पांघरूनिया धरती, सावळ्या शब्दांची धून
वर निळे निळे नभ आनंदे लेवोनि मौन
मन झुळझुळ झरा, त्यास संवादाचा ध्यास
फुले झाडांचा उद्गार व्यक्त होण्याचा प्रवास
गाणी सुखाची कधी नि कधी दुःखाची गाऱ्हाणी
डोह जरी मूक खोल तळाशी दबली वाणी
इथे वाद-उद्वेगाच्या किती चितारल्या रेषा
उमजली कोणा कधी कुणाच्या मनाची भाषा?
शब्दांचा धरोनि हात निःशब्द राहता यावे
गढूळल्या प्रवाहाचे प्रशांतसे तळे व्हावे
आत वळावे जाणण्या हृदयस्थ अबोलणे
असा झंकारावा सूर उमलावे मौन गाणे
मग सलावे ना काही, औषध व्हावेत घाव
आणि उजळोन आर्त एक व्हावा सारा भाव
सारे अनुताप क्लेश विरघळावे प्रवाही
धुके विरावे समस्त प्रकाशता दिशा दाही
बिंब मोदे आकाशाचे धरता उराशी यावे
नितळ प्राणांत मौन निळे निळे नभ व्हावे