मूळ रशियन कथा: आलीसा गनिएवा

मराठी भाषांतर: भाग्यश्री कुलकर्णी

अधःपतन


back

                                                                     

म.वाकबगार घोड्यावरून चालला होता, जो घोडा पहाडी वाटांना सरावलेला होता. खिंडीच्या बाजूला पसरलेली गावकुसाबाहेरची वस्ती[1] आणि म. ने वृद्ध पुरुष आणि स्त्रिया राहत असणारी पिरॅमिड सारखे दगडी बांधकाम असणारी जीर्णशीर्ण खेडी अगोदरच मागे टाकली होती. गोदेकान[2] मधून बाहेर पडणाऱ्यांना, वाटेवरच्यांना, टाळून घाईघाईने घोड्यावरून उतरून, तो नखशिखांत बुर्का[3] परिधान केलेल्या गावकरी वयस्करांना अभिवादन करायला गेला, प्रत्येकच वेळेस तो कोठून आला आहे आणि कोठे चालला आहे हे तो सांगत होता. ते त्याला बराच वेळ सोडायला तयार नव्हते, त्यांनी खोदून खोदून प्रश्न विचारले. प्रश्न याविषयी की त्यांच्यापेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या टी. मध्ये सध्या काय घडते आहे, नदीचं पाणी वाढलंय का, हे खरंय का टी. मध्ये म्हणे घरी वापरायचे फोन आलेत आणि प्रत्येकाने अगदी आग्रहाने त्याला आपल्या घरांकडे; ज्यांच्या भिंतीवर अडकवलेल्या सुक्या मटणाचा आणि मसाल्याच्या वनस्पतींचा अगदी घमघमाट सुटला होता, अशा घरांकडे आकर्षित करून त्याचे आदरातिथ्य करण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

जेव्हा उंच कडा मागे राहिला, तेव्हा दूरवर पसरलेले निष्पर्ण ओक आणि बर्चच्या वृक्षांचे चे विरळ जंगल सुरू झाले. जवळजवळ अंधारुन आलं, घोडयाच्या धापा आणि टापांखाली चिरडला जाणारा पाचोळा यांच्या आवाजाने जोर धरला. खळखळणारी उथळ नदी पार करता करता म. ने गळ्यापर्यंत आपल्या अंगरख्याची बटनं लावली. पुलाच्या पलीकडे दुरूनच गावकुसाबाहेरची वस्ती दिसायला सुरुवात झाली होती. लवकरच त्याचं स्वागत एका तगड्या केसाळ कुत्र्याच्या भूंकण्यानी झाले, जे की एक मिश्र प्रजाती आणि कॉकेशिअन धनगरी कुत्र्यांचे संकर होते. म. ने घोड्याच्या लगाम सोडला, जेणेकरून घोडा उंच कड्याच्या सहज दिसू न शकणाऱ्या दुर्घट निमुळत्या वाटा शोधू शकेल, ज्या गावकुसाबाहेरच्या वस्तीकडे जातात. अंधाराचा अंदाज घेत घेत, म. ने ओळखलं की एका घरासमोर गायींचा कळप, धुक्यात निश्वास सोडत उभा आहे, कुठल्यातरी कारणाने त्यांना अजून गोठ्यात हलवलेले नाहीये. आणि तो कुत्रा तिथंच अवतीभोवती फिरत होता.

गावकुसाबाहेरील वस्तीवर एक कुटुंब राहत होते, आणि या जागेचं लांबलचक असे नाव होते, बोलीभाषेत ज्याचा अर्थ ‘सैन्याने थांबायची जागा’ असा होतो. ते नाव इमाम शामिलचा काळ आणि कॉकेशियन युद्ध ह्यांच्याशी संबंधित होते.

या ठिकाणी एक पती-पत्नी राहत होते, ते बऱ्यापैकी वृध्द होते. तो-अगदी आजोबांसारखा, बारीक आणि सुरकुतलेला, आणि डाव्या हाताची तर्जनी ही नव्हती त्याला, पण घरचा कर्ता.
ती – मोठ्या छातीची, मजबूत बांधा आणि सोबतच पहाडांकडील ऊन आणि स्वयंपाकघरातील धुराने चेहरा लाल झालेला अशी.
पती आणि पत्नी त्याला अगदी दारातच भेटले, आनंदाने आणि काहीशा उताविळपणे, सलाम करून झाल्याझाल्या लगेच त्यांनी त्याचं सामान उतरवून घ्यायला मदत केली. फुरफुरणाऱ्या घोड्याचे खोगिरही उतरवले गेले.
ते घर आतून सामान्य घरासारखे नसून एखाद्या मेंढपाळाच्या तंबू-सारखे होते, आणि बाहेरपर्यंत उकळत्या हिंकल(хинкал)[4] चा घमघमाट सुटलेला होता.

“आम्हाला अगदीच कल्पना नव्हती तुम्ही आज येणार म्हणून,” पती त्याच्या बोलीभाषेत म्हणाला “पण आम्ही वाट पाहून होतो.”

म. ने सोबत आणलेले जिन्नस बाहेर काढले, असे जिन्नस जे या पहाडी भागात मिळणे दुरापास्त होते. प्रभावित झालेल्या पत्निने आणलेले जिन्नस लपवले, एक वाडगा हिंकल आणि मांस, वरुन मटणाचा रस्सा ओतून, घरगुती आंबट मलई आणि वाटलेले लसूण घालून ते मेजावर आदळून ती बाहेर पळाली. बाहेर गायींनी हंबरायला सुरवात केली होती.

“काय थंडी नाही की काय इथे?” पुढ्यात येणाऱ्या गरम जेवणाकडे लक्ष ठेवत, तोंडाला सुटलेले पाणी गिळताना, क्षुल्लक विचारपूस करण्यासाठी, म. ने विचारले.

“रात्री तर अगदी बर्फच असतो,” दुरुस्त करण्याजोगा सुमधूर पांडुर[5]  दिवाणावरून मेजापर्यंत नेताना पतीने उत्तर दिले. “जसा बर्फ पडायला लागतो तसे इथपर्यंतच्या  सगळ्या वाटा बंद होतात. मग कोणीही या ठिकाणी पोहचू शकत नाही, वरचेवर लांडगे दिसायला लागतात आणि कुत्री त्यांच्या मागावर दिसेनाशी होतात.”

“लांडगे! लांडगे!” ,- पत्नीने बाहेरच्या आवारातून आत येतायेता दुजोरा दिला.—“मागच्यावर्षी एकाला गोळी लागली होती, शेजारच्या शेतातला पाहुणा होता, एक क्षयरोगाचा रुग्ण, लांडग्याचे मांस हाच उपाय होता.
“वाचला का तो मग?”
“नाही, तो जरा जास्तच आजारी होता.जर आधीच..”

त्यांनी जेवणाला सुरवात केली. चार पायी लोखंडी शेगडी मधून चांगलाच धूर बाहेर पडायला लागला. थोड्या विरामाने नवरा काळजीपूर्वक बोलला..
“आमच्या इथे काय गोष्ट घडली माहिती आहे. रोझा आठवते का?  र-म. च्या शेतात कामाला होती. 
“तुमच्या शेजारच्यांकडे होती कोणीतरी..” अगदीच खर्जातल्या आवाजात म. उत्तरला.
“मेली ती खोल दरीत खाली पडून.”
“रात्री?”
“दिवसा..!” पत्नी स्वतःच्या आवाजावर लक्ष केंद्रीत करत ओरडली. “..आणि महत्त्वाचं म्हणजे तिला इथला दगड नि दगड माहिती होता, आमच्यापेक्षा चांगल्याप्रकारे डोंगर चढायची ती, जरी ती मैदानी मुलुखातून आलेली एक अनाथ होती. तू ऐकलं असशीलच की?”
“तिथं टी. पर्यंत  फारच कमी वार्ता पोहचतात इथल्या. आणि काय म्हणे, ती स्वतःच पडली?”

“माझा पण विश्वास नाही बसला ह्यावर आधी, पण मुख्तार पी. तुन आलेला इन्स्पेक्टर, जो या खटल्याची चौकशी करत होता. त्याने प्रथमतः सिद्ध केलं कि रोझा घसरून पडली. असं झालं की ती चालत राहिली, चालत राहिली आणि अचानक पडली. असं घडेलच कसं? चिख्खल नाही, पाऊस नाही, चांगलं ऊन होतं त्या दिवशी, खरं की नाही?” — ती पतीकडे वळली.

“नंतर मुख्तारने  स्वतःच कबूल केलं की कोणीतरी तिला ढकलले.”

“ढकलले?” म. चा श्वास जवळजवळ अडकला.
“आणखी काय तर ?” पत्नीने हात वर उचलले आणि हळू आवाजात म्हणाली, “बिचारी रोझा, हे अल्ला तिची सगळी पापं धुवून टाक, कारण ती गरोदर होती. आम्हाला पण हे सगळं अपघातानंतरच समजलं. मुख्तार ने लगेचच तिच्या मालकांबद्दल चौकशी सुरु केली आमच्या शेजारी, ते पण र. चेच रहिवासी आहेत.”

“थांबा, थांबा, थांबा”, म. ने तिला मध्येच टोकलं. त्याने त्याचा दोन काट्यांचा लाकडी चमचा खाली टाकला.
“तुम्हाला आठवते का, टी. मध्ये वर्षभरापूर्वी काय घडले ते? वाटत नाही का फारच साम्य आहे दोन्हीत?”

टी. मध्ये जे काही प्रकार घडला तो अजूनही लोकांची मनं विषण्ण करून सोडतो. त्या गावकऱ्यांपैकी एकाला (असं म्हणतात कि तो निष्पाप असूनही) तुरुंगात टाकण्यात आले. ते सगळे काही कर दस्तऐवज, त्याने दाखवलेली अतितत्त्वनिष्ठा, लाच ह्यांमुळे घडले होते. पण सगळे काहीतरी अति अस्पष्ट. तो दोन वर्षांकरिता तुरुंगात असताना, एकदा त्याची बायको आणि भाऊ शहरातून परतत होते तेव्हा रस्त्यावर वाहनांची रहदारी असल्याने त्यांचा अपघात झाला. त्याचा भाऊ पटकन गाडीबाहेर पडला पण बायको जागेवरच मृत्यू पावली. ती पट्ट्यांमध्ये इतकी वेगळ्याच पद्धतीने अडकली होती की तिचं पोट विचित्र प्रकारे सुजलेले दिसत होते. घटनास्थळी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ठरवले की महिलेला दिवस गेलेले आहेत ही अफवा वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली, अगदी टी. पर्यंत सुद्धा आणि दफनविधी नंतर तर या अफवेने अजूनच जोर धरला.

लगेचच संशयाची सुई त्या कैद्याच्या भावाकडे वळली, लोकं त्याच्याविषयी कुजबुजू लागले, त्याची निंदानालस्ती करू लागले, त्याच्यावर व्यभिचाराचे आरोप झाले. हे सगळे इतके अति झाले की एकदा तर गोदेकान मध्ये कुणीच त्याला मदतीचा हात देऊ केला नाही. ही अपमानास्पद वागणूक असह्य झाल्याने त्याने त्याच दिवशी स्वतःला गोळी मारून ठार केले. आणि त्यानंतर अल्प कालावधीतच त्याची वृद्ध आईही हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली.

लवकरच त्या दुर्दैवी कैद्याची सुटका झाली. तो परतला ते त्याच्या रिकाम्या घरात, जेथे आता ना भाऊ होता, ना आई, ना बायको. सगळ्या शक्यतांचा विचार करून संतापलेला हा माणूस दफन भूमीमध्ये गेला, त्याने बायकोचा मृतदेह उकरून वर काढला, तिचं गर्भाशय कापलं आणि ते घेवून तो गोदेकान मध्ये परतला. म. ला तो प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवत होता. लोक अगदीच शांत बसले होते, थिजून त्यांचे दगड बनले होते. आणि हा बिचारा तो अवयव गदागदा हलवत होता, जे पाहवतही नव्हते आणि तो किंचाळला..

“या पहा, तपासा.. हे रिकामं आहे की नाही ते? प्रत्येकानी या, ज्यांनी ज्यांनी विचार केला की माझ्या पातीमात ने माझ्याच भावाबरोबर पाप केले, या आणि करा आता खात्री, ते दोघेही निरपराध होते.”

या अविचारी कृत्यानंतर त्याने टी. कायमचंच  सोडलं.त्यानंतर अश्या अफवा पसरल्या होत्या की तो रशियाला निघून गेला.

“नाही, नाही ही फारच वेगळी गोष्ट आहे! शेतकऱ्याच्या पत्नी ने निषेधाचा सूर लावला. मृतदेहाची तपासणी झाली होती आणि रोझा अगदीच गर्भार होती. मुराद तिचा मालक, त्याचंच काम असणार हे. आणि मालकिणीला बहुधा  हे कळले असणार. ती चिडून कामगार तरुणीशी भांडायला गेली असेल. कदाचित तिने हेतुपुरस्सर ढकलले-ही नसेल. किंवा मालकाने स्वतः तिच्यापासून सुटका करून घेतली असेल जेणेकरून कुठे वाच्यता होऊ नये.”

 “काहीही मूर्खपणा”, तिचा पती कर्कश आवाजात, तिरसटपणे तिला ओरडला, “मुराद एक सभ्य माणूस आहे आणि मालकीणही. आणि रोझा तर काय प्रत्येकावर डोळा ठेवून होती, उधळलेल्या घोडीसारखी.


तुला आठवतं का जेव्हा तिने तुझ्याकडे एका रात्रीसाठी माझी मागणी केली होती आणि त्याच्या बदल्यात वासरांना कुरणात चारवून आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता?”

“आठवतंय ना, “पत्नी हसली. “ती तर प्रत्येकासोबतच जायला तयार होती, फक्त या वस्तीवर पुरुष कमीच, सगळे कुटुंब कबिल्यावाले, आणि काही तासांच्या अंतरावरच्या र. मध्ये काही पुरुष” नंतर म. कडे बघून सहमती दर्शवून पुढे म्हणाली

“आणि टी. पर्यन्त आणि अजूनही जास्त.”

म. ला पायात पेटके आल्याची जाणीव झाली. अचानक त्याचे डोके दुखायला लागले. त्याने शेगडीतल्या
ज्वाळावर लक्ष केंद्रित करत, त्याचे भरकटलेले विचार एकत्रित करायला सुरवात केली.

“हेच तर ना,”  शेतकऱ्याने नव्याने सांगायला सुरुवात केली.. “तो लबाड कोल्हा,त्याला तर आधी हा खटला बंद करायचा होता, आणि नंतर तपासणी झाली तेव्हा त्यांना कुणाच्यातरी बोटांचे ठसे रोझच्या हातावर सापडले होते, जणू काही तिची कुणाशीतरी झटापट झाली असावी आणि पोट सुध्दा.. तसं पाहायला गेलं तर ह्या मुख्तारची खलीबेकशी बोलणी झाली असावी.. तो खलीबेकच्या जवळच्या मित्राचा मुलगा! आणि खलीबेकने त्याला सांगितले चल,मृताच्या मालकावर खटला चालव.”

“बरोबरच आहे ते “,पत्नी ओरडली, “मला ते कधीच आवडले नाहीत, तो उदास,गर्विष्ठ. ती अंतर्मुख, दिखाऊपणा करणारी. रोझाने लहानपणापासून त्याची सगळी कामं केली जेवण आणि कपड्यालत्त्यांसाठी, आणि सगळी काळी कामही केली. अजूनही त्या पोरीचे पालक कोण ते माहीत नाही, ती कुठूनतरी किझ्ल्यारहून आली होती, ती आपली भाषा शिकली होती, पण मुद्दामहून आपल्या भाषेत नाही बोलायची.
आणि ती आढ्यताखोर मालकीण एखाद्या राणी सारखी फिरायची. उन्हाळ्यामध्ये मी जेव्हा रासबेरी गोळा करण्यासाठी लवकर उठायचे, तेव्हा जंगलातल्या रासबेरी आधीच तोडलेल्या असायच्या, विशेषत: ते रोझाला टोपल्या घेऊन तयारच ठेवायचे मला जळवायला!”

“त्यांच्याकडे करायला दुसरं काही नव्हतं,” पती चिडला आणि आत्यंतिक कष्टी होऊन वेडेवाकडे हातवारे करीत म. कडे वळला, “तू तिचे नको ऐकूस ! दुसरे तिसरे काही नसून हे मुख्तारचेच कारस्थान! नको त्या गोष्टी खोदून काढणारा. ते दोघे तर तिचे पालनकर्ते. मुराद हळूहळू दाढी वाढवत होता आणि त्याची बायको केसही नाही बाहेर काढत. पण ह्याचा काहीच संबंध नाही, ती चांगली माणसं, अगदी साधी, मुख्तारने खटला केला! कारण त्याला हवी होती बढती. र. मध्ये कोणीतरी त्याच्या कानावर घातलं की शेतात वहाबी राहतात, आणि त्याने खलीबेकच्या सल्ल्यानुसार एका दगडात दोन पक्षी मारायचं ठरवलं. तो स्वतः  रोझाच्या तालावर नाचत होता,

कदाचित त्यानेच तिला गरोदर केले आणि दरीत ढकलले आणि त्या मालकांवर फसवणूक करून खटला टाकला. ते आता र. मध्ये आहेत चौकशीसाठी.”

एकाएकी नवरा स्वतःच कंटाळला आणि शांत बसला, त्याने पांडुर वाजवायला सुरवात केली, त्याची बायको वेडसरपणे स्वतःशीच पुटपुटत, ॲल्यु‍मिनियमच्या टाकीत दूध विरजवण्यात अगदी गर्क झाली होती. म. ने हाताला लागलं ते उचलले, उठला आणि अंगणात आला. जिथे एकदम कुत्र्याची सावली हलली आणि मोठी होत गेली.  थंड,काळ्याभोर आभाळापुढे लाल दगड उठून दिसत होते.  

“मी आत्ता तुझ्या निजण्याची तयारी करते,”घरातून शेतकरी मुलीचा आवाज आला.” आम्ही खाटेवर झोपू आणि तू पलंगावर झोप.”

अंथरुणावर पडल्यावर म. ला थकलेला असूनही लवकर झोप आली नाही. त्याला ह्याच शेतात व्यतीत केलेले मेमधले बरेचसे दिवस आठवले. ठसठशीत बांध्याची, भरलेली रोझा, तिचे गोबरे-गुबगुबीत गाल, तिची मजबूत उन्हाने रापलेली मान, भरगच्चं शरीर, वजनदार पांढरीफटक छाती दोन्ही बाजूला पसरलेली. कशी गावातल्या नदीकडून औषधी झऱ्यांकडे जात असताना त्याची रोझाशी गाठ पडली, खट्याळ ती, नग्नावस्थेत, नडग्यांवर वाहत्या नदीत बसली होती. तिच्या मोठ्या खरबरीत हातामध्ये एक मोठं पांढरं धुण्याचं कापड होते.

ती जराही लाजली नाही, तिने स्वतःहून संभाषणाला सुरुवात केली, आणि एका-अर्ध्या तासात ते दोघे एका मोठ्या ओल्या रुमालावर पहुडलेले होते, भरून पावलेल्या जनावरांसारखे, ज्याना नुकतच भरपेट खाऊ घातलेले असावे.

त्यानंतर तो तिला वरचेवर भेटायचा टी. वरून वाट काढत, परस्परांना भेटणाऱ्या रस्त्यावरून चालत, वाटसरू आणि ओळखीच्यांपासून लपत छपत, पण आधी शांत ,प्रेमळ ,कृतज्ञ असलेली रोझा नंतर एखाद्या अतिलाडावलेल्या घोड्यासारखी बिघडली, हळूहळू बदलली, लाथा झाडायला लागली, फसवे खेळ खेळायची आणि बक्षिसांची मागणी करायची ,त्याहीपेक्षा जास्त-लग्न आणि स्वतःच घर. तिने बढाई मारली की र. मधल्या  एका बड्या-असामीशी तिचा विवाह होणार आहे आणि गेले कित्येक आठवडे ह्याच गोष्टीने म. ला अगदी वेडे  करून सोडले होते. त्यांचं शेवटचं संभाषण त्याच्या विखुरलेल्या आठवणीमधून अशाप्रकारे वर आले जसा धुक्यातून डोंगर वर यावा. 

इथे ती त्याला सांगते आहे की तिला त्याला भेटायची इच्छा नाहीये.  इथे ती र-म शेताकडे परतून चाललीये आणि तो ठरवतो तिला पकडायचं, तिच्या जाड मांड्या मागून पकडतो. ती त्याला पूर्ण ताकदीनिशी ढकलते आणि खट्याळ लहान मुलासारखी ओरडते.

“मी आता लग्न करणार आहे, मला बाळही  होणार आहे ! मी आता र.  ला रहायला जाणार आहे. माझा होणारा नवरा खालिबेक मला मदत करणार आहे! आणि तू कमकुवत जा तुझ्या टी. ला परतून!

इथे म. तिचे हात घट्ट पकडतो आणि सर्व शक्तीने वळवतो. रोझाचा चेहऱ्यावर भीती दाटून येते आहे.  एका बाजूला असतो एक ओबडधोबड कडा आणि दुसरीकडे काळोखाने भरलेली दरी..

म. दुसऱ्या कुशीवर वळतो, भिंतीमागं पती-पत्नी बोलत असतात. बाहेर कुठेतरी कुत्री भुंकत असतात, गायी उभ्या असतात आणि घोडा रात्रीच्या खुराकाला कंटाळलेला असतो.
म. ला वाटतं की शेतावरची आग विझली आहे.


[1] Хутор गावकुसाबाहेरची वस्ती आणि शेती , खुतर हा शब्द नवीन वसाहतींचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. (घरांच्या संख्येची पर्वा न करता) ज्यांनी स्वत: ला प्रमुख गावांपासून अलिप्त केलेले आहे.रशियन साम्राज्यातील स्टोलिपिन सुधारणांदरम्यान, पीटर स्टोलिपिनने श्रीमंत शेतकऱ्यांना त्यांच्या समुदायातील (ओब्स्चिना किंवा टोवरिस्टवो) जमिनीचे”खाजगीकरण” करण्याची योजना केली, ओब्स्चिना सोडून, ​​ते वैयक्तिक मालकीच्या जमिनीवर — खुतर मध्ये स्थायिक झाले.                                                                                                                                                     

[2] Годеканगोदेकान (गजिकान) हे कॉकेशस (प्रामुख्याने दागेस्तान) च्या गावांमध्ये एक समुदाय केंद्र असते, चावडी कींवा  पार यांसारखे , जेथे प्रौढ पुरुष  विरंगुळ्यासाठी आणि उद्भवणार्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी जमतात.

[3] Буркаबुर्का कॉकेशस  प्रदेशात राहणाऱ्या विविध लोकांचे( पुरुषांचे )परंपरागत वस्त्र   

[4] Хинкал हिंकल/ हिंकाली दागेस्तान संस्कृतीतील एक महत्वाची पाककृती…खिंकलमध्ये गहू किंवा मक्याच्या कणकेचे तुकडे असतात, मटनाचा रस्सा किंवा पाण्यात शिजवलेले असतात. हे  उकडलेले गोमांस किंवा मटण  लसूण सॉससह दिले जाते, आंबट मलई, टोमॅटो मिसळून.

[5] ( Пандура)दागेस्तान मधील लोकसंगीतात वापरण्यात येणारे एक पारंपरिक तंतुवाद्य.


About Global Villager Challenge

Flatworld language solutions is based in Pune and working in language services since 2013. The company works in and provides major language services like translation, interpretation, coaching, and corporate training. Team FLS is a group of focused, inspired, and driven professionals who are headed to give foreign language learning a whole new perspective.

In addition to this FLS Comes up with different language-related initiatives. The vision and thought is to Open various avenues of careers for the future as well as present India and to initiate and improve the ‘World Readiness’ of the youth of the nation. 

Global villager Challenge is a very important initiative amongst various initiatives. This is a literature translation competition where the enthusiasts and students have to translate literary texts to Marathi from foreign languages. The students, enthusiasts, and professionals knowing would love to be a part of this competition. This competition gives the language professionals a break from their routine translation work and students or enthusiasts get to know another aspect of their language. 

This is the fifth year of this competition. The response and the participant number is growing every year. English, French, Russian, German, and Japanese are the language categories for this year. Every year we come up with a specific theme for the contest. This year’s theme was literature written by female authors around the world. 

As the competition is online, anyone from all over the world with knowledge of the Marathi language can participate in the competition. 

The competition started on the 8th of August. Our Judges are usually senior fellows working in respective language areas for more than 15 years. This year Sunil Ganu sir was the Judge for the English language category. Dhanesh Joshi was the judge for the German Language Category. Anagha Bhat mam was the Judge for the Russian Language Category; Nandita Wagale was the judge for French Language Category and lastly, Swati Bhagwat mam was the judge for the Japanese Language Category. Judges have all the discretion, right from selecting the texts to selecting the right criteria for examination. 

Following are the winners of the contest: 

1. Satish Kawathekar: German 

2. Manisha Sathe: Japanese

3. Supriya Shelar: English

4. Bhagyashree Kulkarni: Russian

5. Mugdha Kale: French  

Following are the runners up of the contest: 

1. Anvaya Sardesai: German 

2. Snehal Deshpande: Japanese

3. Priyanka Shejale: English

4. Pranali Shinde: Russian

5. Dnyaneshwari Khade: French  

चित्र सौजन्य: किरण मुणगेकर

भाग्यश्री कुलकर्णी सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये रशियन भाषा पदवीअभ्यासक्रमाची (एम.ए. प्रथमवर्ष) विद्यार्थिनी आहे. रशियन भाषा आणि साहित्यप्रसार या क्षेत्रात तिला काम करायची इच्छा आहे. तिला काव्यलेखन, काव्यवाचन आणि छायाचित्रण यात रुची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *