं सांगत बाबांनी त्याच्याबरोबर वाद घातला होता. उदभ्रांतबरोबरच्या वादात बाबा जिंकायचे नाही, तेव्हा त्याला थोडं वाट पाहण्याची शिकवण द्यायचे. हे वाद अचानकपणे होत नव्हते. तर, लहान असताना तो बाबांशी प्रत्येक मुद्यावर इतका तर्कशुद्ध वाद घालायचा की ते पाहून मी थक्क व्हायचो. वादातली त्याची मोठमोठी वाक्य ऐकून मला वाटायचं की हा अभ्यासात नाव काढून आम्हाला चांगले दिवस दाखवेल. मला घरखर्च सांभाळायचा आहे, हे सांगणाऱ्या माझ्या पिताश्रींची आठवण यायची. जेणेकरून, उदभ्रांतचं शिक्षण निर्विघ्न पूर्ण होईल आणि आमच्या अपेक्षा उंचावतील. म्हणून घरातल्या छोट्या छोट्या खर्चाचा भार उचलण्यासाठी मी माझी सारी शक्ती पणाला लावली. काहीही करून मला एक नोकरी मिळायलाच हवी होती. 

निळा रंग देवाचा असतो

अशातच ‘गृहशोभा’ नामक त्या मॅगझिनमध्ये नोकरी लागणं म्हणजे माझ्या आयुष्यात आनंद परतण्यासारखं होतं. मी संध्याकाळी पेढे घेऊन नीलूच्या घरी गेल्यावर ती बराच वेळ हसत राहिली. काकूंनी गच्चीत जाऊन नीलूला पेढा द्यायला सांगितलं. नीलू नेहमीच संध्याकाळी गच्चीत उभं राहून सूर्यास्त पहायची. तिला आकाश खूप आवडायचं. सूर्यास्त पहाणं तिला आवडायचं. माझ्यासाठीही ते बरंच होतं. मीही कधीच उगवलो नाही. मी कायमच अस्ताला जाणाऱ्या सूर्यासारखाच होतो. 

“कसले पेढे देताय साहेब?” पाचवीत असल्यापासून ती मला ‘साहेब’ म्हणायची. शाळेच्या गॅदरिंगमध्ये ‘साला मैं तो साहब बन गया’ गाण्यावर हातात पेप्सीची बाटली घेऊन डान्स केला  होता. तेव्हापासून माझा ‘साहेब’ झाला होता.

मला नोकरी लागल्याचं मी तिला थोडंसं लाजत सांगितलं. माझी ती नोकरी म्हणजे एखाद्या  शहरात आलेला माणूस स्वस्त हॉटेलात आपल्यालायक खोली शोधतो ना, तशातली आहे. तिनं मॅगझिनचं नाव विचारलं. मी नाव न सांगता हे मॅगझिन खास बायकांसाठी आहे, त्यात स्वेटरच्या डिझाईन्सबरोबरच चांगल्या कथा आणि लेख छापतात असं सांगितलं. मात्र, तिनं नाव सांग म्हणून टुमणं लावल्यावर मला ते सांगावंच लागलं. त्यावरचं तिचं हसणं पाहून मला आकाश छपराइतकं खाली आल्यासारखं वाटलं. देशभरात नावाजलेल्या एखाद्या  मॅगझिनमध्ये नोकरी नाही लागली हे एका अर्थानं बरंच झालं. मला नोकरीपेक्षा तिचं हसणं जास्त महत्त्वाचं होतं. नोकरीची गरज तर मला होतीच. मला नोकरी देणाऱ्याला हे माहीत नव्हतं की मला हवेपेक्षा नोकरीची जास्त गरज आहे. आणि, नीलूला हे माहीत नव्हतं की नोकरीपेक्षा मला तिचं हसणं जास्त महत्त्वाचं आहे, हे . 

प्रश्न – शेजारी राहणाऱ्या मुलीवर माझं लहानपणापासून प्रेम आहे. आमची चांगली मैत्री आहे. मात्र, मी तिच्यावर प्रेम करतो हे तिला माहीत नाही. तिचं हसणं जगात सर्वांत सुंदर आहे. तिनं हसावं म्हणून मी कायम विदुषकासारखं वागतो. जणू काही, तिचं हसणं मी पितो. आयुष्यभर तिच्यासाठी विदुषकासारखं वागावं आणि ती हसत रहावी, असंच मला वाटतं. माझं प्रेम तिच्यापाशी व्यक्त करण्याची मला भीती वाटते. मी प्रेम व्यक्त केल्यानं तिच्याबरोबर असलेली मैत्री तुटेल आणि तिचं हसणं ऐकल्याविना अाख्खं आयुष्य जगावं लागेल की काय, याची मला भीती वाटते. मी काय करू?

मी कित्येक प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. मॅगझिनमध्ये छापण्यालायक तर नक्कीच नाही. अशा वाचकांना मी वैयक्तिक स्वरुपात उत्तर देतो. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाला काही ना काही उत्तर आहेच, अशा शब्दांत मी त्यांच्यासाठी सहानुभूती व्यक्त करतो. त्यांच्यासाठी प्रार्थनाही करतो. ज्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत हे मला कळत नाही, ते प्रश्न लोकांपुढे ठेवावेत असंही मला वाटतं. किंवा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ते प्रश्न समाजापुढे ठेवण्याचा पर्यायही शोधतो. मात्र, आमच्या मॅगझिनमध्ये अशा व्यवस्थेचा विचारही करणं कठीण आहे. मी जेव्हा स्वत:चं मॅगझिन काढीन, तेव्हा नक्कीच असा एखादा कॉलम सुरू करीन.  

ऑफिसमध्ये मला उपसंपादकाच्या खुर्चीत बसवण्यात आलं. मी तिथला सर्वांत कमी वयाचा कर्मचारी होतो. मॅगझिनच्या ऑफिसात गेल्यावर मला कळलं की ज्यांचे केस पांढरे झालेले असतात, त्यांच्याशी आदराने वागलं पाहिजे. कारण ते कधीच चुकत नाहीत. सर्वांत वरच्या पदावरची व्यक्ती सर्वांत बुद्धिमान असते. त्याच्याबरोबर कधीच वाद घालायचा नसतो. मॅगझिनमध्ये नोकरी करा किंवा किराणा मालाच्या दुकानात नोकरी करा, दोन्हीकडे नोकरच व्हावं लागतं. मॅगझिनमधले जवळपास सगळेच वयाने ज्येष्ठ होते. त्यापैकी संपादकीय विभागात काम करणारे लोक म्हणजे दीनजी, दादा, गोपीचंदजी, मिस सरीन यांना प्रमुख मानलं जायचं. मुख्य संपादक असलेला माणूस तर दीन आणि दादा यांच्याहून कमी वयाचा होता. मात्र, या दोघांनी केलेली चमचेगिरी त्याला खूप आवडायची. या दोघांकडून मस्का मारून घेताना तो स्वत:ला भारी समजायचा. 

अल्पावधीतच मला या नोकरीचा कंटाळा आला. मी इंटरला असताना पिताश्रींनी घरचा किराणा आणि खर्चाचा विषय माझ्यावर सोपवला होता. त्यावेळी नोकरी माझ्यासाठी खूप दूरचा विषय होता. या गोष्टीला सात वर्षं झाली आहेत आणि आता कुठे मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय. ही नोकरी सोडून मी दुसरी नोकरी शोधण्याचा धोका पत्करू शकत नाही, याची मला लाज वाटते. दुसरी नोकरी शोधण्याइतका वेळच ही नोकरी करताना मिळत नाही. 

मॅगझिनमध्ये मला उपसंपादकाचं पद मिळालं असलं, तरी मला बरंच काही करावं लागायचं. दीनदयाळ तिवारी, अर्थात दीन यांनी लिहिलेल्या लेखांचं प्रुफरिडिंग करणं हे खूप वाईट आणि कंटाळवाणं काम होतं. तिवारी ऑफिसात सर्वांत सीनियर होते. आशीर्वाद हा शब्द ते कायम आर्शीवाद असा लिहायचे. दीन हे त्यांचं टोपणनाव होतं. या नावानं कविता लिहून त्या ऐकवण्याची त्यांची धडपड सुरू असायची. त्यांच्या लेखांचं प्रुफरिडिंग करताना ते सांगायचे की यातून माझं ज्ञान वाढेल आणि जी काही एखादी मिस प्रिंटिंग झाली असेल, तर तीही दुरुस्त होईल. त्यांचे लेख तपासताना ते मला त्यांच्या मुलीची हुशारी आणि तिनं मिळवलेल्या पुरस्कारांचं कौतुक सांगत बसायचे. गप्पागोष्टींदरम्यान त्यांनी मला माझ्या लग्नाविषयी विचारल्यावर मी ऑफिसबाहेरच्या भिंती निरखत बसायचो. भिंती निळ्या होत्या. नीलू नेहमी निळ्या रंगाचे कपडे घालायची. निळा माझा आवडता रंग होता. 

निळा रंग देवाचा असतो,
ती लहान असताना नेहमी सांगायची. त्यावेळी तिनं निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेला असायचा. तुला काय माहीत, असं मी तिला विचारल्यावर ती आकाशाकडे बोट दाखवायची. आकाश निळं असतं आणि समुद्रसुद्धा.. ज्या अथांग आणि सर्वशक्तीमान गोष्टी आहेत, त्या केवळ निळ्याच असू शकतात. त्या क्षणीही मी तिच्या फ्रॉककडेच पहात राहायचो. ती बोलत असताना तिचे डोळे खूप मिचमिचायचे. त्यावरून तिला तिची आई खूप ओरडायची. “ही खूप घाणेरडी सवय आहे आणि ताबडतोब बंद कर,” असं तिची आई सांगायची. नशीब, आजही तिची ती सवय काही प्रमाणात शाबूत आहे. माझ्याशी बोलताना तिचे डोळे तसेच मिचमिचतात. मी नेहमीच तिच्याकडे पहात राहतो आणि तिच्या बोलण्याकडे माझं लक्षच नसतं. मग ती मला भानावर आणते. “आता नेटवर्कमध्ये आहेस का? आता बोलू मी?”, असं ती मला विचारते.  मी थोडा लाजतो, थोडं हसतो आणि मग तिचं बोलणं ऐकू लागतो. मात्र, पुन्हा तिचा आवाज आणि तिच्या डोळ्यांत हरवून जायला मला वेळ लागत नाही. त्यावेळी मी माझी एखादी मौल्यवान वस्तू हरवल्यासारखा असतो आणि कोणत्याही क्षणी माझा टॉवर जाऊ शकतो. पाचवीत असताना एकदा तिनं तिच्या शिक्षकांच्या घरून सशाचं पिल्लू आणलं होतं. मात्र, त्याची नीट काळजी न घेतल्यानं ते चार दिवसांतच मेलं. रडून-रडून नीलूचे डोळे जड झाले होते. तिच्या त्या रडण्यानंतर तिच्या आईनं कधीच दुसरा प्राणी पाळू दिला नाही. सशाविषयी बोलायलाही तिला बंदी करण्यात आली होती. ससा पांढराशुभ्र होता. त्या दिवशी निळ्या आकाशाचा एक छोटा तुकडा पांढरा झाला होता. नीलू बराच वेळ त्याकडे पहात राहिली. निळ्या रंगाचं आमच्या आयुष्यातलं महत्त्व खूप मोठं होतं. नीलूची आणि माझी पहिली भेट आजही मला अगदी जशीच्या तशी आठवते. मी तिसरीत होतो. नीलूची अॅडमिशन आमच्याच शाळेत तिसरीच्याच वर्गात झाली होती. तिच्या वडिलांची बदली झाल्यामुळे तिची फॅमिली आमच्या शहरात आली. सुरुवातीला ते एका भाड्याच्या घरात रहात होते. काही वर्षांनी त्यांनी स्वतःचं घर घेतलं आणि ते तिकडे शिफ्ट झाले. 

तर, नीलूनं निळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. आईचा हात धरून शाळेत येत होती. शाळेची  प्रार्थना सुरू झाली होती. आमचे पिताश्री सकाळी लवकर फॅक्टरीत जायचे. त्यामुळे शाळेत मी एकटाच जायचो. त्या दिवशी मला शाळेत जायला उशीर झाला होता. मी पटापट चालत शाळेच्या गेटवर पोहोचलो, इतक्यातच मला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहिलं, तर निळा ड्रेस घातलेली, बार्बी डॉलसारखी दिसणारी नीलू रडत शाळेत येत होती. तुझ्याबरोबर माझंही नाव घालते तिसरीच्या वर्गात, तू केजीत आहेस का आता रडायला, तिसरीतली मुलं ना हुशार आणि समंजस असतात, असं काही ना काही सांगून तिची आई तिला समजावत होती. ते सगळं पाहत मी गेटवरच उभा राहिलो. मला उशीर होतोय हेच मी विसरून गेलो आईचा हात धरून नीलू गेटवर आली, तेव्हा तिनं माझ्याकडे पाहिलं. मी तिच्याकडे एकटक पहात होतो. ती अचानक थांबली आणि तिनं हात झिडकारून पुढे जाणाऱ्या आईला थांबवलं. 

“काय झालं नीलू,” तिच्या आईनं वैतागलेल्या सुरात विचारलं. 

“त्याचा ब्ल्यू बघ.. मला तसाच ब्ल्यू हवा. उद्यापासून मी हा फ्रॉक नाही घालणार,” तिनं माझ्या पँटकडे बोट दाखवत सांगितलं आणि पुन्हा हमसू लागली. माझ्यासारख्याच रंगाचा फ्रॉक उद्या घेऊन देण्याचं तिच्या आईनं तिला प्रॉमिस केलं. 

 घरी आल्यावर मी पहिल्यांदाच  माझी पँट नीट पाहिली. त्या क्षणापासून मला ती खूपच आवडू लागली. त्या दिवशी मी आईला माझी पँट धुवूच दिली नाही. स्वतःच कपडे धुतले. काही काळानंतर कळलं की नीलू लहान असताना जेव्हा तिला बोलता येत नव्हतं, तेव्हा तिला निळ्या रंगाचंच आमिष दाखवावं लागायचं.  तिला उचलून घेऊन  बाहेर फिरायला नेणाऱ्याला निळ्या रंगाचेच कपडे घालावे लागायचे. म्हणूनच तिचं नाव नीलू ठेवण्यात आलं होतं. नंतर घरच्यांनी शाळेत तिचं नाव अर्पिता असं लिहिलं होतं. मात्र, घरच्यांना काहीही न सांगता तिनं हायस्कूलच्या फॉर्मवर मात्र नीलूच लिहून टाकलं. ती कमाल होती. 

जेव्हा घर सजवायचं असेल..

माझं वय लहान आहे, एवढ्यासाठीच मला दीनजीच्या वाट्याचंही काम करावं लागतं. त्याचं काम करण्याशिवाय  नुकतीच केलेली कविता ऐकवून ते माझ्यावर दुहेरी अत्याचार करतात. त्यांच्या कवितांमध्ये भूक, जागतिकीकरण, बाजारपेठ, शेतकरी हे शब्द वारंवार येत असल्यानं  मी त्यांच्या कवितेला महत्त्वाची कविता म्हणावं अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांच्या कविता आमच्या मॅगझिनमध्येच छापल्या जातात. आपलं हक्काचं मॅगझिन असताना उगाच दुसऱ्यावर कशाला उपकार करायचे, असं त्याचं म्हणणं असतं. कवितांसाठी त्यांना काही प्रशस्तीपत्रंही मिळाली आहेत. त्यावर त्यांना आता एक कथा लिहिण्याची इच्छा आहे. नक्कीच त्या कथेचं नाव उपाशी शेतकरी किंवा भुकेला बाजार असलं काहीतरी असेल. 

प्रश्न उत्तरवाला कॉलम माझ्यापूर्वी संपादक दिनेश क्रांतीकारी स्वतः बघायचा. आलेल्या प्रश्नांना अगदीच किरकोळीत उत्तरं देऊन निकाली काढलं जायचं. त्यानं जेव्हा माझ्यावर या कॉलमची जबाबदारी सोपवली, तेव्हा ऑफिसमध्ये सगळेजण आपापसांत हसत का होते, काही कळलं नाही. या कॉलमचं काम म्हणजे एक मोठी जबाबदारी म्हणून मी स्वीकारलं होतं. लोकांचे प्रश्न वाचताना मला खरंच त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायची. मानसिक ताणतणाव सोडवणारा ‘मी काय करू?’ नावाचा हा कॉलम लोकांसाठी चेष्टेचा विषय झाल्याचं मला लवकरच जाणवू लागलं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी अत्यंत प्रामाणिकपणे दिलं आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना काही अडचण असल्यास मी सेक्सॉलॉजिस्ट किंवा मानसोपचारतज्ज्ञाबरोबर चर्चा केली आहे. त्यांच्याकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून वाचकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. दीनजीबरोबर चौहानसाहेब आणि दासगुप्ता म्हणजे डिझायनरदादाही माझी चेष्टा करण्यासाठी संधी शोधत असतात. कालच मी ऑफिसातून निघत असताना दादांनी मला बोलावलं. माझी बायको माहेरी गेल्यावर मला समोरच्या अंजुला बॅनर्जीचं आकर्षण वाटू लागतं. दिवस कसातरी जातो. मात्र, रात्र जाता जात नाही. मला वाटतं, ती मला आवडते. मी काय करू?

माझी खूप चिडचिड झाली. म्हाताऱ्या वय बघ ना तुझं, असं सांगावसं वाटत होतं. मात्र, ते बॉसच्या खास लोकांमधले एक आहेत. मी मन मारून गप्प बसलो आणि तुम्ही वहिनींना माहेरी पाठवू नका, असं सांगितलं. हे असले लोक घरी आपल्या पोराबाळांसमोर कसे वागत असतील, याचं मला आश्चर्य वाटतं. दादांबरोबर दीनजीही हसू लागले. नवी कविता ऐकवण्यासाठी एकदम चांगलं वातावरण मिळालेलं पाहून त्यांनी एक कविता आमच्या माथी मारलीच.

तिच्याविना रात्र म्हणजे
भाकरीविना पोट भरणं,
चंद्राविना रात्र आणि 
सचिनशिवाय क्रिकेट 
ती आली तर येईल बहार, 
ती गेली तर जाईल बहार..
पण आम्ही नाही मानणार हार
आम्ही अन्यत्र शोधू बहार
तिला यायला उशीर झाला
तर बाहेर इतर कुणाला तरी.. 

पुढचे शब्द ऐकवण्या योग्य नव्हते. काही शब्द अश्लील आहेत, असं दादांनी सांगितलं. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की तसंही आपल्या आयुष्यात बरंच काही अश्लील आहे. आपण ज्या भाषेत बोलतो, त्या भाषेत कविता लिहिली नाही, तर ती कविता खोटी ठरेल. कवितेला नव्या आणि विद्रोही भाषेची गरज आहे. फक्त तुम्हीच या भाषेत बोलता, असं त्यांना सांगावंसं वाटत होतं. मात्र, मी सांगू नाही शकलो. त्यांचे केस पिकले म्हणजे माझ्यापेक्षा त्यांचा जास्त अनुभव हेच जगात मानलं जातं. म्हणजे, त्यांच्या-माझ्यात काही तुलना झाली, तर मीच चुकीचा ठरणार. पिकलेल्या केसांचे लोक कुठल्याही वादात हरल्यावर आपले पिकलेले केस दाखवतात. शिवाय त्यांची अशी अपेक्षा असते की या अजब तर्कानं वादाचा निकाल त्यांच्याच बाजूनं लागला पाहिजे. 

मी नीलूच्या घरी गेलो, तेव्हा तिथं खूप गडबड होती. काकूंनी मला पहाताच थोडी अजून बर्फी आणायला सांगितलं. नेमकी एकच बर्फी आणली आहे आणि त्यांना काजूकतली हवी आहे, असं त्या म्हणाल्या. मी बर्फी घेऊन गेल्यावर कळलं की पाहुणे आले आहेत. त्यांच्या पाहुणचाराची गडबड सुरू होती. नीलू कुठे आहे, हे पाहण्यासाठी बर्फी दिल्यावर मी थोडावेळ तिथंच उभा राहिलो. हॉलमध्ये लावून ठेवलेला टीव्ही कोणीच पहात नव्हतं. टीव्हीवर लागलेल्या एका जाहिरातीनं मला हसू आलं. ‘जब घर की रौनक बढ़ानी हो, दीवारों को जब सजाना हो, नेरोलॅक नेरोलॅक..’ मागच्या तीन दिवाळीत आमच्या घरी चुना लावलाच नव्हता, हे माझ्या लक्षात आलं. कदाचित पुढच्या दिवाळीला मी आणि उदभ्रांत चुना लावून टाकू. पांढऱ्या रंगात नीळ टाकून आमची छोटी खोली रंगवू. 

काकू माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या. बर्फी देऊन मी निघून जाणं हे माझं कर्तव्य होतं, अशा नजरेनं त्या माझ्याकडे पाहू लागल्या. मी त्यांना विचारलं, “नीलू कुठेय?” त्यांनी गच्चीकडे बोट दाखवलं आणि तिला लवकर खाली घेऊन यायला सांगितलं. गच्चीत गेलो, तेव्हा नीलू तिचं आवडतं काम करत होती. ती आकाशाकडे इतकं एकटक पहात होती की जणू कुणाशी तरी तिचा संवाद सुरू होता.  

“या साहेब, कसे आहात?” तिनं कोरड्या नजरेनं माझ्याकडे पहात विचारलं.

“खाली एवढी गर्दी कसली आहे?” मी तिच्या बाजूला बसत विचारलं. 

“काही नाही.. आईच्या माहेरचे काही लोक आलेत.. मला पहायला..” क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला. एका वाचकाचा प्रश्न माझ्या मनात घोंगावू लागला. ‘माझं ज्या मुलीवर प्रेम आहे, ती मला लहानपणापासून ओळखते. मी तिला तिचा सर्वांत जवळचा मित्र वाटतो. पण, माझं तिच्यावर लहानपणापासून प्रेम आहे. माझं प्रेम व्यक्त केलं आणि तिला गमावलं तर, या भीतीनं मी तिला प्रपोज करत नाही. मी काय करू? अशा कित्येक प्रश्नांना व्यक्तिगत स्वरूपात उत्तर दिलं होतं. कालच मॅगझिनमध्ये एक उत्तर दिलं होतं. त्यात मी लिहिलं होतं की एवढी रिस्क तर घ्यावीच लागेल. मात्र, एखाद्याला सल्ला देणं आणि स्वतः तसं करणं यात जमीन-अस्मानाचा फरक असतो, याची मला पूर्ण कल्पना आहे. आम्ही दोघं कायमच एकमेकांच्या खूप जवळचे होतो. एकमेकांच्या जवळपास सगळ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत. मात्र, लग्न आणि मनात असलेलं प्रेम व्यक्त करणं..  किमान माझ्यासाठी तरी अशक्यप्राय आहे. 

“कोण आहे मुलगा?” अतिशय क्षीण आवाजात मी विचारलं. त्यावर तिनं सांगितलं की तिच्या मावशीच्या नणंदेचा मुलगा आहे, इंजिनीअर आहे. मला माझ्या वाचकांची पत्र आठवू लागली, त्यांच्या लव्हस्टोरीचे खलनायक इंजिनीअरच आहेत. “कित्ती लोक इंजिनीअर होतात ना आजकाल? बाकी सगळे आले आहेत, तो उद्या येणार आहे.”

“मीनू सांगत होती, ‘मुलगा खूप उंच आहे’,” तिनं माझ्याकडे पहात सांगितलं. तिचे डोळे तसेच मिचमिचत होते.

“उंच मुलांत एवढं काय खास असतं?” माझ्या प्रश्नातला मूर्खपणा मला लागलीच कळला. 

“असतं ना, त्यांना हवं तेव्हा ते हात उंचावून आकाशातले तारे तोडू शकतात,” ती पुन्हा आकाशाकडे पाहू लागली. 

“चांदण्याच तोडायच्या असतील, तर त्या मी तुला उचलून घेतल्यावरही तोडता येतील की.. कितीशी उंची हवी त्यासाठी,” काही क्षण थांबून मी हळूवारपणे सांगितलं. हे वाक्य म्हणजे माझ्या उंचावलेल्या मनोबलाचं उदाहरण होतं.  

“मग कधी उचलून घेणार साहेब, आकाशातले सगळे तारे आधीच कोणीतरी तोडल्यावर?” तिनं पापण्या मिचकावल्या. मला माझ्या ऐकवण्यावर आणि तिच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास बसला नाही. तिचे शब्द माझ्या मनात असे काही घुमले की मी जणू काही एका स्वप्नात आहे, खूप दूरवर निघून गेल्यासारखं वाटलं. 

तिचा आवाज रेशमासारखा मुलायम झाला होता. आकाशाचा काळा रंग आता निळा झाला होता. थोडं धाडस करून मी तिच्या हातावर माझा हात ठेवला.

“आकाशाचा रंग बदलतोय ना?” मी तिला विचारलं. 

“हां, साहेब. आकाशाचा रंग पुन्हा निळा होतोय. तुला माहितेय, निळ्या रंगाच्या गोष्टी ना आयुष्य देतात,” तिनं माझ्या हातावर तिचा दुसरा हात ठेवत सांगितलं.   

माझ्या डोळ्यासमोरून खूप सारी दृश्यं तरळून जात होती. कधीच न खरेदी केलेली सायकल आणि त्यावर बसलेली नीलू, नीलूच्या फ्रॉकवरचे खूप तारे, जे हळूहळू विलग होऊन आकाशात उडत आहेत, त्या ताऱ्यांना पकडून मला पुन्हा नीलूच्या फ्रॉकवर चिकटवावंसं वाटतं. एकाच स्वप्नात मी दुसरं स्वप्न पाहू लागलो. 

“तुझ्याकडे निळी साडी आहे?” तुटणार नाही इतक्या प्रेमानं मी तिला विचारलं. तिचा आवाजही काचेसारखाच होता. जणू काही त्यावर ‘हँडल विथ केअर’ लिहिलं होतं.

“बीएडवाली आहे ना. पण ती खूप भारी आहे साहेब. तू माझ्यासाठी स्वप्नांपेक्षाही हलकीशी साडी घेऊन ये.” 

“तू फक्त निळाच रंग वापरत जा नीलू.”

“मला फक्त संध्याकाळीच निळ्या रंगाचे कपडे घालायला आवडतात साहेब. कारण दिवसा तर तू काही येत नाहीस.” 

“मग मी कुठे जाणारच नाही. म्हणजे परत येण्याचा प्रश्नच नाही. कुठेही जायचं झालं की मला भीती वाटते. कारण मला परत तुझ्याकडे यायचं असतं,” तिचे तळहात उष्ण झाल्याचं मला जाणवलं. त्या क्षणी कोणी गच्चीत येईल की काय, याचीही मला भीती वाटली.    

“मला तुला काहीतरी सांगायचंय साहेब,” रेशमासारख्या मुलायम आवाजात ती म्हणाली. 

“काय?”

“त्यासाठी मला माझे डोळे बंद करावे लागतील. मी डोळे बंद करते, तू माझ्याकडे बघत रहा. तू माझ्या डोळ्यात पहात राहिलास, तर तुझा टॉवर नाही जाणार..” हसून तिनं डोळे बंद केले. मी तिचे हात हातात घेतले. तिचा मऊसूत हात हातात घेतल्यावर मला जाणवलं की माझं आयुष्य तिच्या हातासारखं कोमल आणि मऊसूत व्हायला हवं. मी तिचे हात हातात घेऊन बसून राहिलो. ती सांगत राहिली. नवं वर्षं माझ्यासाठी जगातला सर्वांत मोठा आनंद घेऊन आलं होतं. या वर्षी माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणलेलं ते छानसं कार्ड उद्याच तिला द्यावं असा विचार माझ्या मनात आला. सोबतच एवढी वर्षं जपून ठेवलेली अगणित कार्ड्सही..

“तू जर कधी सायकल घेतलीस, तर मला त्यावर बसायचंय.. आपण दोघं जंगलात ससा पहायला जाऊ.. तुला जेव्हा काही लिहायचं असेल, तेव्हा मी तुझ्यासमोर बसून डोळे बंद करीन.. म्हणजे तू माझ्याकडे पहात टॉवरवर राहून असं काहीतरी लिही की त्यानंतर आयुष्य कमी पडलं तरी दुःख वाटणार नाही.. तू कविता लिहिलीस, तर ती अशी लिही की तिला स्पर्श करता येईल.. तिला स्पर्श केल्यावर एकतर अजून जगण्याची उमेद यावी किंवा मरण तरी यावं.. तू कायम निळ्याच रंगात लिही..”

ती फक्त बोलत होती. मला पहिल्यांदाच जाणवलं की मी फक्त तिच्या डोळ्यांतच हरवून जात नव्हतो, तर तिच्या चेहऱ्यावरचं  ते निळसर तेज माझ्या तळहातावर पडत होतं आणि त्यात मी असा काही बुडून गेलो होतो की तिचा आवाज मला एखाद्या स्वप्नासारखाच वाटत होता. तिच्या घरातलं कोणी आता गच्चीत आलं, तरी मला त्याची काही फिकीर नव्हती. तिच्या घरी कोणी नव्हतं, कॉलनीत कोणी नव्हतं. साऱ्या जगातही कोणी नव्हतं. आम्ही दोघं एका निळ्या स्वप्नात होतो. त्या रात्री आकाशही निळंच होतं. 

उत्तर प्रदेश

मला बसण्यासाठी क्युबिकलसारखं काहीतरी मिळालं होतं. त्याला तीन बाय तीनची खोलीही म्हणता आलं असतं. त्याला व्यवस्थित असं छप्पर आणि मोठी खिडकीही होती. ते पाहून असं वाटायचं की बाथरूम करायचं म्हणून हे बांधलं असेल आणि नंतर कोणा वास्तुशास्त्रज्ञाच्या सांगण्यानुसार त्याची स्टोअर रूम करून टाकली असेल. कमाल म्हणजे, बाहेरून ती फक्त एक खिडकी असल्यासारखी दिसायची. खि़डकीच्या पाठीमागे एक खोलीसारखं काहीतरी आहे हे अजिबात कळायचंच नाही. त्याचा दरवाजा मागच्या बाजूनं उघडायचा आणि कायमच बंद ठेवला जायचा. ऑफिसात गेल्यावर खिडकी हाच त्यात घुसण्याचा एकमेव मार्ग होता. खिडकीतून उडी मारून माझ्या केबिनमध्ये जाणं म्हणजे चोर असल्यासारखंच वाटायचं. सकाळी मी ऑफिसला जाताना गेटवर दीनजी भेटले आणि सिगरेटचा धूर सोडतच ते माझी मस्करी करू लागले. 

‘सर मी ५६ वर्षांचा आहे. माझं आमच्या ऑफिसातल्या एका मुलीवर प्रेम आहे. ती फक्त २२-२३ वर्षांची आहे. मी तिच्या प्रेमात पार वेडा झालो आहे. माझ्या मनातलं तिला सांगावंसं वाटतं. पण ती मला काका म्हणते. ती माझी होण्यासाठी मी काय करू? दीनच्या चेहऱ्यावर लाजलज्जेचा लवलेशही नव्हता. या वयातले सगळेच म्हातारे असेच असतात का?’ आपल्या घरच्या मुलींनाही ते अशाच नजरेनं पाहतात का? एवढी वर्षं तो काय करत होता की त्याचं वय इतक्या झरकन सरल्याचं त्याला कळलंही नाही? त्याचवेळी योगायोगानं मिस सरिता सरीन ऑफिसात आली आणि दरवाजातूनच ‘हॅलो’ म्हणून निघून गेली. 

‘हॅलो अनहद, हॅलो काका..’ 

माझी चेष्टा करण्याचा दीनजींचा मूड एकाएकी निघून गेला. ते इकडेतिकडे पहात दुसरी सिगरेट पेटवू लागले. मी आत गेलो, तर अजून एक आश्चर्य माझी वाट पहात होतं. माझ्या केबिन कम् खुराड्याच्या खि़डकीवर कोळसा किंवा मार्करनं मोठ्या अक्षरांत ‘उत्तर प्रदेश’ लिहिलं होतं. ते पुसून टाकण्याचा मी अजिबात प्रयत्न न करता उडी मारून आत गेलो. माझ्या टेबलावर पडलेल्या खूपसाऱ्या प्रश्नांची मला उत्तरं द्यायची होती. त्या दिवसापासून माझी केबिन ‘उत्तर प्रदेश’ या नावानं ओळखली जाऊ लागली. खरं सांगायचं, तर त्या खिडकीचं नाव उत्तर प्रदेश ठेवण्यात आलं होतं. सर्क्युलेशन आणि सबस्क्रिप्शन विभागाकडून मला कळलं की माझ्या कॉलमचं खूप कौतुक होतंय. त्यामुळेच मॅगझिनची विक्रीही वाढली आहे. मात्र, या माहितीचा माझ्या फायद्यासाठी कसा वापर करावा हे काही मला कळलं नाही. दीनजी आणि दादांशिवाय मिस सरीन, गोपीचंद आणि एखाद्यावेळी आमचे संपादकही (प्यायल्यानंतर उत्तेजित होऊन) काहीवेळा माझ्या केबिनमध्ये येऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं विचारू लागले, एवढं मात्र झालं. मिस सरीननं एकदा विचारलं, ‘सर माझ्या घरच्यांना माझं लग्न करून द्यायचं आहे. मला काही एवढ्यात लग्न करायचं नाही. मला माझं करिअर करायचं आहे, आयुष्यात खूप पुढे जायचं आहे. माझा लग्नाबिग्नावर अजिबात विश्वास नाही. मी काय करू?’  मी थोडा वेळ त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलो. जेव्हा माझ्या लक्षात आलं की मस्करीत का होईना, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, तेव्हा मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. लग्न म्हणजे काही अडथळा नाही. सारे अ़डथळे आपल्याच मनात असतात. त्यावर विजय मिळवला.. माझं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच दीनजी आणि दादा दरवाजात येऊन उभे राहिले आणि जोरजोरानं हसू लागले. मी गप्प बसलो आणि सरीन तिच्या जागेवर निघून गेली. 

एकदा रात्री मला निघायला थोडा उशीर झाला. संपादकसाहेबांच्या केबिनमध्ये प्यायचा कार्यक्रम सुरू झाला होता. माझ्या केबिनच्या काचेवर टकटक झाली. मी पाहिलं, तर संपादक झिंगत माझ्या खिडकीबाहेर उभे होते. एखाद्या सैनिकासारखा मी तडक उठलो आणि मी अजिबात नमस्कार वगैरे काही केला नाही. 

“अनहद, मित्रा.. माझी बायको रात्री बेडमध्ये मला काही जमत नाही, म्हणून सतत मला टोमणे मारते रे.. मी कितीतरी उपाय करून पाहिले, औषधंही घेऊन झाली.. मला वाटतं की याचं काहीतरी मानसिक कारणच असलं पाहिजे. तुला काय वाटतं?” मग साहेबांनी त्यांच्या पँटची चेन उघडली. घाणेरडा चाळा करत म्हणाले, “बघ बाबा, काही कमी असल्यासारखं तर वाटत नाही ना.. कदाचित काहीतरी मानसिक कारणच असेल.”
मी नजर चोरतच सांगितलं, “असू शकतं सर..” ते अगदीच जोरावर आले होते. “याला जरा टेस्ट करून पाहूया.. जरा उडी मारून बाहेर ये आणि मिस सरीनला फोन करून सांग की सरांनी बोलावलंय.. महत्त्वाचं काम आहे. आज याची टेस्टिंग तिच्यावरच करून पाहू. साला, माझ्या म्हाताऱ्या बायकोसमोर डोकंही वर करत नाही आणि सरीनचं फक्त नाव काढल्यावर बघा कसा तय्यार झाला एकदम..” स्वतःच्याच बोलण्याची त्यांना इतकी मजा वाटली की हसता-हसता जमिनीवरच बसले. त्या क्षणी दीनजी माझे तारणहार होऊन पुढे आले. दादांबरोबर त्यांनी साहेबांना उठवून खुर्चीत बसवलं. पुढच्या पाच मिनिटांत मी माझं काम संपवून तिथून त़़डक निघालो. 

सकाळी अंघोळ करून, खाऊन-पिऊन झाल्याववर बंद पडलेल्या कारखान्यात जाण्यासाठी पिताश्री असे काही तयारीनं निघायचे की जणू काही कामावरच जायचं होतं. हे त्यांचं रूटीनच झालं होतं. भलेही कारखान्याच्या बंद गेटवर धरणंही धरायचं असलं, तरी उशीरा जाणं त्यांना अजिबात पटणारं नव्हतं. कारखान्याचे सर्व कामगार गेटवर धरणं धरायचे आणि संध्याकाळपर्यंत काहीतरी चमत्कार होईल, अशी त्यांना अपेक्षा असायची. हा साखर कारखाना ९० वर्षं जुना होता. त्याला नूरी मियाँचा कारखाना म्हटलं जायचं. कारखाना सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच नूरी मियाँचं निधन झालं. काही वर्षांनी तत्कालिन सरकारनं नूरी मियांच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता त्या कारखान्यावर कब्जा केला. चांगल्या चालणाऱ्या कारखान्याला तत्कालिन सरकारनं आजारी कारखाना ठरवून टाळं लावलं. सरकार जागोजागी टाळं लावत सुटलं होतं. एवढी कुलपं कुठून आणत होते काय माहीत.. कारण अलीगढमधला कुलपांचा उद्योग घटत होता आणि तिथं इतरच काही उद्योग वाढत होते. कधीतरी कारखाना चालू होईल आणि कधीतरी पुन्हा ते जुने दिवस पहायला मिळतील या आशेनं पिताश्री आणि बाकी सारे कामगार धरणं धरून बसले. मात्र, सरकारच्या फर्मानानं त्यांची उरलीसुरली आशाही संपुष्टात येऊ लागली. 

एके दिवशी त्यांच्या धरणं धरलेल्या जागी अन्सारी आला. सगळ्या कामगारांनी त्याला घेराव घातला. सर्वजण त्याच्यासमोर आपली रडगाणी गाऊ लागल्यावर तो मटकन खाली बसला आणि रडू लागला. पिताश्रींच्या खांद्यावर हात ठेवून तो हुंदके देऊ लागला. पिताश्रींबरोबरच बाकी कामगारांनी आपल्या मालकाचं हे रूप त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिलं. त्यांना हे वेगळं वाटलं. त्याच्या अजून जवळ येत त्यांनी गर्दी केली. रडतरडत मोडक्यातोडक्या शब्दांत अन्सारीनं जे काही सांगितलं, ते कामगारांना नीटसं कळलंच नाही. पिताश्री सुपरवायझर होते. त्यांना वाटायचं की सुपरवायझर असणं हे जगातलं सर्वांत जबाबदारीचं काम आहे. सुपरवायझरला सारं काही  माहीत असलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. अन्सारी जे बोलला, त्यातलं त्यांना किती कळलं काय माहीत.. त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं, त्यातलं खरं किती होतं आणि त्यांचा अंदाज किती काय माहीत.. त्यांच्या कुठल्याच गोष्टीच्या खऱ्याखोट्याचे मी पुरावे देतोय असं नाही. मात्र त्याबद्दल सांगणं महत्त्वाचं एवढ्यासाठीच की त्या दिवशी पिताश्रींना इतकं हताश झालेलं मी पहिल्यांदाच पाहिलं. अन्सारीच खचल्याचं पाहिल्यानंतर सगळ्याच कामगारांच्या खोट्या आशा उद्ध्वस्त झाल्या. त्याच आशेच्या जोरावर मागची सात  वर्षं ते बिला नागा कारखान्याच्या जमिनीवर डोकं टेकत होते.  

“अन्सारी साहेबांच्या कारखान्याची जमीन ५२ गुंठे आहे. त्याची किंमत आज एक अब्ज रुपयांहून अधिक आहे. मागच्या सात वर्षांपासून सरकारने त्यांचा कारखाना बंद करायला लावला आहे. हा कारखाना एका उद्योगपतीला फक्त पाच कोटींत विकला जाणार आहे. अन्सारीसाहेबांवर दहा कोटीचं तर कर्ज आहे. त्यांचं काय होईल, त्यांच्या कामगारांचं काय होईल, त्यांच्या कुटुंबाचं..” पिताश्री खूप अस्वस्थ होते. ते खूप भोळे होते. त्यांना स्वत:पेक्षा कामगारांची जास्त चिंता वाटत होती. तेही एक कामगारच आहेत, हे त्यांना कधीच पटत नव्हतं. एखाद्या चांगल्या पेपरात नोकरी मिळाली, तर आमच्या बऱ्याच अडचणी सुटू शकतील असं मला वाटत होतं. मात्र, चांगल्या पेपरात नोकरी मिळण्यासाठी वशिला असलेल्या चांगल्या माणसाची गरज होती आणि सगळी चांगली माणसं राजकारणात गेली होती. 

आम्ही उदभ्रांतसाठी पाहिलेली सारी स्वप्नं उद्ध्वस्त होत होती. त्यानं बीएस्सीनंतर आमच्या इच्छेविरोधात जाऊन एमएस्सी सोडून समाजशास्त्रात एमए करायचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय माझ्या मार्गावर येण्यासारखाच होता. त्याचा बराचसा वेळ बाबांबरोबर जायचा. बाबांच्या सहवासात राहून त्याला चित्रविचित्र पुस्तकं वाचायचं व्यसन लागलं होतं. माझ्या कविता करण्याच्या सुरूवातीच्या काळात मी जी काही पुस्तकं जमवली होती, त्यात मुक्तीबोध, धुमिल अशा कवींचीही पुस्तकं होती. त्यानं माझ्या लायब्ररीतली पुस्तकं वाचून कधी संपवली, ते कळलंच नाही. आजकाल तो मोठमोठी पुस्तकं वाचू लागला होता. ती पुस्तकं वाचताना पिताश्रींना फक्त प्रगती प्रकाशन, मॉस्को एवढंच कळायचं. एक तर माझ्याकडे तितका वेळही नव्हता आणि मला पिताश्रींएवढी काळजीही वाटत नव्हती. काहीही असलं, तरी घरखर्च भागतोय. सायन्स नाहीतर नाही, किमान आर्ट्समध्ये का होईना उदभ्रांतला अभ्यास करावासा वाटतोय. एकदा तर त्यानं मला एमए करण्यासाठी मी बाहेरून फॉर्म भरावा असं सांगितलं होतं. मी हसून त्याला नकार दिला. म्हटलं, “माझी सगळी स्वप्नं मी तुझ्यात पहातो.”

निळा रंग खूप धोकादायक आहे

आमचं सगळं शहर निळे झेंडे, निळ्या झालरी आणि निळ्या बॅनरांनी भरून टाकण्यात येत होतं. जिथं जायचो, तिथं हसत असलेला निळा रंग दिसायचा. निळ्या रंगानं किती लोकांचं आयुष्य घडतंय, किती घरांमध्ये चुली पेटतायत, या महान निळ्या रंगानं किती बेघरांना घर मिळालं हे पोस्टरवर दाखवून दिलं जात होतं. या निळ्या रंगाचा वाढदिवस येणार होता आणि ही एक खूप चांगली संधी होती. ही सगळी पोस्टरबाजी म्हणजे पैशाची उधळपट्टी आणि उगाचच दिखावा आहे, असं काही चांगल्या लोकांनी सांगितलं. 

पिताश्रींबरोबर सात वर्षं सोबत धरणं धरणाऱ्या कामगारांना धरणं धरण्याची अक्षरशः सवय झाली होती. त्यांच्यातल्या हुशार लोकांनी दुसरी नोकरी शोधली होती. मात्र, बहुतेक कामगार आशावादी होते. त्यांना वाटायचं की एखाद्या सकाळी कारखाना उघडलेला असेल आणि त्यांना मागच्या वर्षांचा पगार जोडून दिला जाईल. त्यांच्याकडे खूप पैसे येतील. आयुष्य पुन्हा मार्गी लागेल. मी आणि उदभ्रांत जसं जमिनीवर नकाशा काढून आपल्याला स्वतंत्र खोली मिळेल याचा विचार करत बसायचो, तसाच हा त्यांचा विचार होता. आम्हाला जशी स्वतंत्र खोली कधीच मिळाली नाही, तसंच कामगारांनाही काहीच मिळालं नाही. सारं शहर नवरीसारखं नटवलं जात असताना पिताश्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या कामगारांनी एक योजना आखली. राज्याच्या सर्वांत महत्त्वाच्या माणसाकडे आपलं दु:ख मांडावं आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला जबाबदार कोण, हे त्यांना विचारावं असं त्यांना वाटत होतं. राज्याच्या प्रमुखाला हत्तीवरून फिरायला खूप आवडायचं. त्याचा हत्ती एकदम शांत होता. तो कोणावरही सूड उगवायचा नाही. हत्तीविषयी काहीही जाणून घेण्यापूर्वी त्याचा थोडक्यात इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. राजांनी आपल्या पंडित- पुरोहितांच्या मदतीनं त्याला जबरदस्तीनं पाळीव करून टाकलं होतं. त्याच्यावर खूप अन्याय केला होता. त्यानंतर एका ऐतिहासिक आंदोलनामुळे हत्तीला त्याच्या क्षमतेची जाणीव झाली. या आंदोलनाने ज्यांना मागे ढकललं होतं, त्यांना पुढे येण्यासाठी मदत होईल, अशी काहीशी आशा निर्माण झाली. सर्वांनी हत्तीकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं. जेव्हा हत्तीला त्याच्या क्षमतेची जाणीव होऊ लागली आणि त्याने आपल्या लुटली गेलेली क्षमता परत मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राज्याच्या प्रमुखासारखे काही लोक त्याच्यावर स्वार होऊ लागले. आता हत्तीची सजावट आणि कृत्यही प्रमुखाच्या प्रयत्नांचा परिणाम होता. हत्ती आता आपल्या सजावटीच्या बाहेर येण्यासाठी तडफडत रहायचा. प्रमुखाचा असा प्रयत्न होता की हत्तीला त्याच्या फालतू इतिहासाची आठवण तेव्हाच यावी, जेव्हा लोकांच्या संवेदना जाग्या करून त्यांच्याकडून शिक्का मारून घ्यायचा असेल किंवा एखादं बटण दाबायचं असेल.. पिताश्रींसारख्या काही लोकांच्या हत्तीकडून अपेक्षा होत्या. मात्र, त्या प्रमुखामुळे सगळं निष्फळ होतंय असं वाटायचं. हत्तीचे दोन दात बाहेर होते. ते खूप सुंदर होते. ते दात दगडी होते. एखाद्या जवाहिऱ्याला विचारल्यावर त्यानं नक्कीच सांगितलं असतं की  या दगडांमधून कितीतरी हॉस्पिटल्स किंवा शाळा बांधता येतील, कितीतरी गावांना कित्येक दिवसांचं जेवण मिळू शकेल, एवढे महाग दगड आहेत. आतल्या दातांचा उपयोग खाण्यासाठी केला जायचा आणि पैशांनी खरेदी होऊ शकणारी खाण्याची प्रत्येक गोष्ट हत्तीला आवडायची. गोष्टी सरळ दिसत नाहीत, उदाहरणार्थ संवेदना, भावना, असहायपणा, तुटणं, संपून जाणं अशांमध्ये हत्तीला काहीही रस नव्हता. हत्ती शक्तीमान होता आणि त्याला हे माहीत होतं, म्हणूनच तो कधी कोणाही समोर सोंड उंचावायचा नाही. विनम्र म्हणणं त्याला आवडायचं. त्याला आपल्या शिस्तप्रिय प्रतिमेची काळजी होती. हत्तीच्या पाठीवर विकासाची अंबारी ठेवली जायची. ती नेहमीच रिकामी असायची. मात्र, त्याच्या वजनानं स्वतःला नेहमी दबलेला असल्याचं दाखवणं त्याला आवडायचं. हत्ती कधीकधी चेष्टेच्या मूडमध्येही असायचा. तो चांगल्या मूडमध्ये असताना तो आपल्याला खाली पाडेल याची माहुताला कधी चिंता वाटायची नाही. हत्तीचे माहुत कायम बदलत असायचे. माहुतांचा जीव कायम मुठीत असायचा. कारण माहीत होतं की हत्तीचा मूड चांगला असतो, तेव्हाच तो पाठीवर बसू देतो. नाहीतर, त्यांच्यापैकी एकातही हत्तीच्या शेपटाला हात लावण्याची हिंमत नव्हती. जनतेच्या पैशातून हत्ती आणण्यात आला होता. त्याचं खाणं आणि बाकी गरजेच्या वस्तूही जनतेच्याच पैशातून यायच्या. कदाचित ही गोष्ट हत्तीला माहीत नव्हती. या सगळ्यावर फक्त आणि फक्त त्याचाच अधिकार आहे, असं त्याला सांगण्यात आलं होतं बहुधा. तो आपल्या भविष्याच्या दृष्टीनं चांगली बचत करत होता. त्याचवेळी आपल्या प्रसिद्धीबाबतही त्याला काळजी वाटायची. त्यासाठी तो काहीही करायचा. त्या दरम्यान चेष्टेचा मूड असताना न्याय देण्यासाठी निर्माण केलेल्या संस्थांची खिल्ली उडवायलाही तो कमी करायचा नाही. 

मी एका पेपरात गुपचूप नोकरीसंदर्भात बोललो होतो. एका चांगल्या पेपरातून मला आश्वासनही मिळालं होतं. मी नीलूच्या घरी पोहोचल्यावर काकूंनी माझ्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. मी सावकाश थकलेल्या पावलांनी वर पोहोचलो, तर नीलू आकाशाकडे पहात होती. तिचे डोळे रिते होते आणि तिनं निळा पंजाबी ड्रेस घातला होता. मी आकाशाकडे पाहिलं नाही. का कोण जाणे, मला खूप अस्वस्थ आणि रिकामं असल्यासारखं वाटत होतं. अगदी नीलूच्या डोळ्यांसारखंच.. ती शांतता तिथल्या हवेत विरघळत होती आणि वातावरण उदासवाणं झालं होतं. ती गच्चीतल्या सेटटॉप बॉक्सकडे एकटक पहात होती आणि मला आठवलं, आमच्या घरी सेटटॉप बॉक्स नाहीये. माझ्या घरी फ्रीज नाही आणि वॉशिंग मशीनही.. मी भाड्याच्या घरात राहतो. या क्षणी या सगळ्याला  काहीही अर्थ नाहीये, हे मला माहीत आहे. मला त्वरित जाऊन नीलूच्या उदास होण्याचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, माझ्या आयुष्यात आलेला उदास क्षण जेव्हा अधिक कठीण करणारा असतो, त्याचवेळी माझ्या प्रत्येक उदास क्षणाची तुलना होते. का कोण जाणे, मला असं वाटतंय की माझ्या मनात नीलूच्या घराला पाहून जे प्रश्न येत होते, ते काहीवेळात माझ्यासमोर येणार आहेत.  मी नीलूच्या एकदम जवळ जाऊन उभा राहीपर्यंत तिनं मला पाहिलं नव्हतं.
  
“अरे साहेब, कधी आलास?” तिच्या आवाजात असलेला तुटकपणा या पूर्वी पिताश्रींचा आवाज वगळता बाकी कोणाच्याही आवाजात ऐकला नव्हता. जणू काही मी ताजमहाल बांधलाय आणि त्याचा निर्माता म्हणून मला हाक मारली जातेय, असा काहीसा सूर तिच्या ‘साहेब’ म्हणण्यात होता. तिच्या आवाजात एकप्रकारचा तुटकपणा आणि विखुरलेपणा होता. त्याचे तुकडे टोकदारपणे बाहेर आले होते आणि मला टोचत होते. एक तुकडा तर माझ्या डोळ्याला असा काही टोचला की माझ्या डोळ्यातून पाणी आलं. माझी धडधड वाढत होती. मी फारवेळ उभा राहू शकणार नाही असं मला वाटत होतं. तिनं माझा पगार विचारला आणि उदास झाली. मी आकाशाचा रंग पाहिला आणि उदास झालो. चंद्रानं आम्हा दोघांचे चेहरे पाहिले आणि तोही उदास झाला. 

मुलानं नीलूला पाहून होकार दिला होता. दोन कुटुंब एकत्र येण्याची तयारी सुरू झाली होती. नीलूनं माझा पगार विचारला आणि भरून आलेल्या आवाजात मला म्हणाली, “तू १९९०च्या पगारात किती आणि कधीपर्यंत काम करणार आहेस” आणि बोटं मोडू लागली. “बोटं मोडल्यानं गाठी मोठ्या होतात,” मी तिला सांगितलं. 

ती म्हणाली, “तू काहीही प्रयत्न करत नाहीयेस आणि नशीबवान माणूस आहेस.”

“मी एका मोठ्या पेपरात भेटून आलोय, नोकरीची बोलणी चालू आहेत, त्या मॅगझिनमधल्या मूर्ख म्हाताऱ्यांपासून माझी सुटका होईल.”

मी नीलूच्या जवळच बसलो होतो. तिनं हळूवारपणे माझा हात  तिच्या हातात घेतला. 

“आपल्या येण्यापूर्वीही हे जग असंच चालत होतं, खरं ना..” तिच्या आवाजातल्या विचित्रपणाला ओळखण्याचा प्रयत्न करत मी तिला सहमती दर्शवली.

“आपण गेल्यानंतरही सारं काही असंच सुरू राहील ना?” तिनं विचारत पहिल्यांदा आकाशाकडे पाहिलं. ढग किंवा धुक्यानं आकाश काळसर दिसत होतं. असं वाटत होतं की काही क्षणात भूकंप होईल. 

“हो, कदाचित..”

“मला नाही पटत साहेब.”

“काय?”

“..की आपण आजूबाजूच्या जगाला एवढं सुंदर केलं आहे, आपल्या वाट्याच्या आकाशाला, जमिनीला, वाऱ्याला, आपल्या छोट्याशा दुनियेला आणि सगळं असंच सोडून गेल्यावर कोणाला काही फरकच पडणार नाही. किती स्वार्थी वातावरण आहेना आपल्या आसपास?”

प्रश्न : माझं एका मुलीवर प्रेम आहे. ती मुलगीही माझ्यावर प्रेम करते. मात्र, आम्ही एकमेकांच्या योग्यतेचे नाही. मी खूप गरीब घरचा आहे आणि ती श्रीमंत आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही; पण तिच्या घरचे आमच्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. मी काय करू?
उत्तर : तुम्ही दोघं भलेही एकमेकांवर प्रेम करत असाल, पण लग्न हा खूप मोठा निर्णय असतो. तुम्हाला तुमच्या बाकी गोष्टीही बघितल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, लग्नानंतर बायकोचे सर्व खर्च करणं तुम्हाला परवडणार आहे का.. कारण, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, तिला दुःखी नाही करू शकत. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचाही विचार करावा लागेल. फक्त स्वतःच्या आनंदासाठी स्वार्थी विचार करून चालणार नाही.

मी गप्प बसलो. नीलूला सांगण्यासाठी माझ्यापाशी काहीच नव्हतं. काही चांगल्या कविता शिल्लक होत्या आणि एक म्हणजे माझं वय, ते मला तिला द्यायचं नव्हतं. तिला नक्कीच त्यापेक्षा जास्त काहीतरी मिळायला हवं होतं, खूपच जास्त. माझी मिठी बरीच लहान होती आणि नशीब फार वाईट.. त्यामुळे एखादी गोष्ट कवेत घेण्यासाठी हात कितीही लांब केले, तरी माझ्या कवेत नेहमी कमीच पडायचं. 

“लग्नाची तारीख ठरली का,” असं मी विचारलं. त्यावर ती म्हणाली की जगातल्या सगळ्या लोकांना एकावर एक असं उभं केलं, तरी ते चंद्रावर पोहोचू शकणार नाहीत. चंद्र खूप दूर आहे. मी तिला तिच्या तब्येतीविषयी विचारलं आणि तिनं माझ्या कुटुंबाविषयी विचारलं. आम्ही चार गोष्टी बोललो. तीनवेळा एकमेकांच्या हातांवरून हात फिरवला. दोन वेळा रडलो आणि एकदा हसलो. तिच्या थरथरत्या ओठाचं मी एकदाही चुंबन नाही घेतलं. कदाचित तेच माझं पाप होतं. कारण, खाली येताच माझा विपरित काळ सुरू झाला. सगळ्यांची नजर चुकवून मी तिथून जाऊ शकेन, असं मला वाटत होतं. काका हॉलमध्ये बसून पेपर वाचत होते. काकू स्वेटर विणत होत्या. साधारणपणे रात्रीच्या वेळी न केली जाणारी कामं ते दोघं करत होते. नीलूच्या डोळ्यांबरोबरच तिच्या ओठांचंही चुंबन घ्यायला हवं होतं, असं मला वाटलं. तिच्या डोळ्यांच्या आणि ओठांच्या आमंत्रणाकडे मी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. कारण, त्या क्षणी मी नीलूबरोबर दुसरं काहीच करू शकत नव्हतो. तिची उपेक्षा करण्याचा माझ्याकडे एवढा एकच पर्याय होता. माझ्या मनातल्या मतलबी आणि नीच जनावरानं हळू आवाजात सांगितलं की नीलूनं लग्नाला विरोध का नाही केला.. बॉल तुझ्या कोर्टात कशाल.. का तुझी सामाजिक स्थिती तिच्यासाठीही.. 

“हद्दी, जरा इकडे ये..” काकांनी बोलावल्यावर माझ्या लक्षात आलं की आवाज त्यांचा होता. मात्र, ते जे काही सांगणार होते, त्याची भाषा आणि रणनीती काकूंची होती. माझ्या नावाची काका आणि कॉलनीतल्या त्यांच्यासारख्या काहींनी वाट लावली होती. माझ्या खऱ्या नावानं मला कधीच हाक मारायचे नाहीत. आपल्याला आपल्या नावावर दावाही करता येत नाही, असं नाव ठेवून काय उपयोग.. मी गपचूप ऐकून घ्यायचो. मात्र उदभ्रांत त्याच्या नावाची वाट लावणाऱ्यांशी भांडायचा. 
“हे बघ, नीलूचं लग्न ठरलंय. तू तिचा जवळचा मित्र आहेस. तूच तिला समजावून सांग की लग्नाला नकार देऊ नकोस.. राजी हो.. लग्न करून कोणाच्या करिअरमध्ये अजिबात अडथळा येत नाही. तू सांगितलंस, तर ती ऐकेल. तिच्याशी बोल जरा. तिला समजावण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि बाजारातून काही गोष्टी आणाव्या लागणार आहेत. तू तर दिवसभर ऑफिसात असतोस.. पण उद्या दिवसभरात कधीतरी उद्दीला यायला सांग जरा.. काकूला थोडी मदत करेल तो.. तुला तर माहितेय, मला ऑफिसमधून सुट्टी मिळणं किती..” काका बराच वेळ बोलत राहिले. मी उभा राहून टीव्ही पहात होतो. टीव्हीवरच्या बातम्यांत सांगत होते की शहरात सजावटीवर किती कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि निळा रंग शहरासाठी किती आवश्यक आहे. काकांचं बोलणं मला टोचू लागलं म्हणून मी टीव्हीकडे पाहणं टाळलं. टीव्हीवर जे सांगत होते, तेही टोचत होतं. अखेरीस मी तेही अर्धवट टाकून निघून आलो.  

प्रश्न : माझं कुटुंब मागासलेलं आहे. माझे वडील एके ठिकाणी शिपाई आहेत आणि आई भांडी घासण्याचं काम करते. मोठ्या मुश्किलीनं ते माझ्या शिक्षणाचा खर्च करतात. पण, हल्ली माझं अभ्यासात लक्षच लागत नाही. माझ्या कॉलनीतले काही लोक माझ्या हुशारीचा संबंध माझ्या जातीशी जोडतात आणि काहीही करण्याचा माझा उत्साक एकाएकी संपून जातो. माझ्या कॉलनीतले लोक माझ्या नावाची वाट लावून मला हाक मारतात. एखाद्या संघटनेत सहभागी व्हावं, असं मला वाटू लागलं आहे. माझ्यासमोरच माझ्या वडिलांचा अपमान केला जातो आणि मी काहीच करू शकत नाही. मी काय करू?
उत्तर : तुम्ही हवंतर एखाद्या संघटनेत सहभागी होऊ शकता. पण त्यानं तुमचा त्रास कमी होणार नाही. तुमच्या वडिलांचा अपमान करणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे आणि एखाद्या संघटनेद्वारे त्यांना उत्तर देण्याचं तुमचं वयही नाही. अभ्यास, शिक्षण हेच तुमच्या हातात असलेलं एकमेव शस्त्र आहे. खूप शिका आणि अशा मोठ्या जागी पोहोचा की तुमची चेष्टा करणारे लोकही तुमच्याबरोबर मैत्री करण्यासाठी धडपडू लागतील. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा आणि त्याला एका शस्त्रासारखं वापरा. 

उदभ्रांतनं मला विचारलं, “नीलू तुला आवडत नाही का?”

मी सांगितलं, “नीलू माझी चांगली मैत्रीण आहे.”

तर तो जोरानं हसू लागला. तो या पूर्वी कधीच माझ्याशी अशा भाषेत बोलला नव्हता. मग त्यानं मला विचारलं की तिचा हात हातात घेताना मला कधी असं वाटलं होतं की जग तिच्या हातासारखंच गरम आणि सुंदर व्हायला हवं. मी त्याला म्हणालो की जेव्हा जेव्हा मी तिचा हात हातात घेतलाय, तेव्हा दर वेळी मला असं वाटतं. मग मी त्याला समजावलं की नीलू माझी फक्त आणि फक्त चांगली मैत्रीण आहे. माझी इच्छा आहे की तिचं लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी व्हावं. त्यानं सांगितलं की मी पुन्हा कविता लिहिणं सुरू करावं. कारण मरायचंच असेल, तर कविता लिहित मरण्याशिवाय दुसरं काही चांगलं असू शकत नाही. मी निराश होत त्याला म्हणालो की या जगात आम्ही जगण्यासारखं काहीच नाहीये. तर तो म्हणाला की आमच्याकडे तलवार नसली तरी धार आहे. मी त्याला विचारलं की कॉलेजला जाण्यासाठी सायकल हवी का.. त्यावर तो म्हणाला की कॉलेजला जाण्यासाठी ना त्याला सायकलची गरज आहे ना नोकरी मिळवण्यासाठी हत्तीची.. त्याची ती तुलना मला जरा विचित्र आणि अनाकलनीय वाटली. उद्भ्रांत हल्ली नशापाणी करू लागल्याच्या पिताश्रींचा बोलण्यावर विश्वास बसू लागला. सायकल आणि हत्तीची तुलना अयोग्य आहे, असं मी त्याला सांगितलं. त्यानं लॉर्ड अॅक्टन नावाच्या त्याच्या कोण्या शिक्षकाचं नाव घेऊन काही गोष्टी सांगितल्या आणि म्हणाला की मी भोळा आहे. जे समोर दिसतंय, त्यावर तात्पुरता निकाल देतोय. खरंतर सायकल आणि हत्तीमध्ये फरक नसतो. जगातल्या कुठल्याही फूल आणि शरीराच्या  अवयवात फरक नसतो. महत्त्वाचा असतो, तो रस्ता.. कारण सायकल आणि हत्ती त्यावरूनच जातात. चांगल्या रस्त्यावरून हत्ती मस्त झुलत झुलत जातो, सायकल त्यापेक्षा काही कमी धोकादायक नाही. मी त्याला म्हणालो की तू हत्तीबद्दल अपमानास्पद बोलतोयस.. हत्ती जर इथेच कुठे फिरत असेल, तर याचे काय परिणाम होतील, याची तुला कल्पना नाही. तो हसू लागला. त्यानं डावा डोळा बारीक करून सांगितलं की सध्या हत्ती शहरात नाहीये. तो शेताकडे निघून गेलाय. मला आश्चर्य वाटलं. शेताकडे का?

आम्हाला पुस्तकांतून शिकवली जाणारी एक गोष्ट शिकणं आम्हाला अजिबात चांगलं वाटत नाही. भारत खेड्यांचा देश आहे किंवा भारत हा कृषीप्रधान देश आहे अशा ओळींतून आपल्या देशाची गरिबी आणि वाईट परिस्थितीचा अंदाज येतो. शेती आणि शेतकरी या वाईट गोष्टी आहेत. ते घाणेरडेच राहतात, अशानं सौंदर्यबोधाला धक्का लागतो. ज्यांच्याकडे पैशाची कमी नाही, ज्यांना आपला देश मोठमोठ्या इमारती आणि झळाळणाऱ्या बाजारानं एकदम चकचकीत करून टाकायचा आहे, त्या लोकांनी हत्तीकडे आपल्या देशातली गरिबी हटवण्याची प्रार्थना केली आहे. हत्ती छान नटून, आपल्या दातांना हिरव्या पानांनी सजवून आणि या दयाळू लोकांनी दिलेलं मोत्यांचं जाजम पाठीवर घालून शेताकडे निघाला आहे. तो ज्या शेतांतून जाईल, त्यांच नशीब बदलणार आहे. तिथं शेतीसारखं मागासलेलं काम थांबवून मोठमोठाल्या बिल्डिंग, रस्ते तयार होतील. तिथून श्रीमंत दयाळू लोकांच्या मोठमोठ्या गाड्या जातील.

पिताश्री कायम सांगायचे,  तसं उदभ्रांतचं डोकं जास्त पुस्तकं वाचून आणि वाईट संगतीत राहून नशा करण्यामुळे फिरलं आहे हे मला कळून चुकलं. “आजकाल तू असतोस कुठे आणि रात्र-रात्र गायब होतोस.. कोणाबरोबर आहेस आणि चांगलं शिकायच्या वयात काय चाललंय तुझं,” असा मी त्याला टोमणा मारून जमिनीवर आणायचा प्रयत्न केला. त्यावर तो जोरानं हसला आणि एक कविता वाचू लागला. कवितेत तो कोणाच्या तरी डोळ्यांना वेदनांचा समुद्र असल्याचं सांगत होता.

मी त्याला हळूच सांगितलं, या वयात कविता वाचू नको. त्यावर तो म्हणाला, “या वयात कवितेची जी नशा अनुभवायला मिऴते, त्या पुढे जगातल्या कुठल्याच नशेला किंमत नाही.” तो उठून उभा राहिला. “मी नीलूला कोर्टात घेऊन जाऊन लग्न करायला हवं. कारण, आकाशापर्यंत शिडी लावण्यासाठी एक पुरूषार्थाच्या आणि एका स्त्रीच्या हातांची गरज असते,” असं तो म्हणाला. पिताश्री मोठी स्वप्नं आणि आपल्यासोबत काही सुशिक्षित समजूतदार कामगारांना घेऊन निघाले होते. बऱ्याच कामगारांना असं वाटत होतं की राज्याच्या प्रमुखाकडे गेल्यावर त्यांचे प्रश्न सुटतील. कारण, त्यांचे लोक किती अडचणींच्या खाईत लोटले गेले आहेत हे त्यांना कदाचित माहीत नसेल. त्यांनी आपल्या मागण्यांचे फलक हातात घेतले होते. त्यावर काही आक्रोश व्यक्त करणाऱ्या ओळी सुशिक्षित कामगारांनी लिहिल्या होत्या. काही फलकांवर उदभ्रांतने कविता लिहिल्या होत्या. पिताश्री बऱ्याच काळानंतर उदभ्रांतच्या कुठल्या तरी कामावर समाधानी होते.

ते लोक एका गल्लीतून जाऊन मुख्य रस्त्यावर पोहोचले. तेव्हा तिथं एका राजकीय पक्षाचे फलक घेऊन घोषणा देत जात होते. त्यांनी लाल टोप्या घातल्या होत्या. ते सगळं टीव्हीचे काही लोक रेकॉर्ड करत होते. टीव्हीवाल्यांचा कॅमेरा जिकडे फिरायचा, तेव्हा काही लोक जोशात ओरडून घोषणा द्यायचे. पिताश्री त्यांच्यापासून जरा लांबच राहिले. ते लोक मुख्य रस्त्यावर आले, तेव्हा तिथं भरपूर पोलिस होते. हे सगळं वातावरण पाहून काही कामगारांचेही हात-पाय शिवशिवू लागले. त्यांच्यातही उत्साह संचारला. पिताश्रींनी सगळ्या कामगारांना समजावलं की कोणताही गैरप्रकार आणि हिंसा त्यांच्याकडून होता कामा नये. मात्र, काही कामगाराचं म्हणणं होतं की आज ते त्यांचे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि कोणालाही घाबरणार नाहीत. एक पोलिस अधिकारी पिताश्रींजवळ आला. ‘काय अडचण आहे,’ त्यानं शांतपणे विचारलं.  वडिलांनी त्याला ‘काही प्रश्न विचारायचे आहेत,’ असं सांगितलं. मग तो अधिकारी त्या पक्षाच्या प्रमुखाकडे गेला. त्यानंही सांगितलं की त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. दोन्ही लोकांशी बोलल्यावर तो अधिकारी मागे गेला आणि भाषण देत असल्यासारखं दोन्ही हात वर करून दोन्ही बाजूच्या लोकांना शांततेनं आपापल्या जागी परत जाण्याचा सल्ला दिला. तो सांगत होता की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं एक-दोन दिवसांत कुरिअरनं त्यांच्या घरी पाठवली जातील किंवा पुढच्या आठवड्यात एखाद्या पेपरमध्ये छापली जातील. दोन्ही बाजूचे लोक उभे राहिले. अधिकाऱ्यानं सर्वांना परत जाण्याचं पुन्हा एकदा आवाहन करत  ‘लाठीचार्ज करायला लावू नका’ असं सांगितलं. मग एका हवालदारानं येऊन हळूच त्याच्या कानात सांगितलं की लाठीचार्ज आणि गोळीबारासारख्या घटना होऊन चालणार नाहीत. कारण, बरेच पैसे खर्च करून स्वच्छ केलेल्या रस्त्यावर रक्ताचे डाग उमटलेले हत्तीला अजिबातच चालणार नाहीत. अधिकारी हसून म्हणाला, ‘मूर्खा, म्हणूनच तू हवालदार आहेस आणि मी अधिकारी आहे. हे लोक जर माघारी गेले नाहीत, तर त्यांच्यावर अशा पद्धतीनं लाठीचार्ज केला जाईल की रक्ताचा एक थेंबही सांडणार नाही आणि ते कधी उठूही शकणार नाहीत. राजकीय पक्षाच्या त्या लोकांवर लाठीचार्ज करून त्याला स्वतःचा फोटो चमकवण्याची आणि प्रमोशन करून घेण्याची संधी मिळेल, असंही त्यानं सांगितलं. पिताश्री आणि काही कामगार तिथंच जमिनीवर बसले. आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांततेत इथं बसून राहू, असं पिताश्रींचं म्हणणं होतं. इकडे पोलिस अजून लाठीचार्ज का करत नाही, याची त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काळजी वाटत होती. अखेर मार खाण्यासाठी आपल्या फोटोग्राफर मित्राला घेऊन आलेल्या एका तरूण कार्यकर्त्यांनं पोलिसांच्या दिशेनं एक मोठा दगड फेकला. तो दगड एका हवालदाराच्या डोळ्याला लागला आणि त्याचा डोळा फुटला. त्या हवालदारानं एका डोळ्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे पाहिलं आणि त्याला जाणीव झाली की लाठीचार्ज किंवा फायर बोलणं ही किती मोठी गोष्ट आहे. इतक्यात दुसरा दगड आला. पोलिस लाठीचार्ज का करत नाही याची काळजी करणाऱ्या दुसऱ्या एका कार्यकर्त्यानं हा दगड फेकला होता. एका मागोमाग एक असे चार-पाच दगड पोलिसांवर आल्यानं अधिकाऱ्याला लाठीचार्जचा आदेश द्यावा लागला.

गोंधळ झाला आणि सैरावैरा पळू लागलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तिथं जवळच बसलेल्या पिताश्री आणि कामगारांवर पडू लागले. त्यांनी उठायचा प्रयत्न केला, तर कोणी धक्का देऊन पळून जायचं. पोलिसांची टीम राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पळवत पिताश्रींच्या जवळ आली. जो समोर दिसला, त्याच्यावर लाठीहल्ला सुरू झाला. रस्त्यावर खरंच एक थेंबही रक्त सांडलं नाही आणि संपूर्ण सजावट जशीच्या तशी राहिली. पत्रकार आणि कॅमेरावाल्यांनी हाडं तुटलेल्यांचे फोटो काढले. मग रस्त्यावरच्या चमकणाऱ्या नियॉन लाईट्सच्या साईनएजेसचे फोटो काढू लागले. त्यावर एका खास मुहुर्तावर गरिबांसाठी जाहीर केलेल्या खूप साऱ्या योजनांची घोषणा केली होती.

गंभीररित्या जखमी झालेल्या, हाडं मोडलेल्या त्या तिघांमध्ये पिताश्रीही होते. तुमच्याबरोबरच तुमच्या दोन्ही साथीदारांचीही दोन-तीन हाडं मोडलीयेत, हे डॉक्टरांनी सांगेपर्यंत त्यांना चैन पडत नव्हतं. ते कळल्यावर मात्र पिताश्री निश्चिंत झाले. कारण, आपल्या साथीदारांनी आपला विश्वासघात केला नाही याची त्यांना खात्री पटली. पिताश्रींचे बरेच मित्र त्यांची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. अन्सारीसाहेबही चौकशी करून गेले. एके दिवशी पोलिस इन्स्पेक्टरही आला आणि बराच वेळ पिताश्रींच्या बाजूला बसून काहीतरी लिहित होता. त्यानं पिताश्रींना त्यांचं पुढचं, मागचं सगळं रेकॉर्ड विचारलं. घर-कुटुंब, बायको-पोरं, खाणं-पिणं असं सगळं विचारलं आणि जाताना सरकारविरोधासारखं देशद्रोही काम करू नका, असा सल्लाही दिला. मग वडिलांनी आपली नजर दुसरीकडे वळवली. त्यावर तो म्हणाला, ‘काही विपरित घडलं, तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल.’

 उत्तर प्रदेशमध्ये प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन पिताश्री बारा दिवसांनी घरी आले होते. प्लॅस्टर घातलं होतं, पूर्ण बेडरेस्ट सांगितली होती. एखाद्या सकाळी त्यांचा मूड खूप चांगला असायचा. ते आम्हा भावांना बोलावून मिलच्या जुन्या गोष्टी  सांगायचे. आईचा स्वयंपाक झाल्यावर जेवायला वाढण्यापूर्वी ते तिला बोलवायचे. त्यांच्या लग्नाच्या वेळचा एखादा किस्सा आठवून सांगायचे. आम्ही त्यावर खूप हसायचो आणि आई लाजायची. असंच एके दिवशी पेपर वाचताना पुढच्या आठवड्यात एक चांगली फिल्म येणार आहे ती बघायला जाऊ आणि ती टॅक्स फ्री होण्याची वाट नाही पहायची असं सांगितलं. आईनं विचारलं की फिल्म चांगली आहे हे तुम्हाला कसं माहीत, तर ज्या फिल्मचं नावच डान्स पे चान्स आहे, ती फिल्म चांगलीच असेल, असं त्यांनी सांगितलं. आताच्या नव्या नट-नटींना ओळखत नसल्यानं मजा येणार नाही असं आईनं सांगितलं. ‘तू नखरे केलेस, तर तुला उचलून फिल्मला घेऊन जाईन,’ असं पिताश्रींनी तिला सांगितलं. हे सांगितल्यावर काहीसं निराश होऊन पुन्हा सरकारी जाहिराती वाचू लागले. ज्या दिवशी ते उदास, निराश असायचे, त्या दिवशी ते कुणाशीच धड बोलायचेही नाही. मिल आणि कामगारांबद्दल काही ना काहीतरी बडबडत बसायचे. त्यांना सतत चिंता वाटायची. त्यांच्या उदास असण्याचा या घरावर काहीही फरक पडता कामा नये. दोन्ही मुलं सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम पार  पाडू शकतात, असं त्यांनी एके दिवशी सांगितलं. आई पदराचं टोक तोंडात घेऊन रडू लागल्यावर ते म्हणाले, ‘माझी पोरं म्हणजे वाघ आहेत. ते असताना तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. माझी पोरं माझ्यासारखीच कर्तबगार आहेत.’ हे बोलल्यावर ते पुन्हा निराश झाले आणि पेपरातलं साप्ताहिक राशीभविष्य वाचू लागले. घरच्या या असल्या वातावरणानं मला वैताग यायचा. सुट्टीच्या दिवशीही मी ऑफिसला जायचो. मात्र, तिथं घरच्यापेक्षा जास्त त्रास व्हायचा.

ऑफिसातल्यांच्या उद्धटपणानं माझं डोकं फिरायचं. बॉसनंच गावंढळपणा केल्यावर बाकीच्यांची तक्रार तरी कुणाकडे करायची? त्या दिवशी मी ऑफिसमध्ये पोहोचताच दादा आणि दीनजी यांचा बावळटपणा सुरू झाला. दीनजीचा प्रश्न अत्यंत नालायक होता. त्यावर दादांचा प्रश्न असा होता की दीनजींनी त्यांच्या नात्यातल्या एका बहिणीबरोबर सेक्स करण्याच्या त्यांच्या इच्छेबाबत माझ्याकडे सल्ला मागितला, तर मी काय सांगू? माझं तर डोकंच सटकलं. मी त्यांना काही विचारलंही नव्हतं. तरीही दीनजी सांगू लागले की जगात अशा संबंधांचं प्रमाण वाढू लागतं आहे. लोक त्यांची विफलता न घाबरता बाहेर काढत आहेत. या संबंधांबाबत मी आणि दादानी आश्चर्य व्यक्त केलं, तर ते आमच्यावर जवळपास ओरडलेच. या संबंधाना इनसेस्ट सेक्स म्हणतात आणि जगात सगळीकडे हे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत असंही सांगितलं. दादांना हे मान्य नव्हतं. कुटुंबात असे संबंध असणं योग्य नाही. जर दोन कुटुंबांनी आपापसांत काही बदल करून केलं, तर चालू शकतं. पिताश्रींचा पाय आणि कोपऱ्याचं फ्रॅक्चर मला आमच्या ऑफिसातही वेगवेगळ्या लोकांमध्ये दिसू लागलं. त्या दिवशी मी लंचला गेलो नाही. मला दोन वेळा विचारून दादा हसत निघून गेले.  सगळेजण लंचला गेल्यावर मी दादांच्या ड्रॉवरमधून एक मोठं स्केचपेन काढलं. 

लंचहून परतल्यावर ते लोक वेगळ्या पद्धतीनं हसू लागले. मला गांभीर्यानं घेणं म्हणजे त्यांच्यासाठी अपमानास्पद असेल, याची मला कल्पना होती. दादा बॉसच्या केबिनमध्ये गेले. थोड्याच वेळात मला क्रांतीकारीकडून बोलावणं आलं. 

“हां, सर..” आत जाऊन मी शिपायासारखा चेहरा करून उभा राहिलो. 

“काय झालं रे, तुला काही अडचण..” त्यानं हसत-हसत विचारलं. त्याच्या एका बाजूला दादा आणि दुसऱ्या बाजूला दीनजी उभे होते. 

“नाही, काहीच नाही..” मी विषय संपवण्याचा प्रयत्न केला. 

“उत्तर प्रदेशमध्ये प्रश्नांची उत्तरं दिली जात नाही, असं तू तुझ्या खिडकीवर लिहिल्याचं ऐकतोय मी..” तो अजूनही हसतच होता. 

“नाही नाही.. उत्तर दिलं जात नाही एवढंच मी लिहिलं. उत्तर प्रदेश तर आधीच लिहिलेलं होतं.”

माझ्या उत्तरावर ते तिघंही हसू लागले. त्याचं ते सामूहिक हास्य माझ्यासाठी सामूहिक बलात्कारासमान होतं. ते त्यांच्याजागी योग्यच होते. कारण, ते मला पगार देत होते. या हिशेबानं माझ्या जिवंत असण्याचं श्रेय त्यांनाच होतं. 

“उत्तर प्रदेशमध्ये प्रश्नांची उत्तरं नको देऊ एक वेळ, पण आम्हाला उत्तरं हवी असतील, तेव्हा आम्ही तुला इथं बोलावू. काय दादा, बरोबर ना?,” दादांनी हसतच सहमती दर्शवली. बघता-बघता १०० टक्के मतदानाच्या जोरावर ठराव मंजूर झाला. 

मन मारून मी तिथून निघालो आणि माझ्या जागेवर येऊन बसलो. मला अजिबातच काम करावंसं वाटत नव्हतं. इतक्यातच शिपायानं येऊन सांगितलं की कोणीतरी मुलगी मला भेटायला आली आहे. काहीही विचार न करता मी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. कारण, एखाद्या मुलीनं मला भेटायला येणं म्हणजे ऑफिसातल्या माकडांच्या हाती कोलीत मिळाल्यासारखंच झालं असतं. कोणीतरी सेल्सगर्ल वगैरे असेल, असा विचार करत मी बाहेर गेलो, तर ती नीलू होती. 

“थोडा वेळ माझ्याबरोबर बाहेर येशील, साहेब?”

तिच्या त्या प्रश्नात विचारण्यापेक्षा आज्ञाच जास्त होती. कोणी माझी चौकशी केली, तर मी जेवायला गेलोय म्हणून सांग, असं मी शिपायाला सांगायला सांगितलं. ऑफिसमध्ये भग्गू शिपाई माझा विश्वासू माणूस होता. ऑफिसातल्या त्या माकडांचा त्याला भयंकर राग यायचा. 

मी आणि नीलू शहरातल्या प्रसिद्ध बागेत गेलो. तिथं गेल्यावर नीलू लॉनवर आडवी झाली. शहरात बागा आणि पुतळे खूप होते. मात्र, काम आणि भाकरीची उणीव होती. तिनं लाल रंगाची सलवार घातली होती.

“साहेब, हल्ली तू घरी येत नाहीस..” तिनं माझ्याकडे पहात विचारलं.  

तुझ्या आईनं मनाई केलीय नीलू, मला खरंच सांगायची इच्छा नव्हती. तरीही मी सांगितलं. 

“बरं.. माझ्या आईचं सगळं ऐकतोस तर तू..” ती माझ्याकडे पाहून हसल्यावर मी तोंड वळवून दुसरीकडे पाहू लागलो. एका जोडप्याची मस्ती सुरू होती.

“तिला तुझं भलं व्हावं असं वाटतं नीलू,” माझा आवाजही फुटत नव्हता. 

“पण मला माझं भलं व्हायला नकोय,” ती म्हणाली. “आयुष्य मला गणितासारखं नाही जगायचंय साहेब. मला माझ्या पद्धतीनं जगायचंय. भलेही ते चुकीचं असलं तरी चालेल. फक्त प्रेमानं पोट भरत नाही आणि मी तुला विसरून जावं, असं त्यांनी मला सांगितलं. पण मला वाटतं की प्रेमानं पोट भरतं,” ती खूप वेगळीच दिसत होती. मी तिच्याकडे एकटक पहात होतो.  

“लाल रंगात तू जरा जास्तच छान दिसतेयस,” मी तिच्याकडे नीट पहात सांगितलं. 

“तुला काय वाटतं,” तिनं विचारलं. 

“कशाविषयी? लाल रंगही तुला छान दिसतो.. पण”

“लाल रंग नाही रे.. प्रेमाबद्दल.. प्रेमानं पोट भरतं का?” हजार चिमण्यांसारखा चिवचिवाट तिच्या आवाजात आणि हजार दिव्यांसारखे तिचे डोळे टिमटिमत होते. 

“माहीत नाही.. मला नाही वाटत की प्रेमानं..” माझं बोलणं अर्धवटच राहिलं. कारण, तोवर नीलू उठून माझ्या छातीवर आली होती. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. आमचे श्वास एकमेकांमध्ये गुंतले होते. मी पुढे बोलायचंच विसरलो. 

‘अरे वेड्या, अजून आपण प्रेम चाखलेलंच नाही. भरतही असेल, आपल्याला काय माहीत.. दुसऱ्यांचं किती दिवस ऐकणार.. कधीतरी आपणही करून पाहू की..’ तिचे उष्ण श्वास मला एखाद्या नशेसारखे गुंग करत होते. तिच्या डोळ्यातला भाव मी या पूर्वी कधीच पाहिला नव्हता. माझ्या तोंडातून काही शब्द फुटण्यापूर्वीच तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले होते. बागेतून कुठलाच आवाज येत नव्हता आणि मला ट्रेनची शिटी वाजल्यासारखा आवाज ऐकू आला, कसा काय माहीत! नीलूनं मला मिठी मारली होती. माझे श्वास माझ्यातच अडकले होते. ज्या ट्रेनच्या शिट्टीचा आवाज माझ्या कानात घुमत होता,  मी त्याच ट्रेनच्या टपावर आडवा झालो होतो. आम्ही कुठं तरी जात होतो.  नीलूनं माझे हात तिच्या कमरे भोवती घेतले. मला पहिल्यांदाच तिचा स्पर्श इतक्या जवळून अनुभवायला मिळत होता. तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, याची पहिल्यांदाच जाणीव झाली. माझ्या डोळ्यांदेखत ती दुसऱ्या कुणाची झाली, तर मी मरून जाईन असं वाटलं. तिनं माझे हात तिच्या कमरेभोवती घेतले होते. मीही तिला दोन्ही हातांनी जवळ ओढलं. तिकडे दूर मस्ती करणारं जोडपं आता आमच्याकडे पहात होतं. ते एकमेकांना सांगत होते की आम्ही मस्ती करतोय. 

थोड्या वेळानं आम्ही नीलूच्या आवडत्या जागी, नदीकाठी बसलो होतो. ती माझी बोटं मोडू लागली. मला फार छान वाटत होतं. 

पण मला नव्या शहरात नोकरी शोधायला थोडा वेळ लागू शकतो, माझ्या मनात अजूनही शंका होती आणि  तिच्या चेहऱ्यावर हसू. 

“मला एक सांग साहेब, बायकोच्या कमाईवर जगण्यात तुला काही प्रॉब्लेम तर नाही?” तिच्या आवाजातल्या विश्वासानं माझ्या मनातल्या साऱ्या शंका दूर फेकायला, तिच्या रंगात रंगून जायला मला भाग पाडलं. ती जणू मला नवा जन्म देत होती, मला जगायला शिकवत होती. मला माझ्याच आवरणांपासून विलग करत होती. 

अचानक मी तिला झटका दिला आणि तिच्यासारखंच बोललो, “बायकोच्या कमाईवर जगण्यात मला काही प्रॉब्लेम नाही.” तिच्या ओठांवर मी माझे ओठ टेकवले, तेव्हा झाडांची पानं आपल्या प्रवाहासोबत घेऊन जाणारं नदीचं पाणी थबकून आमच्याकडे पाहू लागलं. नदीच्या ओठांवरही हसू होतं. 

आम्ही दोन दिवसांनी शहर सोडणार होतो. मी इतका मूर्ख आणि उदभ्रांत एवढ्या कमी वयात एवढा समजूतदार हे मला माहीतच नव्हतं. जरा बिचकत मी त्याला कल्पना सांगितली, तर त्यानं मला उचलूनच घेतलं. ‘तुला माहीत नाही, तू आज आयुष्यात पहिल्यांदा बरोबर वागला आहेस. या बदल्यात तू तुझ्या गैरसमजूती सहन करण्याची चूक करतोयस त्याही माफ व्हायला हव्यात,’ असं सांगितलं. इथं तो सारं काही सांभाळून घेईल याची त्यानं खात्री दिली. एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवण्याचं त्याला काम मिळालंय आणि बाकी खर्च तो त्याच्या चार-पाच ट्यूशन्समधून भरून काढेल. ट्यूशन्स आणखी वाढणार असल्याचंही त्यानं सांगितलं.  ‘तिकडे गेल्यावर नीलू प्राध्यापकाची नोकरी शोधेल आणि मी एखाद्या पेपरात प्रयत्न करेन,’ असं मी म्हणालो. ‘त्या शहरात त्याचा एक वकील मित्र आहे. तो बाकी औपचारिकता पूर्ण करेल,’ असं तो म्हणाला. बऱ्याच काळानंतर मी उदभ्रांतशी इतकं बोललो होतो. एक दिवस आपण आपलं घर नक्कीच बांधू असं मी म्हटल्यावर अशा कुठल्याही स्वप्नावर आता विश्वास राहिलेला नसल्याचं त्यानं सांगितलं. ‘स्वप्न बघणं हेच जगणं असतं,’ असं मी म्हणालो.  त्यावर तो म्हणाला की शेतकरी आणि त्यांच्या जमिनींचं स्वप्न तो पहातोय. त्याच्या सेमिनार आणि पोस्टर प्रदर्शनातला अर्थ मला पहिल्यांदा कळला. ‘उद्या तुझ्या ऑफिसला येईन,’ असंही त्यानं सांगितलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसमध्ये पोहोचताच दीन यांनी एक घाणेरडा प्रश्न विचारला. ‘आजपर्यंत मी कधीच दोघींबरोबर एकावेळी सेक्स नाही केला. जिच्याबरोबर मी सेक्स करतो, ती मैत्रीण दोघींबरोबर सेक्स करायला तयार आहे. पण माझी बायको तयार होत नाहीये. माझे बायकोबरोबर सगळंच करून झालं आहे. मी काय करू?’  हा प्रश्न विचारताना ते माझ्या खूप जवळ आले होते. आपलेपणा दाखवत त्यांनी माझा हात धरला होता. त्यांचा हात झटकून मी त्यांच्यावरच ढकलला. मोठ्या आवाजात त्यांच्यावर ओरडलो, ‘आधी तुम्ही तुमच्या बायकोला दोन पुरुषांचा आनंद घेऊ द्या. त्यांना जर हा प्रकार आवडला, तर त्या आपणहून तयार होतील. मग तुम्ही एकावेळी चार, पाच, सहा जितके हवे…’ दीनजी माझा आवाज आणि एकूण अवतार पाहून खूप घाबरले. गुपचूप आपल्या जागी जाऊन बसले. अस्वस्थ होऊन ते सारखं घड्याळ पहात होते. दादा नसल्यानं त्यांचा एकांडा शिलेदार झाला होता. आता थोड्या वेळात ते क्रांतीकारीकडे जाऊन माझी चुगली करतील, असं मला वाटलं होतं. मात्र, ते निमूटपणे बसून राहिले. कधी घड्याळाकडे तर कधी कम्प्युटर स्क्रीनकडे पहात राहिले. त्यांचा प्रश्न कसाही असला, तरी मी माझं उत्तर अत्यंत प्रामाणिकपणे दिलं होतं. पण त्यांना उत्तर नको होतं. 

युपीमध्ये धमक आहे कारण, इथे गुन्हे कमी आहेत

दादा आल्यानंतरही दीनजीच्या हावभावात काहीही फरक पडला नाही. खरंतर, दादा आपल्यासोबत एक आनंदाची बातमी घेऊन आले होते. आमच्या मासिकाला निळ्या रंगाची एक जाहिरात मिळाली होती. ही जाहिरात पुढच्या मार्चपर्यंत आमच्या मॅगझिनला मिळत राहील याचंही वचन मिळालं होतं. दादा थोडावेळ दीनजींशी बोलून सिगरेट ओढायला बाहेर गेले. क्रांतीकारी येईपर्यंत यांचं असं आत-बाहेर सुरू असायचं. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत दादा आणि दीन माझ्याशी काहीही बोलले नाहीत. क्रांतीकारीनं फोन केल्यावर भग्गूनं ऑफिसमध्ये पेढे वाटायचं काम केलं होतं. 

दादा आणि दीन यांना क्रांतीकारीच्या केबिनमध्ये जाऊन एक तास झाला होता. संध्याकाळी जवळपास साडेसात वाजता मला बोलावणं आलं. साहेबांनी बोलावलंय, असा निरोप त्यानं दिला. तसंच कोणीतरी  मजबूत अंगकाठी असलेला तरूण मला भेटायला आल्याची दुसरी बातमीही त्यानं दिली. मी उदभ्रांतला खिडकीतून आत बोलावलं. तो हसतच माझ्यासमोरच्या खुर्चीत बसला. मात्र, थोड्याच वेळात मला आत बोलावण्यात आलं. मी जरा नाराजीनंच उठलो. आज क्रांतीकारीनं मला बोलवायला येऊ नये आणि माझ्याकडून अपमान करून घेऊन ये असं मला वाटत होतं. 

“तू दीनचा अपमान केलास?” क्रांतीकारी आणि त्याच्या दोन्ही चमच्यांवर तिसऱ्या पेगची लाली चढली  होती. 

“नाही. मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं फक्त.. तुम्ही विचारा त्यांना,” मी अत्यंत साधेपणानं सांगितलं.  

“साल्या, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस की माझा हात पिरगळलास, अजून दुखतंय!” दीननं चेहऱ्यावर दुखत असल्याचा आविर्भाव असा काही आणला होता की त्यात अपमानाची सावली दिसत होती. इतक्यात क्रांतीकारी उठून माझ्याजवळ आला. ‘चल, एवढ्या प्रश्नांची उत्तरं देतोस ना, आता माझ्या या प्रश्नाचंही उत्तर दे. आज तुला कळेलच की तू तुझ्या बापाचा सख्खा मुलगा नाहीस. तुझ्या आईसमोर तोंड काळं करून गेलेला मी तुझा खरा बाप आहे. मी अचानक तुझ्यासमोर येऊन उभा राहिलोय आणि आता तुला माझ्यासोबत घेऊन जायचं आहे. तर तू काय करशील?’ क्रांतीकारीनं त्याच्या हिशेबानं अतिशय ठोस प्रश्न विचारला होता आणि त्याला त्याच्या प्रश्नापेक्षाही ठोस उत्तर हवं होतं. आज त्याचे रागरंग काही वेगळेच होते. एरवी प्रत्येक गोष्टीची चेष्टा-मस्करी करण्याचा त्याचा लहेजा सूड घेण्यासारखा वाटत होता. भग्गू येऊन दरवाजात उभा राहिला होता. त्याच क्षणी उदभ्रांत आत घुसला.

बोल साल्या, काय करणार तू.. उदभ्रांतची लाथ क्रांतीकारीच्या जांघेच्या बरोबर मध्ये बसल्यानं क्रांतीकारीचे शब्द त्याच्याच तोंडात  राहिले. ‘ मी तुमच्याबरोबर नाही येणार सर, ऐन वेळी तुम्ही माझ्या मदतीला आला नाहीत , तर आता कशासाठी आलात? आता तर मी तुम्हाला या चुकीची शिक्षा देणार आहे, असं म्हणून मीही त्याच्या गांडीवर लाथ मारली. तो बाजूच्या टेबलावर कोसळला. दादा आणि दीनच्या चेहऱ्यावरून त्या तीन पेगची लाली उतरली होती. ते बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधत होते. उदभ्रांतनं तोपर्यंत क्रांतीकारीला तीन-चार लगावल्या होत्या. त्यानं पुन्हा मारण्यासाठी हात उचलल्यावर क्रांतीकारी हात जोडून रडू लागला. मी उदभ्रांतला अडवलं. पुन्हा क्रांतीकारीच्या जांघेच्या मधोमध एक लाथ मारली. ‘सर, अजून एक लाथ मारतो. तुमच्या जांघेच्या मधोमध जी अडचण आहे ना, ती कायमची दूर होऊन जाईल.’ त्याच्या किंचाळण्याचा आवाज हलालीच्या बकऱ्यासारखा होता. 

मी रात्री उशीरा घरी पोहोचलो. येताना वाटेत मी आणि उदभ्रांत हसत होतो. उदभ्रांतनं पहिल्यांदा सांगितलं की काही वर्षांनंतर सगळं काही स्थिरस्थावर झाल्यावर तो एक छोटंसं घर बांधणार आहे. स्थिरस्थावर होण्याचा अर्थ मला नीटसा उमगला नाही. त्यानंतर आम्ही गप्पपणे घरी पोहोचलो. 

छान वातारण होतं आणि त्या गारव्यात नीलूचा हात हातात घेऊन दूर कुठेतरी फिरायला जावंसं वाटत होतं. मला माझ्यात अलौकिक आत्मविश्वास आल्यासारखं, एखादा हिरो असल्यासारखा वाटत होतं. नीलू एवढ्या रात्री बाहेर पडणं शक्य नव्हतं. आता फक्त दोन दिवसांनी नीलूचा हात धरून फिरायला मला कोणाची परवानगी घ्यावी लागणार नाही असा विचार करत मी एकटाच फिरू लागलो. त्या विचारानं मला इतकं छान वाटत होतं की घरी पोहोचल्यानंतर मी त्याबद्दल कितीतरी वेळ विचार करत होतो. बराच वेळ झोपल्यानं सकाळी उठायला उशीर झाला. तेही आईच्या ओरडण्यानं आणि पिताश्रींच्या रडण्यानं. मी झट्दिशी अंथरूणातून उठून पाहिलं. खूप अस्वस्थ वातावरण होतं. तीन जीप भरून पोलिस आले. उदभ्रांतला पोलिसांनी पकडून नेलं. ते सगळं माझ्या आकलनापलीकडे होतं. मी गडबडीत उदभ्रांतच्या वकील मित्राला फोन केला. ‘लवकर पोलिस स्टेशनला जा आणि केस फाईल होऊ देऊ नकोस. एकदा केस फाईल झाली, तर त्याला सोडवणं अवघड होऊन बसेल,’ असं त्यानं सांगितलं. उदभ्रांतनं असा काय गुन्हा केला होता की त्याला पकडण्यासाठी पोलिसांना तीन जीप घेऊन यावं लागलं, हे मला समजतच नव्हतं. त्याच धुंदीत मी पोलिस स्टेशनला पळालो. तिथं गेल्यावर मला कळलं की त्याला पोलिसांनी नाही, तर एसटीएफनं अटक केली आहे आणि उदभ्रांतला भेटण्यासाठी मला कोणा अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. उदभ्रांतला जिथं ठेवलं होतं, तिथं घेऊन जाण्यासाठी मी कोणाच्या आणि कसा हाता-पाया पडलो हे फक्त मलाच माहीत आहे. 

“हा याचा भाऊ आहे,” मला घेऊन गेलेल्या हवालदारानं सांगितलं. जीन्स टी शर्ट घातलेला एक माणूस माजात खूर्चीवर पाय पसरून बसला होता.

“बरं, अनहद तू आहेस तर..” त्याचा तो स्वर मला संशयास्पद वाटला. 

“हो,” कोरड्या पडलेल्या घशातून एवढाच शब्द बाहेर पडला.

“यालाही आत टाका. पुस्तकावर याचंही नाव आहे. थोड्या वेळानं कोर्टात न्यायचं आहे. तोपर्यंत चहा समोसा मागवा.” त्यानं एवढं सांगितल्यावर मला गजाआड करण्यात आलं. 

नव्या कवींच्या कवितांचं संकलन असलेलं पुस्तक माझ्यासमोर ठेवण्यात आलं. मला काही कळायच्या आतच धुमिलच्या ‘नक्षलबारी’ या कवितेचं पान उघडून पुस्तक माझ्या समोर ठेवण्यात आलं. 

“हे तुझंच पुस्तक आहे ना?” प्रश्न विचारण्यात आला.

“हां, पण हे कवितांचं पुस्तक आहे. हिंदीच्या अभ्यासक्रमात..” मी  क्षीण आवाजात उत्तर दिलं.

“विचारलं तेवढंच सांगायचं. तुमच्यापैकी हिंदी विषय कोणाचा होता?” प्रश्न आला. 

“कोणाचाही नाही. पण मला कविता..” माझं बोलणं अर्धवट तोडण्यात आलं.

“तुझा भाऊ सरकार विरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे. आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. आणखी काही पुरावे जमा करत आहोत. तू अशा कविता वाचतोस म्हणून तुझी चौकशी करतोय. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे, म्हणून प्रेमानं समजावतोय. माझ्या जागी दुसरा कोणी असता, तर त्याने आतापर्यंत तुझ्या गांडीत बांबू..”

मला सोडून देण्यामागचं कारण काही कळलं नाही. उदभ्रांत नेमकं काय करतो हे मला खरंच माहीत नाही. तो काय करत होता, तो आणि त्याचे मित्र रात्र-रात्र कसली पोस्टर्स तयार करायचे, ते कुठल्या गोष्टीला विरोध करत होते, मला काहीच कल्पना नव्हती. मला एवढं माहीत होतं की माझा भाऊ एका अशा कैदेत आहे, जिथून बाहेर पडण्याचे सगळे रस्ते बंद झाले होते. दुसऱ्या दिवशी पेपरात त्याच्या फोटोसह ‘नक्षलवाद्याला अटक’, ‘माओवादी तरूण एसटीएफच्या ताब्यात’ , ‘नक्षली साहित्यासह नक्षलवाद्याच्या मुसक्या आवळल्या’ असे मथळे असलेल्या बातम्या छापून आल्या होत्या. 

प्रश्न – मी २८ वर्षांचा चांगल्या घरातला तरूण आहे. मला चांगली पर्मनंट नोकरी आहे आणि माझ्या कुटुंबालाही माझं खूप कौतुक वाटतं. मला मात्र कायम विरक्ती घेऊन जावंसं का वाटतं कळत नाही. सारं काही सोडून देण्याची इच्छा होते. नातीगोती फोल वाटू लागतात आणि जगातला सर्वांत कमजोर माणूस मीच आहे, हे सर्वांत मोठं सत्य असल्यासारखं वाटतं. हे असे विचार वाढत आहेत. त्याचा मला खूप त्रास होतोय. मी काय करू?

उत्तर – सोडून द्या, सोडू  नका. 

मी उत्तर प्रदेश आहे, म्हणून घाबरट आहे

उदभ्रांतच्या वकील मित्राच्या मदतीनं एक चांगला वकील मिळवला. त्यानं पहिल्याच सुनावणीला चांगल्या पद्धतीनं बाजू मांडली. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडच्या सबळ पुराव्यांच्या आधारावर उदभ्रांतचा पंधरा दिवसांचा पोलिस रिमांड मिळवला. पुढच्या सुनावणीला रिमांड वाढवण्यात आला. आता हे दरवेळी होतं.

उदभ्रांतनं मला पहिल्यांदा भेटल्यावरच सांगितलं होतं, ‘मला जे योग्य वाटायचं, तेच मी केलं. जगण्याची हीच पद्धत मला योग्य वाटली. मी काही अयोग्य काम केलं नाही हे तू समजाव घरी.’

त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पोलिसांच्या पुढच्यातच मी त्याला हळू आवाजात विचारलं, ’तू खरंच नक्षलवादी झालायस का?’ तो हसू लागला आणि म्हणाला, ‘नाही, मी नक्षलवादी नाही झालोय अजून.’ त्यानं मला आई आणि पिताश्रींची नीट काळजी घ्यायला सांगितलं. उदभ्रांतला कोणी अटक करवली असेल याचा मी नेहमी विचार करतो. मी स्वतःलाच याचा जबाबदार मानतो. कदाचित दिनेश क्रांतीकारीने त्याला त्या घटनेनंतर माझ्या भावाला अडकवलं असेल. मग वाटतं, माझा बदला घेण्यासाठी नीलूच्या बाबांनी आपल्या कॉन्टॅक्टसचा वापर करून त्याला अटक करवली असेल.

हां, नीलूच्या लग्नाचा विषय अर्धवटच राहिला. तिच्या लग्नाच्या दिवशी घडलेल्या घटनेनं अवघी कॉलनी सुन्न झाली. तिच्या घरी काम करणाऱ्या महरीनं सांगितलं की रोशनदासला फक्त पंख्याला बांधलेली दोरीच दिसत होती आणि नीलूनं आत्महत्या केल्याचा आक्रोश घरात सुरू झाला. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडल्यावर कळलं की पंख्याला बांधलेल्या दोरीला एक पिशवीही बांधली होती. पोलिसांनी ती पिशवी उघडली,तेव्हा त्यात खूप साऱ्या निळ्या सलवार कमीज आणि नीलू बीएडला जाताना नेसायची ती निळी साडी सापडली. नीलू विषयीची अजून माहिती महरीकडून खोदून काढायाचा मी प्रयत्न केला. मात्र, तिला काहीच माहीत नव्हतं. त्या दिवशी नीलूच्या घरी जावं असं मला सारखं वाटत होतं. पण मी जाऊ शकलो नाही. कारण, त्या दिवशी उदभ्रांतच्या केसची तारीख होती.

पिताश्रींनाही माझ्याबरोबर सुनावणीसाठी कोर्टात यायचं असतं. आता ते काठीच्या आधारानं चालू लागले आहेत. पुढच्या सुनावणीवेळी नक्की घेऊन जाईन असं मी त्यांना सांगितलं आहे. ते चित्र-विचित्र असं काहीतरी बोलत राहतात. कधी ते अचानक एखाद्या जुन्या टॅक्स फ्री फिल्मचं गाणं गाऊ लागतात. तर कधी अचानक पेपर वाचताना तो फाडून त्याचे तुकडे करून टाकतात. कधी ते एकदम शांत बसतात किंवा बडबड करत राहतात. ते केसच्या प्रत्येक तारखेवेळी कोर्टात यायचा हट्ट करतात आणि मी दरवेळी पुढच्यावेळी नेईन असं सांगून वेळ मारून नेतो. दर तारखेला आई देवाला नैवेद्य दाखवते आणि आम्ही कोर्टातून येईपर्यंत अन्नचा एक कणही खात नाही.  

उदभ्रांतला सोडवणं हे जणू माझ्या आयुष्याचं ध्येय झालं आहे. मात्र, दर तारखेला कोर्टात जाण्याशिवाय मी काही करू शकत नाही हेही मला कळलं आहे. उदभ्रांतची केस लढणारा त्याचा मित्र मला दरवेळी ‘सगळं ठीक होईल’ म्हणून समजवतो. मात्र, मी हळूहळू जिंकणं सोडाच, जगण्याची उमेदही हरवत चाललोय. कालच दिल्लीहून आलेल्या माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की राजीव चौक मेट्रो स्टेशनवर त्यानं नीलूसारख्याच एका मुलीला पाहिलं. ‘तिनं निळ्या रंगाचे कपडे घातले होते का,’ असं मी विचारलं, तर त्याला काही नीटसं आठवत नाहीये. बाबा वारल्याचं कळलंय. पण मी ‘त्या दिवशी केसची तारीख नसली, तर तेराव्याला येईन’ असं कळवून टाकलंय.

आता मला निळ्या रंगाची खूप भीती वाटते. माझ्या घरातून निळ्या रंगाच्या सगळ्या चीजवस्तू काढून टाकल्यात. बाहेर पडताना मी नेहमी काळा चष्मा घालतो. आणि आकाशाकडे अजिबात पहात नाही.

प्रश्न: आज काल मला एका स्वप्नामुळे खूप त्रास होतो. या स्वप्नातून जागं झाल्यावर माझं शरीर घामानं डबडबून जातं आणि माझी धडधड वाढते. माझी एक खूप मोठी आणि सुंदर बाग असल्याचं मला दिसतं. त्यातल्या झाडांच्या फांद्या सोन्याच्या आहेत. त्या झाडांवर मला एक घुबड बसलेलं दिसतं आणि माझी बाग उद्ध्वस्त होण्याच्या भीतीनं मी घुबडाला दगड मारू लागतो, रडू लागतो. त्याच वेळी मला फांद्यांतून विचित्र आवाज ऐकू येतात आणि मी पुढे सरकू लागल्यावर प्रत्येक फांदीवर घुबड बसल्याचं मला दिसतं. या भयानक भीतीनं मला जाग येते. मी काय करू ?

उत्तर:

 

 

प्रतिमा सौजन्य: ब्लेटंट डिसरिगार्ड, चारूदत्त पांडे

विमल चंद्र पांडेय: पत्रकार,  चित्रपट-समीक्षक आणि समकालिन हिंदी लेखक.पांडेय यांचे डर, मस्तुलों ते ईर्दगीर्द  हे कथासंग्रह आणि भले दिनों की बात थी ही कादंबरी प्रकाशित आहे. त्यांना ज्ञानपीठ नवलेखन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

चिन्मय पाटणकर: पत्रकार-कॉपीरायटर आहेत. नाटक-सिनेमाविषयक लेखन करतात. त्यांनी दोन मराठी चित्रपटांचे लेखन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *