१.
ठिकाण : नूरानी मस्जिद, नरोडा पाटीया
साक्षीदार : अब्दुस सलाम समशुद्दीन शेख (पेश इमाम)
(दि. ४ मार्च रोजी शाह आलम रिलीफ कॅम्पमध्ये घेतलेली मुलाखत)
“ ए मुल्लाह ! जय श्रीराम म्हण ! म्हण ! नाहीतर सरळ तुम्हाला कापून टाकू.” नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार प्रायोजित हे दहशतवादी हत्याकांड अख्ख्या गुजरातेतील आमच्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाने अनुभवलं. मी आमच्या इथल्या नूरानी मस्जिद मध्ये पेश इमाम आहे. त्या दिवशी, म्हणजे २८ फेब्रुवारीला सकाळी ९.१५ च्या आसपास खूप मोठ्या संख्येने डोक्याला भगव्या पट्ट्या बांधलेल्या लोकांचा प्रचंड जमाव मोठमोठ्या ट्रक्स मधून आणि इतर वाहनांमधून उतरला आणि त्यांनी थेट मशिदीवर हल्ला केला.
मी त्यांना खूपदा विनंती केली की कृपया मशिदीला काही करू नका, पण ते काहीही न ऐकता ‘जय श्रीराम’ असं ओरडतच आत घुसले. नमाजाला बसायच्या गालिच्यांना त्यांनी आग लावली, सिलेंडरमधून गॅस गळती सुरू केली, कुराणाची त्यांनी नासधूस केली, पानं लाथाडली आणि नंतर त्यालाही आग लावली. आम्ही कसेबसे तिकडून पळत निघालो म्हणून स्वतःला वाचवू शकलो.
त्यानंतर जेव्हा आम्ही हायवे जवळ आलो तिथे तर मुस्लीम निवासी भागात अजूनच लाजीरवाणा प्रकार चालू होता. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे रक्षक खुलेआम तरुण मुलींवर बलात्कार करत होते, त्यांना जिवंत जाळत होते. आणि हे सगळं ज्याला मर्यादा पुरूषोत्तम म्हणतात त्या ‘रामा’ च्या नावाखाली चाललेलं होतं. या लोकांना कधी जाणीव होईल ? कधी जागे होतील ते ? स्वातंत्र्यलढ्यात हिंदूंबरोबर मुस्लिमांचाही तितकाच सहभाग होता न ? का भारतातले मुस्लीम कायमच या हिंदू मूलतत्त्ववादाचे, धर्मांधतेचे बळी ठरणार आहेत ?

२.
ठिकाण : नरोडा फ्रुट मार्केट, स्वामी नारायण रोड, नरोडा
साक्षीदार : रमणलाल
(दि. ८ मार्च रोजी नरोडा फ्रुट मार्केट मध्ये घेतलेली मुलाखत)
“इथे इब्राहीम-रमणलाल ही हिंदू-मुस्लीम कुटुंबं गेल्या तीन पिढ्या एकत्र व्यवसायामुळे संबंधित आहेत. इब्राहीम रमणलाल हे स्वामी नारायण चाळ रस्त्यावर काम करणारे एक कमिशन एजंट आहेत. बहुतेक आम्ही असं एकत्र राहणं त्यांना खुपलं असावं त्यामुळेच त्यांनी आमच्यावरही हल्ला केला. आमच्याबद्दल सगळी माहिती काढून आणली होती त्यांनी. त्या दिवशी झालेल्या विध्वंसात आमचं अडीच लाखांचं नुकसान झालं. अर्थात, या गोष्टीने आम्हाला काही फरक पडणार नाही. उलट यामुळे आम्हा दोघातलं नातं अजूनच घट्ट होईल. हे संबंध फक्त व्यवसायापुरते नसून त्यापेक्षाही जास्त आहेत. पिढ्यानपिढ्या असलेले आमच्यातले हे संबंध आम्ही पुन्हा नव्याने तयार करू. वाढवू.
६ मार्चला आम्ही स्वामी नारायण चाळीपाशी फ्रुट मार्केटच्या मागच्या बाजूला फिरत असताना आम्हाला दिसलं की बबनशाह दर्गा पूर्णपणे जमीनदोस्त झालेला होता. अक्षरशः दगड-विटामधून वाट काढत आम्ही थोडं वर गेलो तर पवित्र कुराणाची पानं फाडून इकडे तिकडे फेकलेली होती आणि या माणसांनी त्यावर लघवी सुद्धा केलेली दिसत होती. नमाज सांगायला इमाम जिथे उभे राहतात त्याच जागी एका हिंदू देवतेचा फोटो फ्रेम करून लावलेला होता आणि त्याची व्यवस्थित पूजा केली असल्याचं कळत होतं. शेजारच्या भिंतीवर ओबडधोबड आणि मोठ्या लाल अक्षरात ‘जय श्रीराम’ लिहिलेलं होतं. ते पाहून तिरस्कार एवढा भडकण्यामागे नेमकं काय कारण होतं हे माझ्या लक्षात आलं.
३.
ठिकाण : सय्यदवाडी, अझीमनगर
साक्षीदार : सलमा आपा
( दि. ४ मार्चला वटवा रिलीफ कॅम्प मध्ये घेतलेली मुलाखत )
“सगळ्यात वाईट काय असेल तर हा प्रचंड जमाव हल्ला करत असताना पोलीस इन्स्पेक्टर दामोद तिथे उभे राहून मुस्लिमांना खुलेआम धमक्या देत होते की कोणीही तक्रारी दाखल केल्या तर तुमच्या बायकामुलांना पळवून नेऊ.
नवापुरा मधल्या वस्त्यांमध्ये राहणारे बरेचसे रहिवासी हे भंगार व्यवसायात आहेत त्यामुळे त्यांची घरं रोजंदारीवर चालतात. आज त्या गोष्टीला ४ दिवस झाले तरी अजूनही भीती वाटते कारण अजूनही रात्रीबेरात्री रस्त्यावरून लाऊड-स्पीकर्स मधून रेकॉर्डेड आवाज येतात “कापा!! मारा त्यांना !!” आम्ही घाबरून घराबाहेर पडू आणि मग ते आमच्यावर पुन्हा हल्ले करतील, हेच तर त्यांना हवंय. आजसुद्धा मी ‘त्या बाजूला’ काही धान्य, भाज्या वगैरे खरेदी करायला गेले होते तर तिथल्या विक्रेत्यांना आधीच धमक्या आल्यात – ‘मुस्लीम बायकांना भाजी विकायची नाही, मुस्लीम मुलांना दूध विकायचं नाही.’

४.
ठिकाण : रणधिकपूर, पंचमहल जिल्हा
साक्षीदार : बिल्किस ( वय १९ वर्षे )
(दि. २२ मार्च रोजी गोध्रा रिलीफ कॅम्प मध्ये घेतलेली मुलाखत आणि प्राथमिक अन्वेषण अहवाल)
महोदय,
पोलीस उपअधीक्षक, दाहोड
मी बिल्किस, तक्रारदार, कापडी फालीया, बरीयाची रहिवासी आहे. माझा विवाह याकुव रसूल पटेल यांच्याशी झालेला आहे. आम्हाला सलेहा ही साडेतीन वर्षांची मुलगी होती. माझी आई रणधिकपूर, तालुका दाहोडची रहिवासी आहे.
२३ फेब्रुवारीला ईद असल्यामुळे मी माझ्या लहान मुलीबरोबर आईच्या घरी राहायला गेले होते. २७ तारखेला गोध्रा रेल्वे स्टेशन वर झालेल्या हल्ल्यामुळे सगळीकडेच तणावाचं आणि हिंसाचाराचं वातावरण होतं. म्हणूनच आम्ही घरातले १६ लोक, मी, माझे भाऊ-बहिणी, माझी मुलगी, आई, काका, काकू, त्यांच्या मुली असे सगळे २८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता रणधिकपूर वरून बरियाला जाण्यासाठी पायीच निघालो. रस्त्यात सगळीकडेच हल्ले चालू होते असं आम्हाला कळलं त्यामुळे आम्ही मध्येच चुडडी गावात बिजल दामोरला थांबलो. मध्यरात्री निघून आम्ही कुवाजर दर्ग्यात लपून राहिलो.
माझी चुलत बहिण प्रेग्नंट होती तिने त्याच रात्री एका मुलीला जन्म दिला. सकाळी १० च्या आसपास आम्ही तिथून निघालो आणि खुदराला आदिवासी पाड्यात २ दिवस राहिलो. त्यानंतर मग आम्ही छापरवडला आलो. आम्ही मुद्दामच कोणाच्या लक्षात येणार नाही म्हणून कच्च्या रस्त्यावरून चालत होतो. पण दोन डोंगरांच्या मधून जात असताना रणधिकपूर आणि छापरवडच्या दिशेने जाणाऱ्या २ गाड्या रस्त्यात नेमक्या समोरून आल्या. त्यामध्ये ३०-४० लोक होते. शैलेश भट, राजू सोनी, लाला डॉक्टर, गोविंद नाना, जसवंत नवी, लालो वकील हे काही लोक रणधिकपूरचे असल्यामुळे मी त्यांना लगेच ओळखलं. बाकीचे छापरवडचे होते त्यामुळे आम्हाला त्यांची नावं माहित नव्हती.
सगळ्यांच्या हातात जीवघेणी हत्यारं होती-तलवारी, काठ्या, भाले, कोयते, गुप्ती बरंच काय काय, “मारा, कापा त्यांना” असं ओरडतच ते आमच्याकडे आले आणि माझ्यावर आणि माझ्या दोन बहिणींवर त्यांनी बलात्कार केला. माझ्या चुलत बहिणींशी ते अतिशय गलिच्छ आणि अमानुष पद्धतीने वागले. त्यांनी आमचे कपडे फाडले आणि आमच्यातील आठही बायकांवर बलात्कार केले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या साडेतीन वर्षाच्या मुलीची त्यांनी हत्या केली.
माझ्यावर ज्यांनी बलात्कार केला त्यांची नावं आहेत – शैलेश भट, लाला डॉक्टर, लालो वकील आणि गोविंद नवी. या सगळ्यांना मी चांगलंच ओळखते. मला नंतर त्यांनी खूप मारहाण केली. डोक्याला खूप मार लागल्यामुळे मी तिथेच बेशुद्ध होऊन पडले. त्यांना मी जिवंत नाहीय असंच वाटलं असल्यामुळे ते नंतर तिथून निघून गेले असावेत.
दोन तीन तासांनंतर मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा माझ्या आजूबाजूला जमिनीवर माझ्या सगळ्या नातेवाईकांचे मृतदेह पडलेले होते. ते पाहून मी प्रचंड घाबरले. काही वेळाने मी डोंगरावर चढून गेले आणि रात्रभर तिथेच थांबले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांना जेव्हा या घटनेबद्दल कळलं तेव्हा ते तिथे आले. त्यांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतले. त्यांना मी एकटीच जिवंत सापडले. माझे कपडे फाटलेले होते त्यामुळे त्यांनी मला डोंगराच्या पायथ्याशीच असलेल्या एका आदिवासी घरातून घालायला कपडे आणून दिले. मग ते मला लीमखेडाला घेऊन आले आणि तिकडून मला इथे गोध्राला रिलीफ कॅम्पमध्ये आणलं गेलं.
इथे मी ज्यांची नावं सांगितली आहेत त्या लोकांनी माझ्या बहिणी, माझ्या चुलत बहिणी आणि माझ्यावर बलात्कार केले. मी सोडून आमच्या कुटुंबातल्या सर्व लोकांची त्यांनी हत्या केली. म्हणूनच या लोकांविरुद्ध लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मी आपल्याला विनंती करते.”
कम्युनॅलिझम कॉम्बॅट या नियतकालिकाच्या मार्च – एप्रिल २००२च्या अंकातून साभार.
चित्र सौजन्य: वसुधा थोळूर
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
1 Comment
शिल्पा कांबळे
काय बोलायचे ….भीषण आहे सारे