बंडखोरीचे सौंदर्यशास्त्र. अभिजाततावादाचा अर्थ उत्कट आविष्कारावर नियंत्रण आणणे असा केला तर, ज्या कालखंडात कला उत्कटतेचा आविष्कार करणारे स्वरूप आणि उक्ती धारण करते त्या कालखंडाला अभिजात कालखंड म्हणता येईल. आता जेव्हा वैयक्तिक उत्कटतेला सामूहिक उत्कटता मागे टाकते आहे तेव्हा कलेचे अधिराज्य स्नेहभावावर न रहाता अगदी नेमक्या अर्थाने राजकारणावर राहू लागले आहे. माणसाने स्वतःसाठी उत्कटता कल्पिली; मग ती आशादायी असो वा विनाशकारी.
मग आपले काम अधिकच अवघड बनते. कारण,(१) आपली उत्कटता सुसूत्रपणे ठरवण्याआधीच जगावी लागत असेल तर कलाकाराचा सर्व वेळ सामूहिक उत्कटता जगण्यातच जातो, (२) मरण्याचीच जास्त शक्यता आहे. – सामूहिक उत्कटता यथार्थ जगणे म्हणजेच त्यासाठी मरण पत्करणे असेही म्हणता येईल. इथे, यथार्थतेची सर्वात मोठी शक्यता हीच कलेच्या पराभवाची सर्वात मोठी शक्यता आहे. अशा रितीने, कदाचित, अभिजाततावाद अशक्यच आहे. पण तो असेल तर मानवी बंडखोरीच्या इतिहासाला काही अर्थ आहे. तो अर्थ म्हणजे यथार्थतेच्या मर्यादेपर्यंत येऊन पोहोचणे. असे झाले तर, हेगेलचे म्हणणे बरोबर ठरेल आणि आपण मानवी इतिहासाच्या अंताची कल्पना करू. अर्थात, केवळ अपयश या दृष्टीने. मग, हेगेलचे म्हणणे चुकीचे ठरेल. आपल्या विचारानुसार असा अभिजाततावाद शक्य असेल तर ती एका माणसाची नव्हे तर संपूर्ण पिढीची कामगिरी ठरेल. वेगळ्या शब्दात सांगायचे तर मी ज्या अपयशाच्या शक्यतेबद्दल बोलतो आहे तिचा समतोल साधला जाण्याची शक्यता केवळ संख्यात्मक आहे. म्हणजेच दहा कलाकारांपैकी एक तगेल आणि आपल्या उत्कटतेसाठी आणि निर्मितीसाठी आयुष्यातून वेळ काढणे त्याला जमेल. इथून पुढे कलाकार एकट्याने राहू शकणार नाही. आणि, जर तो तसा राहिलाच तर तो त्याचा विजय ठरेल. विजयाचे श्रेय त्याला सबंध पिढीला द्यावे लागेल.
*
नोव्हेंबर – वय वर्षे बत्तीस
माणसाची सर्वाधिक नैसर्गिक प्रवृत्ती स्वतःचा आणि त्याबरोबर इतरांचा विनाश करण्याकडे असते. चारचौघांसारखे राहण्यासाठी केवढे प्रचंड प्रयत्न! स्वतःवर आणि स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्याची ज्या माणसाची आकांक्षा असते त्याला तर आणखी जास्त प्रयत्न करावा लागतो. माणूस नुसता बघितला तर तो कोणीच नसतो. ती फक्त एक अनंत शक्यता असते. पण त्या शक्यतेला अनंतकाळापर्यंत उत्तरदायी असणारा माणूस मात्र तोच असतो. माणसाची प्रवृत्ती स्वतःला कमी लेखण्याची असते. पण त्याची इच्छाशक्ती, त्याचा आत्मविश्वास, त्याची साहसी वृत्ती जर कायम राहिली तर त्याची प्रतिनिधित्व करण्याची शक्यता वाढू लागते. माणसाची जिथवर पोहोचण्याची क्षमता आहे तिथवर आपण पोहोचलो आहोत असा दावा कुणीच करू शकत नाही. गेल्या पाच वर्षात आपण सर्वांनीच जे काही अनुभवले आहे त्यातून हे शिकायला मिळाले. पशूंपासून हुतात्म्यांपर्यंत, पाशवी वृत्तीपासून ते निरर्थक त्यागापर्यंतचा प्रत्येक पुरावा जीव दडपून टाकणारा आहे. माणसाच्या अंतिम सद्गुणाचा म्हणजे त्याच्यात असलेल्या अंतिम शक्यतेचा वापर स्वतःमध्ये करून घेण्याचे काम आपल्यापैकी प्रत्येकाचे आहे. ज्या दिवशी मानवी मर्यादांविषयी बोलण्याला काही अर्थ प्राप्त होईल तेव्हाच आपल्याला देवाच्या प्रश्नाकडे वळता येईल. त्याआधी नाही. मानवी क्षमता जोवर आपण पुरेपूर अजमावत नाही तोवर नाही. थोर कार्ये करण्यासाठी एकच संभाव्य ध्येय असते आणि ते म्हणजे माणसाला मिळू शकणारे त्याचे फलित. पण सर्वात आधी आपल्याला स्वतःवर प्रभुत्व मिळवता आले पाहिजे.
*
सततच्या प्रयत्नांनीच मी निर्मिती करू शकतो. माझी प्रवृत्ती थांबून राहाण्याची आहे. अगदी आतून माझा अगदी खरा कल हा मौनाकडे आणि दैनंदिन काम करण्याकडे आहे. निव्वळ यांत्रिक क्रियेच्या व्यत्ययातून आणि आकर्षणातून मुक्त होण्यासाठी मला कैक वर्षे चिकाटी बाळगावी लागली आहे. पण मला हेही ठाऊक आहे की केवळ त्या प्रयत्नामुळेच मी आहे आणि एक क्षणभर जरी मी त्यावर विश्वास ठेवणे सोडले तर माझा घात नक्की होईल. या प्रकारेच मी स्वतःला आजारी पडण्यापासून आणि हताश होण्यापासून वाचवतो. सर्व शक्तीनिशी मान ताठ करून श्वास घेतो आणि मात करतो. माझी निराश होण्याची आणि निराशेतून स्वतःला बाहेर काढण्याची प्रक्रिया अशी आहे.
*
एखाद्या समाजवादी किंवा ख्रिश्चन माणसाला (केवळ आदराला पात्र असलेलीच आधुनिक विचाराची रूपे घ्यायची झाली तर) मला निराशावादी म्हणून दूषण देण्याचा काय अधिकार आहे? माणसाची अधम दर्जाची पापी वृत्ती किंवा दैवी संतापाचे भयानक शाप काही मी शोधून काढलेले नाहीत. माणसाला स्वप्रयत्नांवर स्वतःला वाचवणे शक्य नाही असे माझे म्हणणे नाही. एकाकीपणाच्या खोल गर्तेतून फक्त दैवी कृपादृष्टीतच आशेचा किरण सापडू शकतो असेही मी म्हटलेले नाही. आणि सुप्रसिद्ध मार्क्सिस्ट आशावादाबद्द्ल बोलायचे तर मला हसूच येते. आपल्या अनुयायांवर इतका अविश्वास क्वचितच कोणी दाखवला असेल. मार्क्सवादी लोकांचा मन वळवण्यावर किंवा संवाद साधण्यावर विश्वास नसतो. एखाद्या बूर्झ्वाला कामगार बनवता येत नाही. त्यांच्या दुनियेत देवाच्या लहरीपेक्षा आर्थिक परिस्थिती अधिक असहाय करून सोडणारी असते.
आणि आता एम. हॅरिएट आणि अॅनाले च्या वाचकांसाठी!
समाजवादी आणि ख्रिश्चन लोक म्हणतील की आमचा आशावाद जास्त टिकणारा आहे. तो एका उच्च पातळीवर आहे. आमच्या तर्काचे समाधान करणारे निष्कर्ष देव किंवा इतिहास जे काही असेल त्यात आम्हाला मिळतात. मी देखील हाच युक्तीवाद करू शकतो. जर ख्रिश्चन धर्म मानवाविषयी निराशावादी असेल तर तो मानवी नियतीबद्दल आशावादी आहे. मानवी नियती आणि मानवी स्वभावाविषयी निराशावादी असणारा मार्क्सवाद इतिहासाच्या प्रगतीबद्दल आशावादी असतो (केवढा विरोधाभास !) मी स्वतःविषयी असे म्हणेन की मानवी परिस्थितीविषयी मी निराशावादी असलो तरीही माणसाच्या बाबतीत आशावादी आहे.
माणसाबद्दल एवढा ठाम आत्मविश्वास याआधी कोणीही दाखवलेला नाही हे त्यांना दिसत कसे नाही? माझा संवादांवर आणि सच्चेपणावर विश्वास आहे. या गोष्टी अतुलनीय मानसिक क्रांतीचा मार्ग दाखवतात असा माझा विश्वास आहे; इत्यादी, इत्यादी.
*
आधुनिक वेडेपणाचे मूळ. ख्रिश्चन धर्माने माणसाला जगापासून दूर केले. त्याने माणसाला स्वतःपुरते आणि स्वतःच्या इतिहासापुरतेच बघायला शिकवले. समाजवाद हा ख्रिश्चन धर्माचाच तर्कसुसंगत परिणाम आहे. तो साधारण ख्रिश्चन पद्धतीचाच प्रकार आहे.
ओळख. ख्रिश्चन धर्माला दोन हजार वर्षे झाल्यानंतर शरीराने केलेली बंडखोरी. समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा आपल्या नग्न शरीराचे प्रदर्शन करायला आपल्याला दोन हजार वर्षे लागली. म्हणून त्याचा अतिरेक. आणि आता त्या गोष्टी आपल्या चालीरीतींमध्ये पुन्हा सामावल्या आहेत. आता तत्त्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्रात ती गोष्ट पुन्हा बसवणे एवढेच बाकी आहे. आधुनिकतेचा झटका येण्याचा हा देखील एक अर्थ लावता येईल.
*
एका म्हाताऱ्या अभिनेत्याचा मृत्यू
बर्फ आणि चिखलानं भरलेली पॅरीसमधली सकाळ. शहरातला सर्वात जुना आणि उदास पट्टा. ला सांते, सेंट अॅन आणि कोचीन असलेला प्रदेश. या काळ्याशार आणि बर्फाळ रस्त्याकडेला सगळे वेडे, रोगी आणि गुन्हेगार रहातात. कोचीनबद्दल बोलायचं नुसत्या तर गरिबी आणि रोगराईच्या बराकी. दुःखाच्या गलिच्छ दमटपणानं त्यांच्या भिंती ओसंडून वाहत असतात.
तिथेच तो मेला. आयुष्याच्या अखेरीस देखील तो काहीतरी एक्स्ट्रा (रंगभूमीवर काम करणारी माणसं असले गमतीशीर शब्द वापरतात) कामं करत होता. काळ्या रंगाकडून पिवळ्या रंगाकडे झुकत चाललेला, विरत चाललेला सूट बदलून लहानसहान कामं करणाऱ्यांना जे थोडेफार बरे कपडे द्यावेच लागतात ते तो घालत होता. त्याला त्याचं काम सोडावं लागलं. आता त्याला दूध सोडून इतर काही पिता येत नव्हतं. अर्थात त्याच्याकडे दूधही नव्हतंच. ते त्याला कोचीनमध्ये घेऊन गेले. त्यानं आपल्या मित्रांना सांगितलं की माझ्यावर ऑपरेशन करतील आणि मग सगळं संपेल. (‘व्हेन आय वॉज अ लिटील बॉय’ मधल्या त्याच्या पात्राचं एक वाक्य मला आठवतं. कोणतंही वाक्य कसं म्हणायचं हे जेव्हा त्याला सांगितलं जायचं तेव्हा तो म्हणायचा, ‘अच्छा, मला नाही तसं काही वाटत’) त्यांनी त्याचं ऑपरेशन केलंच नाही आणि बरा झालायस असं सांगून त्याला पाठवून दिलं. परत जाऊन त्याने चक्क एक लहानशी भूमिकासुद्धा केली. एका बेढब पात्राची. आत्तापर्यंत तो ती करतच आला होता. पण तो रोडावला होता. ठराविक वजन कमी होणे, विशिष्ट प्रकारे गालाची हाडे वर येणे आणि उठून दिसणा-या हिरड्या हे सगळं काहीतरी संपत आल्याच्या किती हमखास खुणा आहेत हे लक्षात येऊन मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे. एवढच की ज्याचं वजन घटत असतं त्या माणसाला ते ‘जाणवत’ नाही. जरी ‘जाणवलं’ तरी ते अगदी क्षणिक असतं आणि साहजिकच, मला ते कळणार नाही. मला जेवढं दिसतं तेवढंच मला कळतं आणि मला असं दिसलं की, लिएस मरणार होता.
तो वास्तविक मेलाच.
त्यानं पुन्हा काम थांबवलं. तो परत कोचीनमध्ये गेला. त्यांनी तरीही त्याचं ऑपरेशन केलं नाही. पण त्याशिवायच तो मेला. रातोरात, कोणाच्याही लक्षात न येता. आणि सकाळी नेहेमीप्रमाणे त्याची बायको भेटायला आली. तिला डेस्कपाशी कोणीच काही बोललं नाही कारण कोणाला माहीतच नव्हतं. आजूबाजूच्या पलंगावर असणाऱ्या शेजाऱ्यांनी तिला ते सांगितलं. ‘त्याचं असं आहे’, ते म्हणाले, ‘काल रात्री आटपलं सगळं.’
आणि आता आज सकाळी तो इथे आलाय. ला सांते या रस्त्यावरच्या लहानशा शवागारात. त्याच्या विधवा बायकोबरोबर त्याचे दोन तीन जुने मित्र आहेत. शिवाय त्या विधवेची त्याच्यापासून न झालेली एक मुलगीही आहे. मी आलो तेव्हा तिथली व्यवस्था पाहणाऱ्या मुख्य माणसाने (यानं महापौरासारखा तिरंगी पट्टा कशाला घातला आहे?) सांगितलं की तुम्ही अजूनही त्याचं शेवटचं दर्शन घेऊ शकता. मला काही जायचं नव्हतं. त्या दिवशीची हटवादी, रोगट सकाळ जडशीळ होऊन माझ्या अंगावर पसरली होती आणि मला ती झटकताही येत नव्हती. पण तरीही मी गेलो. अंगाभोवती गुंडाळलेलं कापड हनुवटीपर्यंत आल्यामुळे त्याचं नुसतं डोकंच दिसत होतं. तो आणखीनच कृश दिसत होता. हा एवढा बारीक होणं शक्य असेल असं मला वाटलंच नव्हतं. पण त्याला ते जमलं होतं. त्याचं हे मोठं, मूर्ख डोकं मांसाचं वजन पेलायला तयार झालं असावं असं त्याच्या हाडांचा आकार बघून वाटत होतं. अंगावर मांस नसल्याने त्याचे दात बाहेर येऊन भयानक दिसत होते. पण हे सगळं वर्णन कशाला करायचं? प्रेत हे प्रेत असतं. सगळ्यांनाच ते माहितेय. आणि झालं गेलं सगळं त्या मेल्या माणसाबरोबर दफन व्हायला हवं. पण हे किती दयनीय आहे, किती निर्दयी आहे.
येणाऱ्या पाहुण्यांशी जणू त्याची ओळख करून देत असल्यासारखी शवपेटीच्या कडेला हात ठेवून त्याच्या डोक्याशी उभी असलेली माणसं मग कामाला लागली. यंत्रवत हालचाली करणाऱ्या त्या गलथान माणसांचं वर्णन ‘कामाला लागली’ असं करणं म्हणजे विशेषच. आपापल्या जाड्याभरड्या कपड्यात सुस्तावलेल्या त्या माणसांनी गुंडाळलेल्या चादरीचा, झाकणाचा आणि स्क्रू ड्रायव्हरचा अचानक जलदगतीनं ताबा घेतला. क्षणभरातच झाकण उघडले गेले होते, दोन माणसं वाकून हातांची जोरजोरात हालचाल करत स्क्रू पिळत होती. जणू काही ते म्हणत होते, “हां, आता काही तुला इथून बाहेर पडता यायचं नाही !” या जिवंत माणसांना ते सगळं आटपायचंय हे दिसूनच येत होतं. त्याला बाहेर काढलं. आम्ही मागोमाग गेलो. त्याची बायको आणि मुलगी दोघीजणी एकत्रच शववाहिनीत चढल्या. मागोमाग जाणाऱ्या गाडीत आम्ही चढलो. एकही फूल नाही. काळा सोडून दुसरा रंग नाही.
आम्ही थियासच्या स्मशानात निघालो होतो. त्याच्या बायकोला ते फार लांब वाटत होतं पण अधिकाऱ्यांनी तसाच आग्रह धरला होता. आम्ही पोर्ते दे इटालीवरून निघालो. पॅरीसच्या उपनगरांमध्ये आकाश इतकं खाली झुकल्यासारखं मला कधीच वाटलं नव्हतं. बर्फ आणि चिखलाच्या ढिगाऱ्यातून छपराचे तुकडे, काठ्या, काळपट आणि तुरळक झाडी डोकावत होती. गावातून सहा किलोमीटर पार केल्यानंतर आम्ही जगातल्या सर्वात विद्रूप स्मशानाच्या प्रवेशद्वारापाशी आलो. लालबुंद चेहेऱ्याच्या एका रखवालदाराने येऊन आमची मिरवणूक दारापाशीच थांबवली आणि आत शिरण्याचं प्रमाणपत्र मागितलं. ‘या आत,’ एकदाचा हवा तो खजिना हाती लागल्यानंतर तो आम्हाला म्हणाला. चांगली दहा मिनिटं आम्ही चिखल आणि बर्फाच्या ढिगाऱ्यातून वाट काढत गेलो. आणि मग आणखी एका लवाजम्याच्या मागे जाऊन उभे राहिलो. प्रेतं पुरण्याच्या जागेच्या आणि आमच्या मध्ये बर्फाची एक भिंत उभी होती. बर्फात दोन्ही बाजूला दोन क्रॉस खोचलेले होते. वाचल्यावर मला कळलं की त्यातला एक लिएससाठी होता आणि दुसरा अकरा वर्षांच्या एका मुलीसाठी. आमच्या पुढचा तो लवाजमा एका लहान पोरीसाठी आला होता. पण तिच्या घरचे पुन्हा शववाहिनीत बसायला निघाले होते. ते निघाले तसं आम्ही आणखी काही अंतर पुढे सरकलो. आम्ही खाली उतरलो. निळ्या रंगाचे कपडे घातलेली आणि गटारात उतरून काम करणाऱ्या माणसांसारखे बूट घातलेली उंच माणसं हातातली फावडी टाकून बघायला लागली. पुढे येऊन त्यांनी शवपेटिका बाहेर काढायला सुरुवात केली. त्याचवेळेस पोस्टमनसारखे लालनिळे कपडे आणि टोकदार फाटकी टोपी घातलेला एक माणूस पावतीपुस्तकांचा गठ्ठा घेऊन तिथे आला. त्या पुस्तकाच्या दोन पानांमध्ये कार्बन घातलेला होता. खड्डयाचं काम करणाऱ्या त्या माणसाने मग शवपेटीकेवर कोरलेला क्रमांक सांगितला: ३२३७ सी. पोस्टमननं आपल्या पेन्सिलीच्या टोकानं हातातली यादी पालथी घालत त्या नंबरापुढे खूण केली आणि तो ‘बरोबर’ असं म्हणाला. मग त्यांनी ती शवपेटिका आत नेऊ दिली. आम्ही प्रेत पुरण्याच्या जागी गेलो. तेलकट आणि किंचित चिकट मातीत आमचे पाय रुतले. इतर चार थडग्यांच्या मधोमध खड्डा खोदला होता. त्या माणसाने चटकन पेटी त्यात सरकवली. पण आम्ही त्या खड्डयापासून बरेच लांब होतो कारण ती थडगी मध्येच आल्याने आम्हाला पुढे जाता येत नव्हते. शिवाय मधला अरुंद रस्ता हत्यारांनी आणि मातीनं भरून गेला होता. शवपेटिका तळाशी पोहोचली तशी एक क्षणभर शांतता पसरली. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे पाहिलं. तिथे ना धर्मोपदेशक होता, ना फुलं होती ना कोणी शांतीचे किंवा पश्चात्तापाचे शब्द उच्चारत होतं. आणि आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं की हा क्षण आणखी गंभीर असायला हवा. आपण तो व्यवस्थित नोंदवून ठेवायला हवा पण ते कसं ते मात्र कोणालाच ठाऊक नव्हतं. मग तो खड्ड्याचं काम करणारा माणूस म्हणाला, “जर तुम्हाला थोडीथोडी माती लोटायची असेल तर लोटा.” त्या विधवेने मान डोलावली. त्याने फावड्यावर थोडी माती घेतली. मातीच्या एका ढिगाऱ्यावरून त्याची बायको पुढे झुकली आणि तिने विशेष नेम न धरता त्या खड्डयाकडे माती लोटली. आम्हाला त्या पेटीचा पोकळ आवाज ऐकू आला. मुलीचा नेम मात्र चुकला. माती खड्डयावरून पलीकडे पडली. तिनं ‘अरेरे,’ अशा अर्थाची खूण केली.
झाल्या कामाची पावती: ‘आणि अवाच्या सव्वा किमतीला त्याला मातीत पुरण्यात आले.’
त्याचं काय आहे, ही जागा मरणाची शिक्षा झालेल्या माणसांना पुरण्याची आहे.
लाव्हालचं म्हणाल तर ते आणखी थोडं पुढे आहे.
*
कादंबरी. गरिबीत गेलेलं लहानपण. मला माझ्या गरिबीची आणि माझ्या घरच्यांची लाज वाटायची. (तसे ते भयानक आहेतच !) आणि आज जर मी सहजपणे त्याबद्दल बोलू शकत असेन तर त्याचं कारण असं आहे की आता मला त्या लाज वाटण्याची लाज वाटत नाही आणि आपल्याला तशी लाज वाटली याबद्दल स्वतःचा तिटकाराही वाटत नाही. जेव्हा मी माध्यमिक शाळेत जायला लागलो तेव्हाच मला अशी शरम वाटायला लागली. त्याआधी सगळे माझ्यासारखेच होते आणि गरिबी ही हवेइतकीच नैसर्गिक होती. लिसेमध्ये जाऊन मी तुलना करायला शिकलो.
एखादे मूल स्वतःहून कोणीच नसते. त्याचे सगेसोयरे त्याचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि एकदा का तुम्ही मोठे झालात की अशी एखादी विद्रूप भावना नसणे ही काही विशेष जमेची बाजू म्हणता येणार नाही. कारण मग तुम्ही कोण आहात यावरून तुमची किंमत केली जाते. शिवाय आपण स्वतः जसे घडलो त्यावरून आपल्या सोयऱ्यांची किंमत करण्यापर्यंत तुमची मजल जाते. माझे रहाते घर पाहिल्यानंतर वाटलेले आश्चर्य माझ्या श्रीमंत मित्राच्या चेहेऱ्यावरून लपत नाही. ते बघून त्रास न होण्यासाठी माझ्यापाशी एखाद्या शूरवीरासारखे अद्वितीय निर्मळ हृदय असायला पाहिजे हे आज माझ्या लक्षात येते.
होय, दुनियेबद्दल माझ्या मनात अढी होती. तशी ती सरसकट सगळीकडे आढळतेच. आणि जर वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत मला ती अढी आठवून कायम संताप आणि लाज वाटत असेल तर त्याचे कारण असे की मी सामान्य व्हायचे नाकारले होते. अर्थात आजकाल माझ्या असे लक्षात येते की मी सामान्यच आहे आणि त्याला चांगले किंवा वाईट न म्हणता मी वेगळ्याच कशाचा तरी विचार करतो..
मी माझ्या आईवर हताश होऊन प्रेम केले. मी कायमच तिच्यावर हताश होऊन प्रेम केले.
*
बाजू घेणाऱ्या साहित्यकृतींपेक्षा बाजू घेणारी माणसे मला अधिक आवडतात. आयुष्यात धैर्य बाळगणे आणि कामातली हुशारी असणे चांगले असतेच. शिवाय लेखक त्याला हवी तेव्हाच बाजू घेतो. उपजत प्रेरणेने दिलेली प्रतिक्रिया हीच त्याची जमेची बाजू आहे. मग जर का हीच गोष्ट कायद्याने, व्यावसायिक बांधिलकीमुळे किंवा दहशतीने लादलेली असेल तर त्याची जमेची बाजू कशात आहे?
आजकाल असे वाटेल की साधी वसंतऋतूवर कविता करायची म्हणजे भांडवलशाहीला पूरक वागल्यासारखे आहे. मी काही कवी नाही पण अशा एखाद्या सुरेख कवितेचा आनंद घेण्यात मला जराही विचार करावासा वाटणार नाही. तुम्ही माणसाला हरतऱ्हेने सेवा पुरवता किंवा अजिबात पुरवत नाही. आणि माणसाला जर भाकरी आणि न्याय हवा असेल, आणि त्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व काही आपल्याला करायचे असेल तर त्याला निखळ सौंदर्याचीही आवश्यकता आहे. त्याच्या हृदयाची भाकरी तीच आहे. आणखी कशाने काही फरक पडत नाही.
होय, त्यांनी आपापल्या पुस्तकांमधून बाजू मांडणे जरा कमी करून प्रत्यक्ष आयुष्यात अधिक बाजू घेतली तर मला आवडेल.
*
अस्तित्त्ववादाने हेगेलवादाची मूलभूत चूक तशीच ठेवली आहे. ती चूक म्हणजे माणसाचे इतिहासात रुपांतर करणे. पण त्या चुकीचे परिणाम मात्र त्याने आपलेसे केलेले नाहीत. ते परिणाम म्हणजे माणसाला सर्वप्रकारचे स्वातंत्र्य नाकारणे.
*
२९ ऑक्टोबर. कस्टलर – सार्त्र – माल्ऱो– स्पर्बर आणि मी. पिएरो देला फ्रान्चेस्का आणि दुबुफेच्या दरम्यान
क – आपल्याला मूलभूत राजकीय नीतीमत्तेची व्याख्या ठरवली पाहिजे. तेव्हा, काही चुकीच्या शंकांचे (तो त्याला कुतर्क असं म्हणतो) निरसन करण्यापासून सुरूवात करूया. (अ) आपण जे बोलतो त्याने आपल्याला एरवी अशक्य असलेले परिणाम शक्य होऊ शकतात. (ब) आपापली सद्सदविवेकबुद्धी तपासा. अन्यायाची पातळी तपासून पहा. ‘मुलाखत घेणाऱ्या माणसाने जेव्हा मला विचारलं की तुम्हाला रशियाचा तिटकारा आहे का, तेव्हा माझ्या आतमध्ये काहीतरी निपचित पडल्यासारखं झालं. मग मी झगडलो. मी असं म्हटलं की हिटलरच्या राजवटीइतकाच मला स्टॅलिनच्या राजवटीचा तिटकारा आहे. दोन्ही राजवटींचा तिटकारा वाटायचं कारण एकच आहे. पण मग माझ्या आत कशाचा तरी पराभव झाला.’ ‘इतकी वर्षं एकत्र संघर्ष करण्यात घालवली होती. मी त्यांच्यासाठी खोटं बोललो.. आणि आता माझ्या खोलीच्या भिंतीवर डोकं आपटून घेणारा हा दोस्त रक्ताळलेल्या चेहेऱ्याने माझ्याकडे वळून म्हणतो: ‘आता आणखी काहीही आशा उरलेली नाही, आणखी काहीही आशा उरलेली नाही.’ कृतीचे माध्यम तपासून पहा, इत्यादी.’
मा – श्रमिक वर्गापर्यंत पोहोचण्याची तात्पुरती अशक्यता. श्रमिक वर्ग हे सर्वोच्च ऐतिहासिक मूल्य आहे काय?
का – अस्थितादर्शवाद (युटोपिया किंवा काल्पनिक आदर्श परिस्थिती). आजच्या घडीला अस्थितादर्शवादाची युद्धापेक्षा कमी किंमत चुकवावी लागेल. युद्ध हे अस्थितादर्शवादाच्या विरुद्ध आहे. एकीकडे. आणि दुसरीकडे: ‘मूल्यांच्या अभावाला आपण सगळेच जबाबदार आहोत असं तुम्हाला वाटत नाही का? नित्शेवादाचे किंवा शून्यवादाचे किंवा ऐतिहासिक वास्तववादाचे वारसदार म्हणून आम्ही चुकलो. नीतीमूल्ये असतातच. इथून पुढे ती शोधून काढून अनुसरण्यासाठी जे लागेल ते सर्व आम्ही करू असा दावा आपण जाहीरपणे केला तर ती आशेची सुरूवात असेल असं नाही तुम्हाला वाटत?’
सा – आपली नीतीमूल्ये केवळ रशियाच्याच विरुद्ध वापरायची असे मी करू शकत नाही. एका निग्रोचा चौकशीशिवाय सामूहिक वध करण्यापेक्षा लाखो लोकांना हद्दपार करणे अधिक गंभीर आहे हे खरे. पण एका निग्रोचा सामूहिक वध म्हणजे शेकडो वर्षे चालत आलेल्या परिस्थितीचा परिणाम आहे. शेवटी विश्लेषण केल्यावर असेच दिसते की दक्षिण कॉकेसशसमधून जेवढे गोरे तडीपार केले गेले तेवढेच निग्रो कैक वर्षे पीडित होते.
का – ज्याचा धिक्कार करायला पाहिजे तो केला नाही तर लेखक म्हणून इतिहासाच्या नजरेतून आपण गद्दार ठरतो. मौन बाळगण्याचे कारस्थान केले तर पुढील पिढ्यांच्या नजरेतून आपण उतरू.
सा – होय, इत्यादी, इत्यादी.
हा सर्व वेळ प्रत्येकाच्या बोलण्यात नक्की भीती किती आणि सत्य किती हे सांगणे अशक्य असते.
*
जर नीतिमूल्यांवर विश्वास असेल तर नैतिकतेवरही विश्वास असतो. अगदी लैंगिक नैतिकतेपर्यंत आणि तिच्यासकट. सुधारणा ही सर्वंकष असते.
*
पॅनेलियर १७ जून १९४७
सुरेख दिवस. समुद्रकिनाऱ्यावरच्या उंचच उंच झाडांच्या शेंड्यावर, भवताली एक चमचमता आणि सौम्य प्रकाश. प्रत्येक फांदीतून स्रवत असल्यासारखा. त्या निळसर सोनेरी रंगात पानांचे पुंजके हळूच हलतात. दिवसभर तो हवेशीर, सोनेरी, मधुर रस चाखणाऱ्या अनेक ओठांच्या हजारो तोंडांसारखे – किंवा, पुन्हा एकदा, हिरवट तांबूस रंगाची हजारो लहानलहान, मुडपलेली कारंजासारखी तोंडे. अव्याहतपणे आकाशावर निळ्या चमचमत्या पाण्याचा शिडकावा करणारी – किंवा पुन्हा एकदा..पण आता एवढे पुरे.
*
मी या सगळ्या नोंदी वाचल्या – अगदी पहिल्यापासून. माझ्या डोळ्यांना एकदम काय जाणवले असेल तर ते हे की, एकेक करत करत निसर्गदृश्ये नाहीशी होत जातायत. आधुनिक कर्करोग माझाही घास घेतो आहे.
*
मर्लो – पाँटी. वाचायचं कसं ते शिका. त्याची अशी तक्रार आहे की लोकांनी त्याच्या लिखाणाचा चुकीचा अर्थ लावला आहे आणि त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे. अशा प्रकारची तक्रार पूर्वी मला देखील करावीशी वाटली असती. पण ती अनुचित असल्याचे आता मला कळते. अशा काही चुका होत नसतात.
सदाचार हे मूलभूत तत्त्व असलेले स्वैराचारी. खरीखुरी माणसे. अर्थात, व्यावहारिक दृष्टीकोनातून बघितले तर. सध्याच्या काळात प्रत्येकाचा जीव घेणाऱ्या कर्मठ पापभीरू माणसापेक्षा कोणाचाही जीव न घेणारा बदफैली मला अधिक पसंत आहे. शिवाय, या सर्वांवर कडी म्हणजे हर एक जीव घेण्याची इच्छा असलेला बदफैली मला कधीही सहन झालेला नाही.
मर्लो – पाँटी किंवा सर्वसाधारण समकालीन माणूस : जो सतत बरोबरी करत राहतो. त्याचं असं म्हणणं आहे की कोणाचं कधीच बरोबर नसतं आणि ते सगळं इतकं सोपं नसतं. (या वाक्याचा खुलासा करण्याचे कष्ट न घेऊन मर्लो पाँटी माझ्यावर कृपा करेल अशी आशा आहे.) पण आणखी थोडं पुढे जाऊन तो असा दावा करतो की हिटलर हा असा गुन्हेगार आहे ज्याला कोणताही प्रतिकार केला तरी तो न्याय्यच ठरेल. जर कोणीच बरोबर नसेल, तर आपण असे मत बनवायला नको. हे बोलण्याचं कारण असं की आज तुम्हाला हिटलरविरुद्ध बोलणं भाग आहे. आपल्या गुणांचं पारडं बरोबरीला आलेलं आहे. चला.
*
लेझिन. बर्फ आणि ढगांनी डोंगरदऱ्यांना वेढून टाकले आहे. वरून उडणारे कावळे या मृतप्राय शांत आणि फेसाळलेल्या समुद्राला काळ्या सीगल पक्ष्यांसारखे हलकाच स्पर्श करून जात आहेत आणि बर्फाचे तुषार आपल्या पंखांवर घेत आहेत.
Sunder bhashantar!