आमचे म्हणजे ह्याचे. जो हे जे वाचतोय त्याचे. तो अण्णावर प्रेम करायचा प्रचंड. अण्णा सध्यस्थितीत ८५ वर्षांचे. गोष्ट सुरू होईल तेव्हा त्यांचं वय ‘नुकतं’च. सुरूवातीपासून सुरू करू.
नुकती ‘सुरूवात‘ – अण्णा एक दिवसाचे.
घरात आनंद कोसळतोय. स्वयंपाक रसरशीत एकदम. अण्णा आपल्या एका कुशीवर, पाठीला पेटका, आत्याने उचलून काखेवर, आत्या अंगाई–बिंगाई.. बातमी समाप्त..अण्णांच्या वडिलांनी रेडियो बंद केला. आपली पाटलन (हाफ पैंट) नीट करुन,”जरा जेवणाचं बघा” असा हुकूम सोडला. आतून ‘हे काय आणतेच‘ क्विक रिप्लाय पण आला. तर तिकडे अण्णांनी अंबाबाईचा कोल्हापूरहून आणलेला साडे तीन रूपयाचा फोटो न जाणतेपणी फोडला. गंभीर शांतता. अण्णांचे वडील काचा बघून करवादतात(रागावतात).
लेखक इथे एक श्वास टाकतो. आपली लेखणी खाली ठेवतो. एक सिगरेट पेटवतो. समोर असलेल्या गुजरात्यांच्या खोलीकडे बघतो. प्रायोगिक नाटकात असल्यासारखी सिम्बोलिक स्माइल देतो. पफ खेचतो, इन–आऊट, एष.. सिगरेट संपते. बाथरूमला जातो. आटोपतो. पुन्हा लेखनी घेतो.
सुरूवात क्रमांक दोन.
अण्णा बारा–तेरा वगैरे.
वेळ बरोबर साडे नऊ. शाळेत जायची घाई. अण्णांची वित भर खाकी पैंट, पांढरा कोरा शर्ट, इयत्ता पाचवी. आईनं पापा करून ओल्या कपडयांची बादली डोक्यावर घेतली. अण्णांनी पाठमोरं पाहिलं. अण्णा दप्तर घेत निघाले. बारक्याला हाक मारून एकत्र जाण्याचा विचार अण्णांचा. अण्णा हुशार. बारक्या ढ, पण चिंचा तोच काढे. अण्णा दोन वेळेस चढता घरचा दर्जा मार खाल्ला. अण्णा चिंचा गोळा करी. ‘कोपऱ्यातली उचल अण्णा‘ बारक्यानं बारा फुटाहून सांगितलं. वेळ दौडत होती. शाळेची घंटा ऐकू आली. अण्णा, बारक्या कुत्र्यागत धावले. कुलकर्णी मास्तर डेंजर. चित्रच उभं राहिलं डोळ्यांसमोर. पोहोचले. एकदाचे पोहोचले. कुलकर्णी मास्तर इतिहासाचा पहिला तास. अण्णा, बारक्या विसरलेच. ‘अरे आज गुरुवार नं‘ धत्त तेरी.. “मंगल छडी आण ती,” मास्तर उभेउभेच. “मास्तर ते…बारक्या सांग ना?” अण्णा आठवत बिठवत. बारक्या बोलणार तितक्यात मंगल छड़ी घेऊन तयार. “ही घ्या मास्तर“… “खिशातलं बाहेर काढा” मास्तर एकसुरी, वरच्या पट्टीत. “मास्तर काही नाही ओ ते,” अण्णा फसवताना, बारक्या खिसा रिकामा करतो. कुलकर्णी मास्तरांच्या तोंडाला पाणी. “गधड्यांनो, नालायकांनो, ही थेरं करतात होय शाळेत येऊन. तो गुरव बोंबलतोय. त्याची चिंचं साफ केली. मास्तर बोलत असताना दर शब्दास एक छडी मारत. एकूण गिनती अखंड.
संध्याकाळ. पूर्ण दिवस वर्गाबाहेर उभे असणारे अण्णा बारक्यासोबतच. मास्तर आपली बॅग घेऊन घराकडे प्रस्थान, भटवाडी. रस्त्यात एक गोड मावा खरेदी करून पुन्हा आपल्या घरी पोचतात. पाणी पितात. बायकोला हाक मारत, ‘आज तुमच्या आवडीचं आणलंय काहीतरी“. “काय ओ, गजरा की मिठाई?”, मंजुळ आवाज आतून. “चिंचा.” पाण्याची धार तोंडाला. तिकडे अण्णा–बारक्या एकमेकांना कोसत घरची वाट धरतात.
लेखक पुन्हा एक श्वास टाकतों. अजून एक सिगरेट पेटवतो. अण्णांचं चित्र काढू असा ‘केव्हातरी‘चा विचार करतो. आत्ता त्याला घाई आहे. ४–५ पफ मारून सिगरेट विझवतो.
अण्णा ऐन वयात.
वय चोवीसावं. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक समारंभात अण्णांचा गुणगौरव. गौरवाला आई, बापू, बारक्या समस्त मंडळी उपस्थित. अण्णा खुश. अण्णांच्या “तेहतीस कोटी लांडगे” या कवितेला सुवर्ण कमळ जाहिर होताच बापू(अण्णांचे वडील) सरकून उभे राहतात. मानेखालचं जानवं चाचपडत उलटया दिशेने तडक घर गाठतात. अण्णा मात्र व्यस्त. व्यासपीठावर अण्णांच्या कवितेचं वाचन. आई पदर तोंडाला लावून काहीतरी करताना अण्णा बघत. अण्णा कविता संपवतात. “हे सगळं बापूंमुळे शक्य, अथवा आम्ही जन्मतः आळशी” अण्णा रडायला आले जणू. अण्णा व्यासपीठाहून खाली येत आईच्या गळ्यात धायमोकलून रडतात.
लेखक आत्ता फार इमोशनल होतोय. त्याला जाणवतंय त्या कागदावर एक अश्रू नृत्य करतोय. लेखकाला नृत्य फारसं आवडत नाही. लेखक पाणी पितो. पाणी जीवन. लेखक मर्यादी.
अण्णा तिशी–बिशीपुढे.
कम्युनिष्ट पार्टीची मीटींग संपवून अण्णा घरच्या रस्त्यावर. सायकलची हवा ठीके ना बाबा? असा विचार करत नवीन रस्ता–बांधकामावर चालतात. रस्ता दुभागी, अण्णा कम्युनिष्ट. अण्णांकडे असलेल्या बऱ्याच सदऱ्यांपैकी एक सदरा अंगावर. करडा. आवडणारा. आज जरा अण्णा स्वस्थ चालतायत. “ओ शाहिर,” मागून एका माणसाची हाक एेकताच अण्णा थबकतात. “आज मीटींगमधे झालेलं समदं व्हाया हवं नायतर हाय नाय ते बी जायचं“. ” सखाराम विश्वास ठेव मी आहे तुमच्यासोबत,” आपल्या सायकलीला अडकवलेला डफ घुमतोय हे ऐकून अण्णा खुश. शाहिर अण्णा.
लेखक जरा संदर्भ शोधू लागतो. १९५५ बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर. लेखक “का” असा विचार अजिबात करत नाही. त्याने “मनभर” बाबासाहेब वाचलेत. अभ्यासलेत.
अण्णा सद्यस्थिती.
सखाराम पवार या इसमाने केलेल्या हल्ल्यात शाहिर डैश डैश जबर जखमी. लेखक संदर्भ वर्तमानपत्रात वाचतो. बाजूला निपचीत पडलेले अण्णा. घरात बाबासाहेब. बुद्ध. अण्णांचं जानवं बापूंसोबत वारलं. धर्म जाळला. जात जाळली. अण्णांना पॅरलिसिस. अर्धांगवायू पूर्णपणे. अण्णांचा नातू त्यांची खाजगी डायरी बंद करतो. तो लिटरेचर ग्रॅज्युएट आहे. नुकतीच त्याने राष्ट्रीय नाट्य महाविद्यालायतून नाट्य –लेखक होण्याची तयारी पूर्ण केली आहे. तशी त्याच्याकडे सर्टिफिकेट ही आहेत. तो सिद्धार्थ या नावाने संबोधला जातो. अण्णांनी बुद्धाचं नाव का ठेवलं? हा विचारच नको. त्याला परदेशात नाट्य–शिक्षण घेण्यासाठी जायचे आहे. तशी त्याची मोहीम फिक्स आहेच.
तो आत्ता अण्णांच्या हाताला किस करून. ‘आय लव यू‘ अण्णा असं म्हणाला. लेखकाने ते ऐकलं. आणि तसंच ते लिहिलं देखील. तो उठू लागतो. बाबासाहेबांच्या फोटोकडे बघतो. त्याला अस्वस्थ वाटतंय. तो नीट बघतो. बाबासाहेब काहीतरी म्हणतायत. तो ते ऐकतो. अण्णांकडे बघतो. अण्णा स्थिर चिंचेसारखे. सिद्धार्थ बाबासाहेबांच्या फोटोला बाहेर काढतो. फ्रेम तोडतो. फोटो काढतो. “ती“जागा रिकामी करतो. आणि निघतो.
लेखकाने हे काय लिहिलेले आहे? त्याला हजार प्रश्न पडलेत. पण रात्र खूप आहे. मिलचा कम्युनिष्ट भोंगा वाजेल इतकी रात्र–पहाट. आत्ता मात्र लेखक झोपतोय.