अनुजा घोसाळकर
भाषांतर: निनाद झारे

लेडी आनंदी

०२

back

सोळाव्या शतकातील लंडनमध्ये कवी आणि नाटककार असलेल्या एखाद्या बाईला स्वतंत्रपणे जगायचं असतं तर तिला इतक्या मानसिक तणावात आणि अनिश्चिततेत जगावं लागलं असतं की त्यात तिचा जीवही गेला असता. त्यातून ती वाचलीच असती तर विकृत आणि रोगट कल्पनाशक्ती लढवून तिच्या लिखाणाचे भलतेच अर्थ लावण्यात आले असते आणि ते विरूप करण्यात आलं असतं. आणि माझी खात्री आहे की स्त्रियांनी लिहिलेलं एकही नाटक आपल्या फडताळात नाही हे पाहून तिचं लेखनही निनावीच राहिलं असतं.१

व्हर्जिनिया वूल्फच्या अ रूम ऑफ वन्स ओनच्या रंगावृत्तीच्या संहितेला सामोरं जात मी रंगभूमीतील माझे स्थान काय हा प्रश्न स्वतःला विचारला. या प्रश्नाचं उत्तर वयाच्या ३४ व्या वर्षी मी जेव्हा पूर्णवेळ नाट्य-कलाकार व्हायचं ठरवलं तेव्हा मला मिळालेल्या भूमिका साकारण्यातून आणि उच्चारायच्या संवादातून मिळाले. बाई म्हणून येणा-या मर्यादांनी अस्वस्थ होऊन माझ्या मनात घुमणारी संहिता आणि तिचा प्रयोग निर्माण करायचं मी ठरवलं.  

मौखिक इतिहास आणि वैयक्तिक अर्काईव्ह मला नेहमीच भावत आले आहेत. माझे आजोबा राम टिपणीस हे भारतातले सर्वात वयस्कर रंगभूषाकार होते. त्यांच्याकडून ऐकलेल्या मौखिक इतिहासावर आधारित एक प्रकल्प याआधी मी यशस्वीरित्या हाताळलेला असल्यानं मला त्यांच्या वडिलांची, माधवराव टिपणीसांची जीवन-कथा निवडावीशी वाटली. माधवराव टिपणीस हे माझ्या आईकडून माझे पणजोबा. एकोणिसाव्या शतकात ते मराठी रंगभूमीवर स्त्री-पात्र रंगवत असत. त्यांचे मोठे बंधू यशवंतराव टिपणीस आणि इतर सहकाऱ्यांसोबत त्याकाळी त्यांनी ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’ नावाची नाट्य-संस्था सुरू केली होती. ही नाट्य-संस्था राजकीय स्वरूपाची नाटकं रंगभूमीवर आणत असे. त्याकाळी नाटकातली स्त्री-पात्रही पुरूषच निभावत असत. माधवराव टिपणीस, मामा भट, वामनराव पोतनीस, आणि बालगंधर्व हे पुरूष त्याकाळी त्यांनी केलेल्या स्त्री-पात्रांमुळे प्रसिद्ध होते.

माझं नाट्य-सादरीकरण दोन अभिनेत्यांभोवती फिरते. पहिला १०० वर्षांपूर्वीचा एक पुरूष जो अगदी सहजतेने स्त्री-भूमिका पार पाडतो. आणि दुसरी मी, आजच्या काळातली एक स्त्री, जी रंगभूमीवर अभिनय करण्यासाठी धडपडतेयं. मी माझ्या पणजोबांविषयीची माहिती शोधायला सुरूवात केली. त्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला. पण तिथे काहीच हाती आलं नाही. नाटकांच्या इतिहासावर पुस्तकांमध्ये त्यांचा अगदी ओझरता उल्लेख सापडला. माझा शोध निष्फळ ठरत होता. माधवराव टिपणीस नाटकांच्या इतिहासात अस्तित्वातच नसल्याचं वास्तव स्पष्ट दिसत होतं. मग मी माझ्या कुटुंबियांचे फोटो-अल्बम शोधायला सुरूवात केली. माझ्या एका मावशीकडे त्यांचे तीन फोटो मला मिळाले. आणखी काही नातेवाईकांनी त्यांच्याकडे असलेले फोटो दिले. माझ्या लहानपणी ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या गोष्टींवरून त्यांच्या अंगी पुरूष आणि स्त्री भूमिका एकाच सिद्धतेनं निभावण्याची कला होती असं मला जाणवलं. त्याकाळी समीक्षकांनीही त्यांच्या अभिनयाचं कौतुक केल्याचं माझ्या ऐकिवात होतं. ते रोज पाच लीटर दूध पित आणि कुस्ती हा त्यांचा आवडीचा खेळ होता असंही काही कळत गेलं. पण एवढ्यावर एक संपूर्ण सादरीकरण तयार करणं शक्य होईल काय? त्यांच्या नाटकांच्या इतिहासाचा उल्लेखच मिळत नाही…म्हणजे त्यांचं अस्तित्वच नव्हतं काय? माझ्या जन्माच्या अनेक वर्ष आधी त्यांचा मृत्यू झाला. दूरच्या नातेवाईकांमध्ये त्यांची एक भला माणूस एवढीच ओळख…मग त्यांच्या विषयीच्या माहितीच्या दुष्काळाशी सामना कसा करायचा असा प्रश्न मला पडला…आपल्यातून गेलेल्या माणसाविषयी काहीच माहिती उपलब्ध नसेल, तर आपण त्यांना कसं बरं आठवायचं? याचं उत्तर शोधायचं होतं.

बरंच शोधल्यावर मला त्यांचे, माधवराव टिपणीसांचे वीस एक फोटो मिळाले. त्यांच्या आधारे मी त्यांच्या अभिनयाची ओळख करुन घेण्यास सुरुवात केली. बायकांचे बंड, कीचकवध, भाऊबंदकी, शहाशिवाजी, संगीत चंद्रग्रहण अशा काही नाटकात त्यांनी भूमिका केल्या होत्या.२ वाचनालयात धूळ खात पडलेल्या यापैकी काहीच नाटकांच्या संहिता मला सापडल्या. आश्चर्याची गोष्ट अशी की त्यापैकी एक संहिता ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या वेबसाईटवर सापडली. त्यांनी केलेल्या नाटकांच्या संहिता, त्यांनी त्या नाटकात निभावलेली स्त्री-पात्रं यावरून मी त्यांचं व्यक्तिमत्व रेखाटायला सुरूवात केली. फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने मी माझ्या पणजोबांच्या आयुष्याचा प्रवास काल्पनिक पद्धतीनं मांडायला सुरूवात केली. ऐकीव गोष्टी, फोटो, जुनी कागदपत्रे, मुलाखती, नाट्य परीक्षणं यांच्या आधारे मी एक रंगावृत्ती तयार केली. तिचं शीर्षक लेडी आनंदी. माधवरावांनी १९०९ साली रंगभूमीवर साकारलेल्या भाऊबंदकी नाटकातल्या आनंदीबाई पेशव्यांच्या भूमिकेवरून हे शीर्षक घेतलंय. भाऊबंदकी हे नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी लिहिलं. रघुनाथराव पेशव्यांना त्यांचे धाकटेभाऊ नारायणराव पेशवे यांची हत्या करण्यासाठी रघुनाथरावांची पत्नी आनंदीबाईची फूस होती असं कथानक ऐतिहासिक नाटकातून समोर येतं. आनंदीबाईचं पात्र मला भावलं…सत्तेच्या हव्यासापोटी तिनं रघुनाथरावांच्या पत्रात ‘ध चा मा’ केला. त्यातूनच नारायणरावांची हत्या झाली. पत्रात रघुनाथरावांनी त्यांच्या धाकट्या भावाला ‘धरा’ असा संदेश पाठवला. पण कपटी आनंदीबाईनं तो बदलून ‘मारा’ असा केला. तिथूनच मराठीत ‘ध चा मा’ करणे हा वाक्यप्रचारही रुढ झाला. माझ्या कलाकृतीत मी या वाक्यप्रचाराचा ‘From Catch to Kill’ असा अनेकदा वापर केलाय. उपलब्ध असलेल्या विस्कळीत माहितीच्या आधारे मी नाटकातले प्रवेश लिहायला सुरुवात केली. क्रमशः लिखाण न करता माधवरावांबद्दल माहितीपर लिखाण सापडेल तसे मी प्रवेश लिहित गेले.

माधवरावांचा मला मिळालेला हा पहिला फोटो. यात माधवरावांनी लाल रंगाची नऊवारी साडी नेसलीय. आनंदीबाईच्या अंगावर झळाळणारे सोन्याचे दागिने आहेत. माधवरावांची माहिती देणारा हा एकमेव फोटो माझ्या हाती लागल्यानं त्यावेळी कित्येक तास मी या फोटोकडे एकटक बघत राहात असे. मी त्यांचे डोळे, त्यांचा देह, त्यांनी नेसलेली साडी, गुडघ्यात किंचित वाकून आणि खांदे पाडून उभं राहण्याची त्यांची शैली हे सगळं मी डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. एक अभिनेत्री म्हणून मी त्यांनी साकारालेली आदर्श स्त्रीची देहबोली उभी करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यासाठी जितके शर्थीचे प्रयत्न केले, तितकेच ते प्रयत्न फोल ठरत गेले. माधवराव किंवा बालगंधर्वांनी साकारलेली स्त्री-पात्र ही आदर्श स्त्रीच्या जवळ जाणारी होती. कधी कधी ती आदर्श स्त्रीपेक्षाही आदर्श भासत. माधवरावांची आनंदीबाई लेडी आनंदीत उतरवताना हे मला जाणवलं होतं. म्हणूनच मी माझ्या स्त्री-सुलभ हालचालींना मुरड न घालता रंगमंचावर वावरण्याचं ठरवलं. माधवरावांच्या आनंदबाईची हुबेहुब नक्कल करण्यात मी अयशस्वी ठरत होते. मला एक पुरुषी आवाज ऐकू येत असे…आवाज मला सांगे: “अगं, तू खरीखुरी स्त्री आहेस. “याक्षणी मला जाणीव होते माझ्यातल्या उणीवांची… “कॅन आय बी अ कन्व्हिंसिंग आनंदीबाई?” “डू आय होल्ड द पल्लू राईट?”, “इज इट परफेक्ट वेस्ट साईझ?”, ” इज माय व्हॉईस द राईट पिच”, “इज माय गेझ टू स्टर्न”, ” हे मिस्टर, एम आय वुमन इनफ फॉर यू”…ही वाक्य थेट प्रेक्षकांना उद्देशून म्हटली जातात..

संग्रहातले फोटो हे माझ्या अभिनयकृतीचं अभिन्न अंग होते. ऐतिहासिक लेखी माहितीच्या अभावामुळे या प्रतिमा भूतकाळाचे पुरावे ठरल्या. माझ्या जन्माआधीच्या या सगळ्या घटना असल्यामुळे मला त्यांच्या स्मृती असणं शक्यच नव्हतं. त्यामुळे लेडी आनंदीचा प्रवास एका रेषेत होत नाही. तिचा प्रवास या प्रतिमांमधून उलगडत जातो. फोटोतली आनंदीबाई जशीच्या तशी पुन्हा रंगमंचावर उभी करण्यापेक्षा, मी या फोटोमध्ये स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न केला….हे फोटो माझ्या शरीरावर प्रोजेक्ट केले. “अभिनयकृतीची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली, की ते केवळ फोटोचं प्रात्यक्षिक न राहाता, समाजाचा क्लिष्ट दृष्टीकोन दाखवण्याचा त्यातून प्रयत्न होतो. माझ्या अभिनयातून समाज रचना, राजकीय नातेसंबंध, हे साध्या सोप्या मुद्रांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या डोळ्यासमोर उलगडणारी इतिहासाची पानं किंवा भूतकाळात घडलेल्या घटना, असलं काही माझ्या अभिनयकृतीत येत नाही. काही विशिष्ट मुद्रांमधून प्रेक्षकांना फोटोशी संलग्न अशा तत्कालीन वैयक्तिक आणि राजकीय नातेसंबंधांचा उलगडा करण्याचा माझा प्रयत्न असतो.”३

प्रेक्षकांचं लक्ष माझ्या पणजोबांच्या थिजलेल्या भूतकाळातून, माझ्या जिवंत शरीराच्या वर्तमानाकडे वेधून घेण्याचा हा प्रयत्न असतो. मला आलेला अनुभव, करावा लागलेला संघर्ष माझ्या अभिनयातून व्यक्त करताना त्याच्या विरुद्ध बाजूला ऐतिहासिक सत्याची पडताळणी करून सौंदर्याची बूज राखून तयार झालेली एक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न होतो. १९०९ सालच्या फोटोतला अभिनय आणि वर्तमानातला माझा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करतो. भविष्यात ते लेडी आनंदीला कसे लक्षात ठेवतील…माझं शरीर कुठे संपतं आणि फोटो कुठे सुरु होतो? माझ्या शरीराला भेदून माझ्या पूर्वजांच्या इतिहासाचं गूढ शोधता येईल काय? अशा प्रश्नांची उत्तर शोधत राहावी लागतात.“पहिलं म्हणजे कुठल्याही स्मृती या ऐकणाऱ्या आणि पाहाणाऱ्याच्या मनावर तुकड्या तुकड्यांच्या एका आकृतीबंधाच्या स्वरूपात कोरल्या जातात…दुसरं म्हणजे या स्मृती कोरल्या जात असताना झालेल्या वेदनाच आयुष्यभर त्या आकृतीबंधांची आठवण करून देतात.”४

आपलं शरीर भूतकाळ साठवत असतं. आपण सोसलेल्या यातना आणि त्यातून काढलेले मार्ग यांना जतन करून ठेवलेलं असतं. याशिवाय आपल्या पूर्वजांच्या कथाही त्यात सामावलेल्या असतात असा माझा विश्वास आहे. हा भूतकाळ वर्तमानात आणण्याची प्रक्रिया ‘घाव घालणारी’ आणि ‘जीवघेणी’ असू शकते. लेडी आनंदी मध्ये तीन पात्र आहेत. तिन्ही पात्रं माधवराव टिपणीस यांची पणती म्हणे मीच साकारते. असं का? हा प्रश्न अनेक प्रयोगांच्या वेळी विचारण्यात आला. त्यावर माझं उत्तर साधं आहे. पारंपारिक नाटकात तीन भूमिका तीन अभिनेत्यांनी केल्या असत्या. पण हे नाटक पारंपारिक नाटकांसारखं नाही. काळाच्या ओघात हरवलेल्या माधवराव टिपणीसांना शोधण्याचा हा प्रयत्न होता. मी स्वतः रंगमंचावर असल्यानं हरवलेल्या माधवरावांविषयीच्या अनेक गोष्टी आपोआप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आल्या.

लेडी आनंदी हा एकपात्री प्रयोग असला, तरी एल.सी.डी. प्रोजेक्टर हा या प्रयोगातील अविभाज्य पात्र आहे. फोटो पडद्यावर आणि माझ्या शरीरावर प्रोजेक्ट करण्यासाठी मी त्याचा वापर करते. जेव्हा फोटो नसतात तेव्हा मी या प्रोजेक्टरच्या घाबरवणाऱ्या शुभ्र प्रकाशासमोर अभिनय करते. त्यामुळे पडद्यावर अत्यंत तीक्ष्ण, अविचल अशा सावल्या पडतात. मी सातत्यानं प्रोजेक्टरच्या प्रकाश झोताला आडवी जाते. सुरुवातीला सभागृहातले दिवे वापरायचे नाही, म्हणून मी प्रोजेक्टरचा दिवा वापरला पुढे-पुढे जसा माझा अभिनय फुलत गेला, प्रोजेक्टरचा तो स्पष्ट शुभ्र प्रकाशाची जागा मंद पिवळ्या प्रकाशानं घेतली. त्यामुळे रंगमंचावर इतिहासातली पान उलगडल्याचा आभास निर्माण होऊ लागला. लेडी आनंदीची रचना करताना, काल्पनिक प्रवेश हे वाचून सादर करण्याचं मी ठरवलं. ज्या गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या आहेत, त्या मी संवादाप्रमाणे मुखोद्गत करून सादर करण्याचं निश्चित केलं. संशोधनानं सिद्ध झालेल्या प्रत्येक गोष्टीशी एक फोटो निगडीत आहे. प्रत्येक काल्पनिक प्रवेश हा प्रोजेक्टरच्या मंद पिवळ्या प्रकाशात सादर होतो. ऐतिहासिक संशोधनांचं सादरीकरण करताना फोटोचे पुरावे देणं आवश्यक असतं. पण काल्पनिक गोष्टी फक्त प्रकाश आणि सावल्यांच्या आधारे प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात. सुरुवातीला, हे विरोधाभासी वाटायचं. पण काही दिवसातच मी या विरोधाभासी विचारांकडे वेगळ्या नजरेतून बघायला सुरूवात केली. माझ्या मते ही अभिनयकृती म्हणजे एका मोठ्या इतिहासाला सातत्यानं एखाद्या छोट्या घटनेद्वारे किंवा वैयक्तिक अनुभव कथनातून आव्हान देण्यासारखं आहे. लेडी आनंदीच्या मूळ ढाच्यातच ऐतिहासिक सत्यावर आधारित कल्पनांचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे इतिहासाला काल्पनिकतेची जोड मिळते तर सादरकीरणाला प्रायोगिकतेचा आधार…आणि एक नाजूक पण वेगळ्या धाटणीचा कोलाज उभा राहातो.

हातात कागद घेऊन अभिनय करण्याचा निर्णय महत्त्वाचा होता. त्यामुळे इतिहासातले न भरून निघालेले दुवे साधण्यासाठी काल्पनिकतेचा आधार घेतल्याचं अधोरेखित करण्यात मदत झाली. लेडी आनंदीमध्ये कल्पनातीत विस्तारामुळेच माधवरावाचं आयुष्य रेखाटणं शक्य झालं. लेडी आनंदी हा स्मृतीपट आहे. त्यामुळे या प्रयोगला साचेबद्ध अशी कुठलीच चौकट नाही. शिवाय प्रयोग नेहमीच अपूर्ण आणि खरमरीत अनुभव देणारा ठरतो. मला माझ्या प्रेक्षकांना खंडलेल्या स्मृती आणि ऐतिहासिक संशोधनाच्या एकत्रीकरणाचा अनुभव द्यावयाचा होता. ऐतिहासिक दस्ताऐवज शोधण्याच्या प्रकियेतच कल्पनांना नवी प्रेरणा मिळाली. याच प्रक्रियेतून मी लेडी आनंदीची संहिता तयार केली. संशोधन आणि स्मृतींचा हा प्रवास मांडतांना त्यातले चढ-उतार, बोथट कडा हेच लेडी आनंदीचं वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत एक अपूर्ण प्रयोग म्हणून लेडी आनंदी देशभरात ३० वेळा सादर झालंय. आणि ते सगळे प्रयोग म्हटलं तर कच्चे आणि ताजे राखण्यात यश आलंय.

लेडी आनंदीची रचना करण्याची प्रक्रिया मला भारावून टाकणारी आहे. या प्रक्रियेत अनेकदा स्वतःच्या क्षमेतविषयी संशय निर्माण झाला. आनंद, भीती, राग अशा अनेक भावना दाटून आल्या. पण, सगळ्यात आव्हानात्मक होतं, ते माझ्या अभिनयकृतीला ऐतिहासिक पुरावा असल्याचं सिद्ध करणं. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या प्रश्नोत्तरांच्यावेळी एका तरुण विद्यार्थ्यानं विचारलं, “अभिनय हा ‘ऐतिहासिक’ पुरावा कसा होऊ शकतो? आजच्या संध्याकाळनंतर त्या अभिनयाचा तुमच्याकडे काहीच पुरावा नसेल.” या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी पुढच्या प्रयोगापासून सुरु केला. आता उत्तर शोधायचं म्हणजे मी नेमकं काय करायचं? माझ्या पणजोबांच्या आयुष्याचा पट पन्नास मिनिटांच्या अभिनयकृतीतून रंगमंचावर आणताना मी नेमकं काय करत होते? हा फक्त एक धावता आढावा होता का? ऐतिहासिक पुरावा म्हणजे स्मृती का नसाव्यात? अशा स्मृती, ज्या कालांतरानं आपण विसरतो, किंवा त्याचा ढाचा बदलतो.. या विचारानं मला आणखी अस्वस्थ केलं. मला असं वाटतं की अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला वरवरच्या किंवा नाजूक वाटतात त्याच दीर्घकाळ आपल्या स्मृतींमध्ये टिकून राहातात. शरीर नश्वर असतं. पण श्वास आणि अभिनय करणारं शरीर एक वेगळीच तरलता आणि मृत्यू पलिकडचं जगणं दाखवून जातं. या अंगानं विचार केल्यास स्मृतीही चिरकाल टिकून राहू शकतात. कारण, स्मृतीही तितक्याच तरल असतात. वाहत्या असतात. हीच तरलता स्मृतींना आपल्या आयुष्यात जागा कायम ठेवण्यास मदत करते. आपलं शरीर किंवा आपला मेंदू या स्मृतींचं घरं बनतं किंवा असं म्हणूया की तोच आपला ऐतिहासिक पुरावा बनतो. आपलं शरीर अनेक अपूर्ण घटकांनी बनलेलं आहे. या अपूर्णतेची अनेकदा आपल्यालाही जाणीव नसते. माझं शरीर खरंच अनेक अपूर्ण घटकांनी बनलेलं होतं. मी एक ऐतिहासिक पुरावा म्हणूनच जगत असते आणि म्हणूनच मी जोपर्यंत जिवंत आहे तोवर माधवरावांच्या गोष्टीही जगतील. कदाचित त्यामुळेच मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की मी स्वतः रंगमंचावर उभं राहून त्यांचा आयुष्यपट मांडेन… माझ्यातल्या कलेचा हा आविष्कार अनेकांना पटला नाही. मी दिग्दर्शक व्हावं, लेखक व्हावं, त्रयस्थ राहावं अशी कारणं-वजा सूचना त्यावेळी करण्यात आल्या. माझा रंगमंचावर जाण्याचा निर्धार पक्का होता, पण त्याचं कारण मला माहित नाही. माझ्यातल्या उणीवा मला जगासमोर उघड का करायच्या होत्या हे ही मला माहित नव्हतं.५

माझ्या अभिनयकृतीतून मी सातत्यानं माधवरावांचा शोध घेत राहिले. अखेर मला त्यांची एक जुनी मुलाखत सापडली.६ त्यात माधवराव म्हणतात की ते नियमितपणे आखाड्यात जात. सुरुवातीला रंगमंचावर स्त्रीचं पात्र उभं करणं कठीण जाईल असं वाटलं होतं. पायात जड पैंजण घालून स्त्रीप्रमाणे नाजूक चाल सांभाळावी लागे. कांचनगड मोहना या त्यांच्या पहिल्याच नाटकात ते नायिकेची ‘मोहना’ची भूमिका करत होते. शुभारंभाच्या प्रयोगाच्या वेळी त्यांना मनस्थिती ठीक नव्हती. खोटी पोलकी घालून स्त्रीप्रमाणे आकर्षक उरोज घेऊन रंगमंचावर जाण्याआधी त्यांना अश्रू अनावर झाले…त्यांच्या मोठ्या भावानं त्यांचं सांत्वन केलं. मुलाखतीच्या शेवटी…माधवराव म्हणतात…”मोहनाच्या पहिल्या प्रवेशात तिच्या डोळ्यात अश्रू होते…आणि माझा रडवेला चेहरा अपेक्षित परिणाम साधून गेला…” त्यांची निराश मनस्थिती आणि अभिनेता न होण्याकडचा कल हाच माझ्या अभिनयकृतीचा गाभा आहे. आणि तो माझ्या शेवटच्या दृश्यातून उघड होतो.७

माधवराव टिपणीस (जन्मतारीख माहित नाही, वर्ष-१८७८. मृत्यू- २५ सप्टेंबर १९६५.)

दृष्य ११

अनुजा पडद्याजवळ एका लेवलवर उभी आहे.

माधव आता वृद्ध झालाय.. आणि रंगमंचावर तो त्याच्या अंतर्वस्त्रांत उभा आहे. तो भ्रमिष्ठ झालाय. त्याच्या डोळ्यात हरवल्याची भावना आहे. लोकांच्या प्रतिसादाचा आवाज

(आतापर्यंत पडद्यावर येऊन गेलेले सर्व फोटो पुन्हा एकदा प्रोजेक्टरवरून पडद्यावर येतात. तिच्या शरीरावरून हे फोटो पडद्यावर पोहोचतात… ती स्तब्ध असते. कुठलीही हालचाल नाही. फोटो पडद्यावर येण्याचा वेग हळूहळू वाढत जातो. ती कुठल्याही हालचाली न करता बोलू लागते)

माझ्याकडे असं बघू नका, माझ्याकडे बघू नका..मला इथं उभं राहायचं नाहीये… इथे दुर्गंधी पसरलीय…हजारो प्रेतांची दुर्गंधी… मला अंधारात अदृश्य व्हायचंय…कधीही परत न येण्यासाठी…मला जायचंय…मला जाऊ द्या…आणखी कुणीतरी येईल, माझ्याहून सरस.. मी इथून गेलंच पाहिजे… त्याच्यासाठी मला जागा करून द्यायलाच हवी… थांब, तुझी जागा घेण्यासाठी कुणीतरी येईपर्यंत वाट बघ….

अभिनेत्री बाजूला होते…तिची फोटोसोबतची प्रतिमा पडद्यावर येते… ती बाजूला बसून पडद्याकडे बघत राहते..

स्लाईड शो संपतो…

स्लाईड शो संपल्यावर अभिनेत्री रंगमंच सोडते…प्रकाश येत नाही..आणि प्रेक्षक अंधारातच येणारे आवाज दोन मिनिटं ऐकत राहतात..दोन मिनिटांनी आवाज थांबतो…रंगमंच पुन्हा प्रकाशित होतो…

समाप्त

अनुजा घोसाळकर या बंगलुरूस्थित लेखिका, अभिनेत्री व दिग्दर्शिका आहेत.
निनाद झारे हे पत्रकारिता आणि संज्ञापनशास्त्र क्षेत्रात कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीत निर्माता म्हणून काम केल्यावर सध्या झी २४ तास या वृत्तवाहिनीत निर्माता म्हणून कार्यरत आहेत.

References:

[1] A Room of One’s Own, Virginia Woolf, chapter 3.https://ebooks.adelaide.edu.au/w/woolf/virginia/w91r/chapter3.html

[2] Reference to Madhavrao playing Lady Macbeth or Daryabai

[3] Page 116, Remembering Toward Loss: Performing And so there are pieces- Rivka Syd Eisner in Remembering: Oral History Performance edited by Della Polock, afterword by Jacquelyn Dowd Hall. Published by Palgrave Macmillan, 2005.

[4]Page 106, Remembering Toward Loss: Performing And so there are pieces- Rivka Syd Eisner in Remembering: Oral History Performance edited by Della Polock, afterword by Jacquelyn Dowd Hall. Published by Palgrave Macmillan, 2005.

[5] Page 116, Remembering Toward Loss: Performing And so there are pieces- Rivka Syd Eisner in Remembering: Oral History Performance edited by Della Polock, afterword by Jacquelyn Dowd Hall. Published by Palgrave Macmillan, 2005.

[6]  Page 81, from an essay titled Madhavraovanchi Smurti by Chandrakant Martand Pradhan in Natya Darpan’s Diwali Ank, 1975

[7] All stage directions in italics are read aloud by actor. All characters are played by the same actor. Where no character name is indicated, they are narrations by Lady F. Actual stage directions are written in red.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *