नावा-गावाचा पत्ता
ओल्ड मंक आणि अली सेठीची जुगलबंदी
आपल्यातील अब्राहमिक सूर नेमका पकडते
क्षीणावणारा प्रकाश तुझ्या सज्जावर
निरोपाची सांज पांघरतो. पसरलेलो, चरत
काहीतरी आंबट-गोड बहुतेक — खरंच
पूर्वग्रह काय चिकट चीज आहे. त्यातून पुरेशी
वाट शोधावी लागल्यावर, अखेरीस
माणूस स्वतःला वेगळे अंथरा-पांघरायला लागतो
अटकळ डोक्यात घातलेल्या शेणाजोगी —
टपकत, दुर्गंधी आणि घातकी — तरी
घेऊन चालणे अटळ. की गझलनेही आमचा नाद
सोडलेला, आम्ही पाय फरफटतो पंजाबी रॅपकडे
पण तरीही विसर काही पडेना. कर्कश केसरी धर्मवेड
हे आमच्या खांद्यावरचे क्रॉस या देशात. पण
एकजात नाही — हे भरडून काढणारे
ओझे तुझ्या खांद्यावर जरा जास्तीच —
सगळे अल्पसंख्याक असमान दर्जाचे असतात, पण
काही अल्पसंख्याक अधिक असमान दर्जाचे असतात.
रवंथी भरकटता उगवते आपले मंथन
आपल्याच घरगुती पांथिक कलहांच्या वेशीवर
शि’आ-सुन्नी. प्रोटेस्टन्ट-कॅथॉलिक
आणि स्टार ऑफ डेव्हिड — ज्यांच्या जवळ-जवळ
संहाराच्या न्याय्य अढीने आता
आंधळा, उग्र आवेश घेतलेला. शेवटी थडकलेली
ही रात्र ह्या नेहमीच्याच अवलोकनांवर
सुस्कारा सोडते. व्यवस्थित पाऊल चुकवून
ती कोपर्याच्या कुशीत जाऊन चटकन आडवी होते.
आपण अलीकडचा इतिहास चाळतो : सत्तेच्या, धर्मांच्या
चोरट्या गुपितांचा. ज्या व्यंगाने तू हलकेच सजवतो, अंतरातील रोजच्या धाकधूकीची
आणि भीतीची कहाणी, माझा जीव तुटतो
तुला बघताना, दाराशी टेकून
दूर कुठेतरी टेकलेली नजर, चौथा प्याला कुरवाळत
जिभेवर धावत येणार्या आश्वासनांची
निष्फळ कटुता मी ओठांतच दाबते.
असे चालणार नाही. असे चालणार नाही
काही सत्यांचा शोक शब्दांच्या आवाक्यापलीकडे
असतो. रात्रीचा मंद गारवा. हळुवार. सूर बदलतो
बाटली अर्ध्यावर. रात्रीच्या त्या प्रहरी उभे आपण
आता, जिथे शब्दांची गरज उरलेली नाही.
शहनाई : बिस्मिल्ला आणि त्यांची संपूर्ण काशी
आणि एकही शब्द नाही. मी प्याले विसळता
तू दिसतो मला, आवरत-सावरत. संध्येचे उरले-
सुरले तोडे-तुकडे उचलत. आणि परत
मला आठवण होते की तुला जाणीव आहे, बाकी
कितीही सौभाग्यवान असलास
तरी तुझं नाव तुला दुर्बल करतं
या देशात. आणि आणखी अजूनही
***
काय क्रियापद लावू ?
आज्ञार्थकांच्या ठेवीची
विरासत
स्वत्व शब्दजातींना
बांधील
मनाचे निर्मळ, फक्त
संगती मळकट
मुकुट आणि मुद्दल ह्यांच्या एकजात सावलीत
विखरते प्रभा बहुविध इतिहासांची
ख़ुसरो ते बुल्ला. अदा ते परवीन.
यह, वह, वो
तो, ती, ते
‘आशिक़ की मा’शूक़ ? नारी की नर ?
तरल भाषा, प्रशस्त
मातृ-ची साहेबापेक्षा भली
प्रवाही स्वत्व
सैल नेसलेलं
(माधवी मेननना आभारासकट)
***
आठवड्यातून आई आणि मी
आधीच वैताग. सोमवारी निराशेहून अधिक ती कटकट
तिशीत घरी परतणे : वेगळीच ती करामत
आईचं आणि माझं नुसतं भांडण
कोण जिंकेल यावर काही नको पण
पाय फरफटून मी कपडे उचलते रडतखडत
आजचा मंगळवार. आम्ही शेक्सपिअरचा करतो अनुवाद
उन्हाळा आवडतो म्हणणार्यांवर हसत
कोणाची काय काय असते पारख ती !
ते इंग्रज आणि त्यांच्या त्या चालीरीती
इथे, कळी वा बहरात, मे-ची काही एक नाही चालत
बुधवारी आमच्या मेजावर सजतो पोर्क बफात
लसणाचा जणू गोळीबार गरम तेलामध्ये
कधी रडत जरी कांद्यापायी
तरीही धूर्त तसा तो नाही
त्या मोहक कळीवानी — जी रांगेनं कत्तल मांडते
गुरुवारी आमचा आपला वेगळाच संताप
ही एकेरी विचारसरणी नं जन्मजात देणगी
आईचे फोनवर ओरडणे
माझे रुकलेल्या वेबसाइटवर धुमसणे
संध्याकाळी उशिराच जरा काही डोक्याला शांती
आठवडा संपू बघता, शुक्रवारी मिळतो मला एकान्त
आई आणि तिच्या मैफिलीला बोलावते मैसूर
विविध होणारे चर्चही
फक्तच कोड्यात टाकत नाही
भक्ती आणि सुखाचा काय तो सुसंगत सूर
शनिवारी सायंकाळी जेवायला मी घराबाहेर
झाडांना पाणी दे, विसरू नकोस हं : आईचा निरोप
नुसता झाडांचा लगाव नसून
ती अति अति चिंताग्रस्त असून
सात समुंदरापार वा पुढल्या गावात, कामाच्या यादीचा काही नाही समारोप
शेवटला रविचा हा वार येतो बघा कसा टवटवीत
आई बहुतेक येणार आज परत संध्याकाळी
थोडे लिखाण : दिवसाचा आकार
हलकेच मग गॅसवर कूकर
विशेष नाही काही, साधी वरण-भुर्जी रात्री
अनुवादाबद्दल :
मी इथे कॅरल डिसूझांच्या तीन कवितांचा मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या तीन कवितांची (मराठीत अनुवादित) शीर्षकं आहेत : नावा-गावाचा पत्ता, काय क्रियापद लावू ?, आणि आठवड्यातून आई आणि मी. नावा-गावाचा पत्ता ह्या कवितेत विविध प्रवाह एका रात्रीच्या प्रवाहात उमलून येतात — राजकारणाचा भलामोठा प्रवाह दोन सामान्य व्यक्तींच्या संवादाला येऊन मिळतो, आणि ह्या दोन प्रवाहांना संगीताच्या प्रवाहाची पार्श्वभूमी मिळते. दुसरी कविता — काय क्रियापद लावू ? — ही स्वत्व आणि भाषेची प्रवाही प्रवृत्ती ह्यांवरील चिंतन आहे. शेवटच्या कवितेचा — आठवड्यातून आई आणि मी — रोख दैनंदिन, सामान्य प्रवाहावर आहे. अशा ह्या तीन कविता प्रवाहीपणाच्या विविध अंगांचं अवलोकन करतात. याउपर, अनुवाद हा प्रवाहीपणाचा एक अधिक आयाम समजला जाऊ शकतो, ज्यामध्ये एका भाषेतून दुसर्या भाषेत शब्दांचा, विचारांचा प्रवाह होतो. पण ह्या प्रवाहात मर्यादा आहेत, कारण एका भाषेतील कलाकृतीचं दुसर्या भाषेत नेमके रूपांतरण होणं हे अशक्यप्राय आहे. भाषांतराच्या प्रवाहात काहीतरी मागे उरतं, तशीच काही नूतन निर्मितींची भर पडते.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram