दिवस सुरू होतो. मी टेबलवर हात टेकून बसतो. डोक्यावरल्या केसात हात फिरवतो. डॅंड्रफचा भुगा टेबलावर रांगोळी काढतो. तो मी फुंकतो. तिरप्या सूर्यप्रकाशात काही कण उडताना दिसतात. नेहमीचा सूर्यप्रकाश समोर पडलाय. प्रकाशापेक्षा अंधारी बाजू जास्त गडद दिसतेय. प्रकाश डोळ्यात शिरतोय. खोलीत बसूनही डोळ्यावर शेड्स लावून बसावसं वाटतंय. बाजूच्या ड्रॉवर मधून माझा गॉगल काढून घ्यायचा विचार करतो. गोदार्दच्या सिनेमातले कॅरेक्टर मनात येतंय. नको, आता गॉगल नको. (काय म्हणतात: शेड की गॉगल?). डोळ्यावर गॉगल असला की आपण बघतोय त्याकडे न बघितल्यासारखे करू शकतो. जिकडं बघतोय त्याला/तिला/त्यांना गाफील ठेऊन बघू शकतो. आपल्या डोळ्यातला विचार दुसऱ्याला दिसू शकणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. सूर्याच्या पृष्ठभागावरुन सुसाट सुटलेले प्रकाशाचे फोटॉन्स डोळ्यापर्यंत पोहोचायला त्यांना आख्खी स्पेस क्रॉस करावी लागणार. आठ मिनिटे आणि वीस सेकंद असा काही तरी वेळ लागणार तोपर्यंत माझ्या डोळ्य़ातले भाव गायब झालेले असतात. माझं मन किती फास्ट बदलत राहातं. पण, कुठल्याही चालू क्षणाला कुठले तरी भाव डोळ्यात असणारच. क्षणभर मी घाबरतो. मी माझे भाव फक्त माझ्यापुरते ठेऊ शकत नाही, प्रयत्न करुनही. याची भीती वाटते मला. माझ्या डोळ्यात शिरणाऱ्या सूर्यकिरणांमधे कुणी सेन्सर बसवून किरण डोळ्याच्या आत शिरल्यावर त्या सेन्सरने माझ्या डोळ्यातल्या भावांना टिपून माझ्या मेंदूपर्यंतचा ठाव घेतला तर! या भीतीने तर मी गांगरूनच जातो. पुढे काय होईल या विचाराने धस्स होतं. पण, हे सगळं रात्री पडणाऱ्या स्वप्नांसाठी बाजूला ठेव असं मी स्वतःला समजावतो आणि लॅपटॉपकडं सरकतो.
लॅपटॉपवर लावलेल्या दोन-एक स्टिकी-नोट्स जबडा उघडा ठेवून बोलल्यासारख्या दिसतायत.
✓दर अर्ध्या तासाने चेअरवरुन उठणे
✓ दोन तासांतून एकदाच FB वर जाणे
✓ संध्याकाळी जाताना दुधाच्या पिशव्या घेणे
✓ write a mail to Rihan reg fucking nothing!!!
आ करून बसलेलं मूल, जांभई, कृष्णाचं तोंड, वाघाचा जबडा फाकवणारा इतिहास पुरूष, रानटी वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या मागल्या काचेवरचं हिंस्र श्वापदाचं चित्र. यातली कुठली प्रतिमा स्टिकी नोट्ससाठी निवडू?
मागे सरकतो. बराच वेळ खुर्चीची हालचाल पायाने तटवून ठेवलीय. आता खुर्चीवरनं पाय उचलतो. पाय दुमडून घेतो. खुर्ची डाव्या बाजूला काही अंशाने वळते. डाव्या बाजूला वळते पण माझा खांदा अवघडलाय. मी डाव्या बाजूला वळतो. उजव्या बाजूचा फ़ोन हातात घेऊन डाव्या बाजूच्या खिडकीतून बाहेर पाहातो. समोर स्टिकी नोट्स मधे ✓limit use of the fucking phone असं लिहिलेलं दिसतं. मनावर छोटा दगड ठेऊन फोन बाजूला ठेवतो.
मिटवलेल्या विंडो ब्लाईंड्स मधून पलिकडच्या इमारतीचा काहीच भाग दिसतोय. समोरच्या गच्चीत आई आणि एक मूल दिसतंय. ओठ मिटवून घेतलेल्या पोराला कसं भरवावं या विवंचनेत आई घास हातात धरुन त्याच्या समोर बसलीय.
लिहिताना चांगलं वर्णन कसं करायचं?
प्रतिमा उभ्या करायच्या की प्रतिकं मांडायची की नुसतंच वर्णन करायचं. नुसतं वर्णनच करायचं असेल तर लिहायचं कशाला? त्यापेक्षा फोटो काढून दाखवला तर? मोबाईल घ्यायचा. फोटो क्लिक करायचा. वाटल्यास फिल्टर्स लावायचे. फोटो शेअर करायचा.
मोबाईलवर फोटो घेताना मी सेल्फी घ्यायचा खूप प्रयत्न करतो. पण, आता या प्रकाशाच्या रोखात माझा चेहरा नीट दिसत नाही. बघणाऱ्याला आपल्या चेहऱ्याबद्दल काही बाही वाटू नये म्हणून सेल्फी घेतली तरी ती मी डिलीट करतो.
आताची प्रकाशाची वेळ टळली की सेल्फी घ्यावी. असा विचार करून मी फोन बाजूला ठेवतो.
तेवढ्यात, शिया माझ्या खोलीत घुसते. ही अशी कशीपण खोलीत घुसते.
शिया फॅन्सी पण डिसेन्ट कपडे घालते. कशाही फॅशनचे कपडे तिला अंगावर कॅरी करता येतात. ती कॉन्फिडन्ट आहे. तिचा बॉयफ्रेंड छान आहे. माझ्याशी शिया छान बोलते. कधी कधी मला ती चॉकलेट देते. चॉकलेट आणि पाणीपुरी तिचा सॉफ्ट कॉर्नर आहे असेही ती सांगते. तिला वाटतं की पहाटे चारला उठून पाणीपुरी खावी आणि नंतर आईस्क्रिम खावे. पहाटे चारला पाणीपुरीच्या गाड्या रस्त्यावर नसतात. याचं तिला वाईट वाटतं. मागच्या महिन्यात ती अमेरिकेत जाऊन आली. “अमेरिकेतल्या लोकांसारखं भारतातल्या लोकांना बिझनेस करता येत नाही.”, शिया.
“कसं काय?”, मी.
“भारतीयांकडे इमॅजिनेशन नाही.”
“काहीही!”
“लोक सेक्स फक्त रात्री करतात काय?”
(तिची नजर टाळतो.) “नाही.”
“दुपारीही करतात. पहाटेही करतात. मग, पाणीपुरी पहाटे खाणार नाहीत, आईस्क्रिम दात घासायच्या आत खाणार नाहीत हे या बिझनेसवाल्यांनी कसं ठरवलंय? सो पथेटिक इज अवर इमॅजिनेशन. असं का ठरवायचं? लेट देम इट व्हेनेवर आणि वॉटेवर दे वॉन्ट.”
“तुला कोण अडवलंय?”
“माझ्याबद्दल बोलत नाहीये. माय सिली बॉयफ्रेंड वेक्स अप सो लेट. (कपाळावर भल्या मोठ्या आठ्या दाखवत) आम्हाला रात्रीच करावं लागणार!”
“ आर यु स्टेईंग टुगेदर.”
“नो. त्याचा फ़ोन सकाळी साडे दहापर्यंत स्विच ऑफ असतो. बाय द वे, मी बिझनेस इमॅजिनेशनबद्दल बोलतेय.”
आम्ही काही वेळ असेच बाजूला बघत बसलो. ती मोबाईल वर असते. मी मोबाईलवर असतो. ती काही तरी विचार करत असते. मी विचार करत असतो तिला गवर्नमेंटच्या नव्या स्टार्ट अप बिझनेस प्रोजेक्टसाठी प्रपोजल पाठवायला सांगायचा. मी मनातल्या मनात तिला विचारू लागतो.
“Early Morning Paani Puri Centre चा बिझनेस का सुरू करत नाहीस तू, शिया?”
“पाणी पुरी बिफोर ब्रश । पाणीपुरी आफ्टर सेक्स । मॉर्निंग फॅन्सी वुईथ पाणीपुरी।”
बोलून होतं पण वेगवेगळ्या टॅग लाईन्सचा मी विचार करत राहातो. आम्ही दोघंही वेगवेगळ्याच बाजूला पाहात असतो. एकदम शांत होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ‘एक्सक्यूज मी’ म्हणत ती बाजूला जाते.
सेल्फी बरोबरचे माझे खेळ शियाने बघितले असावेत. जाता येता माझ्या खोलीतल्या अॅक्टिव्हीटीज बाहेरुन दिसू शकतात. कारण, या खोलीच्या दाराला एक आडवी काच आहे. खोलीत वेगळ्याने डोकावे लागत नाही. जाता जाता सहज कुणी बघू शकतो. मी स्वतःला समजावतोय की खोलीला दोष द्यायची गरज नाही. खोलीला काच नसती तरी बघितलं असतं. कृती केली तरच ती कृती होते? बंद दरवाज्यापलिकडचं आपण न बघताही आपल्याला दिसत असतं. स्वतःला मी उदाहरण सांगतो: माझ्या स्वप्नाचं. गेले वर्षभर अधनं मधनं मला पंतप्रधान झाल्याचं स्वप्न पडतंय. ‘मी पंतप्रधान झालो तर’ असं निबंध-टाईप स्वप्न नाही. किंवा, अनिल कपूरच्या ‘नायक’ टाईपचा मारामार-कुछ घंटोंका-पंतप्रधान नाही. प्रॉपर पंतप्रधान. आय मीन लाल किल्ल्यावर निवडणुकीचं भाषण देणारा टाईप नाही. असंही नाही की मी डॉळ्य़ावर गॉगल घालून, थर्मल वेअर घालून बर्फाळ प्रदेशात जवानांबरोबर गप्पा गोष्टी करायला गेलोय. (इथं फक्त थर्मल वेअर म्हणजे थर्मल वेअर नेहरु शर्ट/जाकिटाच्या आत असतात. कधी कधी जाकीटं किंवा झब्बे इतके चांगले असतात की थर्मल वेअरची गरज पडू नये. अशा जाकीटांची मी राहातो त्या शहरातल्या दुकानात मी चौकशी केली. पण, दुकानदार हसला. गांधीजींनी असा खादी-उद्योग करायला सांगून खेड्याकडं चला म्हटलं असतं तर आमच्या पिढ्या न पिढ्या एकाच दुकानात बसलो नसतो. आत घालायचे थर्मल कपडे इतके चांगली असतात की घातले असले तरी दिसत नाहीत. त्यामुळे, एवढ्या कडाक्याच्या थंडीत सुध्दा मी नेहमीचे कपडे घालतो असं वाटतं. अशी फसवणूक मी एकदा मित्राला माझ्या जर्मनीच्या ट्रीपचे फ़ोटो दाखवताना केली होती.)
प्रॉपर पंतप्रधान व्हायचं स्वप्न म्हणजे प्रॉपर पंतप्रधान. शांत. टी-शर्ट, जीन्स घालून काम करणारे पंतप्रधान. मी स्वप्नात बघत होतो की माझा शपथविधी वगैरे झाल्यावर मी स्वतः घटना वाचत होतो. म्हणजे, राज्यघटना वाचत होतो. म्हणजे, अॅक्च्युअली वाचत होतो. ट्विटर वगैरे साठी सेक्रेटरी नोटस मागायला येत होते. पण, मी फोकस्ड होतो वाचनात. वेळोवेळी, मी तज्ज्ञांशी बोलत होतो. ते तज्ज्ञ वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून, वेगवेगळी भाषा बोलणारे, कुठनं कुठनं आले होते. अर्थात, दररोज वाचत बसायचो नाही. कारण, कामाचा हा ढिग होता. वाचन मधनं अधनं चालायचं. मधेच कितीदा तरी इकडच्या राष्ट्रांतून, तिकडच्या राष्ट्रातून फोन वगैरे येत राहायचे. तुम्ही आमच्याकडे या असं म्हणून. पण, मी कामात, लोकांना भेटण्यात फार गुंग असतो. एके दिवशीच्या स्वप्नात मी बघितलं की प्रचंड मोठा पाऊस होऊन एक आख्खं राज्य पाण्याखाली गेलंय. मग, मी ते इकडच्या राष्ट्रात जा तिकडच्या राष्ट्रात जा असं करायचं नाही ठरवतो. मी म्हणतो, “आपले फॉरेन मिनिस्टर आहेत. ते काय करणार. त्यांना आपण खास राज्यसभेतून घेतलंय. त्यांना पाठवा.” मला सगळे सारखं सारखं सांगत राहातात: प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल असतो. स्वप्नातल्या खोलीत ‘प्रोटोकॉल’ ‘प्रोटोकॉल’ असे शब्द कानावर आदळत राहातात. विजापूरच्या गोलघुमटात असं झालं होतं. असा गोंगाट ऐकू आला. आपण बोलतोय आपल्याबरोबर आजूबाजूचं जग बोलत राहातं. असं बरंच काही बाही. मग, मी हिंदी सिनेमातल्या हिरो किंवा हिरॉईन सारखं “नही!” असं म्हणून कानांवर हात ठेवतो आणि आकाशाकडे बघतो. गरगरायला होतं. थोड्या क्षणानंतर गरगर थांबते तसं मी आदेश देतो: “लेट्स, स्काईप वुइथ द प्राईममिनिस्टर ऑफ दॅट कंन्ट्री.”
मी देश सोडून कुठं जात नाही असं काही माझ्याबद्दल बोललं जातंय. मिडीयामधनं हलकल्लोळ उडतो. आता काय करणार. मिडिया म्हणजे पिलर ऑफ डेमॉक्रसी. माझे अॅडवायझर्स समजावतात. मग मी मान्य करतो. शेवटी, एका फॉरेन ट्रिपचा प्लॅन करतो. तिथली कार्यक्रम-पत्रिका बघतो तर तिथल्या लोकांनी एका स्टेडियमवर माझं भाषण आयोजित केलंय. थ्रिलिंग वाटतं. बेस्ट! त्या राष्ट्रातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर आपलं भाषण! मी गुगल मॅपवर बघतो स्टेडियमचे लोकेशन चेक करतो. तिथे, अॅडेल ‘हॅलो, हाऊ आर यु’ हे गाणं म्हणतीय असं मनाच्या पडद्यावर दिसू लागतं. तिच्यासाठी ते स्टेडीयम एकदम फीट वाटलं.
“पण मग, मी काय करू एवढ्या मोठ्या स्टेडियम वर?” मी मंत्रिमंडळात विचारलं.
“धिस इज ऑपर्च्युनिटी, मि. पी एम.” माझे सहकारी सांगतात.
“पण, आता तर निवडणुकाही नाहीत. निवडणुकीत केली की भाषणं. शिवाय, मला बिन जाकिटाचं त्या देशाच्या पंतप्रधानांना, तिथल्या उद्योजकांना, कलाकारांना भेटायचं होतं. जस्ट टीशर्ट घालून.”
