प्रगती दळवीने सर. जे. जे. कलामहाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले असून ती अमूर्त कला (Abstract Art) आणि सादरीकरण प्रयोग कला (Performance Art) प्रकारात कार्य करते. प्रगती दोन मुलांची आई असून सध्या तिच्या कुटुंबासोबत बेंगळुरूमध्ये राहते. उर्वी छेडा आपल्या लेखात प्रगतीच्या कोणीही पाहत नाही या प्रयोगाची चर्चा प्रख्यात कलाकार मिअेरल युकेल्स यांनी ‘देखभाल कला’ (Maintenance Art) विषयी केलेल्या तात्त्विक मांडणीचा आधार घेऊन करतात.
फ्रेम – स्वयंपाक घर (पोर्ट्रेट व्ह्यू)
लाकडी कपाट, चिमणी, इंग्रजी ‘एल’आकाराचा कट्टा आणि फिक्कट रंगाची स्पार्टेक्सची फरशी असणारे स्वयंपाकघर- या साऱ्याभोवती प्रगतीचा दिवस फिरत राहतो.
काळ्या रंगाच्या सलवारीवर मरून रंगाचा टॉप आणि अर्धेमुर्धे मोकळे सोडलेले केस सावरत प्रगती स्वयंपाकघरातील वरच्या बाजूचे कपाट उघडते. कपाटात बरणी ठेवून दार बंद केल्यानंतर ती आपला मोर्चा रेफ्रिजरेटरकडे वळविते. तो उघडून एक कॅन घेते आणि खायचे वेगवेगळे पदार्थ एका ताटात वाढून घेते. पंजाबी ड्रेसमधली दुसरी एक स्त्री आजूबाजूला आपले काम चालू ठेवते. प्रगती ताट घेऊन फ्रेम मधून बाहेर जाते.
आताच्या फ्रेममध्ये आहे जेवणाचे लाकडी टेबल आणि चार खुर्च्या. पांढऱ्या भिंतीवर वेगवेगळ्या फॅमिली फोटोफ्रेम्सच्या वरच्या बाजूला लटकणाऱ्या एका पारंपरिक दिव्याचा प्रकाश तिथली शोभा वाढवतो. दुपारच्या जेवणाचे ताट घेऊन प्रगती नव्या फ्रेममध्ये येते. आता तिच्या ताटात एक वाटी, घडी घातलेली चपाती आणि भाजी आहे. ताट घेऊन ती टेबलाच्या उजव्या बाजूला बसते, खाता-खाता डाव्या बाजूकडील बाल्कनीतून बाहेरच्या आसमंताकडे टक लावून पाहत राहते. त्याचवेळी ती एक पुस्तक उचलून पाने पलटू लागते. वाचता-वाचता ती चपातीचा एक घास वाटीमध्ये बुडवून खाते. मग पाण्याचा ग्लास उचलते. घोटभर पाणी पिऊन पुन्हा वाचू लागते. जेवण संपवून ती भिंतीला टेकते. वाचन सुरु ठेवते. सतत फिरणाऱ्या पंखांच्या आवाजात वातावरण शांत आणि प्रसन्न आहे.
रिकामे ताट ठेवून ती फ्रेममधून बाहेर पडते. एक फडके घेऊन ती टेबलाकडे परतते. जेवणासाठी वापरलेले टेबल पुसून निघून जाते. फ्रेम स्थिर असूनही अस्थिर आहे – ती प्रगतीच्या परतण्याची वाट पाहते. ओह, मग ती दोन सुंदर दिसणारी वाडगी घेऊन परत येते. जेवणाच्या टेबलावर ती वाडगी ठेवते. खुर्चीवर बसून ती एका वाडग्यातले धान्य निवडून दुसऱ्या वाडग्यात ठेवते.
प्रगती असणारी फ्रेम सतत बदलताना दिसते – दिवाणखाना (खिडकी, व्हॅन गॉगचे चित्र असणारी भिंत, समोर दिसणारे टेबल), स्वयंपाकघर, मग मुलांची खोली- जिथे तिला आई, पत्नी, गृहिणी, तिच्या मुलीची मैत्रीण.. वेळोवेळी, संयम ठेवत आणि हे सर्व नीट सुरु ठेवण्यासाठीच्या धडपडीतून नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात असणारी एक स्त्री प्रगतीच्या रूपाने चित्रित होताना दिसत राहते.
आज मात्र ती एकांतात धडपडणारी सादरकर्ती-कलाकार आहे आणि तिच्यासाठी दररोजच्या कामाचे दृश्यरूपच अभिव्यक्ती ठरते. सादरकर्ती-नायिका-कलाकार आणि घरातली धडपणारी व्यक्ती या अशा ओळखीत ती आलटून पालटून दिसत राहते.
कोणीही पाहत नाही या प्रयोगाच्या सादरीकरणासाठी ५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रगती दळवी फेसबुकवर ‘लाईव्ह’ गेली. दिवसभर चाललेल्या या प्रयोगात बऱ्याचशा गोष्टी घडताना दिसल्या. घरातले काम, मुलांसोबत खेळणे, मुलाला (कडेवर घेऊन) फिरवणे, त्याला झोपवणे, मुलीच्या बाहुल्यांबरोबर खेळणे, व्हॅन गॉगचे (दुर्लक्षित राहिलेली) भिंतीवरील पेंटिंग आणि अस्ताव्यस्त घर अशा शहरी प्रेक्षकांना जवळच्या वाटतील तसेच त्यांना हेवा वाटेल अशा गोष्टींचा समावेश प्रयोगामध्ये होता.
घरातील तिची दिनचर्या आणि तिचा वावर टिपण्यासाठीचा कॅमेरा तिच्या घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात पुनःपुन्हा हलवावा लागला होता. कदाचित, निर्जीव यंत्राप्रमाणे राबून कलाकृतीतून अभिव्यक्त होण्यासाठी तिला तिच्या आयुष्यातून एक दिवस बाजूला काढावा लागला. प्रयोगातून तिने आपले घरातले काम, आयुष्यात पडलेले पेचप्रश्न आणि दिवसभरातल्या क्रिया-प्रक्रिया यांचे सादरीकरण केले.
“कोणीही पाहत नाही हा लॉकडॉऊनच्या काळातील मर्यादा आणि बंधनांना चिकित्सकपणे मांडणारा प्रयोग आहे. बाहेरच्या लोकांना हा कदाचित नेहमीचाच, अव्याहत चालू असणाऱ्या कामांचा एक सामान्य, नीरस दिवस वाटेल. पण अशा प्रयोगातून एखाद्या घरातील स्त्री आपल्या खाजगी अवकाशाला आणि दैनंदिन जीवनातून घडणाऱ्या भाव-भावनांना प्रतिबिंबित करत असते. जेव्हा ती एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत शिरते किंवा एका कामातून दुसऱ्या कामाकडे वळते तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते, तिच्याकडे पाहिलेही जात नाही. ती स्वतःच वेळापत्रक बनते आणि घरातल्या गरजेच्या, मूलभूत क्रियांचा, सांसारिकतेचा, मागे सरकणाऱ्या दिवसाचा, आणि पुनरावृत्तींचा ती एक नमुना म्हणून आपल्या समोर येते. पुनःपुन्हा घडणाऱ्या क्रियांचे सवयींमध्ये रूपांतर होते आणि अखेरीस, कालांतराने, त्या सवयी नैसर्गिक वाटू लागतात. या संपूर्ण प्रक्रियेत अनेक बाबी सामावलेल्या असतात. मग, अशा या अवकाशात काय होत असते? तिच्या ज्या काही हालचाली होत असतात त्यांचा वेगवेगळ्या क्रियांवर कसा परिणाम होत असतो? अर्थात, तसा परिणाम होत असेल तर. मग, एखादी व्यक्ती अशा बदलात मिसळून जात कशी उभारत असते? असं काहीसं मला मांडायचं आहे.”
– प्रगती दळवी
कोणीही पाहत नाही हा प्रयोग एका दिवसात आकाराला आला नव्हता. प्रगतीचा प्रयोग तिच्या धारणा, तिचा अनुभव आणि दररोजच्या आयुष्यात तिला येणारे अनुभव यातून आकाराला आला. तिच्या पॅरलल वर्ल्ड (२०२०) चा सादरीकरणाचा प्रयोग तिने कोरोना महामारीच्या काळात सादर केला. बेंगळुरूच्या रस्त्यावर अनेक तास भल्यामोठ्या आरशाला घेऊन उभे राहत तिने निश्चल वस्तुलाही अस्वस्थ होण्यास भाग पाडले! प्रयोग सादर करताना तिच्या बाजूने, तिला पाहत पदपथावरून जाणाऱ्यांना तिने आपल्या जाणिवा जाग्या करण्यास प्रवृत्त केले. जेव्हा ‘पब्लिक’ हा तुमच्या कामाचा महत्त्वाचा मुद्दा ठरतो तेव्हा तुम्हाला राजकारण-सत्ताकारणापासून तटस्थ राहता येत नाही. अशा प्रयोगातून एक नागरिक म्हणून सहभागी होताना प्रगती स्वतः देखील ‘व्यक्तिगत म्हणजे राजकीय’चा भाग बनते. पण कसे? अशा प्रश्नाला मी सामोरे जाण्याचा प्रयत्न करते आहे.
घराचे नूतनीकरण चालू असताना कोण्या खरेदीदाराला तुम्ही घरात घुसू द्याल का? शाॅवरखाली आंघोळ करता करता आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही कधी बाथरूमच्या बाहेर पडाल काय? कच्चा राहिलेला ब्रेड तुम्हाला खायला आवडेल काय? तुमच्या घरात कुरियरने आलेले सामान व्यवस्थित बंद केलेले नसेल किंवा ते फाटलेले वा उघडे असेल आणि अर्धेमुर्धे सीलबंद असेल तर तुम्ही काय कराल? आपली मानसिकता अशी घडली आहे की नीट नसलेले, त्रुटीयुक्त सामान आपल्याला मिळाले तर आपण स्वतः क्षणभरात नाराज होतो. खरंतर, आपल्याला जे सामान मिळालेले असते ते बनवण्याच्या प्रक्रियेत जे घटक असतात त्यावर त्याचे मूल्य ठरलेले असते. त्यात बासमतीऐवजी साधा तांदूळ असो की एखाद्या वेटरने चीज टाकायला विसरलेला ‘बर्गर’ असो ते सामान बदलू शकतं. उत्पादनाचे मूल्य त्याच्या निर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या वस्तूंच्या दर्ज्यावरून ठरते. पण, आपण प्रक्रियेपेक्षा आपण त्या विशिष्ट सामान तयार झाल्यानंतरच्या मूल्यावर विसंबून राहतो!
सामानाच्या ‘दर्जा’लाच कायम सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. साहित्याच्या उत्पादन प्रक्रियेतील निष्काळजीपणा आणि अयोग्यपणामध्ये तज्ज्ञ मंडळाची मर्जी राखताना आपण त्याच्या गैरवापरास बळी पडतो. तयार साहित्य आणि साहित्य निर्मिती प्रक्रिया या दोहोंना समान प्रतिष्ठा आवश्यक असली तरी तयार साहित्यच बाजी मारून जाते. पण, प्रगतीच्या कामातून अर्ध्या कच्च्या आणि बदलत राहणाऱ्या निर्मिती प्रक्रियेला स्वतःची अशी ओळख देण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो.
संकल्पनात्मक पातळीवर पाहायचे तर प्रगतीच्या दैनंदिन कामाच्या संदर्भात मिअरल लॅडरमॅन युकेल्सने केलेल्या मांडणीकडे पाहता येईल. युकेल्स म्हणते त्याप्रमाणे, केवळ लैंगिकतेच्या बाबतीतच नव्हे तर आपली देखभाल करणाऱ्या कामगारांप्रतीही सामाजिक भेदभाव केला जातो. “व्यक्तिगत म्हणजे राजकीय” हा युकेल्सच्या जाहीरनाम्यातून समोर येणारा विचार प्रगतीच्या दिवसभराच्या कामातून आणि तिला जाणवणाऱ्या छुप्या व्यवस्थेतूनही आपल्याला दिसून येतो.
मिअरल लॅडरमॅन युकेल्सची देखभालीची कला (Maintenance Art)
संस्था-स्तरावरच्या चिकित्सेची पुरस्कर्ती असणाऱ्या मिअरल लॅडरमॅन युकेल्सची कलाकृती तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर उत्पादनाच्या देखभालीसाठी प्रयत्न करण्याऱ्या प्रत्येक कामगारासाठी पराकोटीच्या सहानुभूतीची मागणी करते. मूल झाल्यावर, घरातील पडेल ती कामे पूर्ण करून झाल्यावर, स्वतःची काळजी घेण्याच्या स्त्रीच्या नेहमीच्या देखभालीच्या कामालाही तिने कलेचा दर्जा दिला आहे.
वॉशिंग/ट्रॅकस/मेंटेनन्स: आऊटसाईड (१९७३) हा युकेल्सने सादर केलेला प्रयोग म्हणजे द वॅडसवर्थ अथेनियम या म्युझियमच्या फरशा पुसण्याचे सादरीकरण होते. या प्रयोगात प्रेक्षक जसे गॅलरीत येतील तसे त्यांच्या मागोमाग जात त्यांच्या पावलांचे ठसे पुसत युकेल्स पुढे जात राही. म्युझियमच्या दिवसभराच्या कामाच्या वेळात तिने हा प्रयोग सादर केला. टच सॅनिटेशन परफॉर्मन्स (१९७०-८०) या आपल्या प्रयोगात युकेल्सने कामगार, घरकाम करणाऱ्या कामगार, सुरक्षारक्षक- ज्यांना न्यूयॉर्क शहरातले ‘द सन मन’ म्हटले जाते – अशांच्या मुलाखती घेतल्या, त्यांची छायाचित्रे घेतली आणि त्यावर टिपणंही लिहिली. फोटोंमधून आणि टिपणांमधून युकेल्सने न्युयॉर्क शहर स्वच्छ ठेवणाऱ्या ८५०० ‘सन मन’ चे आभार मानले, त्यांचे कौतुक केले, अभिनंदन केले आणि त्यांना धन्यवाद देत त्यांच्याशी हस्तांदोलनही केले. युकेल्सने १९७८ पासून ती न्यूयॉर्कच्या स्वच्छता विभागात (एनवायएसडी) बिनपगारी काम केले. द सोशल मिरर (१९८३) या दुसऱ्या एका मांडणीशिल्पात, न्यूयॉर्क स्वच्छता विभागाच्या (एनवायएसडी) मदतीने, युकेल्सने शहरातील कचरा गोळा करून तो वाहून नेणाऱ्या ट्रकवर टणक असा आरसा बसविला. हे इंस्टॉलेशन तिने न्यूयॉर्कच्या १९८३ मधल्या न्यूयॉर्क मधील आर्ट परेड मध्ये फिरविले. त्या आरशात नागरिकांना आपले प्रतिबिंब पाहता आले. Touche!
युकेल्सने देखभाल कलेचा सराव केला. या कलेसाठी तिने १९६९ मध्ये एक जाहीरनामाही लिहिला होता. या जाहीरनाम्यात लैंगिक पक्षपातीपणाबरोबरच नेहमीच्या व्यवहारातील देखभाल व व्यक्ती/समाजाचा विकास यांच्यामधील तीव्र मतभेदांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यात युकेल्स लिहिते:
“मी एक कलाकार आहे, मी एक स्त्री आहे, मी एक पत्नी आहे.
मी आई आहे.
(वाचनाचा क्रम काही असू शकतो)
दररोज मी बऱ्याच कामांचा उरका पाडते. मग त्यात कपडे धुणे, साफसफाई करणे, स्वयंपाक करणे, घरात वेगवेगळे बदल करणे, एखाद्याला आधार देणे, हवे असणारे जपून ठेवणे.. असं बरच काही. याचबरोबरीने, आतापर्यंत मी स्वतंत्रपणे ‘कला’ही ‘करत’ आले आहे.
मी देखभालीच्या दैनंदिन गोष्टी करत राहीन आणि त्यांना नेहमीच्या कामांना जाणिवेत मिसळून टाकून त्या कला म्हणून सादर करत राहीन. प्रदर्शनाच्या काळात मी संग्रहालयात राहीन. तसेच प्रदर्शनाच्या काळात मी वेळोवेळी माझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलांबरोबर घरीही काम करत असेन. (बरोबर?! अर्थात, तुम्हाला जर मी रात्री घरी आलेली नको असेन तर दिवसभर घरी थांबेन.) मग, जनकलेसाठी सर्व गोष्टी करेन – झाडलोट करणे, झटकाझटकी करून साफसफाई करणे, भिंती पुसणे, घर घासून पुसून स्वच्छ ठेवणे. यामध्ये, घरभरातील चित्रे आणि शिल्पेसुद्धा स्वच्छ ठेवणे आले), जेवण करून लोकांना खाण्यापिण्यासाठी घरी आमंत्रित करणे, एखादा ग्रुप तयार करून तिथे आपण वेगवेगळ्या कामांना नकार का देतो हेही मी समजून घेईन.
माझे दैनंदिन काम हेच माझे कलाविषयक कार्य असेल.”
*
प्रगतीच्या प्रयोगात सामान्य घरातील दैनंदिन कामाचे कंटाळवाणे वर्णन अप्रत्यक्ष रीतीने, सूचकतेने केले जाते. अशावेळी ती केवळ एक कलाकार किंवा कलेची निर्माती नसते तर तिच्या कुटुंबातील एक घटकही असते. आपल्या प्रयोगाद्वारे ती आपल्या कुटुंबाला देखील या प्रक्रियेत सहभागी करून घेत असते. तिचे कुटुंब तिला समर्थन देण्याचा हक्क असणारा एक घटक असतो. युकेल्सने केलेल्या मांडणीनुसार प्रगतीचे काम ‘अ-राजकीय’ वाटले तरी ते ‘राजकीय’ आहे. प्रयोगातील अवचेतनेद्वारे दैनंदिन आयुष्यात आपल्याविरुद्ध होणाऱ्या थेट युक्तिवादाचा तिने प्रतिकार केला असेल. पण, आपला प्रयोग आणि आणि आपले काम दाखवताना आपल्या दैनंदिन आयुष्याबरोबरच त्यामधल्या प्रक्रियेतीलही जितेजागते क्षण आपल्याशी शेअर करण्याची प्रगतीची तीव्र इच्छा असते.
संदर्भ
१. ब्लीस, लॉरा. ध आर्टिस्ट हु मेड सनिटेशन वर्कर्स वर्थी ओफ आ म्युझियम. बलोम्बर्ग, 29 नोव्हेंबर 2016. https://www.bloomberg.com/news/articles/2016-11-29/the-maintenance-art-of-mierle-laderman-ukeles.
२. मुरे, केटरूना आणि स्पेक, कॅथरीन. “हाऊ ध पर्सनल बिकेम (अंद रेमैन्स) पॉलिटिकल इन् ध विसोल आर्ट्स.” एवरीडे रेवॉल्युशन्स: रेमाकिंग जंडर, सेक्शुअलिटी अंड कल्चर इन् १९७० काळात ऑस्ट्रेलिया, एडीतेड बाई मीचेल्ले अररो अँड अँजेला वूलॅकॉट, आ एन उ प्रेस, ॲक्टन ॲक्ट, ऑस्ट्रेलिया, प्प. ८५-१०२ ज स्टोअर, 2019. http://www.jstor.org/stable/j.ctvq4c17c.8.%20Accessed%2030%20Nov.%202020.
३. स्तैन्हायेर, जिलियन. हाऊ मियरल लदरमन उकेलेस तर्णेड मेंटेनन्स वर्क इंटो आर्ट. हायपेरॅलर्गिक. १० फेब्रुवारी २०१७. https://hyperallergic.com/355255/how-mierle-laderman-ukeles-turned-maintenance-work-into-art/.
४. उकेलेस, मियरल लदरमन. मेनिफेस्टो मेंटेनन्स आर्ट – प्रपोजल फॉर ध एक्जीबिशन, 1969.https://queensmuseum.org/wp-content/uploads/2016/04/Ukeles-Manifesto-for-Maintenance-Art-1969.pdf.
५. वेट्झळेर, रेचेले. मित ध आर्टिस्ट हू कोल्ड आउट आ मुसियम बाई स्क्रबिंग ध फ्लोअर फॉर हॉर्स. ताईमलाईने. १५ डिसेंबर २०१६. https://timeline.com/mierle-ukeles-cleaning-museum-64d274a0a19c.