अक्षय शेलार

आऊट ऑफ द पास्ट



back

ट्रिगर वॉर्निंग – सदर कथेमध्ये अँक्झायटी, नैराश्य, औदासिन्य या सर्व गोष्टींबाबत विस्तृतपणे बोललं गेलं आहे. या संकल्पना काही वाचकांकरिता त्रासदायक असू शकतात.

. मिडनाईट इन पुणे

सहसा मला पार्टीज अटेंड करणं आवडत नाही. त्यावेळी मात्र हे करण्यावाचून पर्याय नव्हता. नवीन कॉन्टॅक्ट्स बनवणं आणि आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ते दिवस होते. मी पुण्यातल्याच एका ॲडव्हर्टायजिंग एजन्सीमध्ये काम करू लागलो होतो. एजन्सीची ॲनिव्हर्सरी पार्टी असल्याने येणं भाग होतं. नसता ‘याला कसला आलाय माज’, असं उगाच सर्वांना वाटत राहिलं असतं. ऑफिसमध्ये पाऊल टाकलं तेव्हाच, आय न्यू दॅट आय वॉज गोइंग टू रिग्रेट इट. सुरुवातीला ऑब्लिगेटरी स्पीचेस वगैरे झाली. त्यानंतर ऑफिसला उगाच पबचा फील देण्यासाठी थोडीशी डिम लाइटिंग केली गेली. तेव्हा लोकप्रिय असलेली उडत्या चालीची हिंदी गाणी लावलेली होती आणि इतर लोक त्यावर थिरकत देखील होते. सोबतीला ड्रिंक्स होते आणि एकंदरीत भयंकर कंटाळवाणा माहौल होता.

काहीतरी प्यायचं म्हणून पिणं आणि उगाच एखाद्या अतिउत्साही व्यक्तीनं डान्स करायला बोलावलं, तर त्या व्यक्तीला नकार देणं इतक्याच कृती करत जवळपास दीड दोन तास झालं मी नुसताच बसून होतो. समोरच्या बाजूला माझ्या अपोजिट ज्या चेअर्स ठेवलेल्या होत्या त्यामधील एकीत श्रुती बसलेली होती. आमची जुजबी ओळख असली तरी, ती अन-नोटिसेबल अशी कधीच नव्हती. तिची इलस्ट्रेशन्स देखील कमाल असायची. मात्र, मी काही स्वतःहून कन्वर्सेशनला सुरुवात करणाऱ्यातील नव्हतो. तेव्हाही आणि आताही. मघाशी जस्ट आमचं एकमेकांकडे लक्ष गेलं नि दोघांनीही खांदे उडवत पार्टीविषयीचं आपलं मत व्यक्त करून हसत पुन्हा निर्विकारपणे बसून राहिलो. ती माझ्याकडे पाहतेय असा भास झाल्याने आता तिच्याकडे लक्ष गेलं, तर तिने माझ्या डाव्या आणि तिच्या उजव्या बाजूला असलेल्या दरवाजाच्या दिशेने मान झुकवत इशारा केला. मला तर तसंही प्रचंड बोअर झालेलं असल्याने मी होकारार्थी मान हलवली.

“तिथे नुसतं बसून राहून अँक्शिअस वाटायला सुरुवात झालेली!” मी आपला काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणालो.

बाहेर पडल्यानंतर तिचं पहिलंच वाक्य होतं, “व्हाय डू दिज पीपल नीड टू एक्स्टर्नलाईज एव्हरीथिंग?”

“मे बी, म्युजिक इज अ गेटवे फॉर देम. इट वर्क्स ॲज अ वे टू एस्केप फ्रॉम द रिॲलिटी. भलेही माझ्या बाबतीत याच्या अगदी उलट असलं, तरी आय कॅन अंडरस्टँड द सेंटीमेंट.” सो, आम्ही आमच्या या अँटी-सोशल बिहेवियरमुळे एकत्र बाहेर पडलो होतो. ऑफिसमध्ये जशी डिम लाइटिंग केलेली होती तशी लाइटिंग बाहेर पिवळ्या स्ट्रीट लाईट्स मुळे आपोआप तयार झालेली होती. रात्री बाराला आम्ही हातात ड्रिंक्स घेऊन लॉ कॉलेज रोडवर फिरत होतो. एफटीआयआय जवळच असल्याने या वेळीदेखील काही एक समवयस्क लोक फिरताना दिसत होते.

“मला तरी अशा ट्रान्समध्ये जाण्याकरिता डान्स करण्याची गरज भासत नाही. व्हाय ट्राय टू एक्स्टर्नलाईज इट व्हेन जस्ट लिसनिंग टू म्युजिक कॅन गिव यू दॅट ट्रान्सेंडेंटल फीलिंग!” तिने पुढे सुरू ठेवलं, “बट यू आर राईट. एव्हरीवन इज डिफरन्ट.”

मग आम्ही तोच थ्रेड पकडून गाण्यांवर बोलू लागलो. नंतर कधीतरी फिल्म्सकडे वळलो. काही वेळाने बऱ्याच दूर आलो आहोत आणि आमच्या गाड्या ऑफिस जवळ आहेत हे लक्षात आल्याने उलट्या दिशेने चालू लागलो. थोडं पुढे आल्यानंतर ती अचानक खाली बसली. काय झालं विचारल्यावर कळलं की, पायाला क्रॅम्प्स आले आहेत.

तिला वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत असताना देखील ती, “ आय ॲम सो एम्बॅरॅस्ड दॅट धिस इज हॅपनिंग राईट नाऊ” म्हणाली.

“ओह, कम ऑन! त्यात काय इतकं!” क्रॅम्प्स आल्यावर ज्या प्रकारच्या तीव्र वेदना होतात त्यांच्याशी माझा परिचय होता. तिच्या पायांकडे पाहत मी, “मे आय?” असं विचारलं. तिने होकारार्थी मान डोलावल्यानंतर दोन तीन मिनिटं तिचे पाय चेपले. नंतर हिल्स काढून बोटं मोडली नि तिला बरं वाटायला लागल्यानंतर पाचेक मिनिटांनी आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. थोडं पुढे आल्यानंतर जे काही घडलं त्यावरून भलेही घडलेली घटना हसण्यासारखी नसली तरी हसायला लागलो.

ऑफिसला पोचल्यावर इतर लोक इतक्यात काही निघणार नाहीत, असं म्हणून आम्ही आमच्या गाड्यांकडे मोर्चा वळवला. मला सांगवीला आणि तिला औंधला जायचं असल्याने दोघांच्या गाड्या घेणं भाग होतं. औंध पर्यंत का होईना, पण दोघे सोबत असू, असं म्हणत आम्ही निघालो. एका वळणावर पोचल्यावर ती म्हणाली आमचा फ्लॅट इथे आहे. मी ‘ठीके, मी निघतो’ म्हणणार इतक्यात तिने विचारलं, “भूक लागलीय?” मी, “हो” म्हटलं. यू नो हाऊ दिज थिंग्ज आर लाईक – डॅम्न्ड इफ यू डू, डॅम्न्ड इफ यू डोन्ट. शिवाय,  सगळं काही इतक्या सुरळीतपणे घडत होतं की, आय डिडन्ट वाना डू समथिंग दॅट आय वुड रिग्रेट लेटर. मग त्या रात्री तिच्या फ्लॅटवर मॅगी नि ऑम्लेट खाल्लं आणि नंतर पहाटे कधीतरी आमच्या गप्पा संपल्यानंतर मी तिथून निघालो. त्या रात्री अनपेक्षितपणे इन्टिमसी निर्माण झालेली असली तरी काही घडलं नाही. तशी अपेक्षा देखील नव्हती. पण, ‘कॅसाब्लान्का’मध्ये म्हटलं आहे तसं, ‘इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ ब्युटीफुल फ्रेंडशिप’.

. गाय लाइंग स्टिल इन पॉलीक्रोमॅटिक रूम

आठवणी तयार होण्यात आपल्या सेन्सेसचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे साहजिकपणे आपण जे पाहतो, ऐकतो, बोलतो, स्पर्श करतो त्या त्या गोष्टींमधून आपल्या आठवणी तयार होतात. आपल्या आयुष्यात आलेली माणसं, घडलेल्या घटना या सर्वांच्या आठवणींचा उगम कुठे ना कुठे आपल्या सेन्सेसमध्ये असतो. आयुष्यात आलेल्या माणसांना आपण चेहरा, शरीरयष्टी, त्यांचा आवाज या सर्व गोष्टींशी असोसिएट करत असतो. हेच जागांच्या बाबतीत घडतं. हे असं व्यक्ती, जागा, गोष्टींना वेगवेगळे अट्रिब्युट्स असोसिएट करण्यातूनच अनुभव आणि आठवणी निर्माण होतात, असं मला कायम वाटत आलेलं आहे. मी हे घर सोडायचा निर्णय घेतला तो यामुळेच. कारण, खोलवर कुठेतरी माझी रिॲलिटी ही या घराशी एकरूप झालेली असल्याने माझ्या आठवणींमध्ये त्याचं अस्तित्त्व इतस्ततः विखुरलेलं होतं.

श्रुती आणि मी वेगळं व्हायचा निर्णय घेतल्यानंतर ती मुंबईला शिफ्ट होणार होतीच. पण, मी इथे राहायचं की नाही, हा निर्णय सर्वस्वी माझा असणार होता. कारण, लीज तशीही ऑक्टोबर २०२० पर्यंतची होती. पण, या घरातील आठवणी हा खरा कळीचा मुद्दा होता. या आठवणी वाईट होत्या असं मुळीच नाही. खरंतर रेट्रोस्पेक्ट करायचे झाल्यास त्या निर्विवादपणे चांगल्याच आहेत. मात्र, या आठवणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा. माझ्याबाबतीत नेमका हा दृष्टिकोनच काहीसा भ्रष्ट झाला असं म्हणता येईल. कारण, हे घर म्हणजे माझ्यासाठी आमच्या नात्याचा मूक साक्षीदार आहे. आमच्या आयुष्यातील बऱ्याचशा घटना, म्हणजे वैयक्तिक अधिक आमच्या दोघांचे शेअर्ड अनुभव, हे एकतर या घरात घडलेले तरी आहेत किंवा मग घराशी निगडीत तरी आहेत. आता आमचं नातंच अस्तित्त्वात नाही म्हणजे या आठवणी मला छळत राहणार. तुटलेल्या नात्याची जाणीव करून देत राहणार. हा विचार करूनच मी फेब्रुवारी महिन्यात घराच्या ओनरला आम्हाला घर सोडायचं असल्याचं कळवलं. श्रुती मार्चच्या सुरुवातीला मुंबईला जाणार होती. त्यामुळे उरलेल्या सगळ्या पॅकिंग वगैरेच्या दृष्टीने मार्चमध्ये इथेच राहीन नि एप्रिलमध्ये मीही घर सोडेन असं ठरवलं होतं.

ती सहा मार्चला निघून गेली. त्यावेळी माझीही अर्धीअधिक पॅकिंग झालेली असली तरी उरलेल्या गोष्टी पॅक करणं सोडून मी माझ्या स्वभावाला अनुसरून प्रोक्रॅस्टिनेट करण्यात बिझी होतो. नाही म्हणायला यामागे दोन व्हॅलिड कारणं होती. पहिलं म्हणजे, जवळच सांगवीमध्ये शिफ्ट व्हायचं होतं. त्यामुळे फार दूर जायचं नव्हतं. दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या फ्लॅटची लीज एप्रिलच्या सुरुवातीला मिळणार होती. (आता मी या जागेला घर म्हणतो आणि जिथे राहायचं ठरलं होतं त्या जागेला फ्लॅट म्हणतोय, यातही सारं आलं.) त्यामुळे तोवर का होईना, पण इथे राहणं भाग होतं. दरम्यानच्या काळात मी राहण्यापुरत्या गोष्टी सोडल्यास इतरही गोष्टी बॉक्सेसमध्ये पॅक करत होतो. पण, मी घर सोडायच्या एकच आठवडा आधी लॉकडाऊनची घोषणा झाली. पॅन्डेमिक असलं तरी त्यावेळी भारतात त्याची इन्टेन्सिटी तितकी नसल्याने लवकरच ही फेज संपेलसं वाटलं होतं. त्यामुळे इच्छा नसताना या घरात राहायचं असूनही मला पॅनिक अटॅक्स किंवा अँक्झायटी अटॅक्स आले नव्हते. मुख्य म्हणजे अख्खं घर राखाडी बॉक्सेसनं भरलेलं असताना मला पॅनिक अटॅक न येणं, हे चांगल्या अर्थाने चमत्कारिक होतं. कारण, त्या बॉक्सेसच्या निमित्ताने तो एकच एक रंग अनेक दिवस घरभर पसरलेला होता. अर्थात, पुढे जाऊन ही कमी भरून निघाली. कारण, आता जून महिना सुरू असूनही मी इथेच अडकून पडलेलो आहे. नि मधल्या काळात जवळपास चार-पाच वेळा मेजर पॅनिक आणि अँक्झायटी अटॅक्स येऊन गेले आहेत. याचं कारण काही घरात अडकून पडलेलं असण्यात नव्हतं. कारण, मी आणि श्रुती दोघे यापूर्वीही अनेकदा वर्क फ्रॉम होम करत असायचो. हे एपिसोड्स मात्र मेजरली आमचं रिलेशनशिप आणि घराचं, घरातील वस्तूंचं या रिलेशनशिपशी असलेलं घट्ट कनेक्शन याच्याशी निगडीत होते.

उदाहरणार्थ, ही बेडरूममधील बेडच्या अपोजिट असलेली भिंत. या भिंतीकडे पाहिल्याने नि तिच्यावरील रंगामुळे ट्रिगर झाल्याने लॉकडाऊनमधला पहिला पॅनिक अटॅक आला होता. बारा की तेरा एप्रिलला सकाळी दहाएक वाजता उठलो, कॉफी बनवली नि पॅक न केलेल्या पुस्तकांमधून काहीतरी शॉर्ट फॉर्ममधील वाचायचं म्हणून असीम कौलचं ‘एट्यूड’ काढून वाचत बसलो. कॉफीचा तिसरा की चौथा सिप घेत असताना समोरच्या भिंतीकडे लक्ष गेलं. अँड दॅट वॉज इट! पुस्तक बाजूला पडलं, कॉफीदेखील बाजूला राहिली नि ही भिंत रंगवली ते दिवस आठवले. आम्ही इथे शिफ्ट होऊन तीन महिने झाले होते. त्यावेळी मी एक दोन पब्लिकेशन हाऊसेसशी असोसिएटेड होतो. फ्रीलान्स रायटिंग, ट्रान्सलेशनचं काम सुरू होतं. श्रुती देखील फ्रीलान्स इलस्ट्रेटर म्हणून काम करत होती. त्यामुळे आम्ही घरीच स्टडीमध्ये किंवा बेडरूममध्ये काम करत, गाणी ऐकत पडून असायचो. अशात एके दिवशी ‘क्रीम’ या बँडचं ‘व्हाईट रूम’ नावाचं गाणं ऐकत असताना आम्हाला साक्षात्कार झाला की, आमचं राहतं घर अगदीच व्हाईट नसलं तरी बँडच्या नावाप्रमाणे इथल्या भिंती क्रीम कलरच्या होत्या. म्हणजे याआधी आमच्या हे लक्षातच आलं नव्हतं असं नाही. कारण, नाही म्हटलं तरी घर आम्हीच निवडलं होतं. त्यात तीन महिने राहिलो देखील होतो. पण, त्या दिवसानंतर मात्र आम्हा दोघांनाही हा रंग एकच एक बोअर वाटायला सुरुवात झाली. त्यावेळी दोघांचंही काम घरूनच सुरु होतं आणि आम्ही दिवसरात्र घरातच असल्याने हे असं वाटणं अधिकच वाढलं. मग आम्ही प्रत्येक रूममधील प्रत्येकी एक भिंत वेगळ्या रंगाने रंगवायची ठरवलं नि ओनरकडे हे करायची परवानगी मागितली. सरप्रायजिंगली, ओनरची याला काही हरकत नव्हती. त्यामुळे इथे आल्याच्या तीन चार महिन्यातच आम्ही हा उपक्रम हाती घेतला नि दर शनिवार-रविवारी एक असं करत महिनाभर तीनही भिंती रंगवत बसलो. बेडरूममध्ये ऑरेंज कलर, दुसऱ्या बेडरूममध्ये, जिला दोघांची स्टडी म्हणून ट्रीट करायचो तिथे जरा वेगळं आणि सोबत मेडिटेटिंग काहीतरी पर्याय असावा म्हणून पर्पल आणि हॉलमधील भिंतीला पुन्हा ऑरेंज कलर. तेव्हा आम्ही दोघे तसेही काहीशा उत्साही मूडमध्ये असायचो. त्यामुळे हे असं काहीतरी घडत राहायचं.

ज्या दिवशी ही बेडरूममधील भिंत रंगवली; त्या रविवारी दिवसभर असंच भिंतीचं काम कमी आणि इतर टाइमपास अधिक असं करत, कॉफीचे बरेचसे कप रिचवत, गाणी ऐकत होतो. मला आठवतंय, त्या रात्री बियर पीत असताना आम्हा दोघांनाही आवडतात म्हणून नोलनच्या ‘बॅटमॅन बिगीन्स’ आणि ‘द डार्क नाईट’ अशा  दोन्ही फिल्म्स सलग पाहत पहाटे कधीतरी झोपलो होतो.

आता मात्र मी एकटाच इथे उरलोय, या भावनेने उचल खाल्ली होती. फिजिकली तीव्र वेदना होत होत्या. मी ब्लँकेट ओढून पडून राहिलो. नंतर कधीतरी यावर तेवढ्यापुरता का होईना, पण ताबा मिळवल्यानंतर उठलो. खोलीतील अंधार पाहून लक्षात आलं होतं की, ऑलरेडी संध्याकाळ झाली होती. मधल्या काळाची काहीच मेमरी नव्हती. सकाळची उरलेली कॉफी कधीच थंड झाली होती. ती थंडगार कॉफी बेसिनमध्ये ओतत असतानाही जणू सगळ्या एक्झिस्टन्सचा अर्क तिच्यात सामावलेला आहे नि मी तोच घालवून टाकतोय, असं उगाच वाटत राहिलं. ते भयाण उदासीनतेमध्ये अधिकच भर घालणारं ठरलं. अर्थात, हे लॉकडाऊनमधल्या पहिल्या पॅनिक अटॅकबाबत. जो नेमका श्रुती गेल्यानंतरचा असा पहिलाच प्रसंग ठरला. म्हणजे हे किती इन्सिडेन्टल आणि आयरनिकल झालं की, आम्ही एकत्र असताना केलेली गोष्टच आमचं नातं संपल्यानंतरचा पहिला ट्रिगर पॉइंट ठरावी!

आफ्टर ऑल, या घरातील मोनोक्रोमॅटिक कलर्सचा आम्हाला आलेला कंटाळा आणि मे बी सुप्तपणे अस्तित्त्वात असलेली आमच्या मनातील भीती सहा वर्षांनंतर का होईना, पण वास्तवात उतरली होती. आता घर टेक्निकली मोनोक्रोमॅटिक नसलं तरी आमची आयुष्यं तशी झाली होती. आणि माझ्या बाबतीत तर हे अधिकच खरं होतं. अर्धीअधिक फिल्म पोस्टर्स आणि पेंटिंग्ज श्रुती आधीच घेऊन गेली होती. त्या त्या फ्रेम्स टांगलेल्या जागा तितक्या रिकाम्या होत्या. तिने माझ्यासाठी बनवलेली आणि माझ्यावर बेतलेली काही इलस्ट्रेशन्स मागे ठेवली होती. हे सारं एकाच वेळी फॉर्च्युनेट आणि अनफॉर्च्युनेट होतं. कारण, असे निरनिराळे ट्रिगर्स घरभर पसरलेले होते. एखादं पुस्तक उघडावं, तर त्यात अनेकदा श्रुतीने चिटकवलेल्या स्टिकी नोट्स दिसायच्या. गाणं ऐकावं, तर ते आमच्या आवडत्या बँडचं असायचं. ‘म्युजिक इज थेरप्युटिक’, असं आपण म्हणतो, जे खरं आहेच. मागेही कुठेतरी वाचलं होतं की, एका अल्झायमर्स डिजीज असलेल्या डान्सरला नुसतं म्युजिक ऐकवल्याने तिला तिचा भूतकाळ आठवून ती कधीकाळी तारुण्यात परफॉर्म केलेल्या संगीतावर बसल्या जागी नृत्य करू लागली. अशी इतरही उदाहरणं असतील, आहेत. पण, माझ्या मते म्युजिक इज अ डबल-एज्ड स्वॉर्ड; कारण इट कुड इवन लीड अस टू अनवॉन्टेड, अनप्लेजन्ट पास्ट अँड मेमरीज. त्यात कम्पार्टमेन्टलाईज करता आलं नाही की मेलोच. त्यात आता बाहेर पडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे वेळोवेळी अँक्झायटीज ट्रिगर होणं स्वाभाविक होतं. एप्रिलमध्ये याची सुरुवात झाली होती आणि नंतर याच्या फ्रिक्वेन्सी आणि इन्टेन्सिटी दोन्ही वाढत गेल्या.

. ॲडल्ट्स इन रूम: अर्थात प्रेमाचा शेवट

२०१४ मध्ये मी या घरात शिफ्ट झालो तो श्रुतीसोबतच. त्यापूर्वी मी पिंपरीमध्ये राहायचो, तर श्रुती आताच्या घराजवळच औंधमध्ये. साधारण दीड वर्षभर आमचं रिलेशनशिप चांगलं सुरु असल्याने आम्ही एकत्र राहायचा निर्णय घेतला. नि आमची घर शोधण्याची मोहीम या घरापाशी येऊन थांबली. चांगली स्पेशियस जागा. शिवाय, थियरीटिकली पुण्यातच असलो तरी एक्स्पीरिअन्सच्या अनुषंगाने पुण्याच्या मध्यवर्ती भागात असते तशा वर्दळीपासून जरा दूर. जे आम्हा दोघांच्या स्वभावाच्या आणि कामाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आम्हा दोघांचंही वय पंचवीस होतं. वुई वेअर यंग अँड इन लव्ह, अर्थात दॅट गोज विदाऊट सेईंग. दोघेही लग्नाच्या विचारात नव्हतो, मुलांच्या तर नाहीच नाही. इथे राहायला येण्यापूर्वीच सिंगल पॅरेंट असलेल्या श्रुतीच्या आईला आमच्या नात्याची कल्पना दिली होती. आणि आम्ही नात्याबाबत पुरेसे गंभीर असलो तरी लग्नाचा विचार नसल्याचं कळवलं होतं. त्यांची याला ना नव्हती. अर्थात, असती तरीही आम्हाला फार फरक पडला असता असं नाही! या घरात आल्यानंतर काही दिवसांत माझ्या घरीही आमचे प्लॅन्स किंवा खरंतर त्यांच्या अभावाबाबत सांगितलं, तर  त्यांनीही ते ऐकून घेतलं.

इथे शिफ्ट झाल्यानंतरचे सात-आठ महिने आम्ही दोघांनी प्री-पॅन्डेमिक काळातदेखील वर्क फ्रॉम होम करत घालवले होते. मग आम्ही दोघेही फ्रीलान्स सोबत दुसरं काहीतरी करावं, असा विचार करू लागलो. या विचारामागे फिनान्शियल अस्पेक्टसोबत एकत्र राहायला लागल्यानंतर कुठेतरी सुप्तपणे निर्माण झालेली रिस्पॉन्सिबिलिटीची भावना देखील असावी. तसेही आम्ही लग्न, मुलं या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेलो नसल्याने एकमेकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्या रीतीने कशा पार पाडता येतील, याचा विचार यामागे होता. त्यानंतर मी फ्रीलान्स रायटिंगसोबतच एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉब करायला सुरुवात केली आणि श्रुतीदेखील एका इंग्रजी पब्लिशिंग हाऊसमध्ये जॉईन झाली. त्यानंतर अगदी आतापर्यंत आम्ही दोघांनीही बरेचदा जॉब्ज स्विच केले. कधी कॉन्ट्रॅक्ट्स संपल्यानंतर, तर कधी फ्रीलान्सिंगमध्ये एखादं मोठं, जरा अधिक कमिटेडली आणि डेडिकेटेडली काम करावं लागेल असं गिग मिळालं म्हणून. किंवा कधी सिम्पली कंटाळा आल्याने. आता या घरातल्या आमच्या वास्तव्यात आम्ही दर वर्षा-दीड वर्षाने जॉब्ज बदलले असले तरी घर बदलण्याचा विचार कधीच आमच्या मनात आला नाही. त्यामुळे आम्ही दोघांनीही इतर बाबतीत बदल स्वीकारण्याबाबत कधीच कुरबुर केली नसली, तरी का कोण जाणे; पण या घराबाबत असं नव्हतं. शिवाय, आमच्या नात्याच्या बाबतीत तर नव्हतंच नव्हतं. म्हणजे, जे काही निर्णय असतील ते एकत्रितपणे घ्यायचे, दोघांपैकी एखाद्याने जॉब सोडून फ्रीलान्सिंगकडे मोर्चा वळवला तर त्याला साथ देणं, हे कायम घडत राहायचं. किंवा ॲट अ टाईम दोघेही फ्रीलान्सिंग करत होतो, असंही घडलं होतं. त्यामुळे समहाऊ वुई ऑल्वेज अज्युम्ड रादर वुई न्यू दॅट द अदर वन विल ऑल्वेज बी देअर टू फॉल बॅक ऑन. आणि या सहा-सात वर्षांत हे कायम घडलंदेखील. आम्ही कायम एकमेकांना साथ देत असायचो; बट समव्हेअर अलाँग द वे, वुई ग्र्यू अपार्ट.

लोक असं म्हणतात की, ‘माणसं बदलतात’. त्यांच्या पार्टनरच्या स्वभावात बदल झाला, वगैरे. मात्र, माझ्या मते लोक बदलतात, असं सहसा घडत नाही. कारण, एका विशिष्ट वयाजवळ पोचल्यावर त्यांचा स्वभाव, आचार-विचार, आवडी-निवडी या सर्व गोष्टी अधिकाधिक ठरावीक आणि विशिष्ट होत जातात. हे वय प्रत्येकासाठी वेगळं असेलही. पण, त्यानंतर ती एकाएकी बदलतात असं घडत नाही. ती फार तर इवॉल्व होतात. त्यांच्या मनात काही डिलेमा असेल, आयुष्यात काही समस्या असेल, तर त्यालाही ते मूळ स्वभावाला अनुसरूनच रिस्पॉन्ड करतात. एखादी व्यक्ती मुळातच अतिविचार करणारी, स्वतःच्या चुका सुधारणाऱ्या स्वभावाची असेल, तर ती जो काही निर्णय घेईल त्याला ‘ती व्यक्ती बदलली’, असं म्हणणं चुकीचं असतं असं माझं मत. त्यामुळे श्रुती बदलली, असं म्हणत आणि ‘पीपल चेंज’ असं धृपद जोडत मी क्लिष्ट गोष्टीचं अतिसुलभीकरण करणार नाही. कारण, जेव्हा मी — वुई ऑल्वेज अज्युम्ड दॅट द अदर वन विल ऑल्वेज बी देअर टू फॉल बॅक ऑन — असं म्हणतो, तेव्हा मी नकळतपणे समोरच्या व्यक्तीला गृहीत धरत असतो. मात्र, हे असं गृहीत धरणं कितपत बरोबर? अर्थात, याला असं म्हणून डिफेन्ड करता येऊ शकतं की, जवळच्या माणसांना गृहीत धरणार नाही तर मग कुणाला? तरीही मला स्वतःला हे तितकंसं कन्विन्सिंग अर्ग्युमेंट वाटत नाही.

माझ्या या अशा विरोधाभासी बोलण्यामुळे श्रुती अनेकदा म्हणायची, “तू इतका डिप्लोमॅटिक आहेस की, कित्येकदा तुझी मते बायपोलर असतात.” हेही बरोबरच म्हणा. मी एकटाच दोन्ही बाजूंचा विचार करतो म्हटल्यावर माझी मतं बायपोलर वाटणं/असणं काहीसं साहजिकच. आताही आम्ही स्प्लिट-अप झाल्यावर देखील मी तिला डिफेन्ड करता येईल किंवा खरंतर ज्या काही चुका असतील, जे काही उत्तम निर्णय असतील असं सगळं दोघांच्या बाजूने समप्रमाणात अस्तित्त्वात होतं, असा विचार करतो आहे. हे असं करणं सुद्धा एका अर्थी माझ्या अतिडिप्लोमॅटिक असण्याचं लक्षण मानता येईल. पण, काहीही असलं तरी ‘वुई ग्र्यू अपार्ट’, हे तितकंच खरं आहे.

आता बाहेर पाऊस पडतोय. पाऊस म्हटलं की, मला २०१७ मध्ये घडलेला प्रसंग आठवतो. घडलं असं की, त्या वर्षी ऑगस्टमधल्या दुसऱ्या आठवड्यात दोन-तीन दिवस संततधार पाऊस पडत होता. दोन-तीन दिवस जवळपास अविरतपणे सुरु असणारा पाऊस आणि दाटून आलेल्या ढगांमुळे इतकं गडद वातावरण व्हायचं की, दुपारी सुद्धा लाईट लावावे लागायचे. त्यावेळी मी घराच्या बाहेर पडावं लागेल, असा जॉब करत नसल्याने घरीच होतो. पण, श्रुती मात्र पुण्यातल्या एका इंग्रजी एजन्सीमध्ये रेग्युलर जॉब  करत असल्याने तिला ऑफिसमध्ये जावं लागायचं. त्या स्पेसिफिक आठवड्यात पाऊस पडत असूनही ती सुरुवातीचे दोन-तीन दिवस ऑफिसला गेली. तिसऱ्या दिवशी मात्र इतक्या आळसावलेल्या वातावरणात गेले दोन-तीन दिवस मला बेडवर लोळताना पाहून तिनेही लीव्ह टाकली. तो संपूर्ण आठवडा आम्ही दिवसभर एकमेकांच्या मिठीत बेडवर लोळत, कॉफीचे कप किंवा रेड वाईनचे ग्लासेस रिचवत, सिनेमे आणि सिरीज पाहत घालवला. त्यानंतरच्या आठवड्यात ती या साऱ्या पार्श्वभूमीवर सोमवारी ऑफिसला जायला निघाल्यानंतर मी आपला तिला बाहेर जावं लागत असल्याने चिडवत होतो.

पण, हे असं घडून आता तीन वर्षं झाली होती. त्यानंतर याच्या जवळ जाईल असं काही घडलं नाही, असंही नाही. नंतरही असे प्रसंग घडले. मात्र, या साऱ्यातील फन एलिमेंट कमी झाला होता. आमच्या आयुष्यात एक विलक्षण एकसुरीपणा आणि फॉर्मॅलिटीचा समावेश झाला होता. गेल्या दोनेक वर्षांत आमची जॉब्ज चेंज करण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली होती. आमचा स्वैराचार देखील कमी झाला होता. ती स्वतःचा एक प्रोजेक्ट आणि त्यासोबत फ्रीलान्स असं दोन्ही करत होती. तर, मी पुण्यातल्याच एका ॲड एजन्सीसोबत काम करू लागलो होतो. हे निर्णय एकमेकांशी बोलून आणि एका एक्स्टेंटपर्यंत समोरच्याला काहीएक प्रमाणात गृहीत धरून घेतले होते. त्यामुळे त्यावरून काही प्रॉब्लेम होता, असंही नाही.

गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये नेमका श्रुतीचा मायनर ॲक्सिडेंट झाला. डाव्या हाताला मायनर फ्रॅक्चर असल्याने प्लास्टर केलं होतं आणि ते महिनाभर ठेवायचं होतं. हे घडलं त्यावेळी माझी एजन्सी एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत काम करत होती. शिवाय, रेग्युलर जॉब होता. हे तिला देखील माहीत असल्याने ॲक्सिडेंट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिनेच मला जॉबवर जाण्यास सांगितलं. तरी मी त्याच दिवशी माझ्या सुपीरियरला सांगून घरून काम करायला लागलो. मात्र, त्या दिवसांमध्ये एकत्र असूनही आम्ही पूर्वी नव्हतो इतके डिस्टन्ट झालो होतो. त्याआधी जर असं काही घडलं असतं, तर आम्ही तो सगळा महिना नुसतं एकत्र बिंज वॉच करत, गाणी ऐकत घालवला असता. त्यावेळी मात्र असं घडलं नाही. तिला प्लास्टर केल्याच्या पहिल्या आठवड्यात तर मी तिला सवयीप्रमाणे, ‘कॉफी घ्यायची का?’, हे विचारण्यापुरता बेडरूममध्ये जायचो. तिला कॉफी हवी असल्यास द्यायचो नि पुन्हा माझ्या कामाकडे जायचो.

खरंतर तिच्या ॲक्सिडेंटची घटना म्हणजे केवळ एक कॅटॅलीस्ट होती. कारण, फॉर्मॅलिटी, कंटाळा, एकसुरीपणा या आम्हाला प्रचंड चीड असलेल्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडत होत्या. आणि हे असं घडण्यात आमच्या जॉब्जचा मोठा वाटा होता. आमचं रिलेशन तसंही कधी ग्रँड जेश्चर्स वर अवलंबून नव्हतं. इट वॉज ऑल्वेज अबाऊट द स्मॉल थिंग्ज, लिटिल जेश्चर्स. गेल्या वर्षभरात मात्र वाढलेल्या एक्स्पेन्सेसमुळे किमान एकाला तरी रेग्युलर जॉब करणं भाग होतं आणि हे करत असताना एकमेकांसाठी वेळ काढणं अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे ज्या लहानसहान गोष्टींवर सगळा भार असायचा त्या घडत नव्हत्या. ‘थिंग्ज वेअर नॉट द वे, दे युज्ड टू बी’, हे अधोरेखित करण्यात या घटनेची मदत झाली.

तिला प्लास्टर केल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातसुद्धा मी घरून काम करत होतो. फक्त फरक इतका होता की, रात्री आमच्या रिलेशनशिपबाबत आम्हा दोघांच्या चर्चा घडून येत होत्या. इतकी वर्षं एकत्र राहिल्यानंतर आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की, वुई वुड गेट थ्रू धिस. मात्र, हे देखील घडलं नाही. ॲज आय हॅव सेड, ‘माणसं बदलत नाहीत’. मात्र, त्यानंतर आमच्या लक्षात आलं की, आमच्या प्रायॉरिटीज जरूर बदलल्या होत्या. उदाहरणार्थ, हिवाळ्यात आम्हा दोघांनाही मसल स्पॅजम्सचा फार त्रास व्हायचा. मसल रिलॅक्स्टंट्स घ्यावे लागायचे. एकमेकांना मसाज द्याव्या लागायच्या. त्या काळात मात्र असं काही घडलं नाही. म्हणजे, मला क्रॅम्प्स आले नाहीत असं नाही. पण, मी तिला त्याबाबत सांगत नसे. पुढे बोलताना याचा विषय निघाल्यावर कळालं, तिच्याबाबतीत सुद्धा हे घडलं होतं. आम्ही या पॉइंट पर्यंत कसे पोचलो, हा प्रश्न मोठा होता. त्याचं उत्तर आम्हाला हवं होतं का? तर कदाचित हो. पण, पुन्हा मोटिव्ह्ज डू नॉट मॅटर; ॲक्शन्स डू.

माझ्या थेरपिस्टचं मत असं की, श्रुतीने गेल्या काही महिन्यांत इलस्ट्रेशन्स, लोगो डिझाईन, स्टेशनरी इत्यादीसाठी तिचा स्वतःचा ब्रँड निर्माण केला होता. तिचा हा प्रोजेक्ट चांगला चालू असताना मला मात्र रेग्युलर जॉब करावा लागतोय आणि त्यातून आमच्यात दुरावा निर्माण होतो आहे. मला मात्र हा मत-वजा-आरोप अजिबात मान्य नव्हता. तिचं जे काही सुरु होतं, ते उत्तम होतं आणि आय वॉज हॅपी दॅट शी वॉज डूइंग इट. पण, याचा अर्थ असा नाही की, समव्हेअर आय वॉज जेलस ऑफ हर. दॅट वॉज सच अ बुलशिट अनॅलिसिस!

अनेकदा लोकांना सगळ्या गोष्टींचा होलिस्टिक व्ह्यू न मिळाल्याने सगळं चुकतंय असं वाटत राहतं. पण, माझं निरीक्षण असं की, हा असा दृष्टिकोन सगळ्या क्लिष्टतेमध्ये अधिक भर घालतो. कारण, आपल्याला दोन किंवा त्याहून अधिक इंटरप्रिटेशन्स दिसत असतात. आणि एकदा ही अशी बायनरी ब्रेक झाली की, मग त्यातून पुन्हा काही ठरावीक शक्यतांपैकी एक निर्णय घेण्याची वेळ येते. आमच्याबाबत हा निर्णय रिलेशनशिपच्या विरुद्ध असणारा होता. ज्यातून बाय दि एन्ड ऑफ डिसेंबर, थिंग्ज वेअर नॉट वर्किंग आऊट बिट्वीन अस, यावर शिक्कामोर्तब झालं. एकतीस डिसेंबरच्या रात्री पार्टीज टाळून वुडी ॲलनचा ‘मिडनाईट इन पॅरिस’ पाहायला सुरुवात करायची आणि त्यानंतर जे काही वाटेल त्यानुसार काहीतरी पाहत-ऐकत बसायचं किंवा जेवण बनवत बसायचं असा आमचा वार्षिक कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी ‘फॉर ओल्ड टाइम्स’ सेक’ म्हणत हे केलं, तरी त्यात एक विलक्षण रुक्षपणा होता.

जानेवारीमध्ये तिने तिला एका मुंबई-बेस्ड मेजर ॲड एजन्सीमध्ये जॉब मिळण्याची शक्यता असल्याचं कळवलं. आम्हा दोघांनाही हे बरंच आहे, असं वाटलं. कारण, वुई वेअर ऑलरेडी ड्रिफ्टिंग अपार्ट. तरीही आम्ही पुढचे दीड दोन महिने सोबत का राहत होतो, तर या घरामुळे. शिवाय, आम्हा दोघांनाही आत्मघातकी गोष्टी करण्याचं व्यसन होतं. आमचे सायकिॲट्रिस्ट आणि थेरपिस्ट याबाबत नाखूष असले तरी आमची हिस्टरी माहीत असल्याने सगळं सॉर्ट झालं तर उत्तम, हे त्यांना वाटत असावं. पण, ही सगळी फॉल्स होप होती. तरी आमच्या स्वभावाला जागत आमच्या सभोवताली आणि अगदी आमच्या वागण्यात सगळे बदल घडत असले तरी घर सोडणं हे प्रकरण जरा लांबणीवर टाकलं गेलं होतं. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिला मुंबईतला  जॉब मिळाला आणि ते आत्मघातकी वागणं तेवढ्यापुरतं का होईना; पण थांबलं, असं वाटू लागलं.

गेली सात वर्षं आम्ही सोबत असल्याने आम्ही एकमेकांना नखशिखांत ओळखत असताना, हे कसं घडलं हा प्रश्न आमच्या घरच्यांना आणि मित्रांना छळत असला तरी मला तितकासा छळत नाही. कारण, सगळं इंटर्नल आणि एक्स्टर्नल स्ट्रगलमधल्या तफावतीमुळे घडत होतं. पूर्वीही आम्ही दोघे एकमेकांच्या अँक्झायटीज ट्रिगर करायचो. कधी एखादी फिल्म किंवा सिरीज तिच्या एक्सने तिला इंट्रोड्यूस केलेली असायची किंवा मग कधी ती ऐकत असलेलं गाणं माझ्या जुन्या नकोशा आठवणींना उजाळा द्यायचं. कारण, ते माझ्या एक्सच्या आवडत्या बँडचं असायचं, जो मलाही आवडत असला तरी त्याचवेळी नकोसा वाटायचा. मात्र, ॲट दि एन्ड ऑफ द डे, जे काही असेल त्यात आम्ही सोबत असायचो. काहीही झालं तरी शेवटी आम्ही एकमेकांच्या इंटर्नल (आणि इटर्नल) डीमन्सशी कायम सुरु असलेल्या स्ट्रगलमध्ये एकत्र असणं गृहीत धरलेलं असायचं. आता मात्र असं नव्हतं. सगळं अगदी उलट झालं होतं आणि असं एकमेकांना गृहीत धरण्याचे आणि तासनतास एकत्र पडून राहण्याचे दिवस केव्हाच संपले होते. गुरुदत्त आणि गीता दत्तची, लकी अली, स्वानंद किरकिरे, अॅडेल, मोहित चौहान आणि केके आणि इतरही अनेकांची गाणी ऐकण्याचे ते दिवस होते.

अस्ताव्यस्तता टाळली तर एपिसोड्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये फरक पडत असल्याच्या सर्वश्रुत संकल्पनेवर माझा विश्वास आहे. पण, त्यात प्रोक्रॅस्टिनेशनमुळे कधीकधी ते बाजूला पडतं. तरी एप्रिलमध्ये पहिला मेजर एपिसोड घडल्यानंतर लगेच सगळं सामान भरून ठेवलेले राखाडी बॉक्सेस हॉलमध्ये व्यवस्थित ठेवले होते. प्रोक्रॅस्टिनेट करणं टाळत दोन्ही बेडरूम आणि किचन आणि एकूण घरामध्ये आवराआवर करून बऱ्यापैकी सुसूत्रता आणली. त्यानंतर लागलीच लॉकडाऊनची फेज टू सुरु झाल्याने मी भरणं अपेक्षित असलेले राखाडी बॉक्सेस उलट, हे पुस्तक बाहेर काढ, ते बाहेर काढ करत रिकामे झाले. एका पॉइंट नंतर सगळं व्यवस्थित झाल्यानंतर काहीतरी पाहत बसणं, ऐकत बसणं किंवा फारतर वाचत बसणं इतकंच हाती उरतं. किंवा फारतर स्वयंपाक करणं. किचनमधील साऱ्या गोष्टी नेमक्या इथेच होत्या, हे त्यातल्या त्यात बरं होतं. घराबाहेर पडणं शक्य नव्हतं; पण शक्य असतं तरी त्या काळात मी ते केलं असतं का, हा मुद्दा आहे. कारण, मधल्या काळात माझ्या भुकेवर आणि जेवणावर देखील परिणाम झाला होता. दिवसात एखादेवेळी जेवण करण्याचे प्रकार घडत होते.

. अस्वस्थ आणि असंतुष्ट : ()रॅशनल मॅन

मी किचनमध्ये आहे. सिंकमधून काहीतरी द्रव पदार्थ बाहेर येत आहे. पण, त्याचा रंग माझ्या ध्यानात तरी येत नाहीये किंवा मग तो बदलत तरी आहे. तो आधी ऑरेंज वाटत होता. आता तो पांढरा वाटतोय, ज्यात पर्पल शेड्स आहेत. पण, तो पदार्थ जाळीवाटे खाली जाण्याच्या ऐवजी माझ्या अंगावर आणि भिंतींवर पसरतोय. त्याचे रंग बदलत जात आहेत. बघता बघता माझ्या आजूबाजूच्या भिंती त्यात गडप होऊन जातात. आताही तो पदार्थ भिंतीवर, आसपासच्या वस्तूंवर आणि माझ्या अंगावर वरच्या बाजूने सरकतोय, असं वाटतंय. आलटून पालटून ऑरेंज आणि पर्पलच्या साऱ्या शेड्स दिसताहेत. हे सारं म्हटलं तर कुठल्याशा हॉरर फिल्ममध्ये वगैरे पाहिल्यासारखं वाटतंय. फक्त त्यात सहसा या क्रॉल होणाऱ्या गोष्टी किंवा द्रव पदार्थ लाल/काळया रंगाचे असतात.

मी जागा होतो तेव्हा मला दरदरून घाम फुटलेला आहे. त्यात मला हे स्वप्न ठळकपणे आठवतंय. मला कुणाला तरी कॉल करावासा वाटतोय. मी श्रुतीला फोन लावला. पण, तो रिंग होण्याआधीच कट केला. कारण, मला स्प्लिट झाल्यानंतर अचानक फोन करून समोरच्या व्यक्तीलाही डिस्टर्ब करणाऱ्या व्यक्तींमध्ये समाविष्ट व्हायचं नाही. मग मी माझ्या थेरपिस्टला कॉल केला.

पडलेल्या स्वप्नाचा अर्थबोध होणं जरा अशक्य हे मी जाणून आहे. तरी आताच्या स्वप्नाचं मूळ दोन-तीन वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगात असेल का, हा प्रश्न मला पडला आहे. २०१६ की  २०१७ मध्ये एकदा आमच्या बिल्डिंगमधली ड्रेनेज लाईन चोकअप झाली होती. त्यामुळे किचनमधील सिंक, बाथरूममधील पाईप्स अशा सर्व पाईप्समधून पाणी बाहेर येत होतं. काहीएक तासानंतर त्यासोबत कचरा आणि सिंकवाटे खाली जाणं अपेक्षित असलेल्या गोष्टी देखील बाहेर यायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुरुस्त करून घेतलं तरी घरभर कुबट वास सुटला होता. जो पुढचे दोन दिवस तरी तसाच राहिला होता.

तसं पाहिल्यास मेमरी पोर्टल्सचं देखील काहीसं असंच असतं. एकदा ती उघडली की, त्यातून आठवणींची रांग लागत जाते. ज्या म्हटलं तर असंबद्ध असतात, म्हटलं तर नाही. त्यात पुन्हा अँक्झायटीमुळे अटेन्शन स्पॅनवर फरक पडत राहतो. ज्यामुळे गेल्या काही दिवसांत काही पाहायचं, वाचायचं म्हटलं तरी डोकेदुखी होतेय. कारण, काही पाहायला, वाचायला किंवा अगदी ऐकायला जावं, तर मध्येच कुठेतरी मन विचलित झाल्याने एखाद्या विचाराची ट्रिप लागते. जे करतोय ते करताना पुन्हापुन्हा मागे जावं लागतं. मग त्यात वेळ वाया जातोय असं वाटत राहिल्याने ते बाजूला पडतं. ते काम पूर्ण करावं तर प्रॉब्लेम, न करावं तर — ‘आय ॲम अप्टू नो गुड’ — असं वाटून अधिक प्रॉब्लेम.

परफेक्शन अचिव करण्याच्या अट्टाहासामुळे तर या साऱ्यात अधिक भर पडते. एरवी हा अट्टाहास चांगला असेल, किंबहुना असतो. पण, अनेकदा इट लीड्स टू ओव्हरथिंकिंग अँड देन टू सेल्फ-लोदिंग. माझ्या कंडिशनमध्ये नेमकं हेच घडत होतं. आता गेल्या महिन्यात एक ट्रान्सलेशनचं काम मिळालं होतं. काहीसा डिस्टर्ब्ड असूनही मी ते घेतलं; कारण विचार केला की, मे बी त्या निमित्ताने या फेज मधून बाहेर पडेन. मात्र, प्रत्यक्षात झालं ते या गृहीतकाच्या उलटच. अर्धंअधिक काम झालेलं असताना मध्येच ते मनासारखं होत नाहीये, या भावनेने उचल खाल्ली. दोन-तीन दिवस हे असंच सुरू राहिल्याने नकोच ते काम म्हणत सगळे इनिशियल ड्राफ्ट्स, रिवाइज्ड ड्राफ्ट्स असं सगळं स्क्रॅप करून टाकलं. काहीतरी अर्धवट सोडणं अधिक वाईट की ते उगाच करायचं म्हणून करणं अधिक वाईट? माझ्या मते, या दोन्हींपैकी दुसरा मार्ग अधिक क्लेशकारक.

माझी थेरपिस्ट माझ्या विचारांच्या आणि मनातील भावनांच्या ड्युॲलिटी बाबत कायम बोलत असते. तिच्या मते, माझी प्रत्येक गोष्टीचं अतिरॅशनलायजेशन करण्याची सवय याला कारणीभूत होती. माझ्या लेखी तिच्या मताला किंमत आहे. पण, एका पॉइंट नंतर या साऱ्या भावना कायम माझ्या सोबत असणार आहेत, हे मी पूर्वीच मान्य केलेलं आहे. आणि हे असं तिलाही बोलून दाखवलं आहे. तिलाही याबाबत फार प्रॉब्लेम नसावा. कारण, शेवटी ज्याचं त्याचं कोपिंग मेकॅनिझम वेगळं असणार, हे ती जाणून आहे. त्यामुळे तिने फक्त फिजीकल सिम्प्टम्स संदर्भात इतरांना रेफर करावं आणि त्यानुसार फक्त फिजीकल सिम्प्टम्स ट्रीट करावेत, हे मी अगदी सुरुवातीला नसलं तरी काहीएक सेशन्स नंतर आमची ट्युनिंग जुळल्यानंतर स्पष्ट केलं होतं. तिने देखील याला होकार दिला होता. कारण, काही पझल्स माझी मला सोडवायला आवडतात. मे बी पझल इज नॉट द राईट वर्ड. माझी फिजिकल सिम्प्टम्स, विचार आणि या दोन्ही भोवतीचं सारं काही मी तिच्याशी शेअर करत असलो तरी ॲट दि एन्ड ऑफ द डे मला वाटतं की, ही काही पझल्स माझी मी सोडवावीत. अर्थात, काहीएक प्रमाणात तिच्या मदतीने. पण, माझ्या मूळ स्वभावाबाबत तडजोड करण्यास मी तयार नसायचो, रादर अजूनही नाही. मी अनेक गोष्टींबाबत दुराग्रही होतो. अँटी-डिप्रेसंट्स न घेणं वॉज जस्ट वन ऑफ सच थिंग्ज. आणि ती हे सारं झेलत असल्यामुळेच तर गेली चार वर्षे मी तिचा क्लायंट होतो, रादर अजूनही आहे.

म्हणूनच तर एप्रिल मधल्या सेशनमध्ये मी अजून शिफ्ट झालो नसल्याने एकटाच आहे म्हटल्यावर ती माझ्याहून अधिक चिंतेत पडली होती. त्यामुळे लॉकडाऊन नंतरच्या आमच्या पहिल्या सेशनमध्ये तिने मला काही सांगण्याऐवजी मीच तिला ‘काळजी करण्याची गरज नाही. आय ॲम फाईन… शिवाय, काही वाटलं तर तू आहेस… फिजीकल सिम्प्टम्स असतील तर पुरेशा गोळ्या आहेत’, असं सगळं सांगत एका अर्थी तिचंच सांत्वन करत बसावं लागलं होतं. एनीवे, शी’ज रियली गुड. डिसेंबरनंतर आणि विशेषतः आता पॅन्डेमिक पिरीयडमध्ये तर याची पुनःप्रचिती येऊन मी माझ्या निवडीवर खुश झालो होतो. कारण, आपल्याशी ज्यांचं सूत्र जुळेल असे लोक त्यातही पुन्हा डॉक्टर्स आणि थेरपिस्ट्स भेटणं अवघड असतं. त्यांच्याशी असलेले संबंध टिकतील असं पाहणं, तर त्याहून अवघड.

ऑन अ टोटली डिफरन्ट साईड नोट, तिला मृत्यूविषयीचे विनोद आवडत नाहीत. त्यामुळे मी ‘आय ॲम नॉट गोइंग टू जम्प ऑफ द रूफ!’ म्हटलं की तिचा चेहरा पाहण्यालायक होतो. जे तसं पाहता तिच्या प्रोफेशनला अनुसरून योग्य आहे. पण, त्यामुळे माझ्यावर कायम ‘रिलॅक्स स्मिता! इट्स जस्ट अ जोक!’, असं धृपद वापरण्याची वेळ येते. तिच्याच कशाला, तर माझ्या आजूबाजूच्या इतर लोकांबाबत देखील हेच घडायचं.

श्रुती बाबत असं अजिबात घडत नसे. वुई युज्ड टू एन्जॉय सच डार्क जोक्स. खरंतर तिच्या सोबत असताना कुठलेच फिल्टर्स लावण्याची गरज मला भासली नाही. मे बी शेवटचे काही आठवडे सोडता. अर्थात, तेव्हादेखील आम्ही जे काही असेल ते स्पष्ट बोलत होतो, त्यामुळे तेव्हाही असे फिल्टर्स लावले असं नाही. एनीवे, माझा मुद्दा काही स्मिताशी बोलताना मला फार फिल्टर्स लावावे लागतात अशा अर्थाचा नाही. कारण, तसं करावं लागलं असतं, तर थेरपीचा फायदा काय! माझा मुद्दा इन जनरल लागू पडणारा होता. आणि हे केवळ डार्क विनोदांबाबत होतं, असं नाही. फॉर इन्स्टन्स, पीपल हॅव ऑल्वेज हॅड अ प्रॉब्लेम वुईथ द वे आय लाफ. मला फिल्म थिएटर्समध्ये हे असं बोलून दाखवलं गेलं आहे. इतकंच कशाला, तर फ्रेन्ड सर्कल मध्ये आणि इव्हन घरात एक्स्टेन्डेड फॅमिली मधील लोक याबाबत बोलले आहेत. बट वुईथ हर, आय कुड इझिली एम्ब्रेस द ग्लोरियस मेस दॅट आय वॉज/ॲम. (हे एलिझाबेथ गिल्बर्ट या श्रुतीच्या आवडत्या लेखिकेचे शब्द.) ती एकाच वेळी लॉजिकल, रॅशनल आणि कम्पॅशनेट होती. जे सर्वांनाच जमतं असं नाही. मला तर नाहीच नाही.

हे काहीसं विरोधाभासी वाटेल, पण मधल्या काळात या आठवणी मला छळत असल्या तरी त्या नसणं हे माझ्या लेखी अधिक क्लेशकारक असेल. जसं मला आठवतंय तसं, कुणालातरी पूर्णतः विसरून जाणं इज वन ऑफ माय बिगेस्ट फियर्स. मे बी कुणाला तरी पूर्णतः विसरेन असं घडणार नाही. पण, कुणाचा तरी चेहरा विसरणं, कुणाचा तरी आवाज विसरणं या शक्यतांमुळे मला अँक्शिअस वाटत राहतं. अर्थात, मी एखाद्या सोशल मीडिया साईटवर जाऊन त्या व्यक्तीचं अकाऊन्ट पाहू शकतो. बट, आय मीन इट इन अ मोअर मेटाफिजिकल सेन्स. जे आधी घडलं देखील आहे. म्हणजे मला आम्ही लहानपणी राहायचो त्या घरमालकाचा, शाळेतील शिक्षकांचा चेहरा आणि आवाज कुठे आठवतो? नाही म्हटल्यास, ते समोर आल्यावर मी त्यांना ओळखीन. अर्थात, हे स्मिताला सांगितल्यावर ती ‘या बालपणीच्या आठवणी होत्या, तारुण्यातील आठवणींबाबत असे घडण्याची शक्यता कमी’, असं म्हणेल. ती ज्या ड्युॲलिटी बाबत म्हणत असते ती हीच. आय हॅव धिस कॉन्स्टन्ट नीड टू रॅशनलाईज एव्हरीथिंग, विच देन लीड्स टू ओव्हरथिंकिंग. सगळं काही रॅशनलाईज करत बसण्यातून इरॅशनल भीती निर्माण होते, हा काहीसा विचित्र पॅराडॉक्स मानता येईल.

आताही स्पॉटिफायवर शफलवर गाणी लावली, तर स्वानंद किरकिरेचं ‘खोया खोया चाँद’ प्ले होतंय. हल्ली फक्त वेगेवेगळ्या ॲप्समधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सर्वाधिक ओळखते, हेच काय ते खरं.

. वह स्त्री

मी घराबाहेर पडणं गरजेचं होतं. त्यात आता लॉकडाऊन संपलं होतं आणि स्मिताने देखील तिच्या ऑफिसमध्ये पूर्वीसारखी प्रॅक्टिस सुरु केली होती. दोन दिवसांपूर्वीच आजची अपॉइंटमेंट बुक केली होती. संध्याकाळची अपॉइंटमेंट असल्याने निघायला अजून चार-पाच तास बाकी होते. बऱ्याच दिवसांत चालवली नसल्याने मी एकदा गाडी सुरु होतेय का ते पाहिलं. लकिली थोडा वेळ घेऊन का होईना, पण गाडी चालू झाली. मग मी वर येऊन जेवण करून घेतलं. फिल्म पाहत बसलो, पण थोड्याच वेळात सुस्तावलेपणा जाणवल्याने थोडा वेळ झोप घ्यायचं ठरवलं. तरी झोपायच्या आधी साडेतीनचा गजर लावला.

जाग आली तर सव्वा तीन वाजले होते. हे एक भयंकर विचित्र असतं की, जेव्हा काही काम नसेल तेव्हा वेळेआधी जाग येते. मात्र, काम असतं तेव्हा गजर वाजत राहिला तरी झोपावंसं वाटत राहतं. गजर बंद करून काही काळ तसाच पडून राहिलो आणि नंतर फ्रेश होऊन चारेक वाजता घराबाहेर पडलो. अपेक्षेप्रमाणे रस्त्यावर बरीच वर्दळ होती आणि पुणेकरांनी पॅन्डेमिकमध्येही गर्दी करणं साध्य केलं होतं. पाच वाजताची अपॉइंटमेंट असूनही तासभर आधी बाहेर पडलो हे बरंच झालं, असं गर्दी पाहून वाटू लागलं. मास्क घातलेले लोक आणि संपूर्ण चेहऱ्यापैकी फक्त डोळे दिसणारे लोक पाहून सुधा मुद्गलचं ‘सीखो ना’ गाणं माझ्या डोक्यात घोळू लागलं. या काळात चेहरा झाकलेला असला तरी नुसत्या डोळ्यांकडे पाहून लोक ओळखता येतात, हे गृहीतक बहुधा प्रत्येकाच्याच बाबतीत खरं ठरलं असेल. त्यामुळे का होईना, पण बरेचसे लोक मुद्गलला अपेक्षित असलेली ‘नैनों की भाषा’ शिकले असावेत, अशी अपेक्षा आहे. मागच्या गाडीवाल्याने हॉर्न वाजवल्याने माझी तंद्री भंग पावली आणि मी पुढे निघालो.

एकतर शिवाजीनगर परिसर म्हणजे बरीच गर्दी, जी आताही मुबलक प्रमाणात होती. स्मिताच्या ऑफिस जवळ पोचेस्तोवर पाच वाजत आले होते. एकदा बिल्डिंगमध्ये पाऊल टाकलं की, जणू इतका वेळची गर्दी माझ्या स्वप्नातच अस्तित्त्वात होती की काय असं वाटावं इतकी शांतता. स्मिताच्या फ्लोअरला पोचेपर्यंत लॉबीमधला वॉचमन सोडल्यास चिटपाखरूसुद्धा नजरेला पडलं नव्हतं. आत गेल्यावर रिसेप्शनिस्ट देखील नसल्याचं पाहून तिला त्याबाबत विचारलं तर कळालं की, मी आजचा शेवटचा क्लायंट असल्याने रिसेप्शनिस्टला जायला सांगितलं होतं. पुढे सहा-सव्वा सहा पर्यंत आमचं सेशन सुरु होतं. इट वॉज रियली नाईस टू टॉक टू समवन इन पर्सन. कधी वाटलं नव्हतं की, मी असं काही म्हणेन. पण, सगळं अनपेक्षित असं घडण्याचेच हे दिवस होते की! नाही म्हणायला आमची व्हर्च्युअल सेशन्स झाली असली तरी पंधरा इंची स्क्रीनवरील माणसं पाहून कंटाळा येतोच.

सेशन संपत असताना स्मिताला म्हणालो, “तू आता दिवसभर अशी रडगाणी ऐकून बोअर झाली असशीलच”. तर, ती आपल्या नेहमीच्या शैलीत खळखळून हसली. त्याला जोडून, “नाही, असं काही नाही. कारण, आता अशा रिपीटीशनची सुद्धा सवय झालेली आहे” म्हणाली.

“मीही आता निघतेच आहे”, असं म्हणाल्याने तिने पर्स, चाव्या वगैरे घेऊन ऑफिस लॉक करेपर्यंत मी बाहेर थांबलो. असं शेवटचं कुणासाठी तरी वाट पाहत थांबून किती दिवस झाले आहेत, असा विचार मनात आला. मात्र, तो विचार आपला मास्क लावेपर्यंत पुन्हा तितकंच प्रसन्न स्मित करणाऱ्या स्मिताकडे पाहून थांबला. पार्किंगमध्ये पोचेपर्यंत आम्ही काहीच बोललो नाहीत. म्हणजे तो ऑकवर्ड सायलेन्स होता अशातला भाग नाही. फक्त मध्ये काही बोलायची गरज पडली नाही, इतकंच. आम्ही आपापल्या गाड्यांकडे वळलो खरे, पण माझी गाडी काही केल्या सुरु होईना. गाडी असल्याने मी काही घरून निघताना ऑनलाईन कॅब वगैरे चेक केल्या नव्हत्या. त्यामुळे कॅब मिळेल की नाही, याची चिंता होती.

इतक्यात स्मिताचा आवाज आला, “गाडी सुरु होत नाहीये?” म्हटलं, “नाही.” ती काहीतरी विचार करत लगेच, “मी ड्रॉप करते” इतकं म्हणाली. कॅबपेक्षा हे बरं, असं म्हणत मीही “चालेल” म्हणालो. बाहेर पडल्यानंतर गाडी चालवत असताना स्मिता काहीतरी बोलत होती, पण तिच्या पिवळ्या कलरच्या हेल्मेटमुळे मला ते नीट ऐकू येत नव्हतं. मध्येच काही शब्द ऐकू यायचे, तर काही नाही. तरी साधारण ती काय म्हणतेय याचा अर्थ लागेल इतपत अंदाज यायचा. हे घडल्याने मला श्रुती देखील नेमकं असंच करायची, हे आठवलं. त्याला लागून मंगलेश डबराल यांची एक हिंदी कविता आठवली, ज्यात साधारण — तुमच्या आयुष्यातील सर्व स्त्रियांमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊन गेलेल्या एका विशिष्ट स्त्रीची प्रतिमा कशी शोधत राहता, असं म्हटलं होतं. शिवाय, त्या त्या स्त्रियांना देखील तुम्ही त्यांच्यामध्ये दुसऱ्या एका स्त्रीचा, तिच्या प्रेमाचा शोध घेत आहात, असं जाणवत राहतं. त्यामुळे कधीकाळी तुमच्या आयुष्यात असलेली स्त्री तुमच्या सगळ्या आयुष्यावर, भविष्यात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांवर किती प्रभाव टाकून जाते — असा बराच गहन अर्थ त्यात होता. हे किती खरं आहे, हे मला वेळोवेळी जाणवत राहतं. मात्र, स्मिताच्या संदर्भात असा विचार पहिल्यांदाच मनात आला होता. त्यामुळे सुप्तपणे मी स्मिताकडे आकर्षित होत होतो का, असा विचार माझ्या मनात आला. पण, तो विचार मी झटकून टाकला आणि परत तिच्या नीट न ऐकू येणाऱ्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित केलं.

तासाभरात आम्ही माझ्या घराजवळ पोचलो. त्या क्षणी मला तिला घरी बोलवावंसं वाटलं. तिला तसं बोलून दाखवल्यानंतर ती देखील हो म्हणाली. ती गाडी पार्क करत असताना मास्क घातलेल्या व्यक्तीची ओळख डोळ्यांकडे पाहूनही लक्षात येतेच, हे पुन्हा जाणवलं. लिफ्टच्या दिशेने जात असताना मी म्हणालो, “हे किती विचित्र आहे ना की, लोक थेरपिस्ट सोबत सगळं शेअर करत असले तरी थेरपिस्ट्सना घरात प्रवेश कधीच मिळत नाही. खरंतर थेरपिस्टने एकदा जरी समोरच्या व्यक्तीचं घर पाहिलं तरी किमान दोन-तीन सेशन्समध्ये सविस्तर बोलूनही मिळणार नाही, इतकी निरीक्षणं नोंदवता येतील.” यावर ती काहीशा विस्मयचकित चेहऱ्याने “आय नेवर थॉट ऑफ धिस”, असं म्हणाली. आणि नंतर स्वतःशीच सहमती दर्शवत आहे अशा प्रकारे काही वेळा मान खालीवर डोलावत राहिली. हे असं करणं मला उगीच आवडून गेलं. तिने पूर्वी कधी असं केलं होतं का, याची मला अजिबात आठवण नव्हती. लिफ्टमध्ये असताना मघाशी गाडीवर असताना मनात आलेल्या विचाराने पुन्हा उभारी घेतली आणि किती लोक आपल्या थेरपिस्टकडे आकर्षित होत असतील, असा प्रश्न मला पडला. एव्हरीवन शुड बी एबल टू एक्स्प्रेस हाऊ दे फील फ्रीली, हे मला मान्य असलं तरी मी तिला याविषयी सांगेन की नाही, याची मला खात्री नव्हती. तूर्तास तरी मी तिला माझ्या घरात प्रवेश देत होतो, इतकंच.

चित्र सौजन्य: अन्वर हुसेन

अक्षयशेलार हे लेखक, चित्रपट समीक्षक आणि स्तंभलेखक आहेत. यापूर्वी दै. महाराष्ट्र टाइम्स आणि दै. आपलं महानगरकरिता साप्ताहिक स्तंभलेखन केलेलं आहे. सध्या इंडी जर्नल या बायलिंग्वल पोर्टलकरिता सिनेमाविषयक लेखन करतात.

2 comments on “आऊट ऑफ द पास्ट : अक्षय शेलार

  1. हिना खान

    कथा आणि लेखन दोन्ही आवडले..

    Reply
  2. अनिल कोष्टी

    कथेतील मनोव्यापार थक्क करणारा आहे. बरेचदा मनाशी होणाऱ्या संवादात इंग्रजी वाक्यरचना रसभंग करते., अर्थात हे माझं मत आहे.. मला इंग्रजी संवाद समजून घ्यायला वेळ लागला म्हणून वाचनात थोडा खंड पडत होता. पण, हे संवाद नैसर्गिक असून आजच्या तरुणांच्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येतात त्यामुळे ते कथेत जसेच्या तसे आले आहेत.👍👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *