मरणाआधीची पाच मिनिटं
पाच मिनिटं उरलीयेत. कदाचित. तेही सारं काही सुरळीत गेलं तर. पाच मिनिटं. म्हणजे आता चार मिनिटं त्रेचाळीस सेकंद … एक्केचाळीस … अडतीस … मोजण्यात अर्थ नाही. आत्तापर्यंत जगलेली कुठं मोजली होती ? करून बघावं का गणित ? २८ वर्षं, ४ महिने, किती काय ते तास, किती काय ती मिनिटं, वर काही सेकंद.
जन्मासाठी कधीची वेळ घेत असावेत ? मी बाहेर आलो तशी माय वारली. एकसाथ नसेल झालं हे. मी आलो उदरातून बाहेर आणि पंधराव्या सेकंदाला माय मेली. अण्णा म्हणायचा तसं. ऑपरेशन थिएटरात अर्धा तास होती, मी झालो, पंधराव्या सेकंदाला माय मेली. मी एकोणतीस मिनिट पंचेचाळीस सेकंदाला जन्मलो, असं धरून चालू. वेळ खर्च झाला उगाच ह्या गणितात.
मरणाआधीची चार मिनिटं
अख्खं एक मिनिट वाया गेलं. तसं तर, अठ्ठावीस वर्षं वाया गेली. माझी अठ्ठावीस वर्षं, त्याची अठ्ठावीस युगं. तो उभा तसाच एवढा वेळ, का कुणास ठाऊक ! थोडं काही केलं असतं तेवढ्या वेळात ! चार लोकांच्या आयुष्यांत सुखं आणली असती. अण्णाला आतून कुठंतरी माझ्यावर राग होता. असणारच म्हणा. त्याची लक्षुमी मी नेली होती त्याच्यापासून. माझ्यावर जेवढा राग, त्याहून जास्त ह्या काळतोंड्यावर. अण्णा त्याला काळतोंड्या म्हणायचा. मला काहीच नाही म्हणायचा. माझ्यापेक्षा बाटलीला जास्त जवळ घ्यायचा. दारू चढली की प्रेमळ व्हायचा, मायच्या नावानं टाहो फोडायचा. ‘तुझी तर काय चूक रं, लेकरा !’, म्हणून आसवं ढाळायचा. मायेचा जो काही स्पर्श मिळायचा, तो बडीशेप फ्लेवरच्या टँगो पंच संत्रा क्वार्टरनेच. त्याचा वास मला अगदीच सुखकारक वाटायचा. अजूनही वाटतो. मरण्यापूर्वी दोन घोट घेतले, तर अण्णाचा स्पर्श जाणवेल. अण्णा प्रेमानं पाठीवरून हात फिरवतो आहे, असं वाटेल.
मरणाआधीची तीन मिनिटं
बापानं माया दारूत वाहिली, मावशीनं जो काय जीव लावला, त्याची परतफेड काकानं करून घेतली. पहिल्यांदा निव्वळ “मांडीवर बस” म्हणाला. कुठंकुठं हात लावून घेतला. दिवसाला किमान पाच मिनिटं मला भोगलं. आता जशी मरायच्या आधी पाच मिनिटं मोजतोय, तशी रोज मोजायचो. पहिलं मिनिट मायची आठवण काढून, दुसरं अण्णाची, तिसरं काकाच्या गुटखा-खाल्या तोंडाची. पुढची दोन मिनिटं वीर्यासारखी वाहून जायची. शेवटच्या घडीला आतून मरण आलेलं असायचं. निपचित पडून राहायचं. श्वास ढकलायला कसब लागायचं. फुप्फुसांची हालचाल लिंगाशी केलेल्या चाळ्यासारखी वाटायची. वर. खाली. वर. खाली. श्वास घ्यायचीही किळस वाटायची. वेळही संपायचा. संथ वाटायचं. मरावं वाटायचं. अंतर्बाह्य.
मरणाआधीची दोन मिनिटं
वयात आल्यानंतर, स्त्री-सहवासाचं कधी आकर्षण नाही वाटलं. शाप असावा त्या काळतोंड्याचा. अण्णा दारूत धुत्त असायचा. टँगो पंच परवडायची नाही आता. जंगम वस्तीच्या तोंडाशी भट्टीची मिळायची. त्यातच अण्णांनी लिव्हर धुऊन काढलं. अण्णा पिऊन उताणा पडला एकदा हनीफभाईच्या पानटपरीजवळच्या गटारीत. तिथंच भेटला सैद. हनीफभाईचा धाकटा ल्योक. सोन्याची कांती घेऊन जन्मलेला, कोवळीशार दाढी, करड्या निळसर डोळ्यांनी मला भुलवू लागला. अण्णाला उचलून एकदा आणला घरी, नि रात्र त्यानं तिथंच काढली. त्याच्या स्पर्शागणिक काका आठवायचा, किळस यायची, सैद हाताबरोबर चाळे करायचा, सारं भय, ग्लानी, तिरस्कार विरून जायचे. सैदने काही दिवसांनी निकाह केला. अण्णाची भट्टीची दारू प्यालो. रडून रडून आटून गेलो.
सैद निकाहच्या दिवशी येऊन भेटून गेला. त्याला स्त्री-सहवासाचा माझ्यासारखा तिटकारा नव्हता. त्याला माझ्याकडून जे सुख मिळत होतं, ते त्याची ‘मेहरुन्निसा’ही देऊ शकत होती. कैद्याला भेटायला जावं, आणि जेल-मास्टरने “तुमचं भेटण्याचं एक मिनिट उरलं,” असं सांगावं; तसा तो निकाहाआधी सांगून गेला. ओठ ओठांनी ओले करून गेला, शेवटचे. ते मिनिटही लवकर संपलं असं वाटलं. हेही लवकरच संपेल.
मरणाआधीचं एक मिनिट
अण्णाच्या लिव्हरनं अखेरीस जीव सोडला. मरताना ढसाढसा रडला, माझ्या मांडीवर कोसळला. माय भेटेल या आशेनं हसत सुटला. माझ्या चेहऱ्याकडं, खोल पाणावलेल्या डोळ्यांकडं पाहून पुन्हा कोसळला, तो नेहमीसाठीच. मयतीला सैदनं हजेरी लावली. पार गळून गेला होता. शब्दाने बोलला नाही. हनीफभाई म्हणाला, “पांढरी कावीळ झाली. पोटुशी मेहरुन्निसा मायक्याला परत गेली.” रात्रीच्या वक्ताला खंगलेला सैद दाराशी आला. “जगणार नाहीये खूप दिवस,” म्हणून सांगितलं. तोही रडला. अण्णासारखाच त्याचा झिजलेला देह माझ्या मांडीवर कोसळला. अंगात मांस उरलं नव्हतं, बरगड्या फुप्फुसाला चिकटल्यासारखं झालं होतं. त्यातून त्याचं हृदय माझ्या मांडीला स्पर्शत होतं. त्याला मात्र माझ्या मांडीवर मरण प्राप्त होणं समाजमान्य नव्हतं. आठवड्याभरात सैदच्या जाण्याची बातमीही कानी पडली. मला मात्र असं कोसळायला कोणाचीच हक्काची मांडी नव्हती. . हे नक्की होतं की माझीही मिनिटं संपत आली होती. शेवटचं एक मिनिट, शेवटचे काही सेकंद.
मरणाआधीचे काही क्षण
“वाढवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठी श्रीरंग बोलवितो ।।
अंतकाळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ।।”
अण्णानं जाताना मला माफ केलं असावं. सैदही मनोमन अल्लाहची विनवणी करत असेलच, कयामतची वाट बघत. राहता राहिलो मी. मीही माफ करीनच म्हणतो — मला, तुला, सैदला, अण्णाला. काका मरताना प्रायश्चित्त करू लागला, तर त्याचं तू बघ. एवढा वेळ उभा आहेसच — निरर्थक. तुझ्या असण्याचा काहीतरी तर फायदा होईल.
बाकी शेवटचा क्षण. मरण. यायचं होतं, आलं एकदाचं.