संध्याकाळची वेळ होती. आभाळ चांगलंच भरून आलं होतं. ‘जोरदार पाऊस येणार! मस्त! हा तास संपला की लग्गेच स्टेशन गाठायचं, सहा नऊची ट्रेन पकडायची आणि थेट मरीन ड्राईव्हवर भेटायचं पावसाला..’ असा विचार करत मी वर्गात प्रवेश केला.
“एक साथ नमस्ते!”
मला नेहमीप्रमाणे आश्चर्य वाटलं, “कसं बरं कळतं तुम्हा सगळ्यांना मी आल्याचं?”
“आम्ही फुल्टू स्मार्ट आहोत सर!” “कळतं हो सर, कळतं,” वर्गभर उत्तरं फुटू लागली – “तुमचा चालायचा आवाज येतो की!”, “फार भरभर चालता तुम्ही”, “सर, तुमच्या डिओचा वास!”, “सर, ह्या मोनिकाला ना थोडं थोडं दिसतं”, “सिक्स्थ सेन्स सर, सुपर पावर!”
“वाह वाह वाह! काय झालाय हा वर्ग!” वर्गातला गलका वाढला तसा धाकडेबाईंनी आवाज चढवला, “परागसर, तुम्ही येण्याआधी एक शब्द बोलायला तयार नव्हतं कुणी! आणि आता पहा! काय काय सुचतंय… एक सुपर रट्टा द्यायला हवा त्या बागेश्रीला. सुपर पावर म्हणे! प्राथमिक वर्गातल्या शिक्षकांनी अचूक सराव करून घेतलाय; आवाजाचा, स्पर्शाचा, चवीचा… म्हणून जमतंय सगळं, हो ना?”
सगळ्याजणी एकदम गप्प झाल्या. मला नेहमीसारखं थोडं अस्वस्थ वाटलं. “का? काय बरं चाललं होतं मी येण्याआधी?” मी विषय बदलायचा प्रयत्न केला. “अहो, शुक्रवारी गृहपाठात निबंध लिहायला दिला नव्हता का, माझ्या आठवणीतील पाऊस, काल तपासायला घेतला तर काय सगळे चाळीसच्या चाळीस निबंध डिट्टो सारखे! ‘रिमझिम रिमझिम पाऊसधारा’ पासून सुरुवात आणि ‘अशी ही रम्य पावसाची आठवण कायम माझ्या मनात घर करून राहील.’ असा शेवट. तुम्हीच पहा.” म्हणत त्यांनी ब्रेलकागदांची थप्पी माझ्या दिशेने भिरकावली. “ते काही नाही – आत्ताच्या आत्ता लिहायचा सगळ्यांनी निबंध. सातवीत आला आहात – स्वतःचं स्वतः भाषेतून व्यक्त होणं जमलंच पाहिजे. काढा बाहेर टाईपरायटर्स आणि सुरू करा – चला. आजचा तास फक्त निबंधाचा.” बाईंचा हुकूम ऐकून सर्वांनी डेस्कातून आपापले टाईपरायटर्स काढले, पण लिहायला सुरूवात मात्र कुणीच करेना.
“बरं” म्हणत मी जरा मदत करायचं ठरवलं. “आधी आपण पावसाबद्दल बोलायचं का थोडं? मग लिहिणं सोप्पं जाईल – पाऊस म्हटलं की काय काय बरं आठवतं? सुसाट वारा? ढगांचा आवाज? मातीचा वास?आत्ता येतोय तसा?”
दूर कुठेतरी पाऊस पडायला सुरुवात झाली होती वाटतं; इथे खिडकीत मात्र अजूनही नुसतेच ढग आणि वर्गात चिडीचूप शांतता. धाकडेबाईपण हाताची घडी घालून शांत बसलेल्या. मीच पुन्हा बोलायला सुरुवात केली, “मला काय आठवतं माहीतेय? मुंबईहून नाशिकला जातानाचा भुरभुर पावसातला घाटातला प्रवास! हिरवे हिरवे डोंगर, हवेतला गारवा, छोटेमोठे धबधबे, त्यांचा आवाज, गाडीच्या खिडकीवर आपटणारे थेंब, त्यांचा होणारा आवाज, असं तुम्हाला काय काय आठवतं बरं पाऊस म्हटलं की? कोण सांगेल?”
“सर, मला ना पावसातल्या गारा आठवतात,” फरीदा म्हणाली.
“वॉव! कुठे खायला मिळाल्या बरं तुला गारा?”
“आम्ही मागच्या वर्षी मामांकडे अलिबागला गेलेलो तिकडे” ती पुढे सांगू लागली, “धो धो पाऊस चालू होता आणि एकदम तडतडतड आवाज यायला पत्र्यावर, मला आधी भीतीच वाटली. पण मग मामीनं सांगितलं गारा पडतायत म्हणून. माझ्या भावानी माझ्यासाठी एक गार आणून दिली. एकदम थंड, बर्फच एकदम. मस्त होती.”
“चवीला कशी ग लागते गार?” बागेश्रीला कुतूहल वाटलं.
“अं, बर्फासारखीच असते बघ, थंड. थोडी मातीसारखीपण असते”
“छानच की फरीदा! या आठवणीबद्दल का नाही लिहिलंस बरं? अजून कोणाकोणाला काय काय आठवतं? कोण सांगणार?” मी वर्गाला अजून बोलतं करायचं ठरवलं.
“पाऊस म्हणलं की मला चिख्खल आठवतो. काठी घसरते चिखलावर. चालताच येत नाही. मला नाई आवडत चिख्खल आणि म्हणून पाऊस पण नाही आवडत,” रसिका म्हणाली.
“मलासुद्धा पाऊस आवडत नाही, सर. पावसात कपडे भिजले की ओलेच राहतात. मग फार कुबट वास येतो घरात. मला तो वास आवडत नाही.” बागेश्रीनं सांगितलं.
“सर, मला २६ जुलैचा पाऊस आठवतो, सर, रस्त्यावरचं पाणी अगदी आमच्या घरापर्यंत आलं होतं आणि शाळेला दोन दिवस सुट्टी मिळाली होती!” मोनिका म्हणाली.
“बाई बाई बाई, तो २६ जुलैचा पाऊस म्हणजे अगदीच कहर होता हो!” वर्ग आता बोलू लागलाय पाहून धाकडेबाई त्यांची आठवण सांगू लागल्या, “मी अंबरनाथच्या केंद्रात कामाला गेले होते. तेव्हा तुमच्यासारखे डोळस सहायक शिक्षक वगैरे काही प्रकार नव्हता हं परागसर! कल्पना करा, केंद्रावर फक्त आम्ही पाच आंधळे! गणपतीतल्या स्टॉलसाठी पतंगी कागदाच्या फुलांची तोरणं करायला घेतलेली. दुपारची वेळ. आणि पावसाची लक्षणं. हा आत्ता येतोय असाच सोसाट्याच्या वारा, फुलं उडून जायला लागली म्हणून दारंखिडक्या बंद केल्यान आम्ही. अर्धा-एक तास झाला असेल, गाणी म्हणत, गप्पा मारत पुरेशी फुलं बनवून झाली; तोरणं गुंफायला लागलो तेव्हा अचानक पायाला पाणी जाणवायलं आणि वाढतच चाललं की! घोटाभर, पोटरीभर! त्यात चिखल, पिशव्या आणि काय काय कचरा! त्या केंद्राच्या शेजारीरून आंबीलओढा वाहतो, त्याचं हे पाणी थेट केंद्रात!”
“बाप रे… केवढी भीती वाटली असेल!” रसिका म्हणाली.
“भीती म्हणजे काय? वर ढगविजांचा आवाज होतोय, खालून पाणी वाढतंय, दारं खिडक्या बंद. फोन बंद. सगळेजण जाम घाबरलो. पूर आमच्यातल्या कोणीपण अनुभवला नव्हता आधी. बराच आरडाओरडा केला पण ऐकायला कोणाला जाणारे?! दिसणं तर नाहीच! आम्ही टेबलवर टेबल चढवून त्यावर जाऊन बसलो. पाचही जण. जितकी फुलं-तोरणं गोळा करता आली तितकी सोबत वर घेतली. खायला काही नाही, पाणी इतकं आजूबाजूला पण प्यायला म्हणून एक थेंब नाही! आता आपण काही जगत नाही असंच वाटलं पहा, हीच आपली जलसमाधी!”
“बाप रे! बाई, मग काय केलंत तुम्ही?” फरीदानं विचारलं.
“कुठलं पुण्य की कुणाची कृपाच म्हणावी बघ” बाई पुढे सांगू लागल्या, “कसं काय माहीत, पण बाजूच्या इमारतीतल्या डोळस लोकांना आम्ही आत असल्याचं आठवलं आणि त्यांनी दार तोडून आम्हाला बाहेर काढलं. त्यांच्या इमारतीत नेलं.”
“बाई, ही रेश्मा रडतीये वाटतं,” अचानक मोनिका उठून उभी राहत म्हणाली.
“काय ग झालं रेश्मा?” पूजानं मागे वळून विचारलं. बाकी मुलींमध्येही कुजबुज सुरू झाली.
“रेश्मा, का रडतेस? सांग ना?” रसिका चाचपडत अमृताच्या बाकाजवळ गेली.
“मला आईची आठवण येतेय, ती खूप आजारी होती…” रेश्मा रडत रडत म्हणाली, “पाऊस खूप होता, आम्हाला तिला हॉस्पिटलात पण नेता नाही आलं. तशीच गेली ती त्या दिवशी… २६ जुलैला,” आणि ती अजूनच हमसून हमसून रडू लागली.
“आई ग, किती वाईट, रेश्मा! मला पण रडू येतंय बघ आता.”
“बाई, या ना इकडे, थांबवा ना हिला.”
मग धाकडेबाई खुर्चीवरून उठल्या, “पोरींनो रडू द्या तिला, या निमित्ताने बोलतेय तरी,” बोलता बोलता त्यांचाही आवाज भरून आला, “मला ठाऊक आहे सगळं, तिच्या घरचे आले होते भेटायला तेव्हा सांगत होते. किती वर्ष मनात असंच साचून ठेवलंय, बोललीच नाही कधी. रेश्मा, अशा गोष्टी मैत्रिणींसोबत वाटल्या की बरं वाटतं बघ, असं एकट्यानं नाही सहन करू सगळं मग खूप त्रास होतो.”
“रेश्मा, का नाही सांगितलंस आम्हाला? आम्ही तुझ्या मैत्रिणी नाही का?” बागेश्री पण रडू लागली … पाहता पाहता सगळा वर्गच हुंदके देऊ लागला.
“बाई, आम्हाला खूप वाईट वाटतंय.”
“वाटणारच मुलींनो, रेश्माची पावसाची आठवण आहेच तशी,” बाईंनी रेश्माच्या डोक्यावर हात ठेवला. “आता मोकळं वाटतंय? चला, रडणं पुरे आता. परागसर म्हणायचे कसल्या रडूबाया आहेत सगळ्या! काय हो सर? घाबरू नका बरं, जरा इमोशनल झाल्यात सगळ्या.” त्या पुन्हा त्यांच्या खुर्चीजवळ आल्या. हातातलं घड्याळ चाचपत म्हणाल्या, “थांबलं का रडू सगळ्यांचं? बघा साडेपाच होत आले आणि पाऊस आलाच वाटतं. आज थांबू आपण. आवरा डेस्क्स तुमचे.”
“बाई, निबंधाचं काय करायचं?” सौम्यानं विचारलं.
“वाह, लक्षात बरा आहे निबंध? छान. आज जे शिकलो ते करायचं, आपली प्रत्येकाची स्वतःची आठवण आहे पावसाची, हो ना? चांगली, वाईट, जी काही. ती आपली आपण लिहायची. ती आठवण नको वाटली तर… आता घरी जाताना पाऊस लागेलच, मग रस्त्यात काय काय होतंय त्याबद्दल लिहा. तात्पर्य काय तर स्वतःची स्वतंत्र गोष्ट सांगा. स्वतःचं स्वतः भाषेतून व्यक्त व्हायला शिका. व्यक्त होता येणं फार महत्त्वाचं, समजलं? चलो पळो! सोमवारी पुन्हा भेटूया.”
सर्व मुली डेस्क आवरून दोन-दोनच्या जोडीने वर्गाबाहेर जाऊ लागल्या. बाईंनीदेखील त्यांची पर्स आवरली, “काय परागसर? आज काय बेत? वाशी की फोर्ट?”
“अं… अजून ठरवलं नाही काही.” मला मी बऱ्याच वेळानं काहीतरी बोलल्याचं जाणवलं!
“मग कोपऱ्यावर चहाला येता? किशोरभाईनी कांदाभजी टाकलीय वाटतं, कसला खमंग वास सुटलाय! काय म्हणता?”
“हो! चला की. गरमागरम चहाभजीला नाही कसं म्हणायचं?” मी बाईंसोबत वर्गाबाहेर पडलो.
व्हरांड्यात पाऊस आमचीच वाट पाहत होता.
Very well written by the author. It shows a lot of maturity.
Thank you Dr. Pradyumna!
मुंबई शहराचं व मुंबईकरांचं पावसाशी असलेलं लव्ह-हेट रेलशनशिप लेखकाने अचूकरित्या टिपलेले आहे.
ही कथा वाचता वाचता माझा ‘वाशी’ ते परेलचा प्रवास कसा संपला ते समजलेच नाही. आज मलापण ६:०९ ची सी.एस.टी पकडून मरीन ड्राईव्ह ला पावसात भिजण्याची इचछा होतीय !!
Thank you for sharing your thoughts Varad!
भिजलास का मग पावसात? 🙂
खुप छान लिहलिय, पावसाची गोषट् !!
धन्यवाद प्रदीप!
Kiti sundar lihila ahes Prasad. Paristhiti, avakash agadi pratyaksha ubha kelay ani tohi agadi mojakya shabdat.
Kathela pravahi thevatana kuthehi nemkepan sodale nahis ani pasaratahi hou dile nahis.
beautiful.
Thank Hemant! It feels so great to receive your detailed feedback 🙂 Thank you so much!
Thanks Hemant! It feels so great to receive your detailed feedback 🙂 Thank you so much!
khupch chan Prasad well-done keep it up
Thank you Swati Tai 🙂 🙂