महामारी सुरु होऊन चार महिने झालेत. गेले दोन महिने झाले तू झोपून आहेस. कॅलेंडरप्रमाणे हिवाळा ऋतू आहे पण कडकडीत उन्हाळाच सुरु असल्यासारखं वाटतय. पक्षी कर्कश्य आवाजात ओरडत राहतात. तुला जाग येईल अशी भीती वाटते. डोळ्यांनी दटावू पाहतो मी पक्षांना. पण, माझं ते ऐकत नाहीत.
कुणालाच वाटले नव्हते- तुलाही आणि मलाही- की वातावरण इतक्या लौकर बदलेल.
आपल्याला काही समजायच्या आत आपले आयुष्य ढवळून निघतेय. कल्पनाही केली नव्हती आपण. असेही नाही की आजूबाजूचे सारेच लोक गाढ झोपेत आहेत. त्यांनाही झोप नाही येत. मलाही येत नाही. ते आपले डोळे टक्क उघडे ठेऊन आहेत. सगळे झोपल्यासारखे दाखवतात. घराघरात पडून राहिलेले आहेत ते. त्यांनी आपले डोळे लपवलेत झोपण्याच्या सोंगात. डोळे मिटून आपल्या आपल्याशी झोपून आहेत ते. मला तुला हाक मारायची होती पण उगीच तुला उठवून काय करू? आजूबाजूची दारे लावलेली आहेत. खिडक्या बंद आहेत. सर्वानी एकमेकांना सोडून दिलय असे वाटते. पण त्या बंद दारांमागे आणि खिडक्यांमागे लपलेले आहेत त्यांचे सोंग घेतलेले डोळे. लोक शांततेत बसून आहेत. त्यांनाही नको आहे अशी शांतता. ते घाबरलेत. कधी उठायला मिळेल या आशेने ते पडून आहेत. दुकाने बंद आहेत. सिग्नल बंद. कोपऱ्यावरचे कुत्रेही थोड्या वेळाने शांत बसेल कुठल्या तरी कोपऱ्यात. खालच्या रस्त्यावरची पिठाची गिरणी आवाज करून बंद पडली आहे. ती कधी तरी आवाज करायची हेही आपण विसरलो आहे. मी विसरलोय. तुला जाग येईल म्हणून वाटते ती बंद राहावी. पण किती काळ? इतिहास लिहिला जायच्या आधीचा काळ वाटतो. टेलिव्हिजनही बंद आहे. पण त्यावर कुणी तरी भाषण देत राहते सतत. मागचे भाषण देऊन तो बाबाही आता झोपी गेला असेल. कंटाळून. त्याने ओढून ताणून आणलेला उत्साह संपल्यानंतर परत शांत झाल्यासारखा वाटतोय ती चौकोनी आकृती. मला वाटते तो बाबा पडलेला असेल खुर्चीवरून, डोक्यावर. गुलना फोडून घेतला असेल त्याने. टी व्ही वरल्या हॉस्पिटल वरून रक्त येईल ओघळत पुढे पुढे. तू जागी असतीस तर पहिले असतेस मी काय म्हणतोय ते. तू झोपून गेलीस त्यानंतर मी एक मनुष्य पहिला रस्त्यावर पडलेला. डोके खुपसून झोपला होता. तो पडत होता त्यावेळी त्याला मी पाहत होतो. रस्त्यावरच्या त्या पुढच्या कोपऱ्यावर पडताना मला तो दिसला. मला त्यावेळी जांभई येत होती. जशी मी जांभई आवरत होतॊ तसा तो पडत होता. खिडकीच्या गजातून बघताना भूमितीच्या वर्गातील आठवण यावी अशा रेषा एकमेकांला छेदून जाव्यात तसा तो पडत होता खिडकीच्या गजांना छेदत. पडून लोळत गेला असता तर त्याच्या आजूबाजूला खूप जागाही होती. पण, रिकामी पडलेली जागा आता कुत्र्याने घेतलीय. जीभ बाहेर काढून ते कुत्रे त्या पडणाऱ्या माणसाकडे पाहत होते. मी, कुत्रा आणि तो माणूस. त्रिकोणात सारे अवकाश फिरत होते. कुण्या देशात कुत्रे मांजर आणि मुंगूस एकत्र राहतात असे मी वाचले आहे. कुठे ते आठवत नाही. तू झोपायच्या आधी दोनच दिवस व्हाट्सअप वरून फिरणारा तो मेसेज दाखवून तू हसत होतीस. कुठेतरी, निदान whatsapp वर तरी, एकमेकाबरोबर कुणी- कुणी राहते आहे हे आठवून आता दिलासा देणारं वाटतंय. वातावरण शांत आहे. दूरवर कुठेतरी कुत्र्याचा आवाज येतो. मांजर कुणाला तरी हाक मारतेय असं वाटत.
त्यादिवशी तुला पाहिले काचेतून तर तर रात्रभर तू झोपलेली आहेस असे सांगितले मला त्यांनी. तुझ्या खोलीत दिवे बंद करायला गेलो तर खोलीत तू पाठीवर तशीच पडून होतीस सकाळपासून असे वाटते. समोरच्या रस्त्यावरचे दिवे बंद नाही होत कधी. आजूबाजूंच्या घरातही दिवे सारखे सुरूच असतात. एखाद्या घरात मोठा दिवा लागला नसला तरी देवासमोर लावलेला दिवा तसाच तेजाळत असतो. मिणमिणता. तू झोपायच्या आधी अर्धा तास मला मेसेज करून म्हणाली होतीस दिव्यात तेल घाल. मी घातले. तू झोपण्याचा धोका देशील हे माहिती नव्हते. तुझ्या डोळ्यात धोक्याची कुठलीही सूचना नव्हती. पण पुढच्या डाम्बावरचा दिवा विचित्र वागतो तशी तू विचित्र वागतेस. अचानक डोळे काय मिटतेस.
कुणीच चांदण्यांकडे पाहत नाही. सगळे सुकलेल्या नजरेने पाहत राहतात समोर, बाजूला, कुठेतरी आणि त्यांची अस्वस्थ नजर खुणावत राहते मला तुझ्याकडे पाहण्यासाठी. युसलेस सारे.
लौकरच हिवाळा संपेल आणि उन्हाळा सुरु होईल. म्हणजे, ऋतुचक्राप्रमाणे. मी तुला म्हणालो होतो की तू जागी राहिलीस तर मी तुला डोंगरावर पाऊस दाखवायला घेऊन जाईन. “पाऊस दाखवायला?” तू खी-खी करत हसत सुटलीस आणि म्हणालीस, “माकडा, पाऊस दाखवत नाहीत, पाऊस अंगावर घेतात.” मी म्हणालो होतो ते तू किती सिरिअसली घेतलेस माहीत नाही किंवा आपल्याला डोंगरावर जाणे किती शक्य झाले असते हे माहीत नाही. पण तू झोपायला नको होतेस. आपण डोंगरावर पावसात जाऊ शकलो नसतो तरी मी डिजिटली तुला दाखवले असता. कोसळणारा पाऊस. थडकणाऱ्या लाटा. सोसाट्याचा वारा. गेले दोन दिवस तुला मेसेज पाठवला नाही किंवा मेलही केला नाही. तुझ्या इंस्टाग्राम वर जाऊन पोस्टला लाईकही केलेले नाही. कारण, तुला उगीच उठवायला नको. तुझी झोप मोडायला नाको. एकदा उठलीस की परत तुला झोपही येणार नाही म्हणून मी काही त्रास दिला नाही तुला. रिक्षातून जाताना किंवा टॅक्सी मधून जाताना तू पुस्तके घेऊन जायचीस. तुला पुस्तक वाचायचे नसते तर ते नुसतेच कॅरी करायचे असते, बरोबर न्यायचे असते हे मला माहिती आहे. मला माहितीय तुला वाचण्यापेक्षा पुस्तके हातात घेऊन जायला आवडतात. एकदा मी तुला याबद्दल विचारले तेंव्हा तू म्हणालीही की पुस्तकाबरोबर सोबतीला कुणीतरी असल्याची फीलिंग असते. असे कसे असे विचारले तर म्हणालीस असेच असते आपले. तुला पुस्तकांचा आधार वाटतो असे म्हणालीस विचारले तेव्हा.
ते आता बोलायला नको.
तू उगीच फोटो टाकत राहतेस फेसबुकवर. साडी हातात घेऊन. साडी बाजूला घेऊन. साडी वर करून. साडी डोक्यावर घेऊन. फोटो काढण्यातच तुला इंटरेस्ट असतो याचे मला आश्चर्यच वाटते. असो, ते जाऊ दे. सगळे करत राहीली असतीस. पण झोपायला नको होतीस.
तू आता झोप.
आता इथे थोडे मोकळे ठेवले आहे. मोजके लोक इकडे तिकडे फिरताना दिसतात. मी हळूच या माळरानावर आलो आहे. ही जागा पुस्तक घेऊन वाचायला यायला खुप चांगली आहे. अर्थातच, उन्हाळ्यात नाही. इथे, पावसाळ्यात खूप गवत येते. आपण एकदा इथे ससाही पहिला होता. मी लहानपणी इथे यायचो खेळायला. कधी काळी इथे कुणा म्हाताऱ्या माणसाला जाळले होते. म्हणून इथे त्याच्या नावाचा दगड ठेवला आहे. आता तो कदाचित दिसणाराही नाही. कुणी आलेले नाही इथे बरेच दिवसात. मी यायचो लहानपणी तेव्हा मला कुणी इथे येऊन द्यायचे नाही कारण भुताटकी आहे म्हणायचे. इथे उन्हाळ्यात एखाद दुसरे फूल येते. बरीच झाडे निष्पर्ण असतात. कधी कधी वाटते तुला कधी कधी माहिती होते काय मला कोणती फुले आवडतात ते? कोणती झाडे आवडतात? तुला कुठली झाडे आवडतात हे मात्र तू मला सारखे सारखे सांगायचीस. मला कधी तुला नीट काही सांगता आले नाही.
मी या माळरानावर आलोय पण तू झोपली आहेस. तू कोणती स्वप्नं बघती आहेस? तुला रात्री झोप लागते का नाही? तुला माझी आठवण येते का?
आपल्याला रात्रीत गाडी चालवायला आवडायची. खरं तर मला गाडी चालवायला आवडत नाही. पण, तुला आवडते. तू कभिन्न रात्री गाडी चालवतेस तेंव्हा मी खिडकीशी बसून बाहेर पाहत राहतो. कडेला वाढलेल्या गवतातून एखादा साप किंवा वाघ समोर येईल अशी भीती वाटून राहते. दूरवर जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रस्त्यांना आपण ओलांडत जातो. गाडी चालवत अगदी अखेरच्या टप्प्यात पोहोचलो असू हेही आपल्या लक्षात येत नसतं.
आता मलाच गाडी चालवावी लागतेय. समोर काही दिसेनासे झालेय. पण, पुढे जातो तसतसे नीट दिसू लागते. कललेला सूर्य आपल्या पाऊलखुणा ठेऊन गेलेलाय. पश्चिमेला अजून थोडासा प्रकाश आहे. थोड्या वेळात तोही दिसेनासा होईल. मग दिसू लागेल आकाश चांदण्यांनी भरलेले. थोडी गाडी पुढे जाईल तसे दूरवरच्या गावातील दिवे लुकलुकायला लागतील. आता मी पुलावरून गाडी घेऊन चाललोय. बाजूला नदीचे कोरडे पडत चाललेले पात्र दिसतेय. जे काही थोडे पाणी उरलंय त्यात वरच्या आकाशातल्या चांदण्याचे प्रतिबिंब दिसतेय. आता पूल ओलांडतो आणि पुढे जातो तशी धूळ उडताना दिसते. इतकी धूळ कुठून येतेय. मी कुठून चाललोय. बाजूला दूर वर कुठेतरी शेत जळत असताना दिसते. प्रचंड मोठी आग लागली आहे. आगीचे लोट आपल्या पर्यंत पोहचतील या भयाने मी गाडी वेगाने चालवू लागतो. आसमंत उजळून गेलेला दिसतो. एकाबाजूला त्या आगीचा प्रकाश तर दुसऱ्या बाजूला काळाकुट्ट अंधार. अरुंद रस्त्याच्या त्या बाजूने सायकलवाला खांद्यावर बॅटरी लटकवून सावकाश सायकल मारत जाताना दिसतो.
अलीकडे असे मी कुणाला मोकळे फिरताना पाहिले नाही. आज किती दिवसाने पाहतोय कुणाला तरी. आता खूप दूरपर्यंत जाऊन चालणार नाही. पुढच्या नाक्यावर पोलीस उभे असतील. मला विचारतील कुठे चालला आहात. का चालला आहात. तुम्ही बरे असल्याचे प्रमाणपत्र असेल तर ते दाखवा म्हणतील. माझ्याकडे बरे असल्याचे प्रमाणपत्र नाही आणि आजारी असल्याचे प्रमाणपत्रही नाही. तुझ्यासाठी प्रमाणपत्रे गोळा करण्यात गेले किती दिवस गेले. तू झोपण्याआधी हरेक टप्प्यावर प्रमाणपत्रे मागत गेले ते सारे. मीही गोळा करत गेलो प्रमाणपत्रे. माझ्या शिक्षणाचीही प्रमाणपत्रे इतकी नाहीत जितकी तुझी गोळा केली.
काल घरासमोरच्या मैदानावर एका मुलाला सायकलीवरून गोल-गोल फिरताना पाहीले. त्याचे आई-वडील झोपून गेले होते. त्याची शाळा बंद होती. खेळायच्या मैदानावर एक कुत्रे पडून होते. त्याच्या भोवती तो सायकल गोल-गोल चालवत होता. त्याला बघून मलाच भोवंडून गेल्यासारखे झाले. नंतर, खालच्या किराणा मालाच्या दुकानात तो दिसला. तोंडावर फडके होते त्याच्या. विचारले तसा तो म्हणाला. “आता काही दुसरे काय करणार म्हणून गोल गोल सायकल चालवत राहतो.” जर मी उतरून खाली गेलो असतो आणि मैदानावर चक्कर मारली असती तर सायकलीच्या चाकांच्या खुणा मैदानावर दिसल्या असत्या. एकमेकाला छेदून जाण्याऱ्या टायरिंचे ठसे. छोटे छोटे चौकोन. पावसाळ्यात गवत उगवेल या खुणांमधून.
काही दिवसांपूर्वी पोलिसांची गाडी पाहीली कोपऱ्यावर. पोलीस गाडीत झोपून होते. मनात विचार आला, कोणापासून कोणाचे संरक्षण करत आहेत हे. आजूबाजूला तर कुणीच चोर दिसत नाही. शत्रू तर नाहीच दिसत. पण, यांना का आपले घर दार सोडून गाडीत झोपावे लागते. काही दिवसापूर्वी मी एका जोडप्याला भेटलो. साठीचे गृहस्थ आणि त्यांची पत्नीही साठीची असावी पण दिसताना तेवढ्या वयाची दिसली नाही. त्यांना विचारले तुम्ही का झोपला नाहीत इतके दिवस. ते म्हणाले जागे राहिलो तर अँटीबॉडीज वाढतील म्हणून. आतापर्यंतही ते झोपलेही नसतील. झोपण्यापेक्षा त्यांना अँटीबॉडीजची जास्त फिकीर असावी. मग त्यांनी मला विचारले मी का झोपलो नाही. मी काही उत्तर दिले नाही. मला स्वतःलाही दिले नाही उत्तर. मला स्वतःला कधी कळले नाही की मी का झोपत नाही. तुझा विचार मला झोपू देत नाही की मी झोपलो तर स्वप्नातही तुझा विचार करत राहीन म्हणून मला झोप येत नाही?
आपण समुद्र किनाऱ्यावर गेलो होतो. दूरवर समुद्रात जहाजाने कितीतरी दिवसांसाठी नांगर टाकला होता. काय ठेवले असेल त्या जहाजात, मी विचार करत राहायचो. आपण खेळही खेळलो त्यावेळेस त्यात काय असेल त्या चीजांच्या नावांचा. आपण बोललोही त्यातून जे सामान पोहोचवले जाणार आहे ते ज्याला मिळणार आहे ते मिळाले नाही तर काय होईल? त्या माणसाचे काय होईल आणि सामानाचे? वर्तमानपत्रात बातमी आली होती कि रस्त्यावर गाड्या अडवून ठेवल्या आहेत रात्रभर. गावात गाडीवाल्याना गावात येऊ देत नाहीत. सामानाचे काय होईल हे तर आहेच पण सामान वाहून नेणाऱ्या ड्रॉयव्हरचे काय होईल? तू झोपली आहे त्यामुळे आपण दोघे मिळून इमॅजिन करू शकणार नाही त्या ड्रायव्हरचे काय होईल ? त्याची वाट कोण पाहत असेल त्याचे काय होईल? की त्याची वाट पाहणारेही झोपले आहेत? झोपेच्या ओझ्याने त्यांच्या प्रियजनांची अंथरुणेही वाकली असतील. परवा कुठेतरी वाचले कि जरी हे झोपलेले सारे उठले तरी हे जग त्यांच्यासाठी तेच, तसेच असणार नाही जसे ते होते. वेगळे असेल. त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होईल. मला काही अंदाज येत नाही. कारण माझ्या जवळच्या पैकी जे कुणी झोपले आहेत ते अजून उठले नाहीत. तुही अजून जागी व्हायची आहेस. तू उठलीस तर कदाचित कळेल. तू उठलीस की मग मी जे लिहितोय ते परत वाचेन आणि मग मला आठवेल की तुझ्या उठण्याची मी वाटत पाहत होतो. मग, मी तुला हे वाचून दाखवेन. अर्थात, हे सारे जर-तरचे.
पहिल्यांदा आपण आपण नदी तीरावर भेटलो होतो. तेव्हा काय झाले हे त्यावेळेस कळले नाही. काही दिवसानंतर जाणवले आपल्यात काय झाले त्या दिवशी ते. तिथे कुणी नव्हते तरीही मी तुला स्पर्श करू शकलो नव्हतो. डोळे लपवत लपवत तुझ्याकडे पाहत राहीलो होतो. एवढे आठवते. तू नदी पाहत राहिलीस. पण, मी तिथून नदी नीट पाहताच निघून आलो. तू पलीकडच्या तीरावरही जाऊन आलीस. पण तुझ्याबरोबर जावे हे काही मला काही सुचले नाही. तू माझ्याकडे पाहत राहिलीस आणि न बोलता डोळ्यांनी विचारत राहिलीस की मी का गेलो नाही तुझ्याबरोबर. मी निरस वाटलो असणार तुला. नंतर, आपण सर्वजण परतीच्या प्रवासासाठी बसकडे जाऊ लागलो तसे मी तिथल्या गवतावर आलेली फुले तुला दिली. मी माझी नजर लपवत राहीलो. तू हसलीस. ते हसू मला आठवते.
मग उन्हाळा सुरु झाला आणि लॉक डाउनही. आपण किती चेष्टा करत राहिलो लोकांची. आपली स्वतःची. आपल्या काळाची. या काळात जन्मलेल्या मुलांची नावे कोरोनावरून ठेवायला हवीत असे काही बोलत राहिलो. आपल्याला मुल होणार नाही हे आपण ठरवले होते. नाहीतर, आपण त्यांची नांवे, मुलगा असेल तर, कोरो आणि मुलगी असेल तर, कोरी ठेवले असते. मराठी शब्द सुटसुटीत आणि त्यांचे इंग्रजी स्पेल्लिंगही तितकेच हलके फुलके. वीस वर्षानंतर त्याचे नाही इथल्या समाजाचा अभ्यास करण्याचा प्रोजेक्टमध्ये अभ्यासले जाईल. त्यांच्या नावांच्या नजरेतून लोक काळ समजून घेतील. आपली गल्ली येण्याजाण्यासाठी बंद केली त्यांनी. आपला एरियाही बंद केला त्यांनी. मोठमोठे बांबू लावून ठेवले आहेत इकडून तिकडे. गल्लीच्या या बाजूपासून त्या बाजूपर्यंत. माणसांना येण्याजाण्यास बंदी केली पण हवेला येण्या-जाण्यास बंदी करू शकत नव्हते ते. आपण संध्याकाळपासून रात्रीपर्यंत बोलत असायचो. मी तूझ्याशी. तू माझ्याशी. मी इतरांशी. तू इतरांशी. समोरासमोर आपण दिसत होतो एकमेकाला. पण सगळेच दिसत नव्हते एकमेकांना. म्हणून, आपण हवेतल्या हवेतही बोलत होतो. तसे जे बोलत होते त्यांना एकमेक काय करतायेत हे दिसत नव्हते.
पण सगळं सोडून तू झोपी गेलीस. मुर्खासारखी.
मग मला कुणी नव्हते बोलण्यासाठी रात्र रात्र. तू उठशील तेव्हा आपण बोलू याबद्दल. मला तर खूप राग येतोय तुझा. तुझ्याबरोबर बोलू तेंव्हा मी भयानक रागावलेला असें तुझ्यावर. प्रचंड आदळआपट करेन. आताही करतोय. पण मनातल्या मनात. पुढे कधी तुला झोपून दिले तर सकाळी माझ्याबरोबर उठण्यासाठी. तोपर्यंत मी आठवत राहीन आपण काय केलय आतापर्यंत एकत्र ते. आठवत राहीन आपण नदीचा किनारा कसा पायाखालून घातला, झाडा-झाडातून आणि जंगलातून. जाताना एक माणूस भेटला होता तो आपल्याकडे कसा पाहत होता तेही मी आठवत राहीन. आठवेल मला, त्याच्या हातातली काठी कसा आवाज करत होती गाण्यातल्या सुरावटींसारखी. त्याच्या हातातल्या पाठीवरून तू हात फिरवलास. त्या काठीवर तुझ्या तळहातावरल्या रेषांच्या खुणा दिसत असतील त्या माणसाला कारण ती काठी ओली होती. तो काही बोलला नाही पण त्याच्या नजरेने मात्र आपल्याला तो आश्वस्त करत होता: “जा, नदीचा काठ तुम्हाला मार्ग दाखवेल.” मला त्या नदीचाही राग येतोय. तेवढ्यापुरताच तिने मार्ग दाखवला.
तू उठशील तेव्हा कोणतीही सूचना न देता झोपलीस याचा मला राग असेल. त्यामुळे, ती नदी, तो मनुष्य असे काहीच आठवणार नाही त्या रागाच्या क्षणी.
आता पुढे, डॉक्टर-अभ्यासक-विचारवंत बोलत राहतील, मांडत राहतील कुठे काय झाले आणि कसे झाले. या सर्वांचा परिणाम म्हणून कुणाचे काय होणार आहे याचेही ठोकताळे मांडत राहतील. कुणाच्या फुफुसांवर कसा परिणाम झाला वा किती जणांच्या डोक्यातल्या वळ्या कशा बदलल्या यांची चर्चा होईल. मी मात्र विचार करत राहीन आपण रात्ररात्र काय करत होतो याचा. कसे भांडत होतो. भांडून कसे दमत होतो. भविष्याबद्दल काय बोलत होतो. हे आठवत राहीन.
चिडचिड करत राहीन. एके ठिकाणी अडकल्याची तडफड आणि चालत राहणे गमावल्याची वेदना व्यक्त करत राहीन. एकमेकाला न दिसण्याचे दुःख काय असते हे शब्दबद्ध करायला वेळ लागतो असेही तू म्हणाली होतीस. मला कळले नव्हते तू असे का म्हणाली होतीस ते. आता काळवंडलेले आकाश रिकामे होईनासे झालेय तसे मला जरा जरा कळतेय तू काय म्हणाली होतीस ते असे वाटते. रित्या अवकाशाकडे पाहत जाणवत राहते आकाशापर्यंत पसरलेली अमर्याद पोकळी. क्षितिजापर्यंत ताणलेल्या माळरानावर पडलेली तुझी झोप अजून किती ओकीबोकी करत राहणार आहे याचा अंदाज येईपर्यंत तुला जाग यावी म्हणून काना-मात्रा जोडून वाक्यं बांधून पाहतोय.
एखादा काळ कसा शब्दात कसा पकडून ठेवावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे लेखन आहे असे मला वाटते.
अशुतोष धन्यवाद!
एखादं लिखाण चित्रासारखं कशाप्रकारे डोळ्यासमोर आणावं हे शिकायला मिळालं.
धन्यवाद सर.
…everyone has stopped looking up at the stars…