“भारतातल्या गरीब-सामान्य जनतेचं रिप्रेझेंटेशन करायचंय सर आपल्याला.” माझा ड्रेस स्पेशॅलिस्ट सांगतो.
“सिल्कचा झब्बा आणि जाकिट!!”, मी म्हणतो. पण, मनातल्या मनात.
तो काही बाही सांगत राहितो. तेवढ्यात, मोबाईलवर अलार्म वाजू लागतो. ते स्वप्न तिथंच संपतं.
मला स्वप्नं फार पडतात. एका मागोमाग स्वप्नं येतात माझ्या डोक्यात.
“तुला सेल्फी नीट घेता येत नाही.” शिया.
“असं नको बोलूस.” मी
मी तिच्याबरोबर सेल्फी घेतो. मी उजव्या कोपऱ्यावर ती माझ्या डाव्या बाजूला. माझा हात थरथरतो. मी उजव्या हातात फोन घेऊन फोटो काढतो. पण, डाव्या हाताचं काय करायचं हे मला कळत नाही. आलेला फोटो सेल्फी नव्हता. फक्त फोटो होता. तो हलला ही होता.
शिया निघालेला फोटो पाहात होती.
“तू जुन्या काळातल्या फॅमिली अल्बमसाठी फोटो काढलायस का?”
ती माझ्या डाव्या हाताला धरते.
“तुला सेल्फी नीट घेता येत नाही.”
माझ्या हातातून ती फोन घेते. हिसकावूनच घेते. टेबलावर ठेवते. स्वतःचा फोन घेत. सेल्फीची तयारी सुरू करते. या तयारीत तिने पुढील गोष्टी केल्या: स्वतःचे केस नीट केले. तिच्या पॅंटला फोल्डस पडल्या होत्या त्या सरळ केल्या. दोन्ही ओठ तोंडात घेऊन ओठांवरनं जीभ फिरवली. काही क्षण कॅमेऱ्यामधे स्वतःला बघितलं. हे सर्व करताना मी तिच्या बाजूला आहे हे ती विसरून गेली असावी. मी तिच्या उजव्या बाजूला उभा राह्यलो होतो तर मला बाजूला ओढलं.
“तुम्हाला बायका नेहमी डाव्या बाजूलाच लागतात. आता तू माझ्या डाव्या बाजूला.”
असं ती का म्हणाली हे माझ्या लक्षात आलं नाही. तिच्या मनात डावं-उजवं काय असावं असा विचार करत असताना तिने माझ्या उजव्या हाताला विळख्यात घेतलं. तिचं असं जवळ घेणं माझ्या सवयीचं असतं. हा तिच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. आम्हा दोघांनाही एकमेकांची बॉडी लॅग्वेज ऑकवर्ड वाटत नाही किंवा अनयुज्वल किंवा रोमॅंटिकही कधी वाटली नाही. सगळं प्लेन होतं. इन फॅक्ट, कुठलीही फीलींग असती तर आमच्यात सहजपणा नसता.
त्या दिवशी, म्हणजे जवळपास एक महिन्यापूर्वी ऑफिसमधे खूप काम होतं. दिवसभर डोकं वर काढायलाही मिळालं नव्हतं. संध्याकाळी सात वाजता काम संपत आलं तसं आम्ही शिणून गेलो होतो. मग, ऑफिसमधून सगळ्यांनी ड्रींक घ्यायला जायचं ठरवलं. एका रेस्टॉरंट कम बारमधे गेलो तर तिथे शियाला कुणी एक गृहस्थ भेटले. तिला पाहाताना ते एकदम हरकून गेले. तिने शेक हॅंड दिला तर त्यांनी तिला हग दिली. आम्ही टेबलावर बसलो तर त्या माणसाच्या नावाने आणि त्याने हग देण्यावरनं ती त्याला ‘अॅसहोल’ म्हणत त्याच्याबद्दल किती वेळ तक्रार करत होती! ते गृहस्थ तिच्या अंगाशी करतात हे तिला जराही आवडलं नव्हतं. ती तेच ते सांगत राहिली. शेवटी, तिला स्वतःच्या त्याच त्या बोलण्याचा कंटाळा आला आणि तिनेच विषय बदलला.
सकाळची वेळ असल्याने तिचा परफ्यूम फ्रेश आहे. ती तोंडाचा तोंडाचा चंबू करते आणि उजवा हात पुढे करून माझ्याबरोबर सेल्फी घेते. “अशी काढतात सेल्फी”, असं म्हणत काढलेली सेल्फी दाखवते. मला सेल्फी घेता येत नाही हे ऐकताना मला त्रास होतोय. म्हणजे, झाला. मला आणखी काय-काय येत नाही याचा विचार करत राहिलो. विचार करता करता पुढील गोष्टी करत राहातो:
इन्स्टाग्रॅम उघडतो खाली स्क्रोल करतो.
वॉट्स अॅप उघडतो खाली स्क्रोल करतो.
फेसबुक उघडतो खाली आणि वर स्क्रोल करतो.
चांगली सेल्फी घेण्याचा विचार मनात येत राहातो. त्यासाठी, मी गुगल करतो.
गुगल करता करता माझं केबीनच्या दाराकडे लक्ष जातं. स्वतःच्या मोबाईलकडे पाहात शिया चालताना दिसते. कुणीतरी हेडफोन गळ्यात लटकवलेलं चालताना दिसतं. शियाच्या समोरून कुणी हातवारे करत मोबाईलवर बोलताना दिसतं. त्यांच्या लक्षातही आलं नसेल की मी त्यांच्याकडे बघतोय. मलाही माहिती नसेल ते माझ्याकडे बघतायत का ते. सेल्फीकडे बघून झाल्यावर सेल्फीलाही माहीत नसेल तिच्याकडे मी बघतोय का ते.
माझी सकाळ अशीच लां ब त राहील.
***
सकाळ झाल्यासारखी वाटते. तो कुस बदलतो. जागा बदलतो. पोझिशन बदलतो. मान वळवतो. किंचीत मान उचलतो आणि खिडकीतून डोकावतो. मनाचा हिय्या करुन उठतो. बेडरूमच्या दाराकडे पहातो. दारातून बाहेरची खोली दिसते. तिथे प्रकाश आहे. रात्रीचा टीव्ही कधीतरी बंद झाला असावा. पण, टीव्हीवरचा लाल दिवा डोळ्यात शिरतो. पांघरुण बाजूला करतो. खिडकीकडे जातो. उठायला हवं. ऑफिसमधे जायला हवं. काही तरी प्यायला हवं. काहीतरी खायला हवं. विचार करत वरच्या मजल्यावरुन खालीपर्यंत एकटक बघत राहातो. लांबवर येणारे आवाज कानावर परत-परत पडत राहातात. कान जागे राहातात. काहीतरी खणण्याचे आवाज येत राहातात. कुणीतरी दगड ओढत असतं. कोणीतरी जमीन खणतंय. माती ओढतंय. मोबाईलवर मेसेज आल्याचा आवाज येतो. तो मोबाईलवर पाहातो तर बाहेरून आवाज येत असतो. कुठूनतरी लांबवरून आवाज येत राहातोय. पण, त्याला वाटतं मोबाईलमधनं आवाज येतोय. मोबाईलमधून आवाज येण्याचे भास नेहमीच होत असतात. (मोबाईलचा आवाज त्याला आवडतो. मोबाईल बंद असलेला त्याला आवडत नाही.) तो आठवत राहातो कुठले-कुठले आवाज येत असतात. त्याला आठवायला आवडतं. आठवत राह्यला आवडतं.
तो आठवतो. फ्लॅटच्या दारातून परवा मांजर आत येण्याचा प्रयत्न करत होतं. तो नेटफ्लिक्सवर सिरिज बघत होता. नेटफ्लिक्सवर काही बघत असेल तर तो खूप फोकस्ड असतो. पण बराच वेळ दाराशी खुसफुस होत होती. तेंव्हा तो खाली वाकून दाराच्या फटीतून बघत राहिला. तेव्हा त्याला मांजराचा पाय दिसला. इतर वेळा तो दचकला असता अशा प्रकाराने. पण आता नाही दचकला. आता तो आठवू लागलाय मांजरीचा कुठला पाय त्याने पहिल्यांदा बघितला. दाराच्या फटीतून मांजराचा पाय घुसताना त्याला दिसतो. पायाचं नख आत घुसतंय. मांजर कुठल्या रंगाचं असावं असा विचार करतोय पण त्याचा फक्त पायच दिसतोय. मांजर म्हणालो आणि मांजरी पण म्हणालो. दोन्हीत नर-मादी असा फरक केला काय हेही आठवतो. पण, तो फरक कसा करावा हे त्याला माहिती नाही हे त्याला आठवतं. काही वर्षापूर्वी, म्हणजे दहा एक वर्षापूर्वी, जेव्हा तो वीस एक वर्षाचा असेल तेव्हा त्याने एका मित्राला विचारलंही होते. माणसाचं लिंग ओळखणं सोपं असतं तसं मांजरांचं असतं काय? मित्र म्हणाला होता, “सोप्पंच असतं. उलटं करून बघायचं. पण, काय बघायचं हे न सांगता तो मित्र हसत सुटला होता.” दारावर हात मारून मांजराला हुसकावून लावावं की नको ? थोड्या वेळानं ते मांजर निघून जातं.
तो जागा बदलून बघतो पण उठवत नाही. खुर्ची वळवून पाहातो. पण खुर्ची फिरते फक्त. तो नाही. गप्प बसून राहातो. कान देऊन बाहेरच्या आवाजाला ऐकतो. कान देतो. कानाचे भोक देतो. कानाचा पडदा देतो. आवाज घेत राहातो. कानात आवाज येत राहातो. आवाज येत राहातात. तोंड चिकट होते. चिकटलेले ओठ आणि टाळूला चिकटलेली जीभ ओढून बाजूला काढू पाहातो. निसटल्याचा आवाज येतो. बाहेरचा आवाज बंद होतोय. आतला, तोंडातला आवाज तोंडातच राहातो. कानामागून कानात शिरतो. कानाच्या पडद्यामागे शिरतो. वर डोक्यापर्यंत जाताना जाणवतो.
परत येऊन तो अंथरुणात लोळत पडतो. मोबाईलमधे एकदम गुंग राहातो. सकाळपासून ढगाळलेली हवा आहे. पडल्या पडल्या टीव्ही ऑन करतो. मग, आळीपाळीने एकदा मोबाईल, मग टीव्हीकडे बघतो. खिडकीच्या काचेतून अंधारलेलं दिसत होतं. किती अंधारलेलंय? सोबतीला मोबाईल होताच. पलिकडच्या मित्र-मैत्रिणींना “Is it going to rain!” आणि सोबतीला खिस-खिस हसणारे इमोटीकॉन्स पाठवून दिले. तिकडून परत काही इमोटिकॉन्स आले. या येण्या-जाण्यात अंधारलेलं आकाश लक्षात आलं नाही. केस सावरत आणि मोबाईलवर बोलत आवाजाचा अंदाज घेत तो हॉलमधे आला. अंगात पिवळ्या रंगाचा हाफ शर्ट, बॉक्सर-शॉर्ट. एका हाताने कानापर्यंत रूळलेले केस सावरत आणि दुसऱ्या हाताने मोबाईलवर चॅट करत तो हॉलमधल्या सोफ्यावर पडला. मागे पुढे झालेले केस नीट करत तो सोफ्यावर लोळत पडला. पोटावर हात ठेऊन केसाच्या बटेबरोबर खेळत मोबाईलकडे बघत राहिला. पोटावर पडून दोन्ही कोपरावर झोपून मोबाईलकडे बघत मशगूल राहिला. मधेच खिडकीतून चकाकणारा प्रकाश दिसताक्षणी मोबाईल घेऊन फोटो काढायला सरसावला. क्षणार्धात फ़ोटो काढून तो स्नॅपचॅट मधून पाठवूनही दिला. मोबाइलचं बटन दाबून वेळ पाहिली. सकाळचे साडे दहा वाजले होते. मैत्रिणीला “GM” चा मेसेज पाठवला.
त्याचा दिवस सकाळी अकराला सुरू होतो. सकाळी नऊचा अलार्म लावलेला असतो. एकदा अलार्म झाला की तो अलार्म बंद करतो. मग, घडयाळाला दिलेल्या सूचनेप्रमाणे साडेनवाला परत अलार्म होतो. तो परत बंद करतो. दहाला परत अलार्म होतो. मग तो बराच वेळ होतो. शेवटी तो अलार्म बंद करून उठतो. म्हणजे, अंथरुणात उठून बसतो. अंथरूणात उठून मोबाईल वापरू लागतो. त्याला आवडता गेम उघडतो. गेम सुरू करतो. गेम सुरू राहातो. गेम खेळता खेळता फेसबुक आणि वॉट्स अॅपवर वेगवेगळे मेसेजेस येऊन पडतात. एक गेम पूर्ण होईपर्यंत मेसेजेस येत राहातात. गेम पूर्ण झाला की तो उठतो. वॉशरुममधे जाऊन येतो. वॉशरुममधे बिझनेस इंडीया, आऊटलूक, वायर सारखी मॅगेझिन्स लटकून पडलेली असतात. एखादं उचलून त्यातली चित्रं बघत सारे विधी तो पूर्ण करतो. आता त्याची झोप बऱ्यापैकी संपलेली असते. चेहऱ्यावर बऱ्यापैकी उत्साह दिसून येतो. स्वयंपाकघरात येऊन कट्ट्यावरचा मग घेतो. त्यात फील्टरचे पाणी घेतो आणि मग मायक्रोव्हेव मधे तीस सेकंदासाठी सरकवून ठेवतो. मायक्रोवेव वाजू लागते. तो मोबाईलमधले मेसेजेस वाचू लागतो. स्वरुप, टीना, आण्णा असे बऱ्याच जणांकडून मेसेजेस येऊन पडलेले असतात. तो एकेक मेसेजेस वाचू लागतो. तोवर, मायक्रोवेव्हमधले पाणी गरम झाल्याचा सिग्नल येतो. मायक्रोवेव्हचा दरवाजा उघडून पाण्याचा मग बाहेर काढतो. कोमट झालेले पाणी घशापर्यंत पोहोचल्यावरचा प्रभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. दोन घोट, तीन घोट, चार घोट पितो आणि शांत होतो. डोळे मिटून घेतो. डोळे उघडतो. नाक फुगल्यासारखे दिसते. तशाच फ़ुगल्या नाकानीशी तो परत मेसेजेस पाहू लागतो. “फक धिस टीना!” मेसेज वाचू लागतो. मोबाईल किचन टेबलवर ठेवून टाकतो. “ हू रियली वॉन्ट्स टू फक धिस बिच” असे पुटपूटत चहा करायचे भांडे घ्यायला वाकतो.
बॉक्सीचा नेहमीची सकाळ अशी सु रू होते.
बॉक्सीची आजची दुपार कुठेतरी बाहेर खाण्यात जाईल.
बॉक्सीची रात्र मोबाईलमधे झोपून जाईल.
नाहीतर, बॉक्सीची सकाळ कधी-कधी सं प त च नाही.
दररोज सकाळी-सकाळी ममचा मेसेज येऊन पडलेला असतो. तिचा मेसेज येऊन पडलेला दिसला की त्याच्या कपाळाला आठ्या पडतात. पण तसे दाखवून न देता, “जी एम” किंवा “सन राईज” चे इमोटीकॉन पाठवून तो ममला ग्रीट करतो. सकाळी येऊन पडलेल्या मेसेजला त्याने नेहमीप्रमाणे तसाच रिप्लाय दिला होता. संध्याकाळीही ममचा मेसेज आला होता. “howz u?” त्याला आश्चर्यच वाटलं. कारण, खरंतर मम असे काही मेसेजेस पाठवत नाही. आजच कसा काय तिने हा मेसेज पाठवला? चमकणाऱ्या आकाशात पाहात तो विचार करत होता. एखादा विचार चमकूनही गेला असेल ममच्या मनात. चमकणारं आकाश आणि आईच्या मनात चमकून गेलेला विषय यामधल्या ‘चमकण्या’ची जी फन करतोय त्याची बॉक्सीला मनापासून गंमत वाटली. ममला आपली आठवण आली असेल या विचाराने आपणही तिला फोन करायला हवा असा विचार करून त्याने फोन उचलला असेल. पण, सकाळी तिचा फोन फक्त वाजत राहिला. संध्याकाळी तिने बॉक्सीला फोन केला तेव्हा त्याचा फोन वाजत राहिला. आता त्याने फोन बघितला. मिस्ड कॉल दिसत होता. त्याला वाटलं की ममला फोन करुन विचारावं तिकडंही ढगाळ आहे का?
तेवढ्यात, बीबीसीवर आशिया प्रोग्रॅम सुरु झाला. म्यानमारमधल्या रोहिंग्यांच्या प्रश्नांबद्दलची पिळवटून टाकणारी दृश्ये दाखवली जात होती. ‘ओह, गॉड. फक धिस युसलेस वर्ल्ड’, बॉक्सी मनातल्या मनात म्हणतो. एक नजर मोबाईलवर, दुसरी नजर टीव्हीवर. बी बी सी न्यूजच्या वेबसाईटवर जाऊन रोहिंग्यांबद्दलची न्यूज ट्विटरवरून शेअर करतो. आपल्या ट्विटरला कुणी लाईक करतं काय किंवा रिट्विट करतं काय याची वाट पाहात बसतो.
बॉक्सी सकाळी अकरा वाजता उठला होता. जागा व्हायच्या आधी कामवाली बाई सकाळी कधी तरी घरातलं आवरून गेली होती. तो झोपला होती ती खोली आवरायचे तिला धाडस झाले नसणार. त्याला आपल्या खोलीत ठेवलेल्या वस्तू तशाच ठेवलेल्या आवडतात. आवराआवरीच्या नादात इकडच्या वस्तू तिकडे झालेल्या त्याला जराही खपत नाही. तो वॉशरुमला गेला असेल आणि चुकून फोन घेऊन जायचा विसरला असेल आणि तेवढ्यात कामवाल्या बाईने, साफसफाई करताना, त्याचा फोन उचलून दुसरीकडे ठेवला तर त्याला प्रचंड संताप येतो. एखाद्या बाईला आपला नवरा एक रात्र वापरला किंवा एखाद्या पुरूषाला आपली आपली बायको कुणी एक रात्र वापरली तर किती राग येईल तेवढा राग बॉक्सीला येतो. (इथे बाई-पुरुष एवढी दोनच उदाहरणे बॉक्सीला किंवा बॉक्सीबद्दल विचार करणाऱ्यांना सुचू शकतात. पण, यापलिकडे, अ-लिंगी, बिन-लिंगी, लिंग विरहीत अशा उदाहरणांचा आपल्या कल्पनाशक्तीच्या वा अनुभवाच्या जोरावर ते विचार करु शकतात. शिवाय, ‘वापरली’ वगैरेच बॉक्सीला सुचतं. )
बॉक्सीची सकाळ रें गा ळ त राहाते.
***
मी आणि बॉक्सी एअरपोर्टवर भेटलो.
मला आणि बॉक्सीला वाटले, आम्ही मॉलमधे भेटतो आहोत.
मला आणि बॉक्सीला असंही वाटलं की आम्ही ब्रेकफास्टसाठी भेटलो आहोत.
मला आणि बॉक्सीला असंही वाटलं असेल की आम्ही एक भाताचं शेत विकत घेतलं आहे आणि तिथल्या चमकत्या सूर्यकिरणात आम्ही भेटलो आहोत.
मला आणि बॉक्सीला असंही वाटलं असेल की जिथं सूर्य कधी डोक्यावर येत नाही तिथे आम्ही भेटलो आहोत.
मी आणि बॉक्सी कधी भेटलो नाही पण आम्हाला भेटल्यासारखे वाटते.
मी आणि बॉक्सी कधी बोललो नाही पण आम्ही तीन-त्रिकाळ बोलतो आहे असे वाटते.
मी पुरूष आहे हे मला माहिती आहे. पण, बॉक्सीला तसं नाही वाटू शकतो. मी बाई आहे अशी त्याची फीलींग असू शकते. किंवा तो गे असेल तर मीही गे आहे असं वाटू शकते. तो लेस्बीयन असेल तर मीही लेस्बीयन आहे असं वाटू शकते. किंवा, आणखी काहीही. बायसेक्सुयल, वगैरे. काहीही, खरंतर. त्याने सकाळी उठल्या उठल्या विचार केला असेल ते. त्याला मी जसं पाहिजे असेल तसं.
बॉक्सी पुरूष नाही हे मला माहिती आहे. तो ट्रान्सजेंडर नाही हेही मला माहिती आहे. तो बाई असावा असे मला वाटतं. कारण, तसा मी विचार केला होता सकाळी. तशीच फीलींग अजूनही आहे माझ्या मनात.
बॉक्सी सारखं मागचं उगाळत बसतो म्हणून त्याचं असं झालंय असं त्याचे मित्र/मैत्रिणी किंवा कुणीही त्याला सकाळपासून सांगत असतात. त्यामुळे, मी स्वप्न बघतो हे त्याला आवडत असावं.
‘मी पंतप्रधान झालो तर’ असली स्वप्नं मला सारखी पडतात. अशी स्वप्नं दीर्घ काळ-रात्रभर चालणारी असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर मला दमल्यासारखं होतं. शिवाय, मी फार ‘पॉलिटिकल’ असतो असंही माझ्या आजुबाजूचे मला म्हणतील. असं माझ्यावर दडपण असतं. “सात आकडी पगार मिळवणारे आणि विकेंडच्या पार्ट्या करणारे तुम्ही लोक विनाकारण ऑनलाईन पॉलिटकल राहाता.” अशीही माझ्यावर टीका होईल अशी भीती वाटते. म्हणून, मला बॉक्सीसारखं कुणीतरी मागं बघणारं भेटलं हे बरं वाटतं.
बॉक्सी बाई आहे याची खात्री मी मनाशी करून घेतल्यानं तो सकाळी सकाळी मला हाय करतो ते बरं वाटतं.
मी आणि बॉक्सी सकाळी फ्रेश असतो. अनेक वॉटस अॅप मेसेजेस दोघांनाही सकाळी सकाळी फॉरवर्ड केले जातात. ते वाचण्यात आमची सकाळ आनंदात जात असते. दर चोवीस तासात आम्ही आमचे स्टेटस अपडेट्स बदलत राहातो. आम्ही आमचे प्रोफाईल्स एकाच अॅपने गार्ड केले आहे. म्हणून, दोघांनाही एकमेकांबद्दल लायकिंग आहे.
मी आणि बॉक्सी एकमेकाला जवळचे समजतो. मी किंवा बॉक्सी फ्रंट कॅमेऱ्यात पाहून सकाळी सेल्फी काढतो तेव्हा माझ्या मोबाईलमधे त्याचा फोटो सेव होतो. बॉक्सीच्या मोबाईलमधे माझा फोटो सेव होतो.
आशुतोष, कथा उत्तम जमलीय. नाट्यमय आणि चित्रमय वर्णनं आहेत. सेल्फीचं वेड आणि पंतप्रधान असण्याचं स्वप्न पडणं अर्थ पोहोचवतं.
अतुल, धन्यवाद. उत्साह वाढवणारी प्रतिक्रिया.
आशुतोष तुझी कथा वाचली छान जमलीय मूर्त अमूर्त असणे नसणे स्वप्न वास्तव असा खेळ असं सार कथेत आहे नर मादी यांतील संघर्ष वगैरे अस्तित्ववादी कथापरंपरेत बसणारी आहे ही कथा
सर, मनापासुन आभार.
क्षणात आता – परवा -तेव्हा -उद्या -नंतर असा सकाळीच प्रवास घडतो.. आता मध्ये आता तरी कुठे आहे मी… वाचलयं त्यावर लिहीतोय.. आता
आशुतोष,कथेतून आजच्या चालू काळाकडे पाहता येतं,एवढे तपशील या कथेत येतात.ही सकाळ वाचतांना खूप काही देऊन जाते त्यात आपणही सामावल्या जातो.आताची जगराहाटी ती सांगून जाते.अगदी चालू काळाचं प्रतिबिंबचं तुझ्या कथालेखनाला माझ्या शुभेच्छा🌺🌺 दागो.काळे Dago Kale.
Virtual गुंता आहे किती. थकवणारा आणि तरी engaging ,जखडून ठेवणारा.
‘बॉक्सी माझच fake account आहे पण मी ठरवलं नाहीये ते Male /Female की transgender की crossdresser असावं! मुळात मला माझच जेंडर अजून ठरवायचय! ‘
असा काहीसा 🙂
छानच .
शब्दचित्र वाटलं मला हे.
ऑन ऑफ ऑन ऑफ असे सीन्स प्ले होतायत डोळ्यासमोर असं वाटलं.