मूळ भाषण: आल्बेर काम्यू

मराठी भाषांतर: ओंकार गोवर्धन

मानवी पेच



back

मार्च २८, १९४६

सभ्य स्त्री पुरुषहो,

जेव्हा अमेरिकेहून मला या व्याख्यानांच्या मालिकेकरता बोलावणं आलं तेव्हा मी जरा बुचकळ्यात पडलो. माझ्या मनात काही शंका आल्या आणि थोडी अनिश्चितता सुद्धा तयार झाली. एकतर व्याख्यानं देण्याच्या वयाचा मी अजून झालेलो नाही. दुसरं म्हणजे सर्वमान्यपणे ज्याला सत्य समजतात त्या गोष्टीवर माझा कुठलाही अधिकार मी मानत नाही. यामुळेच कुठलीही कप्पेबंद विधानं करण्यापेक्षा विचारप्रक्रिया मी अधिक मोकळेपणानं/ सहजतेनं करू शकतो.

मी ह्या शंका बोलून दाखवल्या तेव्हा ‘तुमचं व्यक्तिगत मत महत्त्वाचं नाही’ असं मला अत्यंत नम्रपणे सांगण्यात आलं. मी फ्रान्सच्या बाबतीत काही वस्तुस्थिती मांडावी ज्यायोगे माझे श्रोते स्वत:चं मत तयार करू शकतील हे महत्त्वाचं होतं. फ्रेंच नाटक, फ्रेंच साहित्य, फ्रेंच तत्त्वज्ञान यांच्या सद्यस्थितीबद्दल मी काही माहिती सांगावी अशी सूचना मला करण्यात आली. यापेक्षा फ्रेंच रेल्वे कामगारांचे असामान्य प्रयत्न किंवा उत्तर फ्रान्समधल्या कोळसा खाण कामगारांचं काम याबद्दल बोललेलं जास्त लक्षवेधी होईल असं मी त्यांना म्हटलं.

पण मग मला असं सांगितलं गेलं की माणसानं स्वत:च्या प्रतिभेवर बळजबरी करू नये. ह्या विषयांवर त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींनी बोललेलं बरं. हे म्हणणं बरोबरच होतं. मला रेल्वेरूळाबद्दल काहीही माहिती नाही. दीर्घकाळ माझा रस साहित्यिक प्रश्नांमध्ये आहे. त्यामुळे मी रेल्वेपेक्षा साहित्याबद्दल बोलणं हे नैसर्गिकच आहे.

शेवटी माझ्या लक्षात आलं.

मी मला माहीत असलेल्या गोष्टींबद्दल बोलावं आणि फ्रान्समध्ये आत्ता काय घडतं आहे याचा थोडा प्रत्यय द्यावा हे महत्त्वाचं होतं. आणि याच कारणासाठी मी नाटक किंवा साहित्य यावर न बोलण्याचं ठरवलेलं आहे. साहित्य, नाटक, तत्त्वज्ञान, संशोधन आणि एखाद्या राष्ट्राचे संपूर्ण प्रयत्न हे एकच मूलभूत गोष्ट ध्वनित करत असतात. ती म्हणजे: जीवनासाठी आणि मानवतेसाठी केला जाणारा संघर्ष होय. आणि आज तर ह्या संघर्षानं आपली मनं व्यापून टाकलेली आहेत.

मानवता अजूनही धोक्यात असल्याची फ्रेंच लोकांना जाणीव आहे. जगायचं असेल तर संपूर्ण जगाला ग्रासून राहिलेल्या या पेचप्रसंगातून मानवता या संकल्पनेचा बचाव केलाच पाहिजे याची सुद्धा फ्रेंच लोकांना जाणीव आहे. माझ्या देशावरच्या निष्ठेपोटी मी याच मानवी पेचप्रसंगाबद्दल बोलायचं ठरवलेलं आहे.

मला ज्याबद्दल माहिती आहे तेच मी इथं मांडणार आहे. मग मी काय करू शकेन? तर मी माझ्या पिढीच्या नैतिक अनुभवांचं शक्य तितकं स्पष्ट चित्र काढू शकेन. आमच्या पिढीनं हा पेच तयार होताना पाहिलेला आहे. आमच्या अनुभवामुळे कदाचित मानवजातीच्या नियतीवर थोडा प्रकाश पडू शकेल. तसंच, आज फ्रेंच लोकांच्या जाणिवा काय आहेत हे सुद्धा थोडंफार समजू शकेल.

सर्वप्रथम मला तुमच्यासमोर माझ्या पिढीची व्याख्या करायला आवडेल.

फ्रान्स आणि युरोपातली माझ्या वयाची माणसं एकतर पहिल्या महायुद्धाआधी किंवा त्याच्या दरम्यान जन्माला आली. जागतिक मंदीत ती मोठी झाली, आणि हिटलरचा उदय पहात त्यांनी विशी गाठली. त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मग स्पेनमध्ये यादवी युद्ध झालं, म्युनिक करार झाला, १९३९ मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं, १९४० मध्ये फ्रान्सचा पाडाव झाला, मग पुढची चार वर्षं शत्रूताबा आणि भूमिगत संघर्ष यात गेली.

मला वाटतं ही पिढी एक लक्षवेधी पिढी म्हणून ओळखली जाते. त्यामुळं फक्त माझ्या वतीनं न बोलता मी या फ्रेंच पिढीच्या वतीनं बोलणं संयुक्तिक ठरेल. ही पिढी आज साधारण तिशीत आहे. या पिढीच्या बुद्धीची आणि मनाची सर्व जडणघडण या भीषण वर्षांमध्ये झालेली आहे. शरमेवर पालनपोषण झालेली आणि विद्रोही म्हणून जगलेली ही पिढी आहे. तरीही ही एक लक्षवेधी पिढी आहेच.

मोठ्यांनी रचलेल्या असंगत जगाला सामोरं जाताना या पिढीनं कशावरही विश्वास ठेवला नाही. यांना कायम विद्रोहाची आस लागलेली होती. या काळाच्या साहित्यानं सुबोधतेविरुद्ध, कथानकाविरुद्ध आणि एकूणात वाक्य या कल्पनेविरुद्धच बंड पुकारलेलं होतं. चित्रं अमूर्त होती. मूर्तता, वास्तववाद आणि साधा सुसंवाद याविरुध्द हे बंड होतं. संगीतानं माधुर्य नाकारलं होतं. सत्य नसतंच, फक्त संकल्पना असतात असं आम्हाला तत्त्वज्ञान सांगत होतं.

आमच्या पिढीचा नैतिक कल तर अधिकच ठामपणाकडे झुकलेला होता. राष्ट्रवाद हे कालबाह्य सत्य आणि धर्म ही पळवाट असं आम्हाला ठामपणे वाटलं. शुद्धतेच्या, शुचितेच्या कुठल्याही भावनेला हटकून प्रश्न करावे आणि कधीच कोणीच चूक नसतं कारण प्रत्येकच जण कदाचित बरोबर असू शकतो हा निष्कर्ष काढावा हा धडा २५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणानं आम्हाला शिकवला.

या सगळ्यात आमच्या समाजाची पारंपरिक नीतीमत्ता जशी होती तशीच राहिली. अवाढव्य खोटारडेपणा असं तिचं वर्णन करता येईल. या सगळ्यामुळे आम्ही नकारामध्ये जगलो. अर्थात, यातही नवं काहीच नव्हतं. इतर देशांमधल्या इतर कालखंडात इतर पिढ्यांना हा अनुभव आलेला होताच. मात्र पारंपरिक मूल्यांशी पूर्णतः फटकून वागणाऱ्या या माणसांना कत्तल आणि दहशतीच्या संदर्भाशी मात्र आपली व्यक्तिगत भूमिका जुळवून घेणं भाग पडलं. हे या अनुभवाचं नवेपण आहे. आणि या क्लेशकारक विरोधाभासात जगल्यामुळे मानवी पेचप्रसंग उद्भवू शकतो हे आम्हांला या परिस्थितीनं पटवून दिलं. नरकात प्रवेश केल्याप्रमाणे आम्ही युद्धात प्रवेश केला.(नरक म्हणजे अस्वीकार हे खरं मानल्यास.) युद्ध किंवा हिंसा यापैकी कशावरच आमचं प्रेम नव्हतं. तरीही आम्हांला युद्ध मान्य करावं लागलं आणि हिंसेत भाग घ्यावा लागला. तिरस्काराशिवाय ज्यांनी कशाचाही तिरस्कार केला नाही त्यांना हे तिरस्काराचं अवघड शास्त्र शिकणं भाग पाडलं गेलं. आम्हाला दहशतीशी संगनमत करावं लागलं, किंबहुना दहशतीनं आमच्याशी संगनमत केलं. आम्ही ज्या परिस्थितीत अडकलो ती परिस्थिती काय होती याची मी ४ उदाहरणं सांगतो. तो काळ आता जगाच्या विस्मृतीत जायला सुरुवात झालेली आहे. तरी अजूनही तो आमच्या हृदयात धुमसतो आहे. त्या काळातल्या या ४ गोष्टी आहेत.

१. एका युरोपिअन शहरातली गेस्टापो राहात असलेली एक बिल्डींग. गेस्टापोंनी दोन संशयित ताब्यात घेतलेले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना बांधून ठेवलेलं आहे. बिल्डींगची मालकीण सकाळी उठून, छान न्याहारी करून प्रसन्नपणे आपली घरकामं करायला सुरुवात करते. रक्तबंबाळ झालेल्या माणसाने ती करत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तिला जाब विचारल्यावर ती म्हणते, ‘मी माझ्या भाडेकरूंच्या व्यवहारात लुडबूड करत नाही.’

२. लिओनमध्ये, माझ्या एका सहकाऱ्याला उलटतपासणीच्या तिसऱ्या फेरीसाठी तुरुंगातून बाहेर काढून फरपटत नेलं जातं. आधीच्या दोन फेऱ्यांमध्ये त्याचे कान गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्यानं त्या फाटक्या कानांवर बँडेज बांधलेलं आहे. आधीच्या दोन फेऱ्यात असलेला जर्मन ऑफिसर याही फेरीत आहे. तरीही तो ऑफिसर त्याला जणू काही घडलंच नसल्याच्या प्रेमळ स्वरात विचारतो, ‘मग, कान बरे आहेत का?’

३. ग्रीसमध्ये, एक भूमिगत प्रतिकार मोडून काढला जातो. यानंतर जर्मन ऑफिसर त्यानं ओलीस ठेवलेल्या तीन लोकांच्या फाशीची तयारी करतो. त्या तिघांची आई ऑफिसरच्या हातापाया पडून भीक मागते. यानंतर तो तिघांपैकी एकाला सोडून द्यायला तयार होतो. फक्त तो एक अट घालतो. तिघांपैकी कोणाला सोडून द्यावं हे त्यांच्या आईनं ठरवायचं. आई मोठ्या मुलाची निवड करते कारण त्याला मूलबाळ आहे, कुटुंब आहे. पण तिची ही निवड इतर दोघांसाठी मृत्युफर्मान आहे. आणि नेमकं हेच जर्मन ऑफिसरला हवं आहे.

४. हद्दपार केलेल्या काही महिलांना स्वित्झर्लंडमार्गे पुन्हा फ्रान्समध्ये पाठवलं जातं. स्वीस हद्दीत प्रवेश केल्यावर त्यांना एक अंत्यविधी चाललेला दिसतो. हे दृश्य नुसतं पाहूनच त्या जवळ जवळ वेड्यासारख्या हसू लागतात. ‘पहा मेलेल्यांना इथे असं वागवतात,’ त्या हसताना म्हणतात.

मानवतेवर संकट आलेलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर केवळ ‘होय’ इतकंच मी देऊ इच्छित नसल्यामुळे मी या चार गोष्टी निवडल्या. मी इतका वेळ ज्या माणसांबद्दल बोलत होतो त्यांनी या प्रश्नाला जे उत्तर दिलं तेच उत्तर देणं मला या गोष्टींमुळे शक्य होईल. ‘होय मानवतेवर संकट आलेलं आहे. कारण आजच्या जगात आपण माणसाच्या मृत्यूचा किंवा छळाचा विचार अलिप्ततेनं, मैत्रीपूर्ण काळजीनं, शास्त्रीय कुतूहलानं किंवा सहज निष्क्रियतेनं करू शकतो आहोत.’

होय. मानवी पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. कारण माणसाला मारून टाकणं या गोष्टीची भयानकता किंवा संताप आपल्याला न जाणवता काहीतरी वेगळंच वाटू लागलेलं आहे. कारण मानवी यातनांकडे आपण काहीसं कंटाळवाणं बंधन म्हणून पाहू लागलेलो आहोत. कारण मानवी यातनांना आपण वस्तूपुरवठा किंवा वाण्याकडे लावावी लागणारी रांग याच्या बरोबरीची अपरिहार्यता बहाल केलेली आहे.

या सगळ्या प्रकरणाचा दोष फक्त हिटलरच्या माथी मारणं आणि, ‘आता तो राक्षस मेल्यानं सर्व विष नाहीसं झालेलं आहे’ असं म्हणणं फारच सोपं आहे. आपल्या सर्वांना हे पक्कं माहीत आहे की विष नाहीसं झालेलं नाही. ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात भिनलेलं आहे. ज्या पद्धतीनं राष्ट्रं, राजकीय पक्ष आणि व्यक्ती एकमेकांबरोबर वागतायत त्यातून या विषाचा मागमूस येतोच.

राष्ट्र हे त्याच्या नायकांसाठी आणि खलनायकांसाठी देखील जबाबदार असतं असं मी नेहमी मानत आलेलो आहे. याचप्रमाणे मग, संस्कृती, विशेषत: गोऱ्या लोकांची संस्कृती ही तिच्या यशाबरोबरच विकृतीसाठी देखील जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. या अर्थानं आपण सगळेच जण हिटलर होण्यामागे जबाबदार आहोत. युरोपचा चेहरा ओरबाडून खाल्लेल्या या भयावह विकृतीमागची सर्वसामान्य कारणं शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

मी मगाशी सांगितलेल्या चार गोष्टींतून आपण या संकटाची लक्षणं शोधण्याचा प्रयत्न करू.

पाहिलं लक्षण म्हणजे दहशतवादाचा उदय. माणसांना किंवा ऐतिहासिक शक्तींना त्यांच्या अंगभूत प्रतिष्ठेवर न जोखता फक्त यशाच्या संदर्भात तोलल्यामुळे जी मूल्यविकृती तयार होते तिचा परिणाम म्हणून दहशतवाद जन्माला येतो. युरोपात आज कोणालाही आपल्या भविष्याविषयी खात्री नाही. या ना त्या मार्गानं इतिहास आपल्याला समूळ नष्ट करून टाकेल अशा भीतीत प्रत्येक जण आज जगतो आहे. यामुळे तर पेच निर्माण होणं अटळ आहे.

आज दयनीय झालेल्या माणसाला वाचवायचं असेल, त्याच्या घातक जखमा बऱ्या करायच्या असतील, त्यानंच तयार केलेल्या घाणीत त्याला नष्ट होऊ द्यायचं नसेल तर सर्वप्रथम त्याच्या मनावरचं भीती आणि अनिश्चिततेचं ओझं उतरवायला हवं. आधुनिक सदसद्विवेकबुद्धीला पडणारे प्रश्न सोडवण्यासाठी जे वैचारिक स्वातंत्र्य आवश्यक आहे ते यामुळेच माणसाला पुन्हा सापडू शकेल.

मनमिळवणीची अशक्यता हा या पेचाचा पाया आहे. आपल्यात काहीतरी समान आहे, कुठलीतरी गोष्ट आपल्याला एकत्र आणते असं वाटलं तरच माणसं खऱ्या अर्थानं जगू शकतात. मानवी सादेला मानवी प्रतिसादाची अपेक्षा असते. पण काही माणसांच्या बाबतीत मनधरणी शक्य नाही हा शोध आता आपल्याला लागलेला आहे. एस् एस् च्या माणसे छळछावणीतल्या माणसांना गुरासारखं मारायचे. त्यांनी असं मारलं नाही पाहिजे हे पीडित माणूस त्यांना पटवून देऊच शकत नाही. मी ज्या ग्रीक आईबद्दल सांगितलं तिला त्या जर्मन अधिकाऱ्याला ‘तुला माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे करण्याचा काहीही अधिकार नाही’ हे पटवून देता आलं नाही. एस् एस् किंवा जर्मन ऑफिसर्स आता माणसाचं किंवा मानवजातीचं प्रतिनिधित्व करत नाहीत. संकल्पना किंवा प्रमेयाच्या जवळपास पोहोचलेल्या एका आदिम प्रेरणेचे प्रतिनिधी म्हणून ते वावरतात. यापेक्षा आसक्ती, अगदी जीवघेणी आसक्ती पण परवडली असती. आसक्ती तिचा तिचा प्रवास करते आणि मग कालांतरानं शरीर-मनातली दुसरी एक तीव्र आसक्ती तिची जागा घेण्याची शक्यता असते. पण नुकत्याच आपणच ओरबाडलेल्या कानांबद्दल नाजूक भावना बाळगणारा माणूस आसक्त असूच शकत नाही. तो माणूस हा एक थंड गणिती आकडेमोड झालेला असतो. या आकडेमोडीवर कोणताही निर्बंध शक्य नाही, ना तिच्याशी कुठला संवाद होऊ शकतो.

खऱ्या गोष्टींची जागा छापील गोष्टींनी घेणं, वेगळ्या शब्दांत सांगायचं तर नोकरशाहीचं प्राबल्य वाढणं हे सुद्धा एक संकट आहे. समकालीन माणूस स्वत:च्या आणि निसर्गाच्या दरम्यान एक किचकट आणि अमूर्त यंत्रणा वारंवार निर्माण करताना दिसतो. परिणामत: तो एकाकी पडत जातो. जेव्हा धान्य संपतं तेव्हाच मग धान्याची कुपन्स येतात.

फ्रेंच लोक दररोज साधारणत: जेमतेम १२०० कॅलरीजवर आपली गुजराण भले करोत, पण आमच्याकडे कमीतकमी ६ वेगवेगळे फॉर्म्स भरायचे असतात आणि प्रत्येक फॉर्मवर शेकडो शिक्के मारलेले असतात. नोकरशाही वाढत असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी हेच दृश्य दिसतं. फ्रान्सहून अमेरिकेला येताना मला दोन्ही ठिकाणी असंख्य कागद वापरावे लागले. इतके की, तेवढ्या कागदांत माझ्या व्याख्यानाच्या पुरेशा प्रती छापून त्या लोकांना वाटता आल्या असत्या. मी येण्याची गरजच नव्हती.

या असंख्य कागदांद्वारे, कार्यालयांद्वारे, कार्यप्रणालींद्वारे आपण स्वाभाविक मानवी ऊब नाहीसं झालेलं एक जग निर्माण करतो आहोत. या जगात कोणी कोणाच्या संपर्कात येऊच शकत नाही. जो काही संपर्क करायचा असेल तो फक्त औपचरिक खिडक्यांमधून. माझ्या मित्राच्या फाटलेल्या कानांबद्दल काळजीनं बोलणारा जर्मन ऑफिसर त्याची कृती योग्य समजतो कारण कान ओरबाडणं हा त्याच्या कामाचा भाग होता, कार्यालयीन कामाचा, मग तो चूक असूच शकत नाही. म्हणजेच आता कोणीही एकटा मरत नाही, प्रेम करत नाही, कत्तल करत नाही. सगळंच प्रातिनिधिक होतं. मला वाटतं, चांगलं संघटन यालाच म्हणतात.

खऱ्याखुऱ्या माणसांची जागा राजकीय माणसांनी घेणं हे सुद्धा संकट आहे. व्यक्तिगत आसक्ती आता अशक्य आहे, फक्त जमावाची आसक्ती आता गृहीत आहे. आणि ती अर्थातच अमूर्त आहे. आपल्याला आवडो न आवडो, राजकारण आपण टाळू शकत नाही. एका आईच्या व्यथांचा आपण आदर करतो का किंवा त्यापासून तिला वाचवतो का हे आज महत्त्वाचं नाही. विचारधारेचा, तत्त्वप्रणालीचा जयघोष आज महत्त्वाचा आहे. मानवी यातनांचा आज कोणालाही संताप येत नाही. आपल्या मूर्खपणाबद्दल आपण पूर्णपणे न चुकवलेली किंमत या पातळीवर आज मानवी यातना आलेल्या आहेत. ह्या सर्व लक्षणांना एकत्र केलं तर एक अशी गोष्ट तयार होते जिला आपण कार्यक्षमता आणि अमूर्ततेचा पंथ म्हणू शकतो. यामुळेच आज युरोपियनांना फक्त एकाकीपण आणि नि:शब्दता या दोनच गोष्टी माहीत आहेत. कुठल्याही सामायिक मूल्यांद्वारे ते इतरांशी संवाद साधूच शकत नाहीत. परस्पर आदर असल्यामुळे एकमेकांचं संरक्षण करणाऱ्या मूल्यांना ते पारखे झालेले आहेत. त्यामुळे एकतर बळी पडणं किंवा बळी घेणं हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर उरलेले आहेत.

माझ्या पिढीतल्या स्त्री पुरुषांना जे समजलं ते हे आहे. ह्या पेचप्रसंगाला त्यांनी तोंड दिलं आणि अजूनही देता आहेत. आमच्याकडे असणाऱ्या मूल्यांच्या मदतीनं हा पेच सोडवायचा आम्ही प्रयत्न केला, पण आमच्याकडे मूल्यं नव्हतीच. फक्त आमच्या आयुष्यांच्या असंगतीचं/ हास्यास्पदतेचं भान होतं. सांत्वन आणि निश्चिततेचा संपूर्ण अभाव असणाऱ्या युद्ध आणि दहशतीला सामोरे जात असताना आमची मन:स्थिती अशी होती.

चहूबाजूंनी युरोप व्यापू पाहणाऱ्या नराधमांना शरण जाऊन चालणार नाही हे आम्हाला माहीत होतं. पण प्रतिकाराचं कोणतंही समर्थन आमच्याकडे नव्हतं. ज्याद्वारे दहशतीचा विरोध करता येईल आणि कत्तलींना नकार देता येईल असं कुठलंही मूल्य आपल्याकडे नाही हे आमच्यातल्या प्रतिभावंतांच्या देखील लक्षात आलं. आपला कशावरच विश्वास नसेल, आपल्याला कशालाच काही अर्थ वाटत नसेल, आपण कुठलंही मूल्य कबूल करत नसू तर मग प्रत्येकच गोष्टीला आपली संमती आहे आणि काहीच महत्त्व देण्याच्या लायकीचं नाही. मग सुष्ट दुष्ट असं काहीच नाही आणि मग हिटलरही ना चूक होता ना बरोबर. ज्या सहजतेनं एखादा माणूस स्वत:ला कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी समर्पित करतो त्याच सहजतेनं मग तो लाखो निरपराध माणसांची कत्तल करू शकतो. एका हातानं कान ओरबाडणारा माणूस आपल्या दुसऱ्या हातानं तो कान हळूवार थापटू शकतो. रक्तबंबाळ अवस्थेतल्या माणसांसमोर घर स्वच्छ केलं जाऊ शकतं. मेलेल्यांना सन्मानपूर्वक दफन केलं जाऊ शकतं किंवा कचऱ्यात भिरकावूनही दिलं जाऊ शकतं. सगळं एकूण एकच असतं. कशालाच काही अर्थ नसल्याची आमची धारणा असल्यानं मग शेवटी जो यशस्वी होतो तो योग्य असतो असा निष्कर्ष काढणं आम्हाला भाग पडलं. आणि हा निष्कर्ष इतका खरा आहे की जर हिटलर चुकून युद्ध जिंकला असता तर इतिहासानं त्याचा आणि त्यानं स्वीकारलेल्या घृणास्पद मार्गाचा गौरवच केला असता असं अनेक पळपुटे बुद्धिवादी तुम्हाला सांगत असतात. आणि इतिहास नावाची गोष्ट आज आपण ज्या स्वरूपात पाहतो आहोत त्या इतिहासानं तर नक्कीच हिटलरचा गौरव करून दहशत आणि कत्तलींचं समर्थन केलं असतं. सर्वकाही अर्थहीन मानण्याचं औद्धत्य दाखवून आपणही दहशत आणि कत्तलींचा गौरवच तर करत असतो.

आता हे ही खरं आहे की इतिहासाला काही अर्थ आहे असं आमच्यातल्याही काही जणांना वाटलं. आसपास कुठलंही उच्च मूल्य न दिसल्यामुळे मग त्यांनी ते स्थान इतिहासाला दिलं. या विश्वासाप्रमाणे ते वागले सुद्धा. यामुळे राष्ट्रवाद विसर्जित होईल आणि एक असा काळ येईल जेव्हा साम्राज्यं कुठल्याही संघर्षाशिवाय एका वैश्विक समाजात स्वत:ला विलीन करतील आणि पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतरेल असं त्यांना वाटत होतं. पण या विचाराबरोबर सुद्धा ते आमच्याच निष्कर्षाला येऊन पोहोचले: कशातच काहीच अर्थ नाही. इतिहासाला अर्थ असेलच तर तो संपूर्ण असायला हवा किंवा मग इतिहास अर्थहीन असायला हवा. पण, इतिहास ही गोष्ट कुठलेतरी पारलौकिक नियम पाळते, सर्व मानवजात एका निश्चित ध्येयाकडे प्रवास करते आहे असं या माणसांना वाटत होतं आणि त्याप्रमाणे ते वागले देखील. ‘इतिहास माणसासाठी निर्माण झालेला नसून माणूस इतिहासासाठी निर्माण झालेला आहे’ या हेगेलच्या जवळजवळ तिरस्करणीय सिद्धांताप्रमाणे त्यांचे विचार आणि कृती होती.

सर्व मानवता एका निश्चित विश्वाकडे तर्कशुद्धतेनं कूच करत आहे असं जर्मन इतिहासाचं तत्त्वज्ञान सांगतं. आजच्या जगातला राजकीय आणि नैतिक वास्तववाद याच तत्त्वज्ञानाचा वारस आहे. शून्यवादाची जागा आज संपूर्ण तर्कशुद्धतेनं घेतलेली आहे. अर्थात दोन्हींचे परिणाम सारखेच आहेत. इतिहास जर पारलौकिक आणि अपरिहार्य तर्कशास्त्र मानतो असं धरलं, सरंजामशाहीनं अराजकतेची जागा घ्यावी, राष्ट्रानं सरंजामशाहीची जागा घ्यावी, साम्राज्यांनी राष्ट्र पादाक्रांत करावी आणि मग सरतेशेवटी एक वैश्विक समाज निर्माण व्हावा हे जर्मन तत्त्वज्ञान खरं मानलं तर मग याच्या करता होणारी कुठलीही अपरिहार्य प्रक्रिया योग्यच असणार. याचप्रमाणे मग इतिहासात झालेल्या गोष्टी निश्चित सत्य म्हणूनच समोर येणार. आणि इतिहास तर युद्ध, कटकारस्थानं, व्यक्तिगत आणि सामूहिक कत्तली यांनी भरलेला आहे. त्यामुळे मग कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण हे चांगुलपणाच्या किंवा दुष्टतेच्या संदर्भात न होता फक्त कार्यक्षमतेच्या बळावर होतं.

तर यामुळे माझ्या पिढीला आजच्या जगात दुहेरी भुरळ पडते. काहीच खरं नाही असा विचार करणं किंवा इतिहासाच्या अटळणीय शक्तीच तेवढ्या खऱ्या मानणं. बहुतेक जण या पैकी एकाला शरण जातात. त्याचाच परिणाम म्हणून आजचं हे बळजोरीच्या आणि दहशतीच्या इच्छेवर उभं राहिलेलं जग आपण पाहतो आहोत. जर चूक-बरोबर, योग्य-अयोग्य असं काहीच नसेल आणि कार्यक्षमता हेच एकमेव मूल्य असेल तर सर्वाधिक कार्यक्षम असणं म्हणजेच सर्वाधिक ताकदवान असणं असा आजचा नियम आहे.

आजचं जग न्याय्य आणि अन्याय्य या मध्ये विभागलेलं नाही. मालक आणि गुलाम असे त्याचे दोन भाग झालेले आहेत. जो गुलामगिरी लादतो तोच योग्य आहे. छळाचे बळी योग्य नाहीत, घरमालकीण योग्य आहे. छळ करणारा जर्मन ऑफिसर, फाशी देणारा जर्मन ऑफिसर, एस् एस् चे सैनिक ही नव्या जगातली विवेकी माणसं आहेत.

जरा आसपासच्या जगाकडे पाहिलं की आपल्याला हेच दिसेल. हिंसेनं आपल्याभोवती पुरता फास आवळलेला आहे. अविश्वास, संताप, हाव, सत्तास्पर्धा या गोष्टी प्रत्येक राष्ट्रात आणि एकंदरीतच जगात एक काळंकुट्ट, अत्यंत अधीर असं विश्व निर्माण करता आहेत. या विश्वात प्रत्येक माणसाला वर्तमानाच्या मर्यादांत जगण्याची जणू सजा मिळालेली आहे. हा माणूस अनाकलनीय शक्तींनी बंदिवान झालेला आहे. आपल्या पिळवणूकीच्या आयुष्यामुळे तो भुकेला आणि संभ्रमित आहे. प्राकृतिक सत्य, अर्थपूर्ण निवांतपणा, साधासरळ आनंद या गोष्टींपासून तो सहस्र योजनं लांब गेलेला आहे. भविष्याची नुसती चाहूल देखील मग अशा माणसाला क्लेशानं भरून टाकते.

अजूनही आनंदी असणाऱ्या अमेरिकेत राहणाऱ्या तुमच्या सारख्या लोकांना कदाचित हे दिसणार नाही किंवा तितक्या स्पष्टपणे दिसणार नाही. पण मी ज्या माणसांबद्दल बोलतोय ती माणसं गेली अनेक वर्षं हेच पाहतायत. हे पिशाच्च त्यांच्या हाडामासांत भिनलंय, आपल्या प्रेमाच्या माणसांच्या चेहेऱ्यावर ते हेच वाचतायत. त्यांच्या विकल हृदयांत कुठेतरी खोलवरून एक बंड उभं राहील जे सगळंकाही झाडून टाकेल अशी त्यांना आशा आहे. पण राक्षसी प्रतिमांनी झपाटलेल्या हृदयांत हे घडणं सोपं नाही, आणि मधल्या वर्षांची भयानकता त्यांच्या मनावर इतकी ठळक गोंदली गेलेली आहे की ती अनेक वर्षं पुसली जाणार नाही.

इथे खरा प्रश्न सुरू होतो. बळजोरी, दहशत, खऱ्या माणसांची जागा राजकारणी किंवा ऐतिहासिक माणसांनी घेणं, असंगताचं आणि मृत्यूचं राज्य, भविष्य नसलेलं एकाकीपण हे जर या पेचाचे घटक असतील तर हा पेच सोडवण्यासाठी हेच घटक बदलणं गरजेचं आहे.

ह्या अफाट प्रश्नाला आणि आमच्याच सर्व नकारांना आमच्या पिढीला सामोरं जावं लागलं. आम्ही दिलेले सर्व नकार मग आमच्यासमोर दंड ठोकून उभे राहिले.

आमच्या या नकारांमधूनच आम्हाला लढण्याचं बळ उपसून काढावं लागणार होतं. ‘तुम्ही देवावर, प्लेटो किंवा मार्क्सवर विश्वास ठेवा’ असं आम्हाला सांगणं अर्थहीन होतं कारण त्या परीचा विश्वास आमच्याकडे नव्हताच. ज्या जगात आपण बळी पडू किंवा बळी घेऊ असं जग आपण मान्य करायचं का हा एकच प्रश्न आमच्यासमोर होता. अर्थातच, आम्हाला यातलं कोणीच व्हायचं नव्हतं कारण अंतर्मनात आम्हाला हे माहीत होतं की हे विभाजन म्हणजे एक मृगजळ आहे आणि जेव्हा खरी वेळ येते तेव्हा आपण सगळे बळीच जात असतो. मरणं आणि मारणं ही शेवटी एकच गोष्ट होत असल्यानं मरणारे आणि मारणारे यांना शेवटी समान पराभवाला सामोरं जावं लागतं. जगाची ही स्थिती स्वीकारायची की नाकारायची हा प्रश्न आता उरलेला नव्हता. या स्थितीला विरोध करण्यासाठी आपल्याकडे कुठलं रास्त कारण आहे ते समजून घेणं हा खरा प्रश्न होता. आम्ही दुष्टाव्याविरुद्ध लढायला काय म्हणून धजलो? याचं कुठलंही उघड कारण आमच्याकडे नव्हतं. मग आम्ही आमच्या बंडात आणि आमच्या नकारात ते कारण शोधायला लागलो. आणि इथे आमच्या लक्षात आलं की आमचं बंड केवळ आमच्यासाठी नव्हतं. ते अशा एका गोष्टीसाठी होतं जी गोष्ट जगातल्या सर्व माणसांमध्ये समान असते.

हे कसं घडलं?

या करड्या, मूल्यहीन जगात, आपल्याच मनाच्या रेताड वाळवंटात वस्ती करणारे आम्ही लोक होतो. आमच्या बंडानं नक्की काय सूचित केलं? त्यानं आम्हाला सगळं काही नाकारणारे लोक करून टाकलं. पण त्याच वेळी आम्ही कशालातरी होकार ही दिला होता. आम्ही या जगाला नकार दिला, या जगाला आवश्यक असणाऱ्या असंगततेला आम्ही नकार दिला, आम्हाला धमकावणाऱ्या अदृश्य शक्तींना आम्ही नकार दिला, आमच्या डोळ्यांसमोर तयार होत असलेल्या भयावह स्मशानसंस्कृतीला आम्ही नकार दिला. आम्ही एक रेषा आखलेली आहे आणि ती आम्ही कोणालाही ओलांडू देणार नाही हेच आम्ही आमच्या नकाराद्वारे जाहीर केलं. पण त्याच वेळी त्या रेषेच्या अलीकडे असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही कबूल केल्या, त्यांना होकार दिला. आमच्यात असं काहीतरी तत्त्व होतं ज्यानं मानवी यातना निर्माण करण्याचं कटकारस्थान नाकारलं. आणि हे तत्त्व आणखी फार काळ अपमानित करता येणार नाही हे सुद्धा आम्ही दाखवून दिलं.

अर्थातच, या विरोधाभासानं आम्हाला काही काळ स्तंभित केलं. कुठल्याही अस्सल मूल्यांवाचून हे जग अस्तित्वात आहे आणि लढतंय असं आम्हाला वाटलं. आणि तरीही आम्ही जर्मनीविरुद्ध लढत होतोच. पण मला माहीत असणाऱ्या फ्रेंच लोकांनी या प्रतिकाराच्या दरम्यान, गुप्तपणे पत्रकं वाटत असताना, आपण पळपुट्या लोकांना समजून घेऊनही आपली प्रतिष्ठा जपू शकतो हेच दाखवून दिलं. आम्ही जगलो, स्वप्न पाहिली, संघर्ष केला या साध्या वस्तुस्थितीनं देखील आम्ही कुठल्या तरी गोष्टीला होकार दिलेला होता. पण आम्ही होकार दिलेल्या गोष्टीत काही सर्वसाधारण मूल्य होतं का? व्यक्तिगत मतापेक्षा तिचं काही अधिक स्थान होतं का? आचरणाचा नियम म्हणून तिचा काही उपयोग आहे का?

याचं उत्तर साधं आहे.

मी ज्या माणसांबद्दल बोलतोय त्या माणसांची या प्रतिकारामध्ये मरायची तयारी होती. स्वत:च्या अस्तित्वाच्या पल्याड जाणाऱ्या कुठल्यातरी महान मूल्याकरता त्याग करून ते त्यांच्या व्यक्तिगत नियतीच्या पार गेले. आपल्या शत्रुवत दैवाशी लढताना ते एका मूल्याचं रक्षण करत होते. हे मूल्य सर्व लोकांसाठी सामाईक होतं. जेव्हा घरमालकासमोरच माणसांचा अनन्वित छळ होतो, जेव्हा अतिशय कौशल्यानं कान ओरबाडले जातात, जेव्हा आयांना त्यांच्या मुलांना फाशी देणं भाग पाडलं जातं, जेव्हा माणसांना डुकरांप्रमाणे पुरलं जातं.. ..जेव्हा जेव्हा हे घडतं तेव्हा तेव्हा आपल्यातलंच काहीतरी नाकारलं जातं आहे असं या प्रतिकार करणाऱ्या माणसांना वाटलं. आणि नाकारली जाणारी गोष्ट ही काही फक्त त्यांच्या मालकीची नव्हती. ती गोष्ट म्हणजे सर्व माणसांना एकत्र आणू शकणारा चांगुलपणा होता.

होय. त्या भयानक वर्षांनी आम्हाला हा महान धडा शिकवला. प्रागमध्ये झालेला विद्यार्थ्याचा अपमान पॅरीसमधल्या कामगाराला विचलित करू शकतो. जगाच्या एका कोपऱ्यात सांडलेल्या रक्तानं जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातला माणूस व्यथित होऊ शकतो. ही कल्पना सुद्धा वेडगळ, असंगत आणि जवळ जवळ अविश्वसनीय होती. पण त्या असंगत काळातच, सामूहिक प्रतिष्ठा पणाला लागलेल्या त्या सामुदायिक शोकांतिकेतच आम्हाला आमचा हा धडा मिळाला. माणसामाणसातला जिव्हाळा जागवला पहिजे आणि वाढवला पाहिजे हा तो धडा होय. एकदा हे लक्षात आल्यावर आमची कृती स्पष्ट झाली. आणि एकदा का हा धडा लक्षात आला की परिस्थिती कितीही अध:पतनाची असो माणसांकडे दिशादर्शक मूल्य असेलच हे ही आमच्या लक्षात आलं.

परस्परसंवादामध्ये आणि एकमेकांचा सन्मान करण्यामध्ये सत्य दडलेलं आहे हे आम्हाला समजलं. त्यामुळे आता हा संवाद सुरू होणं आवश्यक होतं. पण याकरता माणसांनी मुक्त, स्वतंत्र असणं अतिशय गरजेचं होतं. मालक आणि गुलाम यांच्यात कुठलीही गोष्ट समान नसते त्यामुळे संवाद अशक्य असतो. दुसरी गोष्ट म्हणजे गुलामाबरोबर बोलणं किंवा संवाद करणं शक्य नसतं. होय. गुलामी हे एक मोठं मौन असतं. सर्वात भयावह मौन. या संवादाकरता आम्हाला अन्याय दूर करणं आवश्यक होतं कारण लाभार्थी आणि शोषित यांच्यात कुठलाही संपर्क असू शकत नाही. गरज ही देखील संवादाला मौनाच्या पातळीवर आणून ठेवते. या संवादाकरता आम्हाला असत्य आणि हिंसा या गोष्टी समूळ नष्ट कराव्या लागणार होत्या, कारण असत्य बोलणारा, वागणारा माणूस इतरांपासून स्वत:ला अलग पाडतो आणि अत्याचार करणारा, लोकांना दडपणारा माणूस हा लोकांवर कायमचं वज्रमौन लादत असतो. तर अशा प्रकारे आमच्या बंडाच्या मुळाशी असणाऱ्या नकारात्मक प्रेरणांच्या मंथनातून आम्ही स्वातंत्र्य आणि प्रामाणिकता ह्या मूल्यांना वर घेउन आलो. या खुनी जगाचा विरोध करण्यासाठी संवाद ही कृती आवश्यक होती.आणि आजही जर आपल्याला आपली कत्तल होऊ द्यायची नसेल तर हा संवाद चालू राहणं अतिशय गरजेचं आहे.

अन्याय, गुलामी आणि दहशत ही तीन भयानक अरिष्टं आहेत. यांच्यामुळे माणसं स्मशानवत शांततेत जगतात, माणसामाणसांत फूट पडते, यांच्यामुळे माणसाला समोरचा जिवंत माणूस दिसेनासा होतो. या अधाशी जगापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी माणसाकडे एकमेव मूल्य आहे ते म्हणजे दैवाबरोबर चाललेल्या संघर्षाचा विस्तार. या मूल्यापासून त्याला दूर लोटणाऱ्या या तीन अरिष्टांचा आपण मुकाबला केलाच पाहिजे हे एव्हाना आपल्या लक्षात आलेलं आहे.

संकटांनी जर्जर झालेल्या या जगात आपण काय केलं पाहिजे हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. काय केलं पाहिजे आपण? आपण स्पष्ट आणि रोकठोक असलं पाहिजे. काही विशिष्ट विचारांच्या वळचणीला जाऊन आपण लाखो माणसं मारायला मान्यता देतो हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही खुनी असता म्हणून वाईट विचार करता असं नसतं तर तुम्ही वाईट विचार करता म्हणून तुम्ही खुनी होता. त्यामुळे कोणालाही प्रत्यक्ष न मारता तुम्ही खुनी होऊ शकता आणि यामुळे आपण सर्व जण आज कमी अधिक प्रमाणात खुनी आहोतच.

त्यामुळे पहिली गोष्ट जर कुठली करायची असेल तर ती म्हणजे या प्राणघातक विचारांना आपल्या विचारांतून आणि कृतीतून संपूर्णपणे नाकारणं ही होय.

दुसरी गोष्ट म्हणजे खुल्या विचारांना रोखणाऱ्या दहशतीच्या सावटातून हे जग मुक्त करणं.

संयुक्त राष्ट्रसंघाची एक महत्त्वाची बैठक याच शहरात होणार आहे. मृत्युदंडाच्या शिक्षेचं निर्मूलन हे या जागतिक संघटनेचे पहिले लिखित शब्द असावेत असं आपण सर्वानी मिळून सुचवायला हवं. न्यूरेम्बर्ग खटल्यांच्या पार्श्वभूमीवर तर आपण हे करायलाच हवं.

आणि करण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शक्य होईल तेव्हा राजकारण त्याच्या योग्य जागी म्हणजेच दुय्यम स्थानी नेऊन ठेवणं. आपण जगाला राजकीय आणि नैतिक शिकवण देण्याची काहीही गरज नाही. आपल्या काळाचं महान दुर्दैव हे आहे की आज राजकारण आपल्याला एक शिकवण, संपूर्ण तत्त्वज्ञान आणि काही प्रसंगी तर प्रेम करण्याचे नियम सुद्धा पुरवू पाहतं आहे. पण गोष्टी नीट ठेवणं एवढंच राजकारणाचं काम आहे. आपले आंतरिक प्रश्न ढवळण्याचा त्याला काही अधिकार नाही. आपल्या आंतरिक प्रश्नांत संपूर्ण असं काही असतं असं मला वाटत नाही. आणि जरी असलं तरी राजकीय स्वरूपाचं नसतं. किंबहुना ते संपूर्णत्व ही सगळ्यांनी मिळून ठरवण्याची गोष्ट नव्हेच. ती व्यक्तिगत गोष्ट आहे. संपूर्णत्वाचा अर्थ ठरवण्याचं आंतरिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आणि आपल्या बाह्य नातेसंबंधांनी हे स्वातंत्र्य आपल्याला दिलं पाहिजे.

आपलं जीवन इतरांच्या मालकीचं असतं यात काही शंका नाही. गरज पडली तर त्या जीवनाचा त्यागदेखील करावा. पण आपल्या मृत्यूवर मात्र फक्त आपली मालकी असते. माझी स्वातंत्र्याची व्याख्या ही आहे. आपण करण्याची चौथी गोष्ट म्हणजे आपल्या नकारात्मकतेच्या जमिनीतूनच आपण सकारात्मक कृतीसाठी आवश्यक सकारात्मक मूल्यं निर्माण केली पाहिजेत. ही मूल्यंच आपल्या नकाराला सकाराशी सुसंगत करतील. अर्थात हे काम तत्त्वज्ञांचं आहे, मी फक्त हे इथे नमूद करतो आहे इतकंच.

आता पाचवी गोष्ट म्हणजे या दृष्टिकोनाचा अर्थ संपूर्णपणे समजून घेणं. या दृष्टिकोनाद्वारे आपल्याला जगातली सर्व चांगल्या विचारांची लोकं एकत्र येऊ शकतील अशी एक वैश्विकता तयार करायची आहे. एकाकीपणा मागे सोडायचा असेल तर आपण बोललं पाहिजे. आपण कायम मोकळेपणानं बोललं पाहिजे, कुठल्याही प्रसंगी खोटं बोलता कामा नये आणि कायम आपल्याला खरी वाटणारी प्रत्येक गोष्ट सांगितली पाहिजे. पण आपण केवळ आपल्या सामायिक जाणिवांद्वारे घडलेल्या जगातच कायम खरं बोलू शकतो. त्यामुळे श्री. हिटलर हे चूक बरोबर ठरवू शकत नाहीत. किंबहुना आपलं सत्य इतरांवर लादण्याचा अधिकार या जगातल्या कोणालाही आज आणि कधीच आपण बहाल करता कामा नये. सर्व स्त्रीपुरुषांची मिळून तयार झालेली जाणीव आपलं हे स्वप्न पूर्ण करेल. या सामूहिक जाणीवांना पोषक असणाऱ्या मूल्यांचा आपण पुन्हा शोध घ्यायला हवा. आपल्याला मिळवायचं आहे ते खोटं न बोलण्याचं स्वातंत्र्य. ते मिळाल्यानंतरच आपण आपल्या जगण्यामरण्याची कारणं शोधू शकू.

तर आपण सगळे आज इथे उभे आहोत. मी कदाचित इथे पोहोचण्यासाठी थोडा लांबचा रस्ता निवडला. पण शेवटी मानवजातीचा इतिहास म्हणजे तिच्या चुकांचा इतिहास आहे, सत्यांचा नव्हे. सत्य हे बहुदा आनंदाप्रमाणे असतं, साधं आणि कोणताही इतिहास नसलेलं. मग आपण आपले सगळे प्रश्न सोडवले आहेत असा याचा अर्थ घ्यायचा का? अर्थातच नाही. हे जग ना अधिक चांगलं झालंय ना अधिक समजूतदार. आपण अजूनही अर्थहीनता मागे टाकलेली नाहीच पण वागणुकीत बदल घडवण्यासाठी आपल्याकडे आज किमान एक कारण तरी आहे. ह्या कारणाचीच तर इतकी वर्षं आपल्याला कमतरता भासत होती. स्त्री पुरुषांशिवायचं जग सुद्धा अविचारीच असेल हे खरंच पण आज स्त्री पुरुष या जगात आहेत. त्यांच्या आसक्तींसह, स्वप्नांसह, जिव्हाळ्यासह ते इथे वावरतायत हे ही खरं आहे.

युरोपात आमच्यासारख्या काही जणांनी आपल्या जगाविषयीच्या निराशावादाची सांगड मानवतेविषयीच्या प्रगल्भ आशावादाशी घातलेली आहे. आपण इतिहासापासून निसटून जाऊ शकत नाही कारण आपणच इतिहास आहोत. माणसाचा जो भाग इतिहासाच्या मालकीचा नाही तो भाग वाचवण्यासाठीच फक्त आपण या इतिहासाच्या युद्धभूमीवर संघर्ष करण्याचं स्वप्न पाहू शकतो. इतिहासाकडे पाठ न फिरवता पण त्याचवेळी इतिहासाचं दास्य न पत्करता माणसानं ज्या मार्गांनी सभ्यता विकसित केली ते मार्ग आपल्याला पुन्हा धुंडाळायचे आहेत. असे मार्ग ज्यात समष्टीच्या बंधनांचा तोल व्यक्तिगत चिंतन, सुख आणि आनंद यांनी साधला जाईल.

मी पुढे जाऊन असंही म्हणेन की आम्ही प्रसंग, घटना, वस्तुस्थिती, संपत्ती, सत्ता, इतिहास आणि यामुळे तयार होणारं जग या सर्वांचं उदात्तीकरण करायला ठाम नकार देऊ. आम्हाला माणसाची स्थिती सर्वात महत्त्वाची असेल. आज ती काय आहे हे आपल्याला माहीत आहे. अशी भयानक स्थिती शतकानुशतकं रक्ताचे पाट वाहवते आणि अंतिमत: मानवी नियतीतच काही अनाकलनीय पालट घडवण्याच्या क्षणाला येऊन ठेपते. हाच तर नियम आहे. १८ व्या शतकात फ्रान्समध्ये वर्षानुवर्ष देठांसारखी मुंडकी उडत होती. फ्रेंच क्रांतीनं सगळ्यांची मनं उत्साहानी आणि दहशतीनी पेटवून दिली होती. पुढच्या शतकात प्रवेश करताना पारंपरिक राजसत्तेची जागा घटनात्मक राजसत्तेनी घेतली. २० व्या शतकात फ्रान्समध्ये रहाणाऱ्या आमच्यासारख्यांना हे सत्य चांगलंच माहीत आहे. युद्ध, शत्रूताबा, सामूहिक कत्तली, हजारो तुरुंग आणि शोकानं उन्मळून पडलेला युरोप.. आमच्या निराशा कदाचित काही प्रमाणात दूर करणाऱ्या किमान २ ते ३ आंतरिक सत्यांचं आम्हाला आकलन होण्याकरता इतकं सगळं घडावं लागलं.

अशा स्थितीत आशावाद हे एक कारस्थान वाटतं. आम्हाला हे माहीत आहे की आज जी मेली आहेत ती आमच्यातली सर्वोत्तम माणसं होती कारण त्यांनी याच कामासाठी स्वत:ला नियुक्त केलं. आणि आज जिवंत असलेल्या आमच्यासारख्या सगळ्यांनी आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून जिवंत आहोत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि याच कारणामुळे आजही आम्ही विरोधाभासातच जगतो आहोत. फरक इतकाच आहे की या पिढीनं आपल्या विरोधाभासाला मानवजातीबद्दलच्या अपरिमित आशेशी जोडून घेतलेलं आहे. मला आज तुम्हाला फ्रेंच जाणिवांबद्दल सांगायचं होतं. त्यातलं एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी पुरे आहे. मानवी स्थितीबद्दल आशावादी असणारा वेडा आहेच पण घडणाऱ्या गोष्टींबद्दल उदासीन असणारा, निराश असणारा मात्र भ्याड आहे असं आज फ्रान्समधली आणि सर्व युरोपातली पिढी मानते. ही पिढी सर्व राजकीय स्पष्टीकरण आणि राजकीय तत्त्वज्ञानाची सत्ता नाकारते. ती हाडामांसाच्या स्त्री पुरुषांना, त्यांच्या संघर्षांना, मुक्ततेसाठी ते करत असणाऱ्या झगड्याला मान्यता देते. वैश्विक आनंद आणि वैश्विक समाधान मिळवणं शक्य आहे असं ह्या पिढीला वाटत नाही, पण मानवी दु:ख कमी करणं शक्य आहे असं तिला वाटतं. जग ही मुळातच दु:खी जागा असल्यामुळे आपण आनंद निर्माण करणं गरजेचं आहे. जग हे मुळातच अन्यायी असल्यामुळे आपण न्यायासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि जग हे अर्थहीन असल्यामुळे आपण त्याला अर्थ देणं गरजेचं आहे. शेवटी या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ हाच की आपण आपल्या विचार आणि कृतीमध्ये विनम्र असलं पाहिजे आणि ठामपणे उभं राहून आपलं सर्वोत्तम काम केलं पाहिजे. आपण पक्ष, सरकारं यांच्या पलीकडे जाणारे समुदाय निर्माण करून देशादेशांतले मानवी संवाद वाढवले पाहिजेत. पोलीस, सैनिक आणि पैसे यांचं जग आता बंद होऊन खऱ्याखुऱ्या स्त्री पुरूषांचं, कामाची फलप्राप्ती देणारं आणि विचारपूर्वक फुरसत निर्माण करणारं जग आता निर्माण व्हायला हवं. आणि हेच तत्त्व या खुल्या समुदायाचे लोक आपल्या बोलण्यातून आणि जगण्यातून ठसवतील. मला वाटतं की आपले प्रयत्न, आपले विचार आणि गरज पडली तर ,आपले त्याग आपण या दिशेला केंद्रित केले पाहिजेत. प्राचीन जग सॉक्रेटीसच्या खुनापासून भ्रष्ट व्हायला सुरुवात झाली आणि या युद्धात तर युरोपात आपण त्याच्यासारखे अनेक मारले. हा एक संकेत आहे. स्वत:बाबत कठोर राहूनही इतरांच्या आशाआकांक्षांमध्ये गुंतून रहाण्याचं सॉक्रेटिसी तत्त्वच फक्त या खुनी राजवटीला खरोखर धोका निर्माण करू शकतं असा या संकेताचा अर्थ आहे. केवळ ही मनोवृत्तीच जग दुरुस्त करू शकेल. सत्ता आणि हुकुमत यांवर अवलंबून असलेले बाकीचे सर्व प्रयत्न, ते कितीही प्रशंसनीय असले तरीही माणसांमध्ये फक्त आणखी दु:खद विकृती निर्माण करतील. ही साधी पण क्रांतिकारक समज सध्या फ्रान्स आणि युरोप अनुभवतो आहे.

आज एक फ्रेंच लेखक, अमेरिकेतल्या त्याच्या औपचारिक, अधिकृत, शिष्टसंमत भेटीमध्ये तुमच्याशी बोलत असताना आपल्या देशाचं कुठलंही आदर्श चित्र तुमच्यापुढे मांडण्याचं बंधन पाळत नाही आणि आतापर्यंतच्या भाषणात त्यानं प्रचाराचा कोणताही प्रयत्न केलेला नाही या गोष्टीनं तुम्ही सगळे कदाचित चकित झाला असाल. पण जे मुद्दे मी मांडले त्यातच मी असं का केलं नाही याचं उत्तर दडलेलं आहे. माणसांकडे नसलेल्या भावना निर्माण करून त्या चेतवणं हे प्रचाराचं काम असतं. पण हा सर्व अनुभव घेतलेले फ्रेंच लोक कुठल्याही हुकुमान्वये दया किंवा प्रेम मागत नाही आहेत. त्यांचा सर्वात मोठा राष्ट्रीय प्रश्न हा जगाच्या मतावर अवलंबून नव्हताच. आम्ही आमची प्रतिष्ठा राखू, वाचवू शकू का हे जाणून घेणंच आम्हाला त्या ५ वर्षांत सर्वात महत्त्वाचं वाटत होतं. युद्ध संपल्यावर आमचं म्हणणं मांडण्याचा हक्क आमच्याकडे सुरक्षित असेल का हा तो प्रश्न होता. आणि तो हक्क दुसऱ्या कोणी बहाल करावा असं आम्हाला निश्चित वाटत नव्हतं. आम्हीच तो हक्क स्वत:ला बहाल करणं गरजेचं होतं. हे सोपं नव्हतं. पण शेवटी आम्ही हा हक्क स्वत:ला दिला कारण आम्हाला, फक्त आम्हालाच आमच्या त्यागाची परिसीमा ठाऊक होती. तरीही कुठलाही नीतीपाठ आम्हाला पढवायचा नव्हता. मानवजातीबद्दल फार जास्त काळ तिरस्कार दाखवल्यामुळे जे आज पराभूत झालेले आहेत त्यांनी आमच्यावर आधी जे अपमानास्पद मौन लादलं त्या मौनातून सुटका करवून घेण्याचा मात्र आम्हाला अधिकार होता. आपली जागा कशी राखावी हे आम्हाला नक्कीच माहीत आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा इतकंच मी या पुढे सांगेन.

काहीजणांच्या म्हणण्याप्रमाणे अशी शक्यता आहे की पुढच्या ५० वर्षांत घडणाऱ्या इतिहासात फ्रान्स सोडून इतर राष्ट्रांचा वाटा असेल. या प्रश्नावर माझं व्यक्तिगत मत कुठलंही नाही. मला इतकंच माहीत आहे की पंचवीस वर्षांपूर्वी १६,२०,००० आणि गेल्या काही वर्षांत आणखी काही लाख माणसं गमावलेला आमचा देश आज थकलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि सहानुभूती किंवा हेटाळणीमुळे ही वस्तुस्थिती बदलू शकणार नाही. त्यामुळे रदबदली करणं किंवा त्यावर परिणाम घडवू पाहणं मला हास्यास्पद वाटतं. पण या वादांमधूनच आजचा जागतिक सत्तासंघर्ष उद्भवला आहे हे अधोरेखित करणं मात्र मला बिलकुल हास्यास्पद वाटत नाही. आजच्या संध्याकाळचा सारांश काढताना आणि माझ्यापुरतं बोलताना मी इतकंच म्हणेन की जेव्हा आपण फ्रान्सची किंवा दुसऱ्या कुठल्याही देशाची सत्तेच्या संदर्भात पारख करतो आहोत तेव्हा आपण त्यापायी शेवटी निर्माण होणाऱ्या मानवी क्रौर्याच्या संकल्पनेलाच प्रोत्साहन देत आहोत. माणसाची हुकुमत गाजवण्याची प्रवृत्ती दृढ करून आपण आता कत्तलींना सामाजिक मान्यता देण्याच्या दृष्टीनं आपला प्रवास सुरू केलेला आहे. जे कृतीला लागू पडतं तेच कल्पनांनाही लागू पडतं. साध्याकडे नेणारे सर्व मार्ग न्याय्य असतात असं लिहिणारे किंवा ताकदीच्या फुटपट्टीवर महानता मोजणारे सर्व जण आज युरोपला विद्रूप करणाऱ्या निर्दयी आणि क्रूर गुन्हेगारीसाठी जबाबदार आहेत.

मला वाटतं की जे सांगणं मी माझं कर्तव्य मानत होतो ते सर्व मी इथे व्यक्त केलेलं आहे. माझ्या युरोपियन कॉम्रेडसच्या आवाजांशी प्रामाणिक राहणं हे माझं कर्तव्य होतं. तुम्ही त्यांना अतर्क्य फुटपट्ट्यांवर जोखू नये हे महत्त्वाचं होतं. कारण ते कोणालाही जोखताना माणूसपणाशिवाय कोणतीही कसोटी लावत नाहीत. याला अर्थातच खुन्यांचा अपवाद आहे. हरेक माणसात वसणारं मानवी सत्य शोधण्याची क्षमता प्रत्येकात आहे अशा ठाम विश्वासानं आणि आशेनं ते राष्ट्रांकडे पाहतात. विशेषत: आजच्या श्रोत्यांमधल्या तरुणांना मला हे सांगावसं वाटतं. स्वातंत्र्य आणि आनंद आज तुम्हा अमेरिकन लोकांच्या चेहेऱ्यांवर झळकताना दिसतो आहे. आणि मी आत्ता ज्या लोकांबद्दल बोललो त्यांना तुमच्या माणुसकीबद्दल व स्वातंत्र्याच्या आणि आनंदाच्या अभिरुचीबद्दल फार आदर आहे. होय. जगातल्या प्रत्येक सत्प्रवृत्तीच्या माणसाकडून असलेली अपेक्षा त्यांना तुमच्याकडूनही आहे. ती म्हणजे जगभरात संवादाचं चैतन्य खेळवण्यासाठी निष्ठापूर्वक सहाय्य करणं.

आमचे संघर्ष, आमच्या आशाआकांक्षा, आमच्या मागण्या लांबून पहाताना तुम्हाला गोंधळलेल्या वाटतील किंवा निष्फळ ही वाटतील. आणि हे ही खरंच आहे की शहाणपण आणि सत्य नावाच्या काही गोष्टी असतीलच तर त्यांच्याकडे जाणारे सरळ आणि साधे मार्ग या माणसांनी निवडले नाहीत. याचं कारण म्हणजे जगानं किंवा इतिहासानं त्यांना काहीच सरळपणानं किंवा साधेपणानं उपलब्ध करून दिलं नाही. जे सत्य त्यांना उपलब्ध परिस्थितीमुळे गवसलं नाही ते सत्य ते स्वत:च्या हातांनी आज घडवू पाहतायत. यात ते अयशस्वी होतील कदाचित. पण मला असं नक्की वाटतं की ते जर अयशस्वी झाले तर सगळं जग अयशस्वी होईल. हिंसेनं आणि खोलवर रुजलेल्या द्वेषानं विषारी झालेल्या युरोपातून, दहशतीनं चिरफाळ्या उडालेल्या जगातून ते माणसासाठी अजूनही जितकं काही वाचवता येईल तितकं वाचवतायत. ही तर पोलादी आकांक्षाच म्हणायला हवी. आणि आज जर अशा आकांक्षांना फ्रान्समध्ये काही अभिव्यक्ती मिळत असेल आणि जर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो असेन तर तेच माझं सांत्वन आणि तोच मी माझा मान समजेन.

धन्यवाद.

आल्बेर काम्यू यांनी १९४६ साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दिलेल्या ‘द ह्युमन क्रायसिस’ या ऐतिहासिक भाषणाचे हे मराठी भाषांतर. या भाषणाला सत्तर वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने २०१६मध्ये त्याच सभागृहात विगो मॉर्टनसन या अभिनेत्याने या भाषणाचे पुनर्वाचन केलेले. त्याचा विडिओ इथे उपलब्ध आहे.

छायाचित्र सौजन्य: गेटी फौऊंडेशन

आल्बेर काम्यू: जगप्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता, लेखक आणि पत्रकार होते. द आऊटसायडर , द प्लेग या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. १९५७ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

ओंकार गोवर्धन हे चित्रपट व नाट्यक्षेत्रात अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे, स्तानिस्लावस्कीच्या ‘द आर्ट ऑफ द स्टेज’  या पुस्तकाचे त्यांनी केलेले ‘रंगमंचकला’ हे भाषांतर राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

One comment on “मानवी पेच: आल्बेर काम्यू / ओंकार गोवर्धन

  1. Milind kadane

    Absolutely breathtaking. I am deeply inspired by such intellect and rebellious thinker who have represented the truth that, every human being has unending possibilities of being a good and wise person who can build a happy, satisfied and fearless world.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *