अजय कांडर

कोणत्याही काळात

back

 

कोणत्याही काळात

खूप दीर्घ

चालल्या नंतरही

हाती लागतायत सुकी पाने

रान तुडवत जाताना

माती कपाळाला लावून

उजळून घ्यावा म्हणतो माथा

कुणास ठाऊक

भोवतालच्या पिढीजात 

दुःखाच्या आजन्म कारावसाची

वेदना सलत राहतानाच्या या दिवसात 

भोवतालच अधिक हिंस्र होत जाताना 

मातीचीही संवेदनशीलता 

हरवून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही

या अविश्वासाच्या दिवसात

ठेवता आला नाही विश्वास नशीबावर

नाहीतर या वर्षीनुवर्षांच्या असहिष्णू काळात बांधता आलेही असते स्वप्नांचे मजले

खोटं जगणं यथार्थ यशस्वी केल्याचे 

आणि पाप पुण्याच्या भाकड कथा सांगत 

गाता आली असतीही गाथा

कदाचित इंद्रायणीत गाथा बुडल्याचे सांगत

आम्हीही धर्ममार्तंड होण्याची

रचली असती नवी कहाणी

कोणत्याही काळात असहिष्णूतेला 

इथूनच तर प्रारंभ होतो,

जात-धर्माच्या मुक्तीची भाषा बोलता बोलता 

त्याचाच तर दोरखंड अधिक घट्ट बांधला जातो !

 

***

 

तुझ्या सोबत

खूप गोष्टी 

असतात देण्यासारख्या

मला त्या देता आल्या नाहीत कधी तुलाही

एक भीतीची किंकाळी 

उठत असते सदैव आपल्या आत

मला ती तुझ्यातून दूर करण्याचे सामर्थ्य लाभो एवढीच इच्छा

तुझ्या जगण्याचे सगळे 

मार्ग बंद होताना 

माझ्या आधाराची होडी तुझ्या घरातूनच सोडली जावी

माझे कधीही मृत्यूवर प्रेम नाही आणि त्याने येऊही नये

पण आलाच अचानक तर येवो बापडा, उरलेले माझेच आयुष्य त्याने तुला द्यावे 

भेदाच्या भिंतींची, भयाची 

आणि एकाकीपणाची शांतता भयाण असते

माणसं कोलमडून पडतात 

त्यात आजन्म 

मी अशाच माणसांच्या जगण्याचा सोहळा साजरा करायचा म्हणतोय

तुझ्याही सोबत.

***

सर्वकालीन प्रार्थनेचा स्वर

दुःखाला

आपलंस करून चालणा-यांच्या ह्रदयात

कायमच वसलेली असते एक वाहती नदी

वेदनेचा कोणता झरा

सतत त्यांच्यात पाझरत असतो

हे नसते माहीत

तरीही निर्वासिताची

सलती वेदना घेऊन

भटकणा-यांच्याही

चेह-यावर स्थैर्याचे भाव

दिसून येतात,

तेव्हा त्यांच्यासाठी जोडले जावू नयेत हात कधीही

फक्त भूमिहीन होण्यानंतरही त्यांच्यात वाढत जाणा-या

सह्रदयी भावनेतच

आपल्याही भावनांची वाहू द्यावी नदी

आईच्या पान्ह्याची कदर न राखताही

गुराढोरांना, पशुपक्ष्यांना मातेसमान माना म्हणत

जे देतायत सूचक इशारे

त्यांच्या साध्या करड्या नजरेने भयभीत होऊन

जे सोडू पाहातायत आपली भूमी

त्यांच्याही शब्दात सापडत जाते सद्भावनेची आर्तता

खरंतर माणसाच्या दुःखाची वेदनाच

सुखाच्या निर्मितीचा क्षण अनुभवत असते तहहयात

म्हणून तर दलित-पददलितांच्या स्पर्श अस्पर्शतेच्या

विद्रोहातून निर्माण होत असतो माणसाच्या समतेचा जन्म,

शोषित, वंचितांच्या सहवासातून शोधता येतायत मुळे,

अखेर

दुःखाच्या खपल्या वाढत जाणा-या अंतःकरणातूनच तर ना

निनादत राहातोय सर्वकालीन प्रार्थनेचा स्वर!

***

छायाचित्र: प्रकाश नेवासकर

अजय कांडर व्यवसायाने पत्रकार आहेत. ते मराठीत कविता आणि इतर साहित्य-प्रकारात लेखन करतात. कविता लेखनासाठी कांडर यांना उत्तमोत्तम पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

One comment on “कोणत्याही काळात: अजय कांडर

  1. राहुल पाटील

    खूपच सुंदर काव्यमेजवानी..

    कांडर हे समकालीन महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या कवितेत वैचारिक सखोलता आहे, जीवनचिंतन आहे आणि काही मौलिक प्रश्न आहेत. जी वाचकाला जाणीव देतात. अंतर्मुख करतात. कविचे अभिनंदन आपल्या उपक्रमास शुभेच्छा!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *