मूळ पत्रं: व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ

मराठी अनुवाद : शर्मिला फडके

व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघने भावाला लिहिलेली पत्रं


6


back

पत्र क्र. ७५०

प्रेषक : व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ. 
प्रति : थिओ व्हॅन गॉघ. 
दिनांक : आर्ल्स, मंगळवार, १९ मार्च १८८९. 
स्थळ : अॕमस्टरडॅम, व्हॅन गॉघ संग्रहालय, आवक क्र.  बी६२६ ए-बी व्ही/१९६२.     
१९ मार्च १८८९.

प्रिय थिओ,

तू कितीही संयमाने रोखून धरलेली असलीस तरी तुझ्या आतली माझ्यावरच्या प्रेमाची वेदना तुझ्या पत्रातल्या प्रत्येक शब्दातून मला जाणवली, त्यामुळे आता मौन तोडणं हे माझं कर्तव्य आहे. डोकं पूर्ण ठिकाणावर असताना मी हे लिहितो आहे. एखादा वेडा माणूस नाही, तर तुझ्या चांगल्या परिचयाचा असलेला तुझा भाऊ तुला हे लिहितो आहे. तर सत्य असं की, येथील काही लोकांनी एक याचिका (त्यावर ऐंशीहून अधिक स्वाक्षऱ्या होत्या,) महापौरांना सादर केली (मला वाटतं त्यांचं नाव एम. टार्ड्यू आहे), ज्यात मी मुक्तपणे जगण्यास नालायक असलेला माणूस आहे असं काहीतरी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर पोलीसप्रमुखांनी किंवा मुख्य निरीक्षकांनी मला डांबून ठेवण्याचा आदेश दिला. 

तर, आता मी इथे आहे. माझ्यावरचा आरोप सिद्ध न होता, किंवा तो सिद्ध व्हायची शक्यता आहे का हे न ठरवताच तुरुंगाधिकाऱ्याच्या देखरेखीखाली, एकांतवासाच्या कोठडीत मला कडीकुलुपात दीर्घ काळासाठी बद्ध करून ठेवलं गेलं आहे. 

हे सांगायची गरज नाही की उत्तरादाखल या सगळ्यावर खूप काही बोलायची ऊर्मी माझ्या मनात आहे. हेही सांगायची गरज नाही की मी चिडता कामा नये. मात्र, या प्रकरणात माफी मागणं म्हणजे स्वत:लाच दोषी ठरवणं. 

आता हे फक्त तुला चेतावणी म्हणून — मला सोडवायचं असेल, तरपहिली गोष्ट, मी तसं करायला सांगत नाही, या खात्रीने की हे सगळे दोषारोप कधीच कमी होणार नाहीत. 

तुला इतकंच सांगतो, मला यातून सोडवणं तुला कठीण जाईल. माझ्या संतापाला मी आवर घातला नाही तर तातडीने मला एक धोकादायक वेडा ठरवलं जाईल, हे माहीत असल्याने मी शांत राहायचा प्रयत्न करत आहे. आपण प्रतीक्षा करू, आशा बाळगू. याहून काही तीव्र भावना, आहे ती परिस्थिती चिघळवण्यास कारणीभूत ठरतील. 

महिन्याभरात तुला माझ्याबद्दलची काही थेट बातमी जर मिळाली नाही, तर काहीतरी कृती कर. मात्र जोवर मी तुला लिहीत आहे, तोवर थांब. 

म्हणूनच आता मला वचन दे की, या सगळ्या भानगडीत तू पडणार नाहीस. 

हे प्रकरण पुढे जास्तच गुंतागुंतीचं, गोंधळवून टाकणारं होत जाणार आहे, याचा इशारा तुला आधीच देऊन ठेवला आहे, असं समज. कदाचित तुला आता हे समजेल की कसा मी एखाद्या क्षणी पूर्णपणे शांत असताना, अशा कोणत्या तरी नैतिक भावनांमधे गुरफटून जातो आणि मग सहजतेने उन्मादी मनःस्थितीचा बळी होऊ शकतो. आता तू कल्पना करू शकशील की, छातीत किती जोरात हातोड्याचे घण पडतात, ज्या वेळी मला कळतं की इथे इतके डरपोक लोक आहेत जे एका आजारी असलेल्या माणसाच्या विरोधात एकवटतात. 

असो.हे केवळ तुला माहीत व्हावं याकरिता होतं. आता माझ्या मानसिक अवस्थेबद्दल — मी भयंकर हादरलो आहे, परंतु त्याचसोबत मला रागावर नियंत्रण मिळवायला उपयोगी अशा विलक्षण शांततेची सिद्धी प्राप्त झाली आहे. शिवाय असे झटके वारंवार अनुभवायला लागले की माझ्यात एक नम्रता येते, ती मला शोभते.    

म्हणून मी गप्प आहे, धीर बाळगून आहे. 

मुख्य गोष्ट, जी फार वेळा तुला सांगायची संधी मला मिळू शकत नाही; ती म्हणजे, तू सुद्धा शांत राहायला हवंस, तुझ्या दैनंदिन व्यवहारात सारखे व्यत्यय येणं चांगलं नाही. एकदा तुझं लग्न पार पडलं की मग या सगळ्या गोष्टी आपल्याला निपटता येतील. दरम्यान, माझा सल्ला आहे की, मला शांतपणे इथे राहू दे. मला खात्री आहे, महापौर, तसंच मुख्य पोलीस अधिकारी, जे माझ्या मित्रांसारखेच आहेत, ते काही करून या गोष्टी मार्गावर आणतील. इथे मला स्वातंत्र्य नाही, काही आवश्यक गोष्टी मिळत नाहीत; ते वगळता, माझी फार काही वाईट अवस्था नाही. शिवाय मी त्यांना आधीच सांगितलं आहे की, आम्ही काही खर्च करू शकत नाही, गेल्या तीन महिन्यांपासून मी काम करत नाहीये. मुळात त्या लोकांनी वैतागून मला असा त्रास दिला नसता तर मी काम करूच शकलो असतो.      

आई आणि आपली बहीण, दोघी कशा आहेत? इथे माझं लक्ष विचलित करायला दुसरं काहीच नाही. धूम्रपान करायलाही मनाई आहे, पण इतर रुग्णांना त्याची परवानगी आहे. अशा वेळी मी शांतपणे मौनावस्थेत जातो आणि माझ्या जिवाच्या नजीक असलेल्या गोष्टींचा विचार रात्रंदिवस करत राहतो. 

केवढं दु:खदायक वाटू शकेल हे सारं — पण तसं बघायला गेलं तर काहीच नाही वाईट. तरीही खरं सांगतो, असा त्रास सहन करण्यापेक्षा किंवा अशा त्रासाकरिता कारणीभूत होण्यापेक्षा मला मरण परवडलं असतं. अजून काय सांगू? तक्रार न करता भोगत राहणं हा एकच धडा या जन्मात शिकतो आहे. आता या सगळ्यांत ज्या वेळी मला पुन्हा पेंटिंगचं काम सुरू करायचं असेल, त्या वेळी स्वाभाविकपणे स्टुडिओची, फर्निचरची गरज लागणार; आणि तेच जर गायब झालं तर पुन्हा सगळं नव्याने सुरू करणं आपल्याला नक्कीच परवडणार नाही.    

पुन्हा एकदा हॉटेलात राहायची वेळ आली, तर हे तुलाही माहीत आहे की माझ्या कामाच्या स्वरूपामुळे आता ते शक्य नाही. मला एका कायमस्वरूपी राहण्याच्या जागेची आवश्यकता आहे. माझ्या विरोधात हे जे लोक गेले आहेत, त्यांचा मी निषेध करतो. त्यांनी स्वतःहून समजुतीने माझ्या नुकसानभरपाईची व्याजासकट परतफेड करायला हवी. थोडक्यात, त्यांच्या चुकीचे, गैरसमजांचे जे परिणाम मी भोगतो आहे, त्याची त्यांनी सव्याज किंमत चुकवावी.  

एक वेळ — धरून चालू — मी खरोखरंच वेडा झालो होतो — हे अशक्य आहे असंही मला म्हणायचं नाही; तरी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी वेगळ्या पद्धतीने वागायला हवं होतं. ताजी हवा, माझं काम आणि सी* या गोष्टी त्यांनी मला परत करायला हव्या. मग — मी शब्द देतो — मी स्वतः माझा पराभव मान्य करीन. पण अजून ती वेळ आलेली नाही. आणि मुळात आधीपासूनच जर अशी शांतता मला लाभली असती, तर मी कधीच माझ्या पायांवर उभा राहू शकलो असतो. मी जे धूम्रपान केलं, नशा केली त्याबद्दल त्यांनी माझ्यावर कोरडे ओढले, हे ठीकच आहे.   

पण काय बोलणार आपण? स्वतःला संयमी समजणारे हे सगळे जण, मला दरवेळी नव्याने फक्त नवनवी दुःखं प्रदान करत आहेत. माझ्या प्रिय भावा, मानवी जीवनातील महान गोष्टी आणि आपली ही लहानशी दुःखं,  दोन्ही विनोदाने घेणंच चांगलं. खऱ्या पुरुषाप्रमाणे त्यांचा स्वीकार करावा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. आजचा जो समाज आहे, त्यात आपल्यासारख्या कलाकारांची किंमत फुटक्या घागरींहून जास्त नाही.

तुला माझे कॅनव्हास पाठवायची तीव्र इच्छा मनात आहे, पण सगळंच कडीकुलुपात बंदिस्त आहे — पोलिसांच्या आणि वेड्यांवर देखरेख करणाऱ्यांच्या ताब्यात. मला सोडवायचा प्रयत्न करू नकोस, सगळं आपोआप ठीक होईल. तसंच सायनेकला सुद्धा सांग की, मी पुन्हा लिहीपर्यंत त्याने यात अडकू नये, कारण तसं करणं हे मधमाशांच्या पोळ्यात हात घालणं ठरेल. आता तुझा निरोप घेतो, तुझ्या वाग्दत्त वधूला, आईला आणि आपल्या बहिणीलाही सांग, मी त्यांची प्रेमपूर्वक आठवण करत राहतो. 

कायमच तुझा,    

व्हिन्सेन्ट.

***

पत्र क्र. १५५  

प्रेषक : व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ. 
|प्रति : थिओ व्हॅन गॉघ. 
ठिकाण : क्वेमेस
दिनांक : मंगळवार, २२ जून आणि गुरुवार, २४ जून १८८०दरम्यान.

प्रिय थिओ,

माझी अजिबात इच्छा नसताना मी तुला हे लिहीत आहे. अनेक दिवस मी मौन बाळगून होतो, अनेक कारणांमुळे. एका विशिष्ट टप्प्यावर आपण एकमेकांकरिता अनोळखी बनलो आहोत, तुझ्या समजुतीपेक्षाही कदाचित जास्त; कदाचित आपल्या दोघांकरिताही हा मार्ग योग्य नाही. 

माझी निकड, मजबुरी नसती तर मी तुला हे लिहिणंच टाळलं असतं. माहीत आहे, माझ्यातली ही निकड, तुला लिहायची गरज ही काही तू माझ्यावर लादलेली नाहीस. मी एटेनला गेलो असताना मला कळलं की तू माझ्याकरिता पन्नास फ्रँक पाठवले आहेस. होय, मी स्वीकारले ते. पूर्ण अनिच्छेने, उदास भावनेतून. पण मी काय करू शकत होतो? मन एकाच वेळी बधीर आणि गोंधळलेलं आहे.  

आणि तुला त्याबद्दल धन्यवाद देण्याकरिता मी हे पत्र लिहीत आहे. 

तुला ठाऊक असेल कदाचित, मी पुन्हा बोरिनेजला आलो आहे. वडिलांनी मला त्याऐवजी एटेनच्याच परिसरात राहा, असं सांगितलं; मी नाही म्हणालो, आणि मला खात्री आहे, मी जे केलं तेच भल्याचं आहे. माझी तशी इच्छा नसतानाही, मी आपल्या कुटुंबातली, कोणत्याही परिस्थितीत जिच्यावर विश्वास टाकला जात नाही अशी एक वागायला अवघड आणि संशयास्पद व्यक्तिरेखा बनलो आहे. असं असताना कोणालाही माझा कसलाही उपयोग होण्याची काय शक्यता? 

म्हणूनच सांगतो की, माझं असं दूर, पुरेशा अंतरावर राहणं, माझ्या अस्तित्वाची दखल लागू न देणं हेच सर्वांच्या दृष्टीने हितावह आहे. पक्ष्यांना नवी पिसं फुटतात, त्यांना नवजीवन लाभतं, आपल्यासारख्या मानवांकरिता येणारी संकटं, दुर्दैव या कसोटीच्या वेळा असतात. अशा वेळी, काही जण आहेत त्याच जुन्या परिस्थितीत राहतात, काही जण नवा जन्म घेऊन त्यातून बाहेर पडतात. पण ही गोष्ट काही सार्वजनिकरीत्या करण्याची गोष्ट नाही, इतरांच्या दृष्टीने यात काही मनोरंजन नाही, आनंद वाटण्यासारखंही काही नाही; त्यामुळे असं करताना स्वतःला इतरांपासून दूर केलेलंच उत्तम. त्यामुळे जे आहे तसंच असू दे. आता स्वतःच्या कुटुंबाचा विश्वास पुन्हा परत मिळवणं, त्यांच्या मनांतले पूर्वग्रह किंवा इतर सन्माननीय, फॅशनेबल समज दूर करणं ही काहीशी मनोधैर्य खचवणारी गोष्ट नक्कीच असू शकते; तरीही मला आशा आहे, हळूहळू पण निश्चितपणे मी पुन्हा कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल योग्य समज नक्की प्रस्थापित करीन.   

सर्वप्रथम, मला पुन्हा एकदा वडिलांच्यात आणि माझ्यात चांगलं सामंजस्य निर्माण करायचं आहे, तसंच ते आपल्या दोघांतही व्हायला हवं आहे. एकमेकांना नीट समजून घेणं हे गैरसमजांपेक्षा लाखपटीने चांगलं असतं. 

माझ्या तुटक, अधांतरी गोष्टींना तू नक्कीच कंटाळला असशील, पण तरीही सहनशीलतेनं ऐक.      

मी स्वभावाने उत्कट आहे, अनेकदा मूर्खपणाच्या गोष्टी माझ्या हातून घडतात, त्याबद्दल मला वाईटही वाटतं. बऱ्याचदा मी विचार न करता, मनात येईल ते लगेच बोलून टाकतो, संयमाची गरज असतानाही कृती करतो. मला वाटतं, इतरही अनेक जण असं मूर्खासारखं वागतात. आता असं असताना काय करावं? आपण जगायला नालायक आहोत, इतरांच्या दृष्टीने धोकादायक व्यक्ती आहोत,  असं समजायचं का स्वतःला? मला नाही असं वाटत. पण स्वभावातल्या उत्कटतेला चांगलं वळण देण्याचा प्रयत्न करता येतो. उदाहरणार्थ, माझ्या उत्कट आवडींपैकी एक म्हणजे मला असलेला पुस्तकांचा अनावर मोह; शिवाय मला सतत काहीतरी शिकायचा, अभ्यास करण्याचा छंद आहे. रोजच्या जेवणाइतक्याच गरजेच्या आहेत या माझ्या आवडी, असं म्हटलं तर कदाचित तुला समजू शकेल. जेव्हा मी वेगळ्या वातावरणात होतो, चित्रांच्या, कलाकृतींच्या सहवासात; तेव्हा तुला चांगलंच माहीत आहे की माझ्यातला उत्साह उत्कटतेच्या किती हिंसक पातळीवर पोहोचला होता. मला त्याचा पश्चात्ताप वाटत नाही; पण आता पुन्हा इतक्या दूर आलो असताना, त्या पेंटिंग्जच्या देशाबद्दल विरह, व्याकुळता निश्चित वाटते आहे. 

तुला कदाचित अजूनही स्पष्ट आठवत असेल, की मला फार चांगल्या रीतीने माहीत होतं, (बहुधा अजूनही माहीत आहे,) रेम्ब्रां किंवा मिले काय आहेत, ज्युल्स डुप्रे, देलाक्रो किंवा मिलेस एम. मारिस काय आहेत.  ठीक आहे — आता यांपैकी काहीच माझ्या आसपास नाही — तरीही, असं काहीतरी आहे, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याविषयी दावा करतात की तो कधीच मरत नाही, अमर आहे, आणि त्याचा सदैव, अनंत काळासाठी काहीतरी मिळवण्याचा ध्यास सुरूच राहतो.    

आणि म्हणूनच घरच्या आठवणींनी व्याकुळ होण्यापेक्षा मी स्वतःला असं बजावलं की आपला देश किंवा मूळ भूमी सर्वत्र आहे. निराश न होता स्वतःला समजावलं की, जोवर माझ्यात कृतिशीलतेची ताकद आहे, तोवर औदासीन्याच्या पोटातून आशा जन्म घेत राहील. वेगळ्या शब्दांत सांगायचं, तर दु:ख, निराशा, निष्क्रियता यांच्यापेक्षा आशा, आकांक्षा, शोध यांना प्राधान्य द्यायचा मी प्रयत्न करतो आहे.  

त्याकरिता मी हाताशी असलेल्या पुस्तकांचा गंभीरपणे अभ्यास केला, जसं की, बायबल आणि मिशेलेटचं La révolution Française. मग गेल्या हिवाळ्यात  शेक्सपिअर, थोडा व्ही. ह्यूगो, डिकन्स, बीचर स्टो, आणि अलीकडे अॅसचिलीस आणि नंतर इतर काही बरे-वाईट, काही चांगले, उत्कृष्ट लेखक, काही उत्तम पण दुय्यम महत्त्वाचे लेखक वाचले. तुला ठाऊकच आहे, फॅब्रिटियस किंवा बिडा हे सुद्धा यांच्यातलेच एक आहेत.आता या सगळ्यांत गढून गेलेली व्यक्ती जर इतरांना धक्कादायक वाटली, त्या व्यक्तीची स्वतःची इच्छा नसतानाही तिला  सामाजिक रूढी-परंपरांचा कमीअधिक प्रमाणात अपमान करणारी व्यक्ती मानलं गेलं, तर ती खेदाची गोष्ट. अजून उदाहरण द्यायचं तर, तुला माहीत आहे, मी कायम माझ्या दिसण्याकडे दुर्लक्ष केलं आहे. कबूल करतो की ते इतरांच्या दृष्टीने धक्कादायक असू शकतं. पण असं बघ, पैशांची समस्या, गरिबी यांचा त्याच्याशी काहीतरी संबंध आहे, गहन निराशेचाही संबंध आहे. काही वेळा स्वतःचा खोलात जाऊन शोध घेण्यासाठी आवश्यक असलेला एकटेपणा निश्चितपणे मिळवून द्यायलाही त्याचा उपयोग होतो. अभ्यासात व्यग्र असलेल्यालाही त्याचा उपयोग होतो.   

अभ्यासाचं एक अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे वैद्यक. क्वचितच असा माणूस असेल जो याबद्दल थोडंतरी जाणून घ्यायचा, निदान ते कशाबद्दल आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही; आणि इथे मी आहे ज्याला अजूनही त्याबद्दल काही माहीत नाही. हे सर्व तुम्हांला शोषून घेतं, तुमचं सर्वस्व व्यापून टाकतं, परंतु त्याचबरोबर हे सर्व तुम्हांला स्वप्न पाहायला, विचार करायला, आणि चिंतन करायलाही प्रवृत्त करतं. 

आणि आता गेली पाच वर्षं — बहुधा, मला नक्की माहीत नाही — मी कमीअधिक प्रमाणात कोणत्याही पदाशिवाय आहे, स्वैर भटकत आहे. आता तू म्हणशील, अमुक एका काळापासून तुझी घसरण चालू आहे, तू प्रभावहीन बनला आहेस, काहीच केलेलं नाहीयेस तू. पूर्णपणे खरं आहे का ते?

हे खरं, की काही वेळा मी पोटापुरतं कमावू शकलो, काही वेळा एखाद्या मित्रानं मला जेवायला घातलं. मी शक्य तितकं चांगलं जगायचा प्रयत्न केला. कधी ते जमलं, कधी फसलं. हे खरं, की यात मी अनेक लोकांचा विश्वास गमावला. हे खरं, की माझे आर्थिक व्यवहार वाईट स्थितीत आहेत. हे खरं, की भविष्य जरा अंधारं आहे. हे खरं, की मी अधिक चांगलं काही करू शकलो असतो. हे खरं, की जगण्याकरता पैसे कमावण्याच्या नादात मी वेळ गमावला आहे. हे खरं, की माझं शिक्षण निराशाजनक स्थितीत आहे. माझ्याकडचा अभाव अनेक पटींतला आहे. पण म्हणून याला माझी घसरण किंवा काहीच न करणं  म्हणायचं का?

कदाचित तू म्हणशील, मग तू का नाही इतर लोकांच्या इच्छेनुसार विद्यापीठीय शिक्षणाचा मार्ग स्वीकारलास? 

यावर मी एवढंच म्हणेन की, ते खूप महाग आहे, आणि त्यानंतरचं भविष्य सध्याच्या वर्तमानापेक्षा फार चांगलं नव्हतं. पण आता मी ज्या रस्त्यावर आहे त्यावर चालत राहणं गरजेचं आहे. जर मी काही केलं नाही, अभ्यास केला नाही, प्रयत्न करत राहिलो नाही, तर मी सगळंच गमावेन, ते सर्वांत वाईट आहे. याकडे मी असं पाहतो, की प्रयत्न चालू ठेवा, चालू ठेवा, तेच आवश्यक आहे.

तू मला माझं अंतिम उद्दिष्ट काय, असं विचारलं आहेस. तर ते हळूहळू अधिक स्पष्ट होत जाईल, त्याला एक निश्चित आकार येईल. रेषांचं रेखाटन, मग त्यातून चित्र आकार घेतं, तसंच आहे हे. एखादी व्यक्ती पूर्ण गांभीर्याने एखादं काम हातात घेते, त्या वेळी सुरुवातीला त्याच्या डोक्यातल्या कल्पना अस्पष्ट असतात, त्याचे विचार धूसर असतात; पण मग तो अधिकाधिक खोलात जायला लागतो, तेव्हा त्यांना एक निश्चित, ठळक आकार येतो. 

हे सगळं मी तुला सांगतो आहे, त्यामागे मला कसलीही तक्रार करायची नाही. माझ्या हातून झालेल्या लहानमोठ्या चुकांची माफी मागायचाही उद्देश नाही. सोपं करून सांगतो, गेल्या उन्हाळ्यात तू इथे आला होतास त्या वेळी आपण एका वापरात नसलेल्या खाणीच्या भागात, ला सॉर्सिएर म्हणतात तिथे, फिरायला गेलो होतो. गप्पा मारताना तुला आपल्या पूर्वीच्या रिजस्विकच्या जुन्या कालव्याजवळच्या भटकंतीची आठवण आली. आपलं अनेक गोष्टींवर एकमत व्हायचे ते दिवस होते. तुझ्या मते नंतर मी बदलत गेलो. खरं तर, ते तसं नाही; त्या वेळी माझा भविष्यकाळ आतापेक्षा जरा कमी अंधारमय होता, बदललं असेल तर ते केवळ इतकंच. आतून मी जसा होतो तसाच आहे, माझी जगाकडे पाहण्याची दृष्टी तशीच आहे. एक बदल झाला आहे खरा, आता मी जास्त गंभीरपणे विचार करतो, काही गोष्टींवरचा माझा विश्वास जास्त दृढ झाला आहे, आणि प्रेमही मी जास्त गांभीर्याने करतो. पण म्हणून जर तुला असं वाटत असेल की आता मला रेम्ब्रां, मिले किंवा देलाक्रा कमी आवडायला लागलेयत, तर तो गैरसमज ठरेल; कारण उलट आता मला ते जास्त आवडतात. जगात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्यावर तुम्हांला फक्त विश्वास ठेवून प्रेम करायचं असतं, एकमेकांना जोडलेल्या असतात त्या; जसं की शेक्सपिअरमधे रेम्ब्रांचं काहीतरी आहे, मिशेलेतमधे कोराजिओचं किंवा सार्त्रचं, व्हिक्तर ह्यूगोमधे देलाक्राचं आणि बीचर स्टेव्हमधे एरी शेफरचं काहीतरी आहे. हे जे काहीतरी असतं, ते वास्तवापेक्षा अधिक वास्तविक असतं. फक्त तुम्हांला ते कसं वाचायचं, त्याकडे कसं पाहायचं हे माहीत असणं आवश्यक आहे; मग त्याच्यामधे ज्या विलक्षण गोष्टी आहेत, ज्या अव्यक्त गोष्टी आहेत, त्या समजू शकतात. आणि मग तुम्हांला कळत जातं की गॉस्पेलमध्ये रेम्ब्रां आहे आणि रेम्ब्रांमधेही गॉस्पेल आहे. तुमच्या रुचीनुसार त्यांचं प्रमाण कमीजास्त होतं, पण ते असतं. अर्थात, त्याकरिता मूळ कलाकृती नीट समजून घ्यायची, अवास्तव तुलना न करण्याची, किंवा चुकीचे अर्थ न लावण्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता यात एखाद्याने जर चित्रकलेला खूपच झुकतं माप दिलं तर त्याला क्षमा करायला हवी, हे मान्य करून की पुस्तकांवरही तो रेम्ब्रांवर करतो तितकंच पवित्र प्रेम करतो. माझ्या मते, दोघेही परस्परांना पूरक आहेत. मला फॅब्रिटियसने केलेलं एका माणसाचं पोर्ट्रेट खूप आवडतं. एक दिवस आपण दोघे फिरायला गेलो होतो हार्लेम म्युझियममधे, आपण त्या पोर्ट्रेटकडे खूप वेळ पाहत होतो. ते छानच आहे, पण मला डिकन्सच्या Paris Et Londres En 1793 मधला रिचर्ड कार्टोनसुद्धा तितकाच आवडतो. तुला मी इतर पुस्तकांमधल्या अशाच अनेक वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांचं एकमेकांशी असलेलं ठळक साम्य दाखवू शकतो. शेक्सपिअरइतकं गूढ अजून कोणीच नाही. त्याची भाषा, त्याची काम करण्याची पद्धत एखाद्या पेंटरच्या उत्कट भावनावेगाने थरथरणाऱ्या ब्रशसारखीच आहे. पण जसं वाचायला शिकावं लागतं, तसंच हे बघायला आणि जगायला शिकावं लागतं.

तू जे दिलं आहेस ते मी स्वीकारलं आहे; आता परतफेड म्हणून तुझ्याकरिता काही करण्याची, तुझ्या उपयोगी पडण्याची संधी तू मला देऊ केलीस तर मला खूप आनंद होईल, तू माझ्यावर विश्वास दाखवला आहेस असं मला वाटेल. आपण एकमेकांपासून खूप दूर आहोत, काही बाबतींत आपली विचारांची पद्धत, बघण्याची दृष्टीही वेगवेगळी आहे; पण काही असलं तरी आपण कधीही एकमेकांच्या उपयोगी पडू शकतो याची खात्री दोघांनाही आहे. आता मी निरोप घेत आहे, पुन्हा एकदा मला केलेल्या मदतीबद्दल आभार मानतो. आता मला पुन्हा लिहिशील तेव्हा नव्या पत्त्यावर लिही — C. Decrucq, rue du Pavillon 8, Cuesmes, near Mons. तू माझ्या भल्याचंच लिहितोस याची मला जाणीव आहे.  

तुझा, 
व्हिन्सेन्ट.

***

पत्र क्र. ८६५ 
प्रेषक : व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ. 
प्रति : थिओ व्हॅन गॉघ. 
सेंट रेमी डी प्रोव्हेन्स,
मंगळवार, ०१ मे १८९० च्या सुमारास.

प्रिय थिओ,

आज, मिस्टर पेरॉन # परत आल्यावर, मी तुझं प्रेमळ पत्र वाचलं. घरूनही काही पत्रं आली आहेत, त्यामुळे मला थोडी ऊर्जा मिळाली. खरं म्हणजे, सध्याच्या निराश मनःस्थितीतून बाहेर पडायला मदत झाली. तू पाठवलेल्या एचिंग्जबद्दल आभार. मला जी आवडत होती तीच तू निवडली आहेस — द डेव्हिड, द लाझरस, द समारितान. यात एक मोठं एचिंग आहे जखमी माणसाचं, एक लहान आंधळ्या माणसाचंही आहे. शेवटचं एक एचिंग इतकं गूढ आहे, त्याचा अर्थ जाणून घ्यायचीच मला भीती वाटते आहे. पण हा लाझरस ! आज सकाळी मी त्याचं एचिंग तेपुन्हा एकदा पाहिलं, आणि चार्ल्स ब्लँक त्याबद्दल काय म्हणतो, किंवा तो जे खूप काही म्हणत नाही, तेही मनाशी आठवलं. 

दुर्दैवाची गोष्ट अशी, की इथल्या लोकांमधे नको इतकं कुतूहल आहे, पण चित्रकलेच्या बाबतीत ते अत्यंत निरुत्साही आणि अनभिज्ञ आहेत; त्यामुळे माझं काम चालू ठेवणं कठीण जातं. एक नेहमी लक्षात येतं की आपले प्रयत्न एकमार्गी चालूच राहतात, काहींना ते समजू शकतात, काहींना नाही. अशा परिस्थितीत केवळ दुःख वाट्याला येतं. माँटपेलियरला जाणं झालं तर वास्तव परिस्थिती जाणून घेता येईल. पण आता तू उत्तरेकडे परत येण्याचा प्रस्ताव दिला आहेस, तो मी स्वीकारला आहे. माझं जगणं इतक्या कठीण परिस्थितीत आहे की काहीही लाथाडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे माझी काम करण्याची उरलीसुरली शक्ती गमावून बसणं ठरेल. 

गोगॅं आणि गिलोमिन या दोघांना आल्पाइल्स लँडस्केपच्या देवाणघेवाणीत रस आहे. याशिवाय, अजून दोन पेंटिंग्ज आहेत फक्त मला असं वाटतं की तुला जे मी नुकतंच पाठवलं आहे, ते माझं सर्वांत शेवटी संपलेलं काम आहे, आणि ते मी जरा अधिक निश्चयपूर्वक केलं आहे, त्याची अभिव्यक्ती जास्त अचूक झाली आहे.

मी कदाचित रेम्ब्राच्या पेंटिंगवरून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, महत्त्वाचं म्हणजे, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे, प्रार्थनेत असलेल्या पुरुषाला तेजस्वी पिवळ्यापासून जांभळ्या छटेपर्यंतच्या श्रेणीत रंगवायचं.

गोगॅंचं पत्र सोबत जोडलं आहे. चित्रांच्या देवाणघेवाणीच्या संदर्भात तुला जे योग्य वाटेल ते कर. तुला जे आवडेल ते तू तुझ्याकरिता ठेव. आपल्या दोघांची आवड जास्तीत जास्त एकसारखी होत चालली आहे, असं मला खात्रीपूर्वक वाटतं. 

खरंच, या असल्या घाणेरड्या आजारपणाशिवाय मला काम करता आलं तर! कितीतरी गोष्टी करू शकलो असतो मी अजून — सर्वांपासून दूर, एकांतवासात, केवळ हा भूप्रदेश मला जे सांगत आहे त्यानुसार रंगवत राहणं. पण हो, हा प्रवास चांगला आहे, आणि आता खऱ्या अर्थाने संपला आहे. मला सांत्वना देणारी आता एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुला पुन्हा भेटण्याची इच्छा. तुझ्या भेटीची तीव्र आस मला लागून राहिली आहे. तू, तुझी बायको आणि तुझं मूल, आणि माझ्या दुर्दैवी कालखंडात मला साथ देणारे माझे अनेक मित्र, या सर्वांचा विचार सातत्याने मनात येत राहतो, तो मी थांबवू शकत नाही. 

मला निश्चित खात्री आहे की उत्तरेत आल्यावर मला लवकरच बरं वाटेल, निदान एक मोठा काळ — पुन्हा काही वर्षांनी हा आजार मागे लागणार याची खात्री आहे, अगदी लगेच नाही, पण तोवर तरी — मी चांगला असेन. इथल्या इतर रुग्णांचं निरीक्षण केल्यावर माझी ही कल्पना झाली आहे. यांतले काही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, काही तरुण आहेत, त्यांतले बरेचसे आळशी विद्यार्थी आहेत. अर्थात, आपल्याला याची फार माहिती नाही. 

सुदैवाने आईने आणि आपल्या बहिणीने पाठवलेली पत्रं मनाला खूप शांतवणारी होती. आपल्या बहिणाबाई छानच लिहितात. एखाद्या लँडस्केपचं किंवा शहराच्या एखाद्या पैलूचं वर्णन ती करते तेव्हा एखाद्या आधुनिक कादंबरीचं पान वाचत आहोत असं वाटतं. मी कायम तिला घरगुती गोष्टींमधे व्यग्र राहा, कलात्मक गोष्टींकडे कमी लक्ष दे, असं आग्रहाने सांगत राहतो; कारण तिचा स्वभाव खूप जास्त संवेदनशील आहे हे मला माहीत आहे, आणि तिच्या या वयात तिला स्वत:चा कलात्मक विकास करणं सोपं जाणार नाही. तिच्यातल्या कलात्मक जाणिवा अकाली उखडल्या गेल्या तर त्याचा तिच्या इच्छाशक्तीवर परिणाम होईल याची मला फार भीती वाटते. पण ती खूप उत्साही आहे, झालेलं नुकसान ती सहज भरून काढू शकेल. माझ्या सध्याच्या परिस्थितीविषयी मी मिस्टर पेरॉन यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं की इथलं वास्तव्य अजून सहन करणं माझ्यासाठी जवळजवळ अशक्य आहे, माझ्या पुढच्या उपचारांची दिशा अजून स्पष्ट नसल्यामुळे उत्तरेकडे परत जाणं मला श्रेयस्कर वाटतं. 

जर तुलाही ही कल्पना चांगली वाटत असेल, आणि जर मी पॅरिसला पोहोचण्याची अपेक्षित तारीख तू सुचवू शकलास, तर इथून कोणाची तरी सोबत घेऊन मला तारासकॉनपर्यंत किंवा ल्योनपर्यंत येता येईल. मग पॅरिसच्या स्टेशनवर तू किंवा इतर कोणी मला घ्यायला येऊ शकाल, तुला जे योग्य वाटतं ते कर. माझं फर्निचर मी काही काळापुरतं आर्ल्समधेच ठेवीन. मित्रांकडेच असेल ते, त्यामुळे मला हवं असेल त्या दिवशी ते माझ्याकडे पाठवून देतील याची मला खात्री आहे. पण वाहतुकीचा आणि पॅकिंगचा खर्च जवळजवळ तितकाच असेल. हा प्रवास भंगारात काढलेल्या जहाजाचा आहे असं मी समजतो; पण ठीक आहे, प्रत्येकालाच त्याच्या मनात आहे तसं करता किंवा वागता येत नाही.

थोडं बरं वाटलं की मी पार्कमधे फिरायला बाहेर पडतो, त्या वेळी कामाबद्दलची सर्व स्पष्टता मनात लख्ख दिसते. माझ्या डोक्यात इतक्या कल्पना आहेत की त्या सगळ्याच्या सगळ्या कृतीत उतरवणं अशक्य वाटतं. मला स्वतःलाच त्या चकित करत राहतात. माझे ब्रशस्ट्रोक्स एखाद्या मशीनसारखे वेगात पडतात. हे सगळं बघता, मला मनातून विश्वास वाटतो की उत्तरेत आल्यावर मला माझा आत्मविश्वास पुन्हा कमावता येईल. सध्या माझ्या आजूबाजूला जे वातावरण आहे, जी परिस्थिती आहे, तिचं आकलन मला अजूनही धड होऊ शकलं नाहीये, ते व्हावं अशीही इच्छा नाही; फक्त त्यातून मुक्तता मिळायला हवी. मग मी पुन्हा पूर्वीसारखं काम नक्की करू शकेन याची मला खात्री आहे. मिस्टर पेरॉननी तुला याबाबत लिहिलं हा त्यांचा दयाळूपणा आहे. ते आज पुन्हा तुला लिहिणार आहेत. त्यांना सोडून जावं लागण्याची खंत मनाला वाटते.

तू आणि जो (जोआना व्हॅन गॉघ, थिओ व्हॅन गॉघची पत्नी) यांच्याशी छानसं हस्तांदोलन करून मी हे पत्र संपवतो. तिच्या पत्राबद्दल मी तिचा खूप आभारी आहे.

कायमच तुझा,
व्हिन्सेन्ट.

* ‘सी’ हा व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघने त्याच्या प्रेयसीसाठी योजलेला संकेतशब्द आहे.  
# सेन्ट रेमी रुग्णालयाचे प्रमुख.  

अनुवादित पत्रांची निवड, पत्रांच्या अनुवाद-प्रक्रियेविषयी तसेच व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ आणि थिओ व्हॅन गॉघ यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याविषयी शर्मिला फडके यांचे टिपण हाकारा च्या याच अंकात इथे वाचता येईल. 

शर्मिला फडके लेखक, कला-इतिहास अभ्यासक आहेत. ‘फोर सीझन्स’ ही पर्यावरण-कला-मानवी नातेसंबंधांचे चित्रण करणारी कादंबरी, कथा, लेख तसेच समकालीन तुर्की साहित्याचे अनुवाद त्यांच्या नावावर आहेत. त्या कला-इतिहास आणि कला-आस्वादाच्या कार्यशाळा घेतात. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *