Skip to content Skip to footer

आहे आणि नाहीमध्ये ‘आता’: आशुतोष पोतदार

Discover An Author

  • Writer

    आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक आणि संशोधक आहेत. आशुतोष यांच्या नावावर नाटक, कविता संग्रह, भाषांतर तसेच संपादने अशी सात पुस्तके असून ते मराठी आणि इंग्रजीमधून लेखन करतात.

    Ashutosh Potdar is an award-winning Indian writer of several one-act and full-length plays, poems, and short fiction. He writes in Marathi and English with seven books to his credit. He is Associate Professor of literature and drama at the Department of Theatre and Performance Studies (School of Design, Art and Performance), FLAME University, Pune. 

‘आता’ असतो का? हा विवाद्य आणि आव्हानात्मक प्रश्न आहे. तरीही ‘आता’च असतो ज्याचे ‘असणे’ सिद्ध करता येते. कारण, आधीचे (भूतकाळ) घडून गेलेले असते म्हणून ते ‘नसते’ आणि येणारा (भविष्यकाळ) अजून यायचा असतो म्हणून तो नसतो. मग उरला तो ‘आता’! सूक्ष्मातिसूक्ष्म तुकड्यात विभागलेला ‘आता’ आपण ‘बघू’ शकतो. हाकारा।hākārā च्या या ‘आता’ आवृत्तीत आशुतोष पोतदार यांनी लिहिलेली ‘चालू सकाळ’ ही कथा अखंड चालत असलेल्या ‘आता’च्या क्षणांना टिपते. ‘चालू सकाळ’ टिपण्याचा खेळ इतका गुंगवणारा बनतो कारण ‘आता’ चालू असतो तसाच तो ‘चालू’ही असतो. तो खेळ खेळत असतो. खेळ टिपणारा त्यात फसतही जात राहातो.

‘आता’ला पकडण्यातले अजून एक महत्त्वाचे आव्हान असते. ते असे: ‘आता’ आणि ‘अस्तित्व’ यामधले परस्परपूरक, गोलाकार नाते. ‘आता’मधून निघून आपण ‘असण्या’त येऊन पोहचतो, ‘असण्या’तून निघून आपण ‘आता’त येऊन पोहोचतो. मग, ‘आता’ काळ आणि अवकाशाच्या तथाकथित तटबंदी मोडून वर्तुळाकार फिरत राहातो. हा गुंता मानवी अनुभवातल्या जगाचा असतो तसाच तो भाषिक मांडणीचाही असतो. उदाहरणार्थ, ‘आता’ दाखवण्यासाठी आपण जे क्रियापद वापरतो ते ‘आहे’ किंवा ‘आहे’ची चालू रूपे. साहजिकच, जे ‘नाही’ ते ‘आता’तून निसटून जाते. दुस-या शब्दात मांडायचे तर जे ‘नसते’, ‘नाही’ वा ‘नसेल’ ते ‘आता’ किवा ‘आहे’ बनते. हा नातेसंबध तत्त्वज्ञानात्मक असतो तसाच तो रूपविवेचनात्मक आणि सत्ताकारणीयही असतो.

हाकारा।hākārā च्या ‘आता’च्या आवृत्तीतील कलात्म तसेच चिंतनात्मक लिखाण आणि दृश्य रुपे ‘आता’पणाच्या विविध अंगाना मांडणारी आहेत. इथे, ‘आता’कडे पाहाण्याचे, प्रामुख्याने, तीन दृष्टीकोन आपल्याला दिसून येतील: १. काळ आणि अवकाशाची सरमिसळ, २. संदर्भांची पुनर्स्थापना, आणि ३. जतन करण्याचे आकर्षण.

प्रगत माध्यमं, संवाद आणि वाहतुकीची प्रचंड वेगाने बदलत जाणारी अत्याधुनिक साधनं ‘आता’चा क्षण स्थळाचे भान विसरून मुक्त संचार करु शकतो. एकाच क्षणाला कोसो दूरवर असणारे एक किंवा अनेक स्थळांना जोडणारे ‘आता’चे क्षण जगभर विखुरलेले असू शकतात. सच राय आपल्या ‘Is Now Special?’ या आपल्या लेखात ‘आता’चे स्थळ-काळातील गुंतागुंतीचे भान सहजतेने मांडतात. ते लिहितात: “News and media are predicated on the perception of now as a special moment. You can hear it in the diction and branding. News breaks. Events are “unprecedented” or “momentous”. That which is happening now is extraordinary. Sorry, that which is happening now is extraordinary!” अशा चिंतनीय मांडणीबरोबरच, मंगेश नारायणराव काळे यांच्या मराठी कविता, अंजना कोथामाचू यांचे दृक-श्राव्य इन्स्टॉलेशन, अंकिता आनंद यांच्या इंग्रजी कविता काळ आणि अवकाशाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करतात.

प्रचंड तीव्रतेने काळाला ओरबाडत, संदर्भाची पुनर्स्थापना करत ‘आता’ची मांडणी आज होत आहे. बदलत्या राज्यव्यवस्था, ओळखींचे राजकारण, धार्मिक आणि जातीय तेढी, स्वार्थीपणाने सामूहिक रितीने केली जाणारी इतिहासाची पुनर्मांडणी यातून ‘आता’चा काळ आपल्याला हव्या त्या गतकाळापर्यंत ताणण्याचा प्रयत्न हिरीरीने केला जातोय. या प्रयत्नातून सार्वजनिक स्थळांवरची हिंसा, राजकीय बलाचा वापर करून शैक्षणिक अभ्यासक्रमांचे पुनर्लेखन, सामुहिक बलाचा आततायी आणि क्रूर वापर करुन व्यक्तीच्या स्वतःच्या, खाजगी क्षणांवरचे आक्रमण किंवा ओळखीच्या राजकारणाचे साहित्य आणि संस्कृतीला प्रभावित करण्याचे प्रयत्न आणि त्यातून समकालीन अभिव्यक्तीचा केला जाणारा संकोच असे प्रयत्न मोठ्या प्रमाणात हॊताना आपल्याला दिसतात. या दृष्टीने, चित्रपट-अभ्यासक असलेल्या रश्मी साहनी यांनी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या निमित्ताने मांडलेला आपला चिकित्सक अभ्यास महत्वपूर्ण ठरावा. त्याचप्रमाणे, अविष्कार रविंद्र यांचे ‘आमचे अण्णा’ हा ललित लेख, रामू रामनाथन यांचे ‘कॉम्रेड कुंभकर्ण’ हे इंग्रजी नाटक आणि त्याचे मराठी भाषांतर हे आणि इतर सर्जनशील लेखन या आवृत्तीची खासियत आहे. 

जतन करण्याची आणि नोंदी ठेवण्याची हौस सनातन आहे. बदलते तंत्रज्ञान आणि हाताशी असलेल्या जुन्या झालेल्या पण दररोज नव्या होणा-या ‘कॅमेरा’ खेळण्याने सर्वसामान्य व्यक्ती आणि कलाकार नोंदी ठेवण्याची हौस वेळोवेळी भागवून घेतो. कधी सेल्फी घेऊन, कधी ग्रुप फोटो काढून घेऊन तर कधी  डायरी वा इतर क्लुप्त्या वापरून. वर नमुद केल्याप्रमाणे, ‘आता’ आणि ‘अस्तित्व’ यामधला गोलाकार खेळ मांडण्याच्या विविध शक्यता ‘जतन करण्याच्या’ प्रक्रियेतून समोर येतात. उदाहरणार्थ, कुश कुकरेजा यांची ‘सिंगर मशिन’ ही दृश्य मालिका. कुकरेजा लिहितात: “But the photographs are a record that there was this shop and there was a time when the shop was being shut with no singer machines inside.” एखाद्या संशोधकाने वा छायाचित्रकाराने त्याच्या ‘आता’च्या काळापर्यंत ‘गतकाळा’तील एखादे दुकान किंवा “there was a time when the shop was being shut” खेचून आणणं म्हणजे, देरिदा यांच्या भाषेत, वर्तमान ‘रचण्या’चा प्रयत्न असतो.

थोडक्यात, नाविण्यपूर्ण त-हेने वेगवेगळ्या माध्यमात आपली निर्मिती करणारे कलाकार, लेखक, संशोधक ‘आता’ कडे कसे पाहातात आणि आपली मांडणी कशी करतात हा प्रयत्न हाकारा।hākārā च्या या तिस-या आवृत्तीतून केला आहे. या प्रयत्नातून; कलारूपे, कलाभान आणि सौंदर्य दृष्टीचे दर्शन घडविण्याबरोबर ‘काळ’ संकल्पनेचे लवचिक आणि बदलते भान हाकारा।hākārā मांडतो.

 
संपादकीयसाठी चित्र सौजन्य: डॉसन कॉलेज अर्कायव्ह आणि द हिंदु

 

आता।Now या आवृत्तीकरिता चित्र सौजन्य

मुखपृष्ट चित्रे: अभिजीत कुमार पाठक, पीटर ब्रिग्ज आणि आसक्त, पुणे.
विभागवार चित्रे:  द हिंदु, प्राजक्ता पोतनीस, श्रेणिक मुथा, कुश कुकरेजा, आसक्त, पुणे आणि अभिजीत कुमार पाठक

Post Tags

4 Comments

  • प्रणव दर्शनानंद चौसाळकर
    Posted 27 जानेवारी , 2018 at 9:22 am

    ‘आता’ भूतकाळही आहे आणि ‘आता’ भविष्यकाळही आहे. ‘आता’ असलेल्या भूतकाळाकडे अभ्यासपूर्ण व निःसंशय वृत्तीने पाहिल्यास ‘आता’ असलेला भविष्यकाळ, वर्तमानात राहूनंच नाविन्यपूर्ण घडवता येईल. वस्तुतः ‘आता’ आणि ‘अस्तित्व’ यांपैकी ‘अस्तित्व’ ही व्यापक संकल्पना आहे. जी ‘भूत,वर्तमान व भविष्य’ या तीनही ‘आतांना’ व्यापून उरते.

  • Ujwala Mehendale
    Posted 29 जानेवारी , 2018 at 4:02 pm

    Looks very interesting. I would like to receive updates from this.

    • Hakara Team
      Posted 3 फेब्रुवारी , 2018 at 12:17 pm

      Thank you, Ujwala Mehendale.

      Please write to us on info@hakara.in and we’ll add your email id to our mailing list for regular updates.

      Hakara Team

  • Awdhoot Parelkar
    Posted 22 मार्च , 2018 at 5:12 pm

    Innovative and excellent indeed !

Leave a comment