‘परतणं’ हा शब्द एखाद्या शांत संध्याकाळीसारखा आहे. त्यात स्मृतीचा उजेड जेवढा प्रखर आहे, तेवढ्याच भूतकाळाच्या सावल्याही गडद आहेत. काही वेळेला परतणं आपल्याला मिश्किल हसू देतं, काही ठिकाणी विचार करायला लावतं, तर कधी ते भरत आलेल्या जखमेवरची खपली काढून रक्त भळाभळा वाहू देतं. कसंही असो, परतणं कुणासाठी चुकत नाही ते नाहीच ! असं म्हणताना, ‘परतणं’ ही फक्त भावनिक हालचाल नाही, तर तो एका जाणिवेचा प्रवास आहे. ती आपल्या भूतकाळाशी पुन्हा संवाद साधण्याची आणि त्यातून स्वतःचा अर्थ शोधण्याची प्रक्रिया आहे. हीच प्रक्रिया तारा वेस्टओव्हर ह्यांच्या एज्युकेटेड ह्या गाजलेल्या आत्मचरित्रात प्रभावीपणे उलगडते.
एज्युकेटेड ह्या आत्मचरित्राची सुरुवात आयडाहो राज्यात राहणाऱ्या ताराच्या धार्मिक, मूलतत्त्ववादी कुटुंबात व्यतीत बालपणापासून होते. पुढे, ब्रिघम यंग विद्यापीठ, नंतर हार्वर्ड, आणि शेवटी केंब्रिज विद्यापीठातील शिक्षण असा तिच्या शैक्षणिक प्रवासाचा आलेख ह्या आत्मचरित्रात मांडला आहे. चाळीस प्रकरणांचं हे आत्मचरित्र प्रत्येक टप्प्यावर ताराच्या मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक परिवर्तनाची रूपं दाखवतं. २०१८ साली अमेरिकेतील रँडम हाऊस या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेल्या ह्या आत्मचरित्रात, शिक्षणाने लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वात आणि पर्यायाने आपल्या जीवनात झालेले बदल प्रभावीपणे मांडले आहेत. ह्यामुळे, जगभरात हे आत्मचरित्र चर्चिलं जातं.
ह्या आत्मचरित्राच्या लेखिका तारा वेस्टओव्हर ह्या अमेरिकन इतिहासतज्ज्ञ आणि लेखिका असून, त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून इतिहासात पीएच.डी. मिळवली आहे. एज्युकेटेड हे तारा ह्यांचं पहिलं पुस्तक आहे, आणि त्यासाठी त्यांना अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
आत्मचरित्राची सुरुवात ताराच्या बालपणातील एका प्रसंगाने होते; त्या दिवशी तारा आपल्या भावाबरोबर आयडाहोमधील बक्स पीक ह्या उंच डोंगराच्या उतारावर उभी असते. समोर खोल दरी पसरलेली असते, आणि वडील नेहमीप्रमाणे ‘सरकार आपल्याला घ्यायला येणार आहे, आता ‘डेज ऑफ अबोमिनॅशन’ म्हणजे विनाशकाळ जवळ आला,’ असं सांगत कुटुंबाला सरकारपासून सावधान करत आहेत, ह्या प्रसंगाने होते. सरकार ही लोकांवर पाळत ठेवणारी सत्ताच आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच, मुलांच्या जन्मावेळी रुग्णालयात न जाता घरीच प्रसृती करणं, त्यांच्या जन्माची सरकारी नोंद न करणं, त्यांना शाळेत न पाठवणं, आणि कोणत्याही वैद्यकीय उपचारांपासून दूर ठेवणं, हे सगळं त्यांच्या भीतीतून आणि अविश्वासातूनच घडत होतं.
पुस्तकाच्या सुरुवातीचा ताराच्या बालपणीचा हा प्रसंग तिच्या बालपणीच्या बंदिस्त, भीतीग्रस्त आणि बाहेरील जगापासून तुटलेल्या वातावरणाची पहिली झलक दाखवतो. तेव्हा तारा शाळेत जात नव्हती, आणि तिच्या कुटुंबाचा ज्ञानाला नाकारून श्रद्धेवर असलेला अंधविश्वास तिचं विचारविश्व मर्यादित करत होता. त्या बंधनातून बाहेर पडून ज्ञानाच्या दिशेने केलेला प्रवास हा ह्या आत्मचरित्रात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या प्रसंगांतून उलगडला आहे.
ह्या प्रसंगानंतर, कथन ताराच्या त्या बंदिस्त जगाकडे वळतं. अमेरिकेच्या आयडाहो राज्यातल्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये मॉर्मन ह्या ख्रिश्चन मूलतत्त्ववादी कुटुंबात जन्मलेली मुलगी तारा. रुग्णालयं आणि डॉक्टर्स हे देवाच्या इच्छेविरोधात काम करतात हा ताराच्या वडिलांचा ठाम समज असल्याने, ताराचा आणि तिच्या सहा भावंडांचा जन्म घरीच झाला. एवढंच नाही, तर त्यांच्या जन्माची नोंदही सरकारी दफ्तरात बराच काळ केली गेली नव्हती. वडिलांना सरकारकडे अशी कोणतीही नोंद ठेवणं धोकादायक वाटायचं, कारण सरकार ही नागरिकांवर पाळत ठेवणारी एक ‘अनैसर्गिक सत्ता’ आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. ते मुलांना शाळेतही पाठवत नसत. शाळा ही मुलांची मनं कलुषित करण्याचं ठिकाण आहे असा दृष्टिकोन असलेले पारंपरिक वडील, वडिलांच्या ह्या आततायी आणि हेकेखोर वागणुकीला कंटाळून हिंसक झालेला भाऊ, घरकाम आणि जगण्यासाठीची काही व्यावहारिक कौशल्यं ह्यांनाच शिक्षण मानणाऱ्या त्या बंदिस्त वातावरणात तिचं बालपण गेलं. पण चौदा वर्षांच्या वयातच, बाहेरच्या जगाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या संकुचित जगातून बाहेर पडणं आवश्यक आहे हे तिला जाणवतं. म्हणून मग वयाच्या सोळाव्या वर्षी ती महाविद्यालयीन प्रवेशपरीक्षेची तयारी सुरू करते. आतापर्यंतच्या आयुष्यात केवळ धार्मिक ग्रंथ वाचू शकणारी ती गणित, विज्ञान, व्याकरण मुळापासून शिकते, अथक परिश्रमाच्या बळावर ब्रिंगहॅम यंग युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवते, त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठामध्ये, आणि शेवटी केम्ब्रिजमध्ये, असा हा ज्ञानग्रहणाचा आलेख चढताच ठेवते. ह्या प्रवासात तिचं शिक्षण हे केवळ ज्ञानग्रहणाची प्रक्रिया राहत नाही; तो स्वतःच्या अस्तित्वाचा पुनर्विचार ठरतो. तिच्या प्रत्येक पावलामागे प्रश्न विचारण्याचं धैर्य आणि स्वतःला नव्याने ओळखण्याची आकांक्षा दडलेली आहे. हे सर्व करत असताना ती आपल्या विचारांनाही घडवत राहते आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात जाणीवपूर्वक बदल करीत राहते. किती विलक्षण आहे हे सर्व ! ह्या शिक्षणप्रवासाचं प्रथमदर्शी रूप तर प्रेरणादायी आहेच, पण त्याहूनही अधिक त्याचं अंतर्गत स्वरूप आत्मसंघर्षाचं आणि आत्मपरीक्षणाचं आहे. शैक्षणिक उन्नतीबरोबरच लेखिका स्वतःच्या भूतकाळाशी, आणि ओळखीशी संवाद साधायला सुरुवात करते; आणि इथूनच तिला आत्मभान प्राप्त होते. हे आत्मभान म्हणजे, तारा प्रथमच आपल्या कुटुंबाने दिलेल्या प्रत्येक मूल्याकडे, भीतीकडे, श्रद्धेकडे आणि ओळखीच्या चौकटीकडे तटस्थ नजरेने बघण्यास सुरुवात करते.
मात्र तिचं हे परतणं ही एखादी नाट्यमय घटना नसून, ती हळूहळू टप्प्याटप्प्याने घडणारी प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेत, ‘आजीचं त्या वेळी ऐकलं असतं तर’, ‘भावाच्या हिंसेला बळी पडलो नसतो तर’, ‘शिक्षण घेण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला नसता तर’ अशा अनेक शक्यता-अशक्यतांचे कंगोरे आहेत. अनेक कलाटणी देणारे प्रसंग आहेत, तर काही गमावलेल्या संधी आहेत, कुठे भावनावेग आहेत, तर कुठे हतबलता आहे. आणि बहुतेक ठिकाणी मनोधैर्याची परीक्षा आहे. आपल्या एज्युकेटेड ह्या आत्मचरित्रात तारा वेस्टओव्हर, शिक्षणाने तिला नखशिखान्त बदललं, जगाबद्दलची जाणीव वाढवली, ही कृतज्ञता तर व्यक्त करतेच; पण ती तेवढ्यावरच थांबत नाही, त्याहीपेक्षा पुढे जात आपल्या प्रगल्भ विचारांनी ती गतकाळातल्या घटनांचा पुन्हा अर्थ लावायचा प्रयत्न करते. वडिलांचा कट्टर धर्माभिमान, भावाची हिंसा, आईची मौन-संमती, आणि स्वतःची भीती व अपराधगंड ह्या सगळ्यांकडे ती आता संशोधकाच्या दृष्टीने पाहते. “असं का झालं ?”, “मी तेव्हा अगतिक का झाले ?”, “ माझ्याकडे दुसरे कोणते पर्याय होते ?”, “खरंच, तो माझा दोष होता का ?” असे प्रश्न ती स्वतःला विचारू लागते.
गतकाळाचा असा अन्वयार्थ लावताना तिला पहिल्यांदा आठवतो ती दहा वर्षांची असतानाच प्रसंग. पहिल्यांदा ह्याचा अनुभव ताराला आला, तो ती दहा वर्षांची असताना. आयडाहोमधल्या तिच्या घराच्या शेजारीच राहणाऱ्या तिच्या आजीला (वडिलांची आई) आपल्या मुलाची ही आधुनिकता आणि शिक्षण ह्यांपासून फटकून राहणं मुळीच मान्य नव्हतं. आपल्या नातवंडांची तिला कमालीची काळजी वाटे. त्यांनी अशा अंधश्रद्ध चौकटीत वाढू नये, त्यांनी आपल्या वयाच्या इतर मुलांसारखं शाळेत जावं, बाहेरील जग पाहावं आणि डोळसपणे जगावं, अशी तिची तीव्र इच्छा होती. पण तिचं मुलासमोर काही चालत नसे. ती आयडाहो सोडून अॅरिझोना राज्यात राहायला जाताना मात्र ती ताराला, “माझ्यासोबत चल, इथून बाहेर पडू, आणि आपण तुझं शाळेत नाव घालू,” असं म्हणाली. त्या वेळी आजीसोबत निघून जाणं म्हणजे शिक्षण, बाहेरचं जग, आणि स्वातंत्र्य अनुभवता येण्याची पहिली शक्यता होती. तारालाही ते पटलं, ती तयारही झाली, पण ऐन वेळी डगमगली. आईवडिलांना आणि भावंडांना सोडून इतक्या लांब जायची तिला भीती वाटली. त्यानंतर अनेक वर्षांनी ती विद्यापीठात जाण्यासाठी घराबाहेर पडली. आज जेव्हा तारा आजीच्या त्या प्रस्तावाबद्दल विचार करते, तेव्हा आजीच्या धिटाईचं तिला कौतुक वाटतं. आपण तेव्हाच हिंमत दाखवली असती तर आयुष्य किती वेगळं असतं, ह्याचा ती विचार करते. पण नंतरच्या काळात, घरातल्या हिंसेच्या आणि भीतीच्या वातावरणापासून स्वतःला वाचवायचं असेल तर शिकणं हाच एकमेव मार्ग आहे, ही तिला स्वतःला जाणीव झाली. त्या निर्णायक क्षणी शिक्षण हे तिच्यासाठी अक्षरशः ‘करो या मरो’ झालं, आणि ह्या जाणिवेच्या तीव्रतेमुळेच ती शिक्षण घेण्यासाठी अधिक ठाम आणि जिद्दी झाली, हेही तिला उमगतं.
दुसऱ्या एका प्रसंगात गैरसमजातून मनात अढी घालून घेतलेल्या शॉन ह्या आपल्या भावाच्या हिंसक वागणुकीबद्दल ती विचार करते. शॉन ताराचा मोठा भाऊ होता. त्यांच्या पारंपरिक घरात शॉनची सत्ता पुरुष म्हणून जवळपास वडिलांइतकीच होती. आपले कपडे, बोलणं आणि वर्तन ह्यांतून तारा धर्माच्या चौकटीत बसणाऱ्या सभ्यतेच्या मर्यादा ओलांडते आहे, असं त्याला वाटू लागलं. ह्या समजुतीतूनच त्याची हिंसा सुरू झाली. ताराचे केस ओढणं, तोंड आवळणं, अपमान करणं हे सगळं तो ‘शिस्त लावण्यासाठी’ करतो, असं तो म्हणत असे. त्या वेळी सहनशक्तीपलीकडे गेलेल्या त्याच्या हिंसक वागणुकीकडे आता मागे वळून बघताना मात्र ती भावनिक होत नाही. त्या वेळच्या इतर कुटुंबीयांच्या आणि स्वतःच्या देखील ह्यासंदर्भातील मौनाचा तिला आता राग येत नाही. ह्या प्रसंगाचं अलिप्ततेने विश्लेषण करताना तिला ह्या मौनामागचा अर्थ लागतो. ती म्हणते, “I had begun to understand that to be in the family was to accept the logic of its leader, however absurd.” आणि इथेच तिच्या समजुतीचा धागा सापडतो. हे मौन केवळ भयातून जन्मलेलं नाही; तर आज्ञाधारकता ही जिथे प्रेमाचं मोजमाप करण्याचं मापक आहे, आणि विरोध करणं हे जिथे पाप मानलं जातं अशा परंपरेत ते रुजलेलं आहे. एखादी गोष्ट पटली नाही, ती चुकीचीच आहे, हे माहीत असून देखील त्याबाबत चर्चा करण्याऐवजी तिचे आई आणि वडील ‘असं काही घडलं नाही’ ह्या वाक्यात आश्रय शोधत होते. आज जेव्हा तारा ह्याचा विचार करते, तेव्हा ह्या नकाराचा अर्थ समाजात परंपरेने नाकारल्या गेलेल्या स्त्री-अनुभवाच्या सामाजिक व मानसिक संरचनेत आहे असं तिला वाटतं. आणि ह्या वेळी, आपल्या पालकांचं हिंसेबाबतचं ते मौन केवळ वैयक्तिक नसून, कौटुंबिक आणि सांस्कृतिक होतं, ह्याची तिला जाणीव होते. ती लिहिते, “All abuse, no matter what kind of abuse it is, is foremost an assault on the mind. You have to convince them that what you’re doing isn’t that bad, and that they deserve it.” ह्या एका वाक्यात तिने घरगुती हिंसेच्या मानसिक यंत्रणेचं आणि स्त्रीच्या स्व-नकाराचं तत्त्व उलगडलं आहे. तिला कळतं की तिच्या घरातील मौन हा अपघात नव्हता; ते स्त्रीचा आवाज, तिचा अनुभव, आणि तिचं सत्य ‘अतिरेक’, ‘अतिसंवेदनशीलता’ म्हणून झिडकारणाऱ्या समाजानेच पद्धतशीरपणे घडवलेलं होतं. ह्याच अलिप्त निरीक्षणातून तिची दृष्टी आता अधिक व्यापक आणि बौद्धिक बनते. ह्या टप्प्यावर तिचं हे ‘परतणं’ हे भावनिक न राहता समाजशास्त्रीय मूल्यमापनाची कृती बनतं. ती आता केवळ स्वतःच्या जखमा पाहत नाही, तर त्या जखमा कशा एका सामाजिक संरचनेतून तयार झाल्या हे समजून घेते. इथे तिचं आत्मचरित्र व्यक्तिगतेच्या पलीकडे जाऊन सामाजिकतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना दिसतं.
मानवी इतिहासाच्या गुंतागुंतीकडे तारा डोळसपणे पाहते. केंब्रिजमध्ये शिक्षण घेताना वांशिक नरसंहाराविषयी (होलोकास्टविषयी) ताराला पहिल्यांदा समजतं. होलोकास्टच्या कहाण्या वाचून ती हादरून जाते. ह्या अत्याचारांविषयी तिला कधीच काही ऐकायला मिळालं नव्हतं. इतक्या प्रचंड मानवी दुःखाचा पुसटसा साधा उल्लेखही तिच्या बालपणीच्या जगात नव्हता. एका विशिष्ट व्यवस्थेत घडलेल्या तिच्या बालपणात ‘देव’, ‘कुटुंब’ आणि ‘धर्म’ हे ज्ञानाचे एकमेव स्रोत मानले गेले होते. ह्या व्यवस्थेने एका जळजळीत वास्तवापासून तिला कोसो दूर ठेवले होते. किंबहुना, हे वास्तव कळू नये हीच ह्या व्यवस्थेची इच्छा असावी, असं ताराला वाटतं. कारण त्यामुळे लोक विचार करू लागतील, आणि लोकांनी विचार करणंच कदाचित ह्या व्यवस्थेसाठी धोकादायक होतं.
जेव्हा तारा केंब्रिजमध्ये इतिहासाच्या वर्गात होलोकास्टच्या वास्तवाला प्रथमच सामोरी गेली, तेव्हा तिच्या समजुतींच्या भिंती कोसळू लागल्या. आपल्या घरात तिला शिकवलं गेलेलं ‘सत्य’ हे जगाचं सत्य नसून, अज्ञानाने आणि भीतीने उभ्या केलेल्या भिंतींचं एक बंदिस्त विश्व आहे, हे तिला स्पष्ट होत जातं. इथे मानवी इतिहासाच्या गुंतागुंतीकडे तिची नजर वळू लागते. होलोकास्टसारख्या ऐतिहासिक अत्याचारांनी तिला दाखवून दिलं की सत्य, अन्याय आणि हिंसा ह्या गोष्टी फक्त एका कुटुंबापुरत्या किंवा व्यक्तीपुरत्या मर्यादित नसतात; त्या मोठ्या संरचनांमध्ये, परंपरांमध्ये आणि समाजव्यवस्थांमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.
ह्याच संदर्भात, ती आपल्या कुटुंबाबद्दलच्या भावनिक नात्याकडेही नव्या नजरेने पाहू लागते. तेव्हा ती लिहिते, “You can love someone and still choose to say goodbye to them. You can miss a person every day, and still be glad they are no longer in your life.” केंब्रिजमधील ह्या बौद्धिक जागृतीमुळे तिला हे उमजतं की कुटुंबावर कितीही प्रेम केलं तरी त्याच्या मर्यादित जगात कैद राहणं आवश्यक नाही. तिच्या विचारविश्वात पडलेली ती फट म्हणजेच नव्या प्रकाशाची पहाट ठरते, जिच्यातून ती स्वतःचा, समाजाचा आणि इतिहासाचा संबंध पुन्हा समजून घेऊ लागते.
त्या प्रकाशात तिला पहिल्यांदाच दिसतं, ते म्हणजे अंधश्रद्धांनी वेढलेलं तिचं बालपण. हे बालपण एका भयाच्या आणि नियंत्रणाच्या पायावर उभारलेलं होतं. तिथे स्वतंत्र विचार करणं निषिद्ध होतं. त्या चौकटीत व्यक्तीची भूमिका फक्त सेवा करण्याची आणि सहनशीलतेची होती.
होलोकास्टच्या घटनांचा अभ्यास करताना ती आता फक्त इतिहास शिकत नाही; ती स्वतःच्या विचारांच्या मर्यादा ओळखते. आजपर्यंत सत्य मानलेल्या गोष्टींकडे वास्तवदर्शी चष्म्यातून पाहणे आणि ज्याविषयी प्रश्न विचारू दिले नाहीत त्याविषयी प्रश्न विचारणं, हे तिचं ह्या संदर्भातलं ‘परतणं’ आहे.
विद्यापीठात गेल्यानंतर अनेक वर्षांनी तारा घरी परतते, तेव्हा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असतो. घर नावाची ओळखीची जागा आता तिला परकी वाटू लागते. ह्यादरम्यान तिचा वडिलांशी झालेला संवाद हा ह्या परिवर्तनाचा सूचक आहे. ती घरी येते, तेव्हा शिक्षण आणि परदेशात राहणं यामुळे ती ‘देवापासून दूर’ गेली आहे असं तिच्या वडिलांना वाटतं. ह्यामुळे ते तिच्यासाठी धार्मिक शुद्धीकरण विधी (a priestly blessing) करण्याचा आग्रह धरतात. त्यात वडील तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात आणि म्हणतात, “The Lord says you have chosen the wrong path.” वडिलांच्या डोळ्यांत अजूनही तिच्याकडे संशयाने बघणारी तीच पूर्वीची आढ्यताखोर अंधश्रद्धा असली, तरी ताराची नजर मात्र आता बदललेली आहे. त्यांचे धार्मिक मूलतत्त्ववादी विचार पटत नसूनही ती त्यांच्याशी वाद घालत नाही, तर त्यांविषयी कारणमीमांसा करते. त्यामुळे तिच्या द्वेषाची जागा आता शांत समजूतदारपणाने घेतली आहे. समजूतदारपणाबरोबरच ह्या विचारसरणीपासून दूर राहायला हवं हे शिक्षणाने आलेलं शहाणपण आणि ठाम निर्धारही आता तिच्यात आहे.
एज्युकेटेड वाचताना आपण ताराच्या आयुष्याबद्दल वाचत असलो, तरी त्या प्रवासात आपल्याला स्वतःच्या आठवणींचाही आरसा दिसतो. तिचं परतणं जितकं वैयक्तिक आहे, तितकंच प्रातिनिधिक आहे. आपल्या मूळ संस्कृतीशी, श्रद्धेशी आणि कुटुंबाशी पुनःसंवाद करणं हा स्थलांतर केलेल्या, शिक्षण घेतलेल्या, स्वतःचं विश्व शोधलेल्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही न विसरता येणारे अनुभव, मनात राहिलेली भीती, आणि काही फक्त स्वतःशी जपलेली गुपितं असतात. लेखिका तारा जसं आपल्या भूतकाळाशी संवाद साधते, तसं आपल्यापैकी प्रत्येकालाच कधीतरी स्वतःच्या भूतकाळाशी संवाद साधावासा वाटतो. हे परतणं म्हणजे भूतकाळात जगणं नाही, तर त्याचा अर्थ नव्या आणि प्रगल्भ जाणिवांनी समजून घेणं आहे. अशा तऱ्हेने, भूतकाळाकडे केवळ भावनिक अनुभव म्हणून न पाहता , त्याचा विश्लेषक आणि सजग दृष्टिकोनातून पुनर्विचार करणं आहे.
लेखिका तारा वेस्टओव्हर जेव्हा आपल्या भूतकाळाशी जेव्हा संवाद साधते, तेव्हा ती फक्त काय घडलं हे शोधत नाही, तर ते तसं का घडलं असावं, आणि आपण त्याचा काय अर्थ लावला, ह्याविषयी आत्मचिंतन करते. ह्या परतण्यात ती वाचकांनाही सहभागी करून घेते, त्यामुळे तिचं लेखन हे एकतर्फी न राहता अनुभव आणि प्रश्न ह्यांच्या संवादात रूपांतरित होतं. ज्याला आजपर्यंत आपण ‘सत्य’ मानत आलोय, ते खरंच आपल्या स्वतःच्या विचारांनी बनलं आहे, की ते कुणीतरी आपल्यासाठी आधीच ठरवलेलं होतं, ह्याचा विचार करायला हे आत्मचरित्र वाचकाला भाग पाडतं. आपल्याला शिक्षणासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाचं गौरवीकरण न करता, आपल्या जीवनाकडे त्रयस्थपणे पाहत स्वतःच्या जगण्याची केलेली प्रामाणिक मांडणी म्हणजे आत्मचरित्र होय. एज्युकेटेडमध्ये तारा वेस्टओव्हर नेमकं हेच करते, ती तिच्या ह्या प्रवासात स्वतःला नायिकेच्या भूमिकेत ठेवत नाही. ह्याउलट, ती स्वतःच्या भीती, संभ्रम, चुकीच्या समजुती ह्यांच्याकडे आणि कुटुंबासोबतच्या गुंतागुंतीच्या नात्यांकडे एक प्रामाणिक, अंतर ठेवून पाहणारी नजर घेऊन वावरते. तिचं कथन तिच्या ‘यशा’ची गौरवकथा नसून, तिच्या जाणिवेच्या प्रवासाची सत्यकथा आहे, ज्यात ती स्वतःलाही कठोर प्रश्न विचारते आणि आपल्या स्मृतींच्या तसंच विश्वासांच्या चौकटींचा तपास करते. त्यामुळे एज्युकेटेड हे प्रामाणिक आणि आत्मविश्लेषक लेखन ठरतं.
ताराचं हे वेगवेगळ्या प्रसंगांत वेगवेगळ्या अर्थाने ‘परतणं’ हे ह्या आठवणींना नव्याने जगणं आहे. शिक्षणाने ह्या प्रत्येक परतण्याला केवळ वैयक्तिक अनुभवापुरतं मर्यादित न ठेवता त्याला जाणिवेचं साधन बनवलं. तारासाठी शिक्षण हे स्वतःच्या जगाकडे तटस्थ आणि सजग नजरेने पाहण्याचं धैर्य देणारं माध्यम आहे. तिच्या ह्या प्रवासात शिक्षण केवळ ज्ञानग्रहणाची क्रिया राहत नाही, तर ती स्व-जाणिवेची प्रकिया होते. त्यामुळे ‘परतणं’ तिच्यासाठी भूतकाळात अडकणं नव्हे, तर त्या भूतकाळाचं विश्लेषण आहे. तिचं हे ‘परतणं’ केवळ स्मृतींचं नाही, तर आलेल्या अनुभवांचं निरीक्षणात रूपांतर करणं आहे, आणि त्यातून आलेल्या जाणिवेतून त्या अनुभवांचं पुनर्लेखन करणं आहे.
लेखिकेच्या भाषेत सांगायचं तर,
“There are two kinds of memory: the one you live with and the one you write about. Writing is my way of returning.”
या विधानात ‘परतणं’ ह्या संकल्पनेचा व्यापक अर्थ दडलेला आहे. कारण इथे लेखन हे केवळ कथाकथन नाही, तर स्मृतीला अर्थ देण्याची क्रिया आहे. तारा वेस्टओव्हरसाठी लिहिणं म्हणजे स्वतःला पुन्हा ओळखण्याची प्रक्रिया आहे; आणि वाचकासाठी, तिच्या ह्या लेखनाचं वाचन म्हणजे स्वतःच्या विस्मृतीत गेलेल्या आवाजांना ऐकण्याची संधी आहे.
एज्युकेटेड हे म्हणून केवळ एका जिद्दी स्त्रीच्या आयुष्याची कहाणी नाही; तर ती शिक्षण, समज आणि स्वातंत्र्य ह्यांच्या परस्परसंबंधांचा शोध आहे. आपण जिथून सुरुवात केली, तिथेच नव्या जाणिवेने, अधिक सजगतेने पुन्हा परत यावं, हेच शिक्षणाचं अंतिम सत्य ह्यात उद्घोषित केलेलं आहे. आणि हाच ह्या पुस्तकाचा गाभा आहे.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
