निळ्या मृत्यूने मला
भानावर आणले नी
हलके हलके
गात्रं
पुन्हा
प्राणात उतरली…
कवितेच्या ओळी कागदावर उमटल्या. एका अनामिक जाणीवेनं भारल्यासारखं झालेलं. काहीसं अस्वस्थ पण आत कुठेतरी शांत. कवितेचे शब्द जाणिवेच्या खोल अस्पर्श स्तराला स्पर्शून आल्यासारखे वाटले. खूप काळानी रियाजाला बसल्यावर छान सूर गवसावा तसं काहीतरी. हा निळा रंग आयुष्यात अनेकदा वेगवेगळ्या संदर्भात भेटत राहिलाय. कधी मूर्त. कधी अमूर्त रूपात. त्याची शुद्ध, सात्विक अथांगता अनुभवताना मन कधी आनंदात, समाधानात बुडून गेलं. कधी अफाट पसरलेल्या निळाईत दडपून गेलं. महाभारतातल्या कृष्णासारखं. एकीक७डं आपल्या निळ्या-सावळ्या लोभस रूपानं अर्जुनाला प्रिय वाटणारा तर दुसरीकडं युद्धभूमीवर आपल्या विराट विश्वरूपदर्शनानं अचंबित करणारा, धनुर्धारी अर्जुनाला हादरवून टाकणारा !
निळ्याशी जोडलेल्या अनेक आठवणी आज पृष्ठभागावर येऊन तरंगायला लागल्यात. लहानपणी एका मराठी चित्रपटात कृष्णाची भूमिका केलेली. पहाटे उठून स्टुडिओत जायचं नि कृष्णासारखं दिसण्यासाठी अंगभर निळा रंग लावायचा. त्यावेळी पहिल्यांदा आरशात ते कृष्णरूप बघताना कितीतरी वेळ मी पहातच राहिलेले. क्षणभर समोरचा कृष्ण आपणच आहोत याचाही विसर पडलेला. जादुई फिलिंग होतं ते. नकळत हातातली बासरी ओठांशी गेली तेव्हा वास्तवाचं भान आलं. शाळेत असताना सकाळी प्रार्थनेच्या वेळी एका ओळीत उभ्या असलेल्या मुलींकडं बघताना सगळे रंग अदृश्य व्हायचे. प्रत्येकीच्या युनिफॉर्मच्या निळ्या रंगात एकरूप झालेल्या प्रार्थनेच्या शब्दांनी आजूबाजूचा आसमंत गडद झाल्यासारखा भासायचा. सुट्टी लागली की कोकणात महिनाभर मावशीकडे मुक्काम असायचा. त्यावेळी समुद्रावर मनसोक्त भटकणं व्हायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ,रात्र अशा दिवसातल्या वेगवेगळ्या प्रहरात लाटांचे बदलणारे रंग. कधी सोनेरी किरणांनी चमकणाऱ्या फिकट निळ्या लाटा,कधी सूर्यास्ताच्या लाल केशरी छटा पांघरल्यानं स्वतःचं निळेपण हरवलेल्या लाटा, कधी अंधाऱ्या रात्री लुकलुकणाऱ्या चांदण्यांची श्रीमंती ल्यालेलं गडद निळं आकाश स्वतःत सामावून घेतलेल्या लाटा. निळ्याची असंख्य रूपं !
नंतरच्या काळात आर्ट स्कूलमध्ये शिकत असताना रंगांची सोबत होतीच. निळ्या रंगाच्या अनेक छटा. कोबाल्ट ब्ल्यू,प्रशियन ब्ल्यू, अल्ट्रामरीन ब्ल्यू,स्काय ब्ल्यू,सेरेलीयन ब्ल्यू वेगवेगळ्या असंख्य आकृतीबंधातून, पोतातून प्रत्येक वेळी नव्या रूपात साकारलेला निळा. तेव्हापासूनच, नव्हे त्याआधीपासूनच बालपणातल्या असंख्य आठवणीतलं, कधी स्वतःच्या चित्रातलं, कधी आवडत्या व्हॅन गॉग, पिकासो यांच्या चित्रातलं निळेपण नकळत झिरपत राहिलं असावं.
आज सहज सुचलेल्या कवितेच्या काही ओळींनी, त्यातल्या ‘निळा मृत्यू’ या उल्लेखानं मनातले, तळातले, निळ्या रंगाचे कितीतरी संदर्भ क्षणात आठवून गेले. सगळंच अकल्पित कधीकधी आपल्या आत काय काय दडलंय, मुरलंय याचा थांगपत्ता आपल्यालाही नसतो. आणि कधीकधी अचानकपणे आयुष्यात न कल्पिलेल्या गोष्टी घडतात.
आपली जवळची, हक्काची माणसं अचानक काळाच्या ओघात विरून जातात. दुरावतात. परिस्थितीनं आलेलं एकटेपण दुःख,वेदना घेऊन येतं. आपलं भान हरपतं. आपण मौन होतो. अंतर्मुख होतो. काही काळ जगाशी संपर्क तुटतो आपला.असून नसल्यासारखे. हा निःशब्द काळ हळूहळू स्वतःकडं, आपल्यातल्या दुःखाकडं तिर्हाईत नजरेनं बघण्याचं बळ देतो. घाव घालून जखमी करणारा काळ आणि वेदनेचे व्रण भरून काढणाराही काळच. मौनाचा काळ ! मग वेलींचे वृक्ष होतात. आपल्या भूमीत शहाणपणाची बीजं आपोआप रुजत जातात. ‘निळा मृत्यू’ हा शब्द त्याचाच अंकुर असेल काय?
त्या ओळींकडं मी तटस्थपणे पहात राहिले. जणू त्या दुसऱ्याच कुणीतरी लिहिल्यासारख्या. आजपर्यंत कविता सुचणं म्हणजे काय हे अनुभवलं नव्हतं. तो प्रदेश माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी. अनभिज्ञ. मग या ओळींचा अर्थ काय? मृत्यूला रंग असतो? आणि असला तरी तो निळा? कसा? मृत्यू म्हणजे वियोग नि वियोग म्हणजे दुःख. मग दुःखाचा रंग निळा? असेल? मन विचारात हरवलेलं. का नाही? असू शकेल की. आत कुठंतरी हालचाल जाणवली आणि पृष्ठभागावर एक तरंग उठला. दुःखाचा महाकवी! मी महाकवी दुःखाचा,असं म्हणणारा, आपल्या सर्जनानं दगडाचं फुल करणारा. महाकवी ग्रेस ! त्यांचीच ती कविता. ‘निळाई’ !! कवितेतल्या सगळ्या प्रतिमा निळ्या रंगात भिजलेल्या. निळं ऊन, निळ्याशार वाटा, निळी पाखरं,निळी पालखी,निळे सूर.सगळं निळं.
अगदी दुःखही. निळं दुःख !!
‘निळे दुःखद चोचीत घेऊन आली
निळ्या पाखरांची निळी पाऊले…’
ग्रेसच्या शब्दांचं गारुड नि निळ्या प्रतिमांची जादू. कविता वाचल्यावर कितीतरी दिवस मनातल्या मनात पुनरुक्त होत राहिलेली. त्यातली नादमयता, लय, निळ्याचा ओलसर स्पर्श सगळं आत खोलवर मुरत, झिरपत गेलं. तरी प्रत्येक वेळी ‘निळे दुःख’ या शब्दाशी अडखळायला व्हायचं. दुःखाचा रंग निळा?
मग विचार करताना वाटलं आपल्या आयुष्यातली दुःख कोणती?त्यांचे रंग कोणते? प्रश्नांपाठोपाठ आई-बाबांची आठवण झाली. त्यांचं निघून जाणं माझ्यासाठी सर्वात मोठं दुःख होतं. दोघांच्याही आजाराचं निदान एकच. कॅन्सर !! आधी बाबा नि नंतर आई. बाबांना कॅन्सर झाल्याचं कळलं तेव्हा खूप उशीर झालेला. खूप मोठा धक्का होता तो.
आज बाबांच्या मृत्यूचा विचार करताना एक दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. आम्ही एका समुद्रकिनारी गेलोय. नेहमीप्रमाणे बाबा पोहायला समुद्रात उतरलेत.आम्ही किनाऱ्यावर उभे आहोत.अचानक बाबांना दम लागलाय. ते मदतीसाठी हाक मारतायत, तेवढ्यात एक मोठी लाट येते नि त्यांना घेऊन जाते. आम्ही फक्त असहाय्यपणे पाहतोय, हाका मारतोय.
पण ते कुठंच नाहीयेत. सगळंच खूप अनपेक्षित. भयावह. आजूबाजूला फक्त अंधार. काळाकुट्ट अंधार. त्या दुःखाचा, त्या मृत्यूचा रंग दुसरा असूच शकत नाही. काळा रंग होता तो.
मग त्या निळ्या दुःखाचा अर्थ काय ? की ती फक्त कवी कल्पना? पण कवीचा कुठलाच शब्द निरर्थक नसतो. ग्रेस सारख्या कवीचा तर नाहीच नाही. निळ दुःखं म्हणजे जगण्यातल्या अनुभवाला भिडणं ? त्याकडं सजगतेनं पाहणं? निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीतून चिमूटभर शहाणपण घेऊन प्रत्येक वेळी नव्यानं भानावर येणं? आत्मशोधाची पहिली पायरी?
विंदा करंदीकरांच्या ‘उंट’ या कवितेत निळ्या रंगाची एक प्रतिमा आहे. कवितेतला उंट निळ्या पिरॅमिडचा शोध घेतोय. ते म्हणतात…
‘दिसला का मग निळा पिरॅमिड
खूण तयाची एकच साधी
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी’
‘अहं ब्रह्मास्मि’चा साक्षात्कार…आत्मानुभूती. निळ्या रंगाचा आणखी एक अर्थ. इथं निळ्या रंगाला आध्यात्मिक वलय प्राप्त झालंय.
बाबा गेल्यावर काही काळ सगळं घरच मौन झालेलं. मी आणि आई. आमच्यात संवाद फारसा होत नसे. जे बोलायचं ते नजरेतून आणि स्पर्शातून. न बोलता बरंच काही सांगत होतो आम्ही एकमेकींना. सहसंवेदनेची पाळंमुळं हळूहळू आमच्या नात्यात घट्ट होत होती. आतली संवेदनशील मनं अधिक सजगपणे कृती करत होती. आतला आणि बाहेरचा काळाकुट्ट अंधार हळूहळू धूसर होत होता.
आईच्या कॅन्सरचं निदान झालं तेव्हा तिला हे कसं सांगायचं ? ते कसं स्वीकारेल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात ती खूप शांत होती. उपचार घेतले असते तर कदाचित तिचं आयुष्य थोडं वाढलं असतं. पण उपचार घ्यायला तिनं स्पष्टपणे नकार दिलेला. तिच्या निर्णयावर ती ठाम होती. मुळातलं शिस्तबद्ध आयुष्य अधिक काटेकोर झालेलं. प्राणायाम,ओंकार, जप, वाचन,घरातली कामं सगळं ठरल्याप्रमाणे. आधीसारखं जणू काही घडलंच नाहीये.
जाण्याआधी तिची इच्छा म्हणून आम्ही महाबळेश्वरला गेलेलो. मी आणि आई दोघीच. प्रवासाला निघण्यापूर्वी तिला थोडा त्रास जाणवत होता. पण ती निश्चिंत होती. त्या दीड वर्षातली आई खूप वेगळी होती. स्थितप्रज्ञ. अंतर्मुख. नंदादीपातल्या ज्योतीप्रमाणे सतत उजळलेली.
आज तिच्या मृत्यूकडे पाहताना नजरेसमोर एक विस्तीर्ण नदी उभी राहते. शांत,संथपणे वाहणारी.आजूबाजूला दाट झाडी, असंख्य वेली, पानं, फुलं, पक्षी. वातावरणात याआधी कधीही न अनुभवलेली प्रसन्नता. आई, मी, भाऊ आणि अदृश्य रुपातला तो. मृत्यू ! एका नावेत बसून प्रवासाला निघालोय.पलीकडच्या किनाऱ्यावर आईला सोडून परत यायचंय.आमचे हात नकळत एकमेकात गुंफलेत.एक वर्तुळ तयार झालंय. सगळ्या श्वासांची लय एकरूप झालीये. आई प्रसन्न पण निर्विकार वाटतीये. जणू हा प्रदेश तिच्या ओळखीचा आहे. मला थोडी हुरहुर वाटतेय पण मनातली भीती अस्वस्थता, अचानक नाहीशी झालीये. संपून गेलीये. सगळीकडं फक्त शांतता ! स्तब्धता ! आत्ममग्नता !
मृत्यूनंतरचा प्रवास कुठे सुरू होत असेल ? इथे ? या मौनाच्या प्रदेशात ? आणि मृत्यू म्हणजे तरी काय ? एक प्रकारे मौन होणंच? मौनाचा प्रदेश !! एक निरव निःशब्दता. त्या नि:शब्द रानातला अंतस् प्रवास ! जाणिवेतून नेणीवेकडे प्रवाहत जाणारा. आतल्या जिवंत अंधाराला उजळवून टाकणारा. स्वतःला स्वतःत विरघळवणारा.
मनातल्या पानगळीला आश्वस्त करणारा हा प्रदेश. मला तो तसाच भासला.
महेश एलकुंचवार यांच्या ‘बिंदूनादकलातीत’मधला मौनाचा प्रदेश ! तो हाच असेल काय ? सगळ्या अवकाशात फक्त एकच रंग. निळा ! माझ्या मौनाचा आणि आईच्या मृत्यूचाही.
छायाचित्र: मिलिंद करमळकर