‘भिडणे’ ही एक सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेला म्हणा किंवा वास्तवाला म्हणा सामोरं जाण्याची वेळ हरघडी आपल्यावर येत असते. मुळात वास्तवाला भिडताना समोर जे आहे ते जसंच्या तसं स्वीकारणं, त्याला प्रश्न विचारणं किंवा ते चक्क नाकारणं एवढेच पर्याय संभवतात. त्या त्या वेळेस आपापल्या वकुबानुसार, इच्छेनुसार आपण त्यातला एखादा पर्याय निवडतो. आलेली परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारताना कधी हतबलता असते तर कधी आहे त्यातून मार्ग काढायचं शहाणपण. कधी एखाद्या परिस्थितीत अहंकार नाहीतर पूर्वग्रह आड येतात आणि समोरचं वास्तव नाकारण्याचा पर्याय जवळ केला जातो. घडणारी घटना जर आपल्या विचारसरणीच्या किंवा विवेकबुद्धीच्या विरोधात असेल तर त्याला प्रश्न करण्याची हिंमत माणसात येतेही. वास्तवाला ‘का’, ‘कशासाठी’ असे प्रश्न विचारून त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न तो करू लागतो. वास्तवाच्या गाभ्याला हात घातला की ती बदलाची सुरुवात असते. हा बदल अगदी सूक्ष्म, चटकन न जाणवणारा असतो पण हळूहळू त्याचे परिणाम दिसून येत जातात. वास्तव नाकारताना किंवा विनाप्रश्न स्वीकारतानाही त्याचे काहीतरी बरेवाईट परिणाम भोगावे लागतातच. वरीलपैकी कोणताही पर्याय निवडणारी व्यक्ती आणि तिच्या आजूबाजूची माणसं त्या परिणामानं घडत जातात. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ ही कादंबरी जेव्हा मी वाचली आणि नंतर भाषांतर करायला घेतली तेव्हा वास्तवाला भिडताना होणारा संघर्ष मला तिच्यात ठिकठिकाणी जाणवला. वर म्हटल्याप्रमाणे वास्तवाला सामोरं जाताना वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या वाटा चोखाळणारी पात्रं या कादंबरीत दिसतात.
हार्पर ली या अमेरिकन लेखिकेनं १९६० साली ही कादंबरी लिहिली. पुढं या कादंबरीला पुलित्झर पुरस्कार मिळाला. यात वर्णन येतं ते १९३० च्या दशकातलं. ही कथा आणि त्यात येणारी पात्रं लीच्या लहानपणाच्या अनुभवावर आणि निरीक्षणावर बेतलेली आहेत. ती साधारण दहा वर्षांची असताना अलाबामा राज्यातल्या मन्रोव्हील नावाच्या तिच्या गावात घडलेल्या एका घटनेभोवती ही कथा फिरते.
अॅटीकस नावाच्या एका गोऱ्या वकिलाची आणि त्याच्या दोन लहान मुलांची ही कथा आहे. महामंदी आणि वर्णद्वेषाचं प्राबल्य असलेल्या काळात अमेरिकेतल्या अलाबामा राज्यात घडणारी ही घटना. टॉम रॉबिन्सन नावाच्या एका निग्रो मजुरावर एका गोऱ्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप दाखल होतो आणि टॉमचा खटला लढवण्याची कामगिरी अॅटीकसकडे येते. कायद्यापुढे सगळे समान असले तरीही कायद्याची अंमलबजावणी करणारी शेवटी माणसंच असतात. त्यांचे विचार पूर्वग्रहदूषित असतील तर न्याय मिळेलच याची काय खात्री? टॉमच्या बाबतीत तेच होतं. त्याची बाजू पूर्णपणे न्यायाची असूनही आणि ती तशी मांडूनही पंचांनी घेतलेल्या पूर्वग्रहदूषित निर्णयामुळे तो हा खटला हरतो. गोरा माणूस विरुद्ध काळा माणूस असा खटला असेल तर गोराच माणूस जिंकणार हे तर सर्वांनाच माहीत असतं. यापेक्षा वेगळा निकाल त्यांनी आतापर्यंत कधी पाहिलेलाच नसतो. त्यातून बलात्कारासारखा आरोप असल्यामुळे टॉमला कोणाची सहानुभूतीही नसते. हा काळा मजूर एका गोऱ्या मुलीकडे डोळा वर करून बघतोच कसा?
अॅटीकससमोर जेव्हा हा खटला येतो तेव्हा समाजाचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विरोध लक्षात घेऊनही तो हा खटला चालवायचं ठरवतो. मुळात बलात्काराचा आरोप खरा नसून सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे याची त्याला पूर्ण कल्पना आहे. एरवी शहाणीसुरती वाटणारी माणसं काळ्या लोकांशी संबंधित काही असेल तर अचानक वेड्यासारखं का वागायला लागतात हा त्याला पडणारा प्रश्न आहे. त्याला स्वतःला टॉम निरपराध असल्याचं माहीत आहे. म्हणूनच त्याच्या बाजूनं खटला चालवणं अॅटीकसला आवश्यक वाटतंय. “अपील केलं तर संधी मिळेलही,” अशी आशा तो आपल्या भावाला जॅकला बोलून दाखवतो. खटला चालवायचं ठरवल्यावर घरच्यांकडून आणि समाजाकडूनही त्याला अपमानास्पद वागणूक मिळत जाते. या सगळ्यात अॅटीकसचा आणि त्याच्या दोन मुलांचा जेम आणि स्काऊटचा कस लागतो. आपल्या निर्णयाची झळ आपल्या मुलांनाही लागणार याचं त्याला वाईट वाटतं. पण कधीकधी आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यात जास्तीत जास्त चांगलं काम करायचा प्रयत्न करणं एवढंच हातात असतं. ही जाणीव ठेवून अॅटीकस पुढे जायचं धोरण ठेवतो आणि आपल्या मुलांनाही तोच सल्ला देतो.
स्काऊट आणि जेमच्या घरातून शाळेला जायच्या-यायच्या रस्त्यावर रॅडली कुटुंबाचं घर आहे. कळाहीन, सतत बंद असलेलं आणि शेजाऱ्यांशी खेळीमेळीनं न वागणारं असं हे घर. साहजिकच अशा आपापल्या कोषात राहणाऱ्या लोकांबद्दल तयार होतात तशा कथा या घरातल्या माणसांबद्दलही आहेत. घरातल्या धाकट्या मुलाला ऑर्थरला ऊर्फ बूला वाईट संगत लागल्यानं त्यात भरच पडते. एकदा त्याचा गुन्हा उघडकीला येतो आणि मग तो स्वतःच्याच घरात कैद होतो तो कायमचा. नंतर कोणालाही तो दृष्टीस पडत नाही आणि त्याच्याबद्दलच्या गूढ कथांना आणखीनच ऊत येतो. जेम आणि स्काऊटच्या जन्माच्याही आधी कधीतरी घडलेल्या या घटना आहेत. त्यामुळे त्या कथा ऐकतच ते लहानाचे मोठे झालेत. बूबद्दल त्यांना भीतीही आहे आणि बालसुलभ कुतूहलही.
कादंबरीतल्या या काहीशा गूढ वाटणाऱ्या उपकथानकातून भिडण्याची एक बाजू समोर येते. सत्य परिस्थिती नाकारत राहिल्यास हळूहळू ती पिशाच्चासारखी मानगुटीवर कशी येऊन बसते ते या कथेतून दिसून येतं. ऑर्थर रॅडलीचे वडील काय किंवा मोठा भाऊ नॅथन रॅडली काय, दोघांनीही ऑर्थरचा गुन्हा मान्य करायचं नाकारलं आणि ऑर्थरला कायमचं घरात बंद करून ठेवलं. वीसेक वर्षं घरात बंद झालेल्या बू रॅडलीभोवती अनेक कथा तयार होतात आणि त्याला समंधाचं रूप देतात. “या घरात एक पिशाच्च राहतंय. त्यांच्या आवारातले अक्रोड खायचे नाहीत कारण त्या पिशाच्चानं ते विषात बुडवून शाळेच्या बाजूला टाकलेले असतात,” अशा लहान शाळकरी मुलांमध्ये पसरलेल्या कहाण्या हा त्याचाच एक भाग. हा समंध कथानकात सतत डोकावतो. दडपून टाकलेल्या वस्तुस्थितीचं आणि वर्षानुवर्षं कवटाळलेल्या पूर्वग्रहांचं ते प्रतिक आहे. जेम, स्काऊट आणि मुख्य म्हणजे बाहेरून आलेला त्यांचा मित्र डील यांचं कुतूहल बूबद्दल त्यांना वाटणाऱ्या भीतीवर मात करतं. त्याचं अस्तित्व, त्याचं खरं रूप, त्याच्या सवयी, त्याचं वागणं या सगळ्याबद्दलच त्यांना प्रश्न पडू लागतात. या कुतूहलापोटीच त्याला बाहेर काढायला बघ, त्याच्याशी मैत्री करायला बघ अशा निरागस उचापती हे तिघं करतात. हळूहळू बूकडून त्यांना अप्रत्यक्ष प्रतिसाद मिळू लागतो. कथेच्या शेवटी एका निर्णायक प्रसंगात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. जेम आणि स्काऊटनं पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारल्याची ती पावतीच असते. त्याचवेळेस स्काऊटला आणि पर्यायानं वाचकांना तो पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटतो. त्या तथाकथित पिशाच्चाची माणसात येण्याची ही सुरूवात असते. तसंच, दडवून ठेवलेलं वास्तव आणि धरून ठेवलेले पूर्वग्रह बाहेर काढून ते तपासून बघण्याचीही ती नांदी असते.
कथानकातली आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे स्काऊट आणि जेम या आईवेगळ्या मुलांचं आपल्या वडिलांशी अॅटीकसशी असलेलं नातं आणि मोठं होत असतानाच त्या दोघांचं हळूहळू समंजस होत जाणं. सुरूवातीला कोणी अॅटीकसच्या विरुद्ध काही बोललं तरी थेट मारामारी करणारी स्काऊट अॅटीकसच्या समजावण्यानं यथावकाश शांत होत जाते. ‘दुसऱ्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागते’ हा त्याचा सल्ला जसजसा तिच्या ध्यानात येत जातो तसतशी ती अधिक समंजस होते. याउलट क्वचितच भडकणारा जेम एकदाच रागाच्या भरात वेड्यासारखा वागून जातो. पण जसजसा तो मोठा होतो तसतसा तो स्वतःच्या मनाला योग्य वाटतील असेच निर्णय घ्यायला शिकतो. मग ते आजूबाजूच्या लोकांना फारसे मान्य नसले तरीही. दोघांचाही आदर्श अर्थातच अॅटीकस आहे.
स्काऊटची आणखी एक अडचण आहे ती म्हणजे तिनं चांगल्या घरातल्या स्त्रीसारखं (लेडी) वागावं अशी अलेक्झांड्रा आत्यासारख्या बायकांची तिच्याकडून असलेली अपेक्षा. तिनं मुलींना शोभेलसं शालीन वागावं, मारामारी करू नये, जास्त प्रश्न विचारू नयेत, कपडे मुलींसारखे करावेत आणि असं वागून आपल्या वडिलांच्या एकाकी आयुष्यात आनंद निर्माण करावा अशी अलेक्झांड्राची स्वतःचीच एक रोमँटीक कल्पना आहे. त्या अपेक्षा स्काऊटला काहीशा गुदमरून टाकतात. मुलांसारखी पँट घालून आनंद निर्माण करता येत नाही का, असा मूलभूत प्रश्न तिला पडतो. जसजशी कथा पुढे सरकते तसतसं प्रसंगाचं गांभीर्य ओळखून त्याला साजेसं वागणं म्हणजेच चांगल्या स्त्रीसारखं वागणं आहे आणि त्यासाठी इतर बाह्य गोष्टी आपल्या मनाविरुद्ध करायची गरज नाही हे स्काऊटला आपापलं उमजत जातं.
वास्तवाला सामोरे जाताना अॅटीकस, जेम, स्काऊट, अलेक्झांड्रा किंवा मिस्टर रॅडली आपापले पर्याय निवडतात. तो तो पर्याय निवडण्यामागे प्रत्येकाची कारणंही तशीच आहेत.
मुळात बू रॅडलीच्या वडिलांची अडचण आहे ती आपल्या मुलाकडून काही चूक झाली आहे हे मान्य करताना आडवा येणारा अहंकार. त्यापोटी वस्तुस्थिती नाकारण्याचा मार्ग ते स्वीकारतात. दुसरीकडे अलेक्झांड्रा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पूर्वग्रहांना धरून आहे. त्यामुळे स्काऊटनं विचारलेले प्रश्न कितीही नेमके आणि त्या समजुतींच्या मुळांना हात घालणारे असले तरी तिला तो उद्धटपणा वाटतो. त्याच पूर्वग्रहापोटी अॅटीकसनं एका निग्रो माणसाचा खटला घेणं ही तिला घराण्याला काळिमा फासणारी गोष्ट वाटते. स्काऊट आणि जेम दोघंही वयानं लहान आहेत. स्काऊटचा कादंबरीतला प्रवास आहे वय वर्षं सहा ते नऊ असा आणि जेमचा दहा ते तेरा. लहानपणच्या निरागसतेपोटी ते आजूबाजूच्या समाजव्यवस्थेला, न्यायव्यवस्थेला, लैंगिक पूर्वग्रहांना अनेक महत्त्वाचे आणि मूलभूत प्रश्न विचारतात. त्यातून त्यांना वस्तुस्थितीचं आणखी भान येत जातं. टॉम रॉबिन्सनच्या खटल्याचा निकाल स्वीकारणं जेमला कठीण जातं. कायद्यापुढे सगळे समान असतील तर पंच असा अन्याय्य निकाल कसा काय देऊ शकतात, एरवी इतकी चांगली असणारी मेकोम्बमधली माणसं अप्रत्यक्षपणे या निकालाला ज्याप्रकारे हातभार लावतात याचा त्याला त्रास होतोय. अपेक्षाभंगाचा हा कदाचित पहिलाच धक्का पचवणं शक्य न झाल्यामुळे तो ते सगळं विसरायच्या प्रयत्नात आहे. आत्तापर्यंत आपण समजत होतो तशी सगळी माणसं सारखी नसून प्रत्यक्षात त्यांच्यात काही ना काही उतरंडी आहेत ही सत्य परिस्थिती त्याच्या लक्षात येते आहे आणि हळूहळू ती परिस्थिती मान्य करायला तो शिकतो. मिसेस गेट्स सारखी बाई शाळेत हिटलरबद्दल तिरस्कारानं बोलते. तीच बाई न्यायालयात मात्र “या काळ्या लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे. उद्या गोऱ्या मुलींशी लग्न करायला बघतील हे,” असं कसं काय म्हणू शकते हे स्काऊटला समजत नाही. तिचा तो प्रश्न अनुत्तरीतच राहतो आणि वस्तुस्थिती आपल्या कल्पनेपेक्षा बरीच वेगळी आणि कुरूप आहे याचं भान तिला येतं.
सबंध कथानकात अॅटीकसची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्याच्या एका निर्णयानं बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. त्याबद्दल बोलताना तो म्हणतो, “प्रत्येक वकिलाच्या आयुष्यात एखादा तरी असा खटला येतो जो त्याच्या आयुष्यावर परिणाम करून जातो. हा खटला माझ्यासाठी तसा असावा. मला खूप वाटतंय की हा अनुभव घ्यायची वेळच आली नसती तर बरं. पण जॉन टेलरनं माझ्याकडे बोट दाखवून सांगितलं, “तूच घ्यायचास हा खटला”. नाही म्हणालो असतो तर माझ्याच मुलांना मी काय तोंड दाखवणार होतो ? ‘माझं ऐका’ असं त्यांना सांगण्याचासुद्धा मला काही अधिकार उरला नसता.” त्याचं हे विधान फार महत्त्वाचं आहे. त्याला स्वतःला वर्णभेद मान्य नसला तरीही त्यानं खटला चालवायला घेतला तो समाजाला धडा शिकवायला नाही. कोणतेही पूर्वग्रह न ठेवता माणसाकडे केवळ एक माणूस म्हणून बघण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याला मेकोम्बच्या माणसांविषयी वैयक्तिक आकस किंवा राग नाही. स्काऊटला तो सांगतो, “आत्ता आपल्याशी कितीही वाईट वागली तरी शेवटी मेकोम्बची माणसं आपलीच आहेत.” खटला जिंकून देऊन टॉम रॉबिन्सनचं भलं करण्याचा कोणताही आवेश अॅटीकसच्या बोलण्यात किंवा वागण्यात नाही. उलट आपण हरलेली लढाई लढतोय हे तो स्वतःच बोलून दाखवतो. कोणत्याही परिस्थितीला किंवा व्यवस्थेला आव्हान देणं हे जगाचं भलं करण्याच्या भ्रमातून होत असेल तर त्यातून फक्त भ्रमनिरासच वाट्याला येऊ शकतो. पण अॅटीकसचा निर्णय हा निव्वळ सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून घेतलेला आहे. त्यातून कोणाचं काही भलं झालंच तर तो परिणाम झाला, कारण नाही. मात्र मी माझ्या विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहिलो नाही तर पुढल्या पिढीला काही बरंवाईट शिकवायचा अधिकारच गमावून बसेन ही अॅटीकसची साधीसरळ भावना आहे. म्हणूनच तो या कथेचा नायक ठरतो.
१९६० साली प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीनं अगदी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. जवळपास सर्व अमेरिकन शाळांमध्ये ही कादंबरी शालेय अभ्यासक्रमात अभ्यासली जाते. प्रसिद्ध झाल्यापासून आजपर्यंत कितीतरी शाळांमधून तिच्यावर वेगवेगळ्या काळात बंदीही घालण्यात आली आहे. बलात्कारासारखा गंभीर विषय, लैंगिक संदर्भ, असभ्य समजल्या जाणाऱ्या वर्णवाचक शब्दांचा वापर अशा कारणांमुळे ही बंदी घातल्याचं सांगितलं गेलं. पण कादंबरीची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट इतक्या गंभीर विषयांची पार्श्वभूमी असूनही नर्मविनोदी शैलीत लिहिलेल्या या कादंबरीनं आधुनिक अभिजात वाङ्मयात स्थान मिळवलं. या कथानकातून समोर येणारा वर्णभेद, सामाजिक उतरंड आणि पूर्वग्रह आजही कोणत्या ना कोणत्या रूपात अस्तित्वात आहेतच. प्रस्थापित समजुतींना, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी, न्याय्य आणि अन्याय्य म्हणजे काय याची चर्चा करणारी, केवळ शस्त्र हातात घेऊन प्रतिकार करणं म्हणजेच शूर असणं असतं का असा विचार करायला लावणारी, वास्तवाचं भान येत असताना निरागसता कशी हरवत जाते याचं चित्रण घडवणारी ही कादंबरी म्हणूनच आजही तितकीच आपली वाटते.