१.
मी नाही आलोय जन्माला
साठ किंवा सत्तरच्या दशकात.
बायनरी ची कल्पना जेव्हा
कम्प्युटरने माणसाकडून हिरावली त्यानंतर
आणि अर्थव्यवस्था खुली झाली त्या आधी
कधीतरी ठरवलं असणार माझ्या आई बाबांनी
चान्स घ्यायचा हे.
माझा आणि धार्मिक कट्टरतेचा पुनर्जन्म
एकाच सालातला.
व्यामिश्र असणं हेही जेव्हा
सार्वत्रिक आणि सुलभ ठरत होतं
तेव्हा कुठे मी तरुण होत होतो.
विद्रोहाच्या
विद्रोहाशी
विद्रोह
आणि
समर्थनाच्या
समर्थनाचं
समर्थन
अशी द्राविडी अभिव्यक्तीच
लक्षण आणि लक्ष्य आहे माझं.
माझा पेनफुल आशय
कुठल्याश्या आधुनिक जाणीवेचंच
डेरीव्हेटीव्ह आहे म्हणतात.
आता कुठे गेलो किंवा
नाही गेलो तरी
कातडी सारखे
मला घेऊन फिरावे लागतात
हे संदर्भ.
मी स्वतःच स्वतःचा एकांडा संदर्भ असण्याची
मला सवय झालीय.
२.
सल्ला वजा कविता.
पुढे मागे हलवून पन्नास वेळा
उधळून दे
आतमध्ये चोंदलेल्या बांधीलक्या
कोळून पी ऊन एकाकी
दारू-बिरु कला-बिला
पोरगी-बिरगी अशीच असते
असं ठामपणे न गोठवता
भिरकावून दे त्यांना
असण्या-होण्यामधल्या गोंधळात.
वाटलं तर मार बोंबला
फेसबुक वर
भांडवलशाहीच्या नावे.
परदेशी सिरियल पाहून
लावून घे थोडे समकालाचे घोडे स्वतःला.
ढुंगण टेकवून मोपेड वर
फिर शहर रिगार्डलेस
वाईल्ड लाईफ कॅम्पवाल्यांना पैसे देऊन
पाहून ये खऱ्यापेक्षा खोटं जंगल
लाईकसाठी लिही कविता
माईकसाठी म्हण गाणं
बाईकसाठी हो कलंदर
विकेंद्रित डिस्कोर्स च्या (नसलेल्या)मध्यात
येण्याचा कर आटापिटा.
आयरनी असणारच आहे
कुठेही पाचवीला पूजलेली
तिची धास्ती घेऊ नकोस.
इमारतींना लटकवलेलं
स्काय ब्ल्यू आकाश
निसटू शकतं कधीही
नजरेच्या साच्यामधून
तेव्हा वर बघून टोटल लावण्याची
चूक मात्र करू नकोस.
४.
डेरेदार लोकशाहीच्या अंगाखांद्यावर
आपण अपात्र नागरिक
असतो फळं चाखत,
आरडा-ओरडत
हागत, मुतत, झवत एकमेकांस.
बसल्या बसल्या झोपेत
समतेचे भास करवून घेत
काही आधुनिक शब्द
इग्नोरंट भिरकावत.
अंथरतो आपण स्वतःच रेडकार्पेट
अपकमिंग अविवेकासाठी.
आपल्या अकलांवर पाय देऊन जातो
तलवार घेतलेला कलियुगातील
कृष्णदेवाचा अवतार.
आवाज येतो टाळ्या शिट्टयांचा
विचारधारा तुटताना.
तथाकथित समकालीन गीता
आपण असतो कंझ्युम करत लाइव्ह.
तेव्हाच होते आपले
पेंडिंग असलेले ब्रेकअप
आणि आपल्याला वाटते
बदलत्या व्यवस्थेने आपल्यासमोर
आपले प्रेम गिळून खाल्ले.
४.
सगळी झवझव चालूए स्वतःसाठी
असंही नाही म्हणवत.
संवाद होतात का स्थगित ?
रोज पहायची स्वप्नं रचायची
अन बळजबरी कोरून काढायचे
गर्भितार्थ.
कशातून येत नाही काहीच.
असण्यात अंतर्भूत आहेतच प्रयत्न.
असंही म्हणता येईल की
प्रयत्न उजवीकडे असतात
डाव्या बाजूस असणे ठेवले तर.
जे काही केले,
करायचेही आहे जे, ते
प्रयत्नच सरसकट.
इतिहास, विज्ञान,
भाषा, तत्वज्ञान
प्रयत्न यासकट.
फक्त ज्याचे त्याचे मिळू दे कुदळ
ज्याला त्याला
कर प्रार्थना वाहत्या काळाला.
अथवा हो कैद
सीसीटिव्हीत,
वर्ण-वर्ग भेदात,
आणखी कशाकशात.
आणि दे आव्हान
ज्याने दिले आव्हान
जगण्याचे – त्यालाच.
गोष्ट मात्र अर्धी टाकू नको.
काही व्हायचे नसेल
तरी निघतो घाम.
मांडणी कर प्रयत्नांची
उम्रभर.
किंवा असं कर
झोपल्याचं सोंग वठवत
इथेच मर.
बघ.
निवड कर.
तीच तुझी शिक्षा आहे.
५.
एंटायर आकाश
ओठात.
मिस्टिक प्रेम
पोटात.
कॉस्मिक चैतन्य
बोटात.
इन्स्टाळलेलं संदिग्ध नातं
हॅशटॅग टाकून
जागतिक ठोस करू
लागलो.
सीसीटीव्ही मधून
स्वतःच स्वतःला
देखरेखत अन चॅलेंजत
राहिलो.
स्वतःलाही येऊ नये ओळखता
असा मेकओव्हर करून
जर्मन बेकरीत गेलो, तर
तिथे काही हिंदू लोक
मुद्दाम पाश्चात्य वागत होते,
मी ही अगदी हुबेहूब
त्यांच्यामधला झालो.
तरीसुद्धा मला ओळखून
दहशतवादी समोर आला
फेस्बुकी निळ्या रंगाची
बंदूक रोखून ओरडला –
कविता कर
नाहीतर गोळी घालीन.
जीव वाचावा म्हणून
कविता केली.
६.
टाईप केलेली अक्षरं
डॉक्युमेंट मध्ये, स्पेस सोडून
बोटापासून विलग होऊन
फॉसील सारखी फिक्स होतात
आपल्यातली असूनही ती नाही
ओळख दाखवत आपल्याला.
तू ही तशीच नकळत
जैविक सब्लाइम मिठीतून
घरंगळून मेसेंजर च्या डब्यात
जाऊन करू लागतेस
कुठलेसे अमानवी
अनावश्यक चौकोनी संवाद
फिक्स होतं तुझं एक
अनोळखी व्हर्जन तिथे
कायमस्वरूपी..
याच सेव्ह्ड आभासाबरोबर
कमिटेड राहण्याचं प्रॉमिस मी
ऑलरेडी केलेलं असत
फेसबुकच्या रिलेशन कॉलम मध्ये.
७.
आपलीच जीभ
आपल्या दातांखाली यावी
आपण आपल्यालाच hack करावं
आपल्याला कळू नयेत
आपणच जगलेले अपभ्रंश,
एकमेकांना निर्णयासाठी दिलेला
काळ, तुकडे तुकडे होऊन
आपल्याच डोळ्यात जावा आणि
बोचत राहावे त्याचे कण अन क्षण
स्वप्न बघतानाही.
“मला माझी स्पेस दे” चा
कांगावा करावा
एकमेकांना भोगताना.
तिच्या श्वासांनी जड झालेल्या
नाकामधल्या
चंदेरी खड्याचे
ओरखडे उमटावेत
आपल्या गळ्यावर
आणि आपला आवाज फुटू नये,
इतके लॉक करून घ्यावे
स्वतःला स्वतःच्याच मोकळीकीत.
८.
काळ आणि अवकाश
हेच आपले खरे पालक.
आपण त्यांचीच अपत्य आहोत.
काळ असते –
आपली आई.
अवकाश आपला
अन आपल्यापेक्षा
बाप असतो.
आपली सौम्य
मोकळीक असतो तो.
हे दोघं जन्म देतात
आपल्याला नको असलेला
म्हणून आपण त्यांचा सूड घेतो
असा.
९.
एक ऑड मॅन आउट बंदा
असा आहे या शहरात
ज्याचं आहे वाकडं बेकार
समकालीनतेशी.
जो जगतो सगळ्यानंतर.
स्वप्न पाहतो नंतर आणि
ज्याला जाग येते नंतर.
जो मुळात आलाय जन्माला
स्वातंत्र्याच्या नंतर.
जो राहतो ज्या बिल्डींग मध्ये
ती आहे अनेक बिल्डिंग्ज नंतर.
त्याची गाडी पार्क होते
रस्त्यात बऱ्याच गाड्यांनंतर.
हॉटेल मध्ये त्याची ऑर्डर
येते बऱ्याच वेळानंतर.
पाऊस येतो ज्याच्या शहरी
जुलैच्याही नंतर.
त्याचे विचार सापडतात
खूप खाली स्क्रोल केल्यानंतर.
पैसे वगैरे मिळू लागतात
त्याला आपल्या मित्रांच्याही नंतर.
विचारवंत वाचतो तो
ते विकृत झाल्यानंतर.
उठत नाही त्याचा हल्ली
मुलगी समोर आल्यानंतर.
या मागे पडण्यामागे त्याच्या
आहे भेंचोत
एक वैश्विक सिस्टिमिक कारस्थान.
असा एक ऑड –
अनकॉमन इंडीव्हिजुअल,
ज्याचे उच्छादी अर्बन दिवस
अडकून पडत राहतात
त्याच्याच आळशी पायात,
पोस्टपोन होतात काही
ज्याच्या लाईफ मधले
डिफायनिंग मोमेंट्स,
ज्याच्या वेदनामय हाकांचे
एको विरून जातात
नंतरपणाच्या पोकळीत
तुम्हाला सांगतो –
एक दिवस इतका बिथरून जाईल
जेव्हा त्याला बातमी लागेल
कि खरीखुरी समकालीनता
जिचे अॅनॉनिमस इमेल्स आणि
प्रँक कॉल्स यायचे त्याला, किंवा जी फेक अकाउंट वरून
त्याच्याशी करायची सेक्स चॅट –
कचरावाल्या बाईच्या वेशात
पोचलीय आज त्याच्या शेजारच्या घरात.
आणि आपलंही दार वाजवेल ती
अशी भीती त्याला संपवत असतानाच
ती कडी वाजवेल बाहेरून आणि देईल आवाज.
फार फार तर तिला पळवायला
तो घामेजलेल्या अवस्थेत
आतून रीस्पोंस देईल –
आज नाहीय. उद्या या.
पण उद्या त्याला राहावंच लागेल तयार
सगळ्यांच्या आधी –
बाहेर पडण्यास
घरातून
किंवा
कचरावालीशी दोन हात करण्यास
मनातून.
१०.
आपण sort out करू हे.
तुझा टोन मला
आणि माझा झोन तुला
समजत का नाहीय ?
काय भानगड आहे ही
मल्टीप्लीसीटीची ?
एकाचे चार, चाराचे सोळा, सोळाचे एकशेअठ्ठावीस,
त्याचे पुढे पाचशे चोवीस तुकडे का होतायत ?
इतकी वर्ष शेजारी राहून सुद्धा
का मध्येच फेड होतीय मेमरी ?
कसला काळपट पडदा दिसतोय डोळ्यासमोर.
जवळ ये बरं.
बघूदे मला कुठेय fault.
घाबरू नको. जवळ ये.
आपण sort out करू हे.
११.
चिरंतन किक आणि बोलता न येण्यासाठी
दिवस भरत जाणं पानासारखे खिशात.
एक संपल्यावर दुसरा लावणं
रात्री थुंकून येणं चोथा कोपऱ्यावर.
उद्या पुन्हा लावून ठेवणं गालात दिवस.
म्युझिक लावून ठेवतो कानात तसा.
आजचा दिवस बुंगाट काही देणंघेणं नसल्यासारखा कालच्याशी.
उद्या उजाडणार आहे ध्यानात नाही.
काळाला शिव्या घालणं त्याचा रोष ओढवून घेणं
कंटिन्यूटी नसणं म्हणजे कर्ता नसणं
नुसत्या घटना एकामागोमाग न्यूज फीड
जाणीव-बिणीव टोकावर. नेणीव एकदम फुल ऑन.
दडपलेल्या स्वप्नांची एक समांतर कविता चालू नकळत
म्हणून कवितेची कमी नाही.
स्वतःची सडाफटिंग जाहिरात आतून गोंधळलेलं
फिरणं गल्ली-बोळातून पानं खात हनवटी वर ठेवून माजात.
चिल मारायला येण्यासाठी प्रार्थना करणं
आपल्यासारख्या दुसऱ्याला
थुंकून टाकणं दिवसाबाहेर सगळं आशयद्रव्य.
सर्जन वगैरे डोक्यावर घेणं इतकं
कि फळापासून मोबाइल आणि फुलापासून टीव्ही बनवणं.
वर्ज्य मानणं जसं आहे तसं पाहणं.
हात फिरवून-गोंजारून फुगवणं एकमेकांना
वाढवणं बेंडं एकमेकांची संध्याकाळची एसी फुंकर घालून.
आपली सुजलेली बेंडंच
जोरजोरात बडवणं ढोल म्हणून.
पथकं काढणं शहरभर स्पर्धा घेणं
घुमवणं पॅटर्न वेगवेगळे बटबटीतपणाचे.
बाकी जग ब्लर, फक्त स्वतःला
फोकस मध्ये आणि कलर्ड ठेवणाऱ्यांना
अंतर्मुखतेची अॅलर्जी असणं.
हे सगळे सिम्पटम्स् आहेत
कशाचे ते माहित नाही.
जबरदस्त कविता आहेत. ऐंशी नव्वदच्या दशकातील राजकीय, सामाजिक, तंत्रविज्ञान, महितीतंत्रज्ञान स्फोट आणि सांस्कृतिक कोलाहलात जन्माला आलेल्यांना याच अनुभवातून जावं लागलं आहे.