संचार १: प्रवेग
शांतिधाम चौकाच्या
फक्त शंभर फूट आधी
Inflammable अर्थात ज्वलनशील
हे भक्कम बिरुद अंगावर मिरवणारा
जाडसर ट्रक
संथपणे
अनोळखी आगीत तेल टाकायला
रवाना झाला
एक वेधक कट मारून जाणाऱ्या
चाळिशीतल्या लेडी कार ड्रायव्हरला
टू व्हिलर वाल्यानं
सभ्यापेक्षा जास्त आणि असभ्यापेक्षा कमी
शब्दाची शिवी हासडली
गणवेषातल्या सिनियर सिटीझन रिक्षावाल्यानं
स्टायलिश तंग अर्धी चड्डी घातलेल्या
सेमी-फिट सायकलवाल्याच्या आसपासचा
उंची आसमंत
गनिमी काव्यानं काबीज केला
प्रेमानं आठ पॅसेंजर भरलेल्या सिक्स सीटरनं
ढाल म्हणून उगारलेल्या
काळ्याशार धुरातून
हेल्मेटमधून दिसणाऱ्या चष्मेवाल्याच्या डोळ्यांतले
अंगार धुमसून तरारले
दंडरुपी प्रायश्चित्ताच्या प्रतीक्षेतल्या
पाच अपराध्यांच्या
गराड्यात उभ्या पोलिसमामानं
चहुदिशांना फिरवूनही
सिग्नलअभावी अपंगत्व आलेल्या
कार्डाच्या मशीनवर
जोरात चापट मारली
एका गच्च फ्लेक्सवर बसून कावलेल्या
किरमिजी कबुतरानं
पोटातला शुभ्र ऐवज
एका निरागस नवीन टेम्पोच्या दिशेनं
गुरुत्वाकर्षणाकडे सोपवला
माझ्या कॅब ड्रायव्हरकडून
विसाची जीर्ण पण शाबूत नोट
घासाघीस करून घ्यावी लागल्यानंतर
टोलवाल्यानं
एका अनिर्दिष्ट दिशेनं
गुटख्याची रौद्र पिंक टाकली
मीही
एक कविता लिहिली
***
संचार २ – प्रवास
मी घट्ट प्रवास मिठीचा
पण थांबत थांबत जातो
तू झुकता स्पर्श दिठीचा
पण अंतर कापत येतो
मी चावे अधरदिव्याचे
घेता घेता जळणारे
तू चुंबन श्वासधुराचे
देता देता विरणारे
मी आकर्षण घुमणारे
अंगात जणू आलेले
तू अन्वेषण रमणारे
खोलात शिरू गेलेले
मी काय कुणाचा कोण
हा गुंता सुटतच नाही
तू खोल कशाची खूण
हृदयाला स्मरतच नाही
निरखून तुला बघताना
नजरेत तुझ्या मी कळतो
एकेक उरी छळणारा
मग प्रश्न मला उलगडतो
तू कोण प्रिये सलणारी?
तू माझी प्रेमळ व्याधी
मी कोण प्रिये उरणारा?
मी शांत तुझीच समाधी
***
संचार ३ – थिजणे
आत दाटलेला राग
कोणावर आहे
माणसांवर, माझ्यावर
का
काळाच्या घरंगळून गेलेल्या
चार थेंबांवर
एका अनोळखी रात्रीत
वेसुवियसचा उद्रेक होऊन
त्या लाव्हाशयात
पॉम्पेई मधल्या प्रत्येक माणसाचा
नकळत
निर्जीव पुतळा झाला
तसंच माझ्या रागाच्या
अंतरुद्रेकात तयार झालेलं
स्मृतींचं
निर्जीव शहर…
उद्या सहलीचं ठिकाण बनणार नाही
हीच माफक अपेक्षा
***
संचार ४ – एंट्रोपी
एका विचाराचा बसका दगड
पाण्यावर भाकऱ्या टाकाव्यात
म्हणून मी उचलला
आणि कल्पनांच्या बहुरंगी पक्ष्यांचा थवा
अनपेक्षितपणे
सरोवर सोडून सैरावैरा उडून गेला
मला मोकळा वेळ घालवायचा होता
त्यांना काही काळ घर हवं होतं
—
संचार ५: प्रसार
सुंदर वाहून गेले तरीही
सुंदर सुंदर उरते काही
नजरेच्या पागोळ्यामधुनी
सुंदर सुंदर झरते काही
सुंदर होते दाट हवेच्या
काठावरची भेदक नक्षी
सुंदर गातो सूर पसरुनी
मौनाचा अवघडला पक्षी
क्षण वातीच्या झुरण्याइतका
सुंदर होतो अन् फडफडतो
गार दिशेला ओघळणारा
काळ थबकतो, सुंदर घडतो
सुंदर होते दूर जवळचे
सुंदर होते आधी नंतर
सुंदर दिसते दुस्तर जे ते
सुंदर अपुले सूचक अंतर
सुंदर तू अन् सुंदर विश्वे
सुंदर सुंदर काही बाही
सुंदर इतके आटवले की
सुंदर सुंदर झालो मीही
***
संचार ६: विघटन
सख्या विसरून जा रस्ता मला सोडून जाताना
जरासे घट्ट अन् ते दार घे ओढून जाताना
चिरा एकेक भिंतीचा कसा रचला कुणी रचला
घराला हेच आठवते कसे मोडून जाताना
जरासा प्रश्न पडतो अन् फुलाची पाकळी गळते
कसे उमलायचे रे आत कोमेजून जाताना?
मलाही ज्ञान नव्हते फारसे या चक्रव्यूहाचे
कसे माझे पुन्हा व्हावे तुझे होऊन जाताना
तुला चिंता नको माझ्या वृथा विच्छिन्न चेहऱ्याची
नको पाहूस खाली प्रेत ओलांडून जाताना
***