मौन : शांतता, स्तब्धता किंवा अबोला; अफाट असतं मौन आणि गुंतागुंतीचंही. मौनाला समजून घेणं किंवा त्याचं आकलन करून घेणं सहज शक्य नसतं. तरीही, जो-तो आपल्या परीने मौनाबद्दल काहीतरी म्हणत असतो. मौनाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. निर्मितीचा एखादा क्षण, निरिच्छा, अलिप्तता, शरणागती किंवा संवादाची कमतरता यांतून मौन-निर्मिती होते. मनुष्यमात्र नेहमीच्या बोलायच्या, दाखवायच्या किंवा लिहायच्या भाषेत व्यक्त होऊ शकत नाहीत, तेव्हा ते मौनाचा आधार घेतात. काहीजण विश्रांती म्हणूनही मौनात जातात. काहींसाठी मौन कधी स्वेच्छेने आलेलं असू शकतं, तर कधी ते लादलेलं असतं. नात्यांमध्ये कडवटपणा आला असेल, तर शांतता पाळून, आपल्यात होणारे बदल निरखण्याचा मार्ग शहाणी माणसं पत्करतात. आंतरिक ऊर्जेने एखादा शोध घेण्यासाठी निघालेल्या भाविकाच्या प्रवासातला एक प्रगल्भ टप्पा मौनातून साधता येतो.
मौन पाहिजे असतं आणि नकोही, अस्वस्थ करतं आणि उद्दीपितही. मौन बाळगणं आणि न बाळगणं या दोहोंमध्ये आपण असतो : कधी इकडे, कधी तिकडे, तर कधी अधेमधे. मौन आतलं असतं, तसंच बाहेरचंही. आत आणि सभोवती गोंगाट सुरू असताना मौनाविषयी आपण काहीतरी म्हणू इच्छितो, हे विशेष. अस्वस्थता घेरून असते तेव्हा स्वस्थतेविषयी आपण बोलतो, असं काहीसं मौनाबद्दल होतं. भोवतालच्या विशाल प्रक्रियांच्या जंजाळात जीवसृष्टीची स्थिती, गती आणि लय बदलत असताना किती नाना तऱ्हेचे आवाज सुरू असतात. वस्तुनिष्ठ आणि तर्कनिष्ठ अशा कितीतरी फूटपट्ट्या लावल्या, तरी हे आवाज संपत नाहीत. मानवी शरीरात अव्याहत अशी सुरू राहणारी पेशीनिर्मिती-प्रक्रिया, विघटन, आणि पुनर्निर्मिती — ठराविक कार्य करत राहणारे पेशींचे समूह अव्याहत हलत, वागत असतात, आणि अवयवांची प्रचंड अशी व्यवस्था ते राबवत असतात. शरीररचनेचा आणि कार्यांचा अभ्यास तज्ज्ञ करत असतातच; पण वरवर जरी पाहिले तरी आपल्या ध्यानात येतं, की हे खरं आता — त्या तिथे — कुणी चुप्प बसलेलं नसतं. तसे ते नसतात म्हणून आपण असतो, काहीतरी ‘करत’ असतो. काही करत नसलो तरी मौनाचा तरी विचार करत असतो. अख्खी जीवसृष्टी काहीतरी म्हणत असते, हलत, बोलत असते; तरी आपण सारे मौनाबद्दल विचार करत असतो. म्हणजे, मौन, आणि मौनाबद्दल आपण काहीतरी ‘म्हणतो’, हा म्हणजे एक प्रकारचा अंतर्विरोध. अशा अंतर्विरोधाला बरोबरीस घेऊन हाकारा | hākārā-च्या एकविसाव्या अंकाचा दुसरा भाग मौनाबद्दलचे लेख आणि कलाकृती मांडतो.
मौनाविषयीच्या हाकारा | hākārā-च्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या भाषांत, रूपांत व्यक्त होणारे लेखक, कलाकार आणि अभ्यासक किती नानाविध तऱ्हांनी, खोलवर संवाद साधू शकतात याची जाणीव झाली. मोठ्या प्रमाणात साहित्य आणि कलाकृती प्राप्त झाल्याने आम्हाला दोन भागांत ‘मौन’ या विषयाची मांडणी करावी लागली, हे विशेष. मौनाला समोर ठेवून चपखल प्रतिमांची आणि विचारास चालना देणाऱ्या प्रतीकांची योजना केली जाऊ शकते याचं भान दोन्ही अंकांत प्रकाशित साहित्य आणि कलाकृती देतात. आन्द्री गिदे हा लेखक आपल्या जर्नलमध्ये लिहिताना म्हणतो, “मी गप्प बसायला शिकायला हवं.” इथे, गप्प बसायला शिकणं म्हणजे स्वतःला निरखणं. या अंकात प्रकाशित लेखक आणि कलाकार मौनावर भाष्य करताना निरखण्यासाठी अवकाश उभा करताना दिसतात. सभोवताल काय आहे, आपण कोण आहोत, आपण या विश्वात काय करत आहोत, आपलं स्थान काय, असे व इतर प्रश्न विचारणं आणि त्यांची उत्तरं शोधणं यासाठी त्यांनी केलेली मांडणी आम्हांला महत्त्वाची वाटते. इथे दिसून येतं, की कलाकाराने रचनारूपात घेतलेला अल्पसा विराम किंवा पाडलेले खंड अभिव्यक्तीच्या रूपांना वेगवेगळे आयाम देतात. विराम आणि खंड जसे बदलतील, तसं रचनासूत्र आणि अर्थनिर्णयनही बदलत जातं. किंचितशी विश्रांती घेत शब्दाची, वाक्याची किंवा ध्वनीची निर्मिती करताना स्वतःकडे आणि भवतालाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळू शकते, याची जाणीव नवनिर्मिती-प्रक्रियेत होत असते. दोन शब्दांतील किंवा दोन सुरांतील रिकाम्या जागांतून सर्जनशील कलावंत काव्यरूप घडवत जातो. या घडण्यातून मौनाची एक गोष्ट बनते. हाकारा | hākārā-मध्ये मौनाच्या वेगवेगळ्या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
हाकारा | hākārā-च्या २१व्या अंकाच्या दोन भागांत प्रकाशित झालेले कौस्तव चॅटर्जी आणि पंक्ती देसाई यांचे अनुक्रमे, वाराणसीतील वस्त्रनिर्मिती, आणि गुजराती दलित चळवळीत सक्रिय असलेले ‘आक्रोश’ हे लघुनियतकालिक यांबद्दलचे लेख वाचताना असं जाणवतं, की ‘मौन’ म्हणजेच सर्व काही नव्हे. मौनापलीकडच्या आवाजाचंही आपलं जग आहे. मग वाटतं, की मौनाचं फारच कौतुक करतात लोक. मौनात कसं काय सामर्थ्य असतं किंवा मौनाची भाषा कशी सुंदर असते इत्यादी-इत्यादी म्हणणाऱ्यांचं रोमँटिक, हळवं, स्व-केंद्रित जग समोर येतं. मौन बाळगता येणं हाही एक प्रकारचा विशेषाधिकार काहीजणांना मिळत असतो, किंवा काहीजण तो घेत असतात. काहीजणांसाठी हे शक्य असतं. पण मग उत्स्फूर्तपणे व्यक्त व्हायचं असेल तर ? एखादी छान मैफल सुरू असताना किंवा एखादं चित्रप्रदर्शन पाहताना आपण सहज ‘वाह’ म्हणण्याचं स्वातंत्र्यही मौन बाळगण्याच्या दबावाखाली गमावत असतो. त्याच बरोबरीने, ज्यांचं जगणंच नाकारलं जातं, त्यांनी किंवा त्यांच्यासाठीही ‘मौनव्रत’ बाळगणं शोषणाचं एक रूप ठरू शकतं. यातून सत्ताकारणात फायदे मिळतील किंवा राजकीय दृष्ट्या लाभ होईल; पण एखाद्या वास्तवाची, सत्याची एखादी बाजू यातून अंधारून टाकली जात असते. अनाठायी ‘मौनव्रत’ घेण्यातून आपण विशिष्ट अभिव्यक्ती, विशिष्ट व्यक्ती, किंवा संपूर्ण समाज, आणि त्यांचे विचार नाकारत असतो. अशा वेळी साखरेच्या पाकात घोळवून मौनाला गोडगोजिरं रूप देण्यातून विश्वातील गुंतागुंतीला आपण नजरअंदाज करत असतो. म्हणून कधीकधी नको ते मौन, डावपेचात्मक मौन, असं वाटून सुजाण माणूस आणि विचारी समाज अस्वस्थ होत असतो.
मौन आणि आवाज एकमेकांच्या संबंधात पाहायला हवेत. दोहोंचे आंतरिक संबंध असतात, आणि एकाशिवाय दुसऱ्याचं अस्तित्व असणं कठीण असतं. आंतरिक शांतीबाबत बोलता-बोलता किंवा ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करताना व्यापक अशा सामाजिक आणि राजकीय अवकाशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याचं भान मौनीबाबांना असणं गरजेचं ठरतं. तसंच, अशा मौनीबाबांना वेगवेगळे आवाज ऐकवत जागं ठेवण्याची सतर्कता अवतीभवती असायला हवी, हेही महत्त्वाचं बनतं. जगातील तमाम प्राणिमात्रांना मौन बाळगण्याचे विशेषाधिकार असतील असं नाही. किंबहुना, मौनकेंद्रित अभिव्यक्तीचं आणि त्यातील सौंदर्यतत्त्वांचं गौरवीकरण करण्यापेक्षा, विश्वातील गुंतागुंत समजून घेऊन, मौन आणि आवाज एकाच वेळी असू शकतात, याबद्दलचं भान असलं पाहिजे. निर्मितिप्रक्रिया आणि अभिव्यक्तीचं रूप अशा गुंत्यांसोबत आकारत असतं. मौनाबद्दलचं सिद्धांतन सर्वसाधारणीकरणातून न होता कालावकाशाच्या संदर्भात व्हायला हवं, अशी इच्छा बाळगून मौनाला मांडण्याचा प्रयत्न आम्ही या वर्षीच्या हाकारा | hākārā-मध्ये केला आहे.
सरत्या वर्षात संपूर्ण ताकदीनिशी आम्ही हाकारा | hākārā प्रकाशित करू शकलो नाही. याचं एक कारण व्यक्तिगत आहे, आणि दुसरं कारण आहे, हाकारा | hākārā-च्या नव्या संकेतस्थळाचं काम. या वर्षातला आमच्यापैकी काहीजणांचा बराच काळ आजारपणात गेला. तसंच, आयुष्यातली प्रिय, जवळची व्यक्ती गमावण्याने आयुष्य ढवळून निघण्याचा अनुभव आम्ही घेतला. अशा काळात पाय रोवून उभं राहण्याचं बळ कथनं देतात, असं मला वाटतं. मग, ही कथनं गोष्टींची असतील, शब्दांची, किंवा दृश्यांची. हाकारा | hākārā हे असंच एक कथन, जे मला बळ देत आलं आहे. मौनाविषयीचा हा अंक म्हणजे नव्याने उभं राहण्याची खूण.
सात वर्षांपूर्वी सुरू झालेला हाकारा | hākārā या कथनाचा प्रवास आता अधिक समृद्ध होतोय तो जुन्या-नव्या सहकाऱ्यांच्या सोबतीने नवीन संकेतस्थळाच्या रूपात. वेगवेगळ्या चढउतारांत आपल्या सर्व क्षमतांनिशी हाकारा | hākārā-ची दीर्घकाळ सोबत करणाऱ्या पूर्वी राजपुरिया, मयूर सलगर, आणि इतर सहकाऱ्यांबरोबर हाकारा | hākārā-चं नवं रूप आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. या नवीन संकेतस्थळाची संकल्पना, रेखाटन, मांडणी-कल्पना मितवा अभय वंदनाने मांडली, आणि त्याचं दृश्यरूप उभं करण्याची योजना त्याच्या व सौरभ गावंडेंच्या संकेतस्थळ-विकास-सहकार्यातून मूर्त रूपात आपल्यासमोर येत आहे.
नव्या कल्पनांसह आणि मांडणीसह आपण नव्या वर्षात परत भेटू.
छायाचित्र : प्रसांता घोष