Skip to content Skip to footer

‘मराठी गाइड’ची ‘आठवण’: आशुतोष पोतदार

Discover An Author

  • Writer

    आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक आणि संशोधक आहेत. आशुतोष यांच्या नावावर नाटक, कविता संग्रह, भाषांतर तसेच संपादने अशी सात पुस्तके असून ते मराठी आणि इंग्रजीमधून लेखन करतात.

    Ashutosh Potdar is an award-winning Indian writer of several one-act and full-length plays, poems, and short fiction. He writes in Marathi and English with seven books to his credit. He is Associate Professor of literature and drama at the Department of Theatre and Performance Studies (School of Design, Art and Performance), FLAME University, Pune. 

रस्त्याला लागून असलेल्या एका जुन्या पुस्तक-विक्रेत्याकडे ‘मॅट्रिक्युलेशन: मराठी गाइड (१९३५-३६)’ हे १९३५ सालचे शि. ल. करंदीकर लिखित पुस्तक मिळाले.  सव्वा रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन कोण केले आहे याची नोंद नाही.  करंदीकरांनी ‘गाइड’ला लिहिलेल्या प्रस्तावनेत दिल्याप्रमाणे हे पुस्तक लिहिण्याआधी चार-पाच वर्षे ते मराठी गाइड लिहिण्याचे काम करतात पण गाइडला प्रस्तावना मात्र त्यांनी कधी लिहिली नाही. त्यामागचे कारण सांगताना ते लिहितात, “ गाइडचे महत्त्व तें काय व त्याला एखाद्या ग्रंथाप्रमाणे प्रस्तावना काय लिहावयाची असा विचार मनांत येऊन मी यापूर्वी केंव्हांच प्रस्तावना लिहिली नाही.” पुढे जाऊन, ते लिहितात, “पण, आजच्या माझ्या वृत्तपत्रव्यवसायाच्या निमित्ताने असे लक्षांत आले कीं, प्रस्तावनेदाखल चार शब्द लिहिले तर, ते विद्यार्थ्यांना नाही तरी शिक्षकांना उपयोगी ठरण्याचा थोडासा संभव आहे.”

‘मराठी गाइड’ च्या प्रस्तावनेत करंदीकरांनी मांडलेले मुद्दे विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातील शैक्षणिक विश्व समजून घेण्यास मदत करतील. काही मुद्दे पुढीलप्रमाणे:

  • मराठीच्या सगळ्या अभ्यासक्रमांत ज्या पुस्तकासंबंधी विशेष चिकित्सेनें लिहावें असे पुस्तक म्हणजे पद्यवेंचे हेंच होय. हें पुस्तक हातीं आल्याशिवाय गाइडच्या छपाईचें काम सुरु केल्यानें पुष्कळ वेळां फसगत होण्याचा प्रसंग येतो. यासाठीं विद्यापीठानें या पुस्तकांतील उतारे निदान एप्रिल महिन्यांत तरी मजसारख्याला सांगावे, अशी खटपट मी आज तीन वर्षे करीत आहें. पण, ती अजुनहि यशस्वी होत नाही.

  • विठ्ठलाच्या सीतास्वयंवर या प्रकरणांत दुस-या श्लोकाच्या चौथ्या चरणांत संपादकांनी ‘मुकुट’ असा शब्द छापिला आहे. अगोदर विठ्ठल कवीचे ग्रंथ सहज मिळत नाहीत. ते मिळून मूळचा बरोबर पाठ देखील माझ्यासारख्या गाइड लिहिणा-यालाच शोधून काढावा लागला तर, टीपा लिहिण्याच्या कामाला किती वेळ लागेल याची कल्पना कोणालाही करतां येईल. माधव चंद्रोबांच्या प्रतीत ‘मुकुट’ शब्दाबद्दल ‘मुकुर’ शब्द आहे तो घेऊन अर्थ बरोबर लागतो हें ठरविण्याचे  काम संपादकांचे आहे. मोरोपंतांच्या आर्यकेकावलींत तर अनेक दुर्बोध स्थानें आहेत. अगोदर हे आख्यान अवघड. पंत पराडकरांनी मूळ पोथीवरुन आख्यान छापीत असतां कांही चुका नजरेआड केल्या. पंत पराडकरांच्या पुस्तकावरुन हे आख्यान घेतांना संपादकांनी कांही चुका केल्या. अशा त-हेनें हा चुकांचा गुणाकार होत जातो खरा पण, त्यायोगें मजसारख्या माणसाचे व सामान्य शिक्षकवर्गाचे अतोनात हाल होतात.

  • मुळ पोथीच्या ब्लॉकपाशी आर्याची तुलना करुन पदच्छेद तपासून, अपपाठ गाळून, आर्यांचे अर्थ बसविणें हें काम किती किचकट झालें असेल याचा अनुभव शिक्षकांना येईलच. वास्तविक पाहातां हे आख्यान निवडतांना अभ्यासक्रम मंडळांतील सभासदांनी असा प्रश्न स्वतःला विचारावयास पाहिजे होता कीं, या प्रकरणांतील सर्व आर्यांचा अर्थ आपण तरी सहज बसवूं शकूं का?

  • पुण्यामुंबईत रहाणा-या शिक्षकांना तेथील वाचनालयांतून ग्रंथांचा पुरवठा सहज होऊ शकतो; इतर ठिकाणीं ही सोय नसते. म्हणून काही संदर्भ ग्रंथांचा निर्देश करुन ही प्रस्तावना संपवितों. मराठी शब्दांचा अर्थ देणारे अनेक कोश आहेत व होत आहेत; पण, मोल्सवर्थच्या कोशाचें महत्त्व अद्यापहि कमीं झालेलें नाहीं. या कोशाइतकाच उपयुक्त असा दुसरा कोश प्रो. माधवराव पटवर्धन यांचा फ़ारसी-मराठीं कोश. जुन्या मराठी शब्दांचे अर्थ ठरवितांना कै. माडगांवकर यांच्या ज्ञानेश्वरीच्या अखेरीस दिलेल्या कोशाचाहि मला वारंवार उपयोग झालेला आहे. संस्कृत शब्दांचे अर्थ ठरवितांना मी बहुतकरून कै. ज. वि. ओक यांचा गीर्वाणलघु-कोश वापरीत असतो. पुणें येथील शब्दकोश मंडळाच्या बृहत्कोशाचे प्रसिध्द झालेले तीन खंड फ़ार उपयोगी आहेत हें सांगण्याचें वस्तुतः कांही कारणच नाही; पुराणातील वगैरे संदर्भ शोधुन काढण्याच्या कामीं विद्यानिधी सिध्देश्वर शास्त्री चित्राव यांच्या प्राचीन चरित्र कोशाइतका उपयुक्त असा दुसरा ग्रंथ क्वचितच आढळेल. प्राचीन मराठी वाङमयाच्या माहितीसाठी कै. विनायकरावजी भावे यांचा ‘सारस्वत’ हा ग्रंथ सर्वमान्य ठरलेलाच आहे. अर्वाचीन कवींपैकीं कित्येकांची माहिती महाराष्ट्र शारदा मंडळातर्फ़े प्रसिध्द झालेल्या ‘काव्यचर्चा’ या पुस्तकांत चांगल्या प्रकारें देण्यांत आलेली आहे.

‘मराठी गाइड’मधील ‘क्रमिक पुस्तकांचा अभ्यास’ या पहिल्या भागात अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या रमाबाई रानडे लिखित ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ बद्दल पुढील टिपण लिहिले आहे.

आमच्या आयुष्यातील कांहीं आठवणी

(द्रुत वाचनासाठी)

मराठी चरित्रवाङमयाचें प्राचीनत्व ब्रिटिश अमलापूर्वी होऊन गेलेल्या मराठी वाङमयांत चरित्रग्रंथ नव्हते असे विधान आज कोणी करुं पाहील तर तें मुळींच टिकण्यासारखें नाहीं. ज्ञानेश्वरीच्या सुमंगल अवतारापूर्वीच अवतीर्ण झालेलें महानुभावी पंथाचें वाङमय पाहिलें तर त्यांतहि चरित्रग्रंथ आढळतात. “या महानुभावी पंथाचा आद्यप्रवर्तक श्री चक्रधर स्वामीहा होता. याची अनेक चरित्रें या पंथातल्या लोकांनी लिहून ठेवली आहेत.” (महाराष्ट्र भाषा सरस्वतीच्या महालातील एक अज्ञात दालन: ले. कै. वि. ल भावे).

मुक्ताबाईचे अभंग पाहिले तर त्यांतहि आत्मचरित्रविषयक व ज्ञानेश्वरादिकांच्या चरित्रविषयक माहिती सांपडते, हें मुक्ताबाईच्या ‘ताटीच्या अभंगां’वरुन सहज समजण्यासारखे आहे. नामदेव व त्याच्या प्रभावळींतील इतर संत मंडळी यांनीं निर्माण केलेल्या अभंगसागरांत चरित्र व आत्मचरित्र  या दोन्हीहि वाङमयप्रकारांचे टपोरे बिंदू पुष्कळच आहेत. तुकाराम महाराजांच्या ‘याति शुद्र वंश केला वेवसाय’ इत्यादि अभंगातहि आत्मचरित्रपर हकिकत आली आहे.

अशा रितीने, महाराष्ट्राच्या प्राचीन वाङमयात चरित्र व आत्मचरित्र या वाङमयप्रकारांचा उगम झाला. शिवसमर्थांच्या प्रभावशाली कालामध्यें महाराष्ट्राची व महाराष्ट्र-सारस्वताची सर्वांगीण वाढ झाली त्याप्रमाणेंच मराठी चरित्र वाङमयाचीहि त्या काळीं वाढ झाली. शिवरायाच्या अवतारकार्याचे वर्णन करणारी सभासद बखर शके १६१६ मध्यें म्हणजें इ.स. १६९४ मध्यें लिहिली गेली. समर्थांच्या सांप्रदायांतील शिष्य व शिष्यिणी यांनी लिहिलेली समर्थचरित्रपर माहिती प्रसिध्द झालेली आहे. महिपतीनें तर हें चरित्रलेखनाचें काम विशेष आस्थेनें केलें व गद्याशी येऊन भिडलेल्या ओवी छंदांत त्याने अनेक संतांची चरित्रें भक्तिभावानें गायिली.

पध्दति बदलली !

अशा प्रकारें इंग्रजी अमदानीपूर्वीचें वाङमय स्थूल मानानें पाहिलें असतां ही गोष्ट स्पष्टपणे लक्षांत येते कीं, चरित्रविषयक लिखाण लिहिण्याची पध्दत महाराष्ट्रात फ़ार प्राचीन काळापासून असून, हें लेखनकार्य लेखक व लेखिका अशा उभयंतानींहि केले आहे. इंग्रजी अमदानीपूर्वींची ही परंपरा इंग्रजी अमदानींतही कायम रहावी व वाढावी हे स्वाभाविकच आहे. अलिकडच्या काळांत जी चरित्रें मराठीत लिहिलीं गेलीं त्यांची पध्दति व इंग्रजी अमदानीपूर्वी मराठीत निर्माण झालेल्या चरित्रांची पध्दति यांत फार फरक आहे. पूर्वीच्या चरित्रांत चिकित्सक बुध्दि फार कमी प्रमाणांत आढळते. दंतकथा, अलौकिक चमत्कार, अदभूत प्रकार, इत्यादि साहित्यावर विसंबून राहून, चरित्राची सजावट करण्याकडे त्या काळच्या लेखकांचा विशेष कल असे. आजच्या चरित्रलेखकांतहि ह. भ. प. पांगारकरांसारखा एखादा लेखक असा निघतोच कीं, जो आपल्या चिकित्सक बुध्दीला क्षणमात्र गवसणी घालून, भाविकपणाच्या बळावर नाहीं त्या गोष्टी रंगविण्याला उद्युक्त होतो. पण एकंदरीत पहातां असें लेखक अपवादात्मकच मानावे लागतील. चिकित्साबुध्दि, पूर्वग्रहमुक्तता, कालविपर्यास न करण्याची खबरदारी इत्यादि गुणांचे महत्त्व ओळखून, मराठी चरित्रलेखक आपलें कार्य करुं लागलें असल्यामुळें, सुंदर चरित्रग्रंथांची भर मराठींत वाढत्या प्रमाणात पडत चालली आहे.

चरित्र नायकाला ति-हाईत समजून चरित्रलेखकाने चरित्र लिहावे, हा प्रकारच चरित्रांच्या बाबतींत विशेष घडतो. चरित्रनायकाबद्दल लेखकाला वाटत असलेला आदर अगर सांप्रदायिक अभिमान यांच्यामुळे लेखक व लेखनविषय यांच्यातील अंतर कित्येकवेळां बरेंचसें कमी झाल्यासारखे भासलें तरी, लेखक व लेखनविषय यांचे एकरुपत्व झाल्याचें मात्र क्वचितच आढळतें. चिकित्सक बुध्दि कायम ठेवणें, बुध्दिंचे डोळे उघडे ठेवणें इत्यादि गोष्टी टिकाऊ चरित्रलेखनाला अत्यवश्यक असल्यामुळें हा एकरुपत्वांचा अभाव दोषास्पद न ठरतां हितावहच ठरतो, असेंहि म्हणण्यास हरकत नाही.

दोन अपूर्व ग्रंथ

हें खरें असलें तरी वर्ण्यविषयाशी एकरुपत्व पावून लिहिलेल्या चरित्र ग्रंथांना एक प्रकारचे वैशिष्ट्य प्राप्त होतें, ही गोष्ट देखील नाकबूल करतां यावयाची नाही. कै. श्रीमती रमाबाईसाहेब रानडे यांनी लिहिलेला ‘आमच्या आयुष्यांतील कांही आठवणी’ हा ग्रंथ व श्रीमती लक्ष्मीबाई टिळक यांचा खंडशः प्रसिध्द होत असलेला ‘स्मृतीचित्रे’ हा ग्रंथ हे दोन्ही ग्रंथ मराठीत या दृष्टीनेंच अपूर्वत्व पावतील, यांत संशय नाहीं. कै. रमाबाईसाहेब रानडे यांनी लिहिलेल्या आठवणींचे महत्त्व तर मराठी वाङमयात विशेषच आहे. कारण, पत्नीनें आपल्या अलौकिक पतीच्या कर्तृत्वाची कल्पना देण्याचा मराठी वाङमयात केलेला हा जवळ जवळ पहिलाच प्रयत्न  होय, असे म्हणावयास हरकत नाही.

तुलनात्मक चार शब्द

‘आमच्या आयुष्यातील कांहीं आठवणी’ व श्रीमती लक्ष्मीबाई टिळक यांची ‘स्मृतीचित्रे’ या दोन ग्रंथांची तुलना करावयाची वेळ अद्याप आली नाहीं, हें खरें आहे. तथापि, मराठी वाङमयाला समृध्द करणा-या या दोघां विदुषींच्या कार्याबद्दल चार शब्द तुलनेने लिहिले तर, ते आज देखील सर्वस्वीं गैर ठरणार नाहींत. वहिनीसाहेब रानडे यांनी लिहिलेल्या या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत न्या. मू. रानडे यांचे सतशिष्य कै. नामदार गोखले यांनी पुढील विधान केलें आहे: “ पत्नीनें आपल्या पतीबद्दल अशा त-हेनें लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानांत आहे, असे वाटतें.” कोणत्याही ग्रंथाला तो पहिला असला म्हणजे कांही विलक्षण महत्त्व प्राप्त होतें त्याप्रमाणेंच त्याच्या पहिलेपणामुळेंच त्यामध्यें कांही उणिवाहि साहजिकपणेंच रहातात. वहिनीसाहेबांच्या या पुस्तकांतहि अशाच कांही उणीवा राहिल्या आहेत. आठवणी हा ग्रंथ कांहीशा घाईघाईनेंच लिहिला गेल्यामुळें, त्या ग्रंथांत मोठी व्यवस्था अगर मांडणी साधलेली नाही. स्वतःविषयीं फ़ारसे लिहावयाचें नाही, असा निर्बंध वहिनीसाहेबांनी स्वतःवर घालून घेतला असल्यामुळें, पुस्तक वाचीत असतां क्षणोक्षणीं असें भासतें कीं, माधवरावजींचे या पुस्तकांत रेखाटलेले चित्र सरस असलें तरी, त्यांत भर पडण्याला बरीचशी जागा शिल्लक राहिलेली आहे. वहिनीसाहेबांच्या ग्रंथाची भूमिका भाविकपणाची आहे. टीकाकाराच्या दृष्टीला माधवरावजींच्या चरित्रांतल्या कांहीं गोष्टी समर्थनीय वाटत नाहीत; वहिनीबाईसाहेबांच्या भाविक मनानें त्याही गोष्टींचे समर्थन केलेलें आहे. श्रीमती लक्ष्मीबाई टिळक  यांचे ‘स्मृतीचित्रे’ हे पुस्तक संथपणानें लिहिलें जात आहे व कविश्रेष्ठ टिळक यांच्या जीवनाचे यथार्थ दिग्दर्शन करणे हाच हेतू त्यांनी प्राधान्येंकरुन आपल्या दृष्टीसमोर ठेवलेला आहे. यामुळे ‘स्मृतीचित्रे’ या ग्रंथास टिळकांच्या चरित्राचे टीकाकार नांवे ठेवूं शकत नाहीत; इतकेच नव्हे तर, टीकाकारांना हा ग्रंथच अनेक ठिकाणी मार्गदर्शक होऊं शकेल. वहिनीबाईसाहेब रानडे व श्रीमती लक्ष्मीबाई टिळक यांच्या व्यक्तिमत्वामध्यें असलेला फरकहिं हीं दोन पुस्तकें वाचीत असता स्पष्टपणे निदर्शनास येतों.

नेमलेल्या ग्रंथांतील कांही विशेष  

‘आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी’ हे पुस्तक  वहिनीसाहेब रानडे यांनी आपल्या दिवंगत कन्येच्या आग्रहावरुन लिहावयास घेतलें व तें प्रसिध झालेलें पाहावयाला त्यांची कन्या इहलोकांत राहिली नाही. ही या ग्रंथाच्या इतिहासांतील गोष्ट कोणाहि माणसाच्या ह्रदयाला चटका लावल्याशिवाय राहणार नाहीं. ‘आठवणी’ हा ग्रंथ चरित्रवाङमयांत मोडत असला तरी, त्यांत सामाजिक इतिहास, धार्मिक समजुतींचा इतिहास, वगैरेंचे उल्लेख प्रसंगाप्रसंगानें आलेले असल्यामुळें, या ग्रंथाला सामाजिक दृष्ट्याहि फ़ार महत्त्व आलेलें आहे. कै. न्या. मू. रानडे यांनी आपल्या सर्वसंग्राहक बुध्दीचा उपयोग आपल्या काळच्या सर्वप्रकारच्या चळवळींना करुन दिल्यामुळे तत्कालीन इतिहासाच्या अभ्यासकालाहि हें पुस्तक आदरणीयच वाटेल. जुन्या काळच्या बाळबोध वळणाच्या महाराष्ट्रीय महिलांची भाषा किती सहजसुंदर असे, हें पाहणा-या रसिकाला तर, हा ग्रंथ अत्यंत आदरणीय वाटेल.

शि. ल. करंदीकर, पुणे, १९३५

‘मराठी गाइड’ मधे छापलेल्या काही जाहिराती

मराठी गाईड मधील ‘महत्वाची प्रश्नोत्तरे’ या विभागातील प्रश्न.

प्र.१- न्यायमूर्ती रानडे यांचे शिक्षण व त्यांचा बालस्वभाव यांबद्दलची माहिती संकलित रीतीनें सांगा.

प्र.२- प्रथम पत्नीच्या निधनानंतर माधवरावजींनी पुनःविवाह कां केला नाही? याबाबतींतलें त्यांचे वर्तन समर्थनीय ठरतें का?

प्र.३- स्वामी दयानंद सरस्वती यांच्यांबद्दलची माहिती थोडक्यांत सांगून त्यांच्य पुणे येथील मुक्कामांत झालेल्या प्रकाराचें थोडक्यात वर्णन करा.

प्र.४- पुण्यांतील चहा-ग्रामण्य प्रकरणाची हकिकत संक्षेपतः सांगून, या प्रकरणांतील माधवराव रानडे यांच्या वर्तनाचा खुलासा करा.

प्र. ५- ‘आमच्या आयुष्यांतील आठवणी’ या ‘पुस्तकांतील करमाळ्याचे दुखणे’ या भागाचें वाङमयदृष्ट्या परीक्षण करा.

प्र. ६- ‘आमच्या आयुष्यातींल आठवणी’ या पुस्तकांतील माहितीच्या आधारें ‘रानडे व त्यांचा काल’ या विषयावर सुमारें वीस ओळी लिहा.

प्र. ७ – ‘आमच्या आयुष्यांतील आठवणी’ या पुस्तकांवरुन माधवरावजींच्या वैयक्तिक गुणांसंबंधी तुमची काय कल्पना झाली आहे?

प्र. ८ – माधवरावजींवर आलेल्या प्राणांतिक दुखण्यांचा व संकटांचा वृत्तांत संकलित स्वरुपाने सांगा.

प्र. ९-  ‘आमच्या आयुष्यांतील आठवणी’ हें पुस्तक लिहितांना रमाबाईसाहेब रानडे यांनी कोणची भूमिका पत्करिली आहे?

प्र. १०- “आठवणी हे पुस्तक म्हणजे रावसाहेबांचे साग्र संगतवार लिहिलेले चरित्र नव्हे”: कै.ना. गोखले यांच्या या विधानाचें खुलासेवार स्पष्टीकरण करा.

प्र. ११- ‘आठवणी’ या पुस्तकावरुन विठूकाकांचे स्वभावचित्र रेखाटा.

प्र. १२ – ‘आठवणी’ या पुस्तकावरुन रा. ब. शंकर पांडूरंग पंडित यांच्या बद्दलची माहिती संकलित स्वरुपांत द्या.

(मूळ लिखाणातील भाषा जशीच्या तशी ठेवली आहे.)

श्री. शि. ल. करंदीकर यांच्याबद्दल माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Post Tags

Leave a comment