Skip to content Skip to footer

मौनाचं कथन : आशुतोष पोतदार 

Discover An Author

  • Writer

    आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक आणि संशोधक आहेत. आशुतोष यांच्या नावावर नाटक, कविता संग्रह, भाषांतर तसेच संपादने अशी सात पुस्तके असून ते मराठी आणि इंग्रजीमधून लेखन करतात.

    Ashutosh Potdar is an award-winning Indian writer of several one-act and full-length plays, poems, and short fiction. He writes in Marathi and English with seven books to his credit. He is Associate Professor of literature and drama at the Department of Theatre and Performance Studies (School of Design, Art and Performance), FLAME University, Pune. 

मौन: शांतता, स्तब्धता किंवा अबोला; अफाट असतं मौन आणि गुंतागुंतीचंही. मौनाला समजून घेणं किंवा त्याचं आकलन करून घेणं सहज शक्य नसतं. तरीही, जो-तो आपल्या परीने मौनाबद्दल काही तरी म्हणत असतो. मौनाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. निर्मितीचा एखादा क्षण, निरिच्छा, अलिप्तता, शरणागती किंवा संवादाची कमतरता यातून मौन-निर्मिती होते. मनुष्य मात्र नेहमीच्या बोलायच्या, दाखवायच्या किंवा लिहायच्या भाषेत व्यक्त होऊ शकत नाहीत तेव्हा ते मौनाचा आधार घेतात. काही जण, विश्रांती म्हणूनही मौनात जातात. काहींसाठी मौन कधी स्वेच्छेने आलेले असू शकते, तर कधी ते लादलेले असते. नात्यांमध्ये कडवटपणा आला असेल तर शांतता पाळून, आपल्यात होणारे बदल निरखण्याचा मार्ग शहाणी माणसं पत्करतात. आंतरिक ऊर्जेने एखादा शोध घेण्यासाठी निघालेल्या भाविकाच्या प्रवासातला एक प्रगल्भ टप्पा मौनातून साधता येतो. 

मौन पाहिजे असतं आणि नकोही, अस्वस्थ करतं आणि उद्दीपितही. मौन बाळगणं आणि न बाळगणं या दोहोंमध्ये आपण असतो : कधी इकडं, कधी तिकडं, तर कधी अधेमधे. मौन आतलं असतं तसंच बाहेरचंही. आत आणि सभोवती गोंगाट सुरू असताना मौनाविषयी आपण काहीतरी म्हणू इच्छितो हे विशेष. अस्वस्थता घेरून असते तेव्हा स्वस्थतेविषयी आपण बोलतो असं काहीसं मौनाबद्दल होतं. भवतालच्या विशाल प्रक्रियांच्या जंजाळात जीवसृष्टीची स्थिती, गती आणि लय बदलत असताना किती नाना तऱ्हेचे आवाज सुरु असतात. वस्तुनिष्ठ आणि तर्कनिष्ठ अशा कितीतरी फूटपट्ट्या लावल्या तरी हे आवाज संपत नाहीत. मानवी शरीरात अव्याहत अशी सुरु राहणारी पेशीनिर्मिती प्रक्रिया, विघटन आणि पुनर्निर्मिती, ठराविक कार्य करत राहणारे पेशींचे समूह अव्याहत हलत, वागत असतात आणि अवयवांची प्रचंड अशी व्यवस्था ते राबवत असतात. शरीररचना आणि कार्याचा अभ्यास तज्ज्ञ करत असतातच पण वरवर जरी पाहिले तरी आपल्या ध्यानात येते की हे खरे आता त्या तिथे कुणी चुप्प बसलेले नसते. तसे नसे नसतात म्हणून आपण असतो, काही तरी ‘करत’ असतो. काही करत नसालो तरी मौनाचा तरी विचार करत असतो. अख्खी जीवसृष्टी काहीतरी म्हणत असते, हलत, बोलत असते तरी आपण सारे मौनाबद्दल विचार करत असतो. म्हणजे, मौन आणि मौनाबद्दल आपण काही तरी ‘म्हणतो’ म्हणजे एक प्रकारचा अंतर्विरोध. अशा अंतर्विरोधाला बरोबरीस घेऊन हाकारा | hākārā चा एकविसाव्या अंकाचा दुसरा भाग मौनाबद्दलचे लेख आणि कलाकृती मांडतो. 

मौनाविषयीच्या हाकारा | hākārāच्या हाकेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या भाषांत, रूपांत व्यक्त होणारे लेखक, कलाकार आणि अभ्यासक किती नानाविध तऱ्हेने, खोलवर संवाद साधू शकतात याची जाणीव झाली. मोठ्या प्रमाणात साहित्य आणि कलाकृती प्राप्त झाल्याने आम्हाला दोन भागात ‘मौन’ विषयाची मांडणी करावी लागली हे विशेष. मौनाला समोर ठेऊन  चपखल प्रतिमांची आणि विचारास चालना देणाऱ्या प्रतीकांची योजना केली जाऊ शकते याचे भान दोन्ही अंकात प्रकाशित साहित्य आणि कलाकृती देतात. आन्द्री गिदे हा लेखक आपल्या जर्नलमध्ये लिहिताना म्हणतो “मी गप्प बसायला शिकायला हवं.”  इथं गप्प बसायला शिकणं म्हणजे स्वतःला निरखणं. या अंकात प्रकाशित लेखक आणि कलाकार मौनावर भाष्य करताना निरखण्यासाठी अवकाश उभा करताना दिसतात. सभोवताल काय आहे, आपण कोण आहोत, आपण या विश्वात काय करत आहोत आपलं स्थान काय असे आणि इतर प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरे शोधणे यासाठी त्यांनी केलेली मांडणी आम्हाला महत्त्वाची वाटते. इथे दिसून येते की कलाकाराने रचनारूपात घेतलेला अल्पसा विराम किंवा पाडलेले खंड अभिव्यक्तीच्या रूपांना वेगवेगळे आयाम देतात. विराम आणि खंड जसे बदलतील तसे रचनासूत्र आणि अर्थनिर्णयनही बदलत जाते. किंचितसा विश्रांत घेत शब्द, वाक्य किंवा ध्वनी निर्मिती करताना स्वतःकडे आणि भवतालाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळू शकते याची जाणीव नवनिर्मिती प्रक्रियेत होत असते. दोन शब्द आणि सुरांतील रिकाम्या जागांतून सर्जनशील कलावंत काव्यरूप घडवत जातो. या घडण्यातून मौनाची एक गोष्ट बनते. हाकारा | hākārāत मौनाच्या वेगवेगळ्या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 

हाकारा | hākārā च्या २१ व्या अंकाच्या दोन्ही भागात प्रकाशित झालेले कौस्तव चॅटर्जी आणि पंक्ती देसाई यांचे अनुक्रमे वाराणसीतील वस्त्रनिर्मिती आणि गुजराती दलित चळवळीतील सक्रिय ‘आक्रोश’ हे  लघुनियतकालिक याबद्दल वाचताना असे जाणवते की ‘मौन’ म्हणजेच सर्व काही नव्हे. मौनापलीकडेच्या आवाजाचेही आपले जग आहे. मग, वाटतं की मौनाचं फारच कौतुक करतात लोक. मौनात कसं काय सामर्थ्य असतं किंवा मौनाची भाषा कशी सुंदर असते इत्यादी इत्यादी रोमँटिक, हळवं, स्वकेंद्रित जगाभोवती फिरवणारं जग समोर येतं. मौन बाळगता येणं हाही एक प्रकारचा विशेषाधिकार काही जणांना मिळत असतो किंवा काही जण तो घेत असतात. काही जणांसाठी हे शक्य असतं. पण मग उस्फूर्तपणे व्यक्त व्हायचं असेल तर? एखादी छान मैफल सुरू आहे किंवा आपण एखादं चित्रप्रदर्शन पाहताना आपण सहज ‘वाह’ म्हणण्याचं स्वातंत्र्यही मौन बाळगण्याच्या दबावाखाली गमावत असतो. त्याच बरोबरीने, ज्यांचं जगणंच नाकारलं जातं त्यांनी किंवा त्यांच्यासाठीही ‘मौनव्रत’ बाळगणं शोषणाचं एक रूप ठरू शकतं. यातून सत्ताकारणात फायदे मिळतील किंवा राजकीय दृष्ट्या लखलाभ होईल. पण, एखाद्या वास्तवाची, सत्याची एखादी बाजू अंधारून टाकली जात असते. अनाठायी ‘मौनव्रत’ घेण्यातून आपण विशिष्ट अभिव्यक्ती, व्यक्ती किंवा संपूर्ण समाज आणि त्यांचे विचार नाकारत असतो. अशावेळी साखरेच्या पाकात घोळवून मौनाला गोड-गोजिरे रूप देण्यातून विश्वातील गुंतागुंतीला आपण नजरअंदाज करत असतो. म्हणून कधी-कधी नको ते मौन, डावपेचात्मक मौन असे वाटून सुजाण माणूस आणि विचारी समाज अस्वस्थ होत असतो. 

मौन आणि आवाज एकमेकांच्या संबधात पाहायला हवेत. दोहोंचे आंतरिक संबंध असतात आणि एकाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व असणे कठीण असते. आंतरिक शांतीबाबत बोलता-बोलता किंवा ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करताना व्यापक अशा सामाजिक आणि राजकीय अवकाशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याचे भान मौनीबाबांना असणे गरजेचे ठरते. तसेच, अशा मौनीबाबांना वेगवेगळे आवाज ऐकवत जागे ठेवण्याची सतर्कता अवती-भवती असायला हवी हेही महत्त्वाचे बनते.  जगातील तमाम प्राणीमात्रांना मौन बाळगण्याचे विशेषाधिकार असतील असे नाही. किंबहुना, मौन-केंद्रित अभिव्यक्तीचे आणि त्यातील सौंदर्य-तत्त्वांचे गौरवीकरण करण्यापेक्षा विश्वातील गुंतागुंत समजून घेऊन मौन आणि आवाज एकाच वेळी असू शकतात याबद्दलचे भान असले पाहिजे. निर्मिती प्रक्रिया आणि अभिव्यक्तीचे रूप अशा गुंत्यांसोबत आकारत असते. मौनाबद्दलचे सिद्धांतन सर्वसाधारीकरणातून न होता कालावकाशाच्या संदर्भात व्हायला हवं अशी इच्छा बाळगून मौनाला मांडण्याचा प्रयत्न आम्ही या वर्षीच्या हाकारा | hākārā मध्ये केला आहे.  

*

सरत्या वर्षात संपूर्ण ताकदीनिशी आम्ही हाकारा | hākārā प्रकाशित करू शकलो नाही. याचे एक कारण व्यक्तिगत आहे आणि दुसरे, हाकारा | hākārā च्या नव्या संकेतस्थळाचे काम. या वर्षातला आमच्यापैकी काही जणांचा बराच काळ आजारपणात गेला. तसेच, आयुष्यातली प्रिय, जवळची व्यक्ती गमावण्याने आयुष्यं ढवळून जाण्याचा अनुभव आम्ही घेतला. अशा काळात पाय रोवून उभं राहण्याचं बळ कथनं देतात असं मला वाटतं. मग, ही कथनं गोष्टींची असतील, शब्दांची किंवा दृश्यांची. हाकारा | hākārā हे असंच एक कथन जे मला बळ देत आलं आहे. मौनाविषयीचा हा अंक नव्याने उभं राहण्याची खूण. 

सात वर्षांपूर्वी सुरू झालेला हाकारा | hākārā कथनाचा प्रवास आता अधिक समृद्ध होतोय तो जुन्या-नव्या सहकाऱ्यांच्या सोबतीने नवीन संकेतस्थळाच्या रूपात. वेगवेगळ्या चढ-उतारात आपल्या सर्व क्षमतांनिशी हाकारा | hākārā ची दीर्घकाळ सोबत करणाऱ्या पूर्वी राजपुरिया, मयूर सलगर आणि हाकारा | hākārā च्या इतर सहकाऱ्यांबरोबर नवं रूप आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. संकेतस्थळाची  संकल्पना, रेखाटन, मांडणी करण्याची कल्पना मितवा अभय वंदनाने मांडली आणि त्याचे दृश्यरूप उभे करण्याची योजना त्याच्या तसेच सौरभ गावंडेंच्या संकेतस्थळ-विकास-सहकार्यातून मूर्त रूपात आपल्यासमोर येत आहे.

नव्या कल्पना आणि मांडणीसह आपण नव्या वर्षात परत भेटू.   

छायाचित्र : प्रसांता घोष 

Post Tags

Leave a comment