डॉ. चैतन्य शिनखेडे

गुप्ततेचे दृश्यभान देणारे अद्भुत जग



back

प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे तीन प्रकारात मोडते. एक – सार्वजनिक. दोन – खाजगी. आणि तीन – गुप्त. गुपित ठेवण्याचा अर्थ म्हणजे केवळ एखादी माहिती स्वतःपूर्ती मर्यादित ठेवणे एवढाच नसून तर ती इतरांपासून लपवणे असा सुद्धा आहे. एखादी व्यक्ती गुपित का ठेवते या प्रश्नाचे विविध आयाम आहेत. गुपित ठेवण्यामागे जोखीम तर आहेच पण एक प्रकारचा गूढ संतोष सुद्धा दडला आहे. गुपित ठेवणे हे सहज शक्य होत नाही. त्यासाठी तुमचा तुमच्या मनावर व बुद्धीवर ताबा हवा. तो नसेल तर गुपिते सत्ता पलटवू शकतात, भावनांचा कल्लोळ माजवू शकतात, हिंसा भडकवू शकतात, नाती घडवू किंवा बिघडवू शकतात किंवा समाज ढवळून काढू शकतात. अनेकदा काही गोष्टी गुप्त ठेवण्यातच समाजाचे किंवा एखाद्या व्यक्तीचे हित असते असे सुद्धा म्हणतात. एक ठराविक बौद्धिक स्तर गाठल्यावर मनुष्याचा कल वैयक्तिक गोष्टी गोपनीय कशा ठेवता येतील याकडे वळतो. एखादी गोष्ट गुपित ठेवली म्हणजे ती इतरांपासून लपवली असे समजले जाते. याचा अर्थ त्या गोष्टीचे स्वतःला ज्ञान असते. परंतु ती गोष्ट स्वतःलाच ठाऊक नसेल तर? इथे फ्रॉईडच्या मनोविश्लेषणाविषयी चर्चा किंवा जौहरी विंडोचे (जोसेफ लुफ्ट यांनी ‘स्व’ ला समजून घेण्यासाठी तयार केलेली एक मानसशास्त्रीय पद्धत) विश्लेषण देण्याचा उद्देश नाही. तरी एक सर्वसाधारण भासणारा क्लिष्ट प्रश्न उभा राहतो  – आपण स्वतःपासूनच एखादी गोष्ट गुपित ठेऊ शकतो का?

ॲपल टीव्ही प्लसतर्फे नुकतीच रिलीज झालेली टेलिव्हिजन सिरीज ही वरील प्रश्नाला (शक्यतेला) वास्तविकतेची जोड देते. गुप्ततेचा एक चेहरा असाही असू शकतो हे सेवेरन्स मध्ये मांडल्या गेलेल्या अभिनव आणि भन्नाट कथेमुळे समजते. सेवेरन्स चे कथानक काल्पनिक असले तरीही त्याचा सध्याच्या जगाशी जोडणारा दुवा समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय अंगाने आकलन करण्याचा प्रयत्न इथे केला आहे.  ही कथा डिस्टोपिअन काळात रचली आहे. पाश्चात्य चित्रपट निर्मात्यांना डिस्टोपिअन समाजाचे चित्रण करण्यात भारी रस आहे. डिस्टोपिआ म्हणजे एक भविष्यातील अशी एक काल्पनिक जागा, जिथे समाज विकोपाला गेला आहे, पर्यावरणाचा ह्रास झाला आहे, अराजकता माजली आहे, लोकांमधील प्रेम आणि जिव्हाळा लोप पावलेला आहे, सहानुभूती कमी झाली आहे, नैतिकतेचा अंत झाला आहे आणि तंत्रज्ञानाने मनुष्यालाच त्याचे खेळणे बनवून ठेवले आहे. जॉर्ज ऑर्वेलच्या १९८४ या कादंबरीमध्ये अशा समाजाचे उत्कृष्ट वर्णन आले आहे. ‘लुपर’, ‘ब्लेड रनर’, ‘ड्यून’, ‘मायनॉरिटी रिपोर्ट’, ‘पर्ज’, ‘ड्रेड’, ‘ऑब्लिव्हियन’ यासारख्या चित्रपटांनी डिस्टोपिअन जग उत्तमरीत्या चित्रित केले आहे. डिस्टोपिअन चित्रपट किंवा टेलिव्हिजन सिरीज मध्ये तंत्रज्ञानाने उत्कर्षबिंदू गाठला असतो परंतु माणसाच्या व्यक्तिमत्वाची आणि नैतिकतेची वाताहत झालेली दिसते.  

सेवेरन्स ही नऊ भागांची मालिका या वर्षी १८ फेब्रुवारीला ॲपल टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. डॅन एरिक्सन यांनी सेवेरन्स चे लिखाण केले आहे आणि हे  निर्माते सुद्धा आहेत. ही मालिका कोणत्याही पुस्तकावर आधारित नाही किंवा कशाचा रिमेक नाही. एरिक्सन यांना लॉस एंजेलिस शहरामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करताना या मालिकेची कल्पना सुचली आणि अथक प्रयासांनी ती त्यांनी अस्तित्वात आणली. या मालिकेचे दिग्दर्शन बेन स्टीलर यांनी केले आहे. बेन स्टीलर हे हॉलिवूडमध्ये प्रामुख्याने अभिनेता म्हणून ओळखले जातात. ‘द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी’ आणि ‘नाईट ॲट द म्युझिअम’ या चित्रपटांमधील त्यांची भूमिका खूप गाजली आहे. स्टीलर हे १९८७ पासून या क्षेत्रात आहेत. मुख्यतः विनोदी चित्रपट आणि भूमिका करणारे स्टीलर सेवेरन्स सारख्या चिकित्सक आणि गंभीर विषयाकडे दिग्दर्शनाच्या आयमातर्फे वळल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले होते. परंतु स्टीलर यांच्या अनुभवाने आणि कौशल्याने या मालिकेने एक वेगळी उंची गाठली आहे. 

आपण सेवेरन्स येथे पाहू शकता.

सेवेरन्स मध्ये आपण एका गोपनीय संघटनेमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी जोडले जातो. या चारही लोकांनी ‘ल्युमन’ या संस्थेत सामील होण्याअगोदर ‘सेवेरन्स’ नावाची एक वैद्यकीय शस्त्रक्रिया केली आहे जेणेकरून त्यांची स्मृती ही वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफमध्ये विभागली गेली आहे. सेवेरन्स या शब्दाचा अर्थ विच्छेदन असा होतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे कर्मचारी जेव्हा ऑफिसच्या बाहेर जातात तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये काय घडले किंवा आपण तिथे काय काम करतो याची स्मृती नसते आणि ते जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची स्मृती नसते. आपण बाहेरच्या जगात कोण आहोत किंवा काय करतो याची जरासुद्धा जाणीव या लोकांना नसते. ल्युमन या संस्थेमध्ये अशा कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र परंतु बंदिस्त मजला आहे. तिथे सूर्यप्रकाश येत नाही आणि बाहेरच्या जगाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करता येत नाही. सेवेरेड करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात एक चिप बसवली आहे. रोज ऑफिसला येताना आणि जाताना ते एक रहस्यमयी लिफ्टचा वापर करतात आणि या लिफ्टमध्येच त्यांची स्मृती विभागली जाते. कर्मचाऱ्यांच्या स्मृतीचे जरी दोन भागात विच्छेदन केले असले तरी नेमलेले काम करण्यासाठी लागणारी त्यांची कौशल्ये शाबूत असतात. हे कर्मचारी ‘मॅक्रो डेटा रिफाईनमेन्ट’ या विभागात काम करतात आणि यांचे काम म्हणजे नऊ ते पाच या वेळात कॉम्प्युटर समोर बसून एका ठराविक संदर्भातील आकड्यांचे वर्गीकरण करायचे. यांचे कॉम्प्युटर केवळ या कामापुरतेच मर्यादित आहेत. त्यावर इतर काहीच करता येत नाही. ल्युमन ही प्रचंड मोठी कंपनी आहे आणि तिथे विविध विभाग आहेत. परंतु हे विभाग एकमेकांशी जोडलेले नाहीत. मुळात आपण जे काम करतो आहे त्याचे उद्दिष्ट आणि परिणामचं या कर्मचाऱ्यांपासून गुपित ठेवले आहे. या ऑफिसची क्लॉस्ट्रोफोबिक आणि चक्रव्यूही रचना, नीरसवाणे काम, दूरस्थता, अडकल्याची जाणीव, विरळ लोकसंख्या, विक्षिप्त अधिकारी, शिस्तशीर वातावरण, कडक नियम, भीतीदायक शिक्षा यासारख्या घटकांमुळे सर्व ल्युमन कंपनी संशयास्पद आणि तणावपूर्ण वाटते. 

सेवेरन्स मध्ये मांडलेली कल्पनाच इतकी नाविन्यपूर्ण आणि विचारप्रवृत्त करणारी आहे की कथेकडे दुर्लक्ष होते. मुळात ही कथा मार्क, हेली, डिलन आणि इरविंग या चार सहकाऱ्यांची आहे. हे चौघेही सेवेरेड आहेत. मार्क हा या टीमचा प्रमुख आहे. सेवेरन्स प्रक्रिया केल्याने या चौघांच्या व्यक्तिमत्वाचे दोन भाग झाले आहेत आणि दोन्ही एकमेकांपासून दडले आहेत. त्यामुळे हि चौघेही सतत आपला ‘आऊटी’ (बाहेरील जगातील व्यक्तिमत्व) कसा असेल याच विचारात मग्न असतात. मला ल्युमनच्या बाहेर परिवार असेल का? मला लाईफ पार्टनर असेल का? असला तर तो कसा असेल? मला अपत्य असेल का? माझे काय छंद असतील? माझा मित्र परिवार असेल का? मी कुठे राहत असेन? मी घरी गेल्यावर रोज काय करत असेन? माझा स्वभाव कसा असेल? मी सोशल असेन का? मला काय खायला आवडत असेल? अशा अगणित प्रश्नांनी हे चौघे ग्रासलेले दाखवले आहेत. ल्युमनमधून परतल्यावर आपल्याला केवळ मार्कचे खाजगी जीवन दाखवले आहे. हेली, डिलन आणि अरविंगचे खाजगी जीवन लेखकाने आपल्यापासून गुपित ठेवले आहे. ते शेवटच्या भागामध्ये आपल्यासाठी रोमांचक पद्धतीने उघडकीस आणले आहे. मार्क ल्युमनबाहेर कंपनी क्वार्टरमध्ये एकटा राहताना दाखवला आहे. त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी एका कार अपघातात निधन झाले आहे. त्याला एक बहीण आणि मेहुणा आहे. मार्कचे खाजगी जीवन दुःखदायक चित्रित केले आहे. तो त्याच्या पत्नीच्या मृत्यूला अजून पचवू शकला नाही हे सतत जाणवत राहते. त्याच्या बहिणीशी त्याचे जवळचे प्रेमाचे संबंध आहेत पण त्याच्या मित्रपरिवारात त्याच्या सेवेरन्स च्या निर्णयाबाबतीत नाराजी आहे. मार्कचे घर आणि एकूणच जीवनशैली अलिप्त, कंटाळवाणी आणि गंभीर प्रतीत होते. ज्याप्रमाणे मार्कच्या ‘ईनी’ ला (ल्युमनमधील/ ऑफिसमधील व्यक्तिमत्व) त्याच्या बाहेरच्या व्यक्तिमत्व आणि जीवनाविषयी कुतूहल आहे तसेच मार्कच्या आऊटीला त्याच्या ‘ईनी’ विषयी जिज्ञासा आहे. तो अनेकदा ल्युमनमधील कामाविषयी, वर्क कल्चरविषयी, सहकार्यांविषयी विचार करताना दाखवला आहे. मी ल्युमनमध्ये नेमके काय काम करत असेन? माझे सहकारी कोण आणि कसे असतील? माझे वरिष्ठ कसे असतील? मी माझ्या कामाविषयी खुश असेन ना? मला ल्युमनमध्ये कोणी त्रास तर देत नसेल ना? अशा प्रश्नांनी मार्क भेडसावतांना दिसतो. एकाच मनुष्याचे दोन स्वतंत्र जीवन व व्यक्तिमत्व अस्तित्वात असणे आणि ते एकमेकांपासून अनभिज्ञ असणे ही सर्वसाधारण बाब नव्हे. या कथेतील पात्रांनी ’सेवेरन्स’ करण्याचा निर्णय तर घेतला आहे परंतु त्यांचा ऑफिसमधील ‘अवतार’ हा एका संपूर्णपणे स्वतंत्र विचारसरणीचा आणि धोरणांचा आहे हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ‘ईनी’ चे ‘आऊटी’ च्या जीवनावर नियंत्रण नाही व ‘आऊटी’ चे ‘ईनी’ च्या. एकाच व्यक्तीचे दोन व्यक्तिमत्व तयार होऊन एकमेकांपासून ते गुपित ठेवल्याने दोन्ही व्यक्तिमत्व स्वतंत्ररित्या कार्यरत आहेत आणि एकमेकांना बांधील नाहीत. या पैलूमुळेच सेवेरन्स अधिक मनोरंजनात्मक आणि थरारक झाले आहे. 

सेवेरन्स चे मूळ कथानक ल्युमनमधील सेवेरेड कर्मचाऱ्यांनी कंपनी विरोधात केलेले बंड हे आहे. मार्कच्या सहकाऱ्यांनी सर्व जाचक नियमांना झुगारून कंपनीच्या धोरणांविरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा आणि आपल्या आऊटीला ल्युमनमधल्या संशयास्पद आणि धोकादायक वर्क कल्चरची जाणीव करून देण्यासाठी सेवेरन्स प्रक्रियेतील शोधलेले लूपहोल सेवेरन्स ला अधिक दमदार बनवतात. ल्युमनमध्ये काम करणारा मार्कचा सहकारी पीटी एक दिवस अचानक कंपनीमधून गायब होतो. त्याच्या अचानक दृष्टीआड होण्याने मार्क व टीम अस्वस्थ होते परंतु त्यांना वरिष्ठांकडून शांत करण्यात येते. दुसऱ्या भागात पिटी मार्कच्या आऊटीशी संपर्क साधताना दिसतो. साहजिकच मार्कचा आऊटी पिटीला ओळखत नाही पण पिटी मार्कला आपण ल्युमनमध्ये सर्वात चांगले मित्र आहोत याची कल्पना देतो. पिटी हा अनसेवेरेड प्रक्रियेतून गेल्याचे दाखवले आहे. ल्युमन पिटीच्या शोधात असते कारण पिटीची वर्क लाईफची स्मृती त्याच्या मूळ आयुष्यात परत आली आहे. पिटी मार्कला ल्युमनमध्ये कर्मचाऱ्यांची कशी पिळवणूक चालली आहे हे सांगतो आणि ल्युमन कंपनी केवळ कामाच्या माध्यमातूनच नव्हे तर कर्मचाऱ्यांना एक माणूस म्हणून योग्य वागणूक न देता फसवणूक करीत आहे याची जाणीव करून देतो. दुर्दैवाने पिटी अनसेवेरेडची वैद्यकीय शस्त्रक्रिया पेलू शकत नाही आणि त्याचा मृत्यू होतो. यावरून हे सुद्धा कळते की सेवेरन्स हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. पिटीच्या प्रसंगावरून मार्क (आऊटी) सावध होतो. दरम्यान ल्युमनमध्ये पिटीच्या जागेवर नुकतीच रुजू झालेली हेली ल्युमनचे विक्षिप्त वर्क कल्चर आणि मुळात वर्कचं सहन करून शकत नाही आणि तिचा कंपनीसोबतचा कॉन्ट्रॅक्ट संपवण्याचा असफल प्रयत्न करते. तिच्या सततच्या पळून जाण्याच्या असफल प्रयासांमुळे आणि वेळोवेळी वरिष्ठांकडून मिळालेल्या संशयास्पद संकेतांमुळे मार्कची टीम ल्युमनच्या उद्देशांवर शंका घ्यायला लागते. हेली टीममधील सर्वांना ल्युमन विरोधात भडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि यात सफल सुद्धा होते. शेवटी मार्क, हेली, डिलन आणि अरविंग त्यांच्या आऊटींच्या लाईफवर काही काळासाठी ताबा मिळवण्यासाठी योजना तयार करतात.

ल्युमनने त्यांच्या कर्मचाऱ्यांपासून अनेक गुपिते ठेवल्याने त्यांच्या मनात बंडाचे वारे वाहायला लागतात यात शंका नाही. मुळात आपण काय काम करतो हेच लपवल्याने संस्था आणि कर्मचारी यांच्यातला विश्वासाचा धागा तुटला आहे. अनेक गोष्टी लपवल्याने साहजिकच ल्युमनमध्ये कर्मचाऱ्यांच्या स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आली आहे. सातव्या भागात मार्क आणि हेली सर्व बंधनांना झुगारून सेवेरन्स मजल्यावरील इतर विभागांचा शोध घ्यायला निघतात तेव्हा त्यांना एका विभागात एअर-कंडिशन्ड खोलीत शेळीपालन सुरु असल्याचे दिसते. आता ल्युमनसारख्या हाय-टेक कंपनीमध्ये शेळ्या का असाव्यात हेच मार्क आणि हेलीच्या लक्षात येत नाही. ही बाब प्रेक्षकांच्या सुद्धा लक्षात येत नाही. सेवेरन्स मध्ये मार्क व सहकाऱ्यांनापासून जी गुपिते ल्युमनने ठेवली आहेत तीच प्रेक्षकांपासूनसुद्धा गुपितच ठेवली आहेत. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा प्रसंगी बावचळल्यासारखा होतो. पहिल्याच भागामध्ये मार्कची विक्षिप्त बॉस जी बाहेरील आयुष्यात त्याची शेजारी दाखवली आहे त्याच्या डोक्यावर चिडून एक वस्तू फेकून मारते. ऑफिसमधून बाहेर आल्यावर मार्कच्या आऊटीला आपल्या डोक्याला पट्टी का बांधली आहे हे कळतच नाही. त्याच्या मनात संशय निर्माण न व्हावा यासाठी त्याच्या कारमध्ये ल्युमनकडून एक चिट्ठी ठेवली जाते ज्यामध्ये त्याला ‘बॉक्सेस घेऊन जाताना पाय घसरल्याने लागले’ असे लिहिले असते आणि एक व्हीआयपी कुपन भेट म्हणून दिले जाते. ल्युमनचा हा छुपा कारभार सतत सुरु असतो. 

आपण जरी सेवेरन्स चे ‘गुपित’ या आयामामार्फत आकलन करीत असलो तरी या सिरीजकडे समाजशास्त्रीय (मार्क्सवादी  आणि हुकूमशाही) विचारचौकटीत  किंवा मानसशास्त्रीय (विभाजित व्यक्तिमत्व आणि अभिजात अभिसंधान) अंगानी बघणे गरजेचे ठरते. या कथेमधील प्रमुख पात्रांनी सेवेरन्स शस्त्रक्रिया त्यांच्या परवानगीने केली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे विच्छेदन व्हावे ही त्यांची स्वतःची इच्छा आहे. त्यासाठी ल्युमनने त्यांना जबरदस्ती केलेली नाही. मार्क, हेली, डिलन आणि इरविंग या चौघांच्या आउटीने सेवेरन्स साठी संमती दिली आहे.या सर्व पात्रांची अशी इच्छा आहे की त्यांचे वर्क लाईफ ही पर्सनल लाईफ पासून गुप्त ठेवलेली बरी! या दोन्ही भूमिका स्वतंत्र हव्यात आणि यांचा एकमेकांशी संबंध नको. ही वस्तुस्थिती नजीकच्या भविष्यातील माणसाच्या संभाव्य विचारसरणीवर प्रकाश टाकते. अशी कोणती कारणे असतील ज्यांच्यामुळे या चौघांनीही असा टोकाचा निर्णय घेतला? मार्कचे खाजगी जीवन लेखकाने प्रकट केल्याने त्याने त्याच्या पत्नीच्या मृत्यूने झालेले दुःख पचवू शकत नाही म्हणून हा निर्णय घेतला हे स्पष्ट होते. परंतु ल्युमनमध्ये अनेक सेवेरेड कर्मचारी काम करताना दाखवले आहेत. त्यांची सेवेरन्स करण्यामागची कारणे अज्ञात किंवा गुपित आहेत. ऑफिसचे काम घरी घेऊन जायला कोणाला आवडतं? किंवा ऑफिसमध्ये कामात व्यस्त असताना खाजगी गोष्टी कामात व्यत्यय आणतात. त्यामुळे ऑफिस आणि खाजगी जीवन यांना जोडणारा दुवाच तोडला तर हे दोन्ही आयुष्यं स्वतंत्ररीत्या जगता येतील. वरवर पाहायला गेले तर ही विचारसरणी एवढी भयंकर वाटत नाही. किमान घरी आल्यावर ऑफिसची कटकट बंद होते आणि परिवाराला वेळ देता येतो. कॉर्पोरेटमध्ये कामातील आनंद दिवसागणिक कमी होत चालला आहे. कामातील अर्थशून्यता वाढते आहे आणि मानसिक आरोग्य ढासळते आहे. सेवेरन्स पाहिल्यावर तर काम हे माणसाला एक ऐहिक आणि भावनाशून्य मशीन बनवत असल्याची जाणीव होते. अशा परिस्थितीत लोकांनी ’सेवेरन्स’चा निर्णय घेण्यात काही हरकत वाटत नाही. जर कामाच्या ठिकाणी वैयक्तिक आयुष्य गुपित राहिले आणि वैयक्तिक आयुष्यात कामाची आठवणच नसेल तर दोन्ही आयुष्यानं समान न्याय देता येतो. गुपित या आयामामार्फत सेवेरन्स कडे अशा दृष्टिकोनातून बघितले तर ही प्रक्रिया आक्षेपार्ह वाटत नाही. परंतु आपल्या दृष्टीस जे येते त्याचा बोध अनेकदा वेगळा असतो. लक्ष्यार्थ आणि व्यंगार्थ यातला फरक समजणे आवश्यक आहे. सेवेरन्स ने तयार झालेले गुपित व्यक्तीला स्वतःपासून तोडते आहे. स्व: ची भावना नाहीशी होते आहे. एकाच व्यक्तिमत्वाचा विच्छेद होऊन बहुआयामी घटक तयार होऊन ते दोन्ही व्यक्तिमत्वांवर प्रभाव टाकत आहेत. स्वत्वाची आधिभौतिक संकल्पनाच नाहीशी होते आहे.

मार्क आणि त्याची टीम सेवेरेड असल्याने त्यांच्यासाठी झोप हा प्रकारचं अस्तित्वात नाही. त्यांच्या आऊटीने झोप घेतल्याने त्यांना झोपेची तशी आवश्यकता नाही. पण यामुळे त्यांना आपण २४ तास कामच करतोय असे वाटत राहते. निद्रानाश झाल्याने जसे वाटेल तशीच भावना मार्कच्या टीमच्या मनात येत असते म्हणून ल्युमन त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करण्यासाठी जॅझ पार्टी, वाफल पार्टी, वेलनेस सेशन आयोजित करत असते. ल्युमन अशा पार्ट्या देतांना त्यामध्ये पण गुप्तता ठेवतांना दिसते. अशा प्रकारची फुटकळ बक्षिसं कर्मचाऱ्यांमध्ये फुटकळ आशावाद कायम ठेवण्यासाठी आणि त्यांना कामात गुंतवूनच नव्हे तर कामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दिली जातात हे समजून येते. इथे पावलोवच्या अभिजात अभिसंधान (क्लासिकल कंडिशनिंग) या मानसशात्रीय सिद्धांताची आठवण होते. या सिद्धांतानुसार जेव्हा दोन उत्तेजना (स्टिम्यूली) एकमेकांशी जोडल्या जातात तेव्हा एक तेव्हा मनुष्य किंवा प्राण्यामध्ये एक नवा प्रतिसाद तयार होतो. याचा संदर्भ इथे उत्तम कामगिरी करताच बक्षिसासाठी उत्साह वाटणे असा ओळखता येऊ शकतो. हेलीच्या पात्राची दुभंगता मानसशास्त्रीय अंगाने समजून घेतल्यास सेवेरन्स चे लिखाण आणि चित्रण किती उच्च कोटीचे आहे हे लक्षात येईल. हेली पहिल्याच दिवसापासून ल्युमनचा द्वेष करत असते. ती तिथून पळून जाण्याचे अविरत प्रयत्न करते पण अयशस्वी ठरते. ती काम करण्यास नकार देते तर तिला ‘ब्रेक रूम’ मध्ये एक औदासीन्य शिक्षा दिली जाते. पण त्यातही फसते. हेली तिच्या आऊटीसाठी ती ल्युमनमध्ये खुश नाही आणि राजीनामा देण्याची याचना करणारा व्हिडीओ जबरदस्ती शूट करून आऊटीला पाठवते परंतु तिची या कामापासून सुटका नाही हे तिला स्वतःच्या आऊटीचा व्हिडिओ बघितल्यावर होते. या व्हिडिओमध्ये हेलीची आऊटी धूर्त आणि भावनाशून्य वाटते. ती हेलीच्या ईनीला धमकावते. हेलीला ती मनुष्य नसून केवळ तिची गुलाम आहे असे सांगते. तिला आऊटीच्या निर्णयांचे मुकाट्याने पालन करावे लागेल नाहीतर परिणाम वाईट होतील असे सांगण्यात येते. हा व्हिडीओ पाहिल्यावर हेली स्थिर होण्याऐवजी अधिक चवताळते आणि आत्महत्येचा प्रयत्न करते. येथे हेलीला मॅसोकीस्टिक (स्व-क्लेशात सुख मानणारे) म्हणता येणार नाही. रहस्यामुळे एकाच शरीराच्या दोन विभिन्न सचेतना निर्माण झाल्याने त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. या सचेतना एकमेकांचा द्वेष करत आहेत. आऊटी आणि ईनी हे जरी भिन्न व्यक्तिमत्व असले तरी अभिमुखतेमधील साधर्म्य मिटत नाही हे अरविंग आणि बर्टच्या प्रेमप्रकरणातून सिद्ध झाले आहे. हे दोघे ल्युमनमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडतात परंतु कंपनीच्या दडपशाहीमुळे यांचे प्रेम व्यक्त होत नाही. हे दोघेही बाहेरच्या आयुष्यात समलैंगिक दाखवले आहेत त्यावरून व्यक्तिमत्वाचे विच्छेदन जरी झाले असले तरी लैगिक अभिमुखता बदलली गेली नाही असा निष्कर्ष काढता येतो. म्हणजे गुपित हे लैंगिक निवडीवर प्रभाव टाकू शकत नाही.   

सेवेरन्स चे प्रोडक्शन डिजाईन अप्रतिम आहे. या सिरीजमधल्या प्रत्येक भागात (एपिसोड) विविध प्रतीके वापरली आहेत जी रहस्यमय वातावरण तयार करण्यास मदत करतात. सर्व पात्रांची १९६० च्या दरम्यान लोकप्रिय झालेली वेशभूषा, उत्कृष्ट अभिनय, नेमके आणि मर्मभेदक संवाद, गूढ आणि अगम्य संगीत, ऑफिसमधल्या फर्निचर पासून ते पायाभूत सुविधांपर्यंत सगळ्यातून जाणवणारा ऐहिकवाद, सीरिजचे धडकी भरवणारे भीतीदायक टायटल सॉंग हे या सीरिजला अव्वल बनवतात. सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय हा सीरिजला अधिक गूढ आणि रोमांचक बनवतो. मार्क (ॲडम स्कॉट), हेली (ब्रिट लोवर), डिलन (झॅक चेरी), अरविंग (जॉन टरटीरो) या चौंघांनी साजेसा अभिनय केल्याने सेवेरन्स मनात घर करतो. या चौघांच्या वरिष्ठांचे काम हार्मनी कोबेल (पॅट्रिशिया आर्क्वेट), मिस्टर मीलचीक (ट्रामेल ट्रीलमॅन), नॅटली (सिडनी अलेक्झांडर) यांनी केले आहे .या सर्वांची पात्र ल्युमनच्या धूर्त आणि छुप्या कारभाराची साक्ष पदोपदी देतात. 

सेवेरन्स ला जर कार्ल मार्क्सच्या विचारसरणीशी जोडले तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. संपूर्ण ल्युमन कंपनीच भांडवलशाहीचे प्रतिनिधित्व करते. ल्युमनच्या छुप्या कारभाराने आणि कर्मचाऱ्यांच्या विचारांचे यांत्रिकीकरण करण्याच्या प्रयत्नांने तेथील वातावरण हे भावनाशून्य झाले आहे. अधिकाधिक कामे मशीनमार्फत (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) करवली जात आहेत. जी कामे  करण्यासाठी मशीन अजून बनवले गेले नाही त्यावर ल्युमनला माणसांवर अवलंबून राहावे लागत आहे. पण हे अवलंबित्व फार काळासाठी नाही आहे. एकदा मशिन्स/बॉट्स तयार झाले की ते माणसाची जागा घेतील हे स्पष्ट आहे. यामुळेच कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचे बाजारीकरण अथवा वस्तूकरण झाले आहे. उत्पादनातील आनंद कर्मचाऱ्यांना मिळत नसून त्यांना ढोरासारखे राबवले जात आहे. इथे मार्क्सच्या एलिनेशन (अलगाव) संज्ञेची आठवण होते. मार्क्सने ही संकल्पना आधुनिक जगात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी बदलत आहे हे स्पष्ट करण्यासाठी मांडली होती. मार्क्सने कामगार त्याच्या श्रमामधून तयार होणाऱ्या उत्पादनाशी कसा दुरावला जातो याचे विवेचन केले आहे. ल्युमनमधली मागणी, उत्पादन आणि वितरण प्रक्रिया तेथील कर्मचाऱ्यांसाठी गुपित ठेवली आहे. जर कर्मचाऱ्यांना आपण काय उत्पादित करतोय हेच माहित नसेल तर ते कामाचा हेतू, प्रक्रिया आणि शेवटी एकमेकांपासून ते एलिनिएटेड होतीलच. ल्युमन जरी काल्पनिक कंपनी दाखवली असली तरी वास्तविक बाजारपेठा अशाच रीतीने कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना अनभिज्ञ ठेवून अस्थिर व्यवस्था सर्वच ठिकाणी तयार होताना दिसते आहे. सेवेरन्स मध्ये बाहेरच्या जगात सेवेरन्स प्रक्रियेला विरोध होताना लेखकाने दाखवले आहे. अशा टीका आणि आंदोलनापश्चातही ल्युमनसारख्या बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांनी सरकारी यंत्रणांवर दबाव आणून ही पद्धत कायम ठेवली आहे. म्हणूनच १९३६ मध्ये केन्स या अर्थशात्रज्ञाने मुक्त बाजारपेठेला लगाम घालून सामान्य लोकांच्या हातात खरेदीशक्ती राहील अशी योजना करण्याचे आवाहन केले होते पण सध्या नवं-उदारमतवादामध्ये याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. अठराव्या शतकामध्ये मार्क्सने वर्गसंघर्ष, द जनरल इंटेलेक्ट, द्वंद्वात्मक भौतिकवाद यांसारख्या संकल्पना आणि सामाजिक मुद्दे मांडले जे आजही अस्तित्वात आहेत. गाभा तसाच आहे. फक्त आवरणे बदलली आहेत. मार्क्स बुर्जूआ (स्वामित्व) आणि प्रोलॅटेरिअट (शोषित) यांच्या संघर्षाविषयी बोलतो. दोन्ही वर्गात समानता नाही. परंतु वर्चस्व उच्चभ्रू लोकांचे आहे. शोषितांमध्ये बंड किंवा क्रांती होऊ नये म्हणून त्यांना सतत कामात व्यस्त ठेवायचे आणि एका प्रबळ विचारसरणीचा त्यांच्यावर मारा करायचा. 

ल्युमन कंपनीचे संस्थापक किअर इगन यांनी अशीच विचारसरणी तयार केली आहे आणि कंपनीचे एक बायबल आहे त्यात ती सविस्तर लिहिली आहे. याशिवाय ल्युमनच्या आत एक मोठ्ठे संग्रहालय आहे जिथे ल्युमनच्या सर्व बड्या अधिकाऱ्याचे मेणाचे पुतळे आहेत आणि त्यांचे एकाधिकारशाही आणि मुस्काटदाबीचे कोट्स फ्रेम करून लावले आहेत. त्यामुळे क्रांतिकारक बदल आणि उठावाची प्रेरणाशक्ती कर्मचाऱ्यांमध्ये तयार होणे अवघड आहे. असे असले तरी मिस्टर मीलचीक यांच्या चुकीमुळे मार्कच्या मेहुण्याने त्याच्या घराबाहेर ठेवलेले स्वातंत्र्य या विषयावर लिहिलेले एक पुस्तक (सरप्राईझ गिफ्ट) ल्युमनच्या सेवेरन्स मजल्यावर येते आणि मार्क व टीमच्या हाती लागते. या पुस्तकातील लिखाण या सर्वांसाठी नवे आणि परिवर्तनशील ठरते. एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलाला जसे जगाविषयी कुतूहल असते तसेच कुतूहल मार्कच्या टीमच्या डोळ्यात दिसते. मिलीचीक आणि कोबेल यांच्यापासून लपवुन हे पुस्तक सर्वजण वाचत राहतात. या पुस्तकात मार्कच्या मेहुण्याने साहित्य जगातील त्याचे अनुभव आणि त्यातून तो कसा संघर्ष करत यशस्वी झाला याविषयी लिहिले असते. सत्ताधीशांविरोधात बंड कसे पुकारायचे आणि आपली जागा कशी तयार करायची याचे मार्गदर्शन यात केले असते. या पुस्तकामुळे मार्क आणि टीमला संघर्ष करण्याची उमेद मिळते. त्यांना भांडवलशाहीविषयी कळते. त्यांचे कसे शोषण होत आहे याची जाणीव होते. किअर इगनची विचारसरणी आपल्याला दडपण्यासाठी कशी बनवली आहे हे या पुस्तकामुळेच मार्कच्या लक्षात येते. आणखी एक महत्वाची बाब अशी की मार्क आणि टीमचे वरिष्ठ सेवेरेड नाहीत. याचा अर्थ सेवेरन्स प्रक्रिया निरोगी नाही आणि फसवी आहे हेही त्यांच्या लक्षात येते. 

सध्याच्या युगात कॉर्पोरेट कल्चर हे कमालीचे बिघडले आहे हे सर्वज्ञात आहे. लोकं पर्सनल आणि वर्क लाईफचा बॅलन्स करण्यासाठी झगडताना दिसतात. काम करून घरी आल्यावरही अनेकदा पुन्हा ऑफिसच्या कामात गुंतावे लागते. सोशल मीडियामुळे सतत ऑफिसशी कनेक्ट राहावे लागते आणि त्यामुळे वैयक्तिक गोष्टींना वेळ देता येत नाही. कॉर्पोरेट किंवा आयटी क्षेत्रामध्ये कामाचा तणाव खाजगी आयुष्य कसे उध्वस्त करून टाकतो हे समजत नाही. कामामुळे वैयक्तिक नाते-संबंधांवर वाईट परिणाम होतांना दिसतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे चिंता, काळजी, नैराश्य, व्यसन आणि विविध प्रकारचे मानसिक आजार होय. दैनंदिन आयुष्यात जाणवणारी डोकेदुखी, हृदयरोग यासारखे आजार जीवनशैली चुकीची असल्याने भेडसावत नसून मुख्यतः भांडवलशाही आणि नवउदारमतवाद यासाठी कारणीभूत आहे. ल्युमन कंपनीची रचना आणि तेथील सेवेरेड कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचे आकलन केल्यावर गुपित या घटकाने इथे अस्पष्टता, अनियंत्रितता आणि दुःखमय वातावरण तयार केले आहे. ल्युमनमधील सेवेरेड कर्मचारी हे नवजात बाळे आहेत. ते निष्पाप आहेत. ल्युमनच्या चार भिंती हे त्यांचं जग आहे. बाह्य जग त्यांच्यापासून लपवून ठेवलं आहे. लहान मुले हट्ट करतील म्हणून आई-वडील त्यांच्या पासून अनेक गोष्टी लपवून ठेवतात कारण त्यांना त्यांचे चांगले-वाईट कळत नाही. पालकांचा आपल्या मुलांविषयीचा उद्देश हा नेहमी चांगलाच असतो. पण ल्युमनमध्ये गुपिते ही हितकारक नाहीत. ती फसवी आहेत. ल्युमनची वृत्ती निर्दयी आणि लबाड आहे. इथे लपवण्याच्या कृतीचा अर्थ मानवतेसाठी मानसिक विध्वंसक आहे. सध्याच्या जगात सेवेरन्स ही वैद्यकीय पद्धत अजून विकसित झाली नसली तरी ल्युमनसारख्या जाचक कंपन्यांनी कॉर्पोरेट क्षेत्र व्यापून टाकले आहे. कामातील अर्थहीनता ही वरिष्ठ वर्गाच्या छुप्या आणि लबाड हेतूंमुळे येते. टॉप-डाउन अप्रोचमध्ये प्रत्येक पायरीवर गुप्तपणे केलेले व्यवहार असतात. अशा परिस्थितीत अहेतुक आणि यादृच्छिक कामाच्या पद्धतीला आव्हान देऊन परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे की लाचारी पत्करून वर्चस्वाला नमन करून मुस्कटदाबी सहन करायची हा जगातील सर्वच कॉर्पोरेट आणि प्रत्येक क्षेत्रात जिथे हुकूमशाहीने मज्जाव केला आहे तेथील कामगारांसाठी अंतिम प्रश्न आहे.

सेवेरन्स  ही सिरीज म्हणजे एक सर्जनशील कलाकृती तर आहेच; परंतु लेखक-दिग्दर्शकांनी दृक-श्राव्य या परिणामकारक माध्यमाचा पुरेपूर उपयोग करत आपल्या आजच्या आणि उद्याच्या वैयक्तिक-कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील भयावहता कशी असेल हे दृश्य स्वरूपात प्रकट करून गुपित संकल्पनेच्या सामर्थ्याचा आगळा चेहरा सर्वांसमोर आणला आला आहे.

संदर्भसूची:

१)  पानसरे, गोविंद. मार्क्सवादाची ओळख. २०१५, कोल्हापूर: श्रमिक प्रतिष्ठान. 
२)  मेकलॉइड, एस. क्लासिकल कंडिशनिंग. २२ नोव्हेंबर, २०२१.  रिट्रिव्हड फ्रॉम: http://www.simplypsychology.org/classical-conditioning.html
३) केंस, जॉन, द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट, अँड मनी. १९३६, लंडन: मॅकमिलन. 
४) रायेद, एम. एस., सेवेरन्स इज सेरेब्रल, टेन्स साय-फाय शो विथ अ सिनेस्टर कॉर्पोरेट सेटिंग. रिट्रिव्हड फ्रॉम :https://medium.com/upthrust-co/severance-is-a-cerebral-tense-sci-fi-show-with-a-sinister-corporate-setting-832a70f78096 

डॉ. चैतन्य शिनखेडे हे सध्या स्कुल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते ग्लोबल मीडिया कल्चर अँड सिनारियो, माध्यम संशोधन, माध्यम मानसशास्त्र, आणि रेडिओ प्रोडक्शन हे विषय शिकवतात. त्यांचे संशोधन हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण कम्युनिटी रेडिओच्या शाश्वत विकासासंदर्भात आहे. याशिवाय त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून चित्रपट संकलनामध्ये शॉर्ट कोर्स केला आहे आणि त्यांना चित्रपट आणि टेलिव्हिजन सिरींजसंदर्भात लिखाण करायला आवडते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